[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ त्रिपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
हनुमत्पृच्छं प्रदीप्य राक्षसैस्तस्य नगरे परिचारणम् -
राक्षसांनी हनुमानाच्या शेपटीस आग लावून त्याची नगरात धिंड काढणे -
तस्य तद्वचनं श्रुत्वा दशग्रीवो महात्मनः ।
देशकालहितं वाक्यं भ्रातुरुत्तरमब्रवीत् ॥ १॥
धाकटा भाऊ महात्मा विभीषणाचे भाषण देशकाळास अनुसरून आणि हितकारक होते. ते ऐकून महाबलाढ्‍य दशाननाने त्याला उत्तर दिले- ॥१॥
सम्यगुक्तं हि भवता दूतवध्या विगर्हिता ।
अवश्यं तु वधायान्यः क्रियतामस्य निग्रहः ॥ २॥
तो म्हणाला - तू यावेळी चांगले (उचित) बोलला आहेस. खरोखरच दूताचा वध निन्द्य मानलेला आहे. परन्तु वधाच्या अतिरिक्त त्याचाच तोडीचा दुसरा काही दण्ड ह्याला अवश्य दिला पाहिजे. ॥२॥
कपीनां किल लाङ्‌‍गूलमिष्टं भवति भूषणम् ।
तदस्य दीप्यतां शीघ्रं तेन दग्धेन गच्छतु ॥ ३॥
वानरांना आपले पुच्छ फार प्रिय वाटते आणि तेच त्यांचे आभूषण आहे. म्हणून याचे ते पुच्छच तुम्ही लवकरात लवकर पेटवून द्या. जळलेले पुच्छ घेऊनच तो येथून परत जाऊ दे. ॥३॥
ततः पश्यन्त्वमुं दीनमङ्‌‍गवैरूप्यकर्शितम् ।
सुमित्रज्ञातयः सर्वे बान्धवाः ससुहृज्जनाः ॥ ४॥
तेथे याचे मित्र, कुटुंबी, बन्धु-बान्धव आणि हितैषी सुहृद याला अंग भंग झाल्याने पीडित आणि दीन अवस्थेमध्ये पाहू देत. ॥४॥
आज्ञापयद् राक्षसेन्द्रः पुरं सर्वं सचत्वरम् ।
लाङ्‌‍गूलेन प्रदीप्तेन रक्षोभिः परिणीयताम् ॥ ५॥
यानन्तर राक्षसराज रावणाने अशी आज्ञा केली की या वानराचे पुच्छ पेटवून द्यावे आणि राक्षसगणांनी त्याला रस्त्या रस्त्यान्तून आणि चव्हाट्‍यावरून संपूर्ण नगरान्तून फिरवावे (त्याची धिंड काढावी) ॥५॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा राक्षसाः कोपकर्कशा ॥
वेष्टयन्ते स्म लाङ्‌‍गूलं जीर्णैः कार्पासिकैः पटैः ॥ ६॥
त्याचे भाषण ऐकून क्रोधाविष्ट झाल्याने कठोर बनलेले ते राक्षस हनुमन्ताच्या पुच्छाला जुन्या पुराण्या फाटक्या सुती कपड्‍यांच्या चिन्ध्या गुंडाळू लागले. ॥६॥
संवेष्ट्यमाने लाङ्‌‍गूले व्यवर्धत महाकपिः ।
शुष्कमिन्धनमासाद्य वनेष्विव हुताशनः ॥ ७॥
वाळलेले लाकूड आणि अग्नि यांच्या संयोगाने ज्याप्रमाणे वनात आग अधिक भडकत जाते, त्याप्रमाणे महाकपि हनुमान आपले शरीर आणि पुच्छ वृद्धिंगत करू लागले. ॥७॥
तैलेन परिषिच्याथ तेऽग्निं तत्रोपपादयन् ।
लाङ्‌‍गूलेन प्रदीप्तेन राक्षसांस्तानताडयत् ॥ ८॥

रोषामर्षपरीतात्मा बालसूर्यसमाननः ।
राक्षसांनी चिन्ध्या गुंडाळल्यानन्तर त्यांच्या पुच्छावर तेल ओतून त्याला आग लावून दिली. तेव्हां हनुमानांचे हृदय क्रोधाने भरून गेले. त्यांचे मुख प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसू लागले आणि आपल्या पेटलेल्या पुच्छानेच त्यांनी राक्षसांना झोडपण्यास सुरूवात केली. ॥८ १/२॥
स भूयः संगतैः क्रूरै राक्षसैर्हरिपुंगवः ॥ ९॥

सहस्त्रीबालवृद्धाश्च जग्मुः प्रीता निशाचराः ।
तेव्हां क्रूर राक्षसांनी मिळून पुन्हा त्या वानर शिरोमणीना करकचून बान्धून ठेवले. हनुमन्ताचे ते पेटलेले पुच्छ पाहून स्त्रिया, बाल आणि वृद्ध यांच्यासह ते सर्वही राक्षस आनन्दीत झाले. ॥९ १/२॥
निबद्धः कृतवान् वीरः तत्कालसडृशीं मतिम् ॥ १० ॥

कामं खलु न मे शक्ता निबद्धस्यापि राक्षसाः ।
छित्त्वा पाशान् समुत्पत्य हन्यामहमिमान् पुनः ॥ ११॥
त्यावेळी वीर हनुमान करकचून बान्धलेले असतांना त्या समयास अनुसरून विचार करू लागले. मी जरी बद्ध झालो असलो तरी राक्षसांचे माझ्यापुढे काही एक चालणार नाही. मी हे पाश तोडून टाकून एका उड्‍डाणात यांना मारून टाकीन. ॥१०-११॥
यदि भर्तृहितार्थाय चरन्तं भर्तृशासनात् ।
निबध्नन्ते दुरात्मानो न तु मे निष्कृतिः कृता ॥ १२॥
आपल्या स्वामीचे हित (श्रीरामांचे हित) करण्याकरितां मी येथे विचरण करीत असता हे दुरात्मे राक्षस जरी आपल्या राजाच्या आदेशावरून मला बान्धून टाकीत आहेत तरी मी येथे जे नुकसान केले आहे त्याची भरपाई यांच्या हातून होणार नाही. ॥१२॥
सर्वेषामेव पर्याप्तो राक्षसानामहं युधि ।
किं तु रामस्य प्रीत्यर्थं विषहिष्येऽहमीदृशम् ॥ १३॥
संग्रामामध्ये या सर्व राक्षसांचा संहार करण्यास मी एकटा जरी समर्थ आहे तरी श्रीरामाच्या प्रसन्नतेसाठी मी अशा बन्धनास (अशा अपमानास) मुकाट्‍याने सहन करीत आहे. ॥१३॥
लङ्‌‍का चारयितव्या मे पुनरेव भवेदिति ।
रात्रौ न हि सुदृष्टा मे दुर्गकर्मविधानतः ॥ १४॥
या शिवाय असे करण्याने मला पुनरपि एकदा लंकेमध्ये संचार करण्याची आणि निरीक्षण करण्याची सन्धि मिळेल कारण येथे ठिकठिकाणी दुर्गम स्थळे बान्धून ठेविली असल्यामुळे रात्री ही लङ्‌कानगरी मला चांगलीशी पहावयास मिळाली नाही. ॥१४॥
अवश्यमेव द्रष्टव्या मया लङ्‌‍का निशाक्षये ।
कामं बध्नन्तु मे भूयः पुच्छस्योद्दीपनेन च ॥ १५॥

पीडां कुर्वन्तु रक्षांसि न मेऽस्ति मनसः श्रमः ।
म्हणून दिवसा उजेडी मला लङ्‌का पूर्णरूपेण अवश्य पाहिलीच पाहिजे. हे राक्षस मला जरी वारंवार बान्धून आणि पुच्छ पेटवून पीडा देत असले तरी त्यामुळे माझ्या मनाला जराही खेद होत नाही. ॥१५ १/२॥
ततस्ते संवृताकारं सत्त्ववन्तं महाकपिम् ॥ १६॥

परिगृह्य ययुर्हृष्टा राक्षसाः कपिकुञ्जरम् ।
शङ्‌‍खभेरीनिनादैश्च घोयषयन्तः स्वकर्मभिः ॥ १७॥

राक्षसाः क्रूरकर्माणश्चारयन्ति स्म तां पुरीम् ।
याप्रमाणे हनुमन्तांनी विचार केला आणि आपले दिव्य स्वरूप गुप्त ठेवलेल्या त्या बलाढ्‍य वानरश्रेष्ठ महाकपिला ते क्रूरकर्मा राक्षस मोठ्‍या आनन्दाने घेऊन गेले. आणि शंख आणि नगारे वाजवीत आणि त्याच्या (रावणद्रोह) आदि अपराधांची घोषणा करीत त्याला लङ्‌कानगरीतून सर्वत्र फिरवू लागले. ॥१६-१७ १/२॥
अन्वीयमानो रक्षोभिर्ययौ सुखमरिन्दमः ॥ १८॥

हनुमांश्चारयामास राक्षसानां महापुरीम् ।
अथापश्यद् विमानानि विचित्राणि महाकपिः ॥ १९॥
शत्रूंना जर्जर करणारे हनुमान निःशंकपणे पुढे चालले होते आणि सर्व राक्षस त्यांच्या मागे मागे चालले होते. महाकपि हनुमान राक्षसांच्या विशाल नगरीत हिंडत असतांना त्या नगरीस पाहू लागले. त्यांनी तेथे चित्रविचित्र विमाने पाहिली. ॥१८-१९॥
संवृतान् भूमिभागांश्च सुविभक्तांश्च चत्वरान् ।

रथ्याश्च गृहसम्बाधाः कपिः शृङ्‌‍गाटकानि च ॥ २०॥

तथा रथ्योपरथ्याश्च तथैव च गृहान्तरान् ।
तसेच तटबन्दी असलेले कित्येक भूभाग आणि पृथक पृथक बनविलेले सुन्दर चबुतरे पाहिले. सुव्यवस्थितपणे रेखलेले चौक, घरांनी गजबजून गेलेले रस्ते, चव्हाटे, लहान मोठे मार्ग आणि घरांमधील मोकळे भूभाग, त्या वायुपुत्रानी नीटपणे निरखून पाहिले. ॥२० १/२॥
चत्वरेषु चतुष्केषु राजमार्गे तथैव च ॥ २१॥

घोषयन्ति कपिं सर्वे चार इत्येव राक्षसाः ।
सर्व राक्षस त्यांस चौका चौकान्तून, चौखांबी मंडपान्तून आणि राजमार्गावरून नेत असतां 'हेर' असे म्हणत दवंडी पिटत त्यांचा परिचय करून देऊ लागले. ॥२१ १/२॥
स्त्रीबालवृद्धा निर्जग्मुस्तत्र तत्र कुतूहलात् ॥ २२॥

तं प्रदीपितलाङ्‌‍गूलं हनुमन्तं दिदृक्षवः।
निरनिराळ्या स्थानी त्या पुच्छ जळत असलेल्या हनुमन्ताला पहाण्यासाठी अनेक बाल, वृद्ध आणि स्त्रिया कुतूहलाने घरातून बाहेर येत होती. ॥२२ १/२॥
दीप्यमाने ततस्तस्य लांगूलाग्रे हनूमतः ॥ २३॥

राक्षस्यस्ता विरूपाक्ष्यः शंसुर्देव्यास्तदप्रियम् ।
त्या हनुमन्ताच्या पुच्छाचे टोक पेटू लागले तेव्हा भयंकर नेत्र असलेल्या राक्षसस्त्रिया सीतादेवी जवळ गेल्या आणि तिला ती अप्रिय वार्ता सांगू लागल्या. ॥२३ १/२॥
यस्त्वया कृतसंवादः सीते ताम्रमुखः कपिः ॥ २४॥

लाङ्‌‍गूलेन प्रदीप्तेन स एष परिणीयते ।
त्या म्हणाल्या - हे सीते ! ज्या ताम्रमुखी वानराने तुझाशी भाषण केले त्याच या वानराला त्याचे पुच्छ पेटवून देऊन सर्व नगरातून हिंडवले जात आहे. ॥२४ १/२॥
शृत्वा तद् वचनं क्रूरमात्मापहरणोपमम् ॥ २५॥

वैदेही शोकसन्तप्ता हुताशनमुपागमत् ।
हे स्वतःच्या अपहरणाप्रमाणे दुःखकारक असलेले भयंकर भाषण ऐकून वैदेही अत्यन्त शोकसन्तप्त झाली आणि मनातल्या मनात अग्निदेवाची उपासना (ध्यान आदि) करू लागली. ॥२५ १/२॥
मङ्‌‍गलाभिमुखी तस्य सा तदासीन्महाकपेः ॥ २६॥

उपतस्थे विशालाक्षी प्रयता हव्यवाहनम् ।
त्या महाकपीच्या कल्याणाची इच्छा मनान्त ठेवून विशाललोचना, जितेन्द्रिय सीतेने अग्निदेवास संबोधून म्हटले की - ॥२६ १/२॥
यद्यस्ति पतिशुश्रूषा यद्यस्ति चरितं तपः ।
यदि वा त्वेकपत्‍नीत्वं शीतो भव हनूमतः ॥ २७॥
हे अग्निदेवा ! मी जर पतीची शुश्रुषा केली असेल, जर काही तप केले असेल अथवा माझ्या ठिकाणी जर पातिव्रत्य असेल तर हे अग्ने ! तू हनुमन्ताला शीतल असा भासमान हो. ॥२७॥
यदि किंचिदनुक्रोशस्तस्य मय्यस्ति धीमतः ।
यदि वा भाग्यशेषो मे शीतो भव हनूमतः ॥ २८॥
जर बुद्धिमान भगवान श्रीरामांच्या मनात माझ्या विषयी किंचित्मात्रही दया असेल अथवा जर माझे सौभाग्य शेष असेल तर तू हनुमन्तासाठी शीतल होऊन जा. ॥२८॥
यदि मां वृत्तसम्पन्नां तत्समागमलालसाम् ।
स विजानाति धर्मात्मा शीतो भव हनूमतः ॥ २९॥
जर धर्मात्मा राम मला सदाचारसंपन्न आणि आपल्या समागमासाठी उत्कंठित जाणत असतील तर तुम्ही हनुमन्तासाठी शीतळ होऊन जा. ॥२९॥
यदि मां तारयेदार्यः सुग्रीवः सत्यसङ्‌‍गरः ।
अस्माद्दुःखाम्बुसंरोधात् शीतो भव हनूमतः ॥ ३०॥
जर सत्यप्रतिज्ञ आर्य सुग्रीव या दुःखरूपी महासागरातून माझा उद्धार करू शकणार असतील तर तुम्ही हनुमानासाठी शीतल होऊन जा. ॥३०॥
ततस्तीक्ष्णार्चिरव्यग्रः प्रदक्षिणशिखोऽनलः ।
जज्वाल मृगशावाक्ष्याः शंसन्निव शुभं कपेः ॥ ३१॥
मृगशावकाप्रमाणे नेत्र असलेल्या सीतेने या प्रकारे प्रार्थना केल्यावर तो तीक्ष्ण तेजाचा आणि आपल्या कर्तव्याविषयी दक्ष असलेला अग्नि, वानराचे स्वस्ति-क्षेम सीतेला सुचवीत प्रदक्षणीक ज्वाला जातील अशा रीतीने पेट घेऊ लागला. (शान्तपणे जळू लागला). ॥३१॥
हनुमज्जनकश्चैव पुच्छानलयुतोऽनिलः ।
ववौ स्वास्थ्यकरो देव्याः प्रालेयानिलशीतलः ॥ ३२॥
त्या हनुमानाचे पुच्छ अग्नीने पेटलेले असूनही त्याचा पिता वायु बर्फाच्या प्रदेशावरील वायूप्रमाणे शीतल वाहू लागला, त्यामुळेही सीतादेवीच्या मनाला स्वस्थता वाटू लागली. ॥३२॥
दह्यमाने च लाङ्‌‍गूले चिन्तयामास वानरः ।
प्रदीप्तोऽग्निरयं कस्मान्न मां दहति सर्वतः ॥ ३३॥
इकडे पुच्छ जळू लागले तेव्हा हनुमान मनात म्हणू लागले की हा अग्नि प्रदीप्त झाला असूनही सर्व प्रकारे हा मला दग्ध का करून टाकीत नाही ? ॥३३॥
दृश्यते च महाज्वालः करोति न च मे रुजम् ।
शिशिरस्येव सम्पातो लाङ्‌‍गूलाग्रे प्रतिष्ठितः ॥ ३४॥
याची ज्वाळा तर मोठी दिसत आहे. परन्तु याचा मला मुळीच त्रास कसा होत नाही ? हा अग्नि माझ्या पुच्छाच्या टोकावर बर्फाच्या गोळ्या प्रमाणे आहे असे मला भासत आहे. ॥३४॥
अथ वा तदिदं व्यक्तं यद् दृष्टं प्लवता मया ।
रामप्रभावादाश्चर्यं पर्वतः सरितां पतौ ॥ ३५॥
अथवा त्या दिवशी समुद्र उल्लंघन करून येते वेळी श्रीरामचन्द्रांच्या प्रभावाने सागरात मला पर्वत प्रकट होण्याची जी आश्चर्यजनक घटना दिसली त्याप्रमाणेच (त्यांच्या प्रभावानेच) आज ही अग्निची शीतलता व्यक्त होत आहे. ॥३५॥
यदि तावत् समुद्रस्य मैनाकस्य च धीमतः ।
रामार्थं सम्भ्रमस्तादृक्किमग्निर्न करिष्यति ॥ ३६॥
श्रीरामांच्या सेवेकरितां समुद्र आणि बुद्धिमान मैनाक पर्वत यांच्या मनात अशी आदरपूर्ण उत्कंठा दिसून आली होती तर मग भगवान श्रीरामांकरिता अग्नि तरी का शीतलता प्रकट करणार नाही ? ॥३६॥
सीतायाश्चानृशंस्येन तेजसा राघवस्य च ।
पितुश्च मम सख्येन न मां दहति पावकः ॥ ३७॥
निश्चितच भग्वती सीतेची दया, राघवाचे तेज आणि माझ्या पित्याशी असलेले अग्नीचे सख्य यांच्या प्रभावानेच अग्नि मला दग्ध करीत नाही आहे. ॥३७॥
भूयः स चिन्तयामास मुहूर्तं कपिकुञ्जरः ।
कथमस्मद्‌विधस्येह बन्धनं राक्षसाधमैः ॥ ३८ ॥

प्रतिक्रियास्य युक्ता स्यात् सति मह्यं पराक्रमे ।
नन्तर तो वानरश्रेष्ठ पुन्हा एक मुहूर्तपर्यन्त विचारमग्न झाला. माझ्या सारख्या पुरुषाला या नीच निशाचरांकडून बान्धले जाणे कसे उचित असू शकेल ? माझ्या ठिकाणी पराक्रम आहे, म्हणून मला अवश्य याचा प्रतिकार केला पाहिजे. ॥३८ १/२॥
ततश्छित्वा च तान् पाशान् वेगवान् वै महाकपिः ॥ ३९ ॥

उत्पपाताथ वेगेन ननाद च महाकपिः ।
असा विचार करून ते वेगवान महाकपि हनुमान, ज्यांना राक्षसांनी पकडून ठेवले होते ते पाश तोडून आकाशात मोठ्‍या वेगाने उड्‍डाण करते झाले आणि त्यांनी मोठी गर्जनाही केली. त्यावेळीही त्यांचे शरीर दोर्‍यांनी बांधलेलेच होते. ॥३९ १/२॥
पुरद्वारं ततः श्रीमाञ्शैलशृङ्‌‍गमिवोन्नतम् ॥ ४० ॥

विभक्तरक्षःसम्बाधं आससादानिलात्मजः ।
नन्तर राक्षसांची ज्या ठिकाणी गर्दी नव्हती अशा पर्वतशिखराप्रमाणे उंच असलेल्या नगरद्वारावर श्रीमान वायुपुत्र जाऊन बसले. ॥४० १/२॥
स भूत्वा शैलसङ्‌‍काशः क्षणेन पुनरात्मवान् ॥ ४१॥

ह्रस्वतां परमां प्राप्तो बन्धनान्यवशातयत् ।
विमुक्तश्चाभवच्छ्रीमान् पुनः पर्वतसन्निभः ॥ ४२॥
ते मनस्वी हनुमान पर्वताकार होऊन पुन्हा एका क्षणात अतिशय लहान झाले आणि अशा रीतिने त्यांनी आपली सर्व बन्धने फेकून दिली. त्या बन्धनातून मुक्त होताच तेजस्वी हनुमान परत पर्वताकार झाले. ॥४१-४२॥
वीक्षमाणश्च ददृशे परिघं तोरणाश्रितम् ।
स तं गृह्य महाबाहुः कालायसपरिष्कृतम् ।
रक्षिणस्तान् पुनः सर्वान् सूदयामास मारुतिः ॥ ४३॥
त्यावेळी त्यांनी जेव्हा इकडे तिकडे पाहिले तेव्हा दरवाजास टेकवून ठेवलेला एक परिघ त्यांच्या दृष्टीस पडला. काळ्या लोखंडाने मढविलेला तो परिघ हाती घेऊन त्या महापराक्रमी मारूतीनी पुन्हा तेथील सर्वही रक्षकांचा वध केला. ॥४३॥
स तान् निहत्वा रणचण्डविक्रमः
समीक्षमाणः पुनरेव लङ्‌‍काम् ।
प्रदीप्तलाङ्‌‍गूलकृतार्चिमाली
प्रकाशतादित्य इवार्चिमाली ॥ ४४॥
याप्रमाणे रणांगणात पराक्रम करणार्‍या हनुमन्तांनी पुन्हा लङ्‌कापुरीचे निरीक्षण करण्यास आरंभ केला. त्यावेळी जळत असलेल्या पुच्छान्तून ज्या ज्वाळाच्या मालिका निघत होत्या त्यानी अलंकृत होऊन ते वानरवीर तेजपुञ्जाने देदीप्यमान सूर्यदेवाप्रमाणे प्रकाशित होऊ लागले. ॥४४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे त्रिपञ्चाशः सर्गः ॥ ५३॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा त्रेपन्नावा सर्ग पूर्ण झाला. ॥५३॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP