॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय चवथा ॥
रावणाच्या शयनभवनांत सीतेचा शोध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

प्रयत्‍नाची पराकाष्ठा करूनही सीतेचा शोध लागत नाही

रावणाचें सभेआंत । न लभे सीताशुद्धीची मात ।
तेणें दुःखें हनुमंत । चिंताग्रस्त दृढ झाला ॥ १ ॥
दृढ प्रयत्‍न केला भारी । समस्त शोधिली लंकापुरी ।
धांडोळिलें घरोघरीं । सीता सुंदरी तेथें नाहीं ॥ २ ॥
विनोदें वाटिका अरामशिरीं । नद नदी वापी पोखरीं ।
राजकुमरांच्या घरोघरीं । सीता सुंदरी तेथें नाही ॥ ३ ॥
प्रत्यावर्ती लंकापुरीं । शतावृत्तीं घरोघरीं ।
शुद्धि घेतां नानापरी । सीता सुंदरी तेथे नाहीं ॥ ४ ॥
स्त्रीपुरूषांचे शेजारी । त्या स्थानांचे उपराउपरीं ।
शोधितां कोट्यनुकोटी नारी । सीता सुंदरी तेथें नाहीं ॥ ५ ॥
रावणाचे सभेमाझारीं । धुराचि गांजिल्या नानापरी ।
शुद्धि न लभेचि निर्धारीं । लंकेमाझारीं नाहीं सीता ॥ ६ ॥
म्यां तंव आपले निजबुद्धीं । जानकी शोधिली नानाविधीं ।
विधाता पावों नेदी सिद्धी । लंकेमधीं नाहीं सीता ॥ ७ ॥
मज शोधितां गुप्तगतीं । लंकेमाझारीं लक्षितां ती ।
चारी अंगुळे नुरेचि रिती । सीता सती एथें नाहीं ॥ ८ ॥
शुद्धि न लभेचि सीता । हनुमंतासी परम चिंता ।
उकसाबुकसीं होय स्फुंदता । केंवी रघुनाथा मुख दावूं ॥ ९ ॥
आणिक एक उपपत्ती । पाहतां रावणाचे हातीं ।
देह त्यागिला योगगतीं । सीता सती तेथें नाहीं ॥ १० ॥
रामबाणाच्या धाकें । रावण पळतां अति तवकें ।
सीता निष्टोनियां तंवकें । पडोनि कुटके होवोनि गेली ॥ ११ ॥
रावण नेटें पळतां । दृढ आवळितां रामकांता ।
कळ लागोनी निमाली सीता । कैंची आतां शुद्धि लाभे ॥ १२ ॥
रावणापासोनि एकसरीं । निष्टोनि पडली सागरीं ।
सीता भक्षिली मत्स्यमगरीं । कैंसेपरी शुद्धि लाभें ॥ १३ ॥
म्यां चाळिल्या नाना युक्तीं । माझ्या मिथ्या मजाचि प्रती ।
संपातीनें लंकेप्रती । सीता सती सांगितली ॥ १४ ॥
मिथ्या नव्हे संपातिवचन । सीता लंकेस आहे जाण ।
दुष्ट नष्ट हा रावण । सीताभक्षण तेणें केले ॥ १५ ॥
हर्षें नेलिया एकांता । वश्य नव्हेचि जनकदुहिता ।
रावणें रागें भक्षिली सीता । कैंची आतां शुद्धि लाभे ॥ १६ ॥
रावणपत्‍न्या नेणों किती । सुंदर देखोनि सीता सती ।
अवघियांवरी श्रेष्ठ सवती । म्हणोनि समस्तीं खादली ॥ १७ ॥
राक्षसीं स्वयें खादली सीता । ऎंसे मानलें कपीचे चित्ता ।
कैंची शुद्धि लाभे आतां । म्यां कां वृथा कष्टावें ॥ १८ ॥
अश्रुपूर्ण झाले डोळे । दुःखे गडबडोनियां लोळे ।
न भेटतां जनकबाळे । कष्ट केले ते वृथा ॥ १९ ॥
वृथा समुद्रलंघन । वृथा लंकेचे शोधन ।
वृथा माझें दादुलपण । सीता चिद्रत्‍न न साधेचि ॥ २० ॥
घेवोनि आलों श्रीराममुद्रा । ते न साधेचि रामभद्रा ।
कैसेनि भेटों श्रीरामचंद्रा । आणि कपींद्रा सुग्रीवा ॥ २१ ॥
सीता मारिली कीं मेली । किंवा रामविरहें निमाली ।
किंवा तरळ भरोनि मेली । कीं उतटली अति दुःखें ॥ २२ ॥
सीता निःशेष नासली । श्रीरामापाशीं वार्ता नेली ।
ऐसी ऐकतांचि बोली । मज आली अपकीर्ति ॥ २३ ॥
सीताप्रियो कांतेकारणें । राम बैसलासे धरणें ।
तिचें ऐकतांचि मरणें । निजप्राणें तो नूरे ॥ २४ ॥
वेगीं लंघोनि उदधी । जेणें श्रीराममरण त्रिशुद्धी ।
ऐसी आणिली शुद्धी । म्हणती हा दुर्बुद्धि वानर ॥ २५ ॥
सेवक नव्हे हा अधःपाती । आप्त नव्हे हा अतिघाती ।
कुशल नव्हे हा मंदमती । श्रीरामघाती हनुमंत ॥ २६ ॥
म्हणती हनुमान बुद्धिवंत । तरी का केला अति अनर्थ ।
याचेनि निमाला रघुनाथ । येणें कार्यार्थ नाशिला ॥ २७ ॥
सांगतां सीतेची ही कथा । अपेश येईल माझे माथां ।
राहों नयें न सांगतां । तेणेंही माथां अति दोष ॥ २८ ॥
स्वामीपाशीं अति गोष्टी । न सांगे तो सेवक कपटी ।
नरका जाइजे उठाउठीं । होईन सृष्टीं अति दोष ॥ २९ ॥
जैसें तैसें मनोगत । गुरूसी सांगावे इत्थभूंत ।
ऐसा विश्वास नाहीं जेथ । नरकपात त्या नरा ॥ ३० ॥
गुरूसी सांगतां मनोगत । संकल्प विकल्प मनीं मुक्त ।
ऐसा विश्वास नाहीं जेथ । नरकपात त्या नरा ॥ ३१ ॥
सांगो जातां अति अनर्थ । न सांगतां नरकपात ।
कांहीं न चले उपाय येथ । चिंताग्रस्त मारूती ॥ ३२ ॥
उल्लंघोनिया सागरा । मज आणिलें लंकापुरा ।
सीता न भेटेचि सुंदरा । पुढील विचारा विवंची ॥ ३३ ॥
मज कल्याण येथे राहतां । किंवा किष्किंधेसी जातां ।
ऐसें चिंतितां हनुमंता । अति उत्पाता पावला ॥ ३४ ॥
तेथें जातां पैं आपण । सांगतां सीतेचें मरण ।
श्रीराम सांडील प्राण । आणि लक्ष्मण तत्काळ ॥ ३५ ॥
राम आणि लक्ष्मण । दोघे निमाले ऐकोन ।
दुःखे भरत देईल प्राण । आणि शत्रुघ्न त्यासवें ॥ ३६ ॥
ऐकोनि पुत्राचें निधन । तिघी माता पावती मरण ।
प्रधान्ही सांडिती प्राण । अयोध्येचे जन निमतील ॥ ३७ ॥
निमाला देखोनि रघुनंदन । दुःखें सुग्रीवा येईल मरण ।
त्यासवें अंगद देईल प्राण । वानरगण निमाले ॥ ३८ ॥
निधन सुग्रीवश्रीरामां । देह त्यजिती तारा रूमा ।
अति दुःख प्लवंगमां । मरणधम रिघतील ॥ ३९ ॥
नळ नीळ जांबवंत । आणि जुत्पत्ती समस्त ।
श्रीरामआप्त त्यां प्राणांत । निमेषार्धांत निमतील ॥ ४० ॥
श्रीरामदुःख अति अचाट । दुसरें सुग्रीवाचें दुःख श्रेष्ठ ।
वानर होतील सपाट । कडेलोट करूनी ॥ ४१ ॥
मज तेथे करितां गमन । सूर्यवंशा निःसंतान ।
वानरवंश पडिला शून्य । तो मज कोण पुरूषार्थ ॥ ४२ ॥
मज येथेंचि राहतां । श्रीराम माझी परमावस्था ।
गुरूवंचकता बैसेल माथां । केंवी रघुनाथा उपेक्षूं ॥ ४३ ॥
उपेक्षोनि श्रीरघुनाथा । मज तेथें न वचता ।
पृथ्वीचे दोष माझे माथां । अधःपाता जाईन मी ॥ ४४ ॥
अति अनर्थ तेथे जातां । परम दोष येथें राहतां ।
अति विचार हनुमंता । कर्तव्यता लक्षेना ॥ ४५ ॥
मज राहतां निजनिवाडें । सीताशुद्धि मागिलीकडे ।
माझीच शुद्धी पडेल पुढें । अति सांकडें श्रीरामा ॥ ४६ ॥
माझे शुद्धीचें कैवाडें । अगाध उदधि कवण उडे ।
श्रीरामा सुग्रीवा सांकडें । रहाणें कुडें येथें माझें ॥ ४७ ॥
अति संकटीं त्यजूं प्राण । तंव मज नयेचि मरण ।
जाळूं न शके हुताशन । न शके पवन मज मारूं ॥ ४८ ॥
जरी करूं पर्वतपतन । तरी ते माझें नित्य उड्डाण ।
बुडवों न शके मज जीवन । मरतां मरण मज न यें ॥ ४९ ॥
वज्रदेही जो मी लाठा । सीताशुद्धीचिया वाटा ।
तो मी झालों अति करंटा । मरण कटाकटा मज नये ॥ ५० ॥
म्हणोनि क्षितितळीं पडे । धाय मोकलोनि दीर्घ रडे ।
माझें दुस्तर सांकडें । कोणापुढे मी सांगों ॥ ५१ ॥
ऐशा माझिया आकांता । धावें पावें गा श्रीरघुनाथा ।
मज नुपेक्षीं सर्वथा । कृपावंता श्रीरामा ॥ ५२ ॥
भावें स्मरतां श्रीरघुनाथा । चित्तचैतन्या निमाली चिंता ।
परमानंद हनुमंता । श्रीरामकांता शोधावया ॥ ५३ ॥
सीताशुद्धीतें शोधितां । इंद्रजितकुंभकर्णांसमवेता ।
करीन रावणाचे घाता । आणि समस्तां राक्षसां ॥ ५४ ॥
नाहीं तरी जीवें जितां । पुच्छीं बांधोनि लंकानाथा ।
श्रीरामापांशी नेईन आतां । त्यासी तो सीता पुसेल ॥ ५५ ॥
रांडवे स्त्रियेचेपरी । मी कां रडतां लंकापुरीं ।
स्वामी श्रीराम माझे शिरीं । भक्तसहाकारी श्रीराम ॥ ५६ ॥
मज साह्य श्रीपती । म्हणोनि उल्लासे मारूती ।
सीता शोधीन मागुती । प्रत्यावृत्तीं साक्षेपे ॥ ५७ ॥
आळस सांडोनि संभ्रम । त्यजोनि विषयविषकाम ।
प्रयत्‍न करितां पैं परम । परब्रह्म आतुडे ॥ ५८ ॥
प्रयत्‍न करोनि विचक्षण । वैकुंठवासी होय पूर्ण ।
शेषशयनी नारायण । होती आपण अति प्रयत्‍नें ॥ ५९ ॥
अति प्रयत्‍न तो मानसिक । तेणें पावती परम सुख ।
मी तंव रामाचा सेवक । सीता सम्यक शोधीन ॥ ६० ॥
उल्लास हनुमंताचे चित्ता । आलस्य सांडोनि विकल्पवार्ता ।
अति साक्षेपें शोधीन सीता । श्रीरघुनाथाचेनि बळें ॥ ६१ ॥
पूर्वीं केले स्वयें शोधन । समस्तही लंकाभुवन ।
शोधिता राहिलें जें जें स्थान । सावधान अवधारा ॥ ६२ ॥
रावाणाचें शयनभवन । आणिक कामग विमान ।
तेथें रिघोनि सावधान । सीता चिद्रत्‍न शोधीन मी ॥ ६३ ॥
ऐसा करोनि इत्यर्थ । रावणाचे गृहाआंत ।
रिघावया पाहे हनुमंत । स्मरे रघुनाथ सद्‌भावें ॥ ६४ ॥
श्रीरामा तुज मी अनन्य शरण । लक्ष्मणा तुजलागी माझें नमन ।
जनकात्मजेसी लोटांगण । निजदर्शन मज द्दावे ॥ ६५ ॥
मी तंव तुझें अत्यंत तान्हें । मज धाडिलें रघुनंदनें ।
वत्साप्रति धेनु धावणें । तैसी देणें मज भेटी ॥ ६६ ॥
तूं तंव श्रीरामाची शक्ती । तुझेनि मजला नित्यगती ।
म्हणोनि लोटांगण क्षितीं । करीं मारूती जानकीये ॥ ६७ ॥
स्वयें सीतेच्या शुद्ध्यर्था । नमूनियां श्रीरघुनाथा ।
जानकी शोधावय मागुता । होय निघता हनुमंत ॥ ६८ ॥
शोधावया रावणाचें भवन । सूक्ष्मरूप धरोनि जाण ।
कपी करिता जाला गमन । सीता चिद्रत्‍न शोधावया ॥ ६९ ॥
रावणगृहीं उपराउपरीं । एकवीस मांडियांवरी घरी ।
गोपुरादि हारोहारीं । घटीकारीं गडगजरू ॥ ७० ॥
सिंदुरारक्त श्वेत पीत । गज गर्जती चतुर्दंत ।
सैन्य थोवे थोवे समस्त । वीर गाजत गडगजरें ॥ ७१ ॥
अश्व गज पदापदाती । सेनाधर सेनापती ।
राजगृहीं नित्य जागती । शस्त्रसंपत्ती अति गजरें ॥ ७२ ॥
ढोल दमामे शंख किंकाटी । विराणीं वाजती थापटीं ।
घरटीकार देताती घरटी । सावधावृत्ती क्षोभक ॥ ७३ ॥
आइनीपाइनी येकमेकां । उपराउपरी जागती देखा ।
हलकल्लोळें देवोनि हाका । एकमेकां गर्जती ॥ ७४ ॥
दडादडां निशाणें भेरी । त्राहाटिलिया राजद्वारीं ।
काहळा चिनकाहळा थोरी । बुरगे गजरीं गर्जती ॥ ७५ ॥
सप्तकक्षांतर वाट । ऐसें घनदाट सैन्य ।
वार्या तेथें न फुटे वाट । दृढ कपाट राजद्वारीं ॥ ७६ ॥
हनुमान सप्तद्वारांतरीं । रिघोनि सैन्याचे भीतरीं ।
शोधित असे सीता सुंदरी । गुप्ताचारी अति युक्तिं ॥ ७७ ॥
राजपत्‍न्या शिबिकेआंत । बैसौनि जाती अति गुप्त ।
हनुमान रिघोनि घुंगुटाआंत । सीता शोधित अति युक्तीं ॥ ७८ ॥
अश्वशाळा गजशाळा । शस्त्रशाळा अस्त्रशाळा ।
चित्रशाळा आणि नाना विचित्र शाळा । जनकबाळा शोधित ॥ ७९ ॥
स्नानशाळा पानशाळा । गायनशाळा शयनशाळा ।
पाठशाळा अति विशाळा । यज्ञशाळा शोधित ॥ ८० ॥
शाकशाळा पाकशाळा । लतामृगसुमनशाळा ।
रत्‍नशाळा प्रयत्‍नशाळा । टांकशाळा शोधित ॥ ८१ ॥
कर्मशाळा धर्मशाळा । मठमठिकार्पणशाळा ।
ब्राम्हणांच्या ब्रह्मशाळा । अति शोधित विशाळा ॥ ८२ ॥
बावन्न चंदनइंधनशाळा । कंडणीपेषणी अन्नशाळा ।
यंत्रतंत्रनाटकशाळा । रंगशाळा शोधित ॥ ८३ ॥
नानापरींची वातायनें । नानापरींचीं वितानें ।
गोपुरें उपरी नानास्थानें । गौप्यस्थानें शोधित ॥ ८४ ॥
ऐसें शोधिले बाह्यभवन । आतां रावणाचें शयनस्थान ।
आणिक कामग विमान । कपि सावधान शोधित ॥ ८५ ॥
ऐशिया भवनांमाझारीं । रावणशयनाची ओवरी ।
दहा योजने विस्तीर्ण वरी । रूंदीची परी तदर्ध ॥ ८६ ॥
रत्‍नजडितसुवर्णभिंती । घोटींव पाचबद्ध अवघी क्षिती ।
सूर्यप्रभासम ज्योती । रत्‍नदीप्ती दीपक ॥ ८७ ॥
ओवोंनियां मुक्ताफळां । वातायनीं हेममाळा ।
हेममंचकीं माणिक्यकिळा । हेममाळा मोतीलग ॥ ८८ ॥
हेममुक्तमणी विराजमान । हेमसूत्रीं शोभे वितान ।
सुवासें कोंदले गगन । वसंतपवन कामारे ॥ ८९ ॥
विमानातळीं वातायन । सुंगध सुवासें झळकें पवन ।
त्यामाजी कामग विमान । देदीप्यमान तेजस्वी ॥ ९० ॥
ब्रह्मयाकारणें देदीप्यमान । विश्वकर्मा करी विमान ।
तेथें बैसोनि चतुरानन । सुखसंपन्न विचरत ॥ ९१ ॥
त्याचि विमानाकारणे । कुबेर तप करी प्रयत्‍नें ।
एकांगुष्ठ धरोनि चरणें । एकाग्र राहणें निराहार ॥ ९२ ॥
करितां तप शतानुशतें । ब्रह्मा प्रसन्न होवोनि त्यातें ।
कुबेरासी विमान देत । हर्षयुक्त तो जाला ॥ ९३ ॥
घेवोनि कामग विमान । चाले पहावया चैत्रवन ।
तपोवन नंदनवन । सुखसंपन्न क्रीडत ॥ ९४ ॥
ऐसें देखोनियां रावण । सांडोनि बंधुसुह्रदपण ।
कुबेरासी करोनि रण । घेतलें विमान हिरोनि ॥ ९५ ॥
तें हें विमान पैं तेथ । रावणाचे घराआंत ।
तेथें बसोनि लंकानाथ । सुखें क्रीडत स्त्रियांसी ॥ ९६ ॥
विमानशोभा पुष्कळ । खांबोखांबी इंद्रनीळ ।
त्यावरी शोभती महानीळ । अति सुनीळ भूमिका ॥ ९७ ॥
विमाना मुक्ताफळांची झालरी । रत्‍नें जडली उपराउपरी ।
पांच प्रदीप्त हारोहांरी । चढे त्यावरी हनुमंत ॥ ९८ ॥
अति सूक्ष्म तो हनुमंत । लघुलाघवें विमानांत ।
रिघोनि पाहतसे वृत्तांत । सीताशुद्ध्यर्थ शोभावया ॥ ९९ ॥
रावणाचें निजभुवन । अति शोभा देदीप्यमान ।
त्यामाजी शोभत विमान । विराजमान निजस्त्रिया ॥ १०० ॥
जे लक्ष्मी स्वयें इंद्रापाशी । जें वैभव यमवरूणांसीं ।
त्याहूनही अति विशेषीं । रावणगृहासी अति शोभा ॥ १०१ ॥
जें वैभव कुबेरासीं । जें वैभव स्वर्गवासीं ।
त्याहूनिही अति विशेषीं । रावणगृहासी श्रीशोभा ॥ १०२ ॥
नित्य नूतन अनपायिनी । श्रीविराजे दशाननीं ।
त्याचि शयनस्थानीं । दिव्ययोगिनी योषिता ॥ १०३ ॥
शुद्ध पद्मिनीची जाती । नागकन्या नेणों किती ।
देवकन्या दिव्यदीप्ती । असंख्यात राजकन्या ॥ १०४ ॥
सुरवरनरकन्यका । गंधर्वांच्या निजनायिका ।
दैत्यदानवांच्या अनेका । रावणें देखा आणिल्या ॥ १०५ ॥
जीं जीं अपूर्व स्त्रीरत्‍नें । तीं तीं करोनि भोगायतनें ।
स्वयें आणिलीं दशाननें । विराजमानें तेजस्वी ॥ १०६ ॥
ऐशा भोगिल्या अमित कांता । तैसीच आणूं गेली सीता ।
ते तंव न जिरे लंकानाथा । अपमानितां हनुमंतें ॥ १०७ ॥
रावणाचे शयनाशेजारीं । ऐशिया स्त्रियांच्या हारी ।
सुकुमारा अति सुंदरी । अलंकारी शोभती ॥ १०८ ॥
ऐशा योषिता नेणों किती । नाना यत्रें घेवोनि हातीं ।
रावणाचे शेजेप्रती । ओळंग करिती गीतनृत्यें ॥ १०९ ॥
वृद्धा नाचती व्युत्पत्तीं । वोपत्रीप तळप देती ।
संगीताच्या गतिविगती । अंग मोडिती थैथाकें ॥ ११० ॥
तरूण कामिनी कामासक्तीं । न लभती पुरूषासी संगती ।
उन्मादकामकामार्ती । दुःखी होती अति कामें ॥ १११ ॥
न पवे कामाचा संभव । नाडळे भोगभोगवैभव ।
जळों हे रावणाचें दैव । तरी गौरव आम्हां नाहीं ॥ ११२ ॥
गाढ देती आलिंगन । तरी रति नव्हे समाधान ।
मग करितीं आनेंआन । सावधान अवधारा ॥ ११३ ॥
भक्षिति उन्मादअन्न । करिती उन्मादप्राशन ।
तेणें स्त्रिया आनेंआन । करीति रमण तें ऐका ॥ ११४ ॥
ऐशिया रावणाचे घरीं । मदविव्हाळा अमित नारी ।
फुलें गुंफवीजे फुलारीं । तैसी हारी स्त्रियांची ॥ ११५ ॥
हनुमंत रिघोनि त्यांमाझारी । शोधिता श्रीरामाअंतुरी ।
त्या तंव अवघ्या कामाचारी । सीतासुंदरी तेथें नाही ॥ ११६ ॥
शोधिता असंख्यात नारी । येथें नाहीं सीता सुंदरी ।
तेचि शोधावया पुढारी । साटोप धरी हनुमंत ॥ ११७ ॥
पुढें जातां एक एक । देखिला रावणाचा मंचक ।
रत्‍नखचित अलौकिक । सेज सम्यक सुमनांची ॥ ११८ ॥
पहुडावया दशशिर । पवनें त्राहाटिला स्वरे ।
शज रचिली सुमनाकार । सुंगधसेजार वसंत ॥ ११९ ॥
तया मंचकाशेजारीं । एकलीं निजली मंदोदरी ।
हनुमान म्हणे हे सीता खरी । शोभा साजिरी देखोनि ॥ १२० ॥
श्रीरामाची निजकांता । मज सांपडलीसे सीता ।
उल्लास हनुमंताचे चित्ता । होय नाचता स्वानंदें ॥ १२१ ॥
रावणाची क्रिया भली । सुमनसेजे सीता एकली ।
असे निष्पाप राखिली । नाही अभिलाषिली तेणें पै ॥ १२२ ॥
सीता सती निरूपम । अभिलाषितां करील भस्म ।
रावणाचा परम धर्म । सीता निजधर्में रक्षिली ॥ १२३ ॥
जागी जाहलिया सीता गोरटी । रावण कपटी कीं हें कपटी ।
पुसावया गुह्य गोष्टी । मंचका नेहटीं अति गुप्त ॥ १२४ ॥

सभेतील विघ्नाबद्दल रावणाचे शान्तिकर्म :

सभेसीं देखोनि अति विघ्न । त्याचें करावया शांति विधान ।
रावण करूं गेला हवन । अति उद्विग्न भयभीत ॥ १२५ ॥
सभेचा आठवतां आघात । रावणा होऊं पाहे प्राणांत ।
तेणे भयें होम करित । विघ्नशांत्यर्थ अनुतापें ॥ १२६ ॥
यालागीं एकली मंदोदरी । निजली देखिली सेजेवरी ।
हनुमान मानी सीता सुंदरी । निजजिव्हारीं निश्चित ॥ १२७ ॥
मंदोदरीरावणां भेटी । त्या दोघांच्या गुह्य गोष्टी ।
हनुमान ऐकोनि कर्णपुटी । होईल भेटी सीतेची ॥ १२८ ॥
एकाजनार्दना शरण । सीताशुद्धिचें महिमान ।
कथाकौतुक गहन । अति पावन पवित्र ॥ १२९ ॥
सीताशुद्धिचा विधी । श्रवणें जाती अधिव्याधी ।
छेदोनि दुष्ट दुर्बुद्धी । चित्तशुद्धी श्रीरामें ॥ १३० ॥
॥ स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमद्रावणशयनभवनशोधो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
॥ ओव्यां १३० ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १३० ॥



GO TOP