श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकादशाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वसिष्ठेनैवमुक्तेऽपि श्रीरामं पितुराज्ञापालनादविरतं दृष्ट्वा भरतस्य प्रायोपवेशनायोद्यमनं श्रीरामेण तं प्रबोध्यायोध्यायां निवर्तनाय तं प्रत्यादेशदानम् -
वसिष्ठांनी समजाविल्यावरही श्रीराम पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यापासून विरत होत नाहीत हे पाहून भरतांचे धरणे धरण्यास तयार होणे तसेच श्रीरामांनी त्यास समजावून अयोध्येस जाण्याची आज्ञा देणे -
वसिष्ठः स तदा राममुक्त्वा राजपुरोहितः ।
अब्रवीद् धर्मसंयुक्तं पुनरेवापरं वचः ॥ १ ॥
त्यावेळी राजपुरोहित वसिष्ठांनी पूर्वोक्त गोष्टी सांगून श्रीरामांना दुसरीही धर्मयुक्त गोष्ट सांगितली - ॥ १ ॥
पुरुषस्येह जातस्य भवन्ति गुरवः सदा ।
आचार्यश्चैव काकुत्स्थ पिता माता च राघव ॥ २ ॥
काकुत्स्थ ! राघव ! संसारात उत्पन्न झालेल्या पुरुषाचे सदा तीन गुरु असतात. आचार्य, पिता आणि माता. ॥ २ ॥
पिता ह्येनं जनयति पुरुषं पुरुषर्षभ ।
प्रज्ञां ददाति चाचार्यस्तस्मात् स गुरुरुच्यते ॥ ३ ॥
’पुरुषप्रवर ! पिता पुरुषाच्या शरीराला उत्पन्न करतो म्हणून गुरु आहे, आणि आचार्य त्याला ज्ञान देतात म्हणून त्यांनाही गुरु म्हटले जाते. ॥ ३ ॥
स तेऽहं पितुराचार्यस्तव चैव परंतप ।
मम त्वं वचनं कुर्वन् नातिवर्तेः सतां गतिम् ॥ ४ ॥
’परंतप रघुवीर ! मी तुमच्या पित्याचा आणि तुमचाही आचार्य आहे म्हणून माझ्या आज्ञेचे पालन करण्याने तुम्ही सत्पुरुषांच्या मार्गाचा त्याग करणारे समजले जाणार नाही. ॥ ४ ॥
इमा हि ते परिषदो ज्ञातयश्च नृपास्तथा ।
एषु तात चरन् धर्मं नातिवर्तेः सतां गतिम् ॥ ५ ॥
तात ! हे तुमचे सभासद, बंधु-बांधव तसेच सामंत राजे येथे आलेले आहेत; त्यांच्या प्रति धर्मानुकूल आचरण करण्यानेही तुमच्या द्वारा सन्मार्गाचे उल्लंघन होणार नाही. ॥ ५ ॥
वृद्धाया धर्मशीलाया मातुर्नार्हस्यवर्तितुम् ।
अस्यास्तु वचनं कुर्वन् नातिवर्तेः सतां गतिम् ॥ ६ ॥
’आपल्या धर्मपरायण वृद्ध मातेचे म्हणणे तुम्ही कधीच टाळता कामा नये. तिच्या आज्ञेचे पालन करून तुम्ही श्रेष्ठ पुरुषांचा आश्रयभूत धर्माचे उल्लंघन करणारे मानले जाणारच नाही. ॥ ६ ॥
भरतस्य वचनं कुर्वन् याचमानस्य राघव ।
आत्मानं नातिवर्तेस्त्वं सत्यधर्मपराक्रम ॥ ७ ॥
’सत्य, धर्म, पराक्रमाने संपन्न राघवा ! भरत स्वतःच्या आत्मस्वरूप असलेल्या तुमची राज्य ग्रहण करण्यासाठी आणि अयोध्येस परत येण्यासाठी प्रार्थना करीत आहे. त्याची विनंति मान्य केल्याने तुम्ही धर्माचे उल्लंघन करणारे मानले जाणार नाही". ॥ ७ ॥
एवं मधुरमुक्तः स गुरुणा राघवः स्वयम् ।
प्रत्युवाच समासीनं वसिष्ठं पुरुषर्षभः ॥ ८ ॥
गुरु वसिष्ठांनी सुमधुर वचनांत जेव्हां याप्रकारे सांगितले तेव्हां साक्षात पुरुषोत्तम श्री राघवेंद्राने तेथे बसलेल्या वसिष्ठांना याप्रकारे उत्तर दिले - ॥ ८ ॥
यन्मातापितरौ वृत्तं तनये कुरुतः सदा ।
न सुप्रतिकरं तत् तु मात्रा पित्रा च यत्कृतम् ॥ ९ ॥

यथाशक्ति प्रदानेन स्वपनोच्छादनेन च ।
नित्यं च प्रियवादेन तथा संवर्धनेन च ॥ १० ॥
माता आणि पिता पुत्राप्रति जे सर्वदा स्नेहपूर्ण आचरण करतात, आपल्या शक्तिप्रमाणे उत्तम खाद्य पदार्थ देणे, चांगल्या अंथरूणावर झोपविणे, उटणी तेल आदि लावणे, सदा गोड भाषण बोलणे, तसेच पालन पोषण करणे आदिद्वारा माता आणि पिता यांनी जे उपकार केले आहेत, त्याची परतफेड सहजासहजी करता येणे शक्य नसते. ॥ ९-१० ॥
स हि राजा दशरथः पिता जनयिता मम ।
आज्ञापयन्मां यत् तस्य न तन्मिथ्या भविष्यति ॥ ११ ॥
’म्हणून माझे जन्मदाते पिता महाराज दशरथांनी मला जी आज्ञा दिली आहे, ती मिथ्या होणार नाही." ॥ ११ ॥
एवमुक्तस्तु रामेण भरतः प्रत्यनन्तरम् ।
उवाच विपुलोरस्कः सूतं परमदुर्मनाः ॥ १२ ॥
श्रीरामांनी असे म्हटल्यावर रूंद छाती असणार्‍या भरतांचे मन फारच उदास झाले. जवळच बसलेल्या सूत मंत्र्यांना ते म्हणाले - ॥ १२ ॥
इह तु स्थण्डिले शीघ्रं कुशानास्तर सारथे ।
आर्यं प्रत्युपवेक्ष्यामि यावन्मे न सम्प्रसीदति ॥ १३ ॥

निराहारो निरालोको धनहीनो यथा द्विजः ।
शये पुरस्ताच्छालायां यावन्मां प्रतियास्यति ॥ १४ ॥
सारथे ! आपण वेदीवर त्वरितच बरेचसे कुश पसरा. जोपर्यंत आर्य माझ्यावर प्रसन्न होणार नाहीत तो पर्यंत मी येथेच त्यांच्यापाशी धरणे धरून बसेन. ज्याप्रमाणे सावकार अथवा महाजनांकडून निर्धन केला गेलेला ब्राह्मण त्यांच्या घराच्या दरवाजावर तोंड झाकून ना खाता पिता पडून राहतो, त्याच प्रकारे मीही उपवासपूर्वक मुखावर आवरण घालून या कुटीच्या समोर पडून राहीन. जोपर्यंत माझे म्हणणे मान्य करून हे अयोध्येला परत येणार नाहीत तो पर्यंत मी या प्रकारे पडून राहीन. ॥ १३-१४ ॥
स तु राममवेक्षन्तं सुमन्त्रं प्रेक्ष्य दुर्मनाः ।
कुशोत्तरमुपस्थाप्य भूमावेवास्थितः स्वयम् ॥ १५ ॥
हे ऐकून सुमंत्र श्रीरामांच्या मुखाकडे पाहू लागले. त्यांना या अवस्थेत पाहून भरतांच्या मनात फार दुःख झाले आणि ते स्वतःच कुशाची चटई पसरून जमिनीवर बसले. ॥ १५ ॥
तमुवाच महातेजा रामो राजर्षिसत्तमः ।
किं मां भरत कुर्वाणं तात प्रत्युपवेक्ष्यसे ॥ १६ ॥
तेव्हां महातेजस्वी राजर्षि शिरोमणि श्रीरामांनी त्यांना म्हटले - "तात भरत ! मी तुमचे काय वाईट करीत आहे की ज्यासाठी तुम्ही माझ्यासमोर धरणे धरणार आहात ? ॥ १६ ॥
ब्राह्मणो ह्येकपार्श्वेन नरान् रोद्धुमिहार्हति ।
न तु मूर्धाभिषिक्तानां विधिः प्रत्युपवेशने ॥ १७ ॥
’ब्राह्मण एका कुशीवर झोपून, धरणे धरून मनुष्यांना अन्यायापासून अडवू शकतो, परंतु राजतिलक ग्रहण करणार्‍या क्षत्रियासाठी या प्रकारे धरणे धरण्याचे विधान नाही. ॥ १७ ॥
उत्तिष्ठ नरशार्दूल हित्वैतद् दारुणं व्रतम् ।
पुरवर्यामितः क्षिप्रमयोध्यां याहि राघव ॥ १८ ॥
’म्हणून नरश्रेष्ठ राघव (भरत) ! या कठोर व्रताचा परित्याग करून उठा आणि येथून लवकरच अयोध्यापुरीला जा.’ ॥ १८ ॥
आसीनस्त्वेव भरतः पौरजानपदं जनम् ।
उवाच सर्वतः प्रेक्ष्य किमार्यं नानुशासथ ॥ १९ ॥
हे ऐकून भरत तेथे बसले असतांनाच सर्वत्र दृष्टी टाकून नगर आणि जनपदाचे लोकांना म्हणाले - "आपण लोक भ्रात्याला का समजावत नाही ?"॥ १९ ॥
ते तदोचुर्महात्मानं पौरजानपदा जनाः ।
काकुत्स्थमभिजानीमः सम्यग् वदति राघवः ॥ २० ॥
तेव्हां नगर आणि जनपदातील लोक महात्मा भरतांना म्हणाले - "आम्ही जाणतो आहोत की काकुत्स्थ श्रीरामचंद्रांच्या प्रति आपण रघुकुलतिलक भरत ठीकच सांगत आहात. ॥ २० ॥
एषोऽपि हि महाभागः पितुर्वचसि तिष्ठति ।
अत एव न शक्ताः स्मो व्यावर्त्तयितुमञ्जसा ॥ २१ ॥
’परंतु हे महाभाग श्रीरामचंद्रही पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यामागे लागलेले आहेत म्हणून हेही ठीकच आहे. म्हणून आम्ही यांना एकाएकी यातून परावृत्त करण्यास असमर्थ आहोत". ॥ २१ ॥
तेषामाज्ञाय वचनं रामो वचनमब्रवीत् ।
एवं निबोध वचनं सुहृदां धर्मचक्षुषाम् ॥ २२ ॥
त्या पुरवासी लोकांच्या वचनाचे तात्पर्य समजून श्रीरामांनी भरतास म्हटले - "भरत ! धर्मावर दृष्टी ठेवणार्‍या सुहृदांच्या या कथनास ऐक आणि समजून घे. ॥ २२ ॥
एतच्चैवोभयं श्रुत्वा सम्यक् सम्पश्य राघव ।
उत्तिष्ठ त्वं महाबाहो मां च स्पृश तथोदकम् ॥ २३ ॥
’हे राघव (भरत) ! माझे आणि यांचे, दोघांचे म्हणणे ऐकून त्यावर सम्यक् रूपाने विचार करा. महाबाहो ! आता शीघ्र उठा आणि मला आणि जलाला स्पर्श करा."॥ २३ ॥
अथोत्थाय जलं स्पृष्ट्वा भरतो वाक्यमब्रवीत् ।
श्रृण्वंतु मे परिषदो मन्त्रिणः श्रृणुयुस्तथा ॥ २४ ॥

न याचे पितरं राज्यं नानुशासामि मातरम् ।
आर्यं परमधर्मज्ञं नानुजानामि राघवम् ॥ २५ ॥
हे ऐकून भरत उभे राहिले आणि श्रीरामांना आणि जलाला स्पर्श करून म्हणाले - "माझे सभासद आणि मंत्री सर्व लोकांनी ऐकावे. मी पित्याजवळ कधीही राज्य मागितले नव्हते आणि मातेजवळ कधी या विषयी काहीही बोललो नव्हतो. त्याचबरोबर परम धर्मज्ञ श्रीरामचंद्रांच्या वनवासालाही माझी काही संमती नाही. ॥ २४-२५ ॥
यदि त्ववश्यं वस्तव्यं कर्तव्यं च पितुर्वचः ।
अहमेव निवत्स्यामि चतुर्दश वने समाः ॥ २६ ॥
’तरीही जर यांच्या पित्यासाठी पित्याच्या आज्ञेचे पालन करणे आणि वनात राहणे अनिवार्य आहे तर यांच्या बदली मीच चौदा वर्षेपर्यंत वनात निवास करीन."॥ २६ ॥
धर्मात्मा तस्य सत्येन भ्रातुर्वाक्येन विस्मितः ।
उवाच रामः सम्प्रेक्ष्य पौरजानपदं जनम् ॥ २७ ॥
आपला भाऊ भरत यांचे हे सत्यवचन ऐकून धर्मात्मा श्रीरामांना अत्यंत विस्मय वाटला आणि त्यांनी पुरवासी आणि राज्यनिवासी लोकांकडे पाहून म्हटले - ॥ २७ ॥
विक्रीतमाहितं क्रीतं यत् पित्रा जीवता मम ।
न तल्लोपयितुं शक्यं मया वा भरतेन वा ॥ २८ ॥
"पित्यांनी आपल्या जीवनकालात जी वस्तु विकली असेल अथवा ठेव म्हणून ठेवली असेल अथवा विकत घेतली असेल त्या गोष्टीत मी अथवा भरत कोणीही बदल करू शकत नाही. ॥ २८ ॥ "
उपाधिर्न मया कार्यो वनवासे जुगुप्सितः ।
युक्तमुक्तं च कैकेय्या पित्रा मे सुकृतं कृतम् ॥ २९ ॥
’मला वनवासासाठी कुणाला प्रतिनिधी बनवायचे नाही (बनविण्याची माझी इच्छा नाही). कारण सामर्थ्य असताना प्रतिनिधी द्वारा काम करून घेणे लोकात निंदित आहे. कैकेयीने उचित मागणे प्रस्तुत केले होते आणि माझ्या पित्याने ते देऊन पुण्य कर्मच केले आहे. ॥ २९ ॥
जानामि भरतं क्षान्तं गुरुसत्कारकारिणम् ।
सर्वमेवात्र कल्याणं सत्यसंधे महात्मनि ॥ ३० ॥
’मी जाणतो की भरत अत्यंत क्षमाशील आणि गुरुजनांचा सत्कार करणारे आहेत. या सत्यप्रतिज्ञ महात्म्याच्या ठिकाणी सर्व कल्याणकारी गुण विद्यमान आहेत. ॥ ३० ॥
अनेन धर्मशीलेन वनात् प्रत्यागतः पुनः ।
भ्रात्रा सह भविष्यामि पृथिव्याः पतिरुत्तमः ॥ ३१ ॥
’चौदा वर्षांचा अवधि पुरा करून जेव्हां मी वनातून परत येईल, तेव्हां आपल्या धर्मशील भावासह या भूमंडलाचा श्रेष्ठ राजा होईन. ॥ ३१ ॥
वृतो राजा हि कैकेय्या मया तद्वचनं कृतम् ।
अनृतान्मोचयानेन पितरं तं महीपतिम् ॥ ३२ ॥
’कैकेयीने राजांच्याकडे वर मागितला आणि मी त्याचे पालण करणे स्विकारले, म्हणून भरत ! आता तू माझे म्हणणे मान्य करून त्या वराच्या पालनद्वारा आपले पिता महाराज दशरथ यांना असत्याच्या बंधनातून मुक्त कर."॥ ३२ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकादशाधिकशततमः सर्गः ॥ १११ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे अकरावा सर्ग पूरा झाला ॥ १११ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP