[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ द्विसप्ततितमः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामलक्ष्मणाभ्यां चिताग्निना कबन्धस्य दाहो दिव्यरूपं धृत्वा तेन श्रीरामाय सुग्रीवेण सह मैत्रीं कर्तुं संमतिदानम् -
श्रीराम आणि लक्ष्मण द्वारा चितेच्या आगीत कबंधाचा दाह तसेच त्याचे दिव्य रूपात प्रकट होणे त्यांना सुग्रीवाशी मित्रता करण्यासाठी सांगणे -
एवमुक्तौ तु तौ वीरौ कबन्धेन नरेश्वरौ ।
गिरिप्रदरमासाद्य पावकं विससर्जतुः ॥ १ ॥
कबंधाने असे सांगितल्यावर त्या दोन्ही वीर नरेश्वरांनी - श्रीराम आणि लक्ष्मण यांनी त्याच्या शरीरास एका पर्वताच्या खड्‍ड्यात टाकून त्यास अग्नी दिला. ॥१॥
लक्ष्मणस्तु महोल्काभिर्ज्वलिताभिः समन्ततः ।
चितामादीपयामास सा प्रजज्वाल सर्वतः ॥ २ ॥
लक्ष्मणांनी जळत असलेल्या मोठ्‍या उल्कांच्या द्वारा चारी बाजूनी त्याच्या चितेस अग्नि लावला, मग तर ती सर्व बाजूनी प्रज्वलित झाली. ॥२॥
तच्छरीरं कबन्धस्य घृतपिण्डोपमं महत् ।
मेदसा पच्यमानस्य मन्दं दहत पावकः ॥ ३ ॥
चितेत जळत असलेले कबंधाचे विशाल शरीर चरबीने भरलेले असल्याने तुपाच्या गोळ्याप्रमाणे प्रतीत होत होते. चितेची आग त्याला हळू हळू जाळू लागली. ॥३॥
स विधूय चितामाशु विधूमोऽग्निरिवोत्थितः ।
अरजे वाससी बिभ्रन्माल्यं दिव्यं महाबलः ॥ ४ ॥
त्यानंतर तो महाबली कबंध ताबडतोबच त्या चितेला हलवून दोन निर्मल वस्त्र आणि दिव्य पुष्पांचा हार धारण करून धूमरहित अग्निप्रमाणे उठून उभा राहिला. ॥४॥
ततश्चिताया वेगेन भास्वरो विरजाम्बरः ।
उत्पपाताशु संहृष्टः सर्वप्रत्यङ्‌गभूषणः ॥ ५ ॥

विमाने भास्वरे तिष्ठन् हंसयुक्ते यशस्करे ।
प्रभया च महातेजा दिशो दश विराजयन् ॥ ६ ॥

सोऽन्तरिक्षगतो वाक्यं कबन्धो राममब्रवीत् ।
नंतर वेगपूर्वक चितेतून वर उठला आणि शीघ्रच एका तेजस्वी विमानावर जाऊन बसला. निर्मल वस्त्रांनी विभूषित होऊन तो फार तेजस्वी दिसून येत होता. त्याच्या मनात हर्ष भरला होता तसेच समस्त अंग-प्रत्यंगावर दिव्य आभूषणे शोभून दिसत होती. हंस जोडलेल्या त्या यशस्वी विमानात बसलेला महान्‌ तेजस्वी कबंध आपल्या प्रभेने दाही दिशांना प्रकाशित करू लागला आणि अंतरिक्षात स्थित होऊन श्रीरामांना याप्रकारे म्हणाला- ॥५-६ १/२॥
शृणु राघव तत्त्वेन यथा सीतामवाप्स्यसि ॥ ७ ॥

राम षड् युक्तयो लोके याभिः सत्त्वं विमृश्यते ।
परिमृष्टो दशान्तेन दशाभागेन सेव्यते ॥ ८ ॥
राघवा ! आपण ज्याप्रकारे सीतेस प्राप्त करू शकाल ते ठीक ठीक सांगतो आहे, आपण ऐकावे. श्रीरामा ! या लोकात सहा युक्त्या आहेत ज्यांच्या योगे राजांच्या द्वारे सर्व काही प्राप्त केले जाते. ( त्या युक्त्यांची तसेच उपायांची नावे आहेत - संधि, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव आणि समाश्रय) जो मनुष्य दुर्दशेने ग्रस्त होतो तो दुसर्‍या कोणा दुर्दशाग्रस्त पुरुषांकडूनच सेवा अथवा सहायता प्राप्त करतो. ( ही नीति आहे) ॥७-८॥
दशाभागगतो हीनस्त्वं हि राम सलक्ष्मणः ।
यत्कृते व्यसनं प्राप्तं त्वया दारप्रधर्षणम् ॥ ९ ॥
श्रीरामा ! लक्ष्मणासहित आपण वाईट दशेची शिकार होत आहात. म्हणून आपण राज्यापासून वंचित आहात तसेच त्या वाईट दशेमुळेच आपल्याला आपल्या भार्येच्या अपहरणाचे महान्‌ दुःख प्राप्त झाले आहे. ॥९॥
तदवश्यं त्वया कार्यः स सुहृत् सुहृदां वर ।
अकृत्वा हि न ते सिद्धिमहं पश्यामि चिन्तयन् ॥ १० ॥
म्हणून सुहृदांत श्रेष्ठ रघुनंदना ! आपण जो आपल्या प्रमाणेच दुर्दशेत पडला आहे अशा पुरुषालाच आपला सुहृद बनवावे. (या प्रकारे आपण सुहृदाचा आश्रय घेऊन समाश्रय नीतिचा अवलंब करावा.) मी खूप विचार केल्यावर असे केल्याखेरीज आपली सफलता पाहू शकत नाही. ॥१०॥
श्रूयतां राम वक्ष्यामि सुग्रीवो नाम वानरः ।
भ्रात्रा निरस्तः क्रुद्धेन वालिना शक्रसूनुना ॥ ११ ॥
श्रीरामा ! ऐका मी अशा पुरुषाचा परिचय करून देत आहे ज्याचे नाव सुग्रीव आहे. ते जातीने वानर आहेत. त्यांना त्यांचा भाऊ इंद्रकुमार वालीने रागावून घरातून घालवून दिले आहे. ॥११॥
ऋष्यमूके गिरिवरे पम्पापर्यन्तशोभिते ।
निवसत्यात्मवान् वीरः चतुर्भिः सह वानरैः ॥ १२ ॥
ते मनस्वी वीर सुग्रीव या समयी चार वानरांसह त्या ऋष्यमूक गिरिवर निवास करीत आहेत; जो पंपा सरोवरा पर्यंत पसरलेला आहे. ॥१२॥
वानरेन्द्रो महावीर्यस्तेजोवानमितप्रभः ।
सत्यसन्धो विनीतश्च धृतिमान् मतिमान् महान् ॥ १३ ॥

दक्षः प्रगल्भो द्युतिमान् महाबलपराक्रमः ।
ते वानरांचे राजे महापराक्रमी सुग्रीव तेजस्वी, अत्यंत कान्तिमान्‌, सत्यप्रतिज्ञ, विनयशील, धैर्यवान्‌, बुद्धिमान्‌, महापुरुष कार्यादक्ष निर्भिक, दिप्तिमान्‌ तसेच महान्‌ बळ आणि पराक्रमाने संपन्न आहेत. ॥१३ १/२॥
भ्रात्रा विवासितो वीर राज्यहेतोर्महात्मना ॥ १४ ॥

स ते सहायो मित्रं च सीतायाः परिमार्गणे ।
भविष्यति हि ते राम मा च शोके मनः कृथाः ॥ १५ ॥
वीर श्रीरामा ! त्यांच्या महामना भाऊ वालीने सारे राज्य आपल्या अधिकारात करून घेण्यासाठी त्यांना राज्याबाहेर घालवून दिले आहे, म्हणून ते सीतेच्या शोधासाठी आपले सहायक आणि मित्र होतील. म्हणून आपल्या मनाला शोकात पाडू नका. ॥१४-१५॥
भवितव्यं हि तच्चापि न तच्छक्यमिहान्यथा ।
कर्तुमिक्ष्वाकुशार्दूल कालो हि दुरतिक्रमः ॥ १६ ॥
इक्ष्वाकुवंशी वीरांमध्ये श्रेष्ठ श्रीरामा ! जे होणार आहे ते कुणी ही बदलू शकत नाही. काळाचे विधान सर्वांसाठी दुर्लंघ्य असते. (म्हणून आपल्यावर जो प्रसंग ओढवला आहे, त्याला काळाचे प्रारब्धाने विधान समजून आपण धैर्य धारण केले पाहिजे.) ॥१६॥
गच्छ शीघ्रमितो राम सुग्रीवं तं महाबलम् ।
वयस्यं तं कुरु क्षिप्रमितो गत्वाद्य राघव ॥ १७ ॥
वीर राघवा ! आपण येथून तात्काळच महाबली सुग्रीवाजवळ जावे आणि जाऊन तात्काळ त्यांना आपला मित्र बनवावे. ॥१७॥
अद्रोहाय समागम्य दीप्यमाने विभावसौ ।
स च ते सोऽवमन्तव्यः सुग्रीवो वानराधिपः ॥ १८ ॥
प्रज्वलित अग्निला साक्षी बनवून परस्पर द्रोह न करण्यासाठी मैत्री स्थापित करावी आणि असे केल्यानंतर आपण कधी त्या वानरराजा सुग्रीवाचा अपमान करता कामा नये. ॥१८॥
कृतज्ञः कामरूपी च सहायार्थी च वीर्यवान् ।
शक्तौ ह्यद्य युवां कर्तुं कार्यं तस्य चिकीर्षितम् ॥ १९ ॥
ते इच्छेनुसार रूप धारण करणारे, पराक्रमी आणि कृतज्ञ आहेत तसेच या समयी स्वतः ही आपल्यासाठी एका सहायकाच्या शोधात आहेत. त्यांचे हे अभीष्ट कार्य आहे ते सिद्ध करण्यास आपण दोघे भाऊ समर्थ आहात. ॥१९॥
कृतार्थो वाऽकृतार्थो वा तव कृत्यं करिष्यति ।
स ऋक्षरजसः पुत्रः पम्पामटति शंकितः ॥ २० ॥
सुग्रीवाचा मनोरथ पूर्ण होवो अथवा न होवो, ते आपले कार्य अवश्य सिद्ध करतील. ते ऋक्षराजाचे क्षेत्रज पुत्र आहेत आणि वालीमुळे शंकित राहून पंपासरोवराच्या तटावर भ्रमण करीत असतात. ॥२०॥
भास्करस्यौरसः पुत्रो वालिना कृतकिल्बिषः ।
संनिधायायुधं क्षिप्रमृष्यमूकालयं कपिम् ॥ २१ ॥

कुरु राघव सत्येन वयस्यं वनचारिणम् ।
त्यांना सुर्यदेवांचे औरस पुत्र म्हटले गेले आहे. त्यांनी वालीचा अपराध केला आहे. (म्हणून ते त्याला घाबरतात) राघवा ! अग्निच्या समीप हत्यार ठेवून तात्काळच सत्याची शपथ घेऊन ऋष्यमूकनिवासी वनचारी वानर सुग्रीवास आपण आपला मित्र बनवावे. ॥२१ १/२॥
स हि स्थानानि कार्त्स्न्येन सर्वाणि कपिकुञ्जरः ॥ २२ ॥

नरमांसाशिनां लोके नैपुण्यादधिगच्छति ।
कपिश्रेष्ठ सुग्रीव संसारात नरमांसभक्षी राक्षसांची जितकी स्थाने आहेत त्या सर्वाना पूर्णरूपाने निपुणतापूर्वक जाणत आहेत. ॥२२ १/२॥
न तस्याविदितं लोके किञ्चिदस्ति हि राघव ॥ २३ ॥

यावत् सूर्यः प्रतपति सहस्रांशुः परंतप ।
राघवा ! परंतपा ! सहस्त्र किरण असणारे सूर्यदेव जेथपर्यंत तपत असतात तेथपर्यंत संसारात असे कुठलेही स्थान अथवा वस्तु नाही की जी सुग्रीवासाठी अज्ञात असेल. ॥२३ १/२॥
स नदीर्विपुलाञ्छैलान् गिरिदुर्गाणि कन्दरान् ॥ २४ ॥

अन्विष्य वानरैः सार्धं पत्‍नींत तेऽधिगमिष्यति ।
ते वानरांसह राहून समस्त नद्या, मोठ मोठे पर्वत, पहाडी दुर्गम स्थाने आणि कंदरांच्या मध्येही शोध करवून आपल्या पत्‍नीचा पत्ता लावून देतील. ॥२४ १/२॥
वानरांश्च महाकायान् प्रेषयिष्यति राघव ॥ २५ ॥

दिशो विचेतुं तां सीतां त्वद्वियोगेन शोचतीम् ।
अन्वेष्यति वरारोहां मैथिलीं रावणालये ॥ २६ ॥
राघवा ! ते आपल्या वियोगात शोक करीत असणार्‍या सीतेच्या शोधासाठी संपूर्ण दिशांना विशालकाय वानरांना धाडतील, तसेच रावणाच्या घरांतूनही सुंदर अंगे असणार्‍या मैथिलीला शोधून काढतील. ॥२५-२६॥
स मेरुशृङ्‌गाग्रगतामनिन्दितां
     प्रविश्य पातालतलेऽपि वाश्रिताम् ।
प्लवङ्‌गमानामृषभस्तव प्रियां
     निहत्य रक्षांसि पुनः प्रदास्यति ॥ २७ ॥
आपली प्रिया सती -साध्वी सीता मेरूशिखराच्या अग्रभागावर पोहोचवली गेली असली अथवा पाताळात प्रवेश करून तेथे ठेवली गेली असली तरी वानरशिरोमणी सुग्रीव समस्त राक्षसांचा वध करून तिला पुन्हा आपाल्यापाशी आणून देतील. ॥२७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे द्विसप्ततितमः सर्गः ॥ ७२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा बाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP