श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ त्रयास्त्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
किष्किंधासुषमां पश्यतो लक्ष्मणस्य सुग्रीवसदने प्रवेशः, प्रविश्य च तेन सरोषं धनुषो विस्फरणं, भीतेन सुग्रीवेण तस्य रोषशमनाय तारायाः प्रेषणं, तारया प्रबोध्य तस्यांतःपुर आनयनम् - लक्ष्मणांनी किष्किंधापुरीची शोभा पहात सुग्रीवाच्या महालात प्रवेश करून क्रोधपूर्वक धनुष्याचा टणत्कार करणे, भयभीत सुग्रीवांनी तारेला त्यांना शांत करणासाठी पाठवणे तसेच तारेने त्यांना समजावून अंतःपुरात घेऊन येणे -
अथ प्रतिसमादिष्टो लक्ष्मणः परवीरहा ।
प्रविवेष गुहां घोरां किष्किंधां रामशासनात् ॥ १ ॥
इकडे नगर् प्रवेश करण्याविषयी अंगदाने प्रार्थना केल्यावर शत्रुवीरांचा संहार करणार्‍या लक्ष्मणांनी रामांच्या आज्ञेनुसार किष्किंधा नामक रमणीय नगरात प्रवेश केला. ॥१॥
द्वारस्था हरयस्तत्र महाकाया महाबलाः ।
बभूवुर्लक्ष्मणं दृष्ट्‍वा सर्वे प्राञ्जलयः स्थिताः ॥ २ ॥
किष्किंधेच्या द्वारावर जे विशाल शरीराचे महाबलाढ्य वानर होते ते लक्ष्मणांना पहाताच हात जोडून उभे राहिले. ॥२॥
निःश्वसंतं तु तं दृष्ट्‍वा क्रुद्धं दशरथात्मजम् ।
बभूवुर्हरयस्त्रस्ता न चैनं पर्यवारयन् ॥ ३ ॥
दशरथनंदन लक्ष्मणाला क्रोधपूर्वक दीर्घ श्वास घेतांना पाहून ते सर्व वानर अत्यंत भयभीत झाले. म्हणून ते त्यांना चारी बाजूंनी घेरून त्यांच्या बरोबर बरोबर जाऊ शकले नाहीत. ॥३॥
स तां रत्‍न मयीं दिव्यां श्रीमान् पुष्पितकाननाम् ।
रम्यां रत्‍नरसमाकीर्णां ददर्श महतीं गुहाम् ॥ ४ ॥
श्रीमान् लक्ष्मणांनी द्वारांतून आत प्रवेश करून पाहिले की किष्किंधापुरी एका फारच मोठ्या रमणीय गुफेच्या रूपात वसविली गेली आहे. ती रत्‍नमय पुरी नाना प्रकारच्या रत्‍नांनी परिपूर्ण असल्याकारणाने दिव्य शोभेने संपन्न होती. तेथील वने-उपवने फुलांनी सुशोभित दिसत होती. ॥४॥
हर्म्यप्रासादसंबाधां नानारत्‍नोापशोभिताम् ।
सर्वकामफलैर्वृक्षैः पुष्पितैरुपशोभिताम् ॥ ५ ॥
(धनिक लोकांच्या मोठमोठ्या हवेल्या, तसेच प्रासाद, देवमंदिरे आणि राजभवने यांनी ती पुरी अत्यंत श्रीमंत दिसत होती. नाना प्रकारची रत्‍ने तिची शोभा वाढवीत होती. संपूर्ण कामनांना पूर्ण करणार्‍या फळांनी युक्त फुललेल्या वृक्षांनी ती पुरी सुशोभित झाली होती. ॥५॥
देवगंधर्वपुत्रैश्च वानरैः कामरूपिभिः ।
दिव्यमाल्यांबरधरैः शोभितां प्रियदर्शनैः ॥ ६ ॥
तेथे दिव्य माला आणि दिव्य वस्त्रे धारण करणारे सुंदर वानर, जे देवतांचे आणि गंधर्वांच्या पुत्रासारखे, तसेच इच्छानुसार रूप धारण करणारे होते, आणि निवास करून त्या नगरीची शोभा वाढवीत होते. ॥६॥
चंदनागरुपद्मानां गंधैः सुरभिगंधिताम् ।
मैरेयाणां मधूनां च सम्मोदितमहापथाम् ॥ ७ ॥
तेथे चंदन, अगरू आणि कमलांचा मनोहर सुगंध पसरला होता. त्या पुरीतील लांब-रूंद रस्ते ही मैश्य तसेच मधुच्या आमोदाने घमघमत होते. ॥७॥
विंध्यमेरुगिरिप्रखैः प्रासादैनैकभूमिभिः ।
ददर्श गिरिनद्यश्च विमलास्तत्र राघवः ॥ ८ ॥
त्या पुरीत विंध्याचल तसेच मेरू समान उंच उंच महाल बनविलेले होते, जे कित्येक मजल्यांचे होते. लक्ष्मणांनी त्या गुफेच्या जवळच निर्मल जलाने भरलेल्या पहाडी नद्या पाहिल्या. ॥८॥
अङ्‌गशदस्य गृहं रम्यं मैंदस्य द्विविदस्य च ।
गवयस्य गवाक्षस्य गजस्य शरभस्य च ॥ ९ ॥

विद्युन्मालेश्च संपातेः सूर्याक्षस्य हनूमतः ।
वीरबाहोः सुबाहोश्च नलस्य च महात्मनः ॥ १० ॥

कुमुदस्य सुषेणस्य तारजांबवतोस्तथा ।
दधिवक्त्रस्य नीलस्य सुपाटलसुनेत्रयोः ॥ ११ ॥

एतेषां कपिमुख्यानां राजमार्गे महात्मनाम् ।
ददर्श गृहमुख्यानि महासाराणि लक्ष्मणः ॥ १२ ॥
त्यांनी राजमार्गावर अंगदाचे रमणीय भवन पाहिले. त्याच बरोबर तेथे मैंद, द्विविद, गवय, गवाक्ष, गज, शरभ, विद्युन्माली, संपाति, सूर्याक्ष, हनुमान्, बीरबाहु, सुबाहु, महात्मा नल, कुमुद, सुषेण, सार, जाम्बवान् दधिमुख, नील, सुपाटल आणि सुनेत्र - या महामनस्वी वानरशिरोमणींचीही अत्यंत सुदृढ श्रेष्ठ भवने लक्ष्मणास दिसली. ती सर्वच्या सर्व राजमार्गावरच बनविलेली होती. ॥९-१२॥
पाण्डुराभ्रप्रकाशानि दिव्यमाल्ययुतानि च ।
प्रभूतधनधान्यानि स्त्रीरत्‍नैः शोभितानि च ॥ १३ ॥
ती सर्व भवने श्वेत मेघांप्रमाणे प्रकाशित होत होती. त्यांना सुगंधित पुष्पमालांनी सजविलेले होते. ती प्रचुर धनधान्याने संपन्न तसेच रत्‍नस्वरूपा रमणींनी सुशोभित होती. ॥१३॥
पाण्डुरेण तु शैलेन परिक्षिप्तं दुरासदम् ।
वानरेंद्रगृहं रम्यं महेंद्रसदनोपमम् ॥ १४ ॥
वानरराज सुग्रीवांचे सुंदर भवन इंद्रसदनासमान रमणीय दिसून येत होते. त्यात प्रवेश करणे कुणालाही अत्यंत कठीण होते. ते श्वेत पर्वताच्या तटबंदीने घेरलेले होते. ॥१४॥
शुक्लैः प्रासादशिखरैः कैलासशिखरोपमैः ।
सर्वकामफलैर्वृक्षैः पुष्पितैरुपशोभितम् ॥ १५ ॥
कैलास शिखराच्या समान श्वेत प्रासाद-शिखर तसेच समस्त मनोरथांना पूर्ण करणार्‍या फलांनी युक्त, पुष्पित दिव्य वृक्ष त्या राजभवनाची शोभा वाढवीत होते. ॥१५॥
महेंद्रदत्तैः श्रीमद्‌भिः नीलजीमूतसंनिभैः ।
दिव्यपुष्पफलैर्वृक्षैः शीतच्छायैर्मनोरमैः ॥ १६ ॥
तेथे इंद्रांनी दिलेले दिव्य फळा-फुलांनी संपन्न मनोरम वृक्ष लावले गेले होते, जे परम सुंदर नील, मेघासमान श्याम तसेच शीतल छायेने युक्त होते. ॥१६॥
हरिभिः संवृतद्वारं बलिभिः शस्त्रपाणिभिः ।
दिव्यमाल्यावृतं शुभ्रं तप्तकाञ्चनतोरणम् ॥ १७ ॥
अनेक बलवान् वानर हातांमध्ये ह्त्यारे घेऊन त्याच्या देवड्यांच्यावर पहारा करीत होते. तो सुंदर महाल दिव्य मालांनी अलंकृत होता आणि त्याचे बाहेरचे तोरण, पट्ट्या सोन्याचे बनविलेले होते. ॥१७॥
सुग्रीवस्य गृहं रम्यं प्रविवेश महाबलः ।
अवार्यमाणः सौमित्रिः महाभ्रमिव भास्करः ॥ १८ ॥
महाबली सौमित्र लक्ष्मणाने सुग्रीवांच्या त्या रमणीय भवनात प्रवेश केला. जणु सूर्यदेवच महान् मेघांत प्रविष्ट झाले आहेत. त्यावेळी कुणीही त्यांना अडविले नाही. ॥१८॥
स सप्त कक्ष्या धर्मात्मा नानाजनसमावृताः ।
ददर्श सुमहद् गुप्तं ददर्शांतःपुरं महत् ॥ १९ ॥
धर्मात्मा लक्ष्मणांनी वाहने, तसेच विविध आसनांनी सुशोभित त्या भवनाच्या सात देवड्यांना पार करून बर्‍याचशा गुप्त आणि विशाल अंतःपुरांना पाहिले. ॥१९॥
हैमराजतपर्यङ्‌कैः बहुभिश्च वरासनैः ।
महार्हास्तरणोपेतैः तत्र तत्र समावृतम् ॥ २० ॥
त्यांत जेथे-तेथे चांदी आणि सोन्याचे बरेचसे पलंग तसेच अनेकानेक श्रेष्ठ आसने ठेवलेली होती आणि त्या सर्वांवर बहुमूल्य बिछानती पसरलेल्या होत्या. त्या सर्वांनी ते अंतःपुर सुसज्जित दिसून येत होते. ॥२०॥
प्रविशन्नेव सततं शुश्राव मधुरस्वरम् ।
तंत्रीगीतसमाकीर्णं समतालपदाक्षरम् ॥ २१ ॥
त्यात प्रवेश करतांच लक्ष्मणांच्या कानांवर संगीताची मोठी तान ऐकू आली, जी तेथे निरंतर निनादत राहिली होती. वीणेच्या लयीवर कुणी कोमल कण्ठाने गात राहिले होते. प्रत्येक पद आणि अक्षराचे उच्चारण सम तालाचे(**) प्रदर्शन करीत होत होते. ॥२१॥
(**- संगीतातील ते स्थान जेथे गाणे-बजावणे करणार्‍या व्यक्तीचे शिर अथवा हात आपोआप हलू लागतो, ते स्थान तालाच्या अनुसार निश्चित होते. जसे त्रितालात दुसर्‍या तालावर आणि चौतालात पहिल्या तालावर सम येते. या प्रकारे भिन्न भिन्न स्थानांवर ’सम’ होत असते. वाद्यांचा आरंभ आणि गीतांचा तसेच वाद्यांचा अंत या समेवरच होतो. परंतु गाण्या-बजावण्याचा मध्ये मध्ये ही सम बरोबरच येतच असते.)
बह्वीश्च विविधाकारा रूपयौवनगर्विताः ।
स्त्रियः सुग्रीवभवने ददर्श स महाबलः ॥ २२ ॥
महाबली लक्ष्मणांना सुग्रीवाच्या या अंतःपुरात अनेक रूपरंगाच्या बर्‍याचशा सुंदर स्त्रिया दिसल्या, ज्या रूप आणि यौवनाच्या गर्वाने भरलेल्या होत्या. ॥२२॥
दृष्ट्‍वाभिजनसंपन्नाः तत्रमाल्यकृतस्रजः ।
वरमाल्यकृतव्यग्रा भूषणोत्तमभूषिताः ॥ २३ ॥

नातृप्तान्नापि चाव्यग्रान् नानुदात्तपरिच्छदान् ।
सुग्रीवानुचरांश्चापि लक्षयामास लक्ष्मणः ॥ २४ ॥
त्या सर्वच्या सर्व उत्तम कुळात उत्पन्न झालेल्या होत्या, फुलांच्या गजर्‍यांनी अलंकृत होत्या. उत्तम पुष्पहार निर्माण करण्यात लागलेल्या होत्या आणि सुंदर आभूषणांनी विभूषित होत्या. त्या सर्वांना पाहून लक्ष्मणांनी सुग्रीवांच्या सेवकांवर दृष्टिपात केला, जे अतृप्त किंवा असंतुष्ट नव्हते. स्वामींचे कार्य सिद्ध करण्यासाठी अत्यंत उत्साहाचीही त्याMच्या ठिकाणी उणीव नव्हती, तसेच त्यांची वस्त्रे आणि आभूषणे निम्न श्रेणीची नव्हती. ॥२३-२४॥
कूजितं नूपुराणां च काञ्चीनां निस्वनं तथा ।
स निशम्य ततः श्रीमान् सौमित्रिर्लज्जितोऽभवत् ॥ २५ ॥
नुपूरांचा झंकार आणि मेखलेचा खणखणाट ऐकून श्रीमान् सौमित्र लज्जित झाले होते. (परक्या स्त्रियांच्या वर दृष्टि पडल्यामुळे त्यांना स्वभावतः संकोच वाटला.) ॥२५॥
रोषवेगप्रकुपितः श्रुत्वा चाभरणस्वनम् ।
चकार ज्यास्वनं वीरो दिशः शब्देन पूरयन् ॥ २६ ॥
तत्पश्चात पुन्हा आभूषणांचा झंकार ऐकून वीर लक्ष्मण रोषाच्या आवेगाने आणखीच कुपित झाले आणि त्यांनी आपल्या धनुष्यावर टणत्कार केला, ज्याच्या ध्वनीने समस्त दिशा (निनादून गेल्या) भरून गेल्या. ॥२६॥
चारित्रेण महाबाहुः अपकृष्टः स लक्ष्मणः ।
तस्थावेकांतमाश्रित्य रामशोकसमन्वितः ॥ २७ ॥
रघुकुलोचित सदाचाराची आठवण करून महाबाहु लक्ष्मण थोडेसे मागे सरले आणि एकांतात जाऊन उभे राहिले. श्रीरामचंद्रांच्या कार्यासाठी तेथे काही प्रयत्‍न होत असलेला न दिसल्याने ते मनातल्या मनात कुपित होत होते. ॥२७॥
तेन चापस्वनेनाथ सुग्रीवः प्लवगाधिपः ।
विज्ञायागमनं त्रस्तः स चचाल वरासनात् ॥ २८ ॥
धनुष्याचा टणत्कार ऐकून वानरराज सुग्रीव समजून चुकले की लक्ष्मण येथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. मग तर ते भयाने संत्रस्त होऊन आपले सिंहासन सोडून उठून उभे राहिले. ॥२८॥
अङ्‌गञदेन यथा मह्यं पुरस्तात् प्रतिवेदितम् ।
सुव्यक्तमेष संप्राप्तः सौमित्रिर्भ्रातृवत्सलः ॥ २९ ॥
ते मनातल्या मनात विचार करू लागले की अंगदाने मला प्रथम जसे सांगितले होते त्यास अनुसरून हे भ्रातृवत्सल सौमित्र लक्ष्मण निश्चितच येथे आले आहेत. ॥२९॥
अङ्‌गयदेन समाख्यातो ज्यास्वनेन च वानरः ।
बुबुधे लक्ष्मणं प्राप्तं मुखं चास्य व्यशुष्यत ॥ ३० ॥
अंगदाच्या द्वारा त्यांच्या आगमनाचा समाचार तर त्यांना पूर्वीच मिळाला होता. आता धनुष्याच्या टणत्काराने वानर सुग्रीवांना लक्ष्मण नक्कीच येथे आलेले आहेत या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आला. मग तर त्यांचे तोंड सुकून गेले. ॥३०॥
ततस्तारां हरिश्रेष्ठः सुग्रीवः प्रियदर्शनाम् ।
उवाच हितमव्यग्रः त्राससंभ्रांतमानसः ॥ ३१ ॥
भयामुळे ते मनांतल्या मनात घाबरून गेले. (लक्ष्मणाच्या समोर जाण्याचे त्यांना धारिष्ट झाले नाही.) तथापि कसे तरी धैर्य धारण करून वानरश्रेष्ठ सुग्रीव परम सुंदरी तारेला हिताची गोष्ट बोलले- ॥३१॥
किन्नु रुट्कारणं सुभ्रु प्रकृत्या मृदुमानसः ।
सरोष इव संप्राप्तो येनायं राघवानुजः ॥ ३२ ॥
’सुंदरी ! यांच्या रोषाचे काय कारण असू शकेल ? ज्यामुळे स्वभावतः कोमल चित्त असूनही हे राघवानुज -रामांचे लहान भाऊ - रुष्ट होऊन येथे आले आहेत. ॥३२॥
किं पश्यसि कुमारस्य रोषस्थानमनिंदिते ।
न खल्वकारणे कोपं आहरेन्नरपुंगवः ॥ ३३ ॥
’अनिंदिते ! तुझ्या (मताने) पहाण्यात कुमार लक्ष्मणांच्या रोषाला काय आधार आहे ? हे मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहेत, म्हणून विनाकारण निश्चितच क्रोध करू शकत नाहीत. ॥३३॥
यदस्य कृतमस्माभिः बुध्यसे किञ्चिदप्रियम् ।
तद् बुद्ध्या संप्रधार्याशु क्षिप्रमेवाभिधीयताम् ॥ ३४ ॥
’जर आपण यांचा काही अपराध केला असेल आणि तुला त्याचा पत्ता असेल तर आपल्या बुद्धिने विचार करून शीघ्र सांग. ॥३४॥
अथवा स्वयमेवैनं द्रष्टुमर्हसि भामिनी ।
वचनैः सांत्वयुक्तैश्च प्रसादयितुमर्हसि ॥ ३५ ॥
’अथवा भामिनी ! तू स्वतःच जाऊन लक्ष्मणास पहा आणि सांत्वनायुक्त गोष्टी बोलून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्‍न कर. ॥३५॥
त्वद्दर्शने विशुद्धात्मा न स्म कोपं करिष्यति ।
नहि स्त्रीषु महात्मानः क्वचित् कुर्वंति दारुणम् ॥ ३६ ॥
’त्यांचे हृदय शुद्ध आहे. तुझ्या समोर ते क्रोध करणार नाहीत कारण की महात्मा पुरुष स्त्रियांच्या प्रति कधी कठोर वर्तन करीत नाहीत. ॥३६॥
त्वया सांत्वैरुपक्रांतं प्रसन्नेंद्रियमानसम् ।
ततः कमलपत्राक्षं द्रक्ष्याम्यहमरिंदमम् ॥ ३७ ॥
’ज्यावेळी तू त्यांच्याजवळ जाऊन गोड वचनांनी त्यांना शांत करशील आणि जेव्हा त्यांचे मन तसेच इंद्रिये प्रसन्न होतील त्या समयी मी त्या शत्रुदमन कमलनयन लक्ष्मणांचे दर्शन करीन. ॥३७॥
सा प्रस्खलंती मदविह्वलाक्षी
प्रलंबकाञ्चीगुणहेमसूत्रा ।
सलक्षणा लक्ष्मणसंनिधानं
जगाम तारा नमिताङ्‌ग।यष्टिः ॥ ३८ ॥
सुग्रीवाने असे सांगितल्यावर शुभलक्षणा तारा लक्ष्मणांजवळ गेली. तिचे सडपातळ शरीर स्वाभाविक संकोच आणि विनयाने वाकलेले होते. तिचे नेत्र मदाने चंचल होत होते, पाय अडखळत होते आणि तिच्या मेखलेचे सुवर्णमय सूत्र लोंबकाळत होते. ॥३८॥
स तां समीक्ष्यैव हरीशपत्‍नींम
तस्थावुदासीनतया महात्मा ।
अवाङ्‌मुदखोऽभून्मनुजेंद्रपुत्रः
स्त्रीसंनिकर्षाद् विनिवृत्तकोपः ॥ ३९ ॥
वानरराजाची पत्‍नी तारा हिच्यावर दृष्टी पडताच राजकुमार महात्मा लक्ष्मण आपली मान खाली घालून उदासीन भावाने उभे राहिले. स्त्री जवळ असण्यामुळे त्यांचा क्रोध दूर झाला. ॥३९॥
सा पानयोगाच्च निवृत्तलज्जा
दृष्टिप्रसादाच्च नरेंद्रसूनोः ।
उवाच तारा प्रणयप्रगल्भं
वाक्यं महार्थं परिसांत्वरूपम् ॥ ४० ॥
मधुपानामुळे तारेची नारीसुलभ लज्जा निवृत्त झाली होती. तिला राजकुमार लक्ष्मणांच्या दृष्टीत काहीसा प्रसन्नतेचा आभास झाला. म्हणून तिने स्नेहजनित निर्भिकतेने महान् अर्थाने युक्त ही सांत्वनापूर्ण गोष्ट सांगितली - ॥४०॥
किं कोपमूलं मनुजेंद्रपुत्र
कस्ते न संतिष्ठति वाङ्‌निदेशे ।
कः शुष्कवृक्षं वनमापतंतं
दवाग्निमासीदति निर्विशङ्‌कः ॥ ४१ ॥
’राजकुमार ! आपल्या क्रोधाचे काय कारण आहे ? कोण आपल्या आज्ञेच्या अधीन नाही आहे ? कोण निडर होऊन वाळलेल्या वृक्षांनी घेरलेल्या वनात चारी बाजूने पसरलेल्या दावानलात प्रवेश करीत आहे ? ॥४१॥
स तस्या वचनं श्रुत्वा सांत्वपूर्वमशंकितः ।
भूयः प्रणयदृष्टार्थं लक्ष्मणो वाक्यमब्रवीत् ॥ ४२ ॥
तारेच्या या वचनात सांत्वना भरलेली होती. त्यात अधिक प्रेमपूर्वक हृदयाचा भाव प्रकट केला गेला होता. ते ऐकून लक्ष्मणांच्या हृदयांतील आशंका दूर होऊ लागली. ते म्हणू लागले- ॥४२॥
किमयं कामवृत्तस्ते लुप्तधर्मार्थसंग्रहः ।
भर्ता भर्तृहिते युक्ते न चैनमवबुध्यसे ॥ ४३ ॥
’आपल्या स्वामींच्या हितात तत्पर असणार्‍या तारे ! तुझा हा पति विषयभोगात आसक्त होऊन धर्म आणि अर्थाच्या संग्रहाचा लोप करीत आहे. काय तुला याच्या या अवस्थेचा पत्ता नाही आहे ? तू त्याला समजावत का नाहीस ? ॥४३॥
न चिंतयति राज्यार्थं सोऽस्मान् शोकपरायणान् ।
सामात्यपरिषत् तारे काममेवोपसेवते ॥ ४४ ॥
’तारे ! सुग्रीव आपल्या राज्याच्या स्थिरतेचाच प्रयास करीत आहे. आम्ही शोकात बुडलो आहोत परंतु आमची याला थोडी सुद्धा चिंता नाही. हा आपले मंत्री तसेच राज्यसभेचे सदस्य यांच्यासहित केवळ विषयांचेच सेवन करीत आहे. ॥४४॥
स मासांश्चतुरः कृत्वा प्रमाणं प्लवगेश्वरः ।
व्यीतीतांस्तान् मदोव्यग्रो विहरन् नावबुध्यते ॥ ४५ ॥
’वानरराज सुग्रीवांनी चार महिन्याची मुदत निश्चित केली होती. ते कधींच निघून गेले, परंतु ते मधुपानाच्या मदाने अत्यंत उन्मत्त होऊन स्त्रियांबरोबर क्रीडा-विहार करीत राहिले आहेत; त्यांना निघून गेलेल्या वेळेचा पत्ताही नाही. ॥४५॥
नहि धर्मार्थसिद्ध्यर्थं पानमेवं प्रशस्यते ।
पानादर्थश्च कामश्च धर्मश्च परिहीयते ॥ ४६ ॥
’धर्म आणि अर्थाच्या सिद्धिच्या निमित्ताने प्रयत्‍न करणार्‍या पुरुषासाठी याप्रकारे मद्यपान करणे चांगले समजले जात नाही. कारण मद्यपानाने अर्थ, धर्म आणि काम तीन्हीचा नाश होत असतो. ॥४६॥
धर्मलोपो महांस्तावत् कृते ह्यप्रतिकुर्वतः ।
अर्थलोपश्च मित्रस्य नाशे गुणवतो महान् ॥ ४७ ॥
’मित्रांनी केलेल्या उपकाराची भरपाई अवसर प्राप्त झाला असतांही जर केली नाही तर धर्माची हानी तर होतेच होते. गुणवान् मित्राबरोबरचे मैत्रीचे नाते तुटले तर आपल्या अर्थाचीही बरीच हानी होते, (ती ही सोसावी लागते) ॥४७॥
मित्रं ह्यर्थगुणश्रेष्ठं सत्यधर्मपरायणम् ।
तद्द्वयं तु परित्यक्तं न तु धर्मे व्यवस्थितम् ॥ ४८ ॥
’मित्र दोन प्रकारचे असतात- एक तर आपल्या मित्राच्या अर्थसाधनात तत्पर असतो आणि दुसरा सत्य तसेच धर्माचाच आश्रित राहातो. तुमच्या स्वामींनी मित्राच्या या दोन्ही गुणांचा परित्याग केला आहे. तो मित्राचे कार्यही सिद्ध करीत नाही आणि स्वतःही धर्मामध्ये स्थित नाही. ॥४८॥
तदेवं प्रस्तुते कार्ये कार्यमस्माभिरुत्तरम् ।
यत्कार्यं कार्यतत्त्वज्ञे त्वमुदाहर्तुमर्हसि ॥ ४९ ॥
’अशा स्थितिमध्ये प्रस्तुत कार्याच्या सिद्धिसाठी आम्ही भविष्यांत काय करावयास हवे. आमच्यासाठी जे समुचित कर्तव्य असेल ते तुम्ही सांगावे. कारण तू कार्याच्या तत्त्वास जाणतेस.’ ॥४९॥
सा तस्य धर्मार्थसमाधियुक्तं
निशम्य वाक्यं मधुरस्वभावम् ।
तारा गतार्थे मनुजेंद्रकार्ये
विश्वासयुक्तं तमुवाच भूयः ॥ ५० ॥
लक्ष्मणांचे वचन धर्म आणि अर्थाच्या निश्चयाने संयुक्त होते. त्यायोगे त्यांच्या मधुर स्वभावाचा परिचय मिळत होता. ते ऐकून तारा भगवान् श्रीरामचंद्रांच्या कार्याविषयी, ज्याचे प्रयोजन तिला ज्ञात होऊन चुकले होते, पुन्हा लक्ष्मणांस विश्वास योग्य गोष्टी सांगू लागली- ॥५०॥
न कोपकालः क्षितिपालपुत्र
न चातिकोपः स्वजने विधेयः ।
त्वदर्थकामस्य जनस्य तस्य
प्रमादमप्यर्हसि वीर सोढुम् ॥ ५१ ॥
’वीर राजकुमार ! ही क्रोध करण्याची वेळ नाही. आत्मीय जनांच्यावर क्रोध करता कामा नये. सुग्रीवांच्या मनांत सदा आपले कार्य सिद्ध करण्याची इच्छा राहातच आहे म्हणून जरी त्यांच्याकडून काही चूक घडली तरी आपण त्यांना क्षमाच केली पाहिजे. ॥५१॥
कोपं कथं नाम गुणप्रकृष्टः
कुमार कुर्यादपकृष्टसत्त्वे ।
कस्त्वद्विधः कोपवशं हि गच्छेत्
सत्त्वावरुद्धस्तपसः प्रसूतिः ॥ ५२ ॥
’कुमार ! गुणांनी श्रेष्ठ पुरुष कुणा हीन गुणाच्या प्राण्यावर क्रोध कसा बरे करू शकतो ? जो सत्वगुणांनी अवरूद्ध झाल्यामुळे शास्त्र-विपरीत व्यापारात लागूच शकत नाही, म्हणून जो सद्विचारांना जन्म देणारा आहे, तो आपल्या सारखा कोणता पुरुष क्रोधाच्या वशीभूत होऊ शकतो ? ॥५२॥
जानामि कोपं हरिवीरबंधोः
जानामि कार्यस्य च कालसंगम् ।
जानामि कार्यं त्वयि यत्कृतं नः
तच्चापि जानामि यदत्र कार्यम् ॥ ५३ ॥
’वानरवीर सुग्रीवांचे मित्र भगवान् श्रीरामांच्या क्रोधाचे कारण मी जाणते. त्यांच्या कार्यात जो विलंब झालेला आहे त्यापासून मी अपरिचित नाही. सुग्रीवांचे जे कार्य आपल्या अधीन होते आणि जे आपण लोकांनी पुरे केले आहे, तेही मला माहित आहे; तसेच यासमयी जे आपले कार्य प्रस्तुत आहे, त्या विषयी आमचे काय कर्तव्य आहे याचे ही मला उत्तम प्रकारे ज्ञान आहे. ॥५३॥
तच्चापि जानामि तथाविषह्यं
बलं नरश्रेष्ठ शरीरजस्य ।
जानामि यस्मिंश्च जनेऽवबद्धं
कामेन सुग्रीवमसक्तमद्य ॥ ५४ ॥
’नरश्रेष्ठ ! या शरीरात उत्पन्न झालेल्या कामाचे जे असह्य बळ आहे त्यालाही मी जाणते, तसेच त्या कामद्वारा आबद्ध होऊन सुग्रीव जेथे आसक्त होत आहेत तेही मला माहीत आहे. त्याच बरोबर मी हेही जाणते की कामासक्तीच्या कारणामुळेच हल्ली सुग्रीवांचे मन दुसर्‍या कुठल्याही कामात लागत नाही आहे ही गोष्टही मला परिचित आहे. ॥५४॥
न कामतंत्रे तव बुद्धिरस्ति
त्वं वै यथा मन्युवशं प्रपन्नः ।
न देशकालौ हि न यथार्थधर्मौ
अवेक्षते कामरतिर्मनुष्यः ॥ ५५ ॥
आपण जे क्रोधाला वशीभूत झाला आहात यावरून ज्ञात होत आहे की कामाच्या अधीन झालेल्या पुरुषाच्या स्थितीचे आपल्याला बिलकुलच ज्ञान नाही. वानरांची तर गोष्ट्च काय आहे ? कामासक्त मनुष्यालाही देश, काळ, अर्थ आणि धर्म यांचे ज्ञान राहू शकत नाही- त्याकडे त्याची दृष्टीच जात नाही. ॥५५॥
तं कामवृत्तं मम संनिकृष्टं
कामाभियोगाच्च विमुक्तलज्जम् ।
क्षमस्व तावत् परवीरहंतः
त्वद्‌भ्रा तरं वानरवंशनाथम् ॥ ५६ ॥
’विपक्षी वीरांचा विनाश करणार्‍या राजकुमारा ! वानरराज सुग्रीव विषय भोगात आसक्त होऊन यावेळी माझ्याजवळच आले होते. कामाच्या आवेशात त्यांनी आपल्या लज्जेचा परित्याग केला आहे, तरीही त्यांना आपला भाऊ समजून त्यांना क्षमा करावी. ॥५६॥
महर्षयो धर्मतपोऽभिकामाः
कामानुकामाः प्रतिबद्धमोहाः ।
अयं प्रकृत्या चपलः कपिस्तु
कथं न सज्जेत सुखेषु राजा ॥ ५७ ॥
’जे निरंतर धर्म आणि तपस्येतच संलग्न राहातात, ज्यांनी मोहाला अवरूद्ध केलेले असते- अविवेकाला दूर पिटाळून लावले आहे, ते महर्षिही कधी कधी विषयाभिलाषी होऊन जातात. मग जे स्वभावानेच चंचल वानर आहेत, ते राजे सुग्रीव सुखभोगांत आसक्त कसे बरे होणार नाहीत ?’ ॥५७॥
इत्येवमुक्त्वा वचनं महार्थं
सा वानरी लक्ष्मणमप्रमेयम् ।
पुनः सखेदं मदविह्वलाक्षी
भर्तुर्हितं वाक्यमिदं बभाषे ॥ ५८ ॥
अप्रमेय शक्तिशाली लक्ष्मणांना या प्रकारे महान् अर्थाने युक्त गोष्ट सांगून मदाने चंचल असणारी वानरपत्‍नी तारा हिने पुन्हा खेदपूर्वक स्वामीसाठी ही हितकर गोष्ट सांगितली- ॥५८॥
उद्योगस्तु चिराज्ञप्तः सुग्रवेण नरोत्तम ।
कामस्यापि विधेयेन तवार्थप्रतिसाधने ॥ ५९ ॥
’नरश्रेष्ठ ! जरी सुग्रीव या समयी कामाचे गुलाम होत आहेत तरी त्यांनी आपले कार्य सिद्ध करण्यासाठी फार पूर्वीच उद्योग आरंभ करण्याची आज्ञा देऊन ठेवलेली आहे. ॥५९॥
आगता हि महावीर्या हरयः कामरूपिणः ।
कोटीः शतसहस्राणि नानानगनिवासिनः ॥ ६० ॥
याच्या फलस्वरूप या समयी विभिन्न पर्वतांवर निवास करणारे लाखो आणि कोट्यावधि वानर जे स्वेच्छेनुसार रूप धारण करण्यास समर्थ तसेच महान् पराक्रमी असलेले येथे उपस्थित झालेले आहेत. ॥६०॥
तदागच्छ महाबाहो चारित्रं रक्षितं त्वया ।
अच्छलं मित्रभावेन सतां दारावलोकनम् ॥ ६१ ॥
’महाबाहो ! (दुसर्‍यांच्या स्त्रियांना पहाणे अनुचित समजून जे आपण आंत आला नाहीत, बाहेरच उभे राहिलात- या द्वारा) आपण सदाचाराचे रक्षण केले आहे. म्हणून आता आत यावे. मित्र भावांनी स्त्रियांच्याकडे पहाणे (त्यांच्या बद्दल माता-भगिनी आदि भाव ठेवून पहाणे) सत्पुरुषांसाठी अधर्म नाही आहे.’ ॥६१॥
तारया चाभ्यनुज्ञातः त्वरया वापि चोदितः ।
प्रविवेश महाबाहुः अभ्यंतरमरिंदमः ॥ ६२ ॥
तारेचा आग्रह आणि कार्याची घाई यांनी प्रेरित होऊन शत्रुदमन महाबाहु लक्ष्मण सुग्रीवाच्या महालात गेले. ॥६२॥
ततः सुग्रवमासीनं काञ्चने परमासने ।
महार्हास्तरणोपेते ददर्शादित्यसंनिभम् ॥ ६३ ॥
तेथे जाऊन त्यांनी पाहिले की एका सोन्याच्या सिंहासनावर बहुमूल्य चादर पसरलेली आहे आणि वानरराज सुग्रीव सूर्यतुल्य तेजस्वी रूप धारण करून त्यावर विराजमान आहेत. ॥६३॥
दिव्याभरणचित्राङ्‌गंा दिव्यरूपं यशस्विनम् ।
दिव्यमाल्यांबरधरं महेंद्रमिव दुर्जयम् ॥ ६४ ॥
त्यासमयी दिव्य आभूषणांच्या योगे त्यांच्या शरीराची विचित्र शोभा दिसत होती. दिव्य रूपधारी यशस्वी सुग्रीव दिव्य माला आणि दिव्य वस्त्रे धारण करून दुर्जय वीर देवराज इंद्रासमान दिसत होते. ॥६४॥
दिव्याभरणमाल्याभिः प्रमदाभिः समावृतम् ।
संरब्धतररक्ताक्षो बभूवांतकसंनिभः ॥ ६५ ॥
दिव्य आभूषणे आणि मालांनी अलंकृत युवती स्त्रिया त्यांना चारी बाजूने घेरून उभ्या होत्या. त्यांना या अवस्थेत पाहून लक्ष्मणाचे नेत्र रोषामुळे लाल झाले. ते त्या समयी यमराजासमान भयंकर प्रतीत होऊ लागले. ॥६५॥
रुमां तु वीरः परिरभ्य गाढं
वरासनस्थो वरहेमवर्णः ।
ददर्श सौमित्रिमदीनसत्त्वं
विशालनेत्रः सुविशालनेत्रम् ॥ ६६ ॥
सुंदर सुवर्णाप्रमाणे कांति आणि विशाल नेत्र असणारे वीर सुग्रीव आपली पत्‍नी रूमाच्या गाढ आलिंगन-पाशात बद्ध होऊन एका श्रेष्ठ आसनावर विराजमान होते. त्याच अवस्थेत त्यांनी उदार हृदय आणि विशाल नेत्र असणार्‍या सौमित्र लक्ष्मणांस पाहिले. ॥६६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे त्रयस्त्रिंशः सर्गः ॥ ३३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा तेहतिसावा सर्ग पूरा झाला. ॥३३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP