श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकाशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
शुक्रस्य शापेन स्परिवारस्य दण्डस्य तदीयराज्यस्य च विनाशः -
शुक्रांच्या शापाने सपरिवार राजा दण्ड आणि त्याच्या राज्याचा नाश -
स मुहूर्ताद् उपश्रुत्य देवर्षिरमितप्रभः ।
स्वमाश्रमं शिष्यवृतः क्षुधार्तः सन्न्यवर्तत ॥ १ ॥
एका मुहूर्तानंतर कुणा शिष्याच्या मुखाने अरजेवर केल्या गेलेल्या बलात्काराची गोष्ट ऐकून अमित तेजस्वी महर्षि शुक्र, जे भुकेने पीडित झालेल्या शिष्यांनी घेरलेले होते, ते आपल्या आश्रमाकडे परत आले. ॥१॥
सोऽपश्यदरजां दीनां रजसा समभिप्लुताम् ।
ज्योत्स्नामिव ग्रहग्रस्तां प्रत्यूषे न विराजतीम् ॥ २ ॥
त्यांनी पाहिले, अरजा दुःखी होऊन रडत आहे, तिचे शरीर धुळीने माखले आहे तसेच ती प्रातःकाळच्या राहूग्रस्त चंद्रम्याच्या चांदणीप्रमाणे शोभाहीन झाली आहे. ॥२॥
तस्य रोषः समभवत् क्षुधार्तस्य विशेषतः ।
निर्दहन्निव लोकांस्त्रीन् शिष्यांश्चैतदुवाच ह ॥ ३ ॥
हे पाहून विशेषतः भुकेने पीडित असल्या कारणाने देवर्षि शुक्रांचा रोष वाढला आणि तीन्ही लोकांना जणु दग्ध करीत ते आपल्या शिष्यांना याप्रमाणे म्हणाले - ॥३॥
पश्यध्वं विपरीतस्य दण्डस्याविजितात्मनः ।
विपत्तिं घोरसंकाशां क्रुद्धाद् अग्निशिखामिव ॥ ४ ॥
पहा, शास्त्र विपरित आचरण करणार्‍या अज्ञानी राजा दण्डाला रागावलेल्या माझ्याकडून अग्निशिखेसमान कशी घोर विपत्ति प्राप्त होत आहे. ॥४॥
क्षयोऽस्य दुर्मतेः प्राप्तः सानुगस्य दुरात्मनः ।
यः प्रदीप्तां हुताशस्य शिखां वै स्प्रष्टुमिच्छति ॥ ५ ॥
सेवकांसहित या दुर्बुद्धि आणि दुरात्मा राजाच्या विनाशाची वेळ आलेली आहे, जो प्रज्वलित आगीच्या धगधगणार्‍या ज्वालेला मिठी मारू इच्छित आहे. ॥५॥
यस्मात् स कृतवान् पापं ईदृशं घोरसंहितम् ।
तस्मात् प्राप्स्यति दुर्मेधाः फलं पापस्य कर्मणः ॥ ६ ॥
त्या दुर्बुद्धिने ज्या अर्थी असे पाप केले आहे तेव्हा याला त्या पापकर्माचे फळ अवश्य प्राप्त होईल. ॥६॥
सप्तरात्रेण राजासौ सभृत्यबलवाहनः ।
पापकर्मसमाचारो वधं प्राप्स्यति दुर्मतिः ॥ ७ ॥
पापकर्माचे आचरण करणारा तो दुर्बुद्धि नरेश सात रात्रिंच्या आतच पुत्र, सेना आणि वाहनांसहित नष्ट होऊन जाईल. ॥७॥
समन्ताद् योजनशतं विषयं चास्य दुर्मतेः ।
धक्ष्यते पांसुवर्षेण महता पाकशासनः ॥ ८ ॥
वाईट विचारांच्या या राजाच्या राज्यावर, जे सर्व बाजूनी शंभरयोजने लांब रूंद आहे, देवराज इंद्र, भारी धुळीची वृष्टि करून ते नष्ट करून टाकील. ॥८॥
सर्वसत्वानि यानीह स्थावराणि चराणि च ।
महता पांसुवर्षेण विलयं सर्वतोऽगमन् ॥ ९ ॥
येथे जे सर्व प्रकारचे स्थावर जंगम जीव निवास करीत आहेत, ते या धुळीच्या भारी वृष्टिने सर्व बाजूनी विलीन होऊन जातील. ॥९॥
दण्डस्य विषयो यावत् तावत् सर्वं समुच्छ्रयम् ।
पांसुवर्षमिवालक्ष्यं सप्तरात्रं भविष्यति ॥ १० ॥
जेथपर्यंत दण्डाचे राज्य आहे तेथपर्यंत समस्त चराचर प्राणी सात रात्रीपर्यंत केवळ धुळीची वृष्टि प्राप्त करून अदृश्य होऊन जातील. ॥१०॥
इत्युक्त्वा क्रोधताम्राक्षः तमाश्रमनिवासिनम् ।
जनं जनपदान्तेषु स्थीयतामिति चाब्रवीत् ॥ ११ ॥
असे म्हणून क्रोधाने लाल डोळे केलेल्या शुक्रांनी त्या आश्रमात निवास करणार्‍या लोकांना म्हटले - दण्डाच्या राज्याच्या सीमेच्या अंती जो देश आहे, त्यामध्ये जाऊन निवास करा. ॥११॥
श्रुत्वा तूशनसो वाक्यं सोऽऽश्रमावसथो जनः ।
निष्क्रान्तो विषयात् तस्मात् स्थानं चक्रेऽथ बाह्यतः ॥ १२ ॥
शुक्राचार्यांचे हे वचन ऐकून आश्रमावासी माणसे त्या राज्यांतून निघाली आणि सीमेबाहेर जाऊन निवास करू लागली. ॥१२॥
स तथोक्त्वा मुनिजनं अरजामिदमब्रवीत् ।
इहैव वस दुर्मेधे आश्रमे सुसमाहिता ॥ १३ ॥
आश्रमवासी मुनींना असे सांगून शुक्रांनी अरजेला म्हटले - दुर्मधे ! तू येथेच या आश्रमात मनाला परमात्म्याच्या ध्यानात एकाग्र करून रहा. ॥१३॥
इदं योजनपर्यन्तं सरः सुरुचिरप्रभम् ।
अरजे विज्वरा भुङ्‌क्ष्व कालश्चात्र प्रतीक्ष्यताम् ॥ १४ ॥
अरजे ! हा जो एक योजन पसरलेला सुंदर तलाव आहे, त्याचा तू निश्चिंत होऊन उपभोग कर आणि आपल्या अपराधाच्या निवृत्तिसाठी येथे समयाची प्रतीक्षा करीत राहा. ॥१४॥
त्वत्समीपे च ये सत्त्वा वासमेष्यन्ति तां निशाम् ।
अवध्याः पांसुवर्षेण ते भविष्यन्ति नित्यदा ॥ १५ ॥
जे जीव त्या रात्रिंच्या मध्ये तुझ्या समीप राहातील, ते कधीही धुळीच्या वृष्टिने मारले जाणार नाहीत - सदा टिकून राहातील. ॥१५॥
श्रुत्वा नियोगं ब्रह्मर्षेः साऽरजा भार्गवी तदा ।
तथेति पितरं प्राह भार्गवं भृशदुःखिता ॥ १६ ॥
ब्रह्मर्षिंचा हा आदेश ऐकून ती भृगुकन्या अरजा अत्यंत दुःखित होऊनही आपल्या पित्याला म्हणाली - फार चांगले. ॥१६॥
इत्युक्त्वा भार्गवो वासं अन्यत्र समकारयत् ।
तच्च राज्यं नरेन्द्रस्य सभृत्यबलवाहनम् ॥ १७ ॥
असे म्हणून शुक्रांनी दुसर्‍या राज्यात जाऊन निवास केला तसेच त्या ब्रह्मवादीच्या कथनानुसार राजा दण्डाचे ते राज्य, सेवक, सेना वाहनांसहित सात दिवसांत भस्म झाले. ॥१७॥
सप्ताहात् भस्मसात् भूतं यथोक्तं ब्रह्मवादिना ।
तस्यासौ दण्डविषयो विन्ध्यशैवलयोर्नृप ॥ १८ ॥

शप्तो ब्रह्मर्षिणा तेन वैधर्म्ये सहिते कृते ।
ततः प्रभृति काकुत्स्थ दण्डकारण्यमुच्यते ॥ १९ ॥
नरेश्वर ! विंध्य आणि शैवलगिरिच्या मध्यभागात दण्डाचे राज्य होते. काकुत्स्थ ! धर्मयुग कृतयुगात धर्मविरूद्ध आचरण केल्याने त्या ब्रह्मर्षिनी राजा आणि त्याचा देश यांना शाप दिला होता. तेव्हापासून तो भूभाग दण्डकारण्य म्हटला जातो. ॥१८-१९॥
तपस्विनः स्थिता ह्यत्र जनस्थानमतोऽभवत् ।
एतत्ते सर्वमाख्यातं यन्मां पृच्छसि राघव ॥ २० ॥
या स्थानावर तपस्वी लोक येऊन राहिले म्हणून याचे नाव जनस्थान झाले. रघुनंदना ! आपण ज्या विषयी मला विचारले होते हे सर्व मी आपल्याला ऐकविले आहे. ॥२०॥
सन्ध्यामुपासितुं वीर समयो ह्यतिवर्तते ।
एते महर्षयः सर्वे पूर्णकुम्भाः समन्ततः ॥ २१ ॥

कृतोदका नरव्याघ्र आदित्यं पर्युपासते ।
वीरा ! आता संध्योपासनेचा समय उलटून जात आहे. पुरुषसिंह ! सर्व बाजूनी हे सर्व महर्षि स्नान करून चुकल्यावर भरलेले घडे घेऊन सूर्यदेवाची उपासना करीत आहेत. ॥२१ १/२॥
स तैर्ब्राह्मणमभ्यस्तं सहितैर्ब्रह्मवित्तमैः ।
रविरस्तंगतो राम गच्छोदकमुपस्पृश ॥ २२ ॥
श्रीरामा ! हे सूर्यदेव तेथे एकत्र जमलेल्या उत्तम ब्रह्मवेत्त्यांनी पठण केलेल्या ब्राह्मणमंत्रांना ऐकून आणि त्याच रूपात पूजा प्राप्त करून अस्ताचलास निघून गेले आहेत. आता आपणही जावे आणि आचमन तसेच स्नान आदि करावे. ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकाशीतितमः सर्गः ॥ ८१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एक्याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP