श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ त्रिनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामेण रक्षससेनायां संहारः -
श्रीराम द्वारा राक्षससेनेचा संहार -
स प्रविश्य सभां राजा दीनः परमदुःखितः ।
निषसादासने सिंहः क्रुद्ध इव श्वसन् ॥ १ ॥
सभेत पोहोचून राक्षसराज रावण अत्यंत दुःखी आणि दीन होऊन श्रेष्ठ सिंहासनावर बसला आणि कुपित सिंहाप्रमाणे दीर्घश्वास घेऊ लागला. ॥१॥
अब्रवीच्च स तान् सर्वान् बलमुख्यान् महाबलः ।
रावणः प्राञ्जलिर्वाक्यं पुत्रव्यसनकर्शितः ॥ २ ॥
तो महाबली रावण पुत्रशोकाने पीडित होत होता, म्हणून आपल्या सेनेतील मुख्य मुख्य योद्ध्यांना हात जोडून म्हणाला - ॥२॥
सर्वे भवन्तः सर्वेण हस्त्यश्वेन समावृताः ।
निर्यान्तु रथसङ्‌घैश्च पादातैश्चोपशोभिताः ॥ ३ ॥

एकं रामं परिक्षिप्य समरे हन्तुमर्हथ ।
वर्षन्तः शरवर्षेण प्रावृट्काल इवाम्बुदाः ॥ ४ ॥
वीरांनो ! तुम्ही सर्व लोक समस्त हत्ती, घोडे, रथसमुदाय तसेच पायदळ सैनिकांच्या द्वारे घेरले जाऊन, त्या सर्वांमुळे सुशोभित होऊन नगरातून बाहेर निघा आणि समरभूमीवर एकमात्र रामांना चारी बाजूनी घेरून मारून टाका. जसे वर्षाकाळी मेघ जलाची वृष्टि करतात त्याप्रकारे तुम्ही लोकही बाणांची वृष्टि करून रामाला मारून टाकण्याचा प्रयत्‍न करा. ॥३-४॥
अथवाऽहं शरैस्तीक्ष्णैः भिन्नगात्रं महारणे ।
भवद्‌भिः श्वो निहन्तास्मि रामं लोकस्य पश्यतः ॥ ५ ॥
अथवा मीच उद्या महासमरात तुमच्या बरोबर राहून आपल्या तीक्ष्ण बाणांनी रामाच्या शरीराला छिन्न-भिन्न करून सर्व लोक पहात असता त्यांना मारून टाकीन. ॥५॥
इत्येतद् वाक्यमादाय राक्षसेन्द्रस्य राक्षसाः ।
निर्ययुस्ते रथैः शीघ्रैः नानानीकैश्च संयुताः ॥ ६ ॥
राक्षसराजाची ही आज्ञा शिरोधार्य करून ते निशाचर शीघ्रगामी रथ तसेच नाना प्रकारच्या सेनांनी युक्त होऊन लंकेतून बाहेर निघाले. ॥६॥
परिघान् पट्टिशांश्चैव शरखड्गपरश्वधान् ।
शरीरान्तकरान् सर्वे चिक्षिपुर्वानरान् प्रति ॥ ७ ॥

वानराश्च द्रुमान् शैलान् राक्षसान् प्रति चिक्षिपुः ।
ते सर्व राक्षस वानरांवर परिघ, पट्‍टिश, बाण, तलवार तसेच परशु आदि शरीरविदारक अस्त्र-शस्त्रांचे प्रहार करू लागले. याप्रकारे वानरही राक्षससांवर वृक्ष आणि शिलांची वृष्टि करू लागले. ॥७ १/२॥
स सङ्‌ग्रामो महाभीमः सूर्यस्योदयनं प्रति ॥ ८ ॥

रक्षसां वानराणां च तुमुलः समपद्यत ।
सूर्योदयाच्या समयी राक्षस आणि वानरांच्या त्या तुमुल युद्धाने महाभयंकर रूप धारण केले. ॥८ १/२॥
ते गदाभिश्च चित्राभिः प्राशैः खड्गैः परश्वधैः ॥ ९ ॥

अन्योन्यं समरे जघ्नुः तदा वानरराक्षसाः ।
वानर आणि राक्षस त्या युद्धभूमीमध्ये विचित्र गदा, भाले, तलवारी आणि परशु घेऊन एक दुसर्‍याला मारू लागले. ॥९ १/२॥
एवं प्रवृत्ते सङ्‌ग्रामे ह्यद्‌भुतं सुमहद्रजः ॥ १० ॥

रक्षसां वानराणां च शान्तं शोणितविस्रवैः ।
याप्रकारे युद्ध छेडले गेल्यावर जी फार मोठी धूळ उडत होती, ती राक्षसांच्या आणि वानरांच्या रक्ताचा प्रवाह वाहू लागल्याने शांत झाली. ही एक अद्‍भुत गोष्ट होती. ॥१० १/२॥
मातङ्‌गरथकूलाश्च वाजिमत्स्या ध्वजद्रुमाः ॥ ११ ॥

शरीरसङ्‌घाटवहाः प्रसस्रुः शोणितापगाः ।
रणभूमीमध्ये रक्ताच्या कित्येक नद्या वाहू लागल्या ज्या काष्ठसमूहाप्रमाणे शरीरासमुदायांना वाहून नेत होत्या. पडलेले हत्ती आणि रथ त्या नद्यांचे किनारे वाटत होते. बाण मत्स्यासमान प्रतीत होत होते आणि उंच ध्वजच त्यांचे तटवर्ती वृक्ष होते. ॥११ १/२॥
ततस्ते वानराः सर्वे शोणितौघपरिप्लुताः ॥ १२ ॥

ध्वजवर्मरथानश्वान् नानाप्रहरणानि च ।
आप्लुत्याप्लुत्य समरे राक्षसानां बभञ्जिरे ॥ १३ ॥
समस्त वानर रक्तबंबाळ होत होते. ते उड्‍या मारमारून समरांगणात राक्षसांचे ध्वज, कवचे, रथ, घोडे आणि नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांचा विनाश करू लागले. ॥१२-१३॥
केशान् कर्णललाटं च नासिकाश्च प्लवङ्‌गमाः ।
रक्षसां दशनैस्तीक्ष्णैः नखैश्चापि न्यकर्तयन् ॥ १४ ॥
वानर आपल्या तीक्ष्ण दात आणि नखांनी निशाचरांचे केस, कान, ललाट आणि नाक कुरतडून टाकत होते. ॥१४॥
एकैकं राक्षसं सङ्‌ख्ये शतं वानरपुङ्‌गवाः ।
अभ्यधावन्त फलिनं वृक्षं शकुनयो यथा ॥ १५ ॥
जसे फळे लागलेल्या वृक्षाकडे शेकडो पक्षी धाव घेतात, त्याप्रकारे एका एका राक्षसावर शंभर शंभर वानर तुटून पडत होते. ॥१५॥
तथा गदाभिर्गुर्वीभिः प्रासैः खड्गैः परश्वधैः ।
निजघ्नुर्वानरान् घोरान् राक्षसाः पर्वतोपमाः ॥ १६ ॥
त्यासमयी पर्वताकार राक्षसही भारी गदा, भाले, तलवारी आणि परशुंनी भयंकर वानरांना मारू लागले. ॥१६॥
राक्षसैर्वध्यमानानां वानराणां महाचमूः ।
शरण्यं शरणं याता रामं दशरथात्मजम् ॥ १७ ॥
राक्षसांद्वारा मारली जाणारी ती वानरांची विशाल सेना शरणागत वत्सल दशरथनंदन भगवान्‌ श्रीरामांना शरण गेली. ॥१७॥
ततो रामो महातेजा धनुरादाय वीर्यवान् ।
प्रविश्य राक्षसं सैन्यं शरवर्षं ववर्ष ह ॥ १८ ॥
तेव्हा बल - विक्रमशाली महातेजस्वी श्रीरामांनी धनुष्य घेऊन राक्षसांच्या सेनेत प्रवेश करून बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥१८॥
प्रविष्टं तु तदा रामं मेघाः सूर्यमिवाम्बरे ।
नाभिजग्मुर्महाघोरा निर्दहन्तं शराग्निना ॥ १९ ॥
ज्याप्रमाणे आकाशात ढग तळपत असणार्‍या सूर्यावर आक्रमण करू शकत नाहीत त्याप्रकारे सेनेमध्ये प्रवेश करून आपल्या बाणरूपी अग्निने राक्षससेनेला दग्ध करणार्‍या श्रीरामांवर ते महाक्रूर निशाचर हल्ला करू शकले नाहीत. ॥१९॥
कृतान्येव सुघोराणि रामेण रजनीचराः ।
रणे रामस्य ददृशुः कर्माण्यसुकराणि च ॥ २० ॥
निशाचर रणभूमीमध्ये श्रीरामांनी केलेल्या अत्यंत घोर आणि दुष्कर कर्मांनाच पाहू शकत होते, त्यांच्या स्वरूपास पाहू शकत नव्हते. ॥२०॥
चालयन्तं महासैन्यं विधमन्तं महारथान् ।
ददृशुस्ते न वै रामं वातं वनगतं यथा ॥ २१ ॥
जसे वनात वाहणारा वारा मोठ मोठ्या वृक्षांना हलवितो आणि तोडतो सुद्धा, पण तो दिसत नाही. त्याचप्रकारे भगवान्‌ श्रीराम निशाचरांच्या विशाल सेनेला विचलित करत होते आणि कित्येक महारथींचा धुव्वा उडवत होते, तरीही ते राक्षस त्यांना पाहू शकत नव्हते. ॥२१॥
छिन्नं भिन्नं शरैर्दग्धं प्रभग्नं शस्त्रपीडितम् ।
बलं रामेण ददृशुः न रामं शीघ्रकारिणम् ॥ २२ ॥
ते आपल्या सेनेला श्रीरामांच्या द्वारा छिन्न-भिन्न, दग्ध, भग्न आणि पीडित होत असलेली पहात होते परंतु शीघ्रतापूर्वक युद्ध करणार्‍या श्रीरामांना ते पाहू शकत नव्हते. ॥२२॥
प्रहरन्तं शरीरेषु न ते पश्यन्ति राघवम् ।
इन्द्रियार्थेषु तिष्ठन्तं भूतात्मानमिव प्रजाः ॥ २३ ॥
ज्याप्रमाणे शब्दादि विषयांच्या भोक्तारूपाने स्थित जीवात्म्याला प्रजा पाहू शकत नाहीत त्याप्रमाणे आपल्या शरीरावर प्रहार करणार्‍या राघवांना ते पाहू शकत नव्हते. ॥२३॥
एष हन्ति गजानीकं एष हन्ति महारथान् ।
एष हन्ति शरैस्तीक्ष्णैः पदातीन् वाजिभिः सह ॥ २४ ॥

इति ते राक्षसाः सर्वे रामस्य सदृशान् रणे ।
अन्योन्यं कुपिता जघ्नुः सादृश्याद् राघवस्य ते ॥ २५ ॥
हे राम आहेत, जे हत्तींच्या सेनेला मारत आहेत, हे राहिले राम, जे मोठमोठ्‍या रथींचा संहार करत आहेत, नाही-नाही हे आहेत राम जे आपल्या बाणांनी घोड्‍यांसह पायदळ सैनिकांचा वध करीत आहेत, या प्रकारे ते सर्व राक्षस श्रीरामांच्या किचिंत समानतेमुळे सर्वांनाच राम समजत होते आणि रामांच्याच भ्रमाने क्रोधाविष्ट होऊन आपसात एक-दुसर्‍यास मारत होते. ॥२४-२५॥
न ते ददृशिरे रामं दहन्तमपि वाहिनीम् ।
मोहिताः परमास्त्रेण गान्धर्वेण महात्मना ॥ २६ ॥
श्रीरामचंद्र राक्षससेनेला दग्ध करत होते तरीही ते राक्षस त्यांना पाहू शकले नाहीत. महात्मा श्रीरामांनी राक्षसांना गांधर्व नामक दिव्य अस्त्राने मोहित केले होते. ॥२६॥
ते तु रामसहस्राणि रणे पश्यन्ति राक्षसाः ।
पुनः पश्यन्ति काकुत्स्थं एकमेव महाहवे ॥ २७ ॥
म्हणून ते राक्षस रणभूमीमध्ये कधी तर हजारो राम पहात होते आणि कधी त्यांना त्या महासमरात एकाच रामांचे दर्शन होत होते. ॥२७॥
भ्रमन्तीं काञ्चनीं कोटिं कार्मुकस्य महात्मनः ।
अलातचक्रप्रतिमां ददृशुस्ते न राघवम् ॥ २८ ॥
ते महात्मा श्रीरामांच्या धनुष्याची सोनेरी कोटि (टोक अथवा कोणभाग) ला अलातचक्राप्रमाणे फिरत असलेली पाहत होते परंतु साक्षात्‌ राघवांना ते पाहू शकत नव्हते. ॥२८॥
शरीरनाभि सत्त्वार्चिः शरीरं नेमिकार्मुकम् ।
ज्याघोषतलनिर्घोषं तेजोबुद्धिगुणप्रभम् ॥ २९ ॥

दिव्यास्त्रगुणपर्यन्तं निघ्नन्तं युधि राक्षसान् ।
ददृशू रामचक्रं तत् कालचक्रमिव प्रजाः ॥ ३० ॥
युद्धस्थळी राक्षसांचा संहार करीत असलेले श्रीरामचंद्र साक्षात्‌ चक्रासमान भासत होते. शरीराचा मध्यभाग अर्थात नाभि हीच त्या चक्राची नाभि होती, बळ हीच त्यातून प्रकट होणारी ज्वाळा होती, बाण हेच त्याचे आरे होते, धनुष्यानेच नेमिचे स्थान ग्रहण केलेले होते, धनुष्याच्या टणत्कार आणि तलध्वनि हे दोन्ही त्या चक्राचा घडघडाट होता, तेज, बुद्धि आणि कान्ति आदि गुण हीच त्या चक्राची प्रभा होती, तसेच दिव्यास्त्रांचा गुणप्रभावच त्याचा प्रान्तभाग अर्थात धार होती. ज्याप्रमाणे प्रजा प्रलयकाळी कालचक्राचे दर्शन करते त्याच प्रकारे राक्षस त्यासमयी श्रीरामरूपी चक्राला पहात होते. ॥२९-३०॥
अनीकं दशसाहस्रं रथानां वातरंहसाम् ।
अष्टादश सहस्राणि कुञ्जराणां तरस्विनाम् ॥ ३१ ॥

चतुर्दश सहस्राणि सारोहाणां च वाजिनाम् ।
पूर्णे शतसहस्रे द्वे राक्षसानां पदातिनाम् ॥ ३२ ॥

दिवसस्याष्टभागेन शरैरग्निशिखोपमैः ।
हतान्येकेन रामेण रक्षसां कामरूपिणाम् ॥ ३३ ॥
श्रीरामांनी एकट्‍यांनी दिवसाच्या आठव्या भागात (दीड तासात)च आगीच्या ज्वाळेप्रमाणे तेजस्वी बाणांच्या द्वारा इच्छेनुसार रूप धारण करणार्‍या राक्षसांच्या वायुसमान वेगशाली दहा हजार रथ, अठरा हजार वेगवान्‌ हत्ती, चौदा हजार स्वारांसहित घोडे तसेच अख्खे दोन लाख पायदळ निशाचरांची सेना, या सर्वांचा संहार करून टाकला. ॥३१-३३॥
ते हताश्वा हतरथाः शान्ता विमथितध्वजाः ।
अभिपेतुः पुरीं लङ्‌कां हतशेषा निशाचराः ॥ ३४ ॥
जेव्हा घोडे आणि रथ नष्ट झाले तसेच ध्वज मोडून तोडून टाकले गेले तेव्हा मरणापासून वाचलेले निशाचर शान्त होऊन लंकापुरीत पळून गेले. ॥३४॥
हतैर्गजपदात्यश्वैः तद् बभूव रणाजिरम् ।
आक्रीडभूमिः क्रुद्धस्य रुद्रस्येव महात्मनः ॥ ३५ ॥
मारले गेलेले हत्ती, घोडे आणि पायदळ सैनिकांच्या प्रेताने भरून गेलेली ती रणभूमी कुपित झालेल्या महात्मा रूद्रदेवांच्या क्रीडाभूमी सारखी प्रतीत होत होती. ॥३५॥
ततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः ।
साधु साध्विति रामस्य तत् कर्म समपूजयन् ॥ ३६ ॥
त्यानंतर देवता, गंधर्व, सिद्ध आणि महर्षिंनी साधुवाद देऊन भगवान्‌ श्रीरामांच्या त्या कार्याची प्रशंसा केली. ॥३६॥
अब्रवीच्च तदा रामः सुग्रीवं प्रत्यनन्तरम् ।
विभीषणं च धर्मात्मा हनूमन्तं च वानरम् ॥ ३७ ॥

जाम्बवन्तं हरिश्रेष्ठं मैन्दं द्विविदमेव च ।
एतदस्त्रबलं दिव्यं मम वा त्र्यम्बकस्य वा ॥ ३८ ॥
त्यासमयी धर्मात्मा श्रीरामांनी आपल्या जवळ उभे असलेल्या सुग्रीव, विभीषण, कपिवर हनुमान्‌, जाम्बवान्‌, कपिश्रेष्ठ मैंद तसेच द्विविद यांना म्हटले - हे दिव्य अस्त्र-बळ माझ्यात आहे की भगवान्‌ शंकरात ? ॥३७-३८॥
निहत्य तां राक्षसवाहिनीं
रामस्तदा शक्रसमो महात्मा ।
अस्त्रेषु शस्त्रेषु जितक्लमश्च
संस्तूयते देवगणैः प्रहृष्टैः ॥ ३९ ॥
त्या अवसरी इंद्रतुल्य तेजस्वी महात्मा श्रीराम, जे अस्त्र-शस्त्रांचे संचालन करते समयी कधी थकत नसत, ते त्या राक्षसराजाच्या सेनेचा संहार करून, हर्षित झालेल्या देवतांच्या समुदाया द्वारेपूजित आणि प्रशंसित होऊ लागले. ॥३९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्रिनवतितमः सर्गः ॥ ९३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा त्र्याण्णवावा सर्ग पूरा झाला. ॥९३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP