श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। एकोन्चत्वारिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
इन्द्रेण सगरस्य यज्ञसम्बन्धिनोऽश्वस्यापहरणम्, सगरात्मजैर्धराया भेदनं देवैर्ब्रह्माणं प्रति वृत्तस्यास्य विनिवेदनं च - इंद्रद्वारा राजा सगराच्या यज्ञसंबंधी अश्वाचे अपहरण, सगर पुत्रांद्वारे सार्‍या पृथ्वीचे उत्खनन, तथा देवतांनी ब्रह्मदेवांना हा प्रसंग कथन करणे -
विश्वामित्रवचः श्रुत्वा कथान्ते रघुनन्दनः ।
उवाच परमप्रीतो मुनिं दीप्तमिवानलम् ॥ १ ॥
विश्वामित्रांनी सांगितलेली कथा ऐकून श्रीरामचंद्र फार प्रसन्न झाले. नंतर त्यांनी अग्नितुल्य तेजस्वी विश्वामित्रांना विचारले - ॥ १ ॥
श्रोतुमिच्छामि भद्रं ते विस्तरेण कथामिमाम् ।
पूर्वजो मे कथं ब्रह्मन् यज्ञं वै समुपाहरत् ॥ २ ॥
'ब्रह्मन् ! आपले कल्याण होवो !ही कथा मी विस्ताराने ऐकू इच्छितो. माझे पूर्वज सगर यांनी कशा प्रकारे यज्ञ केला होता ? ॥ २ ॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा कौतुहलसमन्वितः ।
विश्वामित्रस्तु काकुत्स्थमुवाच प्रहसन्निव ॥ ३ ॥
त्यांचे म्हणणे ऐकून विश्वामित्रांना फार कौतुक वाटले. त्यांना असे वाटले की मी जे काही सांगू इच्छित आहे त्याचसाठी हा प्रश्न विचारला जात आहे. मनात असे वाटून त्यांना जोरात हसू आले. हसत हसत ते श्रीरामास म्हणाले - ॥ ३ ॥
श्रूयतां विस्तरो राम सगरस्य महात्मनः ।
शङ्‍करश्वशुरो नाम्ना हिमवानिति विश्रुतः ॥ ४ ॥

विन्ध्यपर्वतमासाद्य निरीक्षेते परस्परम् ।
तयोर्मध्ये समभवद् यज्ञः स पुरुषोत्तम ॥ ५ ॥
'श्रीराम ! तू महात्मा सगरांच्या यज्ञाचे वर्णन विस्तारपूर्वक ऐक. पुरुषोत्तमा ! शंकरांचे श्वशुर हिमवान नामक पर्वत विन्ध्याचलापर्यंत पोहोचून आणि विन्ध्य हिमवानापर्यंत पोहोचून एकमेकास पहात आहेत. (या दोहोंच्या मध्ये दुसरा असा कोणताही पर्वत नाही की जो दोघांच्या परस्पर दर्शनात बाधा उपस्थित करू शकेल.) याच दोन्ही पर्वतांच्या मध्ये असलेल्या आर्यावर्ताच्या पुण्यभूमित या यज्ञाचे अनुष्ठान झाले होते. ॥ ४-५ ॥
स हि देशो नरव्याघ्र प्रशस्तो यज्ञकर्मणि ।
तस्याश्वचर्यां काकुत्स्थ दृढधन्वा महारथः ॥ ६ ॥

अंशुमानकरोत् तात सगरस्य मते स्थितः ।
'पुरुषसिंह ! तोच देश यज्ञ करण्यासाठी उत्तम मानला गेला आहे. तात ककुत्स्थनन्दन ! राजा सगराच्या आज्ञेने यज्ञिय अश्वाच्या रक्षणाचा भार सुदृढ धनुर्धर महारथी अंशुमानाने स्वीकारला होता. ॥ ६ १/२ ॥
तस्य पर्वणि तं यज्ञं यजमानस्य वासवः ॥ ७ ॥

राक्षसीं तनुमास्थाय यज्ञीयाश्वमपाहरत् ।
परंतु पर्वाच्या दिवशी यज्ञ करण्यात गुंतलेल्या राजा सगराचा यज्ञ संबंधी अश्वाला राक्षसाचे रूप धारण करून इंद्राने चोरून नेले. ॥ ७ १/२ ॥
ह्रियमाणे तु काकुत्स्थ तस्मिन्नश्वे महात्मनः ॥ ८ ॥

उपाध्यायगणाः सर्वे यजमानमथाब्रुवन् ।
अयं पर्वणि वेगेन यज्ञीयाश्वोऽपनीयते ॥ ९ ॥

हर्तारं जहि काकुत्स्थ हयश्चैवोपनीयताम् ।
यज्ञच्छिद्रं भवत्येतत् सर्वेषामशिवाय नः ॥ १० ॥

तत् तथा क्रियतां राजन् यज्ञोऽच्छिद्रः कृतो भवेत् ।
'काकुत्स्था ! "महामना सगराच्या यज्ञीय अश्वाला चोरून कुणी तरी वेगाने घेऊन जात आहे. आपण चोराला मारावे आणि घोड्याला परत आणावे, नाहीतर यज्ञात विघ्न उत्पन्न होईल आणि असे होणे आपल्या सर्वांसाठी अमंगला चे कारण होईल. राजन् ! आपण असा प्रयत्‍न करावा की ज्या योगे हा यज्ञ कोणतेही विघ्न न येता पूर्णत्वास जाईल." ॥ ८-१० १/२ ॥
सोपाध्यायवचः श्रुत्वा तस्मिन् सदसि पार्थिवः ॥ ११ ॥

षष्टिं पुत्रसहस्राणि वाक्यमेतदुवाच ह ।
गतिं पुत्रा न पश्यामि रक्षसां पुरुषर्षभाः ॥ १२ ॥
त्या यज्ञसभेत बसलेल्या राजा सगरांनी उपाध्यायांची ही गोष्ट ऐकली आणि आपल्या साठ हजार पुत्रांना म्हणाले - "पुरुषप्रवर पुत्रांनो ! हा महान् यज्ञ वेदमंत्रांनी पवित्र अंतःकरणाच्या महाभाग्यशाली महात्म्यांच्या द्वारा संपादित होत आहे. म्हणून येथे राक्षस पोहोंचू शकतील असे मला आढळून येत नाही (अर्थात् हा अश्व चोरणारा कोणी देवकोटीचाच पुरुष असला पाहिजे). ॥ १२ ॥
मन्त्रपूतैर्महाभागैरास्थितो हि महाक्रतुः ।
तद् गच्छत विचिन्वध्वं पुत्रका भद्रमस्तु वः ॥ १३ ॥

समुद्रमालिनीं सर्वां पृथिवीमनुगच्छथ ।
एकैकं योजनं पुत्रा विस्तारमभिगच्छत ॥ १४ ॥

यावत् तुरगसंदर्शस्तावत् खनत मेदिनीम् ।
तं चैव हयहर्तारं मार्गमाणा ममाज्ञया ॥ १५ ॥
म्हणून मुलांनो, तुम्ही जा आणि घोड्याचा शोध करा. तुमचे कल्याण होवो ! समुद्राने घेरलेल्या या पृथ्वीवर सर्वत्र शोध घ्या. एक एक योजन विस्तृत पृथ्वी वाटून घ्या आणि तिच्या कानाकोपर्‍यांतून पहा. जोपर्यंत घोड्याचा पत्ता लागणार नाही तोपर्यंत माझ्या आज्ञेने या पृथ्वीला खोदत रहा. या खोदण्याचा एकच उद्देश आहे. त्या अश्वाला शोधून काढणे. ॥ १३-१५ ॥
दीक्षितः पौत्रसहितः सोपाध्यायगणस्त्वहम् ।
इह स्थास्यामि भद्रं वो यावत् तुरगदर्शनम् ॥ १६ ॥
'मी यज्ञाची दीक्षा घेऊन चुकलो आहे म्हणून स्वतः त्याला शोधण्यासाठी जाऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत त्या अश्वाचे दर्शन होणार नाही तो पर्यंत मी उपाध्याय आणि पौत्र अंशुमान यांच्याबरोबर येथेच राहीन. ॥ १६ ॥
ते सर्वे हृष्टमनसो राजपुत्रा महाबलाः ।
जग्मुर्महीतलं राम पितुर्वचनयन्त्रिताः ॥ १७ ॥
'श्रीरामा ! पित्याच्या आदेशरूपी बंधनात बांधले जाऊन ते सर्व राजकुमार मनांतल्या मनांत हर्षाचा अनुभव करीत भूतलावर विचरण करू लागले. ॥ १७ ॥
गत्वा तु पृथिवीं सर्वामदृष्ट्‍वा तं महाबलाः ।
योजनायामविस्तारमेकैको धरणीतलम् ।
बिभिदुः पुरुषव्याघ्रा वज्रस्पर्शसमैर्भुजैः ॥ १८ ॥
सर्व पृथ्वीला फेरी मारूनही त्या अश्वाचे दर्शन न झाल्याने त्या महाबलवान् पुरुषांनी एकेक योजन भूमि वाटून घेऊन आपल्या भुजांच्या द्वारे पृथ्वीला खोदण्यास आरंभ केला. त्यांच्या भुजांचा स्पर्श वज्राच्या स्पर्शाप्रमाणे दुःसह होता. ॥ १८ ॥
शूलैरशनिकल्पैश्च हलैश्चापि सुदारुणैः ।
भिद्यमाना वसुमती ननाद रघुनन्दन ॥ १९ ॥
'रघुनन्दन ! त्या समयी वज्रतुल्य शूलांनी आणि अत्यंत दारूण नांगरांनी सर्व बाजूंनी विदीर्ण केली जाणारी वसुधा आर्त नाद करू लागली. ॥ १९ ॥
नागानां वध्यमानानामसुराणां च राघव ।
राक्षसानां दुराधर्षः सत्त्वानां निनदोऽभवत् ॥ २० ॥
'रघुवीरा ! त्या राजकुमारांच्या द्वारा मारले जाणारे नाग, असुर, राक्षस तथा अनेक इतर प्राण्यांचा भयंकर आर्तनाद घुमू लागला ॥ २० ॥
योजनानां सहस्राणि षष्टिं तु रघुनन्दन ।
बिभिदुर्धरणीं राम रसातलमनुत्तमम् ॥ २१ ॥
'रघुकुलाला आनन्दित करणार्‍या रामा ! त्यांनी साठ हजार योजन भूमि खोदून काढली. जणुं काही ते सर्वोत्तम रसातलाचेच अनुसंधान करीत होते. ॥ २१ ॥
एवं पर्वतसम्बाधं जंबूद्वीपं नृपात्मजाः ।
खनन्तो नृपशार्दूल सर्वतः परिचक्रमुः ॥ २२ ॥
'नृपश्रेष्ठ रामा ! या प्रकारे पर्वतांनी युक्त जंबूद्वीपाची भूमि खोदत असता ते राजकुमार सर्वत्र भ्रमण करू लागले. ॥ २२ ॥
ततो देवाः सगन्धर्वाः सासुराः सहपन्नगाः ।
सम्भ्रान्तमनसः सर्वे पितामहमुपागमन् ॥ २३ ॥
'याच वेळी गंधर्व, असुर आणि नागांसहित सर्व देवता मनांतल्या मनांत अत्यंत भयभीत झाल्या आणि ब्रह्मदेवाजवळ आल्या. ॥ २३ ॥
ते प्रसाद्य महात्मानं विषण्णवदनास्तदा ।
ऊचुः परमसन्त्रस्ताः पितामहमिदं वचः ॥ २४ ॥
त्यांच्या मुखावर विषाद पसरला होता. ते भयाने अत्यंत संत्रस्त झाले होते. त्यांनी महात्मा ब्रह्मदेवांना (पितामहांना) प्रसन्न करून या प्रमाणे म्हटले - ॥ २४ ॥
भगवन् पृथिवी सर्वा खन्यते सगरात्मजैः ।
बहवश्च महात्मानो वध्यन्ते जलचारिणः ॥ २५ ॥
'भगवन् ! सगराचे पुत्र सर्व पृथ्वीला खोदून काढित आहेत आणि अनेक महात्म्यांचा आणि जलचर जीवांचा वध करीत आहेत. ॥ २५ ॥
अयं यज्ञहरोऽस्माकमनेनाश्वोऽपनीयते ।
इति ते सर्वभूतानि हिंसन्ति सगरात्मजाः ॥ २६ ॥
'हा आमच्या यज्ञात विघ्न आणणारा आहे. हा आमचा अश्व चोरून घेऊन जात आहे' असे म्हणत ते सगराचे पुत्र समस्त प्राण्यांची हिंसा करीत आहेत. ॥ २६ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकोनचत्वारिंशः सर्गः ॥ ३९ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा एकोणचाळीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३९ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP