श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकोनषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
ययातिना पुत्राय पूरवे वार्धक्यं दत्त्वा तदीय यौवनस्य ग्रहणं, भोगतृप्तेन तेन पुनश्चिरकालमनु तस्मै तदीय यौवनस्य प्रत्यावर्तनं, पूरोः पितू राज्येऽभिषेको यदुं प्रति पितुः शापश्च -
ययातिंनी आपला पुत्र पुरुला आपले म्हातारपण देऊन बदल्यात त्याचे यौवन घेणे आणि भोगांनी तृप्त होऊन पुन्हा दीर्घकाळानंतर त्याला त्याचे यौवन परत देणे, पुरुचा आपल्या पित्याच्या गादीवर अभिषेक तसेच यदुला शाप -
श्रुत्वा तूशनसं क्रुद्धं तदाऽऽर्तो नहुषात्मजः ।
जरां परमिकां प्राप्य यदुं वचनमब्रवीत् ॥ १ ॥
शुक्राचार्य कुपित होण्याचा समाचार ऐकून नहुषकुमार ययातिला फार दुःख झाले. त्यांना अशी वृद्धावस्था प्राप्त झाली की जी दुसर्‍याच्या यौवनाने बदलली जाऊ शकत होती. ती विलक्षण जरावस्था प्राप्त झाल्याने राजाने यदुला म्हटले - ॥१॥
यदो त्वमसि धर्मज्ञो मदर्थं प्रतिगृह्यताम् ।
जरां परमिकां पुत्र भोगै रंस्ये महायशः ॥ २ ॥
यदु ! तू धर्माचा ज्ञाता आहेस ! माझ्या महायशस्वी पुत्रा ! तू माझ्यासाठी दुसर्‍याच्या शरीरात संचरित करण्यायोग्य या जरावस्थेला ग्रहण कर. मी भोगांना प्राप्त करीत आपली भोगविषयक इच्छा पूर्ण करीन. ॥२॥
न तावत् कृतकृत्योऽस्मि विषयेषु नरर्षभ ।
अनुभूय तदा कामं ततः प्राप्स्याम्यहं जराम् ॥ ३ ॥
नरश्रेष्ठ ! अद्यापपर्यंत मी विषयभोगांनी तृप्त झालेलो नाही. इच्छेनुसार विषयसुखांचा अनुभव करून नंतर आपली वृद्धावस्था मी तुझ्याकडून परत घेईन. ॥३॥
यदुस्तद्वचनं श्रुत्वा प्रत्युवाच नरर्षभम् ।
पुत्रस्ते दयितः पूरुः प्रतिगृह्णातु वै जराम् ॥ ४ ॥
त्यांचे हे वचन ऐकून यदुने नरश्रेष्ठ ययातिना उत्तर दिले -आपला लाडका पुत्र पुरुच या वृद्धावस्थेला ग्रहण करू दे. ॥४॥
बहिष्कृतोऽहमर्थेषु सन्निकर्षाच्च पार्थिव ।
प्रतिगृह्णातु वै राजन् क सहाश्नाति भोजनम् ॥ ५ ॥
पृथ्वीनाथ ! मला तर आपण धनापासून तसेच जवळ राहून कोडकौतुक मिळण्याच्या अधिकारापासूनही वंचित केले आहे, म्हणून ज्यांच्या बरोबर बसून आपण भोजन करता, त्याच लोकांकडून युवावस्था ग्रहण करावी. ॥५॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा राजा पूरुमथाब्रवीत् ।
इयं जरा महाबाहो मदर्थं प्रतिगृह्यताम् ॥ ६ ॥
यदुचे हे वचन ऐकून राजाने पुरुला म्हटले - महाबाहो ! माझ्या सुखसोयीसाठी तू या वृद्धावस्थेला ग्रहण कर. ॥६॥
नाहुषेणैवमुक्तस्तु पूरुः प्राञ्जलिरब्रवीत् ।
धन्योऽस्मि अनुगृहीतोऽस्मि शासनेऽस्मि तव स्थितः ॥ ७ ॥
नहुषपुत्र ययातिने असे म्हटल्यावर पुरु हात जोडून बोलला - बाबा ! आपल्या सेवेची संधी मिळाल्याने मी धन्य झालो आहे. हा आपला माझ्यावर महान्‌ अनुग्रह आहे. आपल्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मी सर्व प्रकारे तयार आहे. ॥७॥
पूरोर्वचनमाज्ञाय नाहुषः परया मुदा ।
प्रहर्षमतुलं लेभे जरां संक्रामयच्च ताम् ॥ ८ ॥
पुरुचे हे स्वीकारसूचक वचन ऐकून नहुषकुमार ययातिला फार प्रसन्नता वाटली. त्यांना अनुपम हर्ष प्राप्त झाला आणि त्यांनी आपली वृद्धावस्था पुरुच्या शरीरात संचरित केली. ॥८॥
ततः स राजा तरुणः प्राप्य यज्ञान् सहस्रशः ।
बहुवर्षसहस्राणि पालयामास मेदिनीम् ॥ ९ ॥
त्यानंतर तरूण झालेल्या राजा ययातिने सहस्त्र यज्ञांचे अनुष्ठान करीत कित्येक हजार वर्षेपर्यंत या पृथ्वीचे पालन केले. ॥९॥
अथ दीर्घस्य कालस्य राजा पूरुमथाब्रवीत् ।
आनयस्व जरां पुत्र न्यासं निर्यातयस्व मे ॥ १० ॥
यानंतर दीर्घकाळ व्यतीत झाल्यावर राजाने पुरुला म्हटले -मुला ! तुझ्याजवळ ठेव म्हणून ठेवलेली वृद्धावस्था माझी मला परत दे. ॥१०॥
न्यासभूता मया पुत्र त्वयि संक्रामिता जरा ।
तस्मात् प्रतिग्रहीष्यामि तां जरां मा व्यथां कृथाः ॥ ११ ॥
पुत्रा ! माझ्या वृद्धावस्थेला ठेवीच्या रूपानेच मी तुझ्या शरीरात संचारित केले होते म्हणून तिला परत घेईन. तू आपल्या मनांत दुःख मानू नको. ॥११॥
प्रीतश्चास्मि महाबाहो शासनस्य प्रतिग्रहात् ।
त्वां चाहमभिषेक्ष्यामि प्रीतियुक्तो नराधिपम् ॥ १२ ॥
महाबाहो ! तू माझी आज्ञा मानलीस म्हणून मला फार प्रसन्नता वाटली. आता मी अत्यंत प्रेमाने राजाच्या पदावर तुझा अभिषेक करीन. ॥१२॥
एवमुक्त्वा सुतं पूरुं ययातिर्नहुषात्मजः ।
देवयानीसुतं क्रुद्धो राजा वाक्यमुवाच ह ॥ १३ ॥
आपला पुत्र पुरु याला असे सांगून नहुषकुमार राजा ययाति देवयानीच्या मुलावर रागवून म्हणाले - ॥१३॥
राक्षसस्त्वं मया जातः पुत्ररूपो दुरासदः ।
प्रतिहंसि ममाज्ञां यत् प्रजार्थे विफलो भव ॥ १४ ॥
यदु ! मी दुर्जय क्षत्रियाच्या रूपात तुझ्यासारख्या राक्षसाला जन्म दिला आहे. तू माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस म्हणून तू आपल्या संततिलाही राज्याधिकारी बनण्याविषयी विफल मनोरथ होऊन जाशील. ॥१४॥
पितरं गुरुभूतं मां यस्मात् त्वं अमवमन्यसे ।
राक्षसान् यातुधानान् त्वं जनयिष्यसि दारुणान् ॥ १५ ॥
मी पिता आहे, गुरू आहेस, तरीही तू माझा अपमान करीत आहेस, म्हणून भयंकर राक्षसांना आणि यातुधानांना तू जन्म देशील. ॥१५॥
न तु सोमकुलोत्पन्ने वंशे स्थास्यति दुर्मतेः ।
वंशोऽपि भवतस्तुल्यो दुर्विनीतो भविष्यति ॥ १६ ॥
तुझी बुद्धि फार खोटी आहे म्हणून तुझी संतति सोमकुलात उत्पन्न वंशपरंपरेमध्ये राजाच्या रूपाने प्रतिष्ठित होणार नाही. तुझी संततिही तुझ्या सारखीच उद्दण्ड होईल. ॥१६॥
तमेवमुक्त्वा राजर्षिः पूरुं राज्यविवर्धनम् ।
अभिषेकेण सम्पूज्य आश्रमं प्रविवेश ह ॥ १७ ॥
यदुला असे म्हणून राजर्षि ययातिने राज्याची वृद्धि करणार्‍या पुरुला अभिषेकाद्वारे सन्मानित करून वानप्रस्थ आश्रमात प्रवेश केला. ॥१७॥
ततः कालेन महता दिष्टान्तमुपजग्मिवान् ।
त्रिदिवं स गतो राजा ययातिर्नहुषात्मजः ॥ १८ ॥
त्यानंतर दीर्घकालानंतर प्रारब्ध-भोगाचा क्षय झाल्यावर नहुषपुत्र राजा ययातिने शरीराचा त्याग केला आणि स्वर्गलोकी प्रस्थान केले. ॥१८॥
पूरुश्चकार तद्राज्यं धर्मेण महता वृतः ।
प्रतिष्ठाने पुरवरे काशिराज्ये महायशाः ॥ १९ ॥
त्यानंतर महायशस्वी पुरुने महान्‌ धर्माशी संयुक्त होऊन काशिराजाची श्रेष्ठ राजधानी प्रतिष्ठानपुरात राहून त्या राज्याचे पालन केले. ॥१९॥
यदुस्तु जनयामास यातुधानान् सहस्रशः ।
पुरे क्रौञ्चवने दुर्गे राजवंशबहिष्कृतः ॥ २० ॥
राजकुलापासून बहिष्कृत यदुने नगरात तसेच दुर्गम क्रौञ्चवनात हजारो यातुधानांना जन्म दिला. ॥२०॥
एष तूशनसा मुक्तः शापोत्सर्गो ययातिना ।
धारितः क्षत्रधर्मेण यं निमिश्चक्षमे न च ॥ २१ ॥
शुक्राचार्यानी दिलेल्या या शापाला राजा ययातिने क्षत्रियधर्मास अनुसरून धारण केले. परंतु राजा निमिने वसिष्ठांच्या शापाला सहन केले नाही. ॥२१॥
एतत्ते सर्वमाख्यातं दर्शनं सर्वकारिणाम् ।
अनुवर्तामहे सौम्य दोषो न स्याद् यथा नृगे ॥ २२ ॥
सौम्या ! हा सर्व प्रसंग मी तुला ऐकविला आहे. समस्त कृत्यांचे पालन करणार्‍या सत्पुरुषांच्या दृष्टिचेच (विचारांचेच) आपण अनुसरण करत असतो, ज्या योगे राजा नृगाप्रमाणे आम्हांलाही दोष प्राप्त न व्हावा. ॥२२॥
इति कथयति रामे चन्द्रतुल्याननेन
प्रविरलतरतारं व्योम जज्ञे तदानीम् ।
अरुणकिरणरक्ता दिग्बभौ चैव पूर्वा
कुसुमरसविमुक्तं वस्त्रमाकुण्ठितेव ॥ २३ ॥
चंद्रम्याप्रमाणे मनोहर मुख असणारे श्रीराम जेव्हा याप्रकारे कथा सांगत होते त्यासमयी आकाशात एखाद दुसरा तारा राहिलेला होता. पूर्व दिशा अरुण किरणांनी रञ्जित होऊन लाल दिसू लागली, जणु कुसुमरंगात रंगलेल्या अरुण वस्त्राने तिने आपल्या अंगांना झाकून ठेवले होते. ॥२३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकोनषष्टितमः सर्गः ॥ ५९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकोणसाठावा सर्ग पूरा झाला. ॥५९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP