[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। विंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राज्ञो दशरथस्येतरासां राज्ञीनां विलापः, श्रीरामस्य कौसल्याया भवने गमनं तां प्रति स्ववनवासवृत्तान्तनिवेदनं, कौसल्याया मूर्च्छा भुवि पतनं च, श्रीरामेणोत्थापितायास्तस्यास्तमवलोकयन्त्या विलापः - राजा दशरथांच्या अन्य राण्यांचा विलाप, श्रीरामाचे कौसल्येच्या भवनात जाणे, आणि तिला आपल्या वनवासाची गोष्ट सांगणे, कौसल्येचे अचेत होऊन पडणे, आणि श्रीरामांनी उठविल्यावर त्यांच्याकडे पाहून विलाप करणे -
तस्मिंस्तु पुरुषव्याघ्रे निष्क्रामति कृताञ्जलौ ।
आर्तशब्दो महान् जज्ञे स्त्रीणामतःपुरे तदा ॥ १ ॥
तिकडे पुरुषसिंह श्रीराम हात जोडून जसे कैकेयीच्या महालांतून बाहेर निघू लागले त्या बरोबर अंतःपुरात राहणार्‍या राजमहिलांचा महान आर्तनाद प्रकट झाला. ॥१॥
कृत्येष्वचोदितः पित्रा सर्वस्यान्तःपुरस्य च ।
गतिश्च शरणं चासित् स रामोऽद्य प्रवत्स्यति ॥ २ ॥
त्या म्हणत होत्या - 'हाय ! जे पित्यानी आज्ञा दिली नसतांही समस्त अंतःपुराच्या आवश्यक कार्यात स्वतः संलग्न राहात होते, जे आमचे आश्रय आणि रक्षक होते ते राम आज वनात निघून जातील. ॥२॥
कौसल्यायां यथा युक्तो जनन्यां वर्तते सदा ।
तथैव वर्ततेऽस्मासु जन्मप्रभृति राघवः ॥ ३ ॥
ते राम जन्मापासूनच आपली माता कौसल्या हिच्या प्रति सदा जसे वर्तन करीत असत तसेच वर्तन आमच्याशीही करीत होते. ॥३॥
न क्रुध्यत्यभिशप्तोऽपि क्रोधनीयानि वर्जयन् ।
क्रुद्धान् प्रसादयन् सर्वान् स इतोऽद्य प्रवत्स्यति ॥ ४ ॥
जे कठोर वचन बोलल्यावरही कुपित होत नसत, दुसर्‍यांच्या मनांत क्रोध उत्पन्न करणारी वचने कधी बोलत नसत तथा जे सर्व रुसलेल्या व्यक्तींची मनधरणी करीत असत, समजूत घालीत असत ते श्रीराम आज येथून वनात निघून जातील. ॥४॥
अबुद्धिर्बत नो राजा जीवलोकं चरत्ययम् ।
यो गतिं सर्वभूतानां परित्यजति राघवम् ॥ ५ ॥
मोठ्या खेदाची गोष्ट आहे की आमच्या महाराजांची बुद्धि नष्ट झाली आहे. ते या समयी संपूर्ण जीवजगताचा विनाश करण्यास निघाले आहेत. म्हणून तर ते समस्त प्राण्यांचा जीवनाधार जे राम त्यांचा परित्याग करीत आहेत.' ॥५॥
इति सर्वा महिष्यस्ता विवत्सा इव धेनवः ।
पतिमाचुक्रुशुश्चापि सस्वनं चापि चुक्रुशुः ॥ ६ ॥
या प्रकारे सर्व राण्या आपल्या पतिला दोष देऊ लागल्या आणि वासरा पासून वियोग झालेल्या गायींच्या प्रमाणे उच्च्स्वराने क्रंदन करू लागल्या. ॥६॥
स हि चान्तःपुरे घोरमार्तशब्दं महीपतिः ।
पुत्रशोकाभिसंतप्तः श्रुत्वा व्यालीयतासने ॥ ७ ॥
अंतःपुरातील तो भयंकर आर्तनाद ऐकून महाराज दशरथांनी पुत्रशोकाने संतप्त होऊन लज्जेने बिछान्यातच स्वतःस लपविले. ॥७॥
रामस्तु भृशमायस्तो निश्वसन्निव कुञ्जरः ।
जगाम सहितो भ्रात्रा मातुरन्तःपुरं वशी ॥ ८ ॥
इकडे जितेंद्रिय राम स्वजनांच्या दुःखाने अधिक खिन्न होऊन हत्तीप्रमाणे दीर्घ श्वास घेत आपला भाऊ लक्ष्मण याच्यासह मातेच्या अंतःपुरात गेले. ॥८॥
सोऽपश्यत्पुरुषं तत्र वृद्धं परमपूजितम् ।
उपविष्टं गृहद्वारि तिष्ठतश्चापरान् बहून् ॥ ९ ॥
तेथे त्यांनी त्या घराच्या दरवाजावर एक परम पूजित वृद्ध पुरुषास बसलेला पाहिले आणि दुसरीही बरीच माणसे तेथे उभी असलेली दिसली. ॥९॥
दृष्टैव तु तदा रामं ते सर्वे समुपस्थिताः ।
जयेन जयतां श्रेष्ठं वर्धयन्ति स्म राघवम् ॥ १० ॥
ती सर्वच्या सर्व विजयी, वीरात श्रेष्ठ राघवास पहाताच त्यांचा जयजयकार करीत त्यांच्या सेवेत उपस्थित झाली आणि त्यांचे अभिनंदन करू लागली. ॥१०॥
प्रविश्य प्रथमां कक्ष्यां द्वितीयायां ददर्श सः ।
ब्राह्मणान् वेदसम्पन्नान् वृद्धान् राज्ञाभिसत्कृतान् ॥ ११ ॥
पहिली देवडी पार करून जेव्हा ते दुसर्‍या देवडीत पोहोंचले तेव्हा तेथे त्यांना राजांच्या द्वारा सन्मानित बरेचसे वेदज्ञ ब्राह्मण दिसून आले. ॥११॥
प्रणम्य रामस्तान् वृद्धांस्तृतीयायां ददर्श सः ।
स्त्रियो बालाश्च वृद्धाश्च द्वाररक्षणतत्पराः ॥ १२ ॥
त्या वृद्ध ब्राह्मणांना प्रणाम करून राम जेव्हा तिसर्‍या देवडीत पोहोंचले तेव्हा तेथे त्यांना द्वाररक्षणाच्या कार्यात गुंतलेल्या बर्‍याचशा नववयस्का एवं वृद्ध अवस्थेतील स्त्रिया दिसून आल्या. ॥१२॥
वर्द्धयित्वा प्रहृष्टास्ताः प्रविश्य च गृहं स्त्रियः ।
न्यवेदयन्त त्वरितं राममातुः प्रियं तदा ॥ १३ ॥
रामांना पाहून त्या स्त्रियांना फार हर्ष झाला. रामांचे अभिनंदन करून त्या स्त्रियांनी तात्काळ महालाच्या आत प्रवेश केला आणि तात्काळच रामांच्या मातेला त्यांच्या आगमनाचा प्रिय समाचार ऐकविला. ॥१३॥
कौसल्यापि तदा देवी रात्रिं स्थित्वा समाहिता ।
प्रभाते चाकरोत् पूजां विष्णोः पुत्रहितैषिणी ॥ १४ ॥
त्या समयी देवी कौसल्या पुत्राच्या मंगल कामनेने रात्रभर जागून सकाळी एकाग्रचित्त होऊन भगवान विष्णूंची पूजा करीत होती. ॥१४॥
सा क्षौमवसना हृष्टा नित्यं व्रतपरायणा ।
अग्निं जुहोति स्म तदा मन्त्रवत् कृतमङ्‌‍गला ॥ १५ ॥
ती रेशमी वस्त्र नेसून अत्यंत प्रसन्नतापूर्वक निरंतर व्रतपरायण होऊन मंगलकृत्य पूर्ण केल्यानंतर मंत्रोच्चारणपूर्वक त्या समयी अग्निमध्ये आहुति देत होती. ॥१५॥
प्रविश्य तु तदा रामो मातुरन्तःपुरं शुभम् ।
ददर्श मातरं तत्र हावयन्तीं हुताशनम् ॥ १६ ॥
त्याच वेळी रामांनी मातेच्या शुभ अंतःपुरात प्रवेश करून तेथे मातेला पाहिले. ती अग्निमध्ये हवन करवीत होती. ॥१६॥
देवकार्यनिमित्तं च तत्रापश्यत् समुद्यतम् ।
दध्यक्षतघृतं चैव मोदकान् हविषस्तथा ॥ १७ ॥

लाजान् माल्यानि शुक्लानि पायसं कृसरं तथा ।
समिधः पूर्णकुम्भांश्च ददर्श रघुनन्दनः ॥ १८ ॥
रघुनंदनाने पाहिले तेव्हा तेथे देवकार्यासाठी बरीचशी सामग्री संग्रह करून ठेवलेली होती. दही, अक्षत, तूप, मोदक, हविष्य, धान्याच्या लाह्या, (शुभ्र) सफेद माला, खीर, खिचडी, समिधा आणि भरलेले कलश - हे सर्व तेथे दृष्टिगोचर झाले. ॥१७-१८॥
तां शुक्लक्षौमसंवीतां व्रतयोगेन कर्शिताम् ।
तर्पयन्तीं ददर्शाद्‌‍भिर्देवतां वरवर्णिनीम् ॥ १९ ॥
उत्तम कांति असणारी माता कौसल्या शुभ्र रंगाची रेशमी साडी नेसलेली होती. ती व्रताच्या अनुष्ठानाने दुर्बल झालेली होती आणि इष्टदेवतेचे तर्पण करीत होती. या अवस्थेत रामांनी तिला पाहिले. ॥१९॥
सा चिरस्यात्मजं दृष्ट्‍वा मातृनन्दनमागतम् ।
अभिचक्राम संहृष्टा किशोरं वडवा यथा ॥ २० ॥
मातेचा आनंद वाढविणार्‍या प्रिय पुत्राला बर्‍याच काळाने समोर उपस्थित पाहून कौसल्यादेवी मोठ्या हर्षाने त्यांच्याकडे निघाली. जणु एखादी घोडी आपल्या शिंगराला पाहून मोठ्या हर्षाने त्याच्याजवळ आली असावी. ॥२०॥
स मातरमभिक्रान्तामुपसङ्‌‍गृह्य राघवः ।
परिष्वक्तश्च बाहुभ्यामवघ्रातश्च मूर्धनि ॥ २१ ॥
राघवांनी निकट आलेल्या मातेच्या चरणांना प्रणाम केला आणि माता कौसल्येने त्यांना दोन्ही हातांनी कवळून हृदयाशी धरले तथा अत्यंत प्रेमाने त्यांचे मस्तक हुंगले. ॥२१॥
तमुवाच दुराधर्षं राघवं सुतमात्मनः ।
कौसल्या पुत्रवात्सल्यादिदं प्रियहितं वचः ॥ २२ ॥
त्या समयी कौसल्या देवीने आपले दुर्जय पुत्र राघव यांना स्नेहवश ही प्रिय आणि हितकर गोष्ट सांगितली - ॥२२॥
वृद्धानां धर्मशीलानां राजर्षीणां महात्मनाम् ।
प्राप्नुह्यायुश्च कीर्तिं च धर्मं चाप्युचितं कुले ॥ २३ ॥
'पुत्रा ! तू धर्मशील, वृद्ध एवं महात्मा राजर्षिंप्रमाणे आयु, कीर्ति आणि कुलोचित धर्म प्राप्त कर. ॥२३॥
सत्यप्रतिज्ञं पितरं राजानं पश्य राघव ।
अद्यैव त्वां स धर्मात्मा यौवराज्येऽभिषेक्ष्यति ॥ २४ ॥
'राघवा ! आता तू जाऊन आपल्या सत्यप्रतिज्ञ पित्याचे-राजांचे दर्शन कर. ते धर्मात्मा नरेश आजच तुझा युवराज पदावर अभिषेक करतील'. ॥२४॥
दत्तमासनमालभ्य भोजनेन निमन्त्रितः ।
मातरं राघवः किञ्चित् प्रसार्याञ्जलिरब्रवीत् ॥ २५ ॥
असे म्हणून मातेने त्यांना बसण्यासाठी आसन दिले आणि भोजन करावयास सांगितले. भोजनासाठी निमंत्रित झाल्यावर राघवाने त्या आसनास स्पर्श मात्र केला, नंतर ते अंजलि पसरून मातेला काही सांगण्यासाठी उद्यत झाले. ॥२५॥
स स्वभावविनीतश्च गौरवाच्च तथानतः ।
प्रस्थितो दण्डकारण्यमाप्रष्टुमुपचक्रमे ॥ २६ ॥
ते स्वभावानेच विनयशील होते तथा मातेच्या गौरवानेही तिच्या समोर नतमस्तक झाले होते. त्यांना दण्डकारण्यात प्रस्थान करावयाचे होते म्हणून ते त्यासाठी आज्ञा मागण्याचा उपक्रम करू लागले. ॥२६॥
देवि नूनं न जानीषे महद् भयमुपस्थितम् ।
इदं तव च दुःखाय वैदेह्या लक्ष्मणस्य च ॥ २७ ॥
त्यांनी म्हटले- 'देवि ! निश्चितच तुला माहित नाही की तुला महान भय उपस्थित झालेले आहे. या समयी मी जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकून तुला, सीतेला आणि लक्ष्मणालाही दुःख होईल, तथापि मी सांगेन.' ॥२७॥
गमिष्ये दण्डकारण्यं किमनेनासनेन मे ।
विष्टरासनयोग्यो हि कालोऽयं मामुपस्थितः ॥ २८ ॥
आता तर मी दण्डकारण्यात जाईन, म्हणून अशा बहुमूल्य आसनाची मला काय आवश्यकता आहे ? आता माझ्यासाठी हा कुशाच्या (दर्भाच्या) चटईवर बसण्याचा समय आलेला आहे. ॥२८॥
चतुर्दश हि वर्षाणि वत्स्यामि विजने वने ।
कन्दमूलफलैर्जीवन् हित्वा मुनिवदामिषम् ॥ २९ ॥
मी राजभोग्य वस्तुंचा त्याग करून मुनिंच्या प्रमाणे कंद, मूळ आणि फळांनी जीवन-निर्वाह करीत चौदा वर्षे पर्यत निर्जन वनात निवास करीन. ॥२९॥
भरताय महाराजो यौवराज्यं प्रयच्छति ।
मां पुनर्दण्डकारण्यं विवासयति तापसम् ॥ ३० ॥
महाराज युवराजाचे पद भरतास देत आहेत आणि मला तपस्वी बनवून दण्डकारण्यात धाडीत आहेत. ॥३०॥
स षट् चाष्टौ च वर्षाणि वत्स्यामि विजने वने ।
आसेवमानो वन्यानि फलमूलैश्च वर्तयन् ॥ ३१ ॥
म्हणून चौदा वर्षेपर्यत मी निर्जन राहीन आणि जंगलात सुलभ असणारे वत्कल आदि धारण करून फल-मूलाच्या आहारानेच जीवन-निर्वाह करीत राहीन.' ॥३१॥
सा निकृत्तेव सालस्य यष्टिः परशुना वने ।
पपात सहसा देवी देवतेव दिवश्च्युता ॥ ३२ ॥
ही अप्रिय गोष्ट ऐकून वनात कुर्‍हाडीने छाटलेल्या (तोडलेल्या) शाल वृक्षाच्या शाखेप्रमाणे कौसल्या देवी अचानक पृथ्वीवर कोसळली; जणु स्वर्गातून कुणी देवांगना भूतलावर येऊन पडली आहे. ॥३२॥
तामदुःखोचितां दृष्ट्‍वा पतितां कदलीमिव ।
रामस्तूत्थापयामास मातरं गतचेतसम् ॥ ३३ ॥
जीने जीवनात कधी दुःख पाहिले नव्हते- जी दुःख भोगण्यास योग्यही नव्हतीच- त्या माता कौसल्येला कापलेल्या कर्दळीप्रमाणे अचेत अवस्थेत भूमीवर पडलेली पाहून रामांनी हाताचा आधार देऊन उठवले. ॥३३॥
उपावृत्योत्थितां दीनां वडवामिव वाहिताम् ।
पांसुकुण्ठितसर्वाङ्‌‍गीं विममर्श च पाणिना ॥ ३४ ॥
ज्याप्रमाणे एखादी घोडी प्रथम फार मोठे ओझे वाहून चुकली असावी आणि थकवा दूर करण्यासाठी धरतीवर लोळण घेऊन उठलेली असावी, त्या प्रकारे उठलेल्या कौसल्येच्या समस्त अंगावर धूळ चिकटलेली होती आणि ती अत्यंत दीन दशेला पोहोचली होती. त्या अवस्थेत श्रीरामांनी आपल्या हाताने तिच्या अंगावरील धूळ झटकली (पुसली). ॥३४॥
सा राघवमुपासीनमसुखार्ता सुखोचिता ।
उवाच पुरुषव्याघ्रमुपशृण्वति लक्ष्मणे ॥ ३५ ॥
कौसल्येने जीवनात प्रथम सदा सुखच पाहिले होते आणि ती त्या योग्यच होती. परंतु त्यावेळी ती दुःखाने कातर झालेली होती. लक्ष्मण ऐकत असतां तिने आपल्या जवळ बसलेल्या पुरुषसिंह राघवास या प्रकारे म्हटले - ॥३५॥
यदि पुत्र न जायेथा मम शोकाय राघव ।
न स्म दुःखमतो भूयः पश्येयमहमप्रजाः ॥ ३६ ॥
'हे राघवा ! जर तुझा जन्मच झाला नसता तर मला या एकाच गोष्टीचा शोक होत राहिला असता. आज जे माझ्यावर इतके भारी दुःख कोसळले आहे, ते वंध्या असतांना मला पाहावे (सोसावे) लागले नसते. ॥३६॥
एक एव हि वन्ध्यायाः शोको भवति मानसः ।
अप्रजास्मीति संतापो न ह्यन्यः पुत्र विद्यते ॥ ३७ ॥
'मुला ! वंध्येला एकच मानसिक शोक होत असतो. तिच्या मनात हाच संताप राहत असतो की मला काही संतान नाही. याशिवाय दुसरे काही दुःख तिला होत नाही. ॥३७॥
न दृष्टपूर्वं कल्याणं सुखं वा पतिपौरुषे ।
अपि पुत्रे तु पश्येयमिति राम स्थितं मया ॥ ३८ ॥
'रामा ! मुला ! पतिच्या प्रभुत्व कालात एका ज्येष्ठ पत्‍नीला जे कल्याण अथवा सुख प्राप्त व्हावयास पाहिजे, ते मला पहिल्याने कधीही पहाण्यास मिळाले नाही. मी विचार करीत होते की पुत्राच्या राज्यात मी सर्व सुख बघेन आणि या आशेने आत्तापर्यत जगत राहिले. ॥३८॥
सा बहून्यमनोज्ञानि वाक्यानि हृदयच्छिदाम् ।
अहं श्रोष्ये सपत्‍नीनामवराणां वरा सती ॥ ३९ ॥
ज्येष्ठ राणी असूनही मला, आपल्या भाषणाने हृदय विदीर्ण करणार्‍या लहान सवतीची बरीचसी अप्रिय वचने ऐकावी लागतील. ॥३९॥
अतो दुःखतरं किन्नु प्रमदानां भविष्यति ।
मम शोको विलापश्च यादृशोऽयमनन्तकः ॥ ४० ॥
स्त्रियांसाठी याहून अधिक महान दुःख आणखी काय असू शकेल ? म्हणून माझा शोक आणि विलाप जसा आहे (तसाच राहाणार) त्याचा कधी अंत होणार नाही. ॥४०॥
त्वयि सन्निहितेऽप्येवमहमासं निराकृता ।
किं पुनः प्रोषिते तात ध्रुवं मरणमेव हि ॥ ४१ ॥
'तात ! तू जवळ असतांनाही मी याप्रकारे सवतींकडून तिरस्कृत राहिलेली आहे. मग तू परदेशी निघून गेल्यावर माझी काय दशा होईल ? त्या दशेत तर माझे मरणच निश्चित आहे. ॥४१॥
अत्यन्तं निगृहीतास्मि भर्तुर्नित्यमसम्मता ।
परिवारेण कैकेय्याः समा वाप्यथवावरा ॥ ४२ ॥
'पतिकडून मला सदा अत्यंत तिरस्कार अथवा कडक शब्दात धिक्कार यांचीच प्राप्ति झाली आहे. कधी प्रेम आणि सन्मान प्राप्त झाला नाही. मी कैकेयीच्या दासींच्या बरोबर अथवा त्यांच्याहूनही निकृष्ट (वाया गेलेली) समजली जाते आहे. ॥४२॥
यो हि मां सेवते कश्चिदपि वाप्यनुवर्तते ।
कैकेय्याः पुत्रमन्वीक्ष्य स जनो नाभिभाषते ॥ ४३ ॥
जो कुणी माझ्या सेवेत राहातो अथवा माझे अनुसरण करतो तोही कैकेयीच्या पुत्राला पाहून गप्प होऊन जातो, माझ्याशी बोलत नाही. ॥४३॥
नित्यक्रोधतया तस्याः कथं नु खरवादि तत् ।
कैकेय्या वदनं द्रष्टुं पुत्र शक्ष्यामि दुर्गता ॥ ४४ ॥
'मुला ! या दुर्गतीत पडून मी सदा क्रोधी स्वभावामुळे कटुवचन बोलणार्‍या त्या कैकेयीचे मुख कसे बघू शकेन. ॥४४॥
दश सप्त च वर्षाणि जातस्य तव राघव ।
आतीतानि प्रकाङ्‌‍क्षन्त्या मया दुःखपरिक्षयम् ॥ ४५ ॥
'राघवा ! तुझा उपनयनरूप द्वितीय जन्म होऊन सतरा वर्षे निघून गेली आहेत. (अर्थात तू आता सत्तावीस वर्षाचा झाला आहेस.) आत्तापर्यत मी हीच आशा धरून चालत आले आहे की आता माझे दुःख दूर होईल. ॥४५॥
तदक्षयं महत् दुःखं नोत्सहे सहितुं चिरात् ।
विप्रकारं सपत्‍नीनामेवं जीर्णापि राघव ॥ ४६ ॥
'राघवा ! आता या वृद्धपणी या प्रकारे सवतींचा तिरस्कार आणि त्याने होणारे अक्षय महान दुःख मी अधिक काळपर्यत सहन करू शकणार नाही. ॥४६॥
अपश्यन्ती तव मुखं परिपूर्णशशिप्रभम् ।
कृपणा वर्तयिष्यामि कथं कृपणजीविका ॥ ४७ ॥
'पूर्ण चंद्राप्रमाणे तुझ्या मनोहर मुखास पाहिल्याशिवाय मी दुःखिता दयनीय जीवनवृत्तिने राहून कसा निर्वाह करू शकेन ? ॥४७॥
उपवासैश्च योगैश्च बहुभिश्च परिश्रमैः ।
दुःखसंवर्धितो मोघं त्वं हि दुर्गतया मया ॥ ४८ ॥
'मुला ! (जर तुला या देशांतून निघूनच जायचे आहे तर) मी भाग्यहीनने वारंवार उपवास, देवतांचे ध्यान तसेच बरेचसे परिश्रमजनक उपाय करून व्यर्थच तुझे इतक्या कष्टाने पालन- पोषण केले आहे. ॥४८॥
स्थिरं तु हृदयं मन्ये ममेदं यन्न दीर्यते ।
प्रावृषीव महानद्याः स्पृष्टं कूलं नवाम्भसा ॥ ४९ ॥
मी समजते आहे की माझे हे हृदय निश्चितच फार कठोर आहे की जे तुझ्या वियोगाची वार्ता ऐकूनही, वर्षाकालातील नूतन जल प्रवाहाच्या धडकेने फुटून जाणार्‍या महानदीच्या उंच किनार्‍याप्रमाणे (दरडी प्रमाणे) फुटून जात नाही. ॥४९॥
ममैव नूनं मरणं न विद्यते
     न चावकाशोऽस्ति यमक्षये मम ।
यदन्तकोऽद्यैव न मां जिहीर्षति
     प्रसह्य सिंहो रुदतीं मृगीमिव ॥ ५० ॥
निश्चितच माझ्यासाठी कुठेही मरण नाही, माझ्यासाठी यमराजाच्या घरातही कुठे जागा नाही म्हणून तर रडत असलेल्या मृगीला ज्याप्रमाणे सिंह जबरदस्तीने उचलून घेऊन जातो त्याप्रमाणे आजच यमराज मला उचलून घेऊन जाण्यास इच्छित नाही. ॥५०॥
स्थिरं हि नूनं हृदयं ममायसं
     न भिद्यते यद् भुवि नो विदीर्यते ।
अनेन दुःखेन च देहमर्पितं
     ध्रुवं ह्यकाले मरणं न विद्यते ॥ ५१ ॥
अवश्यच माझे हे कठोर हृदय लोखंडाचेच बनलेले आहे जे पृथ्वीवर पडूनही फुटत नाही अथवा त्याचे तुकडे तुकडेही होऊन जात नाहीत. याच दुःखाने व्याप्त या शरीराचेही तुकडे तुकडे होऊन जात नाहीत. निश्चितच मृत्युकाल आल्या शिवाय कुणाला मरण येत नाही. ॥५१॥
इदं तु दुःखं यदनर्थकानि मे
     व्रतानि दानानि न संयमाश्च हि ।
तपश्च तप्तं यदपत्यकाम्यया
     सुनिष्फलं बीजमिवोप्तमूषरे ॥ ५२ ॥
सर्वात अधिक दुःखाची गोष्टही आहे की पुत्राच्या सुखासाठी माझ्या द्वारे केले गेलेले व्रत, दान आणि संयम सर्व व्यर्थ झाले आहे. मी संतानाच्या हितकामनेने जे तप केले आहे तेही खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीजाप्रमाणे निष्फल झाले आहे. ॥५२॥
यदि ह्यकाले मरणं यदृच्छया
     लभेत कश्चिद् गुरुदुःखकर्शितः ।
गताहमद्यैव परेतसंसदं
     विना त्वया धेनुरिवात्मजेन वै ॥ ५३ ॥
जर कुणी मनुष्य दुःखाने पीडित होऊन अकालीही आपल्या इच्छेस अनुसरून मृत्युस प्राप्त करू शकत असेल तर मी तुझ्याविना, आपल्या वासराची ताटातूट झालेल्या गाई प्रमाणे आजच यमराजाच्या सभेमध्ये निघून जाईन. ॥५३॥
अथापि किं जीवितमद्य मे वृथा
     त्वया विना चन्द्रनिभाननप्रभ ।
अनुव्रजिष्यामि वनं त्वयैव गौः
     सुदुर्बला वत्समिवानुकाङ्‌‍क्ष्या ॥ ५४ ॥
चंद्रम्याप्रमाणे मनोहर मुख कांति असणार्‍या श्रीरामा ! जर मला मृत्यु येत नसेल तर तुझ्याविना येथे मी व्यर्थ कुत्सित जीवन का घालवूं ? मुला ज्याप्रमाणे गाय दुर्बल झाली तरीही आपल्या वासराच्या लोभाने त्याच्या मागे मागे निघून जाते, त्याप्रकारे मीही तुझ्या बरोबरच वनात चालू लागेन.' ॥५४॥
भृशमसुखममर्षिता तदा बहु
     विललाप समीक्ष्य राघवम् ।
व्यसनमुपनिशाम्य सा महत्
     सुतमिव बद्धमवेक्ष्य किन्नरी ॥ ५५ ॥
येणारे भारी दुःख सहन करण्यास असमर्थ होऊन महान संकटाचा विचार करून सत्याच्या ध्यानात बद्ध झालेल्या आपल्या पुत्राकडे- राघवाकडे पाहून, जशी कोणी किन्नरी आपला पुत्र बंधनात पडलेला पाहून व्याकुळ होते त्याप्रमाणे ती कौसल्यादेवी अत्यंत विलाप करू लागली. ॥५५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे विंशः सर्गः ॥ २० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा विसावा सर्ग पूरा झाला. ॥२०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP