श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। सप्तसप्ततितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पुत्रैः स्नुषाभिश्च सह दशरथस्यायोध्ययां प्रवेशः, शत्रुघ्नसहितस्य भरतस्य मातुलगृहे गमनं, श्रीरामस्य सद्‌वृत्त्या समेषां संतोषः, श्रीसीतारामयोर्मिथः प्रेम्णो वर्णनम् - राजा दशरथांचा पुत्र आणि पुत्रवधुंसमवेत अयोध्येत प्रवेश, शत्रुघ्नासहित भरताचे मामाच्या घरी जाणे, श्रीरामांच्या वर्तनाने सर्वांना संतोष तथा सीता आणि राम यांचे पारस्परिक प्रेम -
गते रामे प्रशान्तात्मा रामो दाशरथिर्धनुः ।
वरुणायाप्रमेयाय ददौ हस्ते महायशाः ॥ १ ॥
जमदग्निकुमार परशुराम निघून गेल्यावर महायशस्वी दाशरथि रामांनी शांत चित्त होऊन अपार शक्तिशाली वरुणाच्या हातात ते धनुष्य दिले. ॥ १ ॥
अभिवाद्य ततो रामो वसिष्ठप्रमुखानृषीन् ।
पितरं विकलं दृष्ट्‍वा प्रोवाच रघुनन्दनः ॥ २ ॥
तत्पश्चात वसिष्ठ आदि ऋषिंना प्रणाम करून रघुनन्दन रामाने आपला पिता विकल झाला आहे असे पाहून त्यांस म्हटले - ॥ २ ॥
जामदग्न्यो गतो रामः प्रयातु चतुरङ्‌गिणी ।
अयोध्याभिमुखी सेना त्वया नाथेन पालिता ॥ ३ ॥
'पिताश्री ! जमदग्निकुमार परशुराम निघून गेले आहेत. आता आपल्या अधिनायकत्वाखाली सुरक्षित ही चतुरंगिणी सेना अयोध्येकडे प्रस्थान करील.' ॥ ३ ॥
रामस्य वचनं श्रुत्वा राजा दशरथः सुतम् ।
बाहुभ्यां सम्परिष्वज्य मूर्ध्न्युपाघ्राय राघवम् ॥ ४ ॥

गतो राम इति श्रुत्वा हृष्टः प्रमुदितो नृपः ।
पुनर्जातं तदा मेने पुत्रमात्मानमेव च ॥ ५ ॥
रामाचे हे वचन ऐकल्यावर राजा दशरथांनी आपला पुत्र राघव यांस दोन्ही हातांनी ओढून छातीशी लावले आणि त्यांचे मस्तक हुंगले. 'परशुराम निघून गेले' हे ऐकून राजा दशरथांना फार हर्ष झाला. ते आनन्दमग्न होऊन गेले. त्यासमयी त्यांनी आपला आणि आपल्या पुत्रांचा पुनर्जन्म झाला असे मानले. ॥ ४-५ ॥
चोदयामास तां सेनां जगामाशु ततः पुरीम् ।
पताकाध्वजिनीं रम्यां तूर्योद्‍घुष्टनिनादिताम् ॥ ६ ॥
त्यानंतर त्यांनी सेनेला नगराकडे कूच करण्याची आज्ञा दिली आणि तेथून निघून अत्यंत शीघ्रतेने ते सर्व अयोध्यापुरीत जाऊन पोहोंचले. तेव्हां त्या पुरीत सर्व बाजूस ध्वजा-पताका फडकत होत्या. सजावटीमुळे नगराची रमणीयता अधिकच वाढली होती आणि निरनिराळ्या वाद्यांच्या ध्वनिने सारी अयोध्या दुमदुमत होती. ॥ ६ ॥
सिक्तराजपथारम्यां प्रकीर्णकुसुमोत्कराम् ।
राजप्रवेशसुमुखैः पौरैर्मङ्‍गलपाणिभिः ॥ ७ ॥

संपूर्णां प्राविशद् राजा जनौघैः समलंकृताम् ।
पौरैः प्रत्युद्‍गतो दूरं द्विजैश्च पुरवासिभिः ॥ ८ ॥
रस्त्यांवर जलाचा शिडकावा केलेला होता, ज्याच्या योगाने पुरीची सुरम्य शोभा वाढली होती. जिकडे तिकडे ढीगभर फुले विखुरली गेली होती. पुरवासी लोक हातात मांगलिक वस्तु घेऊन राजाच्या प्रवेशमार्गावर प्रसन्नमुख होऊन उभे होते. या सर्वांनी गजबजलेली आणि भारी जनसमुदायाने अलंकृत झालेल्या अयोध्यापुरीत राजांनी प्रवेश केला. नागरिकांनी आणि पुरवासी ब्राह्मणांनी पुढे येऊन महाराजांचे स्वागत केले. ॥ ७-८ ॥
पुत्रैरनुगतः श्रीमाञ्श्रीमद्‌भिश्च महायशाः ।
प्रविवेश गृहं राजा हिमवत्सदृशं प्रियम् ॥ ९ ॥
आपल्या कान्तिमान् पुत्रांसह महायशस्वी श्रीमान् राजा दशरथांनी आपल्या हिमालयाप्रमाणे सुंदर आणि गगनचुंबी अशा प्रिय राजभवनात प्रवेश केला. ॥ ९ ॥
ननन्द स्वजनै राजा गृहे कामैः सुपूजितः ।
कौसल्या च सुमित्रा च कैकयी च सुमध्यमा ॥ १० ॥

वधूप्रतिग्रहे युक्ता याश्चान्या राजयोषितः ।
राजमहालात स्वजनांच्या द्वारे मनोवांच्छित वस्तुंनी परम पूजित होऊन राजा दशरथांनी महान आनन्दाचा अनुभव घेतला. महाराणी कौसल्या, सुमित्रा, सुंदर कटिप्रदेश असणारी कैकेयी, तथा ज्या अन्य राजपत्‍ना होत्या त्या सर्व वधूंना उतरवून घेण्याच्या कार्यात एकत्रित झाल्या. ॥ १० १/२ ॥
ततः सीतां महाभागामूर्मिलां च यशस्विनीम् ॥ ११ ॥

कुशध्वजसुते चोभे जगृहुर्नृपयोषितः ।
मङ्‍गलालापनैर्होमैः शोभिताः क्षौमवाससः ॥ १२ ॥
त्यानंतर राजपरीवाराच्या स्त्रियांनी परम सौभाग्यवती सीता, यशस्विनी ऊर्मिला, तथा कुश्ध्वजाच्या दोन्ही कन्या माण्डवी व श्रुतकीर्ति यांना वाहनांतून उतरविले आणि मंगल गीत गात गात सर्व भवनांत गेले. त्या प्रवेशकालिक होमकर्माने सुशोभित आणि रेशमी साड्यांनी अलंकृत होत्या. ॥ १२ ॥
देवतायतनान्याशु सर्वास्ताः प्रत्यपूजयन् ।
अभिवाद्याभिवाद्यांश्च सर्वा राजसुतास्तदा ॥ १३ ॥
सर्वांनी त्यांना देवमंदिरात घेऊन जाऊन सर्व राजकुमारींनी वंदनीय सासु सासरे आदिंच्या चरणी प्रणाम केला आणि आपापल्या पतिंबरोबर एकांतात राहून त्या सर्वच्या सर्व मोठ्या आनन्दाने समय व्यतीत करू लागल्या. ॥ १३ ॥
रेमिरे मुदिताः सर्वा भर्तृभिर्मुदिता रहः ।
कृतदाराः कृतास्त्राश्च सधनाः ससुहृज्जनाः ॥ १४ ॥

शुश्रूषमाणाः पितरं वर्तयन्ति नरर्षभाः ।
कस्यचित्त्वथ कालस्य राजा दशरथः सुतम् ॥ १५ ॥

भरतं कैकयीपुत्रमब्रवीद् रघुनन्दनः ।
श्रीराम आदि पुरुषश्रेष्ठ चारी भाऊ अस्त्रविद्येत निपुण आणि विवाहित होऊन धन आणि मित्रांसह राहात असतां पित्याची सेवा करू लागले. काही काळानंतर रघुकुनन्दन राजा दशरथांनी आपला पुत्र कैकेयीकुमार भरत यास म्हटले - ॥ १४-१५ १/२ ॥
अयं केकयराजस्य पुत्रो वसति पुत्रक ॥ १६ ॥

त्वां नेतुमागतो वीर युधाजिन्मातुलस्तव ।
'पुत्रा ! हे तुझे मामा कैकेय राजकुमार वीर युधाजित् तुला नेण्यासाठी आलेले आहेत, आणि त्यासाठी कित्येक दिवस थांबून आहेत. ॥ १६ १/२ ॥
श्रुत्वा दशरथस्यैतद् भरतः कैकयीसुतः ॥ १७ ॥

गमनायाभिचक्राम शत्रुघ्नसहितस्तदा ।
दशरथांचे बोलणे ऐकून कैकेयीकुमार भरतांनी त्या समयी शत्रुघ्नासह मामाच्या येथे जाण्याचा निश्चय केला. ॥ १७ १/२ ॥
आपृच्छ्य पितरं शूरो रामं चाक्लिष्टकारिणम् ॥ १८ ॥

मातॄश्चापि नरश्रेष्ठः शत्रुघ्नसहितो ययौ ।
ते नरश्रेष्ठ शूरवीर भरत आपले पिता राजा दशरथ, अनायास महान् कर्म करणारे राम, तथा सर्व मातांना विचारून, त्यांची आज्ञा घेऊन शत्रुघ्नासहित तेथून निघाले. ॥ १८ १/२ ॥
युधाजित् प्राप्य भरतं सशत्रुघ्नं प्रहर्षितः ॥ १९ ॥

स्वपुरं प्राविशद् वीरः पिता तस्य तुतोष ह ।
शत्रुघ्नासहित भरताबरोबर वीर युधाजितांनी मोठ्या हर्षाने आपल्या नगरात प्रवेश केला. यामुळे त्यांच्या पित्यास फार संतोष झाला. ॥ १९ १/२ ॥
गते च भरते रामो लक्ष्मणश्च महाबलः ॥ २० ॥

पितरं देवसंकाशं पूजयामासतुस्तदा ।
भरत निघून गेल्यावर महाबली राम आणि लक्ष्मण त्या काळात आपल्या देवोपम पित्याच्या सेवेत तत्पर राहू लागले. ॥ २० १/२ ॥
पितुराज्ञां पुरस्कृत्य पौरकार्याणि सर्वशः ॥ २१ ॥

चकार रामः सर्वाणि प्रियाणि च हितानि च ।
पित्याची आज्ञा शिरोधार्य करून ते नगरवासी लोकांचे सर्व कामकाज पाहू लगले. तसेच त्यांची समस्त प्रिय आणि हितकर कार्ये करू लागले. ॥ २१ १/२ ॥
मातृभ्यो मातृकार्याणि कृत्वा परमयन्त्रितः ॥ २२ ॥

गुरूणां गुरुकार्याणि काले कालेऽन्ववैक्षत ।
ते स्वतःला अत्यंत संयमित ठेवत होते आणि वेळोवेळी मातांसाठी त्यांची आवश्यक कार्ये पूर्ण करून गुरुजनांच्या भारीहून भारी कार्यांनाही सिद्ध करण्याकडे लक्ष देत होते. ॥ २२ १/२ ॥
एवं दशरथः प्रीतो ब्राह्मणा नैगमास्तदा ॥ २३ ॥

रामस्य शीलवृत्तेन सर्वे विषयवासिनः ।
यांच्या या वर्तनाने राजा दशरथ, वेदवेत्ते ब्राह्मण तथा वैश्यवर्ण फार प्रसन्न होत होते. श्रीरामांचे उत्तम शील आणि सद्‌व्यवहारामुळे त्या राज्यात निवास करणारी सर्व प्रजा संतुष्ट होत असे. ॥ २३ १/२ ॥
तेषामतियशा लोके रामः सत्यपराक्रमः ॥ २४ ॥

स्वयंभूरिव भूतानां बभूव गुणवत्तरः ।
राजाच्या चारी पुत्रांत सत्यपराक्रमी रामच लोकात अत्यंत यशस्वी आणि महान् गुणवान् झाले. ज्याप्रमाणे समस्त भूतांमध्ये स्वयंभू ब्रह्मदेवच जसे अत्यन्त यशस्वी आणि महान् गुणवान आहेत अगदी ठीक त्याप्रमाणेच. ॥ २४ १/२ ॥
रामश्च सीतया सार्धं विजहार बहूनृतून् ॥ २५ ॥

मनस्वी तद्‍गतमनास्तस्या हृदि समर्पितः ।
राम सदा सीतेच्या हृदयमंदिरात विराजमान राहात असत. तसेच मनस्वी रामांचे मनही सीतेमध्ये लागून राहात असे. श्रीरामांनी सीतेसह अनेक ऋतुपर्यंत विहार केला. ॥ २५ १/२ ॥
प्रिया तु सीता रामस्य दाराः पितृकृता इति ॥ २६ ॥

गुणाद्‌रूपगुणाच्चापि प्रीतिर्भूयोऽभिवर्धते ।
तस्याश्च भर्ता द्विगुणं हृदये परिवर्तते ॥ २७ ॥
सीता रामाला अत्यंत प्रिय होती. कारण ती आपला पिता राजा जनक याच्याद्वारा श्रीरामाच्या हाती पत्‍नीरूपाने समर्पित केली गेली होती. सीतेचे पातिव्रत्य आदि गुणांनी तथा तिच्या सौंदर्य गुणांनीही श्रीरामाचे तिच्यावरील प्रेम अधिकाधिक वाढत चालले होते. त्याचप्रमाणे सीतेच्या हृदयांतही आपले पति श्रीराम आपल्या गुण आणि सौंदर्याच्या कारणाने द्विगुण प्रीतिपात्र बनून राहिले होते. ॥ २६-२७ ॥
अन्तर्गतमपि व्यक्तमाख्याति हृदयं हृदा ।
तस्य भूयो विशेषेण मैथिली जनकात्मजा ।
देवताभिः समा रूपे सीता श्रीरिव रूपिणी ॥ २८ ॥
जनकनन्दिनी मिथिलेशकुमारी सीता श्रीरामांच्या हार्दिक अभिप्रायांनाही आपल्या हृदयापासूनच, एवढे नव्हे तर अधिकच जाणून घेत होती तथा स्पष्ट रूपाने सांगतही होती. ती रूपाने देवांगनांच्या समान होती आणि मूर्तिमंत लक्ष्मीसारखीच प्रतीत होत होती. ॥ २८ ॥
तया स राजर्षिसुतोऽभिकामया
     समेयिवानुत्तमराजकन्यया ।
अतीव रामः शुशुभे मुदान्वितो
     विभुः श्रिया विष्णुरिवामरेश्वरः ॥ २९ ॥
श्रेष्ठ राजकुमारी सीता श्रीरामाचीच कामना ठेवीत होती आणि श्रीरामही एकमात्र तिलाच इच्छित होते. ज्याप्रमाणे लक्ष्मीबरोबर देवेश्वर भगवान् विष्णुंची शोभा होते त्याच प्रकारे त्या सीतादेवी बरोबर राजर्षि दशरथकुमार श्रीराम परम प्रसन्न राहून अत्यंत शोभा प्राप्त् करू लागले. ॥ २९ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे श्रीमद्वाल्मीकीये आदिकाव्ये बालकाण्डे सप्तसप्ततितमः सर्गः ॥ ७७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सत्त्याहत्तरावा सर्ग समाप्त झाला. ॥ ७७ ॥
॥ इति बालकाण्डः समाप्तः ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP