श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ सप्तमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुग्रीवेण श्रीरामस्य समाश्वासनं, श्रीरामेण सुग्रीवस्य कार्यसिद्ध्यै विश्वासदापनम् - सुग्रीवांनी रामांना समजाविणे तसेच श्रीरामांनी सुग्रीवास त्यांच्या कार्यसिद्धिचा विश्वास देणे -
एवमुक्तस्तु सुग्रीवो रामेणार्तेन वानरः ।
अब्रवीत् प्राञ्चलिर्वाक्यं सबाष्पं बाष्पगद्गादः ॥ १ ॥
श्रीराम शोकाने पीडित होऊन जेव्हा अशा गोष्टी बोलले, तेव्हा वानरराज सुग्रीवाच्या डोळ्यात अश्रु उमटले आणि ते हात जोडून अश्रुगद्‍गद कण्ठाने याप्रकारे म्हणाले- ॥१॥
न जाने निलयं तस्य सर्वथा पापरक्षसः ।
सामर्थ्यं विक्रमं वापि दौष्कुलेयस्य वा कुलम् ॥ २ ॥
प्रभो ! नीच कुळात उत्पन्न झालेल्या त्या पापात्मा राक्षसाचे गुप्त निवासस्थान कोठे आहे, त्याच्यात किती शक्ति आहे, त्याचा पराक्रम कसा आहे अथवा तो कुठल्या वंशाचा आहे- या सर्व गोष्टी मी सर्वथा जाणत नाही.’ ॥२॥
सत्यं ते प्रतिजानामि त्यज शोकमरिंदम ।
करिष्यामि तथा यत्‍नंी यथा प्राप्यसि मैथिलीम् ॥ ३ ॥
’परंतु आपल्या समोर सत्य प्रतिज्ञा करून सांगतो की मी असा यत्‍न करीन की ज्यायोगे मैथिली सीता आपल्याला मिळेल, म्हणून शत्रुदमन वीरा ! आपण शोकाचा त्याग करावा.’ ॥३॥
रावणं सगणं हत्वा परितोष्यात्मपौरुषम् ।
तथा ऽस्मि कर्ता नचिराद्यथा प्रीतो भविष्यसि ॥ ४ ॥
’मी आपल्या संतोषासाठी सैनिकांसहित रावणाचा वध करून आपला असा पुरुषार्थ प्रकट करीन की ज्यायोगे आपण शीघ्र प्रसन्न होऊन जाल. ॥४॥
अलं वैक्लव्यमालंब्य धैर्यमात्मगतं स्मर ।
त्वद्विधानामसदृशमीदृशं विद्धि लाघवम् ॥ ५ ॥
’याप्रमाणे मनात व्याकुळता आणणे व्यर्थ आहे. आपल्या हृदयांत स्वाभाविकरूपाने जे धैर्य आहे त्याचे स्मरण करावे. या प्रकारे बुद्धि आणि विचारांना हलके बनविणे- त्याची सहज गंभीरता गमावणे आपल्यासारख्या महापुरुषांसाठी उचित नाही. ॥५॥
मयापि व्यसनं प्राप्तं भार्याहरणजं महत् ।
न चाहमेवं शोचामि न च धैर्यं परित्यजे ॥ ६ ॥
’मलाही पत्‍नीच्या विरहाचे महान् कष्ट प्राप्त झाले आहे, परंतु मी याप्रमाणे शोक करीत नाही आणि धैर्यही सोडत नाही. ॥६॥
नाहं तामनुशोचामि प्राकृतो वानरो ऽपि सन् ।
महात्मा च विनीतश्च किं पुनर्धृतिमान् महान् ॥ ७ ॥
’जरी मी एक साधारण वानर आहे तरी आपल्या पत्‍नीसाठी निरंतर शोक करीत नाही. मग आपल्या सारखे महात्मा, सुशिक्षित आणि धैर्यवान् महापुरुष शोक करीत नाहीत हे सांगण्याची तरी काय जरूर आहे ! ॥७॥
बाष्पमापतितं धैर्यान्निग्रहीतुं त्वमर्हसि ।
मर्यादां सत्त्वयुक्तानां धृतिं नोत्स्रष्टुमर्हसि ॥ ८ ॥
’आपण आता धैर्य धारण करून या गळणार्‍या अश्रूंना आवरले पाहिजे. सात्विक पुरुषांनी मर्यादेचा आणि धैर्याचा परित्याग करू नये. ॥८॥
व्यसने वार्थकृच्छ्रे वा भये वा जीवितांतके ।
विमृशन् वै स्वया बुद्ध्या धृतिमान् नावसीदति ॥ ९ ॥
’(आत्मीय जनांच्या वियोग आदिने होणार्‍या) शोकात, आर्थीक संकटात अथवा प्राणांतकारी भय उपस्थित झाले असता जो आपल्या बुद्धिने दुःख निवारण्याच्या उपायाचा विचार करून धैर्य धारण करतो, तो कष्ट भोगत नाही. ॥९॥
बालिशस्तु नरो नित्यं वैक्लव्यं योऽनुवर्तते ।
स मज्जत्यवशः शोके भाराक्रांतेव नौर्जले ॥ १० ॥
’जो मूढ मानव सदा भ्याड बनून राहातो, तो पाण्यातील भाराने दबलेल्या नौकेप्रमाणे शोकातच विवश होऊन बुडून जातो. ॥१०॥
एषो ऽञ्जलिर्मया बद्धः प्रणयात्त्वां प्रसादये ।
पौरुषं श्रय शोकस्य नांतरं दातुमर्हसि ॥ ११ ॥
’मी हात जोडतो. प्रेमपूर्वक अनुरोध करतो आहे की आपण प्रसन्न व्हावे आणि पुरुषार्थाचा आश्रय घ्यावा. शोकाला आपल्यावर प्रभाव पाडण्यास संधी देऊ नये. ॥११॥
ये शोकमनुर्तंते न तेषां विद्यते सुखम् ।
तेजश्च क्षीयते तेषां न त्वं शोचितुमर्हसि ॥ १२ ॥
जे शोकाचे अनुसरण करतात त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे तेजही क्षीण होऊन जाते म्हणून आपण शोक करू नये. ॥१२॥
शोकेनाभिप्रपन्नस्य जीविते चापि संशयः ।
स शोकं त्यज राजेंद्र धैर्यमाश्रय केवलम् ॥ १३ ॥
’राजेन्द्र ! शोकाने आक्रान्त झालेल्या मनुष्यांच्या जीवनांत (त्याच्या प्राणांच्या रक्षणासंबंधी) ही संशय उपस्थित होतो. म्हणून आपण शोकाचा त्याग करावा आणि केवळ धैर्याचा आश्रय घ्यावा. ॥१३॥
हितं वयस्यभावेन ब्रूमि नोपदिशामि ते ।
वयस्यतां पूजयन्मे न त्वं शोचितुमर्हसि ॥ १४ ॥
’मी मित्रत्वाच्या नात्याने हिताचा सल्ला देत आहे. आपल्याला उपदेश करीत नाही. आपण माझ्या मैत्रीचा आदर करून कदापि शोक करू नये.’ ॥१४॥
मधुरं सांत्वितस्तेन सुग्रीवेण स राघवः ।
मुखमश्रुपरिक्लिन्नं वस्त्रांतेन प्रमार्जयत् ॥ १५ ॥
सुग्रीवाने जेव्हा मधुर वाणीमध्ये या प्रकारे सांत्वना दिली तेव्हा राघवांनी अश्रुनी भिजलेले आपले मुख वस्त्राच्या टोकाने पुसून टाकले. ॥१५॥
प्रकृतिस्थस्तु काकुत्स्थः सुग्रीववचनात् प्रभुः ।
संपरिष्वज्य सुग्रीवमिदं वचनमब्रवीत् ॥ १६ ॥
सुग्रीवांच्या वचनांनी शोकाचा परित्याग करून स्वस्थचित्त होऊन काकुत्स्थ भगवान् श्रीरामांनी मित्रवर सुग्रीवास हृदयाशी धरले आणि याप्रकारे बोलले- ॥१६॥
कर्तव्यं यद्वयस्येन स्निग्धेन च हितेन च ।
अनुरूपं च युक्तं च कृतं सुग्रीव तत्त्वया ॥ १७ ॥
’सुग्रीवा ! एका स्नेही आणि हितैषी मित्राने जे करणे आवश्यक आहे तेच तुम्ही केले आहे. तुमचे कार्य सर्वथा उचित आणि तुमच्या योग्यच आहे. ॥१७॥
एष च प्रकृतिस्थो ऽहमनुनीतस्त्वया सखे ।
दुर्लभो हीदृशो बंधुरस्मिन् काले विशेषतः ॥ १८ ॥
’सख्या ! तुमच्या आश्वासनाने माझी सर्व चिंता दूर होत आहे. आता मी पूर्ण स्वस्थ आहे. तुमच्या सारख्या बंधुची विशेषतः अशा संकट समयी भेट होणे कठीण असते. ॥१८॥
किंतु यत्‍न स्त्वया कार्यो मैथिल्याः परिमार्गणे ।
राक्षसस्य च रौद्रस्य रावणस्य दुरात्मनः ॥ १९ ॥
’परंतु तुम्ही मैथिली सीता तसेच रौद्ररूपधारी दुरात्मा राक्षस रावणाचा पत्ता लावण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. ॥१९॥
मया च यदनुष्ठेयं विस्रब्धेन तदुच्यताम् ।
वर्षास्विव च सुक्षेत्रे सर्वं संपद्यते मयि ॥ २० ॥
’याच बरोबर मलाही या समयी तुमच्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते कुठल्याही प्रकारे संकोच न बाळगता मला सांगा. ज्याप्रमाणे वर्षाकाळी चांगल्या शेतात पेरलेले बीज अवश्य फळ देते त्याप्रमाणे तुमचे सर्व मनोरथ सफल होतील. ॥२०॥
मया य यदिदं वाक्यमभिमानात्समीरितम् ।
तत्त्वया हरिशार्दूल तत्त्वमित्युपधार्यताम् ॥ २१ ॥
’वानरश्रेष्ठ ! मी जी ही अभिमानपूर्वक वालीचा वध आदि करण्याची गोष्ट सांगितली आहे, ती तू ठीकच आहे असे समज. ॥२१॥
अनृतं नोक्तपूर्वं मे न च वक्ष्ये कदाचन ।
एतत्ते प्रतिजानामि सत्येनैव शप्याम्यहम् ॥ २२ ॥
’मी पूर्वीही कधी खोटे भाषण केलेले नाही आणि भविष्यातही कधी असत्य बोलणार नाही. या समयी जे काही सांगितले आहे ते पूर्ण करण्याची प्रतिज्ञा करतो आणि तुम्हांला विश्वास वाटावा म्हणून सत्याची शपथ घेतो.’ ॥२२॥
ततः प्रहृष्टः सुग्रीवो वानरैः सचिवैः सह ।
राघवस्य वचः श्रुत्वा प्रतिज्ञातं विशेषतः ॥ २३ ॥
राघवांचे वचन विशेषतः त्यांची प्रतिज्ञा ऐकून आपल्या वानरमंत्र्यांसहित सुग्रीवांना फार प्रसन्नता वाटली. ॥२३॥
एवमेकांतसंपृक्तौ ततस्तौ नरवानरौ ।
उभावन्योन्यसदृशं सुखं दुःखमभाषताम् ॥ २४ ॥
याप्रकारे एकांतात एक दुसर्‍याच्या निकट बसलेले ते दोघे नर आणि वानर (राम आणि सुग्रीव) यांनी परस्परांस सुख आणि दुःख यांविषयी ज्या गोष्टी सांगितल्या त्या एक दुसर्‍यासाठी अनुरूप होत्या. ॥२४॥
महानुभावस्य वचो निशम्य
हरिर्नराणामृषभस्य तस्य ।
कृतं स मेने हरिवीरमुख्यः
तदा स्वकार्यं हृदयेन विद्वान् ॥ २५ ॥
राजाधिराज महाराज श्रीरामचंद्रांचे बोलणे ऐकून वानरवीरांच्या प्रधान विद्वा सुग्रीवांनी त्या समयी मनांतल्या मनात आपले कार्य सिद्ध झाले असेच मानले. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सातवा सर्ग पूरा झाला. ॥७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP