श्रीरामस्याज्ञया विभीषणेन सीतायास्तत्समीप आनयनं सीताकर्तृकं प्रियतममुखचन्द्रस्य दर्शनं च -   
 |                    
 
श्रीरामांच्या आज्ञेने विभीषणाने सीतेला त्यांच्या समीप आणणे आणि सीतेने प्रियतमाच्या मुखचंद्राचे दर्शन करणे - 
 | 
तं उवाच महाप्राज्ञः सोऽभिवाद्य प्लवङ्गमः ।  रामं कमलपत्राक्षं वरं सर्वधनुष्मताम् ।। १ ।।  
 |                    
 
त्यानंतर परम बुद्धिमान् वानरवीर हनुमानांनी संपूर्ण धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ कमलनयन श्रीरामांना प्रणाम करून म्हटले - ॥१॥
 | 
यन्निमित्तोऽयमारम्भः कर्मणां यः फलोदयः ।  तां देवीं शोकसन्तप्तां द्रष्टुमर्हसि मैथिलीं ।। २ ।।  
 |                    
 
भगवन् ! ज्यांच्यासाठी या युद्ध आदि कर्मांचा सारा उद्योग आरंभ केला गेला होता, त्या शोकसंतप्त मैथिली सीतादेवींना आपण दर्शन द्यावे. ॥२॥
 | 
सा हि शोकसमाविष्टा बाष्पपर्याकुलेक्षणा ।  मैथिली विजयं श्रुत्वा द्रष्टुं त्वामभिकाङ्क्षति ।। ३ ।।  
 |                    
 
त्या शोकात बुडून राहिलेल्या आहेत. त्यांच्या नेत्रात अश्रु दाटून आले आहेत. आपल्या विजयाचा समाचार ऐकून त्या मैथिली आपले दर्शन करू इच्छित आहेत. ॥३॥
 | 
पूर्वकात् प्रत्ययाच्चाहं उक्तो विश्वस्तया तया ।  द्रष्टुमिच्छामि भर्तारं इति पर्याकुलेक्षणा ।। ४ ।।  
 |                    
 
पहिल्या वेळी जेव्हा आपला संदेश घेऊन आलो होतो तेव्हा पासूनच त्यांना माझ्याबद्दल विश्वास उत्पन्न झाला आहे, की हा माझ्या स्वामींचा आत्मीय जन आहे. त्याच विश्वासाने युक्त होऊन त्यांनी डोळ्यात अश्रू आणून मला सांगितले आहे की मी प्राणनाथांचे दर्शन करू इच्छिते. ॥४॥
 | 
एवमुक्तो हनुमता रामो धर्मभृतां वरः ।  अगच्छत् सहसा ध्यानं ईषद् बाष्पपरिप्लुतः ।। ५ ।। 
  स दीर्घं अभिनिःश्वस्य जगतीं अवलोकयन् ।  उवाच मेघसङ्काशं विभीषणमुपस्थितम् ।। ६ ।।  
 |                    
 
हनुमानांनी असे म्हटल्यावर धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ श्रीरामचंद्र एकाएकी ध्यानस्थ झाले. त्यांचे डोळे अश्रुनी डबडबले आणि ते दीर्घ श्वास घेऊन जमिनीकडे पहात जवळ उभे असलेल्या मेघासमान शाम कान्तिच्या विभीषणांना म्हणाले- ॥५-६॥
 | 
दिव्याङ्गरागां वैदेहीं दिव्याभरणभूषिताम् ।  इह सीतां शिरस्स्नातां उपस्थापय मा चिरम् ।। ७ ।।  
 |                    
 
तुम्ही वैदेही सीतेला डोक्यावरून स्नान करवून दिव्य अङ्गराग तसेच दिव्य आभूषणांनी विभूषित करून शीघ्र माझ्यापाशी घेऊन या. ॥७॥
 | 
एवमुक्तस्तु रामेण त्वरमाणो विभीषणः ।  प्रविश्यान्तःपुरं सीतां स्त्रीभिः स्वाभिरचोदयत् ।। ८ ।।  
 |                    
 
श्रीरामांनी असे सांगितल्यावर विभीषण मोठ्या उतावळेपणाने आंतःपुरात गेले आणि प्रथम आपल्या स्त्रियांना धाडून त्यांनी सीतेला आपल्या येण्याची सूचना दिली. ॥८॥
 | 
ततः सीतां महाभागां दृष्ट्वोवाच विभीषणः ।  मूर्ध्नि बद्धाञलिः श्रीमान् विनीतो राक्षसेश्वरः ॥ ९ ॥  
 |                    
 
यानंतर श्रीमान् राक्षसराज विभीषणांनी स्वतःच जाऊन महाभाग सीतेचे दर्शन केले आणि मस्तकावर अंजलि जोडून विनीतभावाने म्हटले - ॥९॥
 | 
दिव्याङ्गरागा वैदेहि दिव्याभरणभूषिता ।  यानमारोह भद्रं ते भर्ता त्वां द्रष्टुमिच्छति ।। १० ।।  
 |                    
 
वैदेही ! आपण स्नान करून दिव्य अङ्गराग तसेच दिव्य वस्त्राभूषणांनी भूषित होऊन वाहनात बसावे. आपले कल्याण होवो. आपले स्वामी आपल्याला पाहू इच्छितात. ॥१०॥
 | 
एवमुक्ता तु वेदेही प्रत्युवाच विभीषणम् ।  अस्नात्वा द्रष्टुमिच्छामि भर्तारं राक्षसेश्वर ।। ११ ।।  
 |                    
 
त्यांनी असे म्हटल्यावर वैदेहीने विभीषणास उत्तर दिले - राक्षसराज ! मी स्नान न करतांच आत्ता पतिदेवांचे दर्शन करू इच्छिते. ॥११॥
 | 
तस्यास्तद् वचनं श्रुत्वा प्रत्युवाच विभीषणः ।  यदाह रामो भर्ता ते तत् तथा कर्तुमर्हसि ।। १२ ।।  
 |                    
 
सीतेचे हे वचन ऐकून विभीषण म्हणाले - देवी ! आपले पतिदेव श्रीरामांनी जशी आज्ञा दिली आहे, आपल्याला तसेच केले पाहिजे. ॥१२॥
 | 
तस्य तद् वचनं श्रुत्वा मैथिली पतिदेवता ।  भर्तृभक्त्यावृता साध्वी तथेति प्रत्यभाषत ।। १३ ।।  
 |                    
 
त्यांचे हे वचन ऐकून पतिभक्तिने सुरक्षित तसेच पतिलाच देवता मानणार्या सती-साध्वी मैथिली सीतेने फार चांगले असे म्हणून स्वामींची आज्ञा शिरोधार्य केली. ॥१३॥
 | 
ततः सीतां शिरस्स्नातां संयुक्तां प्रतिकर्मणां ।  महार्हाभरणोपेतां महार्हाम्बरधारिणीम् ।। १४ ।।  
 |                    
 
त्यानंतर वैदेहीने डोक्यावरून स्नान करून सुंदर शृंगार केला तसेच बहुमूल्य वस्त्रे आणि आभूषणे घालून ती जावयास तयार झाली. ॥१४॥
 | 
आरोप्य शिबिकां दीप्तां परार्ध्याम्बरसंवृताम् ।  रक्षोभिर्बहुभिर्गुप्तां आजहार विभीषणः ।। १५ ।।  
 |                    
 
तेव्हा विभीषणांनी बहुमूल्य वस्त्रांनी आवृत्त दीप्तिमती सीतादेवीला शिबिकेत बसवून भगवान् श्रीरामांच्या जवळ घेऊन आले. त्यासमयी बरेचसे निशाचरही चहू बाजूनी घेरून तिचे रक्षण करीत होते. ॥१५॥
 | 
सोऽभिगम्य महात्मानं ज्ञात्वापि ध्यानमास्थितम् ।  प्रणतश्च प्रहृष्टश्च प्राप्तं सीतां न्यवेदयत् ।। १६ ।।  
 |                    
 
भगवान् श्रीराम ध्यानस्थ आहेत हे जाणूनही विभीषण त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना प्रणाम करून प्रसन्नतापूर्वक म्हणाले - प्रभो ! सीतादेवी आली आहे. ॥१६॥
 | 
तां आगतामुपश्रुत्य रक्षोगृहचिरोषिताम् ।  रोषं हर्षं च दैन्यं च राघवः प्राप शत्रुहा ।। १७ ।।  
 |                    
 
राक्षसांच्या घरात बरेच दिवस निवास केल्यानंतर आज सीता आली आहे, हा विचार करून आगमनाचा समाचार ऐकून शत्रुसूदन राघवांना एकाच समयी रोष, हर्ष आणि दुःख प्राप्त झाले. ॥१७॥
 | 
ततो यानगतां सीतां सविमर्शं विचारयन् ।  विभीषणमिदं वाक्यं अमहृष्तो राघवोऽब्रवीत् ।। १८ ।।  
 |                    
 
त्यानंतर सीता वाहनांतून आली आहे या गोष्टीवर तर्क-वितर्क पूर्ण विचार करून राघवांना प्रसन्नता वाटली नाही. ते विभीषणाला याप्रकारे बोलले - ॥१८॥
 | 
राक्षसाधिपते सौम्य नित्यं मद्विजये रत ।  वैदेही सन्निकर्षं मे क्षिप्रं समभिगच्छतु ।। १९ ।।  
 |                    
 
सदा माझ्या विजयासाठी तत्पर राहाणार्या सौम्य राक्षसराजा ! तुम्ही वैदेहीला सांगा की त्यांनी शीघ्र माझ्या जवळ यावे. ॥१९॥
 | 
स तद् वचनं श्रुत्वा राघवस्य विभीषणः ।  तूर्णमुत्सारणे तत्र कारयामास धर्मवित् ।। २० ।।  
 |                    
 
श्रीराघवांचे हे वचन ऐकून धर्मज्ञ विभीषणांनी तात्काळ दुसर्या लोकांना हटविण्यास प्रारंभ केला. ॥२०॥
 | 
कञ्चुकोष्णीषिणस्तत्र वेत्रझर्झरपाणयः ।  उत्सारयन्तस्तान् योधान् समन्तात् परिचक्रमुः ।। २१ ।।  
 |                    
 
पगडी बांधलेले आणि अंगरखा घातलेले बरेचसे शिपाई हातात झांजेप्रमाणे वाजणारी छडी घेऊन त्या वानर योद्ध्यांना हटवीत चोहोबाजूस फिरू लागले. ॥२१॥
 | 
ऋक्षाणां वानराणां च राक्षसानां च सर्वशः ।  वृन्दान्युत्सार्यमाणानि दूरमुत्तस्थुरन्ततः ।। २२ ।।  
 |                    
 
त्यांच्या द्वारा हटविले गेलेली अस्वले, वानर आणि राक्षसांचे समुदाय आंततोगत्वा दूर जाऊन उभे राहिले. ॥२२॥
 | 
तेषामुत्सार्यमाणानां निःस्वनः सुमहानभूत् ।  वायुनोद्ऽऽधूयमानस्य सागरस्येव निःस्वनः ।। २३ ।।  
 |                    
 
ज्याप्रमाणे वायुच्या थप्पडा खाऊन उद्वेलित झालेल्या समुद्राची गर्जना वाढत जाते त्याप्रमाणे तेथून हटविले गेलेल्या त्या वानर आदिंच्या हटण्यामुळे तेथे फार मोठा कोलाहल माजला. ॥२३॥
 | 
उत्सार्यमाणांस्तान् दृष्ट्वा समन्तात् जातसम्भ्रमान् ।  दाक्षिण्यात्तदमर्षाच्च वारयामास राघवः ।। २४ ।।  
 |                    
 
ज्यांना हटविले जात होते, त्यांच्या मनात फार मोठा उद्वेग उत्पन्न होत होता. सर्वत्र हा उद्वेग पाहून राघवांनी आपल्या सहज उदारतेमुळे त्या हटविणारांना रोषपूर्वक रोखले. ॥२४॥
 | 
संरम्भाश्चाब्रवीद् रामः चक्षुषा प्रदहन्निव ।  विभीषणं महाप्राज्ञं सोपालम्भमिदं वचः ।। २५ ।।  
 |                    
 
त्यासमयी श्रीरामांनी त्या हटविणार्या शिपायांच्याकडे याप्रकारे रोषपूर्ण दृष्टिने पाहिले जणु त्यांना जाळून भस्म करून टाकतील. त्यांनी परम बुद्धिमान् विभीषणाला ठपका देत क्रोधपूर्वक म्हटले - ॥२५॥
 | 
किमर्थं मामनादृत्य क्लिश्यतेऽयं त्वया जनः ।  निवर्तयैनमुद्वेगं जनोऽयं स्वजनो मम ।। २६ ।।  
 |                    
 
तुम्ही कशासाठी माझा अनादर करून या सर्व लोकांना कष्ट देत आहात. या उद्वेगजनक कार्याला थांबवा. येथे जितके म्हणून लोक आहेत ते सर्व माझे आत्मीयजन आहेत. ॥२६॥
 | 
न गृहाणि न वस्त्राणि न प्राकारास्तिरस्क्रियाः ।  नेदृशा राजसत्कारा वृत्तमावरणं स्त्रियाः ।। २७ ।।  
 |                    
 
घर, वस्त्र (कनात आदि) आणि प्राकारादि वस्तु स्त्री साठी पडदा होऊ शकत नाहीत. याप्रकारे लोकांना हटविण्याचे जो निष्ठुरतापूर्ण व्यवहार आहेत ते ही स्त्रीसाठी आवरण अथवा पडद्याचे काम करीत नाहीत. पतिकडून प्राप्त होणारा सत्कार तसेच नारीचा स्वतःचा सदाचार हीच तिच्यासाठी आवरणे आहेत. ॥२७॥
 | 
व्यसनेषु न कृच्छ्रेषु न युद्धेषु स्वयंवरे ।  न क्रुतौ न विवाहे च दर्शनं दूष्यते स्त्रियाः ।। २८ ।।  
 |                    
 
विपत्तिकाळात, शारिरीक अथवा मानसिक पीडेच्या समयी, युद्धात, स्वयंवरात, यज्ञात अथवा विवाहात स्त्रीचे दर्शन (अथवा दुसर्यांच्या दृष्टीस पडणे) दोषास्पद नाही आहे. ॥२८॥
 | 
सैषा युद्धगता चैव कृच्छ्रेण च समनिवता ।  दर्शने नास्ति दोषोऽस्या मत्समीपे विशेषतः ।। २९ ।।  
 |                    
 
ही सीता यावेळी विपत्तित आहे. मानसिक कष्टानेही युक्त आहे आणि विशेषतः माझ्या जवळ आहे, म्हणून हिचे पडद्याशिवाय सर्वांच्या समोर येणे दोषास्पद गोष्ट नाही. ॥२९॥
 | 
विसृज्य शिबिकां तस्मात् पद्भ्यामेवापसर्पतु ।  समीपे मम वैदेहीं पश्यन्त्वेते वनौकसः ।। ३० ।।  
 |                    
 
म्हणून जानकी शिबिका सोडून पायीच माझ्या जवळ येऊ दे आणि हे सर्व वानर तिचे दर्शन करू देत. ॥३०॥
 | 
एवमुक्तस्तु रामेण सविमर्शो विभीषणः ।  रामस्योपानयत् सीतां सन्निकर्षं विनीतवत् ।। ३१ ।।  
 |                    
 
श्रीरामांनी असे म्हटल्यावर विभीषण फार मोठ्या विचारात पडले. आणि विनीतभावाने सीतेला त्यांच्याजवळ घेऊन आले. ॥३१॥
 | 
ततो लक्ष्मणसुग्रीवौ हनुमांश्च प्लवङ्गमः ।  निशम्य वाक्यं रामस्य बभूवुर्व्यथिता भृशम् ।। ३२ ।।  
 |                    
 
त्यासमयी श्रीरामांचे पूर्वोक्त वचन ऐकून लक्ष्मण, सुग्रीव तसेच कपिवर हनुमान् तिघेही अत्यंत व्यथित झाले. ॥३२॥
 | 
कलत्रनिरपेक्षैश्च इङ्गितैरस्य दारुणैः ।  अप्रीतमिव सीतायां तर्कयन्ति स्म राघवम् ।। ३३ ।।  
 |                    
 
श्रीरामांच्या भयंकर क्रिया हे सूचित करीत होत्या की ते पत्नीच्या विषयी निरपेक्ष झाले होते. म्हणून त्या तिघांनी हे अनुमान केले की राघव सीतेवर अप्रसन्न असल्यासारखे वाटत आहेत. ॥३३॥
 | 
लज्जया त्ववलीयन्ती स्वेषु गात्रेषु मैथिली ।  विभीषणेनानुगता भर्तारं साभ्यवर्तत ।। ३४ ।।  
 |                    
 
पुढे पुढे सीता होती आणि पाठीमागे विभीषण. ती लज्जेमुळे आपल्या अंगाना चोरून घेत घेत जात होती. याप्रकारे ती आपल्या पतिदेवासमोर उपस्थित झाली. ॥३४॥
 | 
विस्मयाच्च प्रहर्षाच्च स्नेहाच्च पतिदेवता ।  उदैक्षत मुखं भर्तुः सौम्यं सोम्यतरानना ।। ३५ ।।  
 |                    
 
सीतेचे मुख अत्यंत सौम्यभावाने युक्त होते. ती पतिलाच दैवत मानणारी होती. तिने विस्मयाने, हर्षाने आणि स्नेहसहित आपल्या स्वामींच्या सौम्य (मनोहर) मुखाचे दर्शन घेतले. ॥३५॥
 | 
अथ समपनुदन्मनःक्लमं सा   सुचिरमदृष्टमुदीक्ष्य वै प्रियस्य ।  वदनमुदितपूर्णचन्द्रकान्तं   विमलशशाङ्कनिभानना तदाऽऽसीत् ।। ३६ ।।  
 |                    
 
उदयकालीन पूर्णचंद्रम्यालाही लज्जित करणार्या प्रियतमाच्या सुंदर मुखाला, ज्याच्या दर्शनापासून ती फार दिवस वंचित होती, सीतेने जीव भरून न्याहाळले आणि आपल्या मनाची पीडा दूर केली. त्यासमयी तिचे मुख प्रसन्नतेने प्रफुल्ल झाले होते आणि निर्मल चंद्रम्याप्रमाणे शोभा प्राप्त करू लागले होते. ॥३६॥
 | 
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुर्दशाधिकशततमः सर्गः ।। ११४ ।।  
 |                    
 
श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेचौदावा सर्ग पूरा झाला. ॥११४॥
 |