॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय सहावा ॥
राक्षस व विष्णूचे युद्ध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


इल्वलारी म्हणे जामदाग्निजिता । कमलोद्भवजनका ऐकें पूर्वकथा ।
वर देता तयांसी सृष्टीकर्ता । त्यासही तत्वतां न गणिती ॥१॥
वरदें उन्मत्त होवोन । करिते झाले अन्योन्य ।
ऋषींस दुःख देऊन । यागविध्वंसन पैं करिती ॥२॥

राक्षसांच्या उन्मत्तपणामुळे त्रस्त होऊन
ऋषिमंडळी शंकराकडे आली, शंकराची प्रार्थना :

ऐसे राक्षसभयेंकरीं । विप्रीं कडे कुमर हातीं क्कारी ।
यज्ञपात्रें स्त्रियांचे शिरीं । कैलासपुरी ठाकिली ॥३॥
आले वृद्ध थोर थोर । सपत्नीक अपत्नीक विधुर ।
तपें जर्जर झाले शरीर । ब्रह्मचारी थोर तेथें आले ॥४॥
आले मौनी दिगंबर । माथां जटा वल्कलांबर ।
तपोधन थोर थोर । भगवी कापडी येते झाले ॥५॥
राक्षसभयेंकरोनि ऋषी । येते झाले महेशापाशीं ।
विनविती स्वामी शरणागतासी । रक्षीं रक्षीं म्हणोनियां ॥६॥
कपर्दिना त्रिलोचना । कामारि त्रिपुरदहना ।
गंगाधरा पंचवदना । दीनजना रक्षावें ॥७॥
गजमुखजनका शैलजापती । श्शिशेखरा सर्वांगविभूती ।
नंदिवाहना वासुकी शोभती । भक्तांप्रती कृपाळुवा ॥८॥
हात जोडोनियां तुजप्रती । आम्ही करितसो विनंती ।
ब्रह्मवरदें राक्षस मंदमती । दुःख देती ब्राह्मणां ॥९॥
भक्तपति पारवतीरमण । प्रजांतें करिताती दंडन ।
निरपराध्यांतें अपराध ठेवून । त्यांतें ताडन पैं करिती ॥१०॥
हिंरोनि इंद्राचे अधिकार । स्वर्गीं क्रीडती जैसे इंद्र ।
म्हणती आम्हीच ब्रह्मा विष्णू रूद्र । यम कुबेर पैं आम्ही ॥११॥
ऐसे माळी सुमाल्यवंत । वरदें होवूनि उन्मत्त ।
संग्रामीं बोलता पुरूषार्थ । अति गर्वित अभिमानें ॥१२॥
तुजवांचोनि गंगाधरा । आम्हां सोयरा नाहीं दुसरा ।
आमच्या विपत्ति सांगतां चतुरा । लज्जा अंतरा येतसे ॥१३॥
आतां आम्हां अभय द्यावें । राक्षसभय निवारावें ।
गाई ब्राह्मणां स्वस्थ करावें । यश मिरवावें तिहीं लोकीं ॥१४॥

शंकरांनी सर्वांना विष्णूकडे पाठविले :

ऐकोनियां तयांचें वचन । संतोषला शैलजारमण ।
मृदु मंजुळ शब्देकरुन । काय आपण बोलत ॥१५॥
मी न मारीं तयांसी । माझेनि मृत्यु नाहीं तयांसी ।
जरी मज पुसतां तुम्ही ऋषी । तरी उपाय यासी सांगेन ॥१६॥
ऐकोनि महादेवाचें वचन । आनंदले तपोधन ।
जी स्वामी कृपा करुन । दिनजन रक्षावे ॥१७॥
शिव म्हणे तयांसी । तुम्हीं जावें विष्णूपासीं ।
सकळ सांगावें वृत्तांतासी । तो तुम्हांसी रक्षील ॥१८॥
जैसे रोगी रोगें पीडिले । उपरी धन्वंतरीचें दर्शन झालें ।
तेणें शब्दरसायनें हरिलें । कुपथ्यभय देहीचें ॥१९॥
शिववचनीं संतोषोन । मिळोनि सकळही ऋषिजन ।
जयजयशब्दें गर्जोन । ऊर्ध्वगमन तिहीं केलें ॥२०॥
जैसा उगवोनि तमारी । निशी पळे भयेंकरीं ।
तैसे ऋषींस भय भारी । ते कामारिवचनें निरसिलें ॥२१॥

विष्णूस शरण जाऊन त्याची स्तुती :

आले विष्णूस शरण । करिते झाले साष्टांग नमन ।
स्तवन आदरिलें गुणवर्णन । कर जोडून ते काळीं ॥२२॥
जयजयाजी जगद्‌गुरू । जयजयाजी निर्विकल्पतरू ।
जयजयाजी तुझा पारू । नेणे विधाता श्रुतिशास्त्रें ॥२३॥
जयजयाजी गुणातीता । जयजयाजी श्रीअनंता ।
जयजयाजी सद् गुरू अच्युता । देशकाळता तुज नाहीं ॥२४॥
तूं निर्गुण निराकार । तूं निष्कर्म निरुपचार ।
तो तूं होवोनि साकार । नाना अवतार धरिसी ॥२५॥
निजसामर्थ्यें सृष्टि करी । सृजी पाळी संहारी ।
तो तूं मघश्यामरुपेंकरीं । नंदाघरीं अवतरसी ॥ २६॥
धरोनियां नाना वेष । खेळ खेळसी असमसाहस ।
तूं पूर्णब्रह्म अवतारपुरूष । योगिमानसमोहक ॥२७॥
शंख चक्र गदा धरोनि करीं । घेवोनि पीतांबराची उत्तरी ।
वैजयंती रुळे वक्षःस्थळावरी । द्विजपाद उरीं वाहसी ॥२८॥
सुंदर सरळ नासापुट । शोभती बाहू बाहूवट ।
चरणीं नूपुरांचा बोभाट । अंदू नेटें पैं गर्जे ॥२९॥
ऐसी सांवळी सुनीळ मूर्ती । देखोनि ऋषि दंडवत करिती ।
म्हणती स्वामी लक्ष्मीपती । राक्षसी थोर गांजिलें ॥३०॥

राक्षसांविषयी विष्णूंजवळ तक्रार :

रजनीचर म्हणती कोण । सुकेश सुमाळिचें संतान ।
ब्रह्मवरदें उन्मत्त होऊन । अन्योक्त पैं करिती ॥३१॥
ऋषींचे आश्रम भंगिले । यज्ञादिक्रिया विध्वंसूं लागले ।
ऋषीश्वर झाले । अतिभयेंकरोनियां ॥३२॥
तेणें भयेंकरीं जाण । आम्ही आलों तुज शरण ।
शरणागतां अभयदान । कृपा करोन पैं दीजे ॥३३॥
आणिक एक कमळापती । राक्षस वसती लंकेप्रती ।
दुर्गबळें त्रास देती । उच्छेदिती देवांसी ॥३४॥
लंकादुर्ग अति गूढ । भोंवता समुद्राचा आगड ।
बुरजोबुरजीं यंत्रांचा जोड । परदळा अवघड पै लंका ॥३५॥
ऐसिये लंकेमाझारी । सुकेशपुत्रदुराचारी ।
वरदें उन्मत्त तयांवरी । कणवाचें कांही न चलेचि ॥३६॥
तयांच्या भेणें आम्ही समस्त । महादेवापासीं गेलों त्वरित ।
तो म्हणे मी राक्षसां प्रतिपाळित । माझेनि मृत्यु त्यां नाहीं ॥३७॥
मी सांगतों उपायासी । तुम्ही शरण जा विष्णूसी ।
तेणें वचनें आम्ही तुजपासीं । यथार्थैसी पैं आलों ॥३८॥
तुजवाचोंनि तारिता । आणिक नाहीं जगन्नाथा ।
तुवां अभय देवोनि आतां । राक्षसांतें मारावें ॥३९॥
आपुले चक्रेंकरोनी । राक्षसांचीं शिरें छेदोनी ।
पाठवावीं यमपुरीलागूनी । रहावया अनुदिनीं पैं तेथें ॥४०॥
तुझेनि प्रतापलिरणेंकरीं । राक्षसनिशी पळेल दूरी ।
तुजवीण न दिसे कैवारी । शरणागतांवरी कृपा करीं ॥४१॥

श्रीविष्णूंचे ऋषींना अभयदान :

ऐकोनि ऋषींचें वचन । संतोषला श्रीजनार्दन ।
तयांप्रति काय आपण । बोलता झाला ते काळीं ॥४२॥
ऋषि हो तुम्ही श्रमलेती । राक्षसीं बहु गांजिलेती ।
भय सांडोनि आश्रमाप्रती । सुखें वस्ती करावी ॥४३॥
सुकेशपुत्रांतें मी जाणें । तयां वर दिधला चतुराननें ।
तिहीं मरणा दिधलें आवंतणें । तपोधन दुःखी करोनि ॥४४॥
स्थानभ्रष्ट केलें देवांसी । तिहीं दंडिलें प्रजांसी ।
विध्वंसिलें यागांसी । मोडिलें आश्रमासी ब्राह्मणांच्या ॥४५॥
तयांच्या वधाकरणें । मज अज्न्म्या जन्म घेणें ।
अकर्म्यासी कर्म करणें । निर्गुणासी होणें सगुण पैं ॥४६॥
तुम्हीं जावें आश्रमाप्रती । स्वधर्मकर्म करा मजप्रीत्यर्थीं ।
सर्वभूतीं दया शांती । येणें यशकीर्ती होय तुम्हीं ॥४७॥
ऐकोनि श्रीविष्णूचें वचन । ऋषि शिरीं वंदोनि जाण ।
जयजयशब्दें प्रदक्षिणा । गर्जना करोन निघाले ॥४८॥

राक्षसांच्या हेरांनी ती वार्ता माल्यवंताला सांगितली :

तेथें गुप्त होते राक्षस दूत । ते माल्यवंताप्रती सांगत ।
माल्यवंतें बंधु त्वरित । तयांसी वृत्तांत जाणविला ॥४९॥
ऐका बंधु स्वजन हो । देवऋषींचा मिळोन समुदावो ।
तिहीं प्रर्थिला कैलासरावो । त्रिनेत्र महादेवो गिरिजापति ॥५०॥
ऋषी म्हणती महादेवासी । राक्षसभयें क्षिती झाली क्लेशी ।
तुम्हीं वधावें तयांसी । म्हणोनि पायांसी लागले ॥५१॥
महादेव म्हणे तयांप्रती । माझे स्थापित राक्षस असती ।
माझेनि हातें न मरती । शीघ्र विष्णूप्रती तुम्हीं जावें ॥५२॥
तुम्हीं विष्णूस जावें शरण । तो जाणे भविष्य वर्तमान ।
हें जग तया अधीन । तो स्वामी पूर्ण विश्वाचा ॥५३॥
समस्त मोळोनि आलेति येथ । तैसेंचि तुम्हीं जावें तेथ ।
तो भक्तकृपाळु अनंत । उभय देत भक्तांसी ॥५४॥
सकळही मिळोनि ऋषी । ते गेले श्रीविष्णूपासीं ।
म्हणती सुकेशपुत्रीं आम्हांसी । अति त्रासासी दीधलें ॥५५॥
तयांचें वचन ऐकोन । विष्णू बोले हास्यवदन ।
मज ठावें तयांचें उद्धटपण । करीन निर्दळण तयांचें ॥५६॥
तिहीं मर्यादा सांडिली । ब्रह्मवरदें भुली पडली ।
मी करीन तयांची रांगोळी । तुम्हीं सुखसमेळीं नांदावें ॥५७॥
विष्णुआज्ञा घेवोनि । देवऋषी समस्त मिळोनि ।
प्रवेशते झाले स्वस्थानीं । ऐसी करणी केली देवीं ॥५८॥

विष्णूच्या सामर्थ्याची राक्षसांना धास्ती :

यासी काय कीजे उपाव । जेणें वश्य होतील देव ।
मिळोनि राक्षसमुदाव । विचार स्वयमेव करिते झाले ॥५९॥
आम्हां भय नाहीं त्रिपुरींचें । ब्रह्मा कांही न करुं शके आमुचें ।
एक भय त्या विष्णूचें । त्याप्रति कोणाचें काहीं न चाले ॥६०॥
पडिलें समर्थासीं वैर । विष्णु मायालाघवी चतुर ।
तयातें जिंकिजेल ऐसा प्रकार । अणुमात्र दिसेना ॥६१॥
हरी जयातें अंगीकारी । तयाचा घाव यमशिरीं ।
श्रीहरी जयातें अव्हेरी । ते संसारीं जीत मेले ॥६२॥
हरिनाम प्रल्हाद स्मरे । तयातें दैत्य पीडी बहु प्रकारें ।
अरिष्टें रचिलीं महाघोरें । तीं नाममात्रें निरसलीं ॥६३॥
अग्नि विष पर्वतपात । बुडवूं गेले समुद्रांत ।
शस्त्रें मारितां अंगातें । कोठे पुसत श्रीहरि तो ॥६४॥
प्रल्हाद भक्तचूडामणी । म्हणे जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ।
श्रीहरि व्यापक जनीं वनीं । अवनीं गगनीं सदोदित ॥६५॥
असुर पुत्राकडे पाहे । ये म्हणे खांबीं आहे ।
येरु म्हणे जेथें जेथें पाहें । तेथें तेथें आहे श्रीहरि ॥६६॥
देत्यें गदा कढोन । खांबा हाणिली क्रोधेंकरुन ।
तंव प्रकटला सिंहवदन । असुराचा प्राण घ्यावया ॥६७॥
असुर धरोनि जानूवरी । रागें उदर तयाचें विदारी ।
अंत्रमाळा कंठीं धरी । भक्तकैवारी विष्णू तो ॥ ६८॥

विष्णूशी युद्ध करण्याचा तिघा राक्षसांचा निर्धार :

ऐसें माल्यवंताचें वचन । सुमाळी माळी ऐकोन ।
करिते झाले विचारण । मुख्य नारायण आम्हां वैरी ॥६९॥
येणें देव घातले पाठीसीं । वैर करिते आम्हांसी ।
आम्हां संमुख रहावयासी । पुरुषार्थासी न देखों ॥७०॥
बहुसाल मिळती खद्योत । तरी न जिंकावे रवि एक ।
मार्जार काय व्याघ्रासन्मुख । ठाण मांडोनि राहेल ॥७१॥
पतंग आपुले प्रभेकरुन । काय गिळूं शकेल हुताशन ।
पहा हो धेनुचा नंदन । मदगजासीं मिडेल ॥७२॥
कद्रुतनय बहुतेक । विनतातनय तो एक ।
त्यातें काय ते मशक । पराभवतील संग्रामीं ॥७३॥
आतां विबुधांतें पराभविजे । विष्णु भेटला तरी सहजें ।
त्यातेंही रणीं जिंकिजे । हेंचि कीजे विचरण ॥७४॥
मग मेळोवोनि समस्त । विचार करोनि निश्चित ।
युद्धा निघावें त्वरित । दूत सांगत घरोघरीं ॥७५॥
युद्धा निघती रजनीचर । जैसे वन्हीचे स्फुलिंग अपार ।
यावरी माधव शरतुपार । अति गंभीर वर्षेल ॥७६॥


स्यंदनैर्वारणेंद्रैश्च हयैश्च गिरिसन्निमभैः ।
खरैर्गोभिरथोष्ट्रैश्च शिशुमारैर्भुजंगमैः ॥१॥
मकरैः कच्छपैर्मीनैः विहंगैर्गरुडोपमैः ।
सिहैर्व्याघ्नैर्वराहैश्च चामरैः सामरैरपि ॥२॥
रथोत्तमैरुह्यमानाः शतशोऽथ सहस्त्रशः ।
प्रयाता राक्षसा नूनं देवलोकं जिगीषवः ॥३॥

राक्षससैन्याचे वर्णन :

तेथें राक्षस मिळोनि । सेना असंख्य सज्जूनी ।
विबुध जिंतावे रणमेदिनीं । यालागोनी चालिले ॥७७॥
तेथे रथांसी नाहीं मिती । रत्नजडित ध्वज शोभती ।
कोट्यनुकोटी भद्रजाती । मद गळती उन्मत्तपणॆं ॥७८ ॥
जैसे महापर्वत । तैसे हस्ती शोभावंत ।
दांतीं सुवर्णबिंदु रत्नजडित । वरी आरुढ होत रजनीचर ॥७९॥
नाना वर्णांचे उन्मत्त घोडे । त्यांतें देखोनि श्यामकर्ण दडे ।
पाखरा झळकती तेणें उजेडें । दश दिशा गाढे तेज फांकलें ॥८०॥
खेचरांसि नाहीं मिती । बैल कोण जाणे किती ।
उष्ट्रीं आरुढले ते न गणवती । लक्षानुलक्ष राक्षस ॥८१॥
शिशुमारीं एक वळंघोन । एकासि सर्प वाहन ।
एक मगरीं आरुढ जाण । एकां वाहन कच्छप ॥८२॥
एकीं मीन पालाणिले । एक पक्षियांवरी वळंघले ।
एक सिंहीं सरसावले । एक बैसले वाघांवरी ॥८३॥
एकांचें वाहन सूकर । एका रानबैल अपार ।
एकांचे वाहन सामर । गणनाविचार शतसहस्त्रीं ॥८४॥
देवांतें जिंकावयालागून । त्यजिते झाले लंकाभवन ।
अंगीं बळाच अभिमान । राक्षसगण निघाले ॥८५॥
रथांचेनि घडघडाटें । भौममातेचे उदर फुटे ।
नदनायक अंगोळे नेटें । सरिता तडागें शोषलीं ॥८६॥
गर्वे ते रजनीचर । हातीं कात्या त्रिशूळ तोमर ।
एकीं घेतले लहुडीचक्र । एकांचे कट्यार पैं करीं ॥८७॥
एकां हातीं धनुष्यबाण । एकीं पर्वत शिळा पाषाण ।
एकीं पादपा पुडोन । एकीं गोफणा घेतल्या ॥८८॥
रणोन्मदें ते सुरारी । चालिले लंकेबाहेरी ।
एक उडाले अंबरीं । एक अंतराळीं चालिले ॥८९॥
लंका सांडोनि माघारीं । राक्षस आले नगराबाहेरी ।
गर्जना केली निशाचरीं । नाद अंबरीं न समाये ॥९०॥

लंकेतून बाहेर पडताना राक्षसांना अपशकुन :

हर्षेकरोनि रजनीचर । चालिले पवनवेगाहूनि थोर ।
तंव पुढें अपशकुन घोर । वीर दुर्धर देखते झाले ॥९१॥
लंकेसारिखी दुसरी लंका । माड्या गोपुरें अट्टालिका ।
व्योममार्गी विशाळ देखा । रुप भयानक देखिलें ॥९२॥
भूमी अंतरिक्ष व्यापिलें दिसे । काळासारिखी मुर्ति उग्र भासे ।
माथां शिर तिये नसे । हातें वेष्टितसे भुजांतें ॥९३॥
उत्पात होती दारुण । तप्त रक्ते पडे पर्जन्य ।
माजी अस्थींचा वर्षाव जाण । मेघ दारुण वोळला ॥९४॥
अर्णव सांडी मर्यादेतें । महेंद्र डोलविती माथे ।
भूतळ होईं पाहे उलथेंपालथें । कळिकाळ तेथें चळीं कांपे ॥९५॥
औट कोटी भूतावळी । मिळालिया तया काळीं ।
एक आरोळी तये वेळीं । मेघासारिख्या पैं देती ॥ ९६ ॥
एक रणगोंधळीं नाचती । एक विकट मुख पसरिती ।
एक खावें पैं म्हणती । एक दाविती वांकुल्या ॥९७॥
दिवाभीतें मस्तकावरी । फिरती चक्राचिये परी ।
ज्वाळा वमिती मुखोद्गारीं । तें निशाचरीं देखिलें ॥९८॥

बलोन्मत्तपणाने अपशकुनाचा धिक्कार करून राक्षस पुढे निघाले :

राक्षस बळगर्वेकरीं । अपशकुन लेखिती तृणावरी ।
जो नपुंसक से संसारीं । तया भय भारी अपशकुनांचें ॥९९॥
काळपाशेंकरीं विबुधारीं । बांधिले पशु दावणीभीतरीं ।
पतंग जैसा दीपावरी । मरणोन्मत्त होवोनियां ॥१००॥
माल्यवंत सुमाळी माळी । मरण विसरोन ते काळीं ।
सेनासमुदायीं राक्षस बळी । गर्जन करिते पैं झाले ॥१॥
राक्षसेंद्र झाला पुढें । मागें पुढें दळ गाढें ।
जैसें समर्थाश्रयें भ्याडें । मार्ग पडिपाडे क्रमिती ॥२॥
जसा दाता याच्कें वेष्टित । तैसा राक्षस परिवारसहित ।
मृतप्राणी यमपुरा जात । तन्न्याय राक्षसां ॥३॥
ऐसें उपराउपरीं । मार्गी सिंहनादकरीं ।
क्रमिला मार्ग क्षणामाझारी । विश्वात्मा हरि तेथें आला ॥४॥

श्रीविष्णू युद्धासाठी सिद्ध होऊन निघाले :

दूत सांगती विष्णूसी । राक्षस आले युद्धासी ।
ऐकोनि तोषला ह्र्षीकेशी । आनंद मानसीं वोसंडे ॥५॥
श्रीहरि त्वरित उठला । अभेद्य कवच अंगीं ल्याला ।
तेजें दिनमणि लोपला । दशदिशां पडिला उजियेड ॥६॥
अचुक घेवोनियां बाण । जैसे काळाचे क्रूरगण ।
भातां भरोनि संपूर्ण । धनुष्य टणत्कारोन सज्जिलें ॥७॥

श्रीविष्णूंचे वर्णन :

वर्णखड्ग घेवोनि हातीं । अवलोकिता जाहला लक्ष्मीपती ।
कमळासारिखें नेत्र शोभती । मुखीं दंतपंक्तीं हिरियांच्या ॥८॥
शंख चक्रगदाधर । श्यामसुंदर राजीवनेत्र ।
गळां वैजयंतीचे हार । कांसे पीतांबर विद्युत्प्राय ॥९॥
अंगीं अहिप्रियविलेपन । कस्तूरीचा मळवट पूर्ण ।
श्यामसुंदर विराज मान । मनमोहन तो विष्णू ॥११०॥
जैसा कनकाच गिरी । तैसा संमुख सर्पारी ।
वरी आरुढोनि श्रीहरी । त्वरेकरीं चालिला ॥११॥
गरुडपाखांचेनि वातें । पितांबर आंदोळे तेथें ।
जैसें समुद्री लाटांचे भरितें । उपराउपरी येतसे ॥१२॥
राक्षस वधावयाकरणें । अवतार धरिला नारयणें ।
देवांचें भय निवारणें । सुखी करणें त्रैलोक्य ॥१३॥
स्वर्गी देव आनंदत । एक पुष्पवर्षाव करित ।
एक पवाडे गात । एक नाचत स्वानंदें ॥१४॥
ऐसा तो राक्षसारी । निघाला अतित्वरेंकरीं ।
ते रुप देखोनि निशाचरी । रानभरी पैं झाले ॥१५॥
एक भयें थरथरां कांपत । एक सरसें सरसावत ।
एक धैर्य धरोनि राहत । शस्त्रें वर्षत अमित पैं ॥१६॥

राक्षसांचा आवेश :

राक्षसशस्त्रें अति तीक्ष्ण । मेदमांसे आरक्त जाण ।
जैसें वसंतीं पलाशपुष्पेंकरुन । तैसे बाण वर्षले ॥१७॥
अगणित सोडोनि बाण । श्रीहरि वेढिला जैसा पर्वत पर्जन्य ।
लागवेग करितां दारूण । वेगें गर्जन करिताती ॥१८॥
सिंहनादें देती आरोळी । हात घांसिती भूताळीं ।
म्हणती बळियेरे बळी । भिडा ये काळीं अवघेही ॥१९॥
राक्षसीं श्रीहरि वेढिला । एक म्हणती पुरा झाला ।
एक म्हणती अझूनि याला । उरी कोठें असेल ॥१२०॥
पुढें कथानिरूपण परम । श्रीहरींचे चरित्रनाम ।
अगस्ति सांगे ऐके श्रीराम । कथाधर्म अवधारा ॥२१॥
एका जनार्दना शरण । श्रीरामें उत्तरकांड पावन ।
वदनीं वक्ता श्रीजनार्दन । कथानुसंधान अतिरम्य ॥१२२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
राक्षसविष्णुयुद्धं नाम षष्ठोऽध्यायः ॥६॥
ओंव्या ॥१२२॥ श्लोक ॥३॥ एवं ॥१२५॥

GO TOP