[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। दशाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वसिष्ठस्य सृष्टिपरम्परया सहेक्ष्वाकुकुलपरम्परामुपवर्ण्य ज्येष्ठस्यैव राज्याभिषेचनमुचितमिति निश्चित्य श्रीरामं प्रति राज्यग्रहणार्थमनुरोधः -
वसिष्ठांनी सृष्टिपरंपरे बरोबर इक्ष्वाकु कुलाची परंपरा सांगून ज्येष्ठालाच राज्याभिषेकाचे औचित्य सिद्ध करणे आणि श्रीरामांना राज्य ग्रहण करण्यास सांगणे -
क्रुद्धमाज्ञाय रामं तं वसिष्ठः प्रत्युवाच ह ।
जाबालिरपि जानीते लोकस्यास्य गतागतिम् ॥ १ ॥
श्रीराम रागावलेले आहेत हे जाणून महर्षि वसिष्ठांनी त्यांना म्हटले - "रघुनंदन ! महर्षि जाबालि हे जाणतात की या लोकातील प्राण्यांचे परलोकात येणेजाणे होत असते (म्हणून ते नास्तिक नव्हेत). ॥ १ ॥
निवर्तयितुकामस्तु त्वामेतद् वाक्यमब्रवीत् ।
इमां लोकसमुत्पत्तिं लोकनाथ निबोध मे ॥ २ ॥
’जगदीश्वर ! या वेळी तुम्ही अयोध्येस परत यावे म्हणूनच त्यांनी असे हे नास्तिकतापूर्ण भाषण केले होते. तुम्ही माझ्याकडून या लोकाच्या उत्पत्तीचा वृत्तांत ऐका. ॥ २ ॥
सर्वं सलिलमेवासीत् पृथिवी तत्र निर्मिता ।
ततः समभवद् ब्रह्मा स्वयंभूर्दैवतैः सह ॥ ३ ॥
’सृष्टीच्या प्रारंभकाळात सर्व काही जलमयच होते. त्या जलातच पृथ्वीची निर्मिती झाली. त्यानंतर देवतांसह स्वयंभू ब्रह्मा (ब्रह्मदेव) प्रकट झाले. ॥ ३ ॥
स वराहस्ततो भूत्वा प्रोज्जहार वसुंधराम् ।
असृजच्च जगत् सर्वं सह पुत्रैः कृतात्मभिः ॥ ४ ॥
’त्यानंतर त्या भगवान् विष्णुस्वरूप ब्रह्मानेच वराहरूपाने प्रकट होऊन जलांतून या पृथ्वीला बाहेर काढली; आणि आपल्या कृतात्मा पुत्रांसह या संपूर्ण जगताची सृष्टी (उत्पती) केली. ॥ ४ ॥
आकाशप्रभवो ब्रह्मा शाश्वतो नित्य अव्ययः
तस्मान्मरीचिः संजज्ञे मरीचेः कश्यपः सुतः ॥ ५ ॥
अकाशस्वरूप परब्रह्म परमात्म्यापासून ब्रह्मदेवांचा प्रादुर्भाव झाला आहे, जे नित्य सनातन आणि अविनाशी आहेत. त्यांच्यापासून मरीचि प्रकट झाले आणि मरीचिंचे पुत्र कश्यप झाले. ॥ ५ ॥
विवस्वान् काश्यपाज्जज्ञे मनुर्वैवस्वतः स्वयम् ।
स तु प्रजापतिः पूर्वमिक्ष्वाकुस्तु मनोः सुतः ॥ ६ ॥
कश्यपापासून विवस्वानाचा जन्म झाला. विवस्वानाचे पुत्र साक्षात् वैवस्वत मनु झाले, जे पहिले प्रजापति होते. मनुचे पुत्र इक्ष्वाकु झाले. ॥ ६ ॥
यस्येयं प्रथमं दत्ता समृद्धा मनुना मही ।
तमिक्ष्वाकुमयोध्यायां राजानं विद्धि पूर्वकम् ॥ ७ ॥
ज्यांच्या हाती मनुने सर्वात प्रथम या पृथ्वीचे समृद्धिशाली राज्य सोपविले होते त्या राजा इक्ष्वाकुला तुम्ही अयोध्येचा पहिला राजा समजा. ॥ ७ ॥
इक्ष्वाकोस्तु सुतः श्रीमान् कुक्षिरित्येव विश्रुतः ।
कुक्षेरथात्मजो वीरो विकुक्षिरुदपद्यत ॥ ८ ॥
’इक्ष्वाकुचे पुत्र श्रीमान् कुक्षिच्या नावाने विख्यात झाले. कुक्षिचे वीर पुत्र विकुक्षि झाले. ॥ ८ ॥
विकुक्षेस्तु महातेजा बाणः पुत्रः प्रतापवान् ।
बाणस्य तु महाबाहुरनरण्यो महातपाः ॥ ९ ॥
’विकुक्षिचे महातेजस्वी प्रतापी पुत्र बाण झाले. बाणाचे महाबाहु पुत्र अनरण्य झाले, जे फार मोठे तपस्वी होते. ॥ ९ ॥
नानावृष्टिर्बभूवास्मिन् न दुर्भिक्षं सतां वरे ।
अनरण्ये महाराजे तस्करो वापि कश्चन ॥ १० ॥
’सत्पुरुषांत श्रेष्ठ महाराज अनरण्य यांच्या राज्यात कधी अनावृष्टि झाली नाही, दुष्काळ पडल नाही आणि कुणी चोरही उत्पन्न झाला नाही. ॥ १० ॥
अनरण्यान्महाराज पृथू राजा बभूव ह ।
तस्मात् पृथोर्महातेजास्त्रिशङ्‌कुरुदपद्यत ॥ ११ ॥
’महाराज ! अनरण्यापासून राजा पृथु झाले. त्या पृथुपासून महातेजस्वी त्रिशंकुची उत्पत्ती झाली. ॥ ११ ॥
स सत्यवचनाद् वीरः सशरीरो दिवं गतः
त्रिशङ्‌कोरभवत् सूनुर्धुन्धुमारो महायशाः ॥ १२ ॥
’ते वीर त्रिशंकु विश्वामित्राच्या सत्यवचनाच्या प्रभावाने सदेह स्वर्गलोकी निघून गेले होते. त्रिशंकुचे पुत्र महायशस्वी धुंधुमार झाले. ॥ १२ ॥
धुन्धुमारान् महातेजा युवनाश्वो व्यजायत ।
युवनाश्वसुतः श्रीमान् मान्धाता समपद्यत ॥ १३ ॥
’धुंधुमारापासून महातेजस्वी युवनाश्वांचा जन्म झाला. युवनाश्वाचे पुत्र श्रीमान् मांधाता झाले. ॥ १३ ॥
मान्धातुस्तु महातेजाः सुसंधिरुदपद्यत ।
सुसन्धेरपि पुत्रौ द्वौ ध्रुवसंधिः प्रसेनजित् ॥ १४ ॥
’मांधात्याचे महान् तेजस्वी पुत्र सुसंधि झाले. सुसंधिला दोन पुत्र झाले. ध्रुवसंधि आणि प्रसेनाजित्. ॥ १४ ॥
यशस्वी ध्रुवसंधेस्तु भरतो रिपुसूदनः ।
भरतात् तु महाबाहोरसितो नाम जायत ॥ १५ ॥
’ध्रुवसंधिचे यशस्वी पुत्र शत्रुसूदन भरत होते. महाबाहु भरतापासून असित नामक पुत्र उत्पन्न झाला. ॥ १५ ॥
यस्यैते प्रतिराजान उदपद्यन्त शत्रवः ।
हैहयास्तालजङ्‌घाश्च शूराश्च शशिबिन्दवः ॥ १६ ॥
त्यांचे शत्रुभूत प्रतिपक्षी राजे होते. हैहय, तालजंघ आणि शूर शशबिंदु उत्पन्न झाले होते. ॥ १६ ॥
तांस्तु सर्वान् प्रतिव्यूह्य युद्धे राजा प्रवासितः ।
स च शैलवरे रम्ये बभूवाभिरतो मुनिः ॥ १७ ॥
त्या सर्वांचा सामना करण्यासाठी सेनेचा व्यूह रचून युद्धासाठी खिळून राहूनही शत्रूंची संख्या अधिक असल्यामुळे राजा असित यास परदेशात आश्रय घ्यावा लागला. ते रमणीय शैलशिखरावर प्रसन्नतापूर्वक राहून मुनिभावाने परमात्म्याचे मनन चिंतन करू लागले. ॥ १७ ॥
द्वे चास्य भार्ये गर्भिण्यौ बभूवतुरिति श्रुतिः ।
तत्र चैका महाभागा भार्गवं देववर्चसम् ॥ १८ ॥

ववन्दे पद्मपत्राक्षी काङ्‌क्षिणी पुत्रमुत्तमम् ।
एका गर्भविनाशाय सपत्‍न्यै गरलं ददौ ॥ १९ ॥
’असे ऐकले जाते की असितच्या दोन पत्‍नी गर्भवती होत्या. त्यापैकी एक महाभागा कमललोचना राजपत्‍नीने उतम पुत्र प्राप्तीची अभिलाषा ठेवून देवतुल्य तेजस्वी भृगुवंशी च्यवन मुनिच्या चरणांची वंदन केली आणि दुसर्‍या राणीने आपल्या सवतिच्या गर्भाचा विनाश करण्यासाठी तिला विष दिले. ॥ १८-१९ ॥
भार्गवश्च्यवनो नाम हिमवन्तमुपाश्रितः ।
तमृषिं साभ्युपागम्य कालिन्दी त्वभ्यवादयत् ॥ २० ॥
’त्यावेळी भृगुवंशी च्यवनमुनि हिमालयावर राहात होते. राजा असितच्या कालिंदी नाम असणार्‍या पत्‍नीने ऋषिंच्या चरणी पोहोंचून त्यांना प्रणाम केला. ॥ २० ॥
स तामभ्यवदत् प्रीतो वरेप्सुं पुत्रजन्मनि ।
पुत्रस्ते भविता देवि महात्मा लोकविश्रुतः ॥ २१ ॥

धार्मिकश्च सुभीमश्च वंशकर्तारिसूदनः ।
मुनिंनी प्रसन्न होऊन पुत्राच्या उत्पत्तिसाठी वरदान इच्छिणार्‍या राणीला या प्रकार म्हटले - "देवी ! तुला एक महामनस्वी लोकविख्यात पुत्र प्राप्त होईल, जो धर्मात्मा, शत्रूंना अत्यंत भयंकर, आपला वंश चालविणारा आणि शत्रुंचा संहारक होईल. ॥ २१ १/२ ॥
श्रुत्वा प्रदक्षिणं कृत्वा मुनिं तमनुमान्य च ॥ २२ ॥

पद्मपत्रसमानाक्षं पद्मगर्भसमप्रभम् ।
ततः सा गृहमागम्य पत्‍नी पुत्रमजायत ॥ २३ ॥
’हे ऐकून राणीने मुनिंची परिक्रमा केली आणि त्यांचा निरोप घेऊन तेथून घरी आल्यावर त्या राणीने एका पुत्रास जन्म दिला, ज्याची कांति कमलाच्या आतील भागाप्रमाणे सुंदर होती आणि नेत्र कमलदलाप्रमाणे मनोहर होते. ॥ २२-२३ ॥
सपत्‍न्या तु गरस्तस्यै दत्तो गर्भजिघांसया ।
गरेण सह तेनैव तस्मात् स सगरोऽभवत् ॥ २४ ॥
’सवतिने तिच्या गर्भास नष्ट करण्यासाठी जे गर (विष) दिले होते, त्या गरासहच ते बालक प्रकट झाले, म्हणून सगर नामाने प्रसिद्ध झाले. ॥ २४ ॥
स राजा सगरो नाम यः समुद्रमखानयत् ।
इष्ट्‍वा पर्वणि वेगेन त्रासयान इमाः प्रजाः ॥ २५ ॥
’राजा सगर ते हेच होत, ज्यांनी पर्वदिवशी यज्ञाची दीक्षा ग्रहण करून खोदण्याच्या वेगाने या समस्त प्रजांना भयभीत करून आपल्या पुत्रांच्या द्वारे समुद्रही खोदून काढला होता. ॥ २५ ॥
असमञ्जस्तु पुत्रोऽभूत् सगरस्येति नः श्रुतम् ।
जीवन्नेव स पित्रा तु निरस्तः पापकर्मकृत् ॥ २६ ॥
’आमच्या असे ऐकीवात आले आहे की सगरांचे पुत्र असमंजस झाले ज्यांना पापकर्मात प्रवृत्त झाल्यामुळे पित्याने हयात असतानाच राज्यातून घालवून दिले होते. ॥ २६ ॥
अंशुमानपि पुत्रोऽभूदसमञ्जस्य वीर्यवान् ।
दिलीपोंऽशुमतः पुत्रो दिलीपस्य भगीरथः ॥ २७ ॥
’असमंजसचे पुत्र झाले अंशुमान, जे फार पराक्रमी होते. अंशुमानाचे दिलीप आणि दिलीपचे पुत्र भगिरथ झाले. ॥ २७ ॥
भगीरथात् ककुत्स्थश्च काकुत्स्था येन तु श्रुताः ।
ककुत्स्थस्य च पुत्रोऽभूद् रघुर्येन तु राघवाः ॥ २८ ॥
’भगिरथापासून काकुत्स्थाचा जन्म झाला; ज्यांच्यामुळे त्यांच्या वंशजांना ’काकुत्स्थ’ म्हटले जाते. काकुत्स्थाचे पुत्र रघु झाले, ज्यांच्यामुळे त्यांच्या वंशातील लोकांना ’राघव’ म्हटले जाऊ लागले. ॥ २८ ॥
रघोस्तु पुत्रस्तेजस्वी प्रवृद्धः पुरुषादकः ।
कल्माषपादः सौदास इत्येवं प्रथितो भुवि ॥ २९ ॥
’रघुचे तेजस्वी पुत्र कल्माषपाद झाले, जे मोठे झाल्यावर शापवश काही वर्षे नरभक्षक राजे झाले होते. ते या पृथ्वीवर सौदास नामाने विख्यात होते. ॥ २९ ॥
कल्माषपादपुत्रोऽभूच्छङ्‌खणस्त्विति नः श्रुतम् ।
यस्तु तद्वीर्यमासाद्य सहसैन्यो व्यनीनशत् ॥ ३० ॥
’कल्माषपादाचे पुत्र शंखण झाले असे आमच्या ऐकिवात आले आहे, जे युद्धात सुप्रसिद्ध पराक्रम करूनही सेनेसहित नष्ट होऊन गेले होते. ॥ ३० ॥
शङ्‌खणस्य च पुत्रोऽभूच्छूरः श्रीमान् सुदर्शनः ।
सुदर्शनस्याग्निवर्ण अग्निवर्णस्य शीघ्रगः ॥ ३१ ॥
’शंखणांचे शूरवीर पुत्र श्रीमान् सुदर्शन झाले. सुदर्शनचे पुत्र अग्निवर्ण आणि अग्निवर्णाचे पुत्र शीघ्रग झाले. ॥ ३१ ॥
शीघ्रगस्य मरुः पुत्रो मरोः पुत्रः प्रशुश्रुवः ।
प्रशुश्रुवस्य पुत्रोऽभूदम्बरीषो महामतिः ॥ ३२ ॥
’शीघ्रगचे पुत्र मरु, मरुचे पुत्र प्रशुश्रुव आणि प्रशुश्रुवचे पुत्र अंबरीष झाले. ॥ ३२ ॥
अम्बरीषस्य पुत्रोऽभून्नहुषः सत्यविक्रमः ।
नहुषस्य च नाभागः पुत्रः परमधार्मिकः ॥ ३३ ॥
’अंबरीषाचे पुत्र सत्यपराक्रमी नहुश होते. नहुषाचे पुत्र नाहाग झाले. ते फार धर्मात्मा होते. ॥ ३३ ॥
अजश्च सुव्रतश्चैव नाभागस्य सुतावुभौ ।
अजस्य चैव धर्मात्मा राजा दशरथः सुतः ॥ ३४ ॥
’नाभागला दोन पुत्र होते - अज आणि सुव्रत. अजाचे धर्मात्मा पुत्र दशरथ राजा झाले. ॥ ३४ ॥
तस्य ज्येष्ठोऽसि दायादो राम इत्यभिविश्रुतः ।
तद् गृहाण स्वकं राज्यमवेक्षस्व जगन्नृप ॥ ३५ ॥
’दशरथांचे ज्येष्ठ पुत्र तुम्ही आहात, ज्यांची राम नावाने प्रसिद्धि आहे. नरेश्वर ! हे अयोध्येचे राज्य तुमचे आहे. हे ग्रहण करा आणि याची देखभाल करीत रहा. ॥ ३५ ॥
इक्ष्वाकूणां हि सर्वेषां राजा भवति पूर्वजः ।
पूर्वजे नावरः पुत्रो ज्येष्ठो राजाभिषिच्यते ॥ ३६ ॥
’समस्त इक्षाकु वंशियामध्ये ज्येष्ठ पुत्रच राजा होतो. ज्येष्ठ पुत्र विद्यमान असतां लहान पुत्र राजा होत नाही. ज्येष्ठ पुत्राचाच राजाच्या पदावर अभिषेक होत असतो. ॥ ३६ ॥
स राघवाणां कुलधर्ममात्मनः
     सनातनं नाद्य विहन्तुमर्हसि ।
प्रभूतरत्‍नामनुशाधि मेदिनीं
     प्रभूतराष्ट्रां पितृवन्महायशः ॥ ३७ ॥
’महापराक्रमी श्रीरामा ! रघुवंशियांचा जो स्वतःचा सनातन कुलधर्म आहे, तो आज तू नष्ट करू नकोस. बर्‍याचशा अवांतर देशांनी युक्त आणि प्रचुर रत्‍नराशींनी संपन्न या वसुधेचे पित्यासमान पालन करा.’ ॥ ३७ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे दशोत्तरशततमः सर्गः ॥ ११० ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे दहावा सर्ग पूरा झाला ॥ ११० ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP