[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ चतुस्त्रिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
हनुमति सीताया सन्देहः, स्वत एव तस्य समाधानं च सीताया आदेशेन हनुमता श्रीरामगुणानां वर्णनम् -
सीतेचा हनुमन्ताबद्दल संशय, त्याचे समाधान तथा हनुमन्ता द्वारा श्रीरामचन्द्रांच्या गुणांचे वर्णन -
तस्यास्तद् वचनं श्रुत्वा हनुमान् हरिपुंगवः ।
दुःखाद् दुःखाभिभूतायाः सान्त्वमुत्तरमब्रवीत् ॥ १ ॥
दुःखामागून दुःख सोसावे लागल्याने पीडित त्रस्त झालेल्या सीतेचे उपर्युक्त वचन ऐकून तिचे सान्त्वन करण्यासाठी वानरशिरोमणी हनुमान म्हणाले - ॥१॥
अहं रामस्य सन्देशाद् देवि दूतस्तवागतः ।
वैदेहि कुशली रामः स त्वां कौशलमब्रवीत् ॥ २ ॥
देवी ! मी श्रीरामचन्द्रांचा दूत आहे आणि तुझ्यासाठी त्यांचा सन्देश घेऊन आलो आहे. हे वैदेही ! श्रीरामचन्द्र सकुशल आहेत आणि त्यांनी तुझा कुशल समाचार विचारला आहे. ॥२॥
यो ब्राह्ममस्त्रं वेदांश्च वेद वेदविदां वरः ।
स त्वां दाशरथी रामो देवि कौशलमब्रवीत् ॥ ३ ॥
हे देवी ! ज्यांना ब्रह्मास्त्र आणि वेदांचे पूर्ण ज्ञान आहे त्या वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ दशरथनन्दन श्रीरामांनी स्वतःचे कुशल कळवून तुझ्याही कुशला संबन्धी विचारणा केली आहे. ॥३॥
लक्ष्मणश्च महातेजा भर्तुस्तेऽनुचरः प्रियः ।
कृतवाञ्छोकसन्तप्तः शिरसा तेऽभिवादनम् ॥ ४ ॥
तुझ्या पतीचा अनुचर तसेच महातेजस्वी लक्ष्मणही शोक सन्तप्त असून त्यांनी आपल्या चरणी मस्तक नमवून आपल्याला प्रणाम सांगितला आहे. ॥४॥
सा तयोः कुशलं देवी निशम्य नरसिंहयोः ।
प्रीतिसंहृष्टसर्वाङ्‌गी हनुमन्तमथाब्रवीत् ॥ ५ ॥
देवी सीतेने जेव्हा पुरुषसिंह श्रीराम आणि लक्ष्मण यांचा कुशल समाचार ऐकला तेव्हा तिच्या संपूर्ण शरीरावर हर्षजनित रोमांच आले आणि ती हनुमन्तास म्हणाली - ॥५॥
कल्याणी बत गाथेयं लौकिकी प्रतिभाति मा ।
एति जीवन्तमानन्दो नरं वर्षशतादपि ॥ ६ ॥
मनुष्य जर जिवन्त राहिला तर त्याला शंभर वर्षानन्तरही आनन्द प्राप्त होऊ शकतो ही लौकिक म्हण आज मला अगदी सत्य आणि कल्याणकारक असल्याचे जाणून येत आहे. ॥६॥
तयोः समागते तस्मिन् प्रीतिरुत्पादिताद्‌भुता ।
परस्परेण चालापं विश्वस्तौ तौ प्रचक्रतुः ॥ ७ ॥
सीता आणि हनुमन्ताच्या या परस्पर भेटीने - दर्शनाने दोघांना ही अद्‍भुत प्रसन्नता प्राप्त झाली. त्यांना एकमेकाबद्दल विश्वास उत्पन्न झाला आणि ती दोघे एकमेकाशी संभाषण करू लागली. ॥७॥
तस्यास्तद् वचनं श्रुत्वा हनुमान् मारुतात्मजः ।
सीतायाः शोकतप्तायाः समीपमुपचक्रमे ॥ ८ ॥
दीन आणि शोक सन्तप्त सीतेचे वचन ऐकून वानरयूथपति हनुमान तिच्या काहीसे जवळ चालत आले. ॥८॥
यथा यथा समीपं स हनुमानुपसर्पति ।
तथा तथा रावणं सा तं सीता परिशङ्‌कते ॥ ९ ॥
हनुमान जस जसे जवळ येऊ लागले तस तशी सीतेला शंका येऊ लागली की हा रावण तर नाही ना ? ॥९॥
अहो धिग् धिक्कृतमिदं कथितं हि यदस्य मे ।
रूपान्तरमुपागम्य स एवायं हि रावणः ॥ १० ॥
असा विचार येताच ती मनातल्या मनात म्हणू लागली - अहो ! मी याच्या समोर माझ्या मनातील गोष्ट उघड सांगितली त्या अर्थी माझा धिक्कार असो. हा, हे दुसरे रूप धारण करून आलेला तो रावणच आहे. ॥१०॥
तामशोकस्य शाखां सा विमुक्ता शोककर्शिता ।
तस्यामेवानवद्याङ्‌गी धरण्यां समुपाविशत् ॥ ११ ॥
नन्तर तर ती निर्दोष अंगे असणारी सीता त्या अशोक वृक्षाची शाखा सोडून देऊन शोकाने कातर होऊन तेथे जमीनीवर बसली. ॥११॥
अवन्दत महाबाहुस्ततस्तां जनकात्मजाम् ।
सा चैनं भसन्त्रस्ता भूयो नैनमुदैक्षत ॥ १२ ॥
त्यानन्तर महाबाहु हनुमन्तानी जनकात्मजा सीतेच्या चरणी प्रणाम केला परन्तु ती भयभीत झालेली होती त्यामुळे ती परत त्यांच्याकडे पाहूही शकली नाही. ॥१२॥
तं दृष्ट्‍वा वन्दमानं तु सीता शशिनिभानना ।
अब्रवीद् दीर्घमुच्छ्‍वस्य वानरं मधुरस्वरा ॥। १३ ॥
वानर हनुमन्तास वारंवार वन्दन करतांना पाहून चन्द्रमुखी सीता दीर्घ श्वास घेऊन त्याला मधुर स्वराने म्हणाली - ॥१३॥
मायां प्रविष्टो मायावी यदि त्वं रावणः स्वयम् ।
उत्पादयसि मे भूयः सन्तापं तन्न शोभनम् ॥ १४ ॥
जर तू स्वतः मायावी रावण असशील आणि मायामय शरीरात प्रवेश करून, फिरून मला कष्ट देत असशील तर ही गोष्ट तुझ्यासाठी चांगली नाही. ॥१४॥
स्वं परित्यज्य रूपं यः परिव्राजकरूपवान् ।
जनस्थाने मया दृष्टस्त्वं स एव हि रावणः ॥ १५ ॥
ज्याला मी जनस्थानात पाहिले होते आणि ज्याने आपले यथार्थ रूप सोडून परिव्राजकाचे संन्याशाचे रूप धारण करून जो आला होता, तो रावण तूच आहेस. ॥१५॥
उपवासकृशां दीनां कामरूप निशाचर ।
सन्तापयसि मां भूयः सन्तापं तन्न शोभनम् ॥ १६ ॥
हे इच्छानुसार रूप धारण करणार्‍या निशाचरा ! मी उपवास करून दुर्बळ झालेली असून मनातल्या मनात दुःखी राहात आहे, असे असून तू परत परत सन्ताप देत आहेस, ही गोष्ट तुझ्यासाठी चांगली नाही. ॥१६॥
अथवा नैतदेवं हि यन्मया परिशंकितम् ।
मनसो हि मम प्रीतिः उत्पन्ना तव दर्शनात् ॥ १७ ॥
अथवा ज्या गोष्टीची शंका माझ्या मनात उत्पन्न झाली आहे, तसे नसेल ही; कारण तुला पाहून माझ्या मनात प्रसन्नता उत्पन्न झाली आहे. ॥१७॥
यदि रामस्य दूतस्त्वमागतो भद्रमस्तु ते ।
पृच्छामि त्वां हरिश्रेष्ठ प्रिया रामकथा हि मे ॥ १८ ॥
हे वानरश्रेष्ठा ! खरेच जर तू भगवान श्रीरामाचा दूत आहे आणि तुला श्रीरामाच्या विषयीची चर्चा अत्यन्त प्रिय आहे, तर मी तुला त्यांच्या संबन्धीच्या गोष्टीच विचारते. ॥१८॥
गुणान् रामस्य कथय प्रियस्य मम वानर ।
चित्तं हरसि मे सौम्य नदीकूलं यथा रयः ॥ १९ ॥
हे वानरा ! माझ्या प्रियतम श्रीरामाच्या गुणांचे तू वर्णन कर. हे सौम्या ! ज्याप्रमाणे जलाचा वेग नदीच्या तटाचे हरण करतो, त्याप्रमाणेच तूही श्रीरामाच्या चर्चेच्या योगाने माझे चित्त हरण करीत आहेस. ॥१९॥
अहो स्वप्नस्य सुखता याहमेव चिराहृता ।
प्रेषितं नाम पश्यामि राघवेण वनौकसम् ॥ २० ॥
अहो ! हे स्वप्न इतके सुखद कसे झाले ? ज्यायोगे येथे चिरकाल अपहरण करून आणली गेलेली मी आज भगवान श्रीरामांनी धाडलेल्या वानर दूतास समक्ष पहात आहे ! ॥२०॥
स्वप्नेऽपि यद्यहं वीरं राघवं सहलक्ष्मणम् ।
पश्येयं नावसीदेयं स्वप्नोऽपि मम मत्सरी ॥ २१ ॥
जरी मी लक्ष्मणसहित वीरश्रेष्ठ श्रीरघुनाथास स्वप्नात जरी पाहू शकेन तरी मला इतके कष्ट होणार नाहीत. परन्तु स्वप्न सुद्धा माझा जणु मत्सर करीत आहे. ॥२१॥
नाहं स्वप्नमिमं मन्ये स्वप्ने दृष्ट्‍वा हि वानरम् ।
न शक्योऽभ्युदयः प्राप्तुं प्राप्तश्चाभ्युदयो मम ॥ २२ ॥
शिवाय मी याला स्वप्न समजत नाही, कारण स्वप्नात वानरास पाहिल्यावर कुणाचा अभ्युदय होऊ शकत नाही आणि मला तर येथे अभ्युदय प्राप्त झाला आहे (अभ्युदयकाळात जशी प्रसन्नता होते तशी प्रसन्नता माझ्या मनास प्राप्त झाली आहे.) ॥२२॥
किन्नु स्याच्चित्तमोहोऽयं भवेद् वातगतिस्त्वियम् ।
उन्मादजो विकारो वा स्यादयं मृगतृष्णिका ॥ २३ ॥
अथवा हा माझ्या चित्ताचा मोह तर नाही ना ? अथवा वात विकाराने होणारा भ्रम नाही ना ? किंवा हा उन्मादाचा विकार तर बळावलेला नाही ना ? की ही मृगतृष्णा तर नाही ना ? ॥२३॥
अथवा नायमुन्मादो मोहोऽप्युन्मादलक्षणः ।
सम्बुध्ये चाहमात्मानं इमं चापि वनौकसम् ॥ २४ ॥
अथवा हा उन्मादजनित विकारही नाही किंवा उन्मादासारखी लक्षणे असणारा मोहही नाही. कारण मी मला पाहू शकत आहे आणि जाणूही शकत आहे. तसेच या वानरालाही मी नीट पणे (ठीक ठीक) पहात आहे आणि समजू शकत आहे. (उन्माद आणि अवस्थाच्यामध्ये या प्रकारे नीट पणे ज्ञान होणे संभवत नाही). ॥२४॥
इत्येवं बहुधा सीता सम्प्रधार्य बलाबलम् ।
रक्षसां कामरूपत्वान्मेने तं राक्षसाधिपम् ॥ २५ ॥

एतां बुद्धिं तदा कृत्वा सीता सा तनुमध्यमा ।
न प्रतिव्याजहाराथ वानरं जनकात्मजा ॥ २६ ॥
याप्रकारे नाना तर्‍हेने विचार करून राक्षसांची प्रबलता आणि वानरांची निर्बलता या संबन्धी निश्चय करून तिने त्यास राक्षसराज रावणच मानले. कारण राक्षसांच्या ठिकाणी इच्छेनुसार रूपधारण करण्याची शक्ती असते. याप्रमाणे विचार करून सडपातळ कटिप्रदेश असणारी जनकात्मजा सीता कपिवर हनुमन्ताशी परत काहीच बोलली नाही. ॥२५-२६॥
सीताया निश्चितं बुद्ध्वा हनुमान् मारुतात्मजः ।
श्रोत्रानुकूलैर्वचनैस्तदा तां सम्प्रहर्षयन् ॥ २७ ॥
सीतेचा हा निश्चय जाणून पवनपुत्र हनुमान त्यावेळी कानांना सुखद अशा अनुकूल वचनांच्या द्वारे तिला आनन्द प्रदान करीत बोलू लागले- ॥२७॥
आदित्य इव तेजस्वी लोककान्तः शशी यथा ।
राजा सर्वस्य लोकस्य देवो वैश्रवणो यथा ॥ २८ ॥
भगवान श्रीराम सूर्याप्रमाणे तेजस्वी, चन्द्राप्रमाणे लोककमनीय आणि देव वैश्रवणाप्रमाणे (कुबेराप्रमाणे) संपूर्ण जगताचे राजे आहेत. ॥२८॥
विक्रमेणोपपन्नश्च यथा विष्णुर्महायशाः ।
सत्यवादी मधुरवाग् देवो वाचस्पतिर्यथा ॥ २९ ॥
महायशस्वी भगवान विष्णूप्रमाणे ते पराक्रमी आहेत आणि बृहस्पतींच्या प्रमाणे सत्यवादी आणि मधुरभाषी आहेत. ॥२९॥
रूपवान् सुभगः श्रीमान् कन्दर्प इव मूर्तिमान् ।
स्थानक्रोधे प्रहर्ता च श्रेष्ठो लोके महारथः ॥ ३० ॥
ते इतके रूपसंपन्न, सौभाग्यशाली आणि कान्तिमान आहेत की जणुं मूर्तीमन्त कामदेवच ! ते क्रोध करण्यालायक व्यक्तीवरच प्रहार करण्यास समर्थ असून जगातील श्रेष्ठ महारथी आहेत. ॥३०॥
बाहुच्छायामवष्टब्धो यस्य लोको महात्मनः ।
अपक्रम्याश्रमपदान्मृन्मृगरूपेण राघवम् ॥ ३१ ॥

शून्ये येनापनीतासि तस्य द्रक्ष्यसि तत्फलम् ।
संपूर्ण विश्व महात्मा श्रीरामांच्या भुजांच्या आश्रयात त्यांच्याच छत्रछायेमध्ये विश्राम करीत आहे. मृगरूपधारी निशाचरद्वारा ज्याने राघवास आश्रमापासून दूर नेऊन शून्य आश्रमात पोहोचून तुझे अपहरण केले, त्याला त्याच्या पापाचे फळ लवकरच मिळालेले तू स्वतः आपल्या डोळ्यांनी पहाशील. ॥३१ १/२॥
अचिराद् रावणं सङ्‌ख्ये यो वधिष्यति वीर्यवान् ॥ ३२ ॥

रोषप्रमुक्तैरिषुभिर्ज्वलद्‌भिरिव पावकैः ।
पराक्रमी श्रीरामचन्द्र क्रोधयुक्त होऊन सोडल्या गेलेल्या अग्निप्रमाणे प्रज्वलित अशा तेजस्वी बाणांनी समरांगणात लवकरच त्या रावणाचा वध करतील. ॥३२ १/२॥
तेनाहं प्रेषितो दूतः त्वत्सकाशमिहागतः ॥ ३३ ॥

त्वद्वियोगेन दुःखार्तः स त्वां कौशलमब्रवीत् ।
मी त्यांचाच दूत त्यांनी धाडल्यावरून येथे तुझ्याजवळ आलो आहे. भगवान श्रीराम तुझ्या वियोगजनित दुःखाने पीडित आहेत. त्यांनी आपला कुशल समाचार तुला कळविला असून तुझे कुशलाचीही चौकशी केली आहे. ॥३३ १/२॥
लक्ष्मणश्च महातेजाः सुमित्रानन्दवर्धनः ॥ ३४ ॥

अभिवाद्य महाबाहुः स त्वां कौशलमब्रवीत् ।
सुमित्रेचा आनन्द वाढविणार्‍या महातेजस्वी महाबाहु लक्ष्मणानेंही आपल्याला प्रणाम करून आपले कुशल विचारले आहे. ॥३४ १/२॥
रामस्य च सखा देवि सुग्रीवो नाम वानरः ॥ ३५ ॥

राजा वानरमुख्यानां स त्वां कौशलमब्रवीत् ।
नित्यं स्मरति ते रामः ससुग्रीवः सलक्ष्मणः ॥ ३६ ॥
हे देवी ! श्रीरामाचा सखा एक सुग्रीव नावाचा वानर आहे जो मुख्य मुख्य वानरांचा राजा आहे, त्यानेही आपले कुशल विचारले आहे. सुग्रीव आणि लक्ष्मणासहित श्रीराम, नित्य तुझे स्मरण करीत आहेत. ॥३५-३६॥
दिष्ट्या जीवसि वैदेहि राक्षसीवशमागता ।
नचिराद् द्रक्ष्यसे रामं लक्ष्मणं च महारथम् ॥ ३७ ॥
हे वैदेही ! राक्षसींच्या तावडीत सापडूनही तू आजपर्यन्त जिवन्त राहिली आहेस ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आता लवकरच तू महारथी श्रीराम आणि लक्ष्मण यांचे दर्शन करशील. ॥३७॥
मध्ये वानरकोटीनां सुग्रीवं चामितौजसम् ।
अहं सुग्रीवसचिवो हनुमान् नाम वानरः ॥ ३८ ॥
तसेच कोट्‍यावधी वानरांनी घेरलेल्या अमिततेजस्वी सुग्रीवासही तू पहाशील. मी सुग्रीवाचा सचिव हनुमान नामक वानर आहे. ॥३८॥
प्रविष्टो नगरीं लङ्‌कां लङ्‌घयित्वा महोदधिम् ।
कृत्वा मूर्ध्नि पदन्यासं रावणस्य दुरात्मनः ॥ ३९ ॥
मी महासागराचे उल्लंघन करून लङ्‌का नगरीत प्रवेश केला आहे. त्या दुरात्मा रावणाच्या मस्तकावर पाय देऊन मी लङ्‌कापुरीत प्रवेश केला आहे. ॥३९॥
त्वां द्रष्टुमुपयातोऽहं समाश्रित्य पराक्रमम् ।
नाहमस्मि तथा देवि यथा मामवगच्छसि ।
विशङ्‌का त्यज्यतां एषा श्रद्धत्स्व वदतो मम ॥ ४० ॥
मी आपल्या पराक्रमाच्या भरवशावर तुझ्या दर्शनासाठी येथे उपस्थित झालो आहे. हे देवी ! तू मला जसा समजत आहेस तसा मी नाही. तू ही विपरीत शंका सोडून दे आणि माझ्या वचनावर विश्वास ठेव. ॥४०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे चतुस्त्रिंशः सर्गः ॥ ३४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा चौतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३४॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP