श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ द्वात्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अर्जुनस्य भुजाभिः नर्मदायाः प्रवाहस्य अवरोधो रावणसंचितपुष्पोपहारस्य जले वहनं, रावणादि निशाचरैः सह अर्जुनस्य युद्धं, रावणं निर्गृह्य अर्जुनस्य स्वनगरे
प्रस्थानम् -
अर्जुनाच्या भुजांनी नर्मदेचा प्रवाह अवरूद्ध होणे, रावणाचा पुष्पोपहार वाहून जाणे, नंतर रावण आदि निशाचरांचे अर्जुनाबरोबर युद्ध तसेच अर्जुनाचे रावणास कैद करून आपल्या नगरांत घेऊन जाणे -
नर्मदापुलिने यत्र राक्षसेन्द्रः स दारुणः ।
पुष्पोपहारं कुरुते तस्माद् देशाददूरतः ॥ १ ॥

अर्जुनो जयतां श्रेष्ठो माहिष्मत्याः पतिः प्रभुः ।
क्रीडते सह नारीभिः नर्नर्मदातोयमाश्रितः ॥ २ ॥
नर्मदेच्या तटावर जेथे क्रूर राक्षसराजा रावण महादेवांना फुलांचा उपहार अर्पण करत होता, त्या स्थानापासून थोड्‍या अंतरावर विजयी वीरांमध्ये श्रेष्ठ महिष्मतीपुरीचा शक्तिशाली राजा अर्जुन आपल्या स्त्रियांसह नर्मदेच्या जलात उतरून क्रीडा करत होता. ॥१-२॥
तासां मध्यगतो राजा रराज च तदार्जुनः ।
करेणूनां सहस्रस्य मध्यस्थ इव कुञ्जरः ॥ ३ ॥
त्या सुंदर स्त्रियांमध्ये विराजमान झालेला राजा अर्जुन हजारो हत्तीणींच्या मध्यभागी स्थित असलेल्या गजराजासमान शोभत होता. ॥३॥
जिज्ञासुः स तु बाहूनां सहस्रस्योत्तमं बलम् ।
रुरोध नर्मदावेगं बाहुभिः बहुभिर्वृतः ॥ ४ ॥
अर्जुनाला हजार हात होते. त्यांच्या उत्तम बळाचा अंदाज घेण्यासाठी त्याने त्या बहुसंख्य बाहुंच्या द्वारा नर्मदेचा वेग (प्रवाह) अडवून धरला. ॥४॥
कार्तवीर्यभुजासक्तं तज्जलं प्राप्य निर्मलम् ।
कूलोपहारं कुर्वाणं प्रतिस्रोतः प्रधावति ॥ ५ ॥
कृतवीर्य पुत्र अर्जुनाच्या भुजांच्या द्वारे अडविले गेलेले नर्मदेचे निर्मळ जल तटावर पूजा करत असलेल्या रावणापर्यंत पोहोचले आणि त्याच दिशेने उलट्‍या गतिने वाहू लागले. ॥५॥
समीननक्रमकरः सपुष्पकुशसंस्तरः ।
स नर्मदाम्भसो वेगः प्रावृट्काल इवाबभौ ॥ ६ ॥
नर्मदेच्या जलाचा तो वेग मत्स्य, नक्र, मगरी, फुले आणि कुशास्तरणासह वाढू लागला. त्यामध्ये वर्षाकाळासमान पूर आला. ॥६॥
स वेगः कार्तवीर्येण सम्प्रेषित इवाम्भसः ।
पुष्पोपहारं सकलं रावणस्य जहार ह ॥ ७ ॥
जलाचा तो वेग जणु काही कार्तवीर्य अर्जुनानेच धाडला होता, रावणाच्या समस्त पुष्पोपहाराला वाहून घेऊन गेला. ॥७॥
रावणोऽर्धसमाप्तं तं उत्सृज्य नियमं तदा ।
नर्मदां पश्यते कान्तां प्रतिकूलां यथा प्रियाम् ॥ ८ ॥
रावणाचा तो पूजना-संबंधी नियम आत्तापर्यंत अर्धाच पूरा झाला होता, याच दशेमध्ये ती पूजा सोडून तो प्रतिकूल झालेल्या कमनीय कान्तिमान्‌ प्रेयसीप्रमाणे नर्मदेकडे पाहू लागला. ॥८॥
पश्चिमेन तु तं दृष्ट्‍वा सागरोद्‌गारसंनिभम् ।
वर्धन्तमम्भसो वेगं पूर्वामाशां प्रविश्य तु ॥ ९ ॥
पश्चिमेकडून आलेल्या आणि पूर्व दिशेमध्ये प्रवेश करून वाढणार्‍या जलाचा तो वेग त्याने पाहिला, असे वाटत होते की जणु समुद्रामध्ये भरती आली आहे. ॥९॥
ततोऽनुद्‌भ्रान्तशकुनां स्वभावे परमे स्थिताम् ।
निर्विकाराङ्‌गनाभासां अपश्यद् रावणो नदीम् ॥ १० ॥
तिच्या तटवर्ती वृक्षांवर राहाणार्‍या पक्ष्यांमध्ये काही भीती (दिसत) नव्हती. ती नदी आपल्या परम उत्तम स्वाभाविक स्थितिमध्ये स्थित होती. तिचे जल पूर्वीसारखेच स्वच्छ आणि निर्मल दिसून येत होते. तिच्यामध्ये वर्षाकालीन पूर येत असता जे मलिनता आदि विकार उत्पन्न होतात त्यांचा त्या समयी सर्वथा अभाव होता. रावणाने त्या नदीला विकारशून्य हृदयाच्या नारीप्रमाणे पाहिले. ॥१०॥
सव्येतरकराङ्‌गुल्या ह्यसब्दास्यो दशाननः ।
वेगप्रभावमन्वेष्टुं सोऽदिशच्छुकसारणौ ॥ ११ ॥
त्याच्या मुखांतून एक शब्दही निघाला नाही. त्याने मौनव्रताचे रक्षण करण्यासाठी न बोलताच उजव्या हाताच्या बोटाने संकेतमात्र करून पूराच्या कारणाचा शोध घेण्यासाठी शुक आणि सारणाला आदेश दिला. ॥११॥
तौ तु रावणसन्दिष्टौ भ्रातरौ शुकसारणौ ।
व्योमान्तरगतौ वीरौ प्रस्थितौ पश्चिमामुखौ ॥ १२ ॥
रावणाचा आदेश मिळताच दोन्ही वीर भ्राते शुक आणि सारण आकाशमार्गाने पश्चिम दिशेकडे प्रस्थित झाले. ॥१२॥
अर्धयोजनमात्रं तु गत्वा तौ रजनीचरौ ।
पश्येतां पुरुषं तोये क्रीडन्तं सहयोषितम् ॥ १३ ॥
केवळ अर्ध्या योजनावरच त्या दोघां निशाचरांनी एका पुरूषाला स्त्रियांसह जलामध्ये क्रीडा करतांना पाहिले. ॥१३॥
बृहत्सालप्रतीकाशं तोयव्याकुलमूर्धजम् ।
मदरक्तान्तनयनं मदव्याकुलतेजसम् ॥ १४ ॥
त्याचे शरीर विशाल सालवृक्षाप्रमाणे उंच होते. त्याचे केस जलाने ओतप्रोत होत होते. नेत्रप्रान्तामध्ये मदाची लाली दिसून येत होती आणि चित्तही मदाने व्याकुळ असल्यासारखे भासत होते. ॥१४॥
नदीं बाहुसहस्रेण रुन्धन्तं अरिमर्दनम् ।
गिरिं पादसहस्रेण रुन्धन्तमिव मेदिनीम् ॥ १५ ॥
तो शत्रुदमन वीर आपल्या सहस्त्र भुजांनी नदीच्या वेगाला अडवून हजारो चरणांनी पृथ्वीला रूद्ध करणार्‍या पर्वताप्रमाणे शोभून दिसत होता. ॥१५॥
बालानां वरनारीणां सहस्रेण समावृतम् ।
समदानां करेणूनां सहस्रेणेव कुञ्जरम् ॥ १६ ॥
तरूण वयाच्या हजारो तरूणी त्याला घेरून उभ्या असता असे वाटत होते की जणु हजारो मदमत्त हत्तीणीनी कुणा गजराजाला घेरले आहे. ॥१६॥
तमद्‌भुततमं दृष्ट्‍वा राक्षसौ शुकसारणौ ।
संनिवृत्तावुपागम्य रावणं तमथोचतुः ॥ १७ ॥
ते परम अद्‍भुत दृश्य पाहून राक्षस शुक आणि सारण परत आले आणि रावणाजवळ जाऊन म्हणाले - ॥१७॥
बृहत्सालप्रतीकाशः कोऽप्यसौ राक्षसेश्वर ।
नर्मदां रोधवद् रुद्ध्वा क्रीडापयति योषितः ॥ १८ ॥
राक्षसराज ! येथून थोड्‍या दूर अंतरावर कुणी सालवृक्षाप्रमाणे विशालकाय पुरुष आहे जो बांधाप्रमाणे नर्मदेचे जल अडवून स्त्रियांसह क्रीडा करीत आहे. ॥१८॥
तेन बाहुसहस्रेण संनिरुद्धजला नदी ।
सागरोद्‌गारसंकाशानुद्‌गारान्सृजते मुहुः ॥ १९ ॥
त्याच्या सहस्त्र भुजांच्यामुळे नदीचे पाणी अडविले गेले आहे. म्हणून ही वारंवार समुद्राच्या भरतीप्रमाणे जलाच्या उद्गाराची सृष्टि होत आहे. ॥१९॥
इत्येवं भाषमाणौ तौ निशाम्य शुकसारणौ ।
रावणोऽर्जुन इत्युक्त्वा स ययौ युद्धलालसः ॥ २० ॥
याप्रकारे सांगणार्‍या शुक आणि सारणचे भाषण ऐकून रावण म्हणाला - तोच अर्जुन आहे असे म्हणून तो युद्धाच्या लालसेने त्याच्याकडेच निघाला. ॥२०॥
अर्जुनाभिमुखे तस्मिन् रावणे राक्षसाधिपे ।
चण्डः प्रवाति पवनः सनादः सुरजास्तथा ॥ २१ ॥
राक्षसराज रावण जेव्हा अर्जुनाकडे निघाला, तेव्हा धूळ आणि भारी कोलाहलासह वारा प्रचण्ड वेगाने वाहू लागला. ॥२१॥
सकृदेव कृतो रावः सरक्तः प्रेषितो घनैः ।
महोदरमहापार्श्व धूम्राक्षशुकसारणैः ॥ २२ ॥

संवृतो राक्षसेन्द्रस्तु तत्रागाद् यत्र चार्जुनः ।
ढगांनी रक्तबिंदुंची वृष्टि करून एकच वेळ मोठ्‍या जोराने गर्जना केली. इकडे राक्षसराज रावण महोदर, महापार्श्व, धूम्राक्ष, शुक आणि सारण यांना बरोबर घेऊन जेथे अर्जुन क्रीडा करत होता त्या स्थानाकडे निघाला. ॥२२ १/२॥
अदीर्घेणैव कालेन स तदा राक्षसो बली ॥ २३ ॥

तं नर्मदाह्रदं भीमं आजगामाञ्जनप्रभः ।
काजळासारखा अथवा कोळशासारखा काळा तो बलवान्‌ राक्षस थोड्‍याच वेळात नर्मदेच्या त्या भयंकर जलाशयाजवळ जाऊन पोहोचला. ॥२३ १/२॥
स तत्र स्त्रीपरिवृतं वाशिताभिरिव द्विपम् ॥ २४ ॥

नरेन्द्रं पश्यते राजा राक्षसानां तदार्जुनम् ।
तेथे पोहोचून राक्षसांचा राजा रावण याने मैथुनाची इच्छा असणार्‍या हत्तिणींनी घेरलेल्या गजराजासमान सुंदर स्त्रियांनी परिवेष्टित महाराज अर्जुनाला पाहिले. ॥२४ १/२॥
स रोषाद् रक्तनयनो राक्षसेन्द्रो बलोद्धतः ॥ २५ ॥

इत्येवमर्जुनामात्यान् आह गम्भीरया गिरा ।
त्याला पाहाताच रावणाचे नेत्र रोषाने लाल झाले. आपल्या बलाच्या घमेंडीने उद्दण्ड झालेल्या राक्षसराजाने अर्जुनाच्या मंत्र्यांना गंभीर वाणीने याप्रकारे म्हटले - ॥२५ १/२॥
अमात्याः क्षिप्रमाख्यात हैहयस्य नृपस्य वै ॥ २६ ॥

युद्धार्थी समनुप्राप्तो रावणो नाम नामतः ।
मंत्र्यांनो ! तुम्ही ताबडतोब जाऊन हैह्यराजाला सांगा की रावण तुमच्याशी युद्ध करण्यासाठी आला आहे. ॥२६ १/२॥
रावणस्य वचः श्रुत्वा मन्त्रिणोऽथार्जुनस्य ते ॥ २७ ॥

उत्तस्थुः सायुधास्त्राश्च रावणं वाक्यमब्रुवन् ।
रावणाचे वचन ऐकून अर्जुनाचे ते मंत्री हत्यारे घेऊन उभे राहिले आणि रावणाला याप्रकारे बोलले - ॥२७ १/२॥
युद्धस्य कालो विज्ञातः साधु भोः साधु रावण ॥ २८ ॥

यः क्षीबं स्त्रीवृतं चैव योद्धुमुत्सहते नृपम् ।
वाहवा रे रावणा ! वाहवा ! तुला युद्धाच्या प्रसंगाचे चांगले ज्ञान आहे. आमचे महाराज ज्यावेळी मदमत्त होऊन स्त्रियांच्या मध्ये क्रीडा करीत आहेत अशा समयी तू त्यांच्या बरोबर युद्ध करण्यासाठी उत्साहित होत आहेस. ॥२८ १/२॥
स्त्रीसमक्षगतं यत् त्वं योद्धुमुत्सहसे नृप ॥ २९ ॥

वाशितामध्यगं मत्तं शार्दूल इव कुञ्जरम् ।
जसे कुणी व्याघ्र कामवासनेने वासित हत्तिणींच्या मध्ये उभा असलेल्या गजराजाशी झुंजण्याची इच्छा करतो. त्याप्रकारे तू स्त्रियांच्या समक्ष क्रीडा-विलासांत तत्पर झालेल्या राजा अर्जुनाबरोबर युद्ध करण्याचा उत्साह दाखवित आहेस. ॥२९ १/२॥
क्षमस्वाद्य दशग्रीव चोष्यतां रजनी त्वया ।
युद्धे श्रद्धा च यद्यस्ति श्वस्तात समरेऽर्जुनम् ॥ ३० ॥
तात ! दशग्रीव ! जर तुझ्या हृदयात युद्धासाठी उत्साह असेल, तर रात्रभर क्षमा कर आणि आजची रात्र येथेच थांब. मग उद्या सकाळी तू राजा अर्जुनाला समरांगणात उपस्थित पहाशील. ॥३०॥
यदि वापि त्वरा तुभ्यं युद्धतृष्णासमावृत ।
निहत्यास्मान् रणेयुद्धं अर्जुनेनोपयास्यसि ॥ ३१ ॥
युद्धाच्या तृष्णेने घेरलेल्या राक्षसराजा ! जर तुला युद्धाची फार घाई झाली असेल तर प्रथम रणभूमीमध्ये आम्हा सर्वांना मारून टाक. त्या नंतर महाराज अर्जुनाशी युद्ध करू शकशील. ॥३१॥
ततस्तै रावणामात्यैः अमात्यास्ते नृपस्य तु ।
सूदिताश्चापि ते युद्धे भक्षिताश्च बुभुक्षितैः ॥ ३२ ॥
हे ऐकून रावणाचे भुकेले मंत्री युद्धस्थळी अर्जुनाच्या अमात्यांना मारमारून खाऊ लागले. ॥३२॥
ततो हलहलाशब्दो नर्मदातीर आबभौ ।
अर्जुनस्यानुयात्राणां रावणस्य च मन्त्रिणाम् ॥ ३३ ॥
यामुळे अर्जुनाच्या अनुयायांमध्ये तसेच रावणाच्या मंत्र्यांमध्ये नर्मदेच्या तटावर फार मोठा कोलाहल होऊ लागला. ॥३३॥
इषुभिस्तोमरैः शूलैः त्रिशूलैर्वज्रकर्षणैः ।
सरावणानर्दयन्तः समन्तात् समभिद्रुताः ॥ ३४ ॥
अर्जुनाचे योद्धे बाण, तोमर, त्रिशूल आणि वज्रकर्षण नामक शस्त्रांच्या द्वारा चोहो बाजुंनी हल्ला करून रावणासहित समस्त राक्षसांना घायाळ करू लागले. ॥३४॥
हैहयाधिपयोधानां वेग आसीत् सुदारुणः ।
सनक्रमीनमकर समुद्रस्येव निःस्वनः ॥ ३५ ॥
हैह्यराजाच्या योद्धांचा वेग नक्र, मीन, मकर यांच्या सहित समुद्राच्या भीषण गर्जनेप्रमाणे अत्यंत भयंकर भासत होता. ॥३५॥
रावणस्य तु तेऽमात्याः प्रहस्तशुकसारणाः ।
कार्तवीर्यबलं क्रुद्धा निर्दहन्ति स्म तेजसा ॥ ३६ ॥
रावणाचे ते मंत्री प्रहस्त, शुक आणि सारण आदि कुपित होऊन आपल्या बल-पराक्रमाने कार्तवीर्य अर्जुनाच्या सेनेचा संहार करू लागले. ॥३६॥
अर्जुनाय तु तत्कर्म रावणस्य समन्त्रिणः ।
क्रीडमानाय कथितं पुरुषैर्भयविह्वलैः ॥ ३७ ॥
तेव्हा अर्जुनाच्या सेवकांनी भयाने विव्हळ होऊन क्रीडेमध्ये दंग असलेल्या अर्जुनाला मंत्र्यासहित रावणाच्या त्या क्रूर कर्माचे वृत्त सांगितले. ॥३७॥
श्रुत्वा न भेतव्यमिति स्त्रीजनं तं तदाऽर्जुनः ।
उत्ततार जलात् तस्माद्‌ गङ्‌गातोयादिवाञ्जनः ॥ ३८ ॥
हे ऐकून अर्जुनाने आपल्या स्त्रियांना म्हटले - तुम्ही सर्व जणी घाबरू नका. नंतर तो त्या सर्वांसह, कुणी एखादा दिग्गज (हत्तीणींसह) गंगेच्या जलातून बाहेर निघावा त्याप्रमाणे नर्मदेच्या जलातून बाहेर निघाला. ॥३८॥
क्रोधदूषितनेत्रस्तु स तदार्जुनपावकः ।
प्रजज्वाल महाघोरो युगान्त इव पावकः ॥ ३९ ॥
त्याचे नेत्र रोषाने रक्तवर्णाचे झाले होते. तो अर्जुनरूपी अनल प्रलय कालच्या महाभयंकर पावकाप्रमाणे प्रज्वलित झाला. ॥३९॥
स तूर्णतरमादाय वरहेमाङ्‌गदो गदाम् ।
अभिदुद्राव रक्षांसि तमांसीव दिवाकरः ॥ ४० ॥
सुंदर सोन्याचे बाजूबंद धारण करणार्‍या वीर अर्जुनाने तात्काळच गदा उचलली आणि त्या राक्षसांवर आक्रमण केले, जणु सूर्यदेवच अंधःकार समूहावर तुटून पडले असावेत. ॥४०॥
बाहुविक्षेपकरणां समुद्यम्य महागदाम् ।
गारुडं वेगमास्थाय चापपातैव सोऽर्जुनः ॥ ४१ ॥
जी भुजांच्या द्वारा फिरविली जात होती ती विशाल गदा वर उचलून गरूडासमान वेगाचा आश्रय घेऊन राजा अर्जुन तात्काळच त्या निशाचरांवर तुटून पडला. ॥४१॥
तस्य मार्गं समारुद्ध्य विन्ध्योऽर्कस्येव पर्वतः ।
स्थितो विन्ध्य इवाकम्प्यः प्रहस्तो मुसलायुधः ॥ ४२ ॥
त्या समयी मुसळधारी प्रहस्त, जो विंध्यगिरिप्रमाणे अचल होता त्याचा मार्ग अडवून उभा राहिला; ज्याप्रमाणे पूर्वकाळी विंध्याचलाने सूर्याचा मार्ग अडविला होता अगदी त्या प्रमाणेच. ॥४२॥
ततोऽस्य मुसलं घोरं लोहबद्धं मदोद्धतः ।
प्रहस्तः प्रेषयन् क्रुद्धो ररास च यथान्तकः ॥ ४३ ॥
मदाने उद्दण्ड झालेल्या प्रहस्ताने कुपित होऊन अर्जुनावर एक लोखंडाने मढविलेले भयंकर मुसळ फेकले आणि काळासमान भीषण गर्जना केली. ॥४३॥
तस्याग्रे मुसलस्याग्निः अशोकापीडसंनिभः ।
प्रहस्तकरमुक्तस्य बभूव प्रदहन्निव ॥ ४४ ॥
प्रहस्ताच्या हातून सुटलेल्या त्या मुसळाच्या अग्रभागांतून अशोकपुष्पासमान लाल रंगाची आग प्रकट झाली ती जणु जाळून टाकत आहे असे भासत होते. ॥४४॥
आधावमानं मुसलं कार्तवीर्यस्तदार्जुनः ।
निपुणं वञ्चयामास गदया गदविक्लवः ॥ ४५ ॥
परंतु कार्तवीर्य अर्जुनाला तिच्यामुळे जराही भय वाटले नाही. त्याने आपल्याकडे वेगपूर्वक येणार्‍या त्या मुसळाला गदा मारून पूर्णतः विफल करून टाकले. ॥४५॥
ततस्तमभिदुद्राव प्रहस्तं हैहयाधिपः ।
भ्रामयानो गदां गुर्वीं पञ्चबाहुशतोच्छ्रयाम् ॥ ४६ ॥
त्यानंतर गदाधारी हैह्यराज, जिला पाचशे हातांनी उचलून फेकले जात असे, ती भारी गदा फिरवत प्रहस्ताकडे धावला. ॥४६॥
ततो हतोऽतिवेगेन प्रहस्तो गदया तदा ।
निपपात स्थितः शैलो वज्रिवज्रहतो यथा ॥ ४७ ॥
त्या गदेने अत्यंत वेगपूर्वक आहत होऊन प्रहस्त तात्काळ पृथ्वीवर कोसळला, जणु एखादा पर्वत वज्रधारी इंद्राच्या वज्राच्या आघाताने कोसळला असावा. ॥४७॥
प्रहस्तं पतितं दृष्ट्‍वा मारीचशुकसारणाः ।
समहोदरधूम्राक्षा ह्यपसृष्टा रणाजिरात् ॥ ४८ ॥
प्रहस्त धराशायी झालेला पाहून मारीच, शुक, सारण, महोदर आणि धूम्राक्ष समरांगणांतून पळून गेले. ॥४८॥
अपक्रान्तेष्वमात्येषु प्रहस्ते वै निपातिते ।
रावणोऽभ्यद्रवत् तूर्णं अर्जुनं नृपसत्तमम् ॥ ४९ ॥
प्रहस्त पडल्यावर आणि अमात्य पळून गेल्यावर रावणाने नृपश्रेष्ठ अर्जुनावर तात्काळ हल्ला केला. ॥४९॥
सहस्रबाहोस्तद् युद्धं विंशद्बाहोश्च दारुणम् ।
नृपराक्षसयोस्तत्र चारब्धं रोमहर्षणम् ॥ ५० ॥
नंतर तर हजार भुजा असणारा नरनाथ आणि वीस भुजा असणारा निशाचरनाथ यांच्यामध्ये तेथे अंगावर कांटा आणणारे भयंकर युद्ध सुरू झाले. ॥५०॥
सागराविव संरब्धौ चलन्मूलाविवाचलौ ।
तेजोयुक्ताविवादित्यौ प्रदहन्ताविवानलौ ॥ ५१ ॥

बलोद्धतौ यथा नागौ वाशितार्थे यथा वृषौ ।
मेघाविव विनर्दन्तौ सिंहाविव बलोत्कटौ ॥ ५२ ॥

रुद्रकालाविव क्रुद्धौ तदा तौ राक्षसार्जुनौ ।
परस्परं गदां गृह्य ताडयामासतुर्भृशम् ॥ ५३ ॥
विक्षुब्ध झालेले दोन समुद्र अथवा ज्यांचे मूळ हलत आहे असे दोन पर्वत, दोन तेजस्वी आदित्य, दोन दाहक अग्नि, बलाने उन्मत्त झालेले दोन गजराज, काम-वासना असणार्‍या गायीसाठी लढणारे दोन वळू, जोरजोराने गर्जना करणारे दोन मेघ, उत्कट बलशाली दोन सिंह तसेच क्रोधाविष्ट झालेल्या रूद्र आणि काळाप्रमाणे ते रावण आणि अर्जुन गदा घेऊन एक दुसर्‍यावर गंभीर प्रहार करू लागले. ॥५१-५३॥
वज्रप्रहारानचला यथा घोरान् विषेहिरे ।
गदाप्रहारांस्तौ तत्र सेहाते नरराक्षसौ ॥ ५४ ॥
पूर्वकाळी ज्याप्रमाणे पर्वतांनी वज्राचे भयंकर आघात सहन केले होते, त्याच प्रकारे ते अर्जुन आणि रावण तेथे गदांचे प्रहार सहन करीत होते. ॥५४॥
यथाऽ शनिरवेभ्यस्तु जायतेऽथ प्रतिश्रुतिः ।
तथा तयोर्गदापोथैः दिशः सर्वाः प्रतिश्रुताः ॥ ५५ ॥
ज्याप्रमाणे वीजेच्या कडकडाटाने संपूर्ण दिशा प्रतिध्वनित होऊन जातात त्याच प्रकारे त्या दोन्ही वीरांच्या आघातांनी सर्व दिशा निनादू लागल्या. ॥५५॥
अर्जुनस्य गदा सा तु पात्यमानाऽहितोरसि ।
काञ्चनाभं नभश्चक्रे विद्युत्सौदामिनी यथा ॥ ५६ ॥
ज्याप्रमाणे वीज चमकून आकाशाला सोनेरी रंगाने युक्त करून टाकते त्याच प्रकारे रावणाच्या छातीवर आदळणारी अर्जुनाची गदा त्याच्या वक्षःस्थळास सुवर्णासारख्या प्रभेने पूर्ण करत होती. ॥५६॥
तथैव रावणेनापि पात्यमाना मुहुर्मुहुः ।
अर्जुनोरसि निर्भाति गदोल्केव महागिरौ ॥ ५७ ॥
त्याच प्रकारे रावणाच्या द्वारा ही अर्जुनाच्या छातीवर वारंवार आदळणारी गदा एखाद्या महान्‌ पर्वताकार कोसळणार्‍या उल्केप्रमाणे प्रकाशित होत होती. ॥५७॥
नार्जुनः खेदमायाति न राक्षसगणेश्वरः ।
सममासीत् तयोर्युद्धं यथा पूर्वं बलीन्द्रयोः ॥ ५८ ॥
त्यासमयी अर्जुनही थकत नव्हता आणि राक्षसगणांचा राजा रावणही थकत नव्हता. पूर्वकाळी परस्पर झुंजणार्‍या इंद्र आणि बलिप्रमाणे त्या दोघांचे युद्ध एक समानच वाटत होते. ॥५८॥
शृङ्‌गैरिव वृषायुध्यन् दन्ताग्रैरिव कुञ्जरौ ।
परस्परं विनिघ्नन्तौ नरराक्षससत्तमौ ॥ ५९ ॥
ज्याप्रमाणे वळू आपल्या शिंगांनी आणि हत्ती आपल्या दातांच्या अग्रभागाने परस्परावर प्रहार करतात त्याच प्रमाणे ते नरेश आणि निशाचरराज एक-दुसर्‍यांवर गदेने प्रहार करीत होते. ॥५९॥
ततोऽर्जुनेन क्रुद्धेन सर्वप्राणेन सा गदा ।
स्तनयोरन्तरे मुक्ता रावणस्य महोरसि ॥ ६० ॥
इतक्यातच अर्जुनाने कुपित होऊन रावणाच्या विशाल वक्षःस्थळावर दोन्ही स्तनांच्या मध्ये आपली पूर्ण शक्ति लावून गदेचा प्रहार केला. ॥६०॥
वरदानकृतत्राणे सा गदा रावणोरसि ।
दुर्बलेव यथावेगं द्विधाभूत्वाऽपतत् क्षितौ ॥ ६१ ॥
परंतु रावण तर वराच्या प्रभावाने सुरक्षित होता, म्हणून रावणाच्या छातीवर वेगपूर्वक प्रहार करूनही ती गदा एखाद्या दुर्बल गदेप्रमाणे त्याच्या वक्षाशी टकरून दोन तुकडे होऊन पृथ्वीवर पडली. ॥६१॥
स त्वर्जुनप्रयुक्तेन गदाघातेन रावणः ।
अपासर्पद् धनुर्मात्रं निषसाद च निष्टनन् ॥ ६२ ॥
तथापि अर्जुनाने फेकलेल्या त्या गदेच्या आघाताने पीडित होऊन रावण एक धनुष्य मागे सरला आणि आर्तनाद करीत बसला. ॥६२॥
स विह्वलं तदाऽऽलक्ष्य दशग्रीवं ततोऽर्जुनः ।
सहसोत्पत्य जग्राह गरुत्मानिव पन्नगम् ॥ ६३ ॥
दशग्रीवाला व्याकुळ झालेला पाहून अर्जुनांनी एकाएकी उडी मारून त्याला पकडले, जणु गरूडानेच झेप मारून कुणा सर्पाला पकडून दाबून धरले असावे. ॥६३॥
स तु बाहुसहस्रेण बलाद्‌गृह्य दशाननम् ।
बबन्ध बलवान् राजा बलिं नारायणो यथा ॥ ६४ ॥
ज्याप्रमाणे पूर्वकाळी भगवान्‌ नारायणांनी बलिला बांधले होते, त्याप्रमाणेच बलवान्‌ राजा अर्जुनाने दशाननाला बलपूर्वक पकडून आपल्या हजार हातांच्या द्वारा त्याला मजबूत दोरखंडाने बांधले. ॥६४॥
बध्यमाने दशग्रीवे सिद्धचारणदेवताः ।
साध्वीतिवादिनः पुष्पैः किरन्त्यर्जुनमूर्धनि ॥ ६५ ॥
दशग्रीव बांधला गेल्यावर सिद्ध, चारण आणि देवता -शाबास ! शाबास ! म्हणून अर्जुनाच्या मस्तकावर पुष्पवृष्टि करू लागले. ॥६५॥
व्याघ्रो मृगमिवादाय मृगराडिव कुञ्जरम् ।
ररास हैहयो राजा हर्षाद् अम्बुदवन्मुहुः ॥ ६६ ॥
जसा एखादा वाघ एखाद्या हरणाला पकडून धरतो, अथवा सिंह हत्तीला धरून दाबून धरतो, त्याच प्रकारे रावणाला आपल्या आधीन करून घेऊन हैहयराज अर्जुन हर्षातिरेकाने मेघासमान वारंवार गर्जना करू लागला. ॥६६॥
प्रहस्तस्तु समाश्वस्तो दृष्ट्‍वा बद्धं दशाननम् ।
सहसा राक्षसः क्रुद्धो ह्यभिदुद्राव हैहयम् ॥ ६७ ॥
त्यानंतर प्रहस्त शुद्धिवर आला. दशमुख रावणाला बांधला गेलेला पाहून तो राक्षस एकाएकी कुपित होऊन हैह्यराजाकडे धावला. ॥६७॥
नक्तञ्चराणां वेगस्तु तेषामापततां बभौ ।
उद्ऽऽभूत आतपापाये पयोदानामिवाम्बुधौ ॥ ६८ ॥
ज्याप्रमाणे वर्षाकाळ आल्यावर समुद्रात मेघांचा वेग वाढतो, त्या प्रकारे तेथे आक्रमण करणार्‍या त्या निशाचरांचा वेग वाढत असलेला प्रतीत होत होता. ॥६८॥
मुञ्च मुञ्चेति भाषन्तः तिष्ठतिष्ठेति चासकृत् ।
मुसलानि च शूलानि सोत्ससर्ज तदा रणे ॥ ६९ ॥
सोडा, सोडा, थांबा, थांबा असे वारंवार म्हणत राक्षस अर्जुनाकडे धावले. त्यासमयी प्रहस्ताने रणभूमीमध्ये अर्जुनावर मुसळ आणि शूलाने प्रहार केले. ॥६९॥
अप्राप्तान्येव तान्याशु असम्भ्रान्तस्तदार्जुनः ।
आयुधान्यमरारीणां जग्राहारिनिषूदनः ॥ ७० ॥
परंतु त्यावेळी अर्जुन घाबरला नाही. त्या शत्रुसूदन वीराने प्रहस्त आदि देवद्रोही निशाचरांनी सोडलेल्या त्या अस्त्रांना आपल्या शरीरापर्यंत येण्यापूर्वी पकडले. ॥७०॥
ततस्तैरेव रक्षांसि दुर्धरैः प्रवरायुधैः ।
भित्त्वा विद्रावयामास वायुरम्बुधरानिव ॥ ७१ ॥
नंतर त्यांनी दुर्धर तसेच श्रेष्ठ आयुधांनी त्या सर्व राक्षसांना घायाळ करून, वारा जसा मेघांना छिन्न-भिन्न करून उडवून लावतो, त्याप्रमाणे पळवून लावले. ॥७१॥
राक्षसांस्त्रासयामास कार्तवीर्याऽर्जुनस्तदा ।
रावणं गृह्य नगरं प्रविवेश सुहृद्‌वृतः ॥ ७२ ॥
त्यासमयी कार्तवीर्य अर्जुनाने समस्त राक्षसांना भयभीत करून सोडले आणि रावणाला घेऊन तो आपल्या सुहृदांसह नगरात आला. ॥७२॥
स कीर्यमाणः कुसुमाक्षतोत्करैः
द्विजैः सपौरैः पुरुहूतसंनिभः ।
ततोऽर्जुनः स्वां प्रविवेश तां पुरीं
बलिं निगृह्येव सहस्रलोचनः ॥ ७३ ॥
नगराच्या निकट आल्यावर ब्राह्मण आणि पुरवासी लोकांनी आपल्या इंद्रतुल्य तेजस्वी नरेशावर फुले आणि अक्षतांची वृष्टि केली आणि सहस्त्रनेत्रधारी इंद्र ज्याप्रमाणे बलिला कैदी बनवून घेऊन गेले होते त्याचप्रमाणे त्या राजा अर्जुनाने बांधलेल्या रावणास बरोबर घेऊन आपल्या पुरीत प्रवेश केला. ॥७३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे द्वात्रिंशः सर्गः ॥ ३२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा बत्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP