॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय सेहेचाळिसावा ॥
हनुमंताचे नंदिग्रामाला प्रयाण

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अप्सरेने हनुमंताला राक्षसी मायेची कल्पन दिली :

उद्धरोनियां ते खेचरी । विजयी झाला कपिकेसरी ।
येरी राहोनि गगनांतरी । मधुर स्वरी अनुवादे ॥ १ ॥
तुझिया उपकारा हनुमंता । काय म्यां उतरायी व्हावें आतां ।
कांहि विनवीत तत्वतां । सावधानता परिसावें ॥ २ ॥
तूं अदट दाटुगा वीर होसी । कळिकाळातें दृष्टी नाणिसी ।
त्याहीवरी रामस्मरणेंसीं । अहर्निशीं डुल्लत ॥ ३ ॥
रामनाम स्मरणापुढें । विघ्न कायसें बापुडें ।
आश्चर्य देखिलें वाडेंकोंडें । तुजपुढें सांगेन ॥ ४ ॥
तूं भावार्थी श्रीरामभक्त । नेणसी कपटाची मात ।
निष्कपट तूं कपिनाथ । राम देखत सर्वत्र ॥ ५ ॥
विनवीत असें मी तुजप्रती । सावध ऐकें कपिपती ।
केवळ कपटाची कपटमूर्तीं । तो हा राक्षस चित्तीं मानावा ॥ ६ ॥


भृशं प्रीतास्मि ते वीर राघवाज्ञां प्रकुर्वतः ।
पापात्मा एष दुर्बुद्धिर्येन त्वं मन्यसे ऋषिम् ॥१॥
जहि रक्षो महामायं विप्रवेषं महाबलम् ।
एष राक्षसराजेन रावणेन दुरात्मना ॥२॥
प्रेषितस्त्वद्विनाशाय कालनेमिर्निशाचरः ।
इत्युक्त्वा वायुपुत्राय साप्सरा कामरुपिणी ॥३॥
अंतर्धानं गता तत्र दृश्यमाना हनूमता ॥४॥


तूं रामाचा निजभक्त । स्वामिकार्यालागीं उद्युक्त ।
अति संकटीं दूर पंथ । क्रमोनि येथ आलासी ॥ ७ ॥
ज्यासी म्हणती प्रम साधु । तो हा कपती महामैंदु ।
जाण राक्षस दुर्बद्धु । तुज छळवाद करुं आला ॥ ८ ॥
रावणाचा परम आप्त । प्रतिज्ञा करोनियां येथ ।
ठाकूण आला द्रोणपर्वत । छळणार्थ तुजलागीं ॥ ९ ॥
हा काळनेमी राक्षस । ब्राह्मणरुपे तापस ।
धरोनी आला तापसवेष । अति दुर्धर्ष महापापी ॥ १० ॥
झणें याचा विश्वास धरिसी । छळण करील क्षणार्धेसी ।
छळछद्में याची मिरासी । बहु मायेसीं जाण तूं ॥ ११ ॥
जंव उदया ये सुभानु । तंव गोंवावा कपिनंदनु ।
कां मारावा सिंतरुनु । ऐसा पण करोनि आला ॥ १२ ॥
सत्य मानीं माझें वचन । वधीं महापापी दुर्जन ।
न मारितां करील विघ्न । सत्य जाण कपिनाथा ॥ १३ ॥
ऐसें बोलोनि सुंदरी । गेली अंतरिक्ष गगनांतरीं ।
चाकाटला तो अंतरीं । कपिकेसरी अति विस्मित ॥ १४ ॥
गेली असतां स्वर्गांगना । आश्चर्य वर्तलें कपिनंदना ।
विचार आदरिला निजमना । दुष्टहननालागोनी ॥ १५ ॥
सबाह्य स्मरोनी रघुनाथा । राक्षस दुष्ट अवलोकितां ।
समूळ उडाली कपटता । श्रीरामदूताचेनि भेणें ॥ १६ ॥
देखणा होवोनियां देहीं । पाहणें पाहतां ठायीं ।
दृश्यादृश्यत्वचि नाहीं । द्रष्टा तोही हारपे ॥ १७ ॥
द्रष्टा हरपालिया पाहीं । दर्शन नुरेचि कांही ।
भावनेसी ठाव नाहीं । वेगळें काही दिसेना ॥ १८ ॥
द्रष्टा होय परिच्छिन्न । तरी भासे दृश्याचें भान ।
झालिया त्रिपुटीसीं बोळवण । कपटचिन्ह तेथें कैंचें ॥ १९ ॥
एका श्रीरामनामासाठीं । उडती कपटाचिया कोटी ।
तो श्रीराम कपिसनिष्ठीं । कपटगोष्टी तेथें कैंची ॥ २० ॥
निर्धारोनि पाहे तो कपींद्र । दिसे राक्षस भ्यासुर ।
महापापी दुराचार । यासी सत्वर मारीन ॥ २१ ॥
तेणें साधून पुरुषार्थ । करुं आला माझा घात ।
अति बळी रामदूत । याचा निःपात करीन ॥ २२ ॥
ऐसें बोलोनि कपींद्र । आला राक्षसासमोर ।
बोल बोलोनि निष्ठुर । स्वयें वानर सरसावला ॥ २३ ॥
अरे पापिया निशाचरा । झणीं पळसी दुराचारा ।
तुझिया करीन मी संहारा । कपटाचारा सांडी परतें ॥ २४ ॥
ऋषिरुप धरोनि तापस् । करुं आलासी छळणास ।
आतां होई सावकाश । करी युद्धास निजबळें ॥ २५ ॥
माझेनि हातें त्वरित । आजि न वांचसी जीवें जीत ।
ऐसें जाणोनि निश्चित । करीं पुरुषार्थ निजबळें ॥ २६ ॥
ऐसें बोलतां मारुती । सरसावला राक्षसमूर्ती ।
रणी जिंकावया कपीप्रती । साटोप चित्ती मांडिला ॥ २७ ॥


तस्य तद्वचनं श्रुत्वा कालनेमिर्निशाचरः ।
रुपं विकुरुते घोरं दशकल्पप्रमाणतः ॥५॥
ऊर्ध्वं तु योजनं पंच धुन्वन्‍रुक्षशिरोरुहान् ।
अष्टौ दंष्ट्राः सुतीक्ष्णाग्राः सृक्किणीरपि संलिहत् ॥६॥
विवृते नयने घोरे मेघस्तनितनिःस्वनः ।
अर्धदग्धमलाते च प्रगृह्याभ्यपतद्धरिम् ॥७॥

मायावी राक्षसाच्या वधाने गंधर्वाची झोपमोड व क्रोध :

ऐकोनि कपीचें उत्तर । काळनेमि निशाचर ।
धरीत विक्राळ शरीर । अति भ्यासुर भासत ॥ २८ ॥
दश योजनें वाढला उंच । आडवा योजनें पांच ।
माथांचे उभारले कच । जैसे वृक्ष शूळप्राय ॥ २९ ॥
आठही दाढा समसमित । मांसाचे चाकळे आंत ।
चघळी अशुद्धें निथळत । कैसा भासत भ्यासुर ॥ ३० ॥
भोंवयांतळीं बुबुळें खोल । जैसे धगधगीत इंगळ ।
तैसे दिसती नेत्रगोळ । अति विक्राळ आकृती ॥ ३१ ॥
जैसा मेघ गडगडिला । तैसा निशाचर गर्जिन्नला ।
कोलीत घेवोनि धांविन्नला । हनुमान दृष्टी लक्षूनी ॥ ३२ ॥
प्रताप देखोनि निशाचरीं । वेगीं वाढला कपिकेसरी ।
दहा योजनें गगनांतरीं । उसळोनि दूरी चालिला ॥ ३३ ॥
जैसा तापला लोहगोळा । तैसा परतला गोळांगूंळ ।
सवेग चालिला सबळ । जैसा कल्लोळ अग्नीचा ॥ ३४ ॥
लक्षोनियां निशाचर । उडी घातली सत्वर ।
झालें शतचूर्ण शरीर । कपिभार वरी पडतां ॥ ३५ ॥
तरी राक्षस आतुर्बळी । आक्रंदे दिधली आरोळी ।
कपि तुझी युद्धसमेळीं । मी रांगोळी करीन ॥ ३६ ॥
ऐसें बोलतां राक्षस । भूमीं आदळला कर्कश ।
निधा उठिला बहुवस । पर्वतेश दणानिला ॥ ३७ ॥
शब्द झाला अत्यद्‍भुत । गंधर्व होते निद्रिस्त ।
ते उठोनियां तेथ । सैरा धांवत पर्वतीं ॥ ३८ ॥
दणका उठिला दुर्धर । जागे झाले सत्वर ।
घेवोनिया शस्त्रास्त्र । पर्वतेंद्र शोधिती ॥ ३९ ॥


तं निहत्य महानादं ननाद च महाकपिः ।
तेन नादेन गंधर्वाः प्रब्रुद्धाः शैलवासिनः ॥८॥


तंव देखिला कपिकेसरी । भंवता वेढिला समग्रीं ।
वर्षताती शस्त्रास्त्रीं । निशीमाजी चोरी केंवी करिसी ॥ ४० ॥
तूं कोण कैंचा कोण आहेसी । मध्यरात्रीं कां आलासी ।
पर्वतीं सैरा विचरसी । आज्ञा कोणासी पूसिली ॥ ४१ ॥
निशिंमध्यान्ह अंधारीं । तूं विचरसि गिरिशिखरीं ।
पर्वताकार शरीरी । कोण धरेवरी पाडिला असे ॥ ४२ ॥
एक म्हणती पुसतां काय । धरा बांधा हात पाय ।
मध्यरात्रीं विचरत आहे । तस्कर होय सर्वथा ॥ ४३ ॥
ऐसा करिती कल्लोळ । मिनले सभोंवते सकळ ।
तें देखोनि गोळांगूळ । मधुर बोल बोलत ॥ ४४ ॥


गंधर्वाणां वचः श्रुत्वा हनूमान्वाक्यमब्रवीत् ।
श्रुता वा यदि किष्किंधा जंबद्वीपसमाश्रया ॥९॥
वानराधिपतिस्तत्र सुग्रीवो नाम विश्रुतः ।
मित्रकार्यार्थमुद्युक्तो रावणेनाद्य विग्रहे ॥१०॥
मित्रभ्रात राक्षसेन शक्त्या च विनिपातितः ।
तदर्थ संप्रयातोहमोषधीः प्रार्थयाम्याहम् ॥११॥
विशल्यकरणीं नाम ज्ञात्वेह परमौषधिम् ।
विघ्नं नैव प्रकर्तव्यं प्रसादं कतुर्मर्हथ ॥१२॥
अहं वानरराजस्य भृत्यस्तु परमैर्गुणैः ।
हनूमानिति विख्यातः स्वाम्यर्थे प्रार्थयाम्यहम् ॥१३॥

हनुमंताने गंधर्वाला ओळख सांगितली व क्रोधाचे निवारण केले :

जंबुद्वीपाचे दक्षिणकोनीं । किष्किंधा असे राजधानी ।
सुग्रीव राजचूडामणी । तये स्थानी नांदत ॥ ४५ ॥
त्यासी सख्य श्रीरामेंसीं । स्वामी मानी श्रीरामासी ।
तन मन अर्पिलें भक्तीसीं । वानरांसी अति प्रेम ॥ ४६ ॥
रामरावणांचें रण । युद्ध झाले अति दारुण ।
रावणें ब्रह्मशक्ति सोडून । बंधु लक्ष्मण पाडिला ॥ ४७ ॥
वांचवावया सौ‍मित्रासी । नेऊं आलों ओषधींसीं ।
विघ्न न कराएं आम्हांसी । नमन तुम्हांसी मी करितो ॥ ४८ ॥
उदया येतां गभस्ती । प्राण सांडील ऊर्मिलापती ।
म्हणोनि ओषधी मध्यरात्रीं । नेवो निश्चितीं मीं आलों ॥ ४९ ॥
सुग्रीवेसहित वानर । सकळ श्रीरामाचे किंकर ।
माझें नाम हनुमान वीर । मार्ग सत्वर मज द्यावा ॥ ५० ॥
स्वामिकार्य साधितां पूर्ण । सर्वथा करुं नये विघ्न ।
पुढिलांसि करितां छळण । श्रीरघुनंदन क्षोभेल ॥ ५९ ॥


हनूमव्दचनं श्रुत्वा गंधर्वास्ते महाबलः ।
विचित्रवसनाः सर्वे नानाप्रहरणोद्यताः ॥१४॥


ऐसे बोलतां कपिकेसरी । गंधर्व सरसावले भारी ।
केवढी रामसुग्रीवांची थोरी । ओषधि रात्रीं नेवो आला ॥ ५२ ॥
सकळ सैन्य सरसावलें । मारावया सिद्ध झालें ।
गदा परिघ तिखट भाले । वर्षो लागले समकाळें ॥ ५३ ॥
चौपासीं धांवती सैरा । होत गंधर्वां आडदरा ।
आकळावया वानरा । करिती खरा पुरुषार्थ ॥ ५४ ॥
गंधर्व मिनले चौदा सहस्र । एकला एक कपिंद्र ।
क्रोधा चढला दुर्धर । करुं संहार आदरिला ॥ ५५ ॥
रुपें वाढला दारुण । रोमें थरकती संपूर्ण ।
भयानक दिसे चिन्ह । कपींद्र जाण खवळला ॥ ५६ ॥
एक मुष्टिघातें मारिलें । एक दांतांतळीं रगडिले ।
उरले ते पुच्छीं बांधिलें । मग आपटिलें खडकेंशीं ॥ ५७ ॥
एकचि वेळे सत्वर । मारिले चौदा सहस्र ।
केला रामनामें भुभुःकार । विजयी कपींद्र स्वयें झाला ॥ ५८ ॥
ज्याचे मुखीं नामस्मरण । विघ्न त्याचे वंदी चरण ।
कळिकाळ स्वयें आपण । नित्य नमन त्यासी करी ॥ ५९ ॥
ऐसा नामधारक वीर । विजयी झाला कपीद्र ।
नामें गर्जोनि सत्वर । ओषधिभार पाहतसे ॥ ६० ॥


हर्वा गंधर्ववीराणां सहस्त्राणि चतुर्दश ।
पर्यटन्स गिरीं सर्व नापश्यत महौषधिम् ॥१५॥
चिंतयामस हनुमान्कृते कर्मणि निष्फले ।
संगृह्य परिगच्छेयमुपहासो भविष्यति ॥१६॥
सर्व च पर्वतं दृष्ट्वा प्रयासे माविलंबत ।
तत्र ज्ञास्यति वैद्योऽसौ सुषेणः प्ररमौषधिम् ॥१७॥

पर्वताचा औषधीसंबधी असहकार :

पर्वताचें शिखराशिखर । पाहतां ओषधिभार ।
सहसा नव्हती गोचर । तेणें कपींद्र खवळला ॥ ६१ ॥
चाळे मांडिले पर्वतें । दिसों नेदी ओषधींतें ।
नेणे माझ्या पराक्रमातें । सामर्थ्य याचें पाहूं पां ॥ ६२ ॥
म्हणोनि खवळला मानसीं । तंव ओषधी देखिल्या पश्चिमेसीं ।
धांवोनि गेला त्यांपासीं । तंव पूर्वेसीं देखिल्या ॥ ६३ ॥
उत्तर दक्षिण समस्त । अवघा पर्वत लखलखीत ।
वानर विस्मित जाला तेथ । काय येथ करावें ॥ ६४ ॥
ओषधी म्हणोनि धरुं जाय । तंव झाडोरा कैंचा काय ।
तो सांडोन आणखी पाहे । तंव तेथेंही होय तैसेंचि ॥ ६५ ॥
ऐसा झाला खेदक्षीण । नव्हेचि ओषधींचें दर्शन ।
चिंतातुर अति उद्विग्न काय आपण बोलत ॥ ६६ ॥
आजि जितुका पुरुषार्थ केला । तितुका अवघा वायां गेला ।
कपटी राक्षस भेटला । तोही मारिला वायांचि ॥ ६७ ॥
दुष्कर कर्में केलीं । ती अवघींच वायां गेलीं ।
ओषधींनीं बुडी दिधली । शक्ति झाली तेही वृथा ॥ ६८ ॥
सुग्रीवा काय मुख दाखवूं । श्रीरामचरण कैसे पाहूं ।
अंगदा काय उत्तर देऊं । श्रीरघुराव क्षोभेल ॥ ६९ ॥
मीं निजाभिमान केला पाहीं । ओषधी आणीन अवघ्याही ।
श्रीराम न साहे हें कांही । अहंता सर्वही घातक ॥ ७० ॥
अहंता कर्म सिद्धी न वचे । अहंता सुख न घडे स्वर्गींचें ।
अहंता सार न पावे वेदांचें । अहंता साच घातक ॥ ७१ ॥
अहंता न साधे स्वामिकार्य । अहंतेनें साधन हत होय ।
अहंता यश न लाहे । निद्य होय अहंता ॥ ७२ ॥
अहंता नव्हे चित्तशुद्धी । अहंता नव्हे साधनसिद्धी ।
अहंता नव्हे सत्वशुद्धी । अहंता त्रिशुद्धी घातक ॥ ७३ ॥
ऐहिक सुख नव्हे देख । अथवा नव्हे पारत्रिक ।
अहंता भोगिजे नरक । अहंता घातक जगा झाली ॥ ७४ ॥
ते अहंता मी आपण । श्रीरामा संमुख केली जाण ।
तेणें नागवलों संपूर्ण । ओषधिदर्शन नव्हे मज ॥ ७५ ॥
महणती हनुमान पामर । नेणे ओषधिसंभार ।
किती आणिलें कतवार । पालेखाइर मर्कट ॥ ७६ ॥
काय विचार करुं आतां । उपडोनी वनस्पति समस्ता ।
भारा बांधोनियां नेतां । उपहासता होईल ॥ ७७ ॥
धांव पाव गा श्रीरामा । माझा अपराध करीं क्षमा ।
पडिलों संकटीं दुर्गमा । सर्वोत्तमा पाव वेगीं ॥ ७८ ॥
मी तुझें निजबाळक । ज्ञानमूढ अति उत्संक ।
क्षमा करोनि सकळिक । कृपा आवश्यक करीं मज ॥ ७९ ॥
ऐसी उत्कट चिंता । करिंता तया कपीनाथा ।
श्रीराम आठवला चित्ता । बुद्धिदाता निजभक्तां ॥ ८० ॥
जो कायावाचामनेंसीं । शरण रिघे श्रीरामासीं ।
क्षणार्धे सोडवी त्यासी । राम भक्तासीं कृपाळु ॥ ८१ ॥
बुद्धीची बुद्धि आपण । अंतरात्मा रघुनंद ।
तेणें होवोनि प्रसन्न । कपिनंदन प्रबोधिल ॥ ८२ ॥


ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते ।
तेषामेवानुकंपार्थमहमज्ञानजं तमः ॥१८॥

पर्वताचे उच्चाटण करुन आकाशमार्गे उड्डाण :

गजेंद्र ग्राहें धरिला असतां । संकटीं स्मरला भगवंता ।
काकुलती उडी सत्वरतां । घालोनि तत्वतां उद्धरिला ॥ ८३ ॥
हनुमान अखंड नामधारक । नामें पावला रघुकुळटिळक ।
कपीस बुद्धी स्फुरली चोख । सत्वर देख सरसावला ॥ ८४ ॥
म्हणे एवढी कायसी चिंता । मी भ्रांत कां झालों आतां ।
सगळा पर्वतचि तत्वतां । नेऊं सर्वथा उचलोनी ॥ ८५ ॥
सुषेण वैद्यराज तेथे । ओळखील ओषधींतें ।
उठवील सौ‍मित्रातें । अर्ध क्षण न लागतां ॥ ८६ ॥
जरी विलंब करुं येथ । उदया येईल भास्वत ।
शक्ति वरद अद्‍भुत । कार्य समस्त नासेल ॥ ८७ ॥
पर्वतें मांडिलें सळ । पाहों आदरिलें माझे बळ ।
ओषधी लपविल्या सकळ । मज केवळ गोंवावया ॥ ८८ ॥
हाही मिनला रावणासी । गोवूं आदरिलें आम्हासी ।
उपडोनि याच्या कंदासी । ओषधींसीं नेईन ॥ ८९ ॥
ऐसा करोनि विचार । केला रामनामें भुभुःकार ।
कांपिन्नले सुरासुर । चराचर भयभीत ॥ ९० ॥


इति संचिंत्य बलवान्नानारत्‍नोपशोभितम् ।
सिंहव्याघ्‍रगजाकिर्णमुज्जहार महागिरिम् ॥१९॥


पुच्छें गुंडाळिलें बुडखातें । शिखर कवळिलें हातें ।
आंदोलितां पर्वतातें । भूतें आकांते कलकलती ॥ ९१ ॥
करोनियां रामस्मरण । वेगीं उपडितां गिरिद्रोण ।
दणाणिलें त्रिभुवन । शेषफण तडकला ॥ ९२ ॥
दणाणिलें पाताळ । हडबडिले लोकपाळ ।
वनदेवतां खळबळ । केला कोल्लाळ सकळिकीं ॥ ९३ ॥
भेणें पळालीं वन्चरें । तिहीं लंघिलीं गिरिकंदरें ।
ससे म्हैसे तरस तगरें । चौफेरें कळकळिती ॥ ९४ ॥
अट्टहास्य मदगजांचे । आरड ते व्याघ्रांचे ।
सिंहनाद सिंहाचे । तेणें दचके यमलोक ॥ ९५ ॥
आंदोळल्या द्रुमवल्ली । भूतें आकांतलीं सकळीं ।
त्यांही दांती तृणें धरली । शरण आलीं कपीसी ॥ ९६ ॥
दिशा लंघिल्या पक्षिकुळीं । सर्प रिघाले पाताळीं ।
दिग्गजां बैसली टाळी । दातखिळी कृतांता ॥ ९७ ॥
दश योजनें विस्तार । पंच योजनें उंची थोर ।
ऐसा पर्वत सविस्तर । कपींद्रें सत्वर उपडिला ॥ ९८ ॥


दशयोजनविस्तार्णं पंचयोजनमायतम् ।
दोर्भ्यां संगृह्य तं शैलमुत्पपात विहायसा ॥२०॥

पर्वतासह हनुमंताच्या उड्डाणामुळे विचित्र परिस्थिती :

बळें आकळोनि पाहीं । पर्वत उपडिला दोहीं बाहीं ।
गगना उसळला लवलाहीं । श्रम नाहीं अणुमात्र ॥ ९९ ॥
छत्राक झेली बाळक । गज शुंडादंडें कमळ देख ।
तैसा चालिला कपिनायक । गिरी अलोलिक उपडोनी ॥ १०० ॥
तळीं अंधार पडे गडद । वरी प्रकाश अगाध ।
हेमच्छाया अति शुद्ध । कोंदलें नभ उजेडें ॥ १ ॥
तळीं अंधार प्रकाश माथां । नभीं सवेग उडत जातां ।
अयोध्येचा प्रदेश पावतां । भरतें तत्वतां । देखिला ॥ २ ॥
अतिविस्मित झाला मनीं । निबिड दातली असतां रजनी ।
काय जात आहे गगनीं । लक्षितां चिन्ही लक्षेना ॥ ३ ॥
इंद्र बैसला विमानीं । सवें अप्सरा घेऊनी ।
क्रीडा करिताहे गगनीं । लाज मनीं असेना ॥ ४ ॥

भरताचा गैरसमज :

अंगत्रानें वात सुटला । तेणें ओषधिनाद उठिला ।
ध्वनि विचित्र उमटला । तो ऐकिला भरतानें ॥ ५ ॥
म्हणे केवढा हा उद्धट । वाद्यें लावोनि अद्‍भुत ।
अप्सरांसह विमानांत । सैरा विचरत आकाशीं ॥ ६ ॥
स्वयें घेवोनि वाराङ्गना । विमान हिंडवी गगना ।
उल्लंघोनी साधुसज्जनां । करीं अटण उन्मत्त ॥ ७ ॥
जो स्त्रीसवें निरत झाला । मद्यप्राशनीं मातला ।
जो धनलोभें भुलला । त्याचा गेला विवेक ॥ ८ ॥
वेश्यागमनीं जे रत । ते सर्वदा अतिउन्मत्त ।
नाठवे स्वार्थ परमार्थ । स्वेच्छा विचरत खर जैसा ॥ ९ ॥
खर नेणे मर्यादा । दिवसा देखतां जनपदा ।
वेश्याद्वारीं विचरे सदा । न सरे कदा माघारा ॥ ११० ॥
लाता हाणितां उरावरी । प्रीतीं धांवे संमुख खरी ।
पदाभिघात मुखावरी । आवडीं करीं झेलित ॥ ११ ॥
तैसा पुरुष कामाचारी । सुखचि मानी निरंतरी ।
पाऊल जाऊं नेदी दुरी । हृदयावरी झेलित ॥ १२ ॥
म्हणे जन्मांतरीचीं फळली भाग्यें । इचें पादकमळ हृदयीं लागे ।
दैवे दंडिलीं अभाग्यें । वृथा वैराग्यें कष्टती ॥ १३ ॥
स्त्रीकामाची ऐसी रीती । ऐक मद्यप्याची स्थिती ।
बेंचून पदरची संपत्ती । स्वयें होती जगनिंद्य ॥ १४ ॥
जेणें द्रव्यें ऐहिक भोग जोडे । सकाम कर्में स्वर्ग आतुडे ।
निष्कामें तरी डोळ्यांपुढे । तिष्ठे रोकडें मोक्षसुख ॥ १५ ॥
वेचूनियां ऐसें धन । करिताती मद्यपान ।
ते निजात्मघाती संपूर्ण । नरकसेवन आकल्प ॥ १६ ॥
धनलोभीं जे लुब्धक । स्वप्नीं न देखती सुख ।
जन्मादारभ्य देख । भोगिती नरक अनिवार ॥ १७ ॥
मरणांत झटें घेतां । रुका न मिळे सर्वथा ।
तथापि सायास करितां । आळस चित्ता उपजेना ॥ १८ ॥
ऐसें ऐशा कष्टें मिळे । तें वाढवी उपायबळें ।
निजशरीर कष्टविलें । जेणें फळे निजमोक्ष ॥ १९ ॥
जेणें भोगिजे इहभोग । जेणें भोगिजे स्वर्गभोग ।
जेणें साधे महायोग । जीवशिवविभाग जेथ लाहे ॥ १२० ॥
एवढिये प्राप्तीचे दाते । ते कष्टती धनार्जनातें ।
इतरांसी कोण पुसे तेथें । दुःखी समस्तें संगतीची ॥ २१ ॥
देव धर्म नेणती कांही । पर्वकाळ ठाउका नाहीं ।
श्राद्धाची संभावना नाहीं । निराश पाहीं सदा पितर ॥ २२ ॥
जैं धनाचा वेंच होय । तैं प्राणचि जाऊं पाहे ।
सणावाराची नेणे सोय । अतिथि येथें काय करील ॥ २३ ॥
कष्टें जोडिली संपत्ती । ते ठेविती अति निगुतीं ।
तोंडीं दगड माती घालिती । आपण मरती धुळी खात ॥ २४ ॥
ऐसी एक एकाची जाती । अधःपाता स्वयें नेती ।
तिन्ही एकत्र जेथें मिळती । तें दुःख किती सांगावें ॥ २५ ॥
ऐसा स्त्रीमदें मातला । विमानीं विचरत एकला ।
सज्जनांचा उलंघू केला । उन्मत्त छायेला पाडितसे ॥ २६ ॥
आम्ही सूर्यवंशी राजे नियामक । आम्हां स्वधर्म हाचि देख ।
उद्धतासीं लावणें सीक । विचार आणीक असेना ॥ २७ ॥

भरताच्या रामनामांकित बाणाचा हनुमंतावर आघात :

म्हणोनि रामनामांकित बाण । धगधगीत अति दारुण ।
चापीं सज्जिला आपण । दुष्टदळण करावया ॥ २८ ॥
करोनि रामनामस्मरण । धनुष्यीं ओढी काढून ।
बाणासी आज्ञा करुन । दुष्टदळण करावें ॥ २९ ॥
बाण श्रीनामांकित । हनुमान श्रीरामभक्त ।
जीवापरिस अत्यंत आप्त । राम स्मरण सर्वदा ॥ १३० ॥
सुटोनि शितीच्या कडकडाटीं । बाण पडिला अति संकटीं ।
कोणावरी करावी शरवृष्टी । अभक्त दृष्टी दिसेना ॥ ३१ ॥
परतोनि जावें जरी येथून । भरत दंडील संपूर्ण ।
कपीसीं करावें कंदन । तरी यासीं स्मरण श्रीरामाचें ॥ ३२ ॥
भरत श्रीरामाचा भिजभक्त । कपि सप्रेम राम स्मरत ।
माझा न चले पुरुषार्थ । बाण विस्मित विचारी ॥ ३३ ॥
भरताची आज्ञा ऐसी । जे दंडावें अति दुष्टासी ।
दुष्ट म्हणों न ये कपीसी । रामस्मरणेंसीं डुल्लात ॥ ३४ ॥
स्वामीच्या आज्ञेचें उल्लंघन न घडे । साधुअवज्ञा शिरीं न चढे ।
ऐसें विचारोनि वाडेंकोडें । चरणांकडे चालिला ॥ ३५ ॥
धरिलिया सज्जनांचे पाय । अपजय कधींच न होय ।
स्वामिकार्य सिद्धीस जाय । विजयी होय त्रैलोक्यीं ॥ ३६ ॥

रामनामांकित बाणामुळे हनुमंताला चिंता :

ऐसा निश्चय करोनि पूर्ण । पायीं मिठी घाली बाण ।
स्वयें विस्मित कपिनंदन । बाण कोण कोणाच ॥ ३७ ॥
ऐसें विचारिता मनीं । बाण अवलोकित नयनीं ।
देखतां श्रीरामनामांकित चिन्हीं । वायुनंदना अति विस्मयो ॥ ३८ ॥
श्रीरामाचा बाण होय । अतिक्रम याचा करुं नये ।
साष्टांगें नमन करिता होये । रामस्नेहें भावार्थे ॥ ३९ ॥
कपि कांक्षी बाणाचें वचन । तंव तो बोलेना संपूर्ण ।
पाहूं आदरिलें त्याचें चिन्ह । तंव तळीं बाण ओढित ॥ १४० ॥
उदया येईल दिवाकर । म्हणोनि सौ‍मित्रासी रघुवीर ।
घेवोनि आला मजसमोर । बाण सत्वर तेथें ओढीं ॥ ४१ ॥
कीं उठवोनि सौ‍मित्र । वधोनियां दशशिर ।
करोनि बिभीषण राज्यधर । स्वयें सत्वर येथें आला ॥ ४२ ॥
मी नपुंसक सर्वथा । न पवेंचि स्वामिकार्यार्था ।
धिक माझें जीवित्व वृथा । कोण अर्था जात असें ॥ ४३ ॥
ऐसा झाला अति दुःखी । सवेचि बाणातें अवलोकी ।
तंव तो ओढी अधोमुखीं । एकाएकीं सत्वर ॥ ४४ ॥
कार्य न साधेच माझेन । वेगें करीन देहपतन ।
म्हणोनि कृपाळु रघुनंदन । सत्वर बाण पाठविला ॥ ४५ ॥
आतां असो कांही भलतें । आज्ञा करणें निश्चितें ।
स्वयें अनुसरला बाणातें । विलंब येथें नये करूं ॥ ४६ ॥

हनुमंताचे बाणाच्या मागोमाग जाणे :

हनुमान आज्ञेचा किंकर । आज्ञा नुल्लंघी अणुमात्र ।
टाकिलें बाणावरी शरीर । निघाला सत्वर बाणवेगें ॥ ४७ ॥
पातला अयोध्येचा आराम । पुढें देखिला नंदिग्राम ।
रचना अति मनोरम । भक्तोत्तम भरत जेथें ॥ ४८ ॥
एका जनार्दना शराण । दोघांची भेटी अति गहन ।
दोघे प्रेमळ संपूर्ण । दोघे दोनिपण विसरती ॥ ४९ ॥
एका जनार्दन कृपाळु जननी । गोड न खाय बाळावांचूनी ।
मूखींचा घांस काढोनि । माझ्या वदनीं घालित ॥ १५० ॥
जें अत्यंत खावों नेणे। त्याचे मुखीं घांस देणें ।
न खातां पायांवरी बळें पाडणें । घांस कोंदणें मुखामाजी ॥ ५१ ॥
वांझेसी हेंन कळे चिन्ह । व्याली जाणे वेदन ।
क्रुपाळु एका जनार्दन । जिये अभिधान विश्वमाता ॥ ५२ ॥
ब्रह्मादिक पुत्र व्याली । जियें ब्रह्मांडें सृजिलीं ।
निजकर्में तृणें मानिलीं । मज ते चाली लक्षेना ॥ ५३ ॥
तान्हेल्या उदक द्यावें । की भुकेल्या जेऊं घालावें ।
मज हें सर्वथा न संभवे । तेणें ओल्हावे माउली ॥ ५४ ॥
यासीं काय करुं आतां । जन्मोनि झाला अकर्ता ।
किती याची करुं चिंता । कांही सर्वथा जाणेना ॥ ५५ ॥
घांस तोही घेवों नेणे । म्हणवूनि निजमुखींचें काढणें ।
माझ्या मुखीं कोंदणें । बाळाकारणें कृपाळु ॥ ५६ ॥
अति सुरस रामकाथा । माउलीसी घांस गोड घेतां ।
आड मी आलों अवचितां । काही सर्वथा जाणेना ॥ ५७ ॥
तेही कृपाळु कैसी । तोंडींचें काढोनि वेगेंसीं ।
ओपितां माझिये मुखासीं । निजमानसीं सुखावे ॥ ५८ ॥
बाळकाच्या धणीं धाईजे । कां शिष्याचेनि झालेपणें होइजे ।
आणिका हें न कळे सहजें । सद्‍गुरुनें जाणिजे कीं प्रसवतिया ॥ ५९ ॥
एका जनार्दना शरण । कपि राजाज्ञा धरून ।
बाणें आणिला आपण । गोड कथन पुढें असें ॥ १६० ॥
श्रोते कोपती झणें । सैराट भरला रानें ।
ओढिला एका जनार्दनें । कांही मनें स्मरेना ॥ १६१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमंत नंदिग्रामगमनं नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४६ ॥
ओव्या ॥ १६१ ॥ श्रोक ॥ २० ॥ एवं ॥ १८१ ॥


GO TOP