॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥


॥ श्रीभावार्थरामायण ॥


युद्धकांड


॥ अध्याय सत्त्याऐंशींवा ॥
हनुमंताचे लीलाचरित्र -


॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांकडून सर्वांचा सन्मान :


ब्रह्मादि लोकपाळांसी । रामें गौरविले सकळांसी ।
पुढें बिभीषण सुग्रीवादिकांसी । राम निजगणांसी पूजित ॥ १ ॥
निजगणांची प्रीति पूर्ण । आवडी त्याचें पूजाविधान ।
स्वयें करीत रघुनंदन । ऐका विवंचन तयाचे ॥ २ ॥
देवभक्तांचें प्रेम गहन । त्यांचें पूजेचें विधान ।
वदावयामज कैचें वदन । हीन दीन मतिमंद ॥ ३ ॥
तथापि श्रीरामकृपेची ख्याती । वनचर मर्कट हाती ।
धरोनियां अपांपती । बांधिला निश्चिती पाषार्णी ॥४ ॥
निरायुधें माकडें । ती पाडिती लंकेचे हुडे ।
दशमुख केलें वेडें । घेतलें कैवाडें त्रिकूट क्षणें ॥ ५ ॥
सागरी दगड तरती । पालेखाईर सुरकार्यार्थी ।
तिही राक्षय नेले भस्मांती । त्रिजगतीं उत्सावो ॥ ६ ॥
तोचि मजलागीं कळवळोन । अवतरला एका जनार्दन ।
दुर्लभ जें रामायण । तें सुगम करोन दाविलें ॥ ७ ॥
अति सूक्ष्म भावार्थ । अति गुह्य जो सिद्धांत ।
करतळामळकवत । कृपान्वित दाविला ॥ ८ ॥
बाळकाची अति प्रीती । माउली शीचाशौच न विचारिती ।
प्रेम उचलोनि खांदी घेती । मळ क्षाळिती निजकरीं ॥ ९ ॥
परी तेथेंही एक नवल । जननीजनकें धुतले मळ ।
तें पुनरपि होय कश्मळ ।
सजनांचे करकमळ । सबाह्य मळ क्षाळित ॥ १० ॥
सजनांचा हात माथां । पडतां झाली पवित्रता ।
ब्रह्मादिक निजमाथां । वंदिती तत्वतां पूज्यत्वें ॥ ११ ॥
भावार्थे धरितां सत्संगती । कोण अर्थाची अप्राप्ती ।
सर्वथा मुरे निश्चितीं । दृष्टी वोळंगती सकळार्थ ॥ १२ ॥
असो आतां कवितार्थ । झणें कोपतील संत ।
सांडोनियां निजकार्यार्थ । स्तुतिवादार्था काय काज ॥ १३ ॥
ऐका स्वामी सावधान । तुम्हांसी न साहे स्तवन ।
तरी माझें लोटांगण । रामकथन अवधारा ॥ १४ ॥


सुग्रीवाचा सत्कार :


सुग्रीव जो कां वानरनाथ । बिभीषण लंकानाथ ।
प्रीतीं बोलावोनि रघुनाथ । पूजा करित निजप्रेमें ॥ १५ ॥
वस्त्रें भूषणें अलंकार । चिद्‌रत्‍नांचे मनोहर ।
ब्रह्मदत्त माळा परिकर । बाणली सत्वर बिभीषणा ॥ १६ ॥
येरें घातलें लोटांगण । श्रीरामें धरिला आलिंगून ।
आनंद उथळला पूर्ण । रघुनंदननिजकृपा ॥ १७ ॥
तैसीच सुग्रीवाची पूजा । श्रीरामें केली अति वोजा ।
बाप कृपाळू रघुराजा । निजगणफौजा गौरवित ॥ १८ ॥
ब्रह्मयाचा पणतू बिभीषण । ब्रह्मदत्त माळा जाण ।
त्यासी अर्पी रघुनंदन । चतुरानन सुखमय ॥ १९ ॥
सुग्रीव सूर्याचा पुत्र । सूर्यदत्त विचित्र हार ।
स्वयें अर्पितां रघुवीर । तेणें दिनकर सुखमय ॥ २० ॥


अर्करश्मिप्रतीकाशां कांचनीं मणिभूषितामू ।
सुग्रीवाय स्रजं दिव्यां प्रायच्छद्‌रघुपुंगवः ॥ १ ॥


सूर्यप्रकाशाची घडली । विचित्र रत्‍नी परिवारिली ।
हेममणींमाजी ओविली । तेणें माळ शोभली अनुपम्य ॥ २१ ॥
वस्त्रें भूषणें परिकर । चिद्‌रत्‍नें तेजाकार ।
रामें पूजिला सुग्रीव वीर । सूर्यदत हार देवोनि ॥ २२ ॥
तेणें सुग्रीव शोभला । ब्रह्मादिकांपरीस वहिला ।
श्रीरामें प्रीती आलिंगिला । निमग्र झाला निजानंदीं ॥ २३ ॥
तैसेच इतर वानरवीर । पूजिता झाला रामचंद्र ।
वस्त्रें भूषणें अति परिकर । आश्वासन पै केलें ॥ २४ ॥
कंगळटोप राघावळी । रामें लेवविले गोळांगूळीं ।
सुरसिद्ध विस्मित सकळी । नावरदळी अति शोभा ॥ २५ ॥
ते पुसाल कोण म्हणोन । तितके सांगों शके कोण ।
संक्षेपें नांवे सांगेन । कृपा करून परिसावें ॥ २६ ॥


ततो द्विविदनीलाभ्यां भूबणानि परंतप; ।
सर्वार्वान्वानरमुख्यांश्व प्रददौ वसुधाथिपः ॥ २ ॥
सर्वे वानरवृद्धाश्व ये चान्ये वानरोत्तमाः ।
वासांसि भूषणैश्चैव यथार्हं प्रतिपूजिताः ॥ ३ ॥


सर्व वानरप्रमुखांचा सत्कार :


नळ नीळ जांबवंत । मैंद द्विविद विख्यात ।
सुषेणदधिमुखादि तेथ । वानर समस्त गौरविले ॥ २७ ॥
लहान थोर वृद्ध बाळ । पुरुषार्थी रणशार्दूळ ।
सर्वस्वेंसी रघुकुळपाळ । निजांगें अढळ सेविला ॥ २८ ॥
विचित्र भूषणें विचित्र माळा । विचित्र वस्त्रें विचित्र लीळा ।
रामे पूजिला वानरपाळा । सुरां सकळां देखतां ॥ २९ ॥
सर्वस्वेंसी भजलेति मातें । तुमचा ऋणी मी निश्चितें ।
काय उत्तीर्ण होऊं मी येथें । कांहीं वरातें अंगीकारा ॥ ३० ॥
कोणेहि काळी निश्चित । हीन दीन नव्हे चित्त ।
सदा पूर्ण मनोरथ । नित्य तृप्त सर्वदा ॥ ३१ ॥
जेथे असती वानरवीर । सुपक्व फळें निर्झरनीर ।
सांद्र पल्लव कोमलांकुर । सुखनिर्भर सर्वदा ॥ ३२ ॥
संभाविलें पै सकळांसी । अंगद आणि हनुमंतासी ।
राम विसरला मानसीं । झणें चित्तासी मानाल ॥ ३३ ॥
तया दोघांचें पूजन । अति प्रेमाचें कारण ।
सुखातीत सुख जोडे पूर्ण । समाधान जीवशिवां ॥ ३४ ॥


हनुमंत व अंगदाच्या पूजेविषयी श्रीराम सर्व वानरांना प्रश्न करतात :


गौरवोनियां सकळांसी । राम पुसे अति प्रीतीसीं ।
कांही उत्कंठा मानसीं । सकळांपासीं मागतसें ॥ ३५ ॥
अंगद हनुमंत दोघे जण । यांचे करावें पूजन ।
यांच्या उपकारा जाण । ऋणी संपूर्ण आहें मी ॥ ३६ ॥
याकारणें या दोघांसी । अंकी बैसवावें अति प्रीतींसीं ।
तेणें उत्तीर्ण कांही यांसी । निजमानसीं वांटेल ॥ ३७ ॥
तुम्हां सकळांचे आज्ञापन । जरी होईल कृपेंकरून ।
तरी मी ऐसेंचि करीन । सुखसंपन्न जरी तुम्ही ॥ ३८ ॥


वानरांकडून हनुमंताची प्रशंसा :


श्रीरामाचें निजवचन । ऐकतांच सकळ जन ।
होवोनियां सुखसंपन्न । लोटांगण घालिती ॥ ३९ ॥
हनुमंताचेनि धर्में पूर्ण । आम्हां स्वामी रघुनंदन ।
रामें पावन वानरगण । ख्याति पावन त्रिलोकीं ॥ ४० ॥
वाळीचे भेणें पळता । कोठे नाही विश्रांतता ।
हनुमान भेटोनि रघुनाथा । निर्भयता केली आम्हां ॥ ४१ ॥
देवो वाळी दैत्यां वाळी । असुरां सुरदानवां वाळी ।
रावण ज्यातें कांपे चळीं । तेणें होळी केली त्याची ॥ ४२ ॥
क्षणें वधुनियां वाळीसी । दुःख निरसोनि स्त्रीपुत्रांसी ।
भेटविलें ऐक्यतेसीं । निजराज्यासी देवोनी । ४३ ॥
सीताशुद्धीची दुर्घट कथा । समुद्रउल्लंघनाची वार्ता ।
लंका जाळोनि तत्वतां । लंकानाथा गांजिलें ॥ ४४ ॥
पुत्र प्रधान समग्र । मारोनियां वीरें वीर ।
हनुमान अंगद झुंजार । सीता सुंदर संबोखिली ॥ ४५ ॥
सीता शुद्धि पै आणून । अंगद विजयी केला पूर्ण ।
प्रीति मानी रघुनंदन । यासी कारण हनुमंत ॥ ४६ ॥
हनुमंते अंगदाची कीर्ती । हनुमंतें अंगदाची ख्याती ।
हनुमंते आम्ही रामी सरतीं । बहुत किती अनुवादों ॥ ४७ ॥
आम्हांसी स्थिति गति हनुमंते । आम्ही जीवंत वायुसुतें ।
पावन वनचरे समस्त । कीर्तिमंतें त्रिलोकीं ॥ ४८ ॥
आम्हां गति मति शरण । स्वामी जो कां रघुनंदन ।
हनुमंताच्या धर्मे जाण । सद्‌गुरु जाण हनुमंत ॥ ४९ ॥
ज्याचेनि पाविजे रघुपती । ज्याचेनि त्रैलोक्यांत ख्याती ।
त्याचे पूजेचें विषम चिंती । तो आत्मघाती निश्चित ॥ ५० ॥


अंगदाची स्तुती :


अंगद आम्हां निजजीवन । अंगद आम्हां निजप्राण ।
अंगदें सकळिक पावन । आम्ही धन्य अंगदें ॥ ५१ ॥
कुळींचा पै भलता कोणी । जरी विनटे रामचरणीं ।
पतित पितर यमयातनीं । तें त्याचेनि पै सुटती ॥ ५२ ॥
अंगद आवडता श्रीरामीं । त्याचेनि पावन सकळ आम्ही ।
त्याची पूजा करिता स्वामी । सुखसुंगमीं संतुष्ट ॥ ५३ ॥
सुग्रीवादि सकळ जन । निजहरिखें रघुनंदन ।
विनवितांचि आनंदमग्न । भक्तपूजन करी राम ॥ ५४ ॥
हनुमंताचा परम आप्त । भक्त अनुरक्त विख्यात ।
अंगद वीर परम दैवत । बैसवी रघुनाथ दक्षिणांकीं ॥ ५५ ॥


सीतने रामांची डावी मांडी मारुतीसाठी सोडली,
अंगद मारुती यांना दोन बाजूस बसवून त्यांची पूजा :


ते देखोनि जनकदुहिता । जाणोनि स्वामीच्या मनोगता ।
रामांक सांडोनि सीता । तळीं तत्वतां उतरली ॥ ५६ ॥
बैसावया हनुमंता । ठाव दिधला जनकदुहिता ।
तेणें आनंद रघुनाथा । अंकीं तत्वतां बैसविला ॥ ५७ ॥
दोघे आलिंगोनि प्रीतीं । अंकीं बैसवितां रघुपती ।
आनंदल्या सुरपंक्ती । कपिपती आनंद ॥ ५८ ॥
वस्त्रें भूषणें परिकर । चिद्‌रत्‍नांचे अलंकार ।
निजहस्तें रघुवीर । दोघे वीर गौरविले ॥ ५९ ॥
अंगद हनुमंताचा शिष्य । त्याचे पूजेचा संतोष ।
अतिशयें हनुमंतास । हे राघवेश जाणतसे ॥ ६० ॥


रामांनी कुबेराने दिलेली माळ अंगदाच्या गळ्यात घातली :


कुबेरदत्त रत्‍नमाळा । अतिशर्येसीं सुढाळा ।
अति प्रीतीं घननीळा । घाली गळां अंगदाच्या ॥ ६१ ॥


वैदूर्यमणिसंबद्धे वररत्‍नपरिष्कृते ।
प्रायच्छद्‌वालिपुत्राय चांगदायांगदे विभु: ॥ ४ ॥


वैडूर्यादि विचित्र रत्‍नें । मध्ये मध्ये मणिकांचने ।
प्रभा फांकतसे गगनें । सविता तेणें लाजिला ॥ ६२ ॥
निजबाहूंचीं वीरकंकणें । प्रीती करोनि रघुनंदनें ।
दिधली अंगदाकारणे । शोभे तेणें अनुपम्य ॥ ६३ ॥
करी कंकणें बाणली । कंठीं माळा पै घातली ।
श्रीरामअंकावरी भली । शोभा आली अंगदा ॥ ६४ ॥
तैसीचि हनुम्याची पूजा । रामें केली अति वोजा ।
बाप कृपाळू रघुराजा । भक्त फौजा गौरवित ॥ ६५ ॥
तें देखोनि जानकीसी । प्रीती दाटली मानसीं ।
पूजावया हनुमंतासी । अति प्रीतीसीं विचारी ॥ ६६ ॥
रत्‍नमाळा वायुदत्ता । रामें पूजिली जनकदुहिता ।
तिणें पूजावया हनुमंता । आला इच्छित रामाची ॥ ६७ ॥


अवमुच्यात्मनः कंठाद्वारं जनकलंदिनी ।
वानरान्प्रेक्ष्य तान्सर्वान्वान्भर्तारं च पुन: पुन: ॥ ५ ॥
तामिंगितज्ञ संप्रेक्ष्य बभाषे जजकात्मजाम् ।
वदस्व सुभगे हारं यस्य तुष्टासि भामिनि ॥ ६ ॥
एवमुक्ता तु वैदेही राघवेण महात्मना ।
प्रददौ वायुपुत्राय तं हारमसितेक्षणा ॥ ७ ॥


सीतेने रामांच्या अनुज्ञेने तिच्या गळ्यातील हार
मारुतीच्या कंठात घातला. त्यामुळे सर्वांना आनंद :


कंठींचा काढोनि हार । हातीं घेवोनि वेगवत्तर ।
चंद्रवदना मृगनेत्र । पाहे वक्त्र रामाचें ॥ ६८ ॥
सीता मर्यादेची राशी । उच्छ्रंखळता नाहीं तिसी ।
सुरवानरसभेसीं । केंवी रामासी पुसावें ॥ ६९ ॥
अंतरात्मा रघुनंदन । चिन्ह तियेचें जाणोन ।
निजकृपा कळवळोन । काय आपण बोलत ॥ ७० ॥
हार काढोनियां हातीं । तुवा घेतला अति प्रीतीं ।
कोणावरी तुझी स्नेहस्थिती । त्यासी निश्चितीं अर्पावा ॥ ७१ ॥
शंका न धरावी मानसीं । हार अर्पी आवडे त्यासी ।
ऐकोनि रामाज्ञेंसीं । निजमानसीं हरिखेली ॥ ७२ ॥
प्रीतीं उचलोनियां माळा । घाली हनुमंताचिया गळां ।
तैं आनंद सुरा सकळां । घनसांवळा सुखमय ॥ ७३ ॥
जानकी अति प्रीतीसीं । माळ देतां हनुमंतासी ।
आनंद झाला श्रीरामासी । पुष्पवृष्टीसी सुर करिती ॥ ७४ ॥


या घटनेमुळे हनुमंत दुःखित :


तें जाणोनि वायुनंदन । झाला अत्यंत उद्विग्न ।
बाह्यपूर्जा तें मज विघ्न । अभिमान जनघातकी ॥ ७५ ॥
ऐसें विचारोनिपूर्ण । आदरिले वानरचिन्ह ।
तेणें विस्मित सुरगण । रघुनंदन विस्मित ॥ ७६ ॥
ऐसें साधोनि विंदान । वेगें उडाला आपण ।
वृक्षी बैसला वळघोन । मर्कटचिन्ह निजचेष्टा ॥ ७७ ॥
मर्कटचेष्टा वाडेंकोडें । डोळे घुलकावी सीतेकडे ।
वाकुल्या दावी सौमित्राकडे । नाचे उडे तडतडा ॥ ७८ ॥


मारुतीने माळेंतील एक एक मणी तोडून टाकला :


माळ काढोनि झडकरी । रत्‍नें तोडित तडकरी ।
वेगें घालोनि मुखाभीतरीं । टाकी दुरी चावोनी ॥ ७९ ॥
तें तंव लागे अति कठिण । चावितां नये संपूर्ण ।
आणिक पाहे तोडून । तंव तेही जाण तैसेंचि ॥ ८० ॥
देखोनि हनुमंताचे चिन्ह । आवेशले वानरगण ।
करूं आदरिलें त्राण । तंव अश्वगण पै उडती ॥ ८१ ॥
डहाळें धरोनि वृक्षांसीं । झोंबू धांवती फळासी ।
घोडी गोविलें वानरांसी । हात फळासी पावेना ॥ ८२ ॥
तेणें क्रोध वानरांसी । खांवो न लाहों फळांसी ।
घोडीं गोविलें आम्हांसी । धरोनि पुच्छीं झुगारिती ॥ ८३ ॥
करितां उलटे किराण । अत्यंत तडतडी अंगत्राण ।
मग तोडतोडों जाण । वानरगण टाकिती ॥ ८४ ॥
बरें गौरविलें रघुनंदनें । गोवोनि सांडिलीं वानरगणें ।
करूं न लाहती किराणें । फळ खाणे अंतरलें ॥ ८५ ॥
या अंगत्राणा पै हातीं । हाली चाली खुंटली गती ।
कायसा कृपाळु रघुपती । वानरपंक्ती खिळलिया ॥ ८६ ॥
पायीं घोडीं बेडी जोडली । अंगें अंगत्राणें खिळिलीं ।
उड्डाणाची गति खुंटली । भली गौरविलीं रघुनाथें ॥ ८७ ॥
तेणें हांसती सुरगण । वसिष्ठादि ऋषिजन ।
सुमंतादिक प्रधान । अट्टाहास्यें पूर्ण हांसती ॥ ८८ ॥
अंगद सुग्रीव बिभीषण । हांसते झाले गदगदोन ।
मुखी पालव धरोन । रघुनंदन हांसत ॥ ८९ ॥
जंव जंव सकळही हांसती । तंव तंव वानर अधिकें उडती ।
चेष्टा करीत अपरिमिती । विटाऊं लागती सुरसिद्धां ॥ ९० ॥


पृथ्वीमोलाची रत्‍ने फोडल्याबद्दल मारुतीला लक्ष्मणाचा प्रश्र :


तें देखोनि अनुचरित । सौमित्र आदरें पूसत ।
सकळां अग्रणी हनुमान भक्त । काय अद्‌भुत मांडिलें ॥ ९१ ॥
श्रीरामभजनप्रीतीसीं । तुझी दीक्षा सकळांसी ।
राम ऋणी तुझिया भजनासी । उत्तीर्णता त्यासी दिसेना ॥ ९२ ॥
यालागीं श्री रघुपती । अंकी बैसवोनि अति प्रीतीं ।
आदरें तुझी पूजा करिती । ते तुझ्या चित्तीं मानेना ॥ ९३ ॥
एक एक रत्‍नासी । द्वीपांतरींचें मोल परियेसीं ।
उपायनें श्रीरामासीं । अति प्रीतीसी आणिलीं ॥ ९४ ॥
तेणेकरी तुझें पूजन । स्वयें करीत रघुनंदन ।
तेंही न माने तुजलागून । हें अंतर गहन कळेना ॥ ९५ ॥
अंगीकारोनि वानरवृत्त । स्वयें दाविसी अनुचरित ।
रत्‍नें तोडतोडूं टाकित । आणि उपमत द्रुमशिखरीं ॥ ९६ ॥
याचा काय अभिप्राय । राउळें सांगावा स्वयमेव ।
पुसतसे बंधु राव । महाबाहो हनुमंत ॥ ९७ ॥
ऐकोनि सौमित्रवचन । मर्कटचेष्टा अंगीकारून ।
विटावण दाखवून । बोले वचन तें ऐका ॥ ९८ ॥


हनुमंताचे मार्मिक उत्तर :


आम्ही मर्कट वनचरें । अंकी बैसविलें प्रेमें थोरे ।
जेणेंकरोनि पोट भरे । ऐसें आदरें देईल ॥ ९९ ॥
ऐसी धरोनि थोर आस । अंकीं बैसलों सावकाश ।
तंव ते झाली निराश । अंतर राघवेश जाणेना ॥ १०० ॥
अंतरीं तळमळ गहन । बाह्य पूजेचे कार्य कोण ।
अंतर तृप्त न होतां पूर्ण । विटंबन बाह्यपूजा ॥ १०१ ॥
चुकवोनियां निजमुखासी । क्षीरलेप देतां सर्वांगासी ।
नव्हे सुधानिवारणासी । तळमळ कैसी जाईल ॥ १०२ ॥
अंतरीं न विझेचि तळमळ । वरी गोड गाणीं प्रबळ ।
गात्रें जाती विकळ । कृपाकळवळ ते ऐशी ॥ १०३ ॥
टक पडिलें सुरसिद्धांसीं । टक पडिलें नरवानरांसी ।
अंकीं बैसवोनि हनुम्यासी । श्रीराम त्यासी काय देईल ॥ १०४ ॥
तंव गौरविलें रघुनाथें । वरिवरी अंलकारीं बहुतें ।
अंतर अवघें तैसेंचि रितें । जेंवी कां प्रेते कानड्यांची ॥ १०५ ॥
मांडी घालोनि प्रेतातें । अलंकारिती प्रेमें बहुतें ।
तैसेंचि केलें रघुनाथे । बाह्य आमुतें पूजोनी ॥ १०६ ॥
श्रीरामाचें कृपादान । दगडाहुनि अति कठिण ।
खातां पडतील दशन । सुधाहरण तेथें कैचें ॥ १०७ ॥
रत्‍नें सुढाळें दिसती । खातां बहु गोड असती ।
म्हणोनि तोडोनियां प्रीतीं । मुखाप्रती पातलीं ॥ १०८ ॥


ज्यांच्यात ’राम’ नाही ती रत्‍ने मला दगडासारखी आहेत
म्हणून मी ती फोडली असे मारुतीने सांगितले :


फोडोनि पाहिले एकएक । तंव ती अवघी तैसींच देख ।
मग म्यां सांडिलीं निःशेख । मर्कटवेशें साचार ॥ १०९ ॥


रामरत्‍नमहं वंदे कौसल्याकुक्षिसंभवम् ।
जानलीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम् ॥ ८ ॥


तुमची अनर्ध्य रत्‍नें स्वामी । त्यातें दगड मानू आम्ही ।
हे अति उच्छृंखळता दुर्गमी । क्षमा तुम्हीं करावी ॥ ११० ॥
ऐकतां हनुम्याचें उत्तर । सौमित्र झाला विस्मयपर ।
कांही न देववे प्रत्युत्तर । सकळ सुर तटस्थ ॥ १११ ॥
यक्ष किन्नर गंधर्वगण । सिद्ध चारण मुनिजन ।
ब्रह्मादिक सुरगण । आश्चर्ये पूर्ण हांसती ॥ ११२ ॥


इतर वानरांचा हैदोस :


देखोनि हनुम्याची चर्या । सकळ वानरी तेचि क्रिया ।
अश्व सुगारिती पुच्छीं धरूनियां । त्राणें तोडोनियां सांडिती ॥ ११३ ॥
माळा तोडिती तडतडां । मणि फोडिती कडकडां ।
आवेश आलासे माकडां । उडती झाडां आवेशें ॥ ११४ ॥
हातीं धरोनियां पुच्छी । अश्व झुगारिती आवेशीं ।
भीति नाहीं कन्हीयासी । शिबिका सुखासनांसी त्यागिती ॥ ११५ ॥
एक वानर आनंदातें । कांखे घेवोनि गजातें ।
एक कांखे घेती कन्हीयातें । एक अह्यातें घेवोनि फळें खाती ॥ ११६ ॥
सकळ सभा पै हांसत । वसिष्ठ राम आश्चर्य करित ।
समस्त देव पाहत । विपरीतार्थ वानरांचा ॥ ११७ ॥
हांसतां मुरकुंडी वळती । एक एकाकडे पाहती ।
ऐसियाची सहजस्थिती । बाप रघुपति कृपाळू ॥ ११८ ॥


श्रीरामांची उद्विग्नता :


तें देखोनि रघुनंदन । झाला अति उद्विग्न ।
हनुमंतासी समाधान । उपाय कोण तदर्थी ॥ ११९ ॥
संतोषावया वानरा । अंकीं बैसविलें आदरा ।
तें न माने याचिया विचारा । रघुवीरा अति चिंता ॥ १२० ॥
देश दुर्ग देऊं यासी । तेंही न माने हनुमंतासी ।
निःस्पृह सर्वथा मानसीं । देशदुर्गासी पे न घे ॥ १२१ ॥
माझ्या अंकावरी पूजन । स्वयें न मानी वायुनंदन ।
रत्‍नें टाकितसे तोडून । माळा जाण विखुरल्या ॥ १२२ ॥
आता यासी उपाय एक । सवें जेवोनि आवश्यक ।
घ्यावे हनुमंताचे शेख । उपाय आणिक दिसेना ॥ १२३ ॥
ऐसा करोनि विचार । कृपापूर्वक रघुवीर ।
बोलावोनि हनुमान वीर । काय उत्तर बोलते ॥ १२४ ॥


श्रीरामांची मारुतीला विनंती :


पवनात्मजा परिस विनंती । तुझी पूजा निजनिश्चतीं ।
स्वयें नेणेंचि मी मूढमती । क्षमा ये अर्थी करावी ॥ १२५ ॥
क्षमा करोनि सकळिक । जेणें तुज वाटे सुख ।
तेंचि सांगावें आवश्यक । करणें निःशेख तें मज ॥ १२६ ॥
म्हणोनि वंदोनियां चरण । हृदयीं धरिला आलिंगून ।
हृद्‌गत सांगावे संपूर्ण । करणें जाण तेंचि मज ॥ १२७ ॥
येचविषयीं सर्वथा । आन करणें नाहीं चित्ता ।
मज आन नाहीं पढियंता । आण तत्वतां पै तुझी ॥ १२८ ॥
तुझी आण वाहिली जाण । हे परमात्म्यावरील प्रमाण ।
अन्यथा न मानावें आपण । आत्मा जाण तूं माझा ॥ १२९ ॥


हनुमंताचे उत्तर :


ऐकोनि श्रीरामाचें वचन । हनुमान घाली लोटांगण ।
श्रीरामवचन अप्रमाण । मानी तो पूर्ण आत्मघाती ॥ १३० ॥
राम अवतारा अवतारु । तोचि जगाचा जगद्‌गुरु ।
त्याचे वचनीं विकल्प थोरु ।धरी तो नरु आत्मघाती ॥ १३१ ॥
गुरुवचनीं विकल्पात्मक । न चुकती त्याचे आकल्प नरक ।
आत्मघाती तो आवश्यक । सुटका देख त्या कैंची ॥ १३२ ॥
आतां एक विज्ञापन । जरी दिधलें अभयदान ।
तरी जैं आम्ही घेऊं मागोन । कृपा करोन तें द्यावें ॥ १३३ ॥
द्वारा याचक आले असतां । न व्हावें पराङ्मुख सर्वथा ।
औदार्यें तूं अगाध दाता । दीन मागता मी तुझा ॥ १३४ ॥
तूं स्वामी अर्थसंपन्न । मी याचक मागता दीन ।
जे मागेन प्रीतीकरोन । तें आपण अर्पावे ॥ १३५ ॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । श्रीराम झाला सुखैकघन ।
संकट निरसिलें हनुमेन । मागेल आपण तें देऊ ॥ १३६ ॥
आम्हांसी होती परम चिंता । काय अर्पावे हनुमंता ।
तें निरसिलें तत्वतां । झाला मागता स्वयेंचि ॥ १३७ ॥
ऐसें विचारोनि निश्चयेसीं । आला केली हनुमंतासी ।
जे जे अपेक्षा मानसीं । तें प्रीतीसीं मागावें ॥ १३८ ॥


त्याची नैवेद्य-प्रसादाची मागणी :


ऐकोनि श्रीराम वचन । हनुमान झाला आनंदघन ।
दिधले अभय वरदान । तरी ऐक मागेन तें स्वामी ॥ १३९ ॥
असता वनांतरीं । उपवासी फळाहारी ।
पारणाविधीची परी । आम्हीं डोळेभरी पहावी ॥ १४० ॥
पारणाविधीचें शेख । आम्हां पावल्या आवश्यक ।
संभावना सकळिक । एक एक पावली ॥ १४१ ॥
येविषयीं शिष्टांचें । वचन ऐकिलें साचें ।
बळ धरोनियां त्याचें । करू याचनेतें स्वामिया ॥ १४२ ॥
येचविषयींचा श्लोकार्थ । स्वामी ऐका सावचित्त ।
निजप्रेमें कृपायुक्त । ऐका निश्चित कृपानिधी ॥ १४३ ॥


महाप्रसाद इत्युक्त्वा ग्राह्यमंजीलीभिर्बुधेः ।
पादोदकं व निर्माल्य नैवेद्यं च विशेषत: ॥ ९ ॥


नैवेद्य प्रसादाचा महिमा :


झालिया पूजाविधान । तीर्थ प्रसाद निर्माल्य जाण ।
स्वामीपासीं प्रार्थन । करोनि आपण मागावे ॥ १४४ ॥
प्राप्त होय नैवेद्यशेख । तरी भाग्य अलोलिक ।
आगमी निर्वचन देख । श्रुति सम्यक् गर्जती ॥ १४५ ॥
निजदासाचा धर्म पूर्ण । शेष मागावें प्रार्थून ।
तें हाता आलिया जाण । सकळ संभावना पावली ॥ १४६ ॥
होते श्रीरामाचें मनीं । तेंचि मागितलें हनुमेनी ।
एकें अन्ययें वर्तती दोनी । देव भक्त होवोनी श्रीराम ॥ १४७ ॥
तें अपूर्व निरूपण । निजभक्तासी आपण ।
निजशेष देवोनि पूर्ण । रघुनंदन सुखावेल ॥ १४८ ॥
एका जनार्दना शरण । निजभक्ताचे प्रेम पूर्ण ।
कृपापूर्वक सावधान । निजनिरूपण परिसावें ॥ १४९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमद्विनोदचरितं नाम सप्ताशीतितमोऽध्यायः ॥ ८७ ॥
ओंव्या ॥ १४९ ॥ फ्लोक ॥ ९ ॥ एवं १५८ ॥

GO TOP