[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ एकपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जटायूरावणयोर्घोरं युद्धं रावणेन जटायुषो वधश्च -
जटायु आणि रावणाचे घोर युद्ध, आणि रावणा द्वारा जटायुचा वध -
इत्युक्तः क्रोधताम्राक्षsतप्तकाञ्चनकुण्डलः ।
राक्षसेंद्रोऽभिदुद्राव पतगेन्द्रममर्षणः ॥ १ ॥
जटायुने असे म्हटल्यावर राक्षसराज रावण क्रोधाने डोळे लाल करून अमर्षाने भरून त्या पक्षीराजाकडे धावला- त्या समयी त्याच्या कानात तापविलेल्या सोन्याची कुण्डले झगमगत होती. ॥१॥
स सम्प्रहारस्तुमुलस्तयोस्तस्मिन् महामृधे ।
बभूव वातोद्धुतयोर्मेघयोर्गगने यथा ॥ २ ॥
त्या महासमरात जणु आकाशात वायुने उडविले गेलेले दोन मेघखण्ड आपसात टक्कर देतात त्याप्रमाणे ते दोघे एक दुसर्‍यावर भयंकर प्रहार करू लागले. ॥२॥
तद् बभूवाद्‌भुतं युद्धं गृध्रराक्षसयोस्तदा ।
सपक्षयोर्माल्यवतोर्महापर्वतयोरिव ॥ ३ ॥
त्या समयी जणु दोन पंखधारी माल्यवान्‌(**) पर्वत एक दुसर्‍याशीं भिडावेत त्याप्रमाणे गृध्र आणि राक्षसात ते फारच अद्‍भुत युद्ध होऊ लागले. ॥३॥
(** माल्यवान्‌ पर्वत दोन मानले गेले आहेत. एक तर दण्डकारण्यात किष्किंधेच्या समीप आहे आणि दुसरा मेरूपर्वताच्या निकट सांगितला गेला आहे. हे दोन्ही पर्वत परस्परापासून इतके दूर आहेत की त्यांच्यात संघर्षाची काही संभावनाच होऊ शकत नाही. म्हणून सपक्ष (पंखधारी) विशेषण दिले गेले आहे. पंख असलेले पर्वत कदाचित उडून एक दुसर्‍याच्या समीप पोहोचू शकतात.)
ततो नालीकनाराचैस्तीक्ष्णाग्रैश्च विकर्णिभिः ।
अभ्यवर्षन्महाघोरैर्गृध्रराजं महाबलम् ॥ ४ ॥
रावणाने महाबली गृध्रराज जटायुवर नालीक, नाराच तसेच तीक्ष्ण अग्रभाग असणारे विकर्णी नामक महाभयंकर अस्त्रांची वृष्टी करण्यास आरंभ केला. ॥४॥
स तानि शरजालानि गृध्रः पत्ररथेश्वरः ।
जटायुः प्रतिजग्राह रावणास्त्राणि संयुगे ॥ ५ ॥
पक्षीराज गृध्रजातीय जटायुने युद्धात रावणाच्या त्या बाणसमूहांचे तसेच अन्य अस्त्रांचे आघात सहन केले. ॥५॥
तस्य तीक्ष्णनखाभ्यां तु चरणाभ्यां महाबलः ।
चकार बहुधा गात्रे व्रणान् पतगसत्तमः ॥ ६ ॥
त्याच बरोबर त्या महाबलाढ्‍य पक्षिश्रेष्ठाने आपल्या तीक्ष्ण नखे असलेल्या पंजांनी मारमारून रावणाच्या शरीरावर अनेक जखमा केल्या. ॥६॥
अथ क्रोधाद् दशग्रीवो जग्राह दश मार्गणान् ।
मृत्युदण्डनिभान् घोराञ्शत्रोनिधनकाङ्‌क्षया ॥ ७ ॥
तेव्हा दशग्रीवाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या शत्रूला मारून टाकण्याच्या इच्छेने दहा बाण हातात घेतले, जे कालदण्डाप्रमाणे भयंकर होते. ॥७॥
स तैर्बाणैर्महावीर्यः पूर्णमुक्तैरजिह्मगैः ।
बिभेद निशितैस्तीक्ष्णैर्गृधं घोरैः शिलीमुखैः ॥ ८ ॥
महापराक्रमी रावणाने धनुष्यास पूर्णतः खेचून सोडलेल्या त्या सरळ जाणार्‍या तीक्ष्ण, टोंकदार आणि भयंकर बाणांच्या द्वारा, ज्यांच्या मुखावर शल्य (काटे) लागलेले होते, त्या गृध्रराजास क्षत- विक्षत करून टाकले. ॥८॥
स राक्षसरथे पश्यञ्जानकीं बाष्पलोचनाम् ।
अचिन्तयित्वा बाणांस्तान् राक्षसं समभिद्रवत् ॥ ९ ॥
जटायुने पाहिले की जानकी सीता राक्षसाच्या रथात बसली आहे आणि डोळ्यातून अश्रु ढाळीत आहे. तिला पाहून गृध्रराज आपल्या शरीरात लागलेल्या बाणांची पर्वा न करता एकाएकी त्या राक्षसावर तुटून पडले. ॥९॥
ततोऽस्य सशरं चापं मुक्तामणिविभूषितम् ।
चरणाभ्यां महातेजा बभञ्ज पतगोत्तमः ॥ १० ॥
महातेजस्वी पक्षिराज जटायुने मोती आणि मण्यांनी विभूषित, बाणासहित रावणाच्या धनुष्यास आपल्या दोन्ही पायांनी आघात करून तोडून टाकले. ॥१०॥
ततोऽन्यद् धनुरादाय रावणः क्रोधमूर्च्छितः ।
ववर्ष शरवर्षाणि शतशोऽथ सहस्रशः ॥ ११ ॥
मग तर रावण फारच रागावला आणि दुसरे धनुष्य हातात घेऊन त्याने शेकडो- हजारो बाणांची झडी लावली. ॥११॥
शरैरावारितस्तस्य संयुगे पतगेश्वरः ।
कुलायमुपसंप्राप्तः पक्षीवच्च बभौ तदा ॥ १२ ॥
त्या समयी त्या युद्धास्थळावर गृध्रराजाच्या चारीबाजूस बाणांचे जणु जाळेच बनले. ते त्या समयी घरट्‍यात बासलेल्या पक्ष्याप्रमाणे प्रतीत होत होते. ॥१२॥
स तानि शरजालानि पक्षाभ्यां तु विधूय ह ।
चरणाभ्यां महातेजा बभञ्जास्य महद् धनुः ॥ १३ ॥
तेव्हा महातेजस्वी जटायुनी आपल्या दोन्ही पंखानीच त्या बाणांना उडवून लावले आणि पंजे मारून पुन्हा त्याच्या धनुष्याचे तुकडे तुकडे करून टाकले. ॥१३॥
तच्चाग्निसदृशं दीप्तं रावणस्य शरावरम् ।
पक्षाभ्यां च महातेजा व्यधुनोत् पतगेश्वरः ॥ १४ ॥
रावणाचे कवच अग्निप्रमाणे प्रज्वलित होत होते. महातेजस्वी पक्षीराजाने ते ही पंखांनीच झडपून छिन्न-भिन्न करून टाकले. ॥१४॥
काञ्चनोरश्छदान् दिव्यान् पिशाचवदनान् खरान् ।
तांश्चास्य जवसम्पन्नाञ्जघान समरे बली ॥ १५ ॥
तत्‌पश्चात, त्या बलवान वीराने समरांगणात पिशाच्च्या सारख्या मुखाच्या त्या वेगवान्‌ गाढवांनाही, ज्यांच्या छातीवर सोन्याची कवचे बांधलेली होती, मारून टाकले. ॥१५॥
अथ त्रिवेणुसम्पन्नं कामगं पावकार्चिषम् ।
मणिसोपानचित्राङ्‌गं बभञ्ज च महारथम् ॥ १६ ॥
त्यानंतर अग्निप्रमाणे दीप्तिमान्‌, मणिमय सोपनानी विचित्र अंगे असणार्‍या तसेच इच्छेनुसार चालणार्‍या त्याच्या त्रिवेणुसंपन्न(*) विशाल रथाला ही तोडून फोडून टाकले. ॥१६॥
* त्रिवेणु रथाचे हे अंग आहे जे जू म्हणजे जोखडास धारण करीत असते. त्याच्या पर्याय आहे युगंधर.)
पूर्णचन्द्रप्रतीकाशं छत्रं च व्यजनैः सह ।
पातयामास वेगेन ग्राहिभी राक्षसैः सह ॥ १७ ॥

सारथेश्चास्य वेगेन तुण्डेन च महच्छिरः ।
पुनर्व्यपहनच्छ्रीमान् पक्षिराजो महाबलः ॥ १८ ॥
त्यानंतर पूर्ण चंद्राप्रमाणे सुशोभित छत्र आणि चामर यांनाही ते धारण करणार्‍या राक्षसासहच वेगपूर्वक मारून खाली पाडले. नंतर त्या महाबली तेजस्वी पक्षिराजाने अत्यंत वेगाने चोंच मारून रावणाच्या सारथ्याचे विशाल मस्तक ही धडापासून वेगळे करून टाकले. ॥१७-१८॥
स भग्नधन्वा विरथो हताश्वो हतसारथिः ।
अङ्‌केनादाय वैदेहीं पपात भुवि रावणः ॥ १९ ॥
याप्रकारे जेव्हा धनुष्य तुटले, रथ नष्ट झाला, घोडे मारले गेले आणि सारथीही मृत्युमुखात गेला तेव्हा रावण सीतेला मांडीवर घेऊनच पृथ्वीवर पडला. ॥१९॥
दृष्ट्‍वा निपतितं भूमौ रावणं भग्नवाहनम् ।
साधु साध्विति भूतानि गृध्रराजमपूजयन् ॥ २० ॥
रथ तुटल्याने रावणास पृथ्वीवर पडलेला पाहून सर्व प्राणी साधु, साधु म्हणून गृध्रराजाची प्रशंसा करू लागले. ॥२०॥
परिश्रान्तं तु तं दृष्ट्‍वा जरया पक्षियूथपम् ।
उत्पपात पुनर्हृष्टो मैथिलीं गृह्य रावणः ॥ २१ ॥
वृद्धावस्थेमुळे पक्षीराजास थकलेला पाहून रावणाला फार हर्ष झाला आणि तो मैथिलीला घेऊन फिरून आकाशात उडाला. ॥२१॥
तं प्रहृष्टं निधायाङ्‌के रावणं जनकात्मजाम् ।
गच्छन्तं खड्गशेषं च प्रणष्टहतसाधनम् ॥ २२ ॥

गृध्रराजः समुत्पत्य रावणं समभिद्रवत् ।
समावार्य महातेजा जटायुरिदमब्रवीत् ॥ २३ ॥
जनककिशोरीला मांडीवर घेऊन जेव्हा रावण प्रसन्नतापूर्वक जाऊ लागला त्या समयी त्याची अन्य साधने तर नष्ट होऊन गेली होती परंतु एक तलवार त्याच्या जवळ शिल्लक राहिली होती. त्याला जातांना पाहून महातेजस्वी गृध्रराज जटायु उडून रावणाकडे धावले आणि त्याला अडवून या प्रकारे बोलले- ॥२२-२३॥
वज्रसंस्पर्शबाणस्य भार्यां रामस्य रावण ।
अल्पबुद्धे हरस्येनां वधाय खलु रक्षसाम् ॥ २४ ॥
मंदबुद्धि रावणा ! ज्यांच्या बाणांचा स्पर्श वज्रासमान आहे त्या श्रीरामांच्या या धर्मपत्‍नी सीतेला तू अवश्य राक्षसांच्या वधासाठीच घेऊन जात आहेस. ॥२४॥
समित्रबन्धुः सामात्यः सबलः सपरिच्छदः ।
विषपानं पिबस्येतत् पिपासित इवोदकम् ॥ २५ ॥
जसा तहानलेला मनुष्य जल पीत राहातो त्या प्रकारे तू मित्र, बंधु, मंत्री, सेना तसेच परिवारासहित हे विषपान करीत आहेस. ॥२५॥
अनुबन्धमजानन्तः कर्मणामविचक्षणाः ।
शीघ्रमेव विनश्यन्ति यथा त्वं विनशिष्यसि ॥ २६ ॥
आपल्या कर्मांचा परिणाम न जाणणारे अज्ञानी लोक ज्याप्रमाणे शीघ्रच नष्ट होऊन जातात त्या प्रकारे तूही विनाशाच्या गर्तेत पडशील. ॥२६॥
बद्धस्त्वं कालपाशेन क्व गतस्तस्य मोक्ष्यसे ।
वधाय बडिशं गृह्य सामिषं जलजो यथा ॥ २७ ॥
तू कालपाशात बांधला गेला आहेस. कोठे जाऊन त्यापासून सुटणार आहेस ? जसे जलात उत्पन्न झालेला मस्त्य मांसयुक्त गळाला आपल्या वधासाठीच गिळून टाकतो, त्या प्रकारे तूही आपल्या मृत्युसाठीच सीतेचे अपहरण करीत आहेस. ॥२७॥
नहि जातु दुराधर्षौ काकुत्स्थौ तव रावण ।
धर्षणं चाश्रमस्यास्य क्षमिष्येते तु राघवौ ॥ २८ ॥
रावणा ! काकुत्स्थ (कुलातील) दोन्ही राघव श्रीराम आणि लक्ष्मण दोघेही बंधु दुर्धर्ष वीर आहेत. ते तुझ्याकडून आपल्या आश्रमात केला गेलेला हा अपमानजनक अपराध कधीही क्षमा करणार नाहीत. ॥२८॥
यथा त्वया कृतं कर्म भीरुणा लोकगर्हितम् ।
तस्कराचरितो मार्गो नैष वीरनिषेवितः ॥ २९ ॥
तू भ्याड आणि भेकड आहेस. तू जे आणि जसे लोकनिंदित कर्म केले आहेस तो चोरांचा मार्ग आहे. वीर पुरुष अशा मार्गाचा आश्रय घेत नाहीत. ॥२९॥
युद्ध्यस्व यदि शूरोऽसि मुहूर्तं तिष्ठ रावण ।
शयिष्यसे हतो भूमौ यथा भ्राता खरस्तथा ॥ ३० ॥
रावणा ! जर शूरवीर असशील तर आणखी दोन घटका थांब आणि माझ्याशी युद्ध कर. नंतर तर तूही त्याच प्रकारे मरून पृथ्वीवर झोपी जाशील जसा तुझा भाऊ खर झोपी गेला होता. ॥३०॥
परेतकाले पुरुषो यत्कर्म प्रतिपद्यते ।
विनाशायात्मनोऽधर्म्यं प्रतिपन्नोऽसि कर्म तत् ॥ ३१ ॥
विनाशाच्या समयी पुरुष जसे कर्म करतो, तू आपल्या विनाशासाठी तसेच अधर्मपूर्ण कर्मास आपलेसे केले आहेस. ॥३१॥
पापानुबन्धो वै यस्य कर्मणः को नु तत् पुमान् ।
कुर्वीत लोकाधिपतिः स्वयंभूर्भगवानपि ॥ ३२ ॥
जे कर्म केल्याने कर्त्याचा पापाच्या फळाशी संबंध जडतो, त्या कर्माला कोणता पुरुष निश्चित रूपाने करू शकतो ? लोकपाल इंद्र तसेच भगवान्‌ स्वयंभू (ब्रह्मदेव) ही असे कर्म करू शकत नाहीत. ॥३२॥
एवमुक्त्वा शुभं वाक्यं जटायुस्तस्य रक्षसः ।
निपपात भृशं पृष्ठे दशग्रीवस्य वीर्यवान् ॥ ३३ ॥

तं गृहीत्वा नखैस्तीक्ष्णैर्विददार समन्ततः ।
अधिरूढो गजारोहो यथा स्याद् दुष्टवारणम् ॥ ३४ ॥
या प्रकारे उत्तम वचन बोलून पराक्रमी जटायु त्या राक्षस दशग्रीवाच्या पाठीवर अत्यंत वेगाने जाऊन बसले आणि त्याला पकडून आपल्या तीक्ष्ण नखांच्या द्वारा चारी बाजूनी चिरू लागले; जणु कुणी हत्तीस्वार कुणा दुष्ट हत्तीवर स्वार होऊन अंकुशाने त्यास छेदीत असावा. ॥३३-३४॥
विददार नखैरस्य तुण्डं पृष्ठे समर्पयन् ।
केशांश्चोत्पाटयामास नखपक्षमुखायुधः ॥ ३५ ॥
नखे, पंख आणि चोंच - हीच जटायुची हत्यारे होती. ते नखांनी ओरबाडत होते, पाठीवर चोंच मारीत होते आणि केस पकडून उपटून टाकीत होते. ॥३५॥
स तथा गृध्रराजेन क्लिश्यमानो मुहुर्मुहुः ।
अमर्षस्फुरितोष्ठः सन् प्राकम्पत च राक्षसः ॥ ३६ ॥
या प्रकारे जेव्हा गृध्रराजांनी वारंवार क्लेश दिले तेव्हा राक्षस रावण कापू लागला. क्रोधाने त्याचे ओठ थरथरू लागले. ॥३६॥
स परिष्वज्य वैदेहीं वामेनाङ्‌केन रावणः ।
तलेनाभिजघानार्तो जटायुं क्रोधमूर्च्छितः ॥ ३७ ॥
त्या समयी क्रोधाविष्ट रावणाने वैदेही सीतेला वामांकावर ठेवून अत्यंत पीडित होऊन जटायुवर तळ हातांनी प्रहार केला. ॥३७॥
जटायुस्तमतिक्रम्य तुण्डेनास्य खगाधिपः ।
वामबाहून् दश तदा व्यपाहरदरिंदमः ॥ ३८ ॥
परंतु वार चुकवून शत्रुदमन गृध्रराज जटायुने आपल्या चोंचीने मारमारून रावणाच्या दाही डाव्या भुजा उपटून टाकल्या. ॥३८॥
सञ्छिन्नबाहोः सद्यो वै बाहवः सहसाभवन् ।
विषज्वालावलीयुक्ता वल्मीकादिव पन्नगाः ॥ ३९ ॥
त्या बाहूंना उपटतांच वारूळातून प्रकट होणार्‍या विषाच्या ज्वाला- मालांनी युक्त सर्पांप्रमाणे तात्काळ दुसर्‍या नव्या भुजा एकाएकी उत्पन्न झाल्या. ॥३९॥
ततः क्रोधाद् दशग्रीवः सीतामुत्सृज्य वीर्यवान् ।
मुष्टिभ्यां चरणाभ्यां च गृध्रराजमपोथयत् ॥ ४० ॥
तेव्हा पराक्रमी दशाननाने सीतेला तर सोडून दिली आणि गृध्रराजाला क्रोधपूर्वक बुक्क्‌यांनी आणि लाथांनी मारण्यास आरंभ केला. ॥४०॥
ततो मुहूर्तं सङ्‌ग्रामो बभूवातुलवीर्ययोः ।
राक्षसानां च मुख्यस्य पक्षिणां प्रवरस्य च ॥ ४१ ॥
त्या समयी त्या दोन्ही अनुपम पराक्रमी वीर राक्षसराज रावण आणि पक्षिराज जटायु यांच्यामध्ये दोन घटकापर्यंत घोर संग्राम होत राहिला. ॥४१॥
तस्य व्यायच्छमानस्य रामस्यार्थे स रावणः ।
पक्षौ पादौ च पार्श्वौ च खड्गमुद्धृत्य सोऽच्छिनत् ॥ ४२ ॥
त्यानंतर रावणाने तलवार काढली आणि श्रीरामांसाठी पराक्रम करणार्‍या जटायुचे दोन्ही पंख, पाय तसेच पार्श्वभाग कापून टाकला. ॥४२॥
स च्छिन्नपक्षः सहसा रक्षसा रौद्रकर्मणा ।
निपपात महागृध्रो धरण्यामल्पजीवितः ॥ ४३ ॥
भयंकर कर्म करणार्‍या त्या राक्षसाद्वारे एकाएकी पंख कापले गेल्यामुळे महागृघ्र जटायु पृथ्वीवर कोसळले. आता ते अल्पकाळाचेच सोबती होते. ॥४३॥
तं दृष्ट्‍वा पतितं भूमौ क्षतजार्द्रं जटायुषम् ।
अभ्यधावत वैदही स्वबन्धुमिव दुःखिता ॥ ४४ ॥
आपल्या बांधवाप्रमाणे जटायुंना रक्ताने न्हाऊन पृथ्वीवर पडलेले पाहून सीता दुःखाने व्याकुळ होऊन त्यांच्याकडे धावली. ॥४४॥
तं नीलजीमूतनिकाशकल्पं
     सुपाण्डुरोरस्कमुदारवीर्यम् ।
ददर्श लङ्‌काधिपतिः पृथिव्यां
     जटायुषं शान्तमिवाग्निदावम् ॥ ४५ ॥
जटायुच्या शरीराची कांति नील मेघासमान काळी होती. त्यांच्या छातीचा रंग श्वेत होता. ते अत्यंत पराक्रमी होते, तरीही त्या समयी विझलेल्या दावानलासमान पृथ्वीवर पडलेले होते. लंकापती रावणाने त्यांना या अवस्थेमध्ये पाहिले. ॥४५॥
ततस्तु तं पत्ररथं महीतले
     निपातितं रावणवेगमर्दितम् ।
पुनश्च संगृह्य शशिप्रभानना
     रुरोद सीता जनकात्मजा तदा ॥ ४६ ॥
त्यानंतर रावणाच्या वेगाने मर्दित होऊन धराशायी झालेल्या जटायुला पकडून चंद्रमुखी जनकनंदिनी सीता त्यासमयी पुन्हां तेथे रडू लागली. ॥४६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकपञ्चाशः सर्गः ॥ ५१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा एकावन्नवा सर्ग पूरा झाला. ॥५१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP