श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामस्य बन्धनतो मोक्षं श्रुत्वा चिन्तितेन रावणेन धूम्राक्षस्य युद्धाय प्रेषणं सेनापतिना सह तस्य नगरान्निर्गमनं च -
श्रीरामांच्या बंधनमुक्त होण्याचा पत्ता लागल्यावर चिंतित झालेल्या रावणाने धूम्राक्षाला युद्धासाठी धाडणे आणि सेनेसहित धूम्राक्षाचे नगराबाहेर येणे -
तेषां तु तुमुलं शब्दं वानराणां महौजसाम् ।
नर्दतां राक्षसैः सार्धं तदा शुश्राव रावणः ॥ १ ॥
त्या समयी भीषण गर्जना करणार्‍या महाबली वानरांचा तुमुलनाद राक्षसांसहित रावणाने ऐकला. ॥१॥
स्निग्धगंभीरनिर्घोषं श्रुत्वा तं निनदं भृशम् ।
सचिवानां ततस्तेषां मध्ये वचनमब्रवीत् ॥ २ ॥
मंत्र्यांच्या मध्ये बसलेल्या रावणाने जेव्हा तो स्निग्ध गंभीर घोष , तो उच्चस्वरात केला गेलेला सिंहनाद ऐकला, तेव्हा तो याप्रकारे बोलला- ॥२॥
यथाऽसौ संप्रहृष्टानां वानराणां उपस्थितः ।
बहूनां सुमहान् नादो मेघानामिव गर्जताम् ॥ ३ ॥

सुव्यक्तं महती प्रीतिः एतेषां नात्र संशयः ।
तथा हि विपुलैर्नादैः चुक्षुभे लवणार्णवः ॥ ४ ॥
यासमयी गर्जणार्‍या मेघांप्रमाणे जो अधिक हर्षाने भरलेल्या बहुसंख्य वानरांचा हा महान्‌ कोलाहल प्रकट होत आहे यावरून स्पष्ट कळून येत आहे की या सर्वांना फार मोठा हर्ष प्राप्त झाला आहे, यात संशय नाही. म्हणूनच याप्रकारे वारंवार केल्या गेलेल्या गर्जनांनी हा खार्‍या पाण्याचा समुद्र विक्षुब्ध झाला आहे. ॥३-४॥
तौ तु बद्धौ शरैस्तीक्ष्णैः भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
अयं च सुमहान् नादः शङ्‌कां जनयतीव मे ॥ ५ ॥
परंतु ते दोघे भाऊ रामलक्ष्मण तर तीक्ष्ण बाणांनी विंधले गेले आहेत. इकडे हा महान्‌ हर्षनादही होत आहे, ज्यामुळे माझ्या मनात शंका उत्पन्न झाली आहे. ॥५॥
एतत्तु वचनं चोक्त्वा मंत्रिणो राक्षसेश्वरः ।
उवाच नैर्ऋतांस्तत्र समीपपरिवर्तिनः ॥ ६ ॥
मंत्र्यांना असे म्हणून राक्षसराज रावणाने आपल्या जवळच उभे असलेल्या राक्षसांना म्हटले- ॥६॥
ज्ञायतां तूर्णमेतेषां सर्वेषां च वनौकसाम् ।
शोककाले समुत्पन्ने हर्षकारणमुत्थितम् ॥ ७ ॥
तुम्ही लोक शीघ्र जाऊन या गोष्टीचा पत्ता लावा की शोकाचा अवसर उपस्थित होऊनही या सर्व वानरांच्या हर्षाचे कुठले कारण प्रकट झाले आहे. ॥७॥
तथोक्तास्ते सुसंभ्रान्ताः प्राकारमधिरुह्य ते ।
ददृशुः पालितां सेनां सुग्रीवेण महात्मना ॥ ८ ॥
रावणाने याप्रकारे आदेश दिल्यावर ते राक्षस भीतभीतच गेले आणि कोटावर (तटबंदीवर) चढून महात्मा सुग्रीवाच्या द्वारे पालित वानरसेनेकडे पाहू लागले. ॥८॥
तो च मुक्तौ सुघोरेण शरबंधेन राघवौ ।
समुत्थितौ महावेगौ विषेदुः सर्वराक्षसाः ॥ ९ ॥
जेव्हा त्यांना माहीत झाले की महाभाग श्रीराम आणि लक्ष्मण त्या अत्यंत भयंकर नागरूपी बाणांच्या बंधनातून मुक्त होऊन उठलेले आहेत, तेव्हा समस्त राक्षसांना फार दुःख झाले. ॥९॥
सन्त्रस्तहृदयाः सर्वे प्राकारादवरुह्य ते ।
विषण्णवदना घोरा राक्षसेन्द्रमुपस्थिताः ॥ १० ॥
त्यांचा हृदयाचा भीतीने थरकाप झाला. ते सर्व भयानक राक्षस तटबंदीवरून उतरून उदास होऊन राक्षसराज रावणाच्या सेवेत उपस्थित झाले. ॥१०॥
तदप्रियं दीनमुखा रावणस्य च राक्षसाः ।
कृत्स्नं निवेदयामासुः यथावद्वाक्यकोविदाः ॥ ११ ॥
ते वाक्यकोविद होते. त्यांच्या मुखावर दीनता पसरली होती. त्या निशाचरांनी तो सारा अप्रिय समाचार रावणाला यथावत्‌ रूपाने सांगितला. ॥११॥
यौ ताविन्द्रजिता युद्धे भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
निबद्धौ शरबंधेन निष्प्रकम्पभुजौ कृतौ ॥ १२ ॥

विमुक्तौ शरबंधेन दृश्येते तौ रणाजिरे ।
पाशानिव गजौ छित्त्वा गजेन्द्रसमविक्रमौ ॥ १३ ॥
(ते म्हणाले-) महाराज ! कुमार इंद्रजितांनी ज्या रामलक्ष्मण या दोघा भावांना युद्धस्थळी नागरूपी बाणांच्या बंधनांनी बांधून हात हळविण्यासही असमर्थ केले होते, ते गजराजासमान पराक्रमी दोन्ही वीर जसा हत्ती दोरीला तोडून स्वतंत्र होतो त्याप्रकारे बाण-बंधना पासून मुक्त होऊन समरांगणात उभे असलेले दिसून येत आहेत. ॥१२-१३॥
तच्छ्रुत्वा वचनं तेषां राक्षसेन्द्रो महाबलः ।
चिन्ताशोकसमाक्रान्तो विषण्णवदनोऽभवत् ॥ १४ ॥
त्यांचे ते वचन ऐकून महाबली राक्षसराज रावण चिंता आणि शोक यांच्या वशीभूत झाला आणि त्याचा चेहरा उतरून गेला. ॥१४॥
घोरैर्दत्तवरैर्बद्धौ शरैराशीविषोपमैः ।
अमोघैः सूर्यसंकाशैः प्रमथ्येन्द्रजिता युधि ॥ १५ ॥

तदस्त्रबंधमासाद्य यदि मुक्तौ रिपू मम ।
संशयस्थमिदं सर्वं अनुपश्याम्यहं बलम् ॥ १६ ॥
(तो मनातल्या मनात विचार करू लागला-) जे विषधर सर्पाप्रमाणे भयंकर, वरदानाने प्राप्त झालेले आणि अमोघ होते तसेच ज्यांचे तेज सूर्यासमान होते; त्यांच्या द्वारा युद्धस्थळी इंद्रजिताने ज्यांना बांधलेले होते, ते माझे दोन्ही शत्रु जर त्या अस्त्रबंधनात पडूनही त्यातून सुटले असतील, तर मग आता मी आपल्या सार्‍या सेनेला संशयापन्नच पहात आहे. ॥१५-१६॥
निष्फलाः खलु संवृत्ताः शरा पावकतेजसः ।
आदत्तं यैः सुसंग्रामे रिपूणां जीवितं मम ॥ १७ ॥
ज्यांनी प्रथम युद्धस्थळी माझ्या शत्रूंचे प्राण हरण केले होते ते अग्नितुल्य तेजस्वी बाण निश्चितच आज निष्फल झाले आहेत. ॥१७॥
एवमुक्त्वा तु संक्रुद्धो निःश्वसन्नुरगो यथा ।
अब्रवीद् रक्षसां मध्ये धूम्राक्षं नाम राक्षसम् ॥ १८ ॥
असे म्हणून अत्यंत कुपित झालेला रावण फुस्कारणार्‍या सर्पाप्रमाणे जोरजोराने श्वास घेऊ लागला आणि राक्षसांमध्ये धूम्राक्ष नामक निशाचरास बोलला- ॥१८॥
बलेन महता युक्तो रक्षसां भीमविक्रम ।
त्वं वधायाशु निर्याहि रामस्य सह वानरैः ॥ १९ ॥
भयानक पराक्रमी वीरा ! तू राक्षसांची फार मोठी सेना बरोबर घेऊन वानरांसहित रामाचा वध करण्यासाठी शीघ्र जा. ॥१९॥
एवमुक्तस्तु धूम्राक्षो राक्षसेन्द्रेण धीमता ।
परिक्रम्य ततः शीघ्रं निर्जगाम नृपालयात् ॥ २० ॥
बुद्धिमान राक्षसराजांनी याप्रकारे आज्ञा दिल्यावर धूम्राक्षाने त्याची परिक्रमा केली आणि तो तात्काळ राजभवनांतून बाहेर पडला. ॥२०॥
अभिनिष्कम्य तद् द्वारं बलाध्यक्षमुवाच ह ।
त्वरयस्व बलं शीघ्रं किं चिरेण युयुत्सतः ॥ २१ ॥
रावणाच्या गृहद्वारावर पोहोचून त्याने सेनापतिला म्हटले - सेनेला घाईने शीघ्र तयार करा. युद्धाची इच्छा बाळगणार्‍या पुरूषाला विलंब करून काय लाभ ? ॥२१॥
धूम्राक्षवचनं श्रुत्वा बलाध्यक्षो बलानुगः ।
बलमुद्योजयामास रावणस्याज्ञया द्रुतम् ॥ २२ ॥
धूम्राक्षाचे बोलणे ऐकून रावणाच्या आज्ञेनुसार सेनापतिने, ज्याच्या मागे मोठी सेना होती, फार मोठ्‍या संख्येने सैनिकांना तयार केले. ॥२२॥
ते बद्धघण्टाबलिनो घोररूपा निशाचराः ।
विगर्जमानाः संहृष्टा धूम्राक्षं पर्यवारयन् ॥ २३ ॥
ते भयानक रूप धारण करणारे बलवान्‌ निशाचर प्रास आणि शक्ति आदि अस्त्रांमध्ये घंटा बांधून हर्ष आणि उत्साहाने युक्त होऊन जोरजोराने गर्जना करीत आले आणि धूम्राक्षाला घेरून उभे राहिले. ॥२३॥
विविधायुधहस्ताश्च शूलमुद्‌गरपाणयः ।
गदाभिः पट्टिशैर्दण्डैः आयसैः मुसलैरपि ॥ २४ ॥

परिघैः भिन्दिपालैश्च भल्लैः प्रासैः परश्वधैः ।
निर्ययू राक्षसा घोरा नर्दन्तो जलदा यथा ॥ २५ ॥
त्यांच्या हातात नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे होती. काही लोकांनी आपल्या हातात शूल आणि मुद्‌गर घेतलेले होते. गदा- पट्टिश, लोहदण्ड, मूसळ, परिघ, भिंदिपाळ, भाले, पाश आणि परशु घेऊन बरेचसे भयानक राक्षस युद्धासाठी बाहेर पडले. ते सर्व मेघासमान गंभीर गर्जना करत होते. ॥२४-२५॥
रथैः कवचिनस्त्वन्ये ध्वजैश्च समलंकृतैः ।
सुवर्णजालविहितैः खरैश्च विविधाननैः ॥ २६ ॥

हयैः परमशीघ्रैश्च गजैन्द्रैश्च मदोत्कटैः ।
निर्ययू राक्षसव्याघ्रा व्याघ्रा इव दुरासदाः ॥ २७ ॥
कित्येक निशाचर तर ध्वजांनी अलंकृत तसेच सोन्याच्या जाळीने आच्छादित रथांच्या द्वारे युद्धासाठी बाहेर आले. ते सर्वच्या सर्व कवच धारण केलेले होते. कित्येक श्रेष्ठ राक्षस तर नाना प्रकारची मुखे असलेल्या गाढवे, परम शीघ्रगामी घोडे तसेच मदमत्त हत्तींच्यावर स्वार होऊन दुर्जय व्याघ्रांसमान युद्धासाठी नगरांतून बाहेर पडले. ॥२६-२७॥
वृकसिंहमुखैर्युक्तं खरैः कनकभूषितैः ।
आरुरोह रथं दिव्यं धूम्राक्षः खरनिस्वनः ॥ २८ ॥
धूम्राक्षाच्या रथाला सोन्याच्या आभूषणांनी विभूषित अशी गाढवे जुंपलेली होती, ज्यांची मुखे लांडगे आणि सिंहाप्रमाणे होती. गाढवासारखा ओरडणारा धूम्राक्ष त्या दिव्य रथावर स्वार झाला. ॥२८॥
स निर्यातो महावीर्यो धूम्राक्षो राक्षसैर्वृतः ।
हसन् वै पश्चिमद्वाराद् हनूमान् यत्र तिष्ठति ॥ २९ ॥
याप्रकारे बर्‍याचशा राक्षसांसह महापराक्रमी धूम्राक्ष हंसत हसत पश्चिम द्वारातून, जेथे हनुमान्‌ शत्रूशी सामना करण्यासाठी उभे होते, युद्धासाठी बाहेर पडला. ॥२९॥
रथप्रवरमास्थाय खरयुक्तं खरस्वनम् ।
प्रयान्तं तु महाघोरं राक्षसं भीमदर्शनम् ॥ ३० ॥

अन्तरिक्षगता घोराः शकुनाः प्रत्यवारयन् ।
गाढवे जुंपलेल्या आणि गाढवांसारख्या आवाज करणार्‍या त्या श्रेष्ठ रथावर बसून युद्धासाठी जातांना महाघोर राक्षस धूम्राक्षाला जे फार भयानक दिसत होते, अशा आकाशचारी क्रूर पक्ष्यांनी अशुभसूचक बोली बोलून पुढे जाण्यापासून अडविले. ॥३० १/२॥
रथशीर्षे महान् भीमो गृध्रश्च निपपात ह ॥ ३१ ॥

ध्वजाग्रे ग्रथिताश्चैव निपेतुः कुणपाशनाः ।
रुधिरार्द्रो महान् श्वेतः कबंधः पतितो भुवि ॥ ३२ ॥
त्याच्या रथाच्या वरील भागावर एक महाभयानक गिधाड येऊन पडले. ध्वजाच्या अग्रभागावर बरेचसे मुर्दाखोर पक्षी परस्परांत जखडलेले येऊन पडले. त्याचवेळी एक फार मोठे श्वेत धड (कबंध) रक्ताने न्हाऊन पृथ्वीवर पडले. ॥३१-३२॥
विस्वरं चोत्सृजन्नादान् धूम्राक्षस्य निपातितः ।
ववर्ष रुधिरं देवः संचचाल च मेदिनी ॥ ३३ ॥
ते कबंध मोठ्‍या जोरजोराने चीत्कार करीत धूम्राक्षाच्या जवळच कोसळले होते, मेघ रक्ताची वृष्टि करू लागले आणि पृथ्वी डोलू लागली. ॥३३॥
प्रतिलोमं ववौ वायुः निर्घातसमनिस्वनः ।
तिमिरौघावृतास्तत्र दिशश्च न चकाशिरे ॥ ३४ ॥
वायु प्रतिकूल दिशेकडे वाहू लागला. त्यात वज्रपाता समान गडगडाट उत्पन्न होत होता. संपूर्ण दिशा अंधःकाराने आच्छन्न झाल्याने प्रकाशित होत नव्हत्या. ॥३४॥
स तूत्पातांस्ततो दृष्ट्‍वा राक्षसानां भयावहान् ।
प्रादुर्भूतान् सुघोरांश्च धूम्राक्षो व्यथितोऽभवत् ।
मुमुहू राक्षसाः सर्वे धूम्राक्षस्य पुरःसराः ॥ ३५ ॥
राक्षसांना भयभीत करणार्‍या तेथे प्रकट झालेल्या त्या भयंकर उत्पातांना पाहून धूम्राक्ष व्यथित झाला आणि त्याच्या पुढे चालणारे सर्व राक्षस अचेतसे झाले. ॥३५॥
ततः सुभीमो बहुभिर्निशाचरैः
वृतोऽभिनिष्क्रम्य रणोत्सुको बली ।
ददर्श तां राघवबाहुपालितां
महौघकल्पां बहु वानरीं चमूम् ॥ ३६ ॥
याप्रकारे बहुसंख्य निशाचरांनी घेरलेला आणि युद्धासाठी उत्सुक असणार्‍या महाभयंकर बलवान्‌ राक्षस धूम्राक्षाने नगराच्या बाहेर पडून राघवांच्या बाहुबलाने सुरक्षित आणि प्रलयकालीन समुद्रासमान विशाल वानरी सेनेला पाहिले. ॥३६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे एकपञ्चाशः सर्गः ॥ ५१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP