श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। द्विसप्ततितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रेण भरतशत्रुघ्नयोः कृते कुशध्वजकन्ययोर्वरणं जनकेन तस्य स्वीकरणं दशरथेन पुत्राणां मङ्गलार्थं नान्दीश्राद्धगोदानयोरनुष्ठानम् - विश्वामित्रद्वारा भरत आणि शत्रुघ्नासाठी कुशध्वजाच्या कन्यांचे वरण, राजा जनकद्वारा याची स्विकृति तथा राजा दशरथांचे आपल्या पुत्रांच्या मंगलासाठी नांदीश्राद्ध तसेच गोदान करणे -
तमुक्तन्तं वैदेहं विश्वामित्रो महामुनिः ।
उवाच वचनं वीरं वसिष्ठसहितो नृपम् ॥ १ ॥
विदेहराज जनकांनी जेव्हां आपले बोलणे समाप्त केले तेव्हां वसिष्ठासहित महामुनि विश्वामित्र त्या वीर नरेशाला म्हणाले - ॥ १ ॥
अचिन्त्यान्यप्रमेयाणि कुलानि नरपुङ्‍गव ।
इक्ष्वाकूणां विदेहानां नैषां तुल्योऽस्ति कश्चन ॥ २ ॥
'नरश्रेष्ठ ! इक्ष्वाकु आणि विदेह दोन्हीही राजांचे वंश अचिंतनीय आहेत. दोन्हींच्या प्रभावाची काही सीमा नाही. या दोन्हींची समानता करणारा दुसरा कुठलाही राजवंश नाही. ॥ २ ॥
सदृशो धर्मसम्बन्धः सदृशो रूपसम्पदा ।
रामलक्ष्मणयो राजन् सीता चोर्मिलया सह ॥ ३ ॥
'राजन् ! या दोन्ही कुलात हा जो धर्मसंबंध स्थापित होऊ पहात आहे, सर्वथा एक-दुसर्‍यास योग्य आहे. रूप, वैभवाच्या दृष्टीनेही समान योग्यतेचा आहे. कारण ऊर्मिलेसहित सीता श्रीराम आणि लक्ष्मणाच्या अनुरूप आहेत. ॥ ३ ॥
वक्तव्यं च नरश्रेष्ठ श्रूयतां वचनं मम ।
भ्राता यवीयान् धर्मज्ञ एष राजा कुशध्वजः ॥ ४ ॥

अस्य धर्मात्मनो राजन् रूपेणाप्रतिमं भुवि ।
सुताद्वयं नरश्रेष्ठ पत्‍न्यर्थं वरयामहे ॥ ५ ॥

भरतस्य कुमारस्य शत्रुघ्नस्य च धीमतः ।
वरये ते सुते राजंस्तयोरर्थे महात्मनोः ॥ ६ ॥
'नरश्रेष्ठ ! आपले लहान बंधू हे धर्मज्ञ राजा कुशध्वज बसलेले आहेत. या धर्मात्मा नरेशांच्याही दोन कन्या आहेत, ज्या या भूमंडलावर अनुपम सुंदर आहेत. नरश्रेष्ठ ! भूपाल ! मी आपल्याला त्या दोन कन्यांचे कुमार भरत आणि बुद्धिमान् शत्रुघ्न या दोन्ही महामनस्वी राजकुमारांसाठी त्यांची धर्मपत्‍नी बनविण्याच्या उद्देशाने वरण करीत आहे. ॥ ४-६ ॥
पुत्रा दशरथस्येमे रूपयौवनशालिनः ।
लोकपालसमाः सर्वे देवतुल्यपराक्रमाः ॥ ७ ॥
'राजा दशरथांचे हे सर्व पुत्र रूप आणि यौवनाने सुशोभित, लोकपालांप्रमाणे तेजस्वी, तथा देवतातुल्य पराक्रमी आहेत. ॥ ७ ॥
उभयोरपि राजेन्द्र सम्बन्धेनानुबध्यताम् ।
इक्ष्वाकुकुलमव्यग्रं भवतः पुण्यकर्मणः ॥ ८ ॥
'राजेंद्र ! या दोन्ही भावांनाही (भरत आणि शत्रुघ्न) कन्यादान करून या समस्त इक्ष्वाकु कुलाला आपल्या संबंधाने बांधून घ्यावे. आपण पुण्यकर्मा पुरुष आहात. आपल्या चित्तात व्यग्रता येता उपयोगी नाही. (अर्थात् आपण असा विचार करून व्यग्र होऊ नये की अशा महान् सम्राटांच्या बरोबर मी एकाच वेळी चार वैवाहिक संबंधाचा निर्वाह कसा करू शकतो ?)' ॥ ८ ॥
विश्वामित्रवचः श्रुत्वा वसिष्ठस्य मते तदा ।
जनकः प्राञ्जलिर्वाक्यमुवाच मुनिपुङ्‍गवौ ॥ ९ ॥
वसिष्ठांच्या सम्मतीस अनुसरून विश्वामित्रांचे हे वचन ऐकून राजा जनकांनी हात जोडून त्या दोन्ही मुनिवरांना म्हटले - ॥ ९ ॥
कुलं धन्यमिदं मन्ये येषां नो मुनिपुङ्‍गवौ ।
सदृशं कुलसम्बन्धं यदाज्ञापयतः स्वयम् ॥ १० ॥
'मुनिपुङ्‍गवांनो ! मी आपल्या या कुलास धन्य मानतो आहे, ज्याला आपण दोघांनी इक्ष्वाकु वंशास योग्य समजून त्याच्याशी संबंध जोडण्यासाठी आपण स्वयं आज्ञा देत आहात. ॥ १० ॥
एवं भवतु भद्रं वः कुशध्वजसुते इमे ।
पत्‍न्यौ भजेतां सहितौ शत्रुघ्नभरतावुभौ ॥ ११ ॥
'आपले कल्याण होवो ! आपण जसे सांगता आहात तसेच होईल. हे सदा एकत्र राहणारे दोन्ही भाऊ भरत आणि शत्रुघ्न कुशध्वजाच्या या दोन कन्यांचे (दोन कन्यांपैकी एकेकीचे) आपापल्या धर्मपत्‍नीच्या रूपांत ग्रहण करतील. ॥ ११ ॥
एकाह्ना राजपुत्रीणां चतसॄणां महामुने ।
पाणीन् गृह्णन्तु चत्वारो राजपुत्रा महाबलाः ॥ १२ ॥
उत्तरे दिवसे ब्रह्मन् फल्गुनीभ्यां मनीषिणः ।
वैवाहिकं प्रशंसन्ति भगो यत्र प्रजापतिः ॥ १३ ॥
'ब्रह्मन् ! पुढील दोन दिवस फाल्गुनी नामक नक्षत्रांनी युक्त आहेत. यात पहिल्या दिवशी तर पूर्वा फल्गुनी आहे आणि दुसर्‍या दिवशी (अर्थात् परवा) उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असेल, ज्याची देवता प्रजापति भग (अर्यमा) आहे. मनीषी पुरुष त्या नक्षत्रात वैवाहिक कार्य करणे फार उत्तम म्हणून सांगतात. ॥ १२-१३ ॥
एवमुक्त्वा वचः सौम्यं प्रत्युत्थाय कृताञ्जलिः ।
उभौ मुनिवरौ राजा जनको वाक्यमब्रवीत् ॥ १४ ॥
या प्रकारे सौम्य मनोहर वचन बोलून राजा जनक उठून उभे राहिले आणि त्या दोन्ही मुनिवरांना हात जोडून म्हणाले - ॥ १४ ॥
परो धर्मः कृतो मह्यं शिष्योऽस्मि भवतोस्तथा ।
इमान्यासनमुख्यानि आस्यतां मुनिपुङ्‍गवौ ॥ १५ ॥
आपण कन्यांचे विवाह निश्चित करून माझ्यासाठी महान् धर्माचे संपादन केले आहे, मी आपणा दोघांचा शिष्य आहे. मुनिवरांनो ! या श्रेष्ठ आसनांवर आपण दोघांनी विराजमान व्हावे. ॥ १५ ॥
यथा दशरथस्येयं तथायोध्या पुरी मम ।
प्रभुत्वे नास्ति संदेहो यथार्हं कर्तुमर्हथ ॥ १६ ॥
आपणासाठी जशी राजा दशरथांची अयोध्या आहे तशीच ही माझी मिथिलापुरीही आहे. आपला हिच्यावर पूरा अधिकार आहे, यांत संदेह नसावा. म्हणून आपण आम्हांला यथायोग्य आज्ञा प्रदान करावी. ॥ १६ ॥
तथा ब्रुवति वैदेहे जनके रघुनन्दनः ।
राजा दशरथो हृष्टः प्रत्युवाच महीपतिम् ॥ १७ ॥
विदेहराज जनकांनी असे म्हटल्यावर रघुनन्दन राजा दशरथ प्रसन्न होऊन त्या मिथिला नरेशाला त्यांनी या प्रकारे उत्तर दिले - ॥ १७ ॥
युवामसंख्येयगुणौ भ्रातरौ मिथिलेश्वरौ ।
ऋषयो राजसङ्‍घाश्च भवद्‍भ्यामभिपूजिताः ॥ १८ ॥
'मिथिलेश्वर ! आपणा दोघा भावांचे गुण असंख्य आहेत. आपण ऋषि तथा राजसमूहाचा उत्तम प्रकारे सत्कार केला आहे. ॥ १८ ॥
स्वस्ति प्राप्नुहि भद्रं ते गमिष्यामि स्वमालयम् ।
श्राद्धकर्माणि विधिवद्‌विधास्य इति चाब्रवीत् ॥ १९ ॥
'आपले कल्याण होवो ! आपण मंगलाचे भागी व्हावे. आता आम्ही आमच्या विश्रामस्थानी जाऊ. तेथे जाऊन मी विधिपूर्वक नांदीमुख श्राद्धाचे कार्य संपन्न करीन' असे राजा दशरथांनी सांगितले. ॥ १९ ॥
तमापृष्ट्‍वा नरपतिं राजा दशरथस्तदा ।
मुनीन्द्रौ तौ पुरस्कृत्य जगामाशु महायशाः ॥ २० ॥
त्यानंतर मिथिला नरेशांची अनुमति घेऊन महायशस्वी राजा दशरथ, मुनिश्रेष्ठ विश्वामित्र आणि वसिष्ठांना पुढे करून तात्काळ आपल्या आवास स्थानाकडे निघून गेले. ॥ २० ॥
स गत्वा निलयं राजा श्राद्धं कृत्वा विधानतः ।
प्रभाते काल्यमुत्थाय चक्रे गोदानमुत्तमम् ॥ २१ ॥
निवासस्थानी जाऊन राजा दशरथांनी अपराह्नकालात विधिपूर्वक अभ्युदायिक श्राद्ध संपन्न केले. तत्पश्चात् रात्र सरल्यानंतर प्रातःकाळी उठून राजांनी तत्कालोचित उत्तम गोदान कर्म केले. ॥ २१ ॥
गवां शतसहस्रं च ब्राह्मणेभ्यो नराधिपः ।
एकैकशो ददौ राजा पुत्रानुद्दिश्य धर्मतः ॥ २२ ॥
राजा दशरथांनी आपल्या एक एक पुत्राच्या मंगलासाठी धर्मानुसार एक एक लक्ष गायी ब्राह्मणांना दान केल्या. ॥ २२ ॥
सुवर्णशृङ्‍ग्यः संपन्नाः सवत्साः कांस्यदोहनाः ।
गवां शतसहस्राणि चत्वारि पुरुषर्षभः ॥ २३ ॥

वित्तमन्यच्च सुबहु द्विजेभ्यो रघुनन्दनः ।
ददौ गोदानमुद्दिश्य पुत्राणां पुत्रवत्सलः ॥ २४ ॥
त्या सर्वांची शिंगे सोन्याने मढविलेली होती. त्या सर्वांबरोबर वासरे आणि काशाचे दुग्धपात्रही होते. या प्रकारे पुत्रवत्सल रघुनन्दन पुरुषशिरोमणि राजा दशरथांनी चार लक्ष गायी दान दिल्या तथा आणखीही बरेचसे धन पुत्रांसाठी गोदानाच्या उद्देशाने ब्राह्मणांना दिले. ॥ २३-२४ ॥
स सुतैः कृतगोदानैर्वृतः सन्नृपतिस्तदा ।
लोकपालैरिवाभाति वृतः सौम्यः प्रजापतिः ॥ २५ ॥
गोदान कर्म संपन्न करून आलेल्या पुत्रांनी घेरलेले राजा दशरथ त्या समयी लोकपालांनी घेरून बसलेल्या शांतस्वभाव प्रजापति ब्रह्मदेवा सामान शोभून दिसत होते. ॥ २५ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे द्विसप्ततितमः सर्गः ॥ ७२ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा बाहात्तरावा सर्ग समाप्त झाला. ॥ ७२ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP