॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ तृतीयः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



बिभीषणाची शरणागती, समुद्राचा त्रास आणि सेतू बांधण्याचा प्रारंभ


श्रीमहादेव उवाच
विभीषणो महाभागः चतुर्भिर्मंत्रिभिः सह ।
आगत्य गगने राम सम्मुखे समवस्थितः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, त्यानंतर महाभाग्यवंत बिभीषण हा चार मंत्र्यांसह श्रीरामांजवळ येऊन आकाशातच त्यांच्यासमोर उपस्थित झाला. (१)

उच्चैरुवाच भोः स्वामिन् राम राजीवलोचन ।
रावणस्यानुजोऽहं ते दारहर्तुर्विभीषणः ॥ २ ॥
नाम्ना भ्राता निरस्तोऽहं त्वामेव शरणं गतः ।
हितमुक्तं मया देव तस्य चाविदितात्मनः ॥ ३ ॥
आणि तो मोठ्यांदा म्हणाला, "हे कमलनयन, स्वामी, रामा, तुमच्या पत्नीचे हरण करणाऱ्या रावणाचा धाकटा भाऊ मी बिभीषण आहे. भावाने मला हाकलून दिले आहे. म्हणून मी तुम्हांलाच शरण आलो आहे. हे देवा, स्वतःला न ओळखणाऱ्या रावणाला मी त्याच्या हिताची गोष्ट सांगितली. (२-३)

सीतां रामाय वैदेहीं प्रेषयेति पुनः पुनः ।
उक्तोऽपि न शृणोत्येव कालपाशवशं गतः ॥ ४ ॥
'वैदेही सीतेला रामांकडे पाठव.' असे मी त्याला पुनः पुनः सांगितले. तरी काळाच्या पाशात सापडलेला तो माझे काही ऐकतच नाही. (४)

हन्तुं मां खड्गमादाय प्राद्रवद् राक्षसाधमः ।
ततोऽचिरेण सचिवैः चतुर्भिः सहितो भयात् ॥ ५ ॥
त्वामेव भवमोक्षाय मुमुक्षुः शरणं गतः ।
विभीषणवचः श्रुत्वा सुग्रीवो वाक्यमब्रवीत् ॥ ६ ॥
मला ठार करण्यासाठी तो अधम राक्षस खड्‌ग घेऊन धावून आला. तेव्हा भिऊन मी लगेच चार मंत्र्यांसह, त्याच्या आणि संसाराच्या पाशातून सुटण्याच्या इच्छेने तुम्हांलाच शरण आलो आहे." बिभीषणाचे हे वचन ऐकल्यावर सुग्रीव असे बोलला. (५-६)

विश्वासार्हो न ते राम मायावी राक्षसाधमः ।
सीताहर्तुर्विशेषेण रावणस्यानुजो बली ॥ ७ ॥
"हे श्रीराम, हा मायावी अधम राक्षस विश्वास ठेवण्यास पात्र नाही. कारण सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा हा धाकटा भाऊ असून बलवानही दिसत आहे. (७)

मंत्रिभिः सायुधैरस्मान् विवरे निहनिष्यति ।
तदाज्ञापय मे देव वानरैर्हन्यतामयम् ॥ ८ ॥
सशस्त्र अशा मंत्र्यांसह आलेला हा बिभीषण आपणास केव्हाही एकांत स्थानी ठार करील. तेव्हा हे देवा मला आज्ञा करा. वानरांकडून याला मी ठार मारतो. (८)

ममैवं भाति मे राम बुद्ध्या किं निश्चितं वद ।
श्रुत्वा सुग्रीववचनं रामः सस्मितमब्रवीत् ॥ ९ ॥
हे रामा, मला तर असे वाटते की, आता तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही मला अवश्य सांगा." सुग्रीवाचे वचन ऐकल्यावर श्रीराम स्मित करून म्हणाले. (९)

यदीच्छामि कपिश्रेष्ठ लोकान् सर्वान् सहेश्वरान् ।
निमिषार्धेन संहन्यां सृजामि निमिषार्धतः ॥ १० ॥
"हे कपिश्रेष्ठा, मला वाटले तर मी अर्ध्या निमिषात लोकपालांसह सर्व लोकांचा संहार करून टाकीन आणि अर्ध्या क्षणात मी सर्वांना पुनः उत्पन्न करू शकेन. (१०)

अतो मयाभयं दत्तं शीघ्रमानय राक्षसम् ॥ ११ ॥
म्हणून तू चिंता करू नकोस. मी या बिभीषणाला आता अभय दिले आहे. तू शीघ्र या राक्षसाला घेऊन ये. (११)

सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते ।
अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद् व्रतं मम ॥ १२ ॥
'मी तुझाच आहे', असे एकदाच म्हणून व मला शरण येऊन जो अभय मागतो, त्या सर्व प्राण्यांना मी अभय देतो, असे माझे व्रत आहे." (१२)

रामस्य वचनं श्रुत्वा सुग्रीवो हृष्टमानसः ।
विभीषणमथानाय्य दर्शयामास राघवम् ॥ १३ ॥
श्रीरामांचे वचन ऐकल्यावर, आनंदित झालेल्या सुग्रीवाने बिभीषणाला आणले आणि त्याची रामांशी भेट घडविली. (१३)

विभीषणस्तु साष्टाङ्‌गं प्रणिपत्य रघुत्तमम् ।
हर्षगद्‍गदया वाचा भक्त्या च परयान्वितः ॥ १४ ॥
रामं श्यामं विशालाक्षं प्रसन्न-मुखपंकजम् ।
धनुर्बाणधरं शान्तं लक्ष्मणेन समन्वितम् ॥ १५ ॥
कृताञ्जलिपुटो भूत्वा स्तोतुं समुपचक्रमे ॥ १६ ॥
बिभीषणाने रघूत्तमांना साष्टांग नमस्कार केला. तो परम भक्तीने भरून गेला होता. नंतर श्यामवर्ण, विशाल डोळे असणाऱ्या, प्रसन्न मुखकमल असणाऱ्या, धनुष्य व बाण धारण करणाऱ्या, लक्ष्मणासहित असणाऱ्या व शांत अशा रामांपुढे हात जोडून उभे राहून, हर्षाने गद्‌गद झालेल्या वाणीने बिभीषणाने त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. (१४-१६)

विभीषण उवाच
नमस्ते राम राजेन्द्र नमः सीतामनोरम ।
नमस्ते चण्डकोदण्ड नमस्ते भक्तवत्सल ॥ १७ ॥
बिभीषण म्हणाला-"हे राजेंद्रा, सीतेचे मन रमविणाऱ्या, प्रचंड धनुष्य धारण करणाऱ्या, हे भक्तवत्सल रामा, तुम्हांला नमरकार असो. (१७)

नमोऽनन्ताय शान्ताय रामायामिततेजसे ।
सुग्रीवमित्राय च ते रघूणां पतये नमः ॥ १८ ॥
अनंत, शांत, अमर्याद तेज असणाऱ्या श्रीरामांना नमरकार असो. सुग्रीवाचा मित्र आणि रघुकुळाचा स्वामी अशा हे रामा, तुम्हांला नमस्कार असो. (१८)

जगदुत्पत्तिनाशानां कारणाय महात्मने ।
त्रैलोक्यगुरवेऽनादि गृहस्थाय नमो नमः ॥ १९ ॥
जगाची उत्पत्ती व नाश यांचे कारण असणाऱ्या, त्रैलोक्याचा गु रू असणाऱ्या, अनादी काळापासून गृहस्थाश्रमी असणाऱ्या, अशा महात्म्या रामांना पुनः पुनः नमस्कार असो. (१९)

त्वमादिर्जगतां राम त्वमेव स्थितिकारणम् ।
त्वमन्ते निधनस्थानं स्वेच्छाचारस्त्वमेव हि ॥ २० ॥
हे श्रीरामा, तुम्ही सर्व जगाचे आदिकारण आहात. तुम्हीच त्यांच्या स्थितीचे कारण आहात. तुम्हीच शेवटी त्यांच्या नाशाचे स्थान आहात. तसेच तुम्हीच स्वतःच्या इच्छेप्रमाणे आचार करणारे आहात. (२०)

चराचराणां भूतानां बहिरन्तश्चराघव ।
व्याप्यव्यापकरूपेण भवान् भाति जगन्मयः ॥२१ ॥
हे राघवा, स्थावर व जंगम सर्व प्राण्यांच्या आत व बाहेर, व्याप्य आणि व्यापक या रूपाने तुम्हीच असून, तुम्हीच जगन्मय आहात, असे वाटते. (२१)

त्वन्मायया हृतज्ञाना नष्टात्मानो विचेतसः ।
गतागतं प्रपद्यन्ते पपपुण्यवशात्सदा ॥ २२ ॥
तुमच्या मायेमुळे ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे आणि ज्यांची बुद्धी नष्ट झाली आहे व ज्यांचे मन विपरीत प्रवृत्ति-मार्गाकडे लागले आहे, असे लोक आपल्या पापपुण्यांना वश होऊन सतत या संसारात येरझाऱ्या करीत असतात. (२२)

तावत्सत्यं जगद्‌भाति शुक्तिकारजतं तथा
यावन्न ज्ञायते ज्ञानं चेतसा अनन्यगामिना ॥२३ ॥
जोपर्यंत अनन्यगामी चित्ताने तुम्हा परमात्म्याला जाणले जात नाही, तोपर्यंत शिंपेवर भासणाऱ्या रुप्याप्रमाणे हे जग सत्य भासते. (२३)

त्वद् अज्ञानात्सदा युक्ताः पुत्रदारगृहादिषु ।
रमन्ते विषयान्सर्वान् अन्ते दुःखप्रदान्विभो ॥ २४ ॥
हे विभू, तुमचे ज्ञान न झाल्यामुळे प्राणी पुत्र, पत्नी, गृह इत्यादींच्या ठिकाणी आसक्त होऊन, शेवटी दुःख देणाऱ्या सर्व विषयात सतत रमून जातात. (२४)

त्वमिन्द्रोऽग्निर्यमो रक्षो वरुणश्च तथानिलः ।
कुबेरश्च तथा रुद्रः त्वमेव पुरुषोत्तम ॥ २५ ॥
हे पुरुषोत्तमा, तुम्हीच इंद्र, अग्नी, यम, निर्ऋती, वरुण तसेच वायू आहात. तसेच तुम्हीच कुबेर आणि रुद्र आहात. (२५)

त्वं अणोरपि अणीयांश्च स्थूलात् स्थूलतरः प्रभो ।
त्वं पिता सर्वलोकानां माता धाता त्वमेव हि ॥ २६ ॥
हे प्रभो, तुम्हीच अणूपेक्षा अणू व स्थूलापेक्षा अधिक स्थूल आहात. तुम्हीच सर्व लोकांचे पिता व माता आहात. तुम्हीच सर्व लोकांचे पोषण करणारे आहात. (२६)

आदिमध्यान्तरहितः परिपूर्णोऽच्युतोऽव्ययः ।
त्वं पाणिपादरहितः चक्षुःश्रोत्रविवर्जितः ॥ २७ ॥
तुम्ही आदी, मध्य व अंत यांनी रहित आहात. तुम्ही परिपूर्ण, अच्युत आणि अव्यय आहात. तुम्ही हातपाय रहित आहात. तसेच तुम्ही डोळे व कान यांनी रहित आहात. (२७)

श्रोता द्रष्टा ग्रहिता च जवनस्त्वं खरान्तक ।
कोशेभ्यो व्यतिरिक्तस्त्वं निर्गुणो निरुपाश्रयः ॥ २८ ॥
खर राक्षसाचा नाश करणाऱ्या हे रामा, तुम्ही श्रोता, द्रष्टा व ग्रहण करणारे असून, तुम्ही वेगवान आहात. तुम्ही अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय अशा पाच कोशांपेक्षा वेगळे असून, तुम्ही निर्गुण आणि आश्रयरहित आहात. (२८)

निर्विकल्पो निर्विकारो निराकारो निरीश्वरः ।
षड्भावरहितोऽनादिः पुरुषः प्रकृते परः ॥ २९ ॥
तुम्ही निर्विकल्प, निर्विकार, निराकार असून तुम्ही निरीश्वर (=प्रेरक ईश्वर नसणारे) आहात. (उत्पत्ती, वृद्धी, परिणाम, भय, जीर्णता आणि नाश या) सहा विकारांनी रहित अनादी आणि प्रकृतीच्या पलीकडील पुरुष तुम्ही अहात. (२९)

मायया गृह्यमाणस्त्वं मनुष्य इव भाव्यसे ।
ज्ञात्वा त्वां निर्गुणमजं वैष्णवा मोक्षगामिनः ॥ ३० ॥
मायेच्या योगाने धारण केलेल्या रूपात तुम्ही मनुष्य असल्यासारखे दिसता. पण तुम्ही निर्गुण, अज आहात, असे जाणून विष्णूचे भक्त मोक्षाप्रत जातात. (३०)

अहं त्वत्पादसद्‌भक्ति नीःश्रेणीं प्राप्य राघव ।
इच्छामि ज्ञानयोगाख्यं सौधमारोढुमीश्वर ॥ ३१ ॥
हे राघवा, तुमच्या चरणांची उत्तम भक्तिरूप शिडी प्राप्त करून घेऊन, हे ईश्वरा, ज्ञानयोग असणार्‍या प्रासादावर चढून जाण्याची माझी इच्छा आहे. (३१)

नमः सीतापते राम नमः कारुणिकोत्तम ।
रावणारे नमस्तुभ्यं त्राहि मां भवसागरात् ॥ ३२ ॥
हे सीतापते, हे श्रेष्ठ करुणावंता, हे रावणाच्या शत्रो, तुम्ही ज्ञानंसारसागरातून माझे रक्षण करा." (३२)

ततः प्रसन्नः प्रोवाच श्रीरामो भक्तवत्सलः ।
वरं वृणीष्व भद्रं ते वाञ्छितं वरदोऽस्म्यहम् ॥ ३३ ॥
(बिभीषणाने केलेली स्तुती ऐकल्यानंतर) भक्तवत्सल श्रीराम प्रसन्न होऊन म्हणाले, "हे बिभीषणा, तुझे कल्याण होवो. तू कोणताही वर माग. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला वर देईन." (३३)

विभीषण उवाच
धन्योऽस्मि कृतक्‍त्योऽस्मि कृतकार्योऽस्मि राघव ।
त्वत्पाददर्शनादेव विमुक्तोऽस्मि न संशयः ॥ ३४ ॥
बिभीषण म्हणाला, "हे राघवा, तुमच्या पायांच्या दर्शनानेच मी धन्य झालो आहे. कृतकार्य झालो आहे, कृतकृत्य झालो आहे आणि मी मुक्त झालो आहे, यात संशय नाही. (३४)

नास्ति मत्‌सदृशो धन्यो नास्ति मत्‌सदृशः शुचिः ।
नास्ति मत्‌सदृशो लोके राम त्वन्मूर्तिदर्शनात् ॥ ३५ ॥
हे रामा, तुमचे दर्शन झाल्यामुळे, माझासारखा धन्य, शुद्ध आणि भाग्यवान या जगात अन्य कुणीही नाही. (३५)

कर्मबन्धविनाशाय त्वज्ज्ञानं भक्तिलक्षणम् ।
त्वद्ध्यानं परमार्थं च देहि मे रघुनन्दन ॥ ३६ ॥
हे रघुनन्दना, माझ्या कर्मबंधनाचा नाश होण्यासाठी, भक्तिस्वरूप असे तुमचे ज्ञान आणि तुमच्या परमार्थ स्वरूपाचा साक्षात्कार घडविणारे तुमचे ध्यान तुम्ही मला द्या. (३६)

न याचे राम राजेन्द्र सुखं विषयसम्भवम् ।
त्वत्पादकमले सक्ता भक्तिरेव सदास्तु मे ॥ ३७ ॥
हे राजेंद्रा रामा, विषयांपासून निर्माण होणारे सुख मी तुमच्याकडे मागत नाही. तुमच्या चरणकमळांच्या ठिकाणी माझी भक्ती जडून राहो, अशी माझी मागणी आहे." (३७)

ओं इत्युक्‍त्वा पुनः प्रीतो राम प्रोवाच राक्षसम् ।
शृणु वक्ष्यामि ते भद्रं रहस्यं मम निश्चितम् ॥ ३८ ॥
"ठीक आहे" असे म्हणून संतुष्ट झालेले श्रीराम पुनः बिभीषणाला म्हणाले, "तुझे कल्याण होवो. आता मी तुला माझे रहस्य स्पष्टपणे सांगतो, ते ऐक. (३८)

मद्‌भक्तानां प्रशांतानां योगिनां वीतरागिणाम् ।
हृदये सीतया नित्यं वसाम्यत्र न संशयः ॥ ३९ ॥
अतिशय शांत, भक्तियोगी आणि आसक्ती रहित असणाऱ्या अशा माझ्या भक्तांच्या हृदयांत मी सीतेसह सदा राहातो, या बाबतीत संशय नाही. (३९)

तस्मात्त्वं सर्वदा शान्तः सर्वकल्मषवर्जितः ।
मां ध्यात्वा मोक्ष्यसे नित्यं घोरसंसारसागरात् ॥ ४० ॥
तेव्हा सर्व काळी शांत आणि सर्व पापांनी रहित होऊन तू माझे नित्य ध्यान केलेस तर तू या भयंकर संसार-सागरातून मुक्त होशील. (४०)

स्तोत्रमेतत्पठेद्यस्तु लिखेद्यः श्रुणुयादपि ।
मत्‌प्रीतये ममाभिष्टं सारूप्य समवाप्नुयात् ॥ ४१ ॥
शिवाय मला प्रसन्न करण्यासाठी जो कोणी तू केलेले हे स्तोत्र वाचेल, लिहील अगर ऐकेल, तो मला प्रिय असणारे सारूप्य प्राप्त करून घेईल." (४१)

इत्युक्‍त्वा लक्ष्मणं प्राह श्रीरामो भक्तभक्तिमान् ।
पश्यत्विदानीं एवैष मम सन्दर्शने फलम् ॥ ४२ ॥
असे सांगून आपल्या भक्तांवर प्रेम करणारे श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, "माझ्या दर्शनाने मिळणारे फळ हा बिभीषण आत्ताच पाहू दे. (४२)

लङ्‌काराज्येऽभिषेक्ष्यामि जलं आनय सागरात् ।
यावच्चन्द्रश्च सूर्यश्च यावत्तिष्ठति मेदिनी ॥ ४३ ॥
यावन्मम कथा लोके तावद्‌राज्यंकरोत्वसौ ।
इत्युक्‍त्वा लक्ष्मणेनाम्बु ह्यानाय्य कलशेन तम् ॥ ४४ ॥
लङ्‌काराज्याधिपत्यार्थं अभिषेकं रमापतिः ।
कारयामास सचिवैः लक्ष्मणेन विशेषतः ॥ ४५ ॥
आत्ताच मी याला लंकेच्या राज्यावर अभिषेक करतो. लक्ष्मणा, तू समुद्रातून पाणी घेऊन ये. जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे राहतील तसेच जोपर्यंत माझी कथा या जगात टिकून राहील, तोपर्यंत हा बिभीषण लंकेचे राज्य करो." असे म्हणून लक्ष्मणाकडून कलशातून पाणी आणवून घेऊन, त्या लक्ष्मीपती रामांनी बिभीषणाच्या मंत्र्यांकडून आणि विशेषतः लक्ष्मणाकडून, बिभीषणाला लंकेवरील राज्याच्या आधिपत्यासाठी अभिषेक करविला. (४३-४५)

साधु साध्विति ते सर्वे वानराः तुष्टुवुर्भृशम् ।
सुग्रीवोऽपि परुष्वज्य विभीषणमथाब्रवीत् ॥ ४६ ॥
"छान- ! छान- ! " असे म्हणून त्या सर्व वानरांनी आनंदाने प्रशंसा केली. नंतर सुग्रीवानेसुद्धा बिभीषणाला आलिंगन देऊन म्हटले. (४६)

विभीषण वयं सर्वे रामस्य परमात्मनः ।
किङ्‌करास्तत्र मुख्यस्त्वं भक्‍त्या रामपरिग्रहात् ।
रावणस्य विनाशे त्वं साहाय्यं कर्तुमर्हसि ॥ ४७ ॥
"अरे बिभीषणा, आम्ही सर्व जण परमात्म्या रामांचे सेवक आहोत. तू आता भक्तीने रामांचा आश्रय घेतल्यामुळे, आम्हा सर्वांमध्ये तू आता मुख्य झाला आहेस. तेव्हा रावणाचा नाश करण्यासाठी तू साहाय्य करावेस." (४७)

विभीषण उवाच
अहं कियान्सहायत्वे रामस्य परमात्मनः ।
किं तु दास्यं करिष्येऽहं भक्त्या शक्त्या ह्यमायया ॥ ४८ ॥
बिभीषण म्हणाला- "परमात्म्या रामांना मी काय साहाय्य करणार ? तथापि भक्तीने, माझ्या शक्तीप्रमाणे आणि निष्कपटपणाने मी रामांची सेवा मात्र करीन. " (४८)

दशग्रीवेण सन्दिष्टः शुको नाम महासुरः ।
संस्थितो ह्यम्बरे वाक्यं सुग्रीवं इदमब्रवीत् ॥ ४९ ॥
इतक्यात रावणाने निरोप देऊन पाठविलेला शुक नावाचा महान असुर तेथे येऊन आकाशातून, सुग्रीवाला म्हणाला. (४९)

त्वामाह रावणो राजा भ्रातरं राक्षसाधिपः ।
महाकुलप्रसूतस्त्वं राजासि वनचारिणाम् ॥ ५० ॥
"राक्षसांचा अधिपती राजा रावण हा भावाप्रमाणे असणाऱ्या तुला सांगत आहे की, "तू महान कुळात जन्मलेला आहेस आणि वनचर वानरांचा तू राजा आहेस. (५०)

मम भ्रातृसमानस्त्वं तव नास्त्यर्थविप्लवः ।
अहं यद्‌अहरं भार्यां राजपुत्रस्य किं तव ॥ ५१ ॥
तू मला भावाप्रमाणे आहेस. तुझ्या कोणत्याही गोष्टीचा नाश माझ्याकडून आत्तापर्यंत झालेला नाही. जर आता मी एखाद्या राजपुत्राच्या पत्नीचे हरण केले असेल, तर त्याच्याशी तुझा काय संबंध आहे ? (५१)

किष्किन्धां याहि हरिभिः लङ्‌का शक्या न दैवतैः ।
प्राप्तुं किं मानवैरल्प सत्त्वैः वानरयूथपैः ॥ ५२ ॥
तेव्हा तू आपल्या वानरांसह किष्किंधेला परत जा. देवतांनासुद्धा लंका जिंकता येणे शक्य झाले नाही मग अल्प सामर्थ्य असणारे मानव आणि वानरसमूहांचे नायक यांची गोष्ट ती काय ? " (५२)

तं प्रापयन्तं वचनं तूर्णं उत्प्लुत्य वानराः ।
प्रापद्यन्त तदा क्षिप्रं निहन्तुं दृढमुष्टिभिः ॥ ५३ ॥
शुक संदेश सांगत होता, तोच वानर उड्या मारत त्याच्यावर जोराने मुष्टीचे प्रहार करण्यासाठी, चट्दिशी त्याच्याजवळ पोचले. (५३)

वानरैर्हन्यमानस्तु शुको राममथाब्रवीत् ।
न दूतां घ्नन्ति राजेन्द्र वानरान्वारय प्रभो ॥ ५४ ॥
तेव्हा वानरांच्या बुक्क्या खात शुक रामांना म्हणाला, "हे राजेंद्रा, शहाणे लोक दूतांना ठार करीत नाहीत. हे प्रभो, तू या वानरांचे निवारण कर." (५४)

रामं श्रुत्वा तदा वाक्यं शुकस्य परिदेवितम् ।
मा वधिष्टेति रामस्तान् वारयामास वानरान् ॥ ५५ ॥
त्या वेळी शुकाचे दुःखपूर्ण शब्द ऐकल्यावर, "त्याला ठार करू नका." असे म्हणून रामांनी वानरांचे निवारण केले. (५५)

पुनरम्बरमासाद्य शुकः सुग्रीवमब्रवीत् ।
ब्रूहि राजन्दशग्रीवं किं वक्ष्यामि व्रजाम्यहम् ॥ ५६ ॥
तेव्हा पुनः आकाशात जाऊन शुक सुग्रीवाला म्हणाला, "हे राजा, रावणाला तुझा काय संदेश देऊ, ते मला सांग. मी आता जात आहे." (५६)

सुग्रीव उवाच
यथा वाली मम भ्राता तथा त्वं राक्षसाधम ।
हन्तव्यस्त्वं मया यत्‍नात् सपुत्रबलवाहनः ॥ ५७ ॥
सुग्रीव म्हणाला- "तू रावणाला असे सांग की जसा वाली हा माझा भाऊ, तसा हे अधम राक्षसा, तू माझा भाऊ आहेस. तथापि वालीप्रमाणेच पुत्र, सैन्य आणि वाहने यांच्यासह तू माझ्याकडून ठार मारला जाण्यास योग्य आहेस. (५७)

ब्रूहि मे रामचन्द्रस्य भार्यां हृत्वा क्व यास्यसि ।
ततो रामाज्ञया धृत्वा शुकं बध्वान्वरक्षयत् ॥ ५८ ॥
रामचंद्रांच्या पत्नीचे हरण करून तू आता कुठे जाशील, ते मला सांग." असे बोलल्यानंतर रामांच्या आज्ञेने शुकाला धरून आणि बांधून टाकून, त्याला वानरांच्या संरक्षणाखाली ठेवले. (५८)

शार्दूलोऽपि ततः पूर्वं दृष्ट्वा कपिबलं महत् ।
यथावत्‌कथयामास रावणाय स राक्षसः ॥ ५९ ॥
शुक राक्षस येण्यापूर्वीच शार्दूल नावाच्या राक्षसाने सुद्धा वानरांचे प्रचंड सैन्य पाहिले होते आणि त्या राक्षसाने परत लंकेत जाऊन ते रावणाला सांगितले होते. (५९)

दीर्घचिन्तापरो भूत्वा निःश्वसन्नास मन्दिरे ।
ततः समुद्रमावेक्ष्य रामो रक्तान्तलोचनः ॥ ६० ॥
ते ऐकल्यावर अतिशय चिंतेत पडलेला रावण मोठमोठे निःश्वास टाकीत आपल्या महालात बसला होता. त्याच वेळी इकडे समुद्राकडे पाहिल्यावर रामाचे डोळे रागाने लाल झाले. (६०)

पश्य लक्ष्मण दुष्टोऽसौ वारिधिर्मामुपागतम् ।
नाभिनन्दति दुष्टात्मा दर्शनार्थं ममानघ ॥ ६१ ॥
(श्रीराम क्रोधाने लक्ष्मणाला म्हणाले,) "लक्ष्मणा, पाहा, पाहा, हा समुद्र किती दुष्ट आहे. मी याच्या तीरावर आलो आहे. परंतु लक्ष्मणा, हा दुष्ट मनाचा समुद्र माझ्या दर्शनासाठी आला नाही आणि त्याने माझे अभिनंदनही केलेले नाही. (६१)

जानाति मानुषोऽयं मे किं करिष्यति वानरैः ।
अद्य पश्य महाबाहो शोषयिष्यामि वारिधिम् ॥ ६२ ॥
'हा राम एक मानव आहे. तेव्हा वानरांच्या साहाय्याने हा आपले काय वाईट करणार ?' असे त्याला वाटत आहे. हे महाबाहो लक्ष्मणा, बघ, आज मी या समुद्राला कोरडा करून टाकतो. (६२)

पादेनैव गमिष्यन्ति वानरा विगतज्वराः ।
इत्युक्‍त्वा क्रोधताम्राक्ष आरोपितधर्नुर्धरः ॥ ६३ ॥
तूणीराद्‌बाणमादाय कालाग्निसदृशप्रभम् ।
सन्धाय चापमाकृष्य रामो वाक्यमथाब्रवीत् ॥ ६४ ॥
पश्यन्तु सर्वभूतानि रामस्य शरविक्रमम् ।
इदानीं भस्मसात् कुर्यां समुद्रं सरितां पतिम् ॥ ६५ ॥
एवं ब्रूवति रामे तु सशैल वनकानना ।
चचाल वसुधा द्यौश्च दिशश्च तमसावृताः ॥ ६६ ॥
चुक्षुभे सागरो वेलां भयाद् योजनं अत्यगात् ।
तिमिनक्रझषा मीनाः प्रतप्ताः परितत्रसुः ॥ ६७ ॥
एतस्मिन्नन्तरे साक्षात् सागरो दिव्यरूपधृक् ।
दिव्याभरणसम्पन्नः स्वभासा भासयन् दिशः ॥ ६८ ॥
स्वान्तःस्थ दिव्यरत्‍नानि कराभ्यां परिगृह्य सः ।
पादयोः पुरतः क्षिप्त्वा रामस्योपायनं बहु ॥ ६९ ॥
दण्डवत् प्रणित्याह रामं रक्तान्तलोचनम् ।
त्राहि त्राहि जगन्नाथ राम त्रैलोक्यरक्षक ॥ ७० ॥
म्हणजे वानर सहजपणे विनायास पायी पायीच समुद्र पार करून जातील." असे बोलून रामांनी क्रोधाने डोळे लाल केले आणि धनुष्यावर दोरी चढविली. कालाग्नीप्रमाणे तेज असणारा एक बाण भात्यातून काढून घेऊन तो त्यांनी धनुष्याला जोडला आणि नंतर धनुष्याची प्रत्यंचा खेचून ते म्हणाले. "रामाच्या बाणाचा पराक्रम सर्व प्राणी बघू देत. नद्यांचा पती असणाऱ्या समुद्राला मी आता भस्मसात करून टाकतो." रामांनी असे म्हणताच पर्वत, वने आणि अरण्ये यांच्यासह पृथ्वी हलू लागली आणि आकाश व दिशा हे अंधाराने भरून सागर खवळला आणि भीतीने आपला किनारा ओलांडून तो एक योजन पुढे आला. मोठे मत्स्य मगरी, सुसरी, मासे हे संत्रस्त होऊन भयभीत झाले. तितक्यात दिव्य अलंकारांनी संपन्न, दिव्य रूप धारण केलेला, स्वतःच्या तेजाने दिशांना प्रकाशित करणारा असा साक्षात सागर रामांकडे आला आणि आपल्या ठिकाणी असणारी दिव्य रत्ने दोन्ही हातात घेऊन, नाना प्रकारचा नजराणा म्हणून त्याने ती रामांच्या पायांपुढे ठेवली. ज्याचे डोळे रागाने लाल झालेले होते अशा रामांना दंडवत प्रणाम करून तो म्हणाला, "हे जगन्नाथा, हे त्रैलोक्यरक्षका, हे रामा, माझे रक्षण करा. (६३-७०)

जडोऽहं राम ते सृष्टः सृजता निखिलं जगत् ।
स्वभावं अन्यथा कर्तुं कः शक्तो देवनिर्मितम् ॥ ७१ ॥
हे रामा, संपूर्ण जग निर्माण करताना, तुम्ही मला (जल) जड स्वरूपात निर्माण केले आहे आणि देवाने निर्माण केलेला स्वभाव बदलून टाकण्यास कोण बरे समर्थ आहे ? (७१)

स्थूलानि पञ्चभूतानि जडान्येव स्वभावतः ।
सृष्टानि भवतैतानि त्वदाज्ञां लङ्‌घयन्ति न ॥ ७२ ॥
पाच स्थूल भूते ही स्वभावतःच जड आहेत. ती तुम्हीच उत्पन्न केली आहेत. तुमच्या आज्ञेचे उल्लंघन ती करीत नाहीत. (७२)

तामसादहमो राम भूतानि प्रभवन्ति हि ।
कारणान् उगमात्तेषां जडत्वं तामसं स्वतः ॥ ७३ ॥
हे रामा, तामस अहंकारापासूनच ही जड भूते निर्माण होत असतात. कारणाला अनुसरून. त्या भूतांच्या ठिकाणी तमोरूप जडत्व स्वतः सिद्ध असते. (७३)

निर्गुणस्त्वं निराकारो यदा मायागुणान् प्रभो ।
लीलयाङ्‌गीकरोषि त्वं तदा वैराजनामवान् ॥ ७४ ॥
हे प्रभो, निर्गुण आणि निराकार असणारे तुम्ही जेव्हा लीलेने मायेच्या गुणांचा अंगीकार करता, तेव्हा तुमचे नाव वैराज असते. (७४)

गुणात्मनो विराजश्च सत्त्वाद्देवा बभूविरे ।
रजोगुणात् प्रजेशाद्या मन्योर्भूतपतिस्तव ॥ ७५ ॥
त्या गुणयुक्त विराटातील सत्त्वगुणापासून देव उत्पन्न झाले, रजोगुणापासून प्रजापती इत्यादी उद्‌भूत झाले आणि तुमच्या तमोगुणात्मक क्रोधापासून भूतपती रुद्र निर्माण झाला आहे. (७५)

त्वामहं मायया छन्नं लीलया मानुषाकृतिम् ॥ ७६ ॥
जडबुद्धिर्जडो मुर्खः कथं जानामि निर्गुणम् ।
दण्ड एव हि मुर्खाणां सन्मार्गप्रापकः प्रभो ॥ ७७ ॥
भूतानाममरश्रेष्ठ पशूनां लगुडो यथा ।
शरणं ते व्रजामीशं शरण्यं भक्तवत्सल ।
अभयं देहि मे राम लङ्‌कामार्गं ददामि ते ॥ ७८ ॥
मायेने झाकला जाऊन लीलेने मनुष्यरूप धारण करणाऱ्या तुमच्या निर्गुण स्वरूपाला जडबुद्धी, अचेतन आणि मूर्ख असणारा मी कसा बरे जाणू शकेन ? हे प्रभो, ज्याप्रमाणे पशूंना योग्य मार्गावर आणण्यासाठी लाठी उपयोगी पडते, त्याप्रमाणे हे देवश्रेष्ठा, माझ्यासारख्या मूर्ख प्राण्यांना सन्मार्गावर नेणारा दंडच आहे. हे भक्तवत्सला, ईश्वरा, शरणगतांचे रक्षण करणाऱ्या तुम्हांला मी शरण आलो आहे. हे रामा, तुम्ही मला अभय द्या. मी तुम्हांला लंकेत जाण्यासाठी मार्ग देतो." (७६-७८)

श्रीराम उवाच
अमोघोऽयं महाबाणः कस्मिन्देशे निपात्यताम् ।
लक्ष्यं दर्शय मे शीघ्रं बाणस्यामोघपातिनः ॥ ७९ ॥
श्रीराम म्हणाले- "माझा हा महान बाण अमोघ आहे. तेव्हा तो कोणत्या ठिकाणी सोडावा ? व्यर्थ न जाणाऱ्या बाणाला हे समुद्रा, तू चटदिशी एखादे लक्ष्य दाखव." (७९)

रामस्य वचनं श्रुत्वा करे दृष्ट्वा महाशरम् ।
महोदधिर्महातेजा राघवं वाक्यमब्रवीत् ॥ ८० ॥
रामांचे वचन ऐकून आणि रामांच्या हातातील तो प्रचंड बाण पाहून तो महातेजस्वी महासागर राघवांना बोलला. (८०)

रामोत्तरप्रदेशे तु द्रुमकुल्य इति श्रुतः ।
प्रदेशस्तत्र बहवः पापात्मानो दिवानिशम् ॥ ८१ ॥
बाधन्ते मां रघुश्रेष्ठ तत्र ते पात्यतां शरः ।
रामेण सृष्टो बाणस्तु क्षणात् आभीरमण्डलम् ॥ ८२ ॥
हत्वा पुनः समागत्य तूणीरे पूर्ववत्स्थितः ।
ततोऽब्रवीत् रघुश्रेष्ठं सागरो विनयान्वितः ॥ ८३ ॥
"हे रामा, माझ्या उत्तर प्रदेशी द्रुमकुल्य नावाचा एक प्रसिद्ध प्रदेश ताहे. तेथे पापी मनाचे अनेक लोक राहातात. ते रात्रंदिवस मला त्रास देत असतात. हे रघुश्रेष्ठा, तेथे तुमचा बाण टाका." त्यानंतर रामांनी सोडलेला तो बाण एका क्षणात आभीर मंडळाचा वध करून, पुनः परत आला आणि पूर्वीप्रमाणे तो भात्यात येऊन राहिला. त्यानंतर सागर विनयपूर्वक रघुश्रेष्ठांना म्हणाला. (८१-८३)

नलः सेतुं करोत्वस्मिन् जले मे विश्वकर्मणः ।
सुतो धीमान् समर्थोऽस्मिन् कार्ये लब्धवरो हरिः ॥ ८४ ॥
" विश्वकर्म्याच्या नल नावाच्या पुत्राने माझ्या पाण्यात सेतू तयार करावा. वर प्राप्त झाल्यामुळे तो बुद्धिमान वानर हे काम करण्यास समर्थ आहे. (८४)

कीर्तिं जानन्तु ते लोकाः सर्वलोकमलापहाम् ।
इत्युक्‍त्वा राघवं नत्वा ययौ सिन्धूरदृश्यताम् ॥ ८५ ॥
तसे केल्यावर सर्व लोकांच्या पापाचे हरण करणारी तुमची कीर्ती सर्व लोकांना कळून येईल." असे सांगून, राघवांना नमस्कार करून, सागर अंतर्धान पावला. (८५)

ततो रामस्तु सुग्रीव लक्ष्मणाभ्यां समन्वितः ।
नलं आज्ञापयच्छीघ्रं वानरै सेतुबन्धने ॥ ८६ ॥
त्यानंतर सुग्रीव आणि लक्ष्मण यांच्यासह रामांनी वानरांच्या मदतीने सेतू बांधण्याची आज्ञा नलाला दिली. (८६)

ततोऽतिहृष्टः प्लवगेन्द्रयूथपैः
    महानगेन्द्रप्रतिमैर्युतो नलः ।
बबन्धं सेतुं शतयोजनायतं
    सुविस्तृतं पर्वतपादपैर्दृढम् ॥ ८७ ॥
अतिशय आनंदित झालेल्या नलाने तेव्हा प्रचंड पर्वताप्रमाणे महान शरीर असणाऱ्या श्रेष्ठ वानरांच्या आणि वानर यूथपतींच्या साहाय्याने, पर्वत आणि वृक्ष यांचा वापर करून, शंभर योजने लांब, अतिविस्तृत आणि बळकट असा सेतू बांधला. (८७)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥


GO TOP