श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ अष्टाशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
इलाबुधयोर्मिथो दर्शनं बुधेन इलासहचारीणां किंपुरुषीति नाम विधाय पर्वतेऽवस्थानाय प्रेषणम् -
इला आणि बुध यांनी एकमेकास पहाणे तसेच बुधाने त्या सर्व स्त्रियांना किंपुरुषी नाम देऊन पर्वतावर राहाण्याचा आदेश देणे -
तां कथां ऐलसम्बद्धां रामेण समुदीरिताम् ।
लक्ष्मणो भरतश्चैव श्रुत्वा परमविस्मितौ ॥ १ ॥
श्रीरामांनी सांगितलेली इलाच्या चरित्राशी संबंध असणारी ती कथा ऐकून लक्ष्मण आणि भरत दोघेही फार विस्मित झाले. ॥१॥
तौ रामं प्राञ्जली भूत्वा तस्य राज्ञो महात्मनः ।
विस्तरं तस्य भावस्य तदा पप्रच्छतुः पुनः ॥ २ ॥
त्या दोघां भावांनी हात जोडून श्रीरामांना महामना राजा इल यांच्या स्त्री-पुरुषभावा संबंधीच्या विस्तृत वृत्तांताविषयी पुन्हा विचारले - ॥२॥
कथं स राजा स्त्रीभूतो वर्तयामास दुर्गतिः ।
पुरुषः स यदा भूतः कां वृत्तिं वर्तयत्यसौ ॥ ३ ॥
प्रभो ! राजा इल स्त्री होऊन तर मोठ्‍या दुर्गतीत पडला असेल. त्यांनी तो समय कसा घालवला ? आणि जेव्हा ते पुरुषरूपात रहात होते तेव्हा कुठल्या वृत्तिचा आश्रय घेत होते ? ॥३॥
तयोस्तद्‌भाषितं श्रुत्वा कौतूहलसमन्वितम् ।
कथयामास काकुत्स्थः तस्य राज्ञो यथागतम् ॥ ४ ॥
लक्ष्मण आणि भरतांचे हे कौतुहलपूर्ण वचन ऐकून श्रीरामचंद्रांनी राजा इलाचा वृत्तांत जसा उपलब्ध होता, त्याच रूपात पुन्हा ऐकविण्यास आरंभ केला- ॥४॥
तमेव प्रथमं मासं स्त्रीभूता लोकसुंदरी ।
ताभिः परिवृता स्त्रीभिः ये च पूर्वं पदानुगाः ॥ ५ ॥

तत्काननं विगाह्वाशु विजह्रे लोकसुंदरी ।
द्रुमगुल्मलताकीर्णं पद्‌भ्यां पद्मदलेक्षणा ॥ ६ ॥
त्यानंतर त्या प्रथम मासातच इला त्रैलोक्यसुंदरी नारी होऊन वनात विचरण करू लागली. जे प्रथम त्यांचे चरणसेवक होते ते ही स्त्रीरूपात परिणत झाले होते, त्याच स्त्रियांनी घेरलेली लोकसुंदरी कमललोचना इला वृक्ष, झाडी आणि लतांनी भरलेल्या एका वनांत शीघ्र प्रवेश करून पायीच सर्वत्र हिंडू फिरू लागली. ॥५-६॥
वाहनानि च सर्वाणि संत्यक्त्वा वै समन्ततः ।
पर्वताभोगविवरे तस्मिन् रेमे इला तदा ॥ ७ ॥
त्या समयी सर्व वाहनांना सर्व बाजूस सोडून देऊन इला विस्तृत पर्वत मालांच्या मध्यभागी भ्रमण करू लागली. ॥७॥
अथ तस्मिन् वनोद्देशे पर्वतस्याविदूरतः ।
सरः सुरुचिरप्रख्यं नानापक्षिगणायुतम् ॥ ८ ॥
त्या वनप्रांतात पर्वताच्या जवळच एक सुंदर सरोवर होते, ज्यात नाना प्रकारचे पक्षी कलरव करीत होते. ॥८॥
ददर्श सा इला तस्मिन् बुधं सोमसुतं तदा ।
ज्वलन्तं स्वेन वपुषा पूर्णं सोममिवोदितम् ॥ ९ ॥
त्या सरोवरात सोमपुत्र बुध तपस्या करीत होते, जे आपल्या तेजस्वी(**) शरीरामुळे उदित झालेल्या पूर्ण चंद्रासमान प्रकाशित होत होते. इलाने त्यांना पाहिले. ॥९॥
(** - हे सरोवर त्या सीमेच्या बाहेर होते जेथपर्यंतचे प्राणी भगवान्‌ शिवांच्या आदेशाने स्त्रीरूप झाले होते, म्हणून बुधाला स्त्रीत्वाची प्राप्ति झाली नाही.)
तपन्तं च तपस्तीव्रं अम्भोमध्ये दुरासदम् ।
यशस्करं कामकरं कारुण्ये पर्यवस्थितम् ॥ १० ॥
ते जलात राहून तीव्र तपस्येत संलग्न होते. त्यांना पराभूत करणे कुणासाठीही अत्यंत कठीण होते. ते यशस्वी, पूर्णकाम आणि तरूण अवस्थेत स्थित होते. ॥१०॥
सा तं जलाशयं सर्वं क्षोभयामास विस्मिता ।
सहगैः पूर्वपुरुषैः स्त्रीभूतै रघुनन्दन ॥ ११ ॥
रघुनंदना ! त्यांना पाहून इला चकित झाली आणि ज्या प्रथम पुरुष होत्या त्या स्त्रियांच्या सह-जलात उतरून तिने सार्‍या जलाशयाला क्षुब्ध करून सोडले. ॥११॥
बुधस्तु तां समीक्ष्यैव कामबाणवशं गतः ।
नोपलेभे तदात्मानं सञ्चचाल तदाम्भसि ॥ १२ ॥
इलेवर दृष्टि पडतांच बुध कामाच्या बाणांच्या अधीन झाले. त्यांना आपल्या तना-मनाची शुद्ध राहिली नाही आणि ते त्यासमयी जलात विचलित झाले. ॥१२॥
इलां निरीक्षमाणस्तु त्रैलोक्याभ्यधिकां शुभाम् ।
चिन्तां समभ्यतिक्रामत् का न्वियं देवताधिका ॥ १३ ॥
इला त्रैलोक्यात सर्वांहून अधिक सुंदर होती. तिला बघताच बुधाचे मन तिच्या ठिकाणी आसक्त झाले आणि ते विचार करू लागले, ही कोण स्त्री आहे; जी देवांहूनही अधिक रूपवती आहे. ॥१३॥
न देवीषु न नागीषु नासुरीष्वप्सरःसु च ।
दृष्टपूर्वा मया काचिद् रूपेणानेन शोभिता ॥ १४ ॥
देववनिता, नागवधु, असुरांच्या स्त्रिया आणि अप्सरा यामध्ये मी पूर्वी कधी अशी कोणी मनोहर रूपाने सुशोभित होणारी स्त्री पाहिलेली नाही. ॥१४॥
सदृशीयं मम भवेद् यदि नान्यपरिग्रहः ।
इति बुद्धिं समास्थाय जलात् कूलमुपागमत् ॥ १५ ॥
जर हिचा दुसर्‍या कोणाशी विवाह झालेला नसेल तर सर्वथा ही माझी पत्‍नी बनण्यायोग्य आहे. असा विचार करून ते जलातून बाहेर निघून किनार्‍यावर आले. ॥१५॥
आश्रमं समुपागम्य ततस्ताः प्रमदोत्तमाः ।
शब्दापयत धर्मात्मा ताश्चैनं च ववन्दिरे ॥ १६ ॥
नंतर आश्रमात पोहोचून त्या धर्मात्म्याने पूर्वोक्त सर्व सुंदरीना आवाज देऊन बोलावले आणि त्या सर्वांनी येऊन त्यांना प्रणाम केला. ॥१६॥
स ताः पप्रच्छ धर्मात्मा कस्यैषा लोकसुन्दरी ।
किमर्थमागता चैव सर्वमाख्यात मा चिरम् ॥ १७ ॥
तेव्हा धर्मात्मा बुधांनी त्या सर्व स्त्रियांना विचारले - ही लोकसुंदर नारी कुणाची पत्‍नी आहे आणि कशासाठी येथे आली आहे; या सर्व गोष्टी तुम्ही शीघ्र मला सांगा. ॥१७॥
शुभं तु तस्य तद् वाक्यं मधुरं मधुराक्षरम् ।
श्रुत्वा स्त्रियश्च ताः सर्वा ऊचुर्मधुरया गिरा ॥ १८ ॥
बुधाच्या मुखांतून निघालेले हे शुभवचन मधुर पदावलीने युक्त तसेच गोड होते. ते ऐकून त्या सर्व स्त्रिया मधुर वाणीने म्हणाल्या - ॥१८॥
अस्माकमेषा सुश्रोणी प्रभुत्वे वर्तते सदा ।
अपतिः काननान्तेषु सहास्माभिश्चरत्यसौ ॥ १९ ॥
ब्रह्मन्‌ ! ही सुंदरी आमची नेहमीची स्वामिनी आहे. हिचा कोणी पति नाही आहे. ही आमच्यासह आपल्या इच्छेनुसार वनप्रांतात विचरत असते. ॥१९॥
तद् वाक्यमाव्यक्तपदं तासां स्त्रीणां निशम्य च ।
विद्यामावर्तनीं पुण्यां आवर्तयत स द्विजः ॥ २० ॥
त्या स्त्रियांचे ते वचन सर्व प्रकारे सुस्पष्ट होते. ते ऐकून ब्राह्मण बुधाने पुण्यमयी आवर्तनी विद्येचे आवर्तन (स्मरण) केले. ॥२०॥
सोऽर्थं विदित्वा सकलं तस्य राज्ञो यथा तथा ।
सर्वा एव स्त्रियस्ताश्च बभाषे मुनिपुङ्‌गवः ॥ २१ ॥
त्या राजाच्या विषयी सर्व गोष्टी यथार्थ रूपाने जाणून मुनिवर बुधांनी त्या सर्व स्त्रियांना म्हटले - ॥२१॥
अत्र किम्पुरुषीर्भूत्वा शैलरोधसि वत्स्यथ ।
आवासस्तु गिरावस्मिन् धीघ्रमेव विधीयताम् ॥ २२ ॥
तुम्ही सर्व किंपुरुष (किन्नरी) होऊन पर्वताच्या किनार्‍यावर राहू लागा. या पर्वतावर शीघ्रच आपल्यासाठी निवासस्थान बनवा. ॥२२॥
मूलपत्रफलैः सर्वा वर्तयिष्यथ नित्यदा ।
स्त्रियः किम्पुरुषान्नाम भर्तॄन् समुपलप्स्यथ ॥ २३ ॥
पत्र आणि फळामुळांवरच तुम्हा सर्वांना सदा जीवननिर्वाह करावा लागेल. पुढे काही काळाने तुम्ही सर्व स्त्रिया किंपुरुष नामक पतिंना प्राप्त करून घ्याल. ॥२३॥
ताः श्रुत्वा सोमपुत्रस्य वाचं किम्पुरुषीकृताः ।
उपासाञ्चक्रिरे शैलं वध्वस्ता बहुलास्तदा ॥ २४ ॥
किंपुरुषी नावाने प्रसिद्ध झालेल्या त्या स्त्रिया सोमपुत्र बुधाची उपर्युक्त गोष्ट ऐकून त्या पर्वतावर राहू लागल्या. त्या स्त्रियांची संख्या फारच अधिक होती. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टाशीतितमः सर्गः ॥ ८८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा अठ्ठाऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP