श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चतुश्चत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्याज्ञया समेषां भ्रातृणां तत्पार्श्व आगमनम् -
श्रीरामांनी बोलावल्यावरून सर्व भावांनी त्यांच्याजवळ येणे -
विसृज्य तु सुहृद्‌वर्गं बुद्ध्या निश्चित्य राघवः ।
समीपे द्वाःस्थमासीनं इदं वचनमब्रवीत् ॥ १ ॥
मित्र मंडळीना निरोप देऊन राघवांनी बुद्धिने विचार करून आपले कर्तव्य निश्चित केले आणि निकटवर्ती द्वारपालास याप्रमाणे म्हटले - ॥१॥
शीघ्रमानय सौमित्रिं लक्ष्मणं शुभलक्षणम् ।
भरतं च महाभागं शत्रुघ्नमपराजितम् ॥ २ ॥
तू जाऊन शीघ्रच महाभाग भरत, सुमित्राकुमार शुभलक्षणी लक्ष्मण तसेच अपराजित वीर शत्रुघ्नालाही येथे बोलावून आण. ॥२॥
रामस्य वचनं श्रुत्वा द्वाःस्थो मूर्ध्नि कृताञ्जलिः ।
लक्ष्मणस्य गृहं गत्वा प्रविवेशानिवारितः ॥ ३ ॥
श्रीरामांचा हा आदेश ऐकून द्वारपालाने मस्तकावर अंजली बांधून त्यांना प्रणाम केला आणि लक्ष्मणांच्या घरी जाऊन कुणी अडविले नसता सरळ आत प्रवेश केला. ॥३॥
उवाच सुमहात्मानं वर्धयित्वा कृताञ्जलिः ।
द्रष्टुमिच्छति राजा त्वां गम्यतां तत्र मा चिरम् ॥ ४ ॥
तेथे हात जोडून जयजयकार करीत त्याने महात्मा लक्ष्मणांना म्हटले -कुमार ! महाराज आपल्याला भेटू इच्छितात, म्हणून शीघ्र चलावे, विलंब करू नये. ॥४॥
बाढमित्येव सौमित्रिः कृत्वा राघवशासनम् ।
प्राद्रवद् रथमारुह्य राघवस्य निवेशनम् ॥ ५ ॥
तेव्हा सुमित्राकुमार लक्ष्मणांनी फार चांगले म्हणून राघवांचा आदेश शिरोधार्य केला आणि तात्काळ रथावर बसून ते राघवाच्या महालाकडे तीव्रगतीने निघाले. ॥५॥
प्रयान्तं लक्ष्मणं दृष्ट्‍वा द्वाःस्थो भरतमन्तिकात् ।
उवाच भरतं तत्र वर्धयित्वा कृताञ्जलिः ॥ ६ ॥

विनयावनतो भूत्वा राजा त्वां द्रष्टुमिच्छति ।
लक्ष्मणास जातांना पाहून द्वारपाल भरतांजवळ गेला आणि त्यांना हात जोडून तेथे जय-जयकार करून विनीतभावाने म्हणाला - प्रभो ! महाराज आपल्याला भेटू इच्छितात. ॥६ १/२॥
भरतस्तु वचःश्रुत्वा द्वाःस्थाद् रामसमीरितम् ॥ ७ ॥

उत्पपातासनात् तूर्णं पद्‌भ्यामेव महाबलः ।
श्रीरामांनी धाडलेल्या द्वारपालाने वचन ऐकून महाबली भरत तात्काळ आपल्या आसनावरून उठून उभे राहिले आणि पायीच चालू लागले. ॥७ १/२॥
दृष्ट्‍वा प्रयान्तं भरतं त्वरमाणः कृताञ्जलिः ॥ ८ ॥

शत्रुघ्नभवनं गत्वा ततो वाक्यमुवाच ह ।
भरतास जातांना पाहून द्वारपाल मोठ्‍या उतावळेपणाने शत्रुघ्नांच्या भवनात गेले आणि हात जोडून बोलले - ॥८ १/२॥
एह्यागच्छ रघुश्रेष्ठ राजा त्वां द्रष्टुमिच्छति ॥ ९ ॥

गतो हि लक्ष्मणः पूर्वं भरतश्च महायशाः ।
रघुश्रेष्ठ ! या, चला, राजा राम आपल्याला पाहू इच्छितात. श्रीलक्ष्मण आणि महायशस्वी भरत आधीच जान्यास निघाले आहेत. ॥९ १/२॥
श्रुत्वा तु वचनं तस्य शत्रुघ्नः परमासनात् ॥ १० ॥

शिरसा वंद्य धरणीं प्रययौ यत्र राघवः ।
द्वारपालाचे वचन ऐकून शत्रुघ्न आपल्या उत्तम आसनावरून उठले आणि जमिनीवर मस्तक टेकून मनातल्या राघवांना वंदन करून तात्काळ त्यांच्या निवासस्थानाकडे जाण्यास निघाले. ॥१० १/२॥
द्वाःस्थस्त्वागम्य रामाय सर्वानेव कृताञ्जलिः ॥ ११ ॥

निवेदयामास तदा भ्रातॄन् स्वान् समुपस्थितान् ।
द्वारपालाने येऊन रामांना हात जोडून निवेदन केले की प्रभो ! आपले सर्व भाऊ द्वारावर उपस्थित झाले आहेत. ॥११ १/२॥
कुमारान् आगतान् शृत्वा चिन्ताव्याकुलितेन्द्रियः ॥ १२ ॥

अवाङ्‌मुखो दीनमना द्वाःस्थं वचनमब्रवीत् ।
प्रवेशय कुमारांस्त्वं मत्समीपं त्वरान्वितः ॥ १३ ॥

एतेषु जीवितं मह्यं एते प्राणाः प्रिया मम ।
कुमारांचे आगमन ऐकून चिंतेने इन्द्रिये व्याकुळ झालेल्या श्रीरामांनी खाली मुख करून दुःखी मनाने द्वारपालाला आदेश दिला - तू तीन्ही राजकुमारांना लवकर माझ्याजवळ घेऊन ये. माझे जीवन त्यांच्यावर अवलंबून आहे. ते माझे प्रिय प्राणस्वरूप आहेत. ॥१२-१३ १/२॥
आज्ञप्तास्तु नरेन्द्रेण कुमाराः शुक्लवाससः ॥ १४ ॥

प्रह्वाः प्राञ्जलयो भूत्वा विविशुस्ते समाहिताः ।
महाराजांची आज्ञा मिळताच ते श्वेत वस्त्रधारी कुमार मस्तक नमवून हात जोडून एकाग्रचित्त होऊन भवनाच्या आत गेले. ॥१४ १/२॥
ते तु दृष्ट्‍वा मुखं तस्य सग्रहं शशिनं यथा ॥ १५ ॥

सन्ध्यागतमिवादित्यं प्रभया परिवर्जितम् ।
त्यांना रामांचे मुख जणु चंद्रम्याला ग्रहण लागावे तसे उदास दिसले. ते मुख सायकांळच्या सूर्याप्रमाणे प्रभाशून्य होत होते. ॥१५ १/२॥
बाष्पपूर्णे च नयने दृष्ट्‍वा रामस्य धीमतः ।
हतशोभं यथा पद्मं मुखं वीक्ष्य च तस्य ते ॥ १६ ॥
त्यांनी वारंवार पाहिले की बुद्धिमान्‌ रामांच्या दोन्ही डोळ्यात अश्रु उभे राहिले होते आणि त्यांच्या मुखारविंदाची शोभा हरली गेली होती. ॥१६॥
ततोऽभिवाद्य त्वरिताः पादौ रामस्य मूर्धभिः ।
तस्थुः समाहिताः सर्वे रामस्त्वश्रूण्यवर्तयत् ॥ १७ ॥
त्यानंतर त्या तीन्ही भावांनी तात्काळ श्रीरामांच्या चरणी मस्तक ठेवून प्रणाम केला. नंतर ते सर्वच्यासर्व प्रेमात समाधिस्थच झाल्यासारखे झाले. त्या समयी श्रीराम अश्रु ढाळीत राहिले होते. ॥१७॥
तान् परिष्वज्य बाहुभ्यां उत्थाप्य च महाबलः ।
आसनेष्वासतेत्युक्त्वा ततो वाक्यं जगाद ह ॥ १८ ॥
महाबली श्रीरामांनी दोन्ही हात उचलून त्या सर्वांना आलिंगन दिले आणि म्हटले - या आसनांवर बसा. जेव्हा ते बसले तेव्हा त्यांनी परत म्हटले - ॥१८॥
भवन्तो मम सर्वस्वं भवन्तो जीवितं मम ।
भवद्‌भिश्च कृतं राज्यं पालयामि नरेश्वराः ॥ १९ ॥
राजकुमारांनो ! तुम्ही माझे सर्वस्व आहात. तुम्हीच माझे जीवन आहात आणि तुमच्या द्वारा संपादित या राज्याचे मी पालन करत आहे. ॥१९॥
भवन्तः कृतशास्त्रार्था बुद्ध्या च परिनिष्ठिताः ।
सम्भूय च मदर्थोऽयं अन्वेष्टव्यो नरेश्वराः ॥ २० ॥
नरेश्वरांनो ! तुम्ही सर्व शास्त्रांचे ज्ञाते आणि त्यात सांगितलेल्या कर्तव्याचे पालन करणारे आहात. तुमची बुद्धिही परिपक्व आहे. या समयी मी जे कार्य तुमच्या समोर उपस्थित करणारे आहे त्याचे तुम्ही सर्वांनी मिळून संपादन करावयस हवे. ॥२०॥
तथा वदति काकुत्स्थे अवधानपरायणाः ।
उद्विग्नमनसः सर्वे किं नु राजाभिधास्यति ॥ २१ ॥
काकुत्स्थ श्रीरामचंद्रानी असे म्हटल्यावर सर्व भाऊ सावध झाले (अवधान्‌ परायण झाले). त्यांचे चित्त उद्विग्न झाले आणि सर्व विचार करू लागले -न जाणो महाराज आम्हांला काय सांगणार आहेत ? ॥२१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुश्चत्वारिंशः सर्गः ॥ ४४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा चौव्वेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP