[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। । पञ्चाशः सर्गः । ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मार्गे श्रीरामेणायोध्यापुरीतो वनवासायानुज्ञाप्रार्थनं शृङ्‌गवेरपुरे गङ्‌गातटे समुपस्थाय तत्र रात्रौ तस्य निवासौ निषादराजेन गुहेन तस्य सत्कारश्च - श्रीरामांनी मार्गात अयोध्यापुरीकडून वनवासाची आज्ञा मागणे आणि श्रंगवेरपुरात गङ्‌‍गातटावर पोहोचून रात्री निवास करणे, तेथे निषादराज गुह द्वारा त्यांचा सत्कार -
विशालान् कोसलान् रम्यान् यात्वा लक्ष्मणपूर्वजः ।
अयोध्याभिमुन्मुखो धीमान् प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥
याप्रकारे विशाल आणि रमणीय कोसलदेशाची सीमा पार करून लक्ष्मणाचे मोठे भाऊ बुद्धिमान श्रीरामांनी अयोध्येकडे आपले मुख केले आणि हात जोडून ते म्हणाले- ॥१॥
आपृच्छे त्वां पुरिश्रेष्ठे काकुत्स्थपरिपालिते ।
दैवतानि च यानि त्वां पालयन्त्यावसन्ति च ॥ २ ॥
'काकुत्स्थवंशी राजांकडून परिपालित पुरीश्रेष्ठ अयोध्ये ! मी तुझ्याकडून तसेच ज्या ज्या देवता तुझे रक्षण करतात आणि तुझ्यामध्ये निवास करतात त्यांच्या कडूनही वनात जाण्याच्या आज्ञेची इच्छा करीत आहे. ॥२॥
निवृत्तवनवासस्त्वामनृणो जगतीपतेः ।
पुनर्द्रक्ष्यामि मात्रा च पित्रा च सह सङ्‌‍गतः ॥ ३ ॥
'वनवासाचा अवधी पूर्ण करून आणि महाराजांच्या ऋणांतून (उऋण) मुक्त होऊन मी पुन्हा परत येऊन तुझे दर्शन करीन आणि आपल्या माता -पित्यांनाही भेटेन.' ॥३॥
ततो रुचिरताम्राक्षो भुजमुद्यम्य दक्षिणम् ।
अश्रुपूर्णमुखो दीनोऽब्रवीज्जानपदं जनम् ॥ ४ ॥
यानंतर सुंदर आणि अरुण नेत्र असणार्‍या श्रीरामांनी आपला उजवा हात उंचावून नेत्रातून अश्रु ढाळीत दुःखी होऊन जनपदातील लोकांना म्हटले- ॥४॥
अनुक्रोशो दया चैव यथार्हं मयि वः कृतः ।
चिरं दुःखस्य पापीयो गम्यतामर्थसिद्धये ॥ ५ ॥
'आपण माझ्यावर मोठी कृपा केली आहे आणि यथोचित दया दाखवली आहे. माझ्यासाठी आपण बराच वेळ कष्ट सहन केले आहेत. या प्रकारे आपले बराच वेळ दुःखात पडून राहाणे चांगले नाही. म्हणून आता आपण आपापले कार्य करण्यासाठी जावे.' ॥५॥
तेऽभिवाद्य महात्मानं कृत्वा चापि प्रदक्षिणम् ।
विलपन्तो नरा घोरं व्यतिष्ठंश्च क्वचित् क्वचित् ॥ ६ ॥
हे एकून त्या सर्व लोकांई महात्मा श्रीरामांना प्रणाम करून त्यांची परिक्रमा केली आणि घोर विलाप करीत ते जिथे तिथे उभे राहिले. ॥६॥
तथा विलपतां तेषामतृप्तानां च राघवः ।
अचक्षुर्विषयं प्रायाद् यथार्कः क्षणदामुखे ॥ ७ ॥
त्यांचे डोळे अजून राघवांचे दर्शन करून तृप्त झाले नव्हते आणि ते पूर्वोक्त रूपाने विलाप करीतच होते, इतक्यात ज्याप्रमाणे प्रदोषकाली सूर्य लपतो त्याप्रमाणे राघव त्यांच्या दृष्टी आड होऊन गेले. ॥७॥
ततो धान्यधनोपेतान् दानशीलजनाञ्छिवान् ।
अकुतश्चिद्‍भयान् रम्यांश्चैत्ययूपसमावृतान् ॥ ८ ॥

उद्यानाम्रवणोपेतान् सम्पन्नसलिलाशयान् ।
तुष्टपुष्टजनाकीर्णान् गोकुलाकुलसेवितान् ॥ ९ ॥

रक्षणीयान् नरेन्द्राणां ब्रह्मघोषाभिनादितान् ।
रथेन पुरुषव्याघ्रः कोसलानत्यवर्तत ॥ १० ॥
त्यानंतर पुरुषसिंह श्रीराम तो धनधान्याने संपन्न आणि सुखदायक कोसल जनपद रथाच्या द्वारेच ओलांडून गेले. तेथील सर्व लोक दानशील होते. त्या जनपदास कोठूनही भय नव्हते. तेथील भूभाग रमणीय आणि चैत्य वृक्ष आणि यज्ञसंबंधी यूपांनी (संपन्न) व्याप्त होता. अनेक उद्याने आणि आमराया त्या जनपदाची शोभा वाढवित होत्या. तेथे जलाने भरलेले बरेचसे जलाशय होते. सर्व जनपद हृष्ट- पुष्ट मनुष्यांनी भरलेले होते, गायींच्या समूहानी शोभत, व्याप्त आणि सेवित होते. तेथील ग्रामांचे रक्षण अनेक नरेश करत होते आणि तेथे वेदमंत्रांचा ध्वनि गुंजत रहात होता. ॥८-१०॥
मध्येन मुदितं स्फीतं रम्योद्यानसमाकुलम् ।
राज्यं भोग्यं नरेन्द्राणां ययौ धृतिमतां वरः ॥ ११ ॥
कोसल देशांतून पुढे गेल्यावर धैर्यवानांमध्ये श्रेष्ठ श्रीराम मध्यमार्गाने, जे सुखसुविधायुक्त, धनधान्याने संपन्न, रमणीय उद्यानांनी व्याप्त आणि सामंत नरेशांच्या उपभोगात येणारे होते अशा राज्यांतून पुढे गेले. ॥११॥
तत्र त्रिपथगां दिव्यां शीततोयामशैवलाम् ।
ददर्श राघवो गङ्‌‍गां रम्यामृषिनिषेविताम् ॥ १२ ॥
त्या राज्यात राघवांनी त्रिपथगामिनी दिव्य नदी गंगेचे दर्शन केले. ती शीतल जलाने भरलेली, शेवाळरहित आणि रमणीय होती. बरेचसे महर्षि तिचे सेवन करीत होते. ॥१२॥
आश्रमैरविदूरस्थैः श्रीमद्‌भिः समलङ्‌‍कृताम् ।
कालेऽप्सरोभिर्हृष्टाभिः सेविताम्भोह्रदां शिवाम् ॥ १३ ॥
तिच्या तटावर थोड्या थोड्या अंतरावर बरेचसे सुंदर आश्रम बनलेले होते जे देवनदीची शोभा वाढवीत होते. वेळोवेळी आनंदित अप्सरा देखील उतरून तिच्या जलकुण्डाचे सेवन करीत होत्या. ती गंगा सर्वांचे कल्याण करणारी आहे. ॥१३॥
देवदानवगन्धर्वैः किन्नरैरुपशोभिताम् ।
नानागन्धर्वपत्‍नीभिः सेवितां सततं शिवाम् ॥ १४ ॥
देवता, दानव, गंधर्व आणि किन्नर त्या शिवस्वरूप भागीरथीची शोभा वाढवतात. नाग आणि गंधर्वांच्या पत्‍नी तिचे जलाचे सदा सेवन करतात. ॥१४॥
देवाक्रीडशताकीर्णां देवोऽद्यानयुतां नदीम् ।
देवार्थमाकाशगतां विख्यातां देवपद्मिनीम् ॥ १५ ॥
गंगेच्या दोन्ही तटावर देवतांच्या शेकडो पर्वतीय क्रीडास्थळे आहेत. तिच्या किनार्‍यावर देवतांची बरीचशी उद्याने आहेत. ती देवतांच्या क्रीडेसाठी आकाशात विद्यमान आहे. आणि तेथे ती देवपद्मिनी रूपाने विख्यात आहे. ॥१५॥
जलाघाताट्टहासोग्रां फेननिर्मलहासिनीम् ।
क्वचिद्वेणीकृतजलां क्वचिदावर्तशोभिताम् ॥ १६ ॥
प्रस्तरखण्डांवर गंगाजलाचा जो फेन प्रकट होतो ते जणु (तिचे) त्या दिव्य नदीचे निर्मल हास्य आहे. काही ठिकाणी तिच्या जलाचा आकार वेणीसारखा आहे आणि काही ठिकाणी ती भोवर्‍यांनी सुशोभित आहे. ॥१६॥
क्वचित् स्तिमितगम्भीरां क्वचिद् वेगसमाकुलाम् ।
क्वचिद् गंभीरनिर्घोषां क्वचिद् भैरवनिःस्वनाम् ॥ १७ ॥
काही ठिकाणी तिचे जल निश्चल आणि खोल आहे. काही ठिकाणी महान वेगाने व्याप्त आहे. काही ठिकाणी जलांतून मृदुंग आदि समान गंभीर घोष प्रकट होतो आणि काही ठिकाणी वज्रपात आदि प्रमाणे भयंकर नाद ऐकू येतो. ॥१७॥
देवसङ्‌‍घाप्लुतजलां निर्मलोत्पलसंकुलाम् ।
क्वचिदाभोगपुलिनां क्वचिन्निर्मलवालुकाम् ॥ १८ ॥
तिच्या जलात देवतांचे समुदाय डुंबत असतात. काही काही ठीकाणी तिचे जल नील कमलांनी अथवा कुमुदांनी आच्छादित होते. काही ठिकाणी विशाल तटाचे दर्शन होते तर काही ठीकाणी निर्मल वालुका-राशीचे दर्शन होते. ॥१८॥
हंससारससङ्‌‍घुष्टां चक्रवाकोपशोभिताम् ।
सदामत्तैश्च विहगैरभिपन्नामनिन्दिताम् ॥ १९ ॥
तिच्या ठिकाणी हंसाचा आणि सारसांचा कलरव गुंजत राहतो. चक्रवाक पक्षी त्या देवनदीची शोभा वाढवितात. सदा मदमस्त राहाणारे विहंगम (पक्षी) तिच्या जलावर कूजन करीत राहातात. ती (गंगा) उत्तम शोभेने संपन्न आहे. ॥१९॥
क्वचित् तीररुहैर्वृक्षैर्मालाभिरिव शोभिताम् ।
क्वचित् फुल्लोत्पलच्छन्नां क्वचित् पद्मवनाकुलाम् ॥ २० ॥
काही ठिकाणी तटवर्ती वृक्ष मालाकार होऊन तिची शोभा वाढवितात (तर) काही ठिकाणी तिचे जल फुललेल्या उत्पलांनी (नीलकमलांनी) आच्छादित आहे तर काही ठिकाणी कमल वनांनी व्याप्त आहे. ॥२०॥
क्वचित् कुमुदखण्डैश्च कुड्मलैरुपशोभिताम् ।
नानापुष्परजोध्वस्तां समदामिव च क्वचित् ॥ २१ ॥
काही ठिकाणी कुमुद समूह तथा काही ठिकाणी कलिका (कळ्या) तिला सुशोभित करतात. काही ठिकाणी नाना प्रकारच्या पुष्पांच्या परागांनी व्याप्त होऊन ती मदोन्मत्त स्त्री प्रमाणे प्रतीत होते. ॥२१॥
व्यपेतमलसङ्‌‍घातां मणिनिर्मलदर्शनाम् ।
दिशागजैर्वनगजैर्मत्तैश्च वरवारणैः ॥ २२ ॥

देवराजोपवाह्यैश्च सन्नादितवनान्तराम् ।
ती मलसमूह (पापराशी) दूर करते. तिचे जल इतके स्वच्छ आहे की मण्याप्रमाणे निर्मल दिसत असते. तिच्या तटवर्ती वनांच्या आंतील भाग दिग्गज, जंगली हत्ती आणि देवराजाची स्वारी (वाहन) असलेल्या श्रेष्ठ गजराजांच्या मुळे कोलाहलपूर्ण बनून राहात असतो. ॥२२ १/२॥
प्रमदामिव यत्‍नेन भूषितां भूषणोत्तमैः ॥ २३ ॥

फलपुष्पैः किसलयैर्वृतां गुल्मैर्द्विजैस्तथा ।
विष्णुपादच्युतां दिव्यामपापां पापनाशिनीम् ॥ २४ ॥
ती फळे, फुले, पल्लव, वेली आणि पक्ष्यांनी आवृत्त होऊन उत्तम आभूषणांनी यत्‍नपूर्वक विभूषित झालेल्या युवतीप्रमाणे शोभून दिसते. तिचे प्राकट्य भगवान विष्णूंच्या चरणापासून झाले आहे. तिच्यात पापाचा लेशही नाही. ती दिव्य नदी गंगा जीवांच्या समस्त पापांचा नाश करणारी आहे. ॥२३-२४॥
शिंशुमारैश्च नक्रैश्च भुजङ्‌‍गैश्च समन्विताम्
शंकरस्य जटाजूटाद् भ्रष्टां सागरतेजसा ॥ २५ ॥

समुद्रमहिषीं गङ्‌‍गां सारसक्रौञ्चनादिताम् ।
आससाद महाबाहुः शृङ्‌‍गवेरपुरं प्रति ॥ २६ ॥
तिच्या जलात घोरपडी, मगरी आणि सर्प निवास करतात. सगरवंशी राजा भगीरथाच्या तपोमय तेजामुळे जिचे शंकरांच्या जटाजूटांतून अवतरण झाले, जी समुद्राची राणी आहे तसेच जिच्या निकट सारस आणि क्रौञ्च पक्षी कलरव करीत राहातात, त्या देवनदी गंगेजवळ महाबाहु श्रीराम येऊन पोहेंचले. गंगेची ती धार शृङ्‌‍गवेरपुरांतून वहात होती. ॥२५-२६॥
तामूर्मिकलिलावर्तामन्ववेक्ष्य महारथः ।
सुमन्त्रमब्रवीत् सूतमिहैवाद्य वसामहे ॥ २७ ॥
जिचे आवर्त (भोवरे) लहरीनी व्याप्त होते, त्या श्रीगंगेचे दर्शन करून महारथी श्रीरामांनी सारथी सुमंत्रांना म्हटले- 'सूत! आपण येथे राहू.' ॥२७॥
अविदूरादयं नद्या बहुपुष्पप्रवालवान् ।
सुमहानिङ्‌‍गुदीवृक्षो वसामोऽत्रैव सारथे ॥ २८ ॥
'सारथे ! गंगेच्या समीपच हा जो बर्‍याचशा फुलांनी आणि नवनवीन पल्लवांनी सुशोभित मोठा इङ्‌‍गुदीचा वृक्ष आहे त्याच्या खाली आज रात्री आम्ही निवास करूं. ॥२८॥
प्रेक्षामि सरितां श्रेष्ठां सम्मान्यसलिलां शिवाम् ।
देवमानवगन्धर्वमृगपन्नगपक्षिणाम् ॥ २९ ॥
जिचे जल देवता, मनुष्य, गंधर्व, सर्प, पशु आणि पक्षी या सर्वांसाठी समादरणीय आहे त्या कल्याणस्वरूप आणि सरितांच्या मध्ये श्रेष्ठ गंगेचे दर्शनही मला येथून होत राहील.' ॥२९॥
लक्ष्मणश्च सुमन्त्रश्च बाढमित्येव राघवम् ।
उक्त्वा तमिङ्‌‍गुदीवृक्षं तदोपययतुर्हयैः ॥ ३० ॥
तेव्हा लक्ष्मण आणि सुमंत्रही राघवांना 'फार चांगले' असे म्हणून अश्वांच्या द्वारा त्या इङ्‌‍गुदी वृक्षाच्या समीप गेले. ॥३०॥
रामोऽभियाय तं रम्यं वृक्षमिक्ष्वाकुनन्दनः ।
रथादवतरत् तस्मात् सभार्यः सहलक्ष्मणः ॥ ३१ ॥
त्या रमणीय वृक्षाच्या जवळ पोहोचल्यावर इक्ष्वाकुनंदन श्रीराम आपली पत्‍नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह रथातून खाली उतरले. ॥३१॥
सुमन्त्रोप्यवतीर्याथ मोचयित्वा हयोत्तमान् ।
वृक्षमूलगतं राममुपतस्थे कृताञ्जलिः ॥ ३२ ॥
नंतर सुमंत्रांनीही उतरून उत्तम घोड्यांना सोडून दिले आणि वृक्षाच्या बुंध्यावर बसलेल्या श्रीरामांच्या जवळ जाऊन ते हात जोडून उभे राहिले. ॥३२॥
तत्र राजा गुहो नाम रामस्यात्मसमः सखा ।
निषादजात्यो बलवान् स्थपतिश्चेति विश्रुतः ॥ ३३ ॥
शृङ्‌‍गवेरपुरात गुह नामक राजा राज्य करीत होता. तो श्रीरामांचा प्राणांसमान प्रिय सखा होता. त्याचा जन्म निषादकुलात झालेल होता. तो शारिरीक शक्ती आणि सैनिक शक्तिनेही बलवान होता, तथा तेथील निषादांचा सुविख्यात राजा होता. ॥३३॥
स श्रुत्वा पुरुषव्याघ्रं रामं विषयमागतम् ।
वृद्धैः परिवृतोऽमात्यैर्ज्ञातिभिश्चाप्युपागतः ॥ ३४ ॥
त्याने जेव्हा ऐकले की पुरुषसिंह श्रीराम माझ्या राज्यात आले आहेत तेव्हा तो वृद्ध मंत्री आणि बंधुबांधवांनी घेरलेला तेथे येऊन पोहोंचला. ॥३४॥
ततो निषादाधिपतिं दृष्ट्‍वा दूरादुपस्थितम् ।
सह सौमित्रिणा रामः समागच्छद् गुहेन सः ॥ ३५ ॥
निषाद राजाला दुरूनच येतांना पाहून श्रीराम लक्ष्मणासह पुढे येऊन त्यास भेटले. ॥३५॥
तमार्तः सम्परिष्वज्य गुहो राघवमब्रवीत् ।
यथायोध्या तथेदं ते राम किं करवाणि ते ॥ ३६ ॥

ईदृशं हि महाबाहो कः प्राप्स्यत्यतिथिं प्रियम् ।
राघवांना वल्कल आदि धारण केलेले पाहून गुहाला फार दुःख झाले त्याने राघवांना हृदयाशी धरून म्हटले- 'श्रीराम ! आपल्यासाठी जसे अयोध्येचे राज्य तसेच हे राज्यही आहे. सांगावे, मी आपली काय सेवा करूं ? महाबाहो ! आपल्या सारखा प्रिय अतिथी कुणाला बरे सुलभ होईल ? ॥३६ १/२॥
ततो गुणवदन्नाद्यमुपादाय पृथग्विधम् ॥ ३७ ॥

अर्घ्यं चोपानयच्छीघ्रं वाक्यं चेदमुवाच ह ।
स्वागतं ते महाबाहो तवेयमखिला मही ॥ ३८ ॥

वयं प्रेष्या भवान् भर्ता साधु राज्यं प्रशाधि नः ।
भक्ष्यं भोज्यं च पेयं च लेह्यं चेतदुपस्थितम् ।
शयनानि च मुख्यानि वाजिनां खादनं च ते ॥ ३९ ॥
नंतर नाना प्रकारचे उत्तम अन्न घेऊन तो सेवेत उपस्थित झाला. त्याने शीघ्रच अर्घ्य निवेदन केले आणि याप्रकारे म्हटले- 'महाबाहो ! आपले स्वागत आहे. ही सर्व भूमी जी माझ्या अधिकारात आहे, आपलीच आहे. आम्ही आपले सेवक आहोत आणि आपण आमचे स्वामी. आजपासून आपणच आमच्या या राज्याचे उत्तमप्रकारे शासन करावे. हे भक्ष्य (अन्न आदि) , भोज्य (खीर आदि), पेय (पानकरस वगैरे) तथा लेह्य (चटणी आदि) आपल्या सेवेमध्ये उपस्थित आहे. यांचा स्वीकार करावा. या उत्तमोत्तम शय्या आहेत तसेच आपल्या घोड्यांना खाण्यासाठी चणे, चारा गवत आदिही प्रस्तुत आहे- ही सर्व सामग्री ग्रहण करावी. ' ॥३७-३९॥
गुहमेवं ब्रुवाणं तु राघवः प्रत्युवाच ह ।
अर्चिताश्चैव हृष्टाश्च भवता सर्वदा वयम् ॥ ४० ॥

पद्‍भ्यामभिगमाच्चैव स्नेहसंदर्शनेन च ।
गुहांनी असे म्हटल्यावर राघवांनी त्यास याप्रकारे उत्तर दिले- 'सख्या ! तुम्ही येथपर्यंत पायी येऊन स्नेह दाखविलात त्यानेच आमचे नेहमीप्रमाणेच उत्तमप्रकारे पूजन- स्वागत - सत्कार झाला आहे. तुम्हांला भेटून आम्हांला फार प्रसन्नता वाटली आहे'. ॥४० १/२॥
भुजाभ्यां साधुवृत्ताभ्यां पीडयन् वाक्यमब्रवीत् ॥ ४१ ॥

दिष्ट्या त्वां गुह पश्यामि ह्यरोगं सह बान्धवैः ।
अपि ते कुशलं राष्ट्रे मित्रेषु च धनेषु च ॥ ४२ ॥
नंतर श्रीरामांनी आपल्या दोन्ही गोल- गोल भुजांनी गुहाला उत्तम प्रकारे आलिंगन दिले आणि म्हणाले - 'गुहा ! मी आज तुला बंधु-बांधवांसह स्वस्थ आणि सानंद पहात आहे, ही फार भाग्याची गोष्ट आहे. सांग बरे, तुझ्या राज्यात, मित्रांच्या येथे तसेच वनात सर्वत्र कुशल तर आहे ना ? ॥४१-४२॥
यत् त्विदं भवता किञ्चित् प्रीत्या समुपकल्पितम् ।
सर्वं तदनुजानामि न हि वर्ते प्रतिग्रहे ॥ ४३ ॥
'तू प्रेमवश ही जी काही सामग्री प्रस्तुत केली आहेस, ती स्वीकारून मी तुम्हांला ती परत नेण्याची आज्ञा देत आहे, कारण या समयी दुसर्‍यांई दिलेली कुठलीही वस्तु मी ग्रहण करीत नाही - आपल्या उपयोगात आणत नाही. ॥४३॥
कुशचीराजिनधरं फलमूलाशनं च माम् ।
विद्धि प्रणिहितं धर्मे तापसं वनगोचरम् ॥ ४४ ॥
'वल्कल आणि मृगचर्म धारण करून फलमूलाचा आहार करीत आहे आणि धर्मामध्ये स्थित राहून तापस वेषाने वनात विचरत आहे. या दिवसात तू मला याच नियमांत असलेले जाण. ॥४४॥
अश्वानां खादनेनाहमर्थी नान्येन केनचित् ।
एतावतात्र भवता भविष्यामि सुपूजितः ॥ ४५ ॥
'या सामग्रीमध्ये ज्या घोड्यांच्या खाण्या - पिण्याच्या वस्तु आहेत, त्यांची मला आवश्यकता आहे; दुसर्‍या कोठल्याही वस्तूची नाही. घोड्यांनाच केवळ खाऊ-पिऊ घालण्याने तुमच्या द्वारा माझा पूर्ण सत्कार होऊन जाईल. ॥४५॥
एते हि दयिता राज्ञः पितुर्दशरथस्य मे ।
एतैः सुविहितैरश्वैर्भविष्याम्यहमर्चितः ॥ ४६ ॥
'हे घोडे माझे पिता महाराज दशरथ यांना फार प्रिय आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याची सुंदर व्यवस्था केल्याने माझे उत्तमप्रकारे पूजन केल्यासारखे होईल.' ॥४६॥
अश्वानां प्रतिपानं च खादनं चैव सोऽन्वशात् ।
गुहस्तत्रैव पुरुषांस्त्वरितं दीयतामिति ॥ ४७ ॥
तेव्हा गुहाने आपल्या सेवकांना त्याच वेळी आज्ञा दिली की तुम्ही घोड्यांसाठी खाण्या-पिण्याच्या आवश्यक वस्तु तात्काळ आणून द्या. ॥४७॥
ततश्चीरोत्तरासङ्‌‍गः संध्यामन्वास्य पश्चिमाम् ।
जलमेवाददे भोज्यं लक्ष्मणेनाहृतं स्वयम् ॥ ४८ ॥
त्यानंतर वल्कलाचे उत्तरीय वस्त्र धारण करण्यार्‍या श्रीरामांनी सायंकाळची संध्योपासना करून भोजनाच्या नावावर स्वतः लक्ष्मणाने आणलेले केवळ जलमात्र प्राशन केले. ॥४८॥
तस्य भूमौ शयानस्य पादौ प्रक्षाल्य लक्ष्मणः ।
सभार्यस्य ततोऽभ्येत्य तस्थौ वृक्षमुपाश्रितः ॥ ४९ ॥
नंतर पत्‍नीसहित श्रीराम भूमीवरच तृणांची शय्या अंथरून त्यावर झोपले. त्यावेळी लक्ष्मणांनी त्यांचे दोन्ही चरण धुवून-पुसून ते तेथून थोड्या अंतरावर निघून आले आणि एका वृक्षाचा आश्रय घेऊन तेथे बसले. ॥४९॥
गुहोऽपि सह सूतेन सौमित्रिमनुभाषयन् ।
अन्वजाग्रत् ततो राममप्रमत्तो धनुर्धरः ॥ ५० ॥
गुहही सावधपणे धनुष्य धारण करून सुमंत्रांसह बसून सौमित्राबरोबर गप्पा गोष्टी करीत श्रीरामांच्या रक्षणासाठी रात्रभर जागत राहिला. ॥५०॥
तथा शयानस्य ततो यशस्विनो
     मनस्विनो दाशरथेर्महात्मनः ।
अदृष्टदुःखस्य सुखोचितस्य सा
     तदा व्यतीता सुचिरेण शर्वरी ॥ ५१ ॥
या प्रकारे झोपलेल्या त्या यशस्वी मनस्वी दशरथनंदन महात्मा श्रीरामांची, की ज्यांनी दुःख कधी पाहिलेच नव्हते आणि जे सुखच भोगण्यास योग्य होते, ती रात्र त्यावेळी (झोप न आल्यामुळे) बराच वेळाने व्यतीत झाली. ॥५१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे पञ्चाशः सर्गः ॥ ५० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्ष रामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा पन्नासावा सर्ग पूरा झाला. ॥५०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP