॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

किष्किंधाकांड

॥ अध्याय अकरावा ॥
सीतेच्या शोधासाठी वानरांना पाठविले

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सुग्रीवाची श्रीरामांना विनंती :

दाविला कपिसेनासंभार । अति दाटुगा हनुमंत वीर ।
तेणें सुखावला श्रीरामचंद्र । केला नमस्कार सुग्रीवें ॥१॥
वानरसेना कडकडाटीं । वेगीं रिघों लागे वैकुंठीं ।
अथवा कैलासगिरितटीं । मेरुपृष्ठीं घालूं घाला ॥२॥
रिघोनि पाताळाच्या पोटीं । मारूं दानवांच्या कोटी ।
अथवा दैत्यांचि थाटी । उठउठीं निर्दाळूं ॥३॥
गण गंधर्व सुरवर । यक्ष राक्षस नर किन्नर ।
माझे निर्दाळिती वानर । चराचर उलथिती ॥४॥
लोकालोकांहीपरती । कव घालोनि अवचितीं ।
वानर कृतकार्य साधिती । आज्ञा रघुपति शीघ्र द्यावी ॥५॥

इति ब्रुवंतं सुग्रीवं रामो दशरथात्मजः ।
बाहुभ्यां संपरिष्वज्य प्रीतो वचनमब्रवीत् ॥१॥
ज्ञायतां सौम्य वैदेही निलये रावणस्य च ॥२॥

सीतेच्या शोध करण्याची त्याला आज्ञा :

ऐकोनि सुग्रीववचन । श्रीराम जाला सुप्रसन्न ।
सजानुबाहु पसरोन । दिधलें आलिंगन सुग्रीवा ॥६॥
श्रीराम म्हणे कपिनाथा । सीताशुद्धि करावी आतां ।
कोण स्थानीं रावण वसता । तेंही तत्वता शोधावे ॥७॥
ऐसें बोलतां श्रीरघुनाथा । सुग्रीवें चरणीं ठेविला माथा ।
हर्षें वानरां होय सांगता । शोधावी सीता सत्वर ॥८॥
विनतनामा महावीर । सवें सेना शतासहस्र ।
पूर्वे धाडिला सत्वर । सीता सुंदर शोधावया ॥९॥

रावणाचे वसतिस्थानी व संभाव्य ठिकाणी शोधासाठी सुग्रीव वानरांना पाठवितो :

रावणाचें वसतिस्थान । सीता शोधावी सावधान ।
नगर वन उपवन । गिरि गहन शोधावें ॥१०॥

पश्चिमेस सुषेण, पूर्वेस वितन, उत्तरेस शतबळी व इतर चार उपदिशांना वानर पाठविले :

तारेचा पिता सुषेण । त्याचे सुग्रीवें वंदूनि चरण ।
सीताशुद्धीसी जावें आपण । शोधावी संपूर्ण पश्चिमदिशा ॥११॥
पिता तैसा श्वशुर जाण । माझी कळवळ तुज पूर्ण ।
सीता पहावी सावधान । जन विजन शोधूनी ॥१२॥
सवें शोधावें राष्ट्रोराष्ट्र । पुरें पाटणें नगरें समग्र ।
ग्राम गुहा गिरिकंदर । शिखरें शिखर शोधावें ॥१३॥
वामरांमाजी अति प्रवर । शतबळीनाम महावीर ।
सेना शतकोटीसंभार । शोधूं उत्तरे धाडिला ॥१४॥
कोठें वसताहे रावण । हें मुख्य शोधावें आपण ।
करावें सीतागवेषण । रघुनंदन सुखार्थ ॥१५॥
खटें पुरें खर्वट नगरें । पर्वतसानु स्रोत शिखरे ।
गिरि गुहा विवरें कंदरे । मेरुपाठारें शोधावीं ॥१६॥
आग्नेय वायव्य ईशान्य । नैऋत्यदिशेचा नैऋत्य कोण ।
शोधूं धाडिले कोण कोण । सावधान अवधारा ॥१७॥
पद्म आणि पद्माक्ष । कुमुद आणि कुमुदाक्ष ।
हे चार वीर अति दक्ष । सुग्रीव प्रत्यक्ष सत्मानी ॥१८॥
कोटि कोटि सेना देवोनी । चौघे धाडिले चौकोणीं ।
रावणा मारावया शोधोनी । श्रीरामपत्‍नी आणावया ॥१९॥
रावण नागवेल तत्वतां । शुद्धि आणावी शीघ्रता ।
मग मी करीन त्याचिये घाता । श्रीरामकांता आणीन ॥२०॥
चवघे बोलती आंगवण । रावण मशक बापुडें कोण ।
दृष्टीं पडलिया जाण । घायें निर्दळण करीन ॥२१॥
खांदीं घेवोंनियां सीता । नाचत येऊं तत्वतां ।
सत्य जाण गा कपिनाथा । सुखी श्रीरघुनाथा करूं आम्हीं ॥२२॥
तार आणि दुसरा तरळ । वानरांमाजी वीर प्रबळ ।
शोधूं धाडिला पाताळ । कोटिदळ देऊनियां ॥२३॥

सप्तपाताळ :

अतळ वितळ सुतळ । रसातळ महातळ ।
तळातळ आणि पाताळ । सप्त पाताळे शोधावीं ॥२४॥
पाताळ शोधावयाची गती । मी सांगेन जैशा रीतीं ।
तुम्हीं शोधावें त्याच स्थितीं । सावधानवृत्तीं अवधारा ॥२५॥
पाताळ लोकामाजी जाण । कोठें नंदताहे कोण ।
सुग्रीव सांगताहे आपण । सीता सावधान शोधावी ॥२६॥
अतळीं वसे मयपुत्र बळ । नामें बळ प्रतापें बळ ।
त्याचा मंत्री हलकल्लोळ । दुर्धर दैत्य मळ त्याचा ॥२७॥
तेथें शोधावया रावण । आडवे आलिया दैत्यगण ।
रावणासिहत त्यांते मर्दोन । सीता आपण आणावी ॥२८॥
वितळीं वसे हाटकेंश्वर । उमाकांत कर्पुरगौर ।
जेथील हाटकनदीचा पूर । सुवर्णसंभार प्रवाहे ॥२९॥
रावण शिवाचा शिवगण । तेथें सांपडलिया जाण ।
त्याचा घेवोनियां प्राण । सीता आपण आणावी ॥३०॥
सुतळीं महावैष्णव बळी । ज्याचा द्वारपाळ वनमाळी ।
प्रल्हाद वसे त्याचे जवळीं । वैष्णवकुळीं नांदत ॥३१॥
तेथें सीता आणि रावण । स्वयें शोधावीं सावधान ।
सांपडतां घेवोनि प्राण । सीता आपण आणावी ॥३२॥
त्रिपुर भेदोनि शंकर । रसातळीं मयासुर ।
शिवें स्थापिला महावीर । सहपरिवार वसताहे ॥३३॥
तो सोयरा रावणासीं । तेथें तो असेल सीतेंसी ।
जीवें मारोनियां त्यासी । जानकीसी आणावें ॥३४॥
महातळीं कुद्रुसुत । जे विपधर क्रोधयुक्त ।
सर्प वसताती समस्त । रावण तेथ शोधावा ॥३५॥
जरी आतुडला दृष्टीं । तरी मारुनि त्या उठउठी ।
सीता आणावी गोरटी । सुखसंतुष्टी श्रीरामा ॥३६॥
तळातळीं तंव दानव । फणी मुख्य रायाचें नांव ।
निवातकवच वीर सर्व । वैरी स्वयमेव इंद्राचे ॥३७॥
दनुजन्मे दावनमांदी । टवटाळक नामविधीं ।
संख्य नव्हे शंखशब्दीं । ते मुख्य द्वंद्वा इंद्राचे ॥३८॥
तेथें आतुडलिया रावण । तो निर्दाळावा आपण ।
आडवे दानव आलियां जाण । त्यांचेंही कंदन करावें ॥३९॥
दानवांची असंख्य सृष्टी । तुम्हीं वानर कोट्यनुकोटी ।
रामकार्य लक्षोनि दृष्टीं । उठउठीं मारावे ॥४०॥
दानवांचे अति मर्दन । रणीं करोनि रणकंदन ।
जीवें मारोनि रावण । सीता आपण आणावी ॥४१॥
सातवे पाताळीं महानाग । शतसहस्रफणाभोग ।
वासुकिप्रमुख अनेग । पद्मिनीभोग भोगिती ॥४२॥
स्वर्गीं उर्वशीं रंभा सुंदरी । का पाताळीं पद्मिनी नारी ।
त्यांचिया सौंदर्याची थोरी । चराचरीं वाखाणे ॥४३॥
तेथें अति सावधानता । स्वयें शोध करोनि लंकानाथा ।
सांपडलिया करोनि घाता । सवेग सीता आणावी ॥४४॥

त्याचे खाली शेषशायी :

त्या तळीं त्रिशतयोजनांवरी । शेष वसे सहस्रशिरीं ।
ज्याच्या शरीरभोगावरी । निद्रा करी श्रीरंग ॥४५॥
तेथें जानकी दशशिर । सावध शोधावीं सत्वर ।
सांपडलिया करोनि मार । सीता सुंदर आणावी ॥४६॥
शुद्धि करावी तेथवरी । तेथोनि  परतावें वानरीं ।
वाट काढितां पुढांरी । तुम्ही अघोरीं पडाल ॥४७॥

त्यापुढें अंधतामिस्र नरक :

त्याहूनि तळीं आत्यंतिक । अंधतामिस्र महानरक ।
त्याहूनि तळीं कूर्म देख । आवरणोदक त्या तळीं ॥४८॥
नरका जाती पापी नर । तुम्ही सांडोनि ते मोहर ।
रामनामाचा करोनि गजर । भजा सत्वर श्रीरामा ॥४९॥
स्वर्गभोग नावडे ज्यांसी । पुण्य करिती भोगेच्छेंसीं ।
हे जीव होती पाताळवासी । निजपुण्यासी भाोगावया ॥५०॥
पुण्य नाहीं तिळभरी । जे केवळ पापाचारी ।
ते नर पचती नरकांतरीं । पापेंकरीं महापापी ॥५१।
वीरां सुग्रीव सांगे गर्जोन । तुम्हांसी नागवे जैं रावण ।
शीघ्र शुद्धि आणावी आपण । त्याचें निर्दळण मी करीन ॥५२॥

वानरमंडळींचे आवेशपूर्ण आश्वासन :

वानर बोलती कैवाडें । रावण दहा तोंडाचे किडें ।
सहसीता बांधोनि रोकडें । रामापुढें आणूं जी ॥५३॥
पाताळ शोधावयाची गती । सुग्रीवें केली अति निगुतीं ।
तार वानर स्वर्गाप्रती । धाडी ते स्थिती अवधारा ॥५४॥

स्वर्गलोक :

तार वानर तेजोराशी । सेना शतकोटि तयासरसी ।
सुग्रीवें धाडिला स्वर्गासी । जानकीसी शोधावया ॥५५॥
सुग्रीव बोले ताराप्रती । मी सांगेन स्वर्गगती ।
सीता शोधावी ऐशा रीतीं । सावधानवृत्तीं निजबळें ॥५६॥
पृथ्वीहूनियां वरतीं । सूर्यमंडलाखालती ।
यक्ष रक्ष गंधर्व वसती । तेथें सीता सती शोधावी ॥५७॥
स्वर्ग लोक आहेती बहुत । मी सांगेन सकळित ।
सीता शोधावी तेथ तेथ । सावचित्त निजवृत्ती ॥५५

सूर्यलोक, तारालोक, बुधलोक :

सूर्यलोक लक्षांतरीं । लक्षयोजनें सोम त्यावरी ।
तारालोक त्याहीवरी । लक्षांतरीं वसताहे ॥५९॥
तारालोकाहूनि वरी । बुधलोक लक्षांतरीं ।
बुधलोकाच्याही वरी । दों लक्षांतरी भृगुलोक ॥६०॥

भृगुलोक :

दैत्यगुरु भृगुपती । रावणा शुक्रा अति प्रीती ।
तेथें पहावा निश्चितीं । सीतासतीसमवेत ॥६१॥
तेथें देखिल्या सीता सुंदरी । बळें आणितां निजगजरीं ।
शुक्र बुद्धीं आडवा आला जरी । अवधारीं तेहीविषयीं ॥६२॥
मारुं नये गा ब्राह्मणा । श्रीवामनें केलासे तो काणा ।
फोडोनियां दुसरिया नयना । रामांगना आणावी ॥६३॥
तेथें नसलिया सीता सती । तरी निघावें शीघ्रगतीं ।
शुक्रलोकाहीवरती । दोन लक्ष भौमलोक ॥६४॥

भौमलोक, देवगुरु, शनी, सप्तऋषि :

भौमालोकाच्याही वरी । दोनी लक्ष योजनांतरी ।
देवगुरु वस्ती करी । जो सुरवरीं निजपूज्य ॥६५॥
त्याहूनि दोनी लक्ष योजनीं । सूर्यसुत वसे शनी ।
लक्षयोजन त्याहूनी । वसती मुनी सप्तऋषी ॥६६॥
तेथें आहे अरुंधती । तीसी पुसावी सीता सती ।
ते सांगेल यथानिगुतीं । श्रीरामाप्रती सत्यत्वें ॥६७॥
तेथोनि दक्षलक्षयोजनगतीं । वसताहे अमरावती ।
इंद्र नांदे तो सुरपती । स्वर्गसंपत्तीसमवेत ॥६८॥
तेथें गिंवसावें सीतारत्‍न । चैत्ररथनंदनवन ।
कल्पतरूंचे उद्यान । स्वयें शोधून पहावें ॥६९॥

अलकानगरी :

तेथोनि त्रैलोक्य सकळ । सरलें स्वर्ग मृत्यु पाताळ ।
त्याहीवरी आहे स्थळ । जनकबाळा शोधावया ॥७०॥
कैलासगिरीचे पाठारीं । कुबेराची अलका नगरी ।
सुवर्णकमळें सुगंधकारी । सजीव सरोवरीं विकासती ॥७१॥
ज्या कमळांचा सुगंधू । घेतां ब्रह्मा होय स्तब्धू ।
तेथे शोधावी श्रीरामवधू । कुबेर जेष्ठ बंधू रावणाचा ॥७२॥
तिहीं लोकांहुनि वरतीं । रावणां जावया कैची शक्ती ।
जवळी आहे सीता सती । तिचेनि गति राक्षसा ॥७३॥
सीतेचे हरणसंगती । राक्षस पावतील ऊध्वगती ।
हें बोलिलें बहुतां ग्रंथीं । सत्य जाणती सात्विक ॥७४॥

ध्रुवलोक, महर्लोक :

तिन्हीं लोकांहूनि बाहेरी । भक्तकृपाळू श्रीहरी ।
अलक्षलक्ष लक्षांतरीं । कृपेनें करी ध्रुवलोक ॥७५॥
त्रिलोकीं होता प्रळयकाळ । ध्रुवासी कदा नव्हे चळ ।
तो सर्वदा अचळ । यालागीं अढळ ध्रुवपद ॥७६॥
ध्रुव वीर शुर भगवद्‌भक्त । देखोनि सीता आक्रंदत ।
पाडोनि रावणांचे दांत । सीता निश्चित सोडवील ॥७७॥
ध्रुव अढळपदीं सीता । प्रतिपाळील जैसी माता ।
त्यासीं पुसावे तत्वतां । श्रीरघुनाथसुखार्थ ॥७८॥

तपोलोक :

तेथें न लभे जनकबाळ । आणिक स्थळ अति प्रबळ ।
तें मी सांगेन सकळ । सुनिश्चळ अवधारीं ॥७९॥
तेथें जावया एकचि गती । विकल्प सांडोनियां चित्तीं ।
तैं त्या स्थानाची प्राप्ती । जाण निश्चितीं महावीरा ॥८०॥
पृथ्वीपासोनि कोटियोजन । महर्लोक वसे जाण ।
तेथें वसती कल्पायु जन । ते वसतिस्थान तयाचें ॥८१॥
तेथें शोधावी गा सीता । त्याहूनि कोटियोजनांवरता ।
जनलोक आहे वसता । तेथील अवस्था अवधारीं ॥८२॥
तेथे ऊर्ध्वरेते योगी देख । तेथें वसती सनकादिक ।
सीताा पुसावी आवश्यक । ते निष्टंक सांगतील ॥८३॥
तेथोनि दोन कोटि योजनें अधिक । वसताहे तपोलोक ।
वैराजदेवां निवासक । तपस्वी देख अति शांत ॥८४॥
तपें तापस कर्कश होत । क्रोधयुक्त नित्य संतप्त ।
अल्पासाठीं शाप देत । तेणें भस्म होत तपश्चर्या ॥८५॥
ऐसे तापस ते नव्हेत । वैराजदेव अति शांत ।
तप करिती उपकारार्थ । दीन समस्त तारावया ॥८६॥
भावें करितां भगवद्‌भक्ती । ज्या कर्में जे जे राहती ।
तें तें संपूर्ण तें करिती । उद्धरार्थीं दीनांच्या ॥८७॥
त्यांसी करोनियां नमन । सीता पुसावी आपण ।
पुढें आहे ब्रह्मभुवन । सीताशोधन करावें ॥८८॥

सत्यलोक :

तपोलोकाहूनि देख । चारी कोटि उंच अधिक ।
वसताहे सत्यलोक । चतुर्मुख निजस्वामी ॥८९॥
सृष्टि स्रजी स्वयें ब्रह्मा । त्याचे लोकाचा निजमहिमा ।
सावधान ऐकें प्लवंगमा । नाहीं उपमा त्या स्थाना ॥९०॥
तेथें मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध । मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध ।
मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध । तप विशद मूर्तिमंत ॥९१॥
गायत्री वेदबीज अति गुप्त । मूर्तिमंत असे तेथ ।
वाचा मूर्तिमंत वर्तत । दया मूर्तिमंत उल्लासे ॥९२॥
तिन्ही याग मूर्तिमंत । तिन्ही एकत्वें नांदत ।
सत्य सत्यलोकीं मूर्तिमंत । असत्य तेथ असेना ॥९३॥

तेथे राहणारे लोक :

ते लोकीं वसतीं कोण । जे गायत्रीमंत्रजापक ।
जे ब्राह्मण तीर्थोपासक । यागोपासक निष्कामें ॥९४॥
ब्राह्मणकार्यीं जे निमाले । गोरक्षणार्थ जीव  गेले ।
परोपकारार्थ प्राण वेंचले । ते पावले सत्यलोक ॥९५॥
जिहीं निष्काम द्विज पूजिले । जिहीं निष्काम द्विज भोजिले ।
जिहीं निरपेक्ष यजन केलें । ते पावले सत्यलोक ॥९६॥
जे कृपाळु दीनार्थ देख । जे दयाळु बंधमोचक ।
जे सत्यवादी नित्य सात्विक । ते सत्यलोकनिवासी ॥९७॥
जे परापवादीं मूक । जे परांगनीं नपुंसक ।
जे परद्रव्या पराङ्मुख । ते सत्यलोकनिवासी ॥९८॥
ऐसी सत्यलोकींची स्थिती । तेथील ब्रह्मा अधिपती ।
ब्रह्मसृष्टि याहीवरती । नाहीं निश्चितीं महावीरा ॥९९॥
रावण पौलस्तीचा सुतु । तो होय ब्रह्मयाचा नातु ।
असेल सत्यलोकाआंतु । सीतासम वेतु राहिला ॥१००॥

इंदिरावर सरोवर :

पहावा इंदिरावरसरोवरीं । कां सामसोमावनवृक्षांतरी
ऐक त्या ठायाची थोरी । चराचरी अनुपम्य ॥१०१॥
इंदिरावरसरोवरीं  करितां स्नान । सर्व रसांची गोडी जाण ।
सर्वांगी पाविजे आपण । अमृतपान तें फिकें ॥१०२॥
तेथें घडलिया सभाग्य स्नान । अगाध गोडी पावे पूर्ण ।
सीतासमवेत रावण । तेथें आपण गिंवसावा ॥१०३॥
सामसोमवृक्षच्छायेसीं ।बैसल्या विश्रांति होय कैसी ।
सुषुप्तिसुख तेथींची दासी । स्वर्गसुख त्यासी कुरवंडी ॥१०४॥
ते छायेच्या सुखासाठीं । पुण्य वेंचिती कोट्यनुकोटी ।
तरी त्या छायेची नव्हेचि भेटी । अगम्य गोष्टी पावावया ॥१०५॥
पुण्य करोनि कडोविकडीं । सत्यलोका येती बापुडीं ।
त्यांसी न लाभे ही गोही । ते पुण्यजोडी दुर्लभ ॥१०६॥
जांवयासवें आलें घोडें । दाणा देती करबाडें ।
परी त्या पक्कान्न न जोडे । तेणें पाडें साधका ॥१०७॥
शोधित सत्वाची परवडी । गाळींव पुण्याच्या कोडी ।
तैं पाविजे तेथींची थडी । अगाध गोडी त्या ठायीं ॥१०८॥

नामस्मरणमहिमा :

त्या ठायाचें समाधान । समाधिसुखासमान ।
न करितां भगवद्‌भजन । पुनरागमन तेथें नाहीं ॥१०९॥
यालागीं करितां भगवद्‌भक्ती । चारी मुक्ती दासी होती ।
श्रीरामनामाही परती । साधनशक्ती असेना ॥११०॥
पहा पां कैसे अभागी जन । सांडोनियां श्रीरामस्मरण ।
करितां आन आन साधन । जन्ममरण सोडीना ॥१११॥
नामापासीं साधनशक्ती । नामस्मरणा मुख्य भक्तीं ।
श्रीरामस्मरणें मुख्य भक्तीं । साधु संत स्वयें जाणती ।
तेंचि अनुवादावे किती । कथासंगती अवधारा ॥११३॥
सामसोमवृक्षमेळीं । समवेत जनकबाळीं ।
रावण गिंवसावा महाबळीं । छायेतळीं उपविष्ट ॥११४॥

शिवलोक, कैलास :

तेथेंही नसल्या रावणासी । तरी पहावें कैंलासी ।
शिवभक्ती आहे त्यांसीं । शिवलोकासीं शोधावा ॥११५॥
जावया शिवलोकाप्रती । म्हणाल आम्हां नाहीं शक्ती ।
रामानामाच्या आवर्तीं । सुलभ प्राप्ती शिवलोका ॥११६॥
शिव श्रीरामभक्त संपूर्ण । ऐकोनि श्रीरामस्मरण ।
स्वयें सामोरा येईल आपण । अति सन्मान नामास ॥११७॥
शिव सन्मानी रामासी । नाम स्मरावें अहर्निशीं ।
सुलभ प्राप्ति नामापासीं । शिवलोकासीं जावया ॥११८॥

वैकुंठ-कैलास, शेषशायी प्रलयांत :

वैकुंठ कैलासवृत्तांत । वेदशास्रां अगम्य मात ।
ते मी सांगेन साद्यंत । सीतासुद्ध्यर्थ साधावया ॥११९॥
सप्तावरणाहूनि बाहेरी । मायावरणाभीतरीं ।
वैकुठकैलासाची थोरी । स्वलीला करी श्रीभगवंत ॥१२०॥
प्रळय होती ब्रह्मसृष्टीसीं । वैकुंठकैलासशेषशायीसीं ।
प्रळयो नाहीं या तिहींसी । बोलिला ऋषि याज्ञवल्क्य ॥१२१॥

पाच प्रकारचे प्रळय :

तरी ते तिन्ही प्रळयातीत । म्हणों नये गा निश्चित ।
अत्यंत प्रळयीं प्रळय होत । प्रळय प्राप्त तैं त्यांसी ॥१२२॥
ऐसे प्रळय आहेत किती । पुसावें ऐसें वाये चित्तीं ।
तरी ते सांगेन संकळितीं । सावधवृत्तीं अवधारा ॥१२३॥
पहिला जाण नित्यप्रळय । दुसरा तो मरणप्रळय ।
तिसरा दैनंदिनप्रळय । ब्रह्मप्रळय तो चवथा ॥१२४॥
पांचवा प्रळय आत्यंतिक । त्यासी नेणती कोणी लोक ।
त्याही पांचांचा विवेक । ऐका निष्टंक सांगेन ॥१२५॥

त्यांचे प्रकार :

नित्यप्रळय तो सुषुप्ती । मरणप्रळय होतां मरती ।
ब्रह्मयाच्या दिनांतीं । महाप्रळयो दैनदिन ॥१२६॥
विरोनियां सप्तावरण । ब्रह्मांड विरे गा संपूर्ण ।
सृष्टिकर्ता मरे आपण । ब्रह्मप्रळय जाण हा चवथा ॥१२७॥

आत्यंतिक प्रळय :

आत्यंतिक प्रळयाची गोष्टी । लोक न देखती दृष्टीं ।
तो तंव ब्रह्मज्ञानाच्या पोटीं । गुरुवाक्ये उठी लखलखित ॥१२८॥
बाप गुरुवाक्याची दृष्टी । सान थोर सूमळ निवटी ।
कैंचा देव कैंची सृष्टी । नळी निमटी जीवशिवां ॥१२९॥
ज्ञेय ज्ञान ध्येय ध्यान । दृष्य द्रष्टा आणि दर्शन ।
त्रिघुणत्रिपुटीनिर्दळण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥१३०॥
जेथें जीवशिवत्वा नांही । कैचें वेकुंठ कैलास शेषशायी ।
मींतूपण मुळींच नाहीं । ब्रह्म पाही परिपूर्ण ॥१३१॥
विरे वैकुंठेसीं नारायण । विरे शेषेसीं शेषशयन ।
कैलासेंसीं त्रिनयन । जाय विरोन परब्रह्मीं ॥१३२॥
गुरुवाक्याचेनि बोलें । अत्यंतप्रळयाचें रुप केलें ।
ब्रह्मचि एक एकलें । असे कोंदलें परिपूर्ण ॥१३३॥

राम-सुग्रीव यांची एकात्मता :

ऐकतां सुग्रीवाची गोष्टी । श्रीराम सुखावला पोटीं ।
हर्षे दोघां पडली मिंठी । सुखसंतुष्टी स्वानंदें ॥१३४॥
सुग्रीवा नाठवे वानरपण । श्रीराम नाठवे रामपण ।
ऐक्य देखतां संपूर्ण । सुखीं लक्ष्मण विराला ॥१३५॥
एक पडतांचि मिठी । तिघांचि विराली त्रिपुटी ।
हर्षे कोंदलीसे सृष्टी । सुखसंतुष्टी श्रीराम ॥१३६॥
अत्यंतप्रळयींचे परिपूर्ण । स्वयें श्रीरामचि जाण ।
संमुख देखतांही सगुण । ब्रह्म परिपूर्ण श्रीराम ॥१३७॥
सीताशुद्धीची व्युत्पत्ती । शुद्धब्रह्म श्रीरघुपती ।
वानरां जाली पूर्ण ब्रह्मप्राप्ती । सुख सर्वार्थीं श्रीराम ॥१३८॥
श्रीरामाच्या निजसंगतीं । वानरां पूर्ण ब्रह्मप्राप्ती ।
बाप सत्संगाची ख्याती । निंद्य तें होती अति वंद्य ॥१३९॥
एकाजनार्दना शरण । श्रीराम कारणा कारण ।
रामें रम्य रामायण । नामस्मरण तारक ॥१४०॥
नामें अहल्याउद्धरण । नामें गणिका अति पावन ।
नामें भुक्ति मुक्ति पूर्ण । श्रीरामस्मरण परब्रह्म ॥१४१॥
श्रीराम सगुण दिसे पाहीं । परी तों देहचिं विदेही ।
दीनोद्धारालागीं पाहीं । वना निजपायीं स्वयें जाला ॥१४२॥
जो देवां दुर्लभ नमस्कारा । जो न कळे चेदशास्रां ।
तो सखा जाला वानरां  । रामें वनचरां उद्धरिलें ॥१४३॥
एकाजनार्दना शरण । श्रीराम दीनोद्धारण ।
नामें तरती दीन जन । नामें छेदन भवबंधा ॥१४४॥
श्रीरामनामापरतें । आन साधन नाहीं सरतें ।
एका श्रोतियांतें । श्रीरामथेतें अवधारा ॥१४५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
सीताशुद्ध्यर्थवानरप्रेरणं नाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
॥ ओंव्या १४५ ॥ श्लोक २ ॥ एवं १४७ ॥



GO TOP