श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ तृतीयः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

लंकाया दुर्गद्वार सैन्यविभाग संक्रमप्रभृतीन् वर्णयित्वा तत्र वानरसेना प्रस्थापनाय हनुमतः श्रीरामं प्रति प्रार्थना -
हनुमानांनी लंकेचा दुर्ग, द्वार (फाटक), सेना-विभाग आणि संक्रम आदिंचे वर्णन करून भगवान श्रीरामांना सेनेला कूच करण्याची आज्ञा देण्यासाठी प्रार्थना करणे -
सुग्रीवस्य वचः श्रुत्वा हेतुमत् परमार्थवित् ।
प्रतिजग्राह काकुत्स्थो हनुमंतमथाब्रवीत् ॥ १ ॥
सुग्रीवांची ही युक्तियुक्त आणि उत्तम अभिप्रायाने पूर्ण वचने ऐकून श्रीरामचंद्रांनी त्यांचा स्वीकार केला आणि नंतर हनुमानास म्हटले- ॥१॥
तपसा सेतुबंधेन सागरोच्छोषणेन च ।
सर्वथापि समर्थोऽस्मि सागरस्यास्य लङ्‌घने ॥ २ ॥
मी तपस्येने सेतु बांधून आणि सागराचे शोषण करून सर्व प्रकारे महासागर ओलांडून जाण्यास समर्थ आहे. ॥२॥
कति दुर्गाणि दुर्गाया लङ्‌कायास्तद् ब्रवीष्व मे ।
ज्ञातुमिच्छामि तत् सर्वं दर्शनादिव वानर ॥ ३ ॥
वानरवीरा ! तू मला हे तर सांग की त्या दुर्गम लंकापुरीत किती दुर्ग आहेत. मी जणु प्रत्यक्ष पहात असल्याप्रमाणे तिचे सारे विवरण स्पष्टरूपाने जाणू इच्छितो. ॥३॥
बलस्य परिमाणं च द्वारदुर्गक्रियामपि ।
गुप्तिकर्म च लङ्‌काया रक्षसां सदनानि च ॥ ४ ॥

यथासुखं यथावच्च लङ्‌कायामसि दृष्टवान् ।
सर्वमाचक्ष्व तत्त्वेन सर्वथा कुशलो ह्यसि ॥ ५ ॥
तू रावणाच्या सेनेचे परिमाण, पुरीच्या दरवाजांना दुर्गम बनविण्याची साधने, लंकेच्या रक्षणाचे उपाय तसेच राक्षसांची भवने - या सर्वांना सुखपूर्वक यथावत्‌ रूपात तेथे पाहिले आहेस. म्हणून त्या सर्वांचे ठीक-ठीक वर्णन कर, कारण तू सर्व प्रकारे कुशल आहेस. ॥४-५॥
श्रुत्वा रामस्य वचनं हनूमान् मारुतात्मजः ।
वाक्यं वाक्यविदां श्रेष्ठो रामं पुनरथाब्रवीत् ॥ ६ ॥
श्रीरामांचे हे वचन ऐकून वाक्यविदांमध्ये श्रेष्ठ पवनकुमार हनुमान्‌ परत श्रीरामांना म्हणाले- ॥६॥
श्रूयतां सर्वमाख्यास्ये दुर्गकर्म विधानतः ।
गुप्ता पुरी यथा लङ्‌का रक्षिता च यथा बलैः ॥ ७ ॥

राक्षसाश्च यथा स्निग्धा रावणस्य च तेजसा ।
परां समृद्धिं लङ्‌कायाः सागरस्य च भीमताम् ॥ ८ ॥

विभागं च बलौघस्य निर्देशं वाहनस्य च ।
एवमुक्त्वा कपिश्रेष्ठः कथयामास तत्त्वतः ॥ ९ ॥
भगवन्‌ ! ऐकावे, मी सर्व काही सांगतो. लंकेतील दुर्ग कसे बनले आहेत, कुठल्या प्रकारे लंकेच्या रक्षणाची व्यवस्था केली गेली आहे. कशा प्रकारे ती सेनेने सुरक्षित आहे, रावणाच्या तेजाने प्रभावित होऊन राक्षस तिच्याबद्दल कसा स्नेह बाळगून आहेत. लंकेची समृद्धि किती उत्तम आहे, समुद्र किती भयंकर आहे; पायदळ सैनिकांचे विभाग करून कोठे किती सैनिक ठेवले गेले आहेत आणि तेथील वाहनांची संख्या किती आहे- या सर्व गोष्टींचे मी वर्णन करीन. असे म्हणून कपिश्रेष्ठ हनुमानांनी तेथील गोष्टींचे ठीक ठीक वर्णन करण्यास आरंभ केला. ॥७-९॥
हृष्टप्रमुदिता लङ्‌का मत्तद्विपसमाकुला ।
महती रथसंपूर्णा रक्षोगणनिषेविता ॥ १० ॥
प्रभो ! लंकापुरी हर्ष आणि आमोद-प्रमोदाने पूर्ण आहे. ती विशाल पुरी मत्त हत्तीनी व्याप्त आणि असंख्य रथांनी भरलेली आहे. राक्षसांचे समुदाय सदा तिच्यात निवास करतात. ॥१०॥
दृढबद्धकपाटानि महापरिघवन्ति च ।
चत्वारि विपुलान्यस्या द्वाराणि सुमहान्ति च ॥ ११ ॥
त्या पुरीला चार मोठमोठी द्वारे आहेत, जे खूपच लांब-रूंद आहेत. त्यात अनेक मजबूत दारे लावलेली आहेत आणि मोठ मोठ्‍या अर्गळा आहेत. (अडसर आहेत) ॥११॥
तत्रेषूपलयन्त्राणि बलवन्ति महान्ति च ।
आगतं परसैन्यं तु तैः तत्र प्रतिनिवार्यते ॥ १२ ॥
त्या दरवाजांवर मोठी विशाल आणि प्रबळ यंत्रे लावलेली आहेत, जी तीर आणि दगडांच्या गोळ्यांची वृष्टि करतात. त्यांच्या द्वारा आक्रमण करणार्‍या शत्रुसैन्याला पुढे येण्यापासून अडवले जाते. ॥१२॥
द्वारेषु संस्कृता भीमाः कालायसमयाः शिताः ।
शतशो रचिता वीरैः शतघ्न्यो रक्षसां गणैः ॥ १३ ॥
ज्यांना वीर राक्षसगणांनी बनविलेले आहे, ज्या काळ्या लोखंडाच्या बनविलेल्या असून भयंकर आणि तीक्ष्ण आहेत, तसेच ज्यांचा उत्तम प्रकारे संस्कार केला गेला आहे अशा शेकडो शताघ्नि* (लोखंडाच्या काट्‍यांनी भरलेल्या चार हात लांबीच्या गदा) त्या दरवाजांवर सजवून ठेवल्या गेल्या आहेत. ॥१३॥
(* शतघ्नीच चतुर्हस्ता लोहकंटकिनी गदा ॥ इति वैजयंती व्याख्या)
सौवर्णस्तु महांस्तस्याः प्राकारो दुष्प्रधर्षणः ।
मणिविद्रुमवैडूर्यं उक्ताविरचितान्तरः ॥ १४ ॥
त्या पुरीच्या चारी बाजूस सोन्याचा बनविलेला खूपच उंच परकोट (तटबंदी) आहे ज्यास तोडणे फारच कठीण आहे. त्यामध्ये मणि, प्रवाळ, नीलम आणि मोत्यांचे काम केले गेले आहे. ॥१४॥
सर्वतश्च महाभीमाः शीततोया महाशुभाः ।
अगाधा ग्राहवत्यश्च परिखा मीनसेविताः ॥ १५ ॥
परकोट्‍यांच्या चारी बाजूस महाभयंकर, शत्रूचे महान्‌ अमंगल करणारे गार पाण्याने भरलेले आणि अगाध खोलीने युक्त खंदक बनविलेले आहेत, ज्यामध्ये ग्राह आणि मोठ मोठे मत्स्य निवास करत आहेत. ॥१५॥
द्वारेषु तासां चत्वारः सङ्‌क्रमाः परमायताः ।
यंत्रैरुपेता बहुभिः महद्‌भिः गृहपंक्तिभिः ॥ १६ ॥
उक्त चारी दरवाजांच्या समोर त्या खदंकावर मचाणांच्या रूपात चार संक्रम ॥*॥ (लाकडाचे पूल) आहेत जे फारच विस्तृत आहेत त्यावर बरीचशी मोठ मोठी यंत्रे लावलेली आहेत आणि त्यांच्या आसपास परकोटावर बनविलेल्या घरांच्या रांगा आहेत. ॥१६॥
(॥*॥- संक्रम : असे कळून येत आहे की संक्रम अशा प्रकारचे पूल होते की ज्यांना जेव्हां आवश्यकता असेल तेव्हा यंत्रांच्या द्वारा खाली पाडले जात असे, म्हणूनच शत्रूची सेना आल्यावर तिला खंदकात पाडण्याची गोष्ट सांगितली गेली आहे.)
त्रायन्ते सङ्‌क्रमास्तत्र परसैन्यागते सति ।
यंत्रैस्तैरवकीर्यन्ते परिखासु समन्ततः ॥ १७ ॥
जेव्हा शत्रूची सेना येते, तेव्हा यंत्रांच्या द्वारा त्या संक्रमांचे रक्षण केले जाते तसेच त्या यंत्रांच्या द्वाराच त्यांना सर्व बाजूनी खंदकात पाडले जाते आणि तेथे पोहोचलेल्या शत्रूसेनेला सर्व बाजूस फेकून दिले जाते. ॥१७॥
एकस्त्वकम्प्यो बलवान् संक्रमः सुमहादृढः ।
काञ्चनैर्बहुभिः स्तम्भैः वेदिकाभिश्च शोभितः ॥ १८ ॥
त्यापैकी एक संग्रम तर फारच सुदृढ आणि अभेद्य आहे. तेथे फार मोठी सेना राहाते आणि तो सोन्याच्या अनेक खांबांनी तसेच चबुतर्‍यांनी सुशोभित आहे. ॥१८॥
स्वयं प्रकृतिमापन्नो युयुत्सू राम रावणः ।
उत्थितश्चाप्रमत्तश्च बलानामनुदर्शने ॥ १९ ॥
श्रीरामा ! रावण युद्धासाठी उत्सुक होऊन स्वत: कधी क्षुब्ध होत नाही - स्वस्थ आणि धीर बनून राहातो. तो सेनेचे वारंवार निरीक्षण करण्यासाठी सदा सावधान आणि उद्यत राहातो. ॥१९॥
लङ्‌का पुनर्निरालम्बा देवदुर्गा भयावहा ।
नादेयं पार्वतं वान्यं कृत्रिमं च चतुर्विधम् ॥ २० ॥
लंकेवर चढाई करण्यासाठी कुठलाही अवलंब नाही आहे. ती पुरी देवतांसाठीही दुर्गम आणि फारच भीतिदायक आहे. तिच्या चारी बाजूस नदी, पर्वत, वने आणि कृत्रिम खंदक, तटबंदी आदिसहित हे चार प्रकराचे दुर्ग आहेत. ॥२०॥
स्थिता पारे समुद्रस्य दूरपारस्य राघव ।
नौपथोऽपि च नास्त्यत्र निरादेशश्च सर्वतः ॥ २१ ॥
राघवा ! ती फार दूरवर पसरलेल्या समुद्राच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेली आहे. तेथे जाण्यासाठी नावेचाही मार्ग नाही आहे कारण त्यामध्ये लक्ष्याचा पत्ता कुठल्याही प्रकारे राहाणे संभवनीय नाही. ॥२१॥
शैलाग्रे रचिता दुर्गा सा पूर्देवपुरोपमा ।
वाजिवारणसंपूर्णा लङ्‌का परमदुर्जया ॥ २२ ॥
ती दुर्गम पुरी पर्वताच्या शिखरावर वसविली गेली आहे आणि देवपुरीसमान सुंदर दिसून येत असते. हत्ती, घोडे यांनी भरलेली ती लंका अत्यंत दुर्जय आहे. ॥२२॥
परिखाश्च शतघ्न्यश्च यंत्राणि विविधानि च ।
शोभयन्ति पुरीं लङ्‌कां रावणस्य दुरात्मनः ॥ २३ ॥
खंदक, शताघ्नि आणि तर्‍हेतर्‍हेची यंत्रे दुरात्मा रावणाच्या त्या लंकानगरीची शोभा वाढवीत आहेत. ॥२३॥
अयुतं रक्षसामत्र पूर्वद्वारं समाश्रितम् ।
शूलहस्ता दुराधर्षाः सर्वे खड्गाग्रयोधिनः ॥ २४ ॥
लंकेच्या पूर्वद्वारावर दहा हजार राक्षस राहात आहेत, जे सर्वच्या सर्व हातात शूल धारण केलेले आहेत. ते अत्यंत दुर्जय आणि मृत्युच्या तोंडावरही तलवारींनी झुंजणारे आहेत. ॥२४॥
नियुतं रक्षसामत्र दक्षिणद्वारमाश्रितम् ।
चतुरङ्‌गेण सैन्येन योधास्तत्राप्यनुत्तमाः ॥ २५ ॥
लंकेच्या दक्षिण द्वारावर चतुरंगिणी सेनेसह एक लाख राक्षस योद्धे तळ ठोकून आहेत. तेथील सैनिकही फार पराक्रमी आहेत. ॥२५॥
प्रयुतं रक्षसामत्र पश्चिमद्वारमाश्रितम् ।
चर्मखड्गधराः सर्वे तथा सर्वास्त्रकोविदाः ॥ २६ ॥
पुरीच्या पश्चिम द्वारावर दहा लाख राक्षस निवास करतात. ते सर्वच्या सर्व ढाल आणि तलवार धारण करतात, तसेच ते संपूर्ण अस्त्रांच्या ज्ञानात निपुण आहेत. ॥२६॥
न्यर्बुदं रक्षसामत्र उत्तरद्वारमाश्रितम् ।
रथिनश्चाश्ववाहाश्च कुलपुत्राः सुपूजिताः ॥ २७ ॥
पुरीच्या उत्तर द्वारावर एक अर्बुद (दहा कोटी) राक्षस राहातात. ज्यांच्यापैकी काही तर रथी आहेत आणि काही घोडेस्वार आहेत. ते सर्व उत्तम कुळात उत्पन्न असून आपल्या वीरतेसाठी प्रशंसित आहेत. ॥२७॥
शतशोऽथ सहस्राणि मध्यमं स्कन्धमाश्रिताः ।
यातुधाना दुराधर्षाः साग्रकोटिश्च रक्षसाम् ॥ २८ ॥
लंकेच्या मध्यभागीच्या छावणीत शेकडो सहस्त्र दुर्जय राक्षस राहातात, ज्यांची संख्या एक कोटीहून अधिक आहे. ॥२८॥
ते मया संक्रमा भग्राः परिखाश्चावपूरिताः ।
दग्धा च नगरी लङ्‌का प्राकाराश्चावसादिताः ।
बलैकदेशः क्षपितो राक्षसानां महात्मनाम् ॥ २९ ॥
परंतु मी त्या सर्व संक्रमांना तोडून टाकले आहे; खंदक वाहून घालविले आहेत, लंकापुरीला जाळून टाकले आहे आणि तिची तटबंदीही धराशायी केली आहे. इतकेच नव्हे तर तेथील विशालकाय राक्षसांच्या सेनेचा एक चतुर्थांश भाग नष्ट करून टाकला आहे. ॥२९॥
येन केन तु मार्गेण तराम वरुणालयम् ।
हतेति नगरी लङ्‌का वानरैरुपधार्यताम् ॥ ३० ॥
आम्ही कुठल्या ना कुठल्या मार्गाने किंवा उपायाने एक वेळ समुद्रास पार केले की मग लंकेला वानरांच्या द्वारे नष्ट झालेलीच समजावे. ॥३०॥
अङ्‌गदो द्विविदो मैन्दो जाम्बवान् पनसो नलः ।
नीलः सेनापतिश्चैव बलशेषेण किं तव ॥ ३१ ॥
अंगद, द्विविद, मैंद, जांबवान, पनस, नल आणि सेनापति नील इतकेच वानर लंकाविजय मिळविण्यसाठी पर्याप्त आहेत. बाकी सेना घेऊन आपल्याला काय करावयाचे आहे ? ॥३१॥
प्लवमाना हि गत्वा तां रावणस्य महापुरीम् ।
सपर्वतवनां भित्त्वा सखातां च सतोरणाम् ।
सप्राकारां सभवनां आनयिष्यन्ति राघव ॥ ३२ ॥
राघवा ! हे अंगद आदि वीर आकाशात उड्‍या मारीत, उड्‍डाण करीत रावणाच्या महापुरी लंकेत पोहोचून तिला पर्वत, वने, खंदक, दरवाजे, तटबंदी आणि घरांसहित नष्ट करून सीतेला येथे घेऊन येतील; ॥३२॥
एवमाज्ञापय क्षिप्रं बलानां सर्वसंग्रहम् ।
मुहूर्तेन तु युक्तेन प्रस्थानमभिरोचय ॥ ३३ ॥
असे समजून आपण शीघ्रच समस्त सैनिकांना संपूर्ण आवश्यक वस्तुंचा संग्रह करून कूच करण्याची आज्ञा द्यावी आणि उचित मुहूर्तावर प्रस्थान करण्याची इच्छा करावी. ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायणातील आदिकाव्यांतील युद्धकांडाचा तीसरा सर्ग पूर्ण झाला. ॥३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP