॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय एकोणविसावा ॥
श्रीरामस्वरूप वर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामाविषयी सीतेची उत्कंठा :

सीतेसी सांगती सखीजन । टळलें रावणाचें विघ्न ।
तूं भाग्याची सभाग्य पूर्ण । आवडे तो आपण नृप लक्षीं ॥ १ ॥
दळें बळें अति संपत्ती । धैर्य वीर्य यश कीर्ती ।
सखिया दाविती भूपती । सीता ते नृपती मानीना ॥ २ ॥
श्यामसुंदर निजमूर्ति । पती तो एक रघुपती ।
सीतेनें निश्चय केला चित्तीं । वरकड निश्चितीं मानीना ॥ ३ ॥
सभेसी बैसला रावण । धनुष्या न चढवेचि गुण ।
राम करूं न शके वरण । जनकें पण केला कथिण ॥ ४ ॥

धनुर्भंगाच्या पणाबद्दल राजांना आवाहन :

जो धनुष्यीं वाहील गुण । त्याचें म्यां करावें पाणिग्रहण ।
हा जो जनकें केला पण । अति दारुण निष्ठुर ॥ ५ ॥
धनुष्य कमठपृष्टासम कठोर । राम अत्यंत सुकुमार ।
त्यासी केंवी होय स्वयंवर । चिंता थोर सीतेसी ॥ ६ ॥
रावण अपमानल्यापाथीं । नृपनरवीरां धाक पोटीं ।
धनुष्य वहावया कोणी न उठी । सभेसी दृष्टी टकमक ॥ ७ ॥
तटस्थ देखोनी सभामंडळ । जनक बोलिला भूपाळ ।
शिवचापधारी नाहीं प्रबळ । क्षितिमंडळ निर्वीर ॥ ८ ॥

श्रीरामांना विश्वामित्रांची आज्ञा :

ऐकोनि रायाचें वचन । उठावला रघुनंदन ।
करावया धनुर्भंजन । पुसे आज्ञापन गुरूसी ॥ ९ ॥
निर्वीर पृथ्वीतळ । हे वाक्य न साहे रामभूपाळ ।
गुर्वाज्ञा झाल्या सबळ । धनुष्य तत्काळ सज्जीन ॥ १० ॥
ऐकतां आल्हाद विश्वामित्रा । वेगीं चाप चढवी रामचंद्रा ।
निंचावीं सुरां वीरां नृपवरां । धनुर्धरां सकळांसी ॥ ११ ॥
गुर्वाज्ञा होतां रोकडी । रामचम्द्रें घातली उडी ।
लक्ष्मणें अति तांतडी । कांस गाढी घातली ॥ १२ ॥
चाप एक आम्ही दोघे जण । राजे हांसतील संपूर्ण ।
सीताही हांसेल आपण । वीरलक्षण हे नव्हे ॥ १३ ॥
राम म्हणे सौमित्रा राहें सावधान । जेणें चापें गांजिला रावण ।
त्या चापा निमेषार्धें वाहीन गुण । राजांराव्णा देखतां ॥ १४ ॥
ऐकतां रामाचें वाक्य । वचकले रावणादिक ।
पाहता दिसताहे बाळक । अलोलिक निजधैर्य ॥ १५ ॥
हरचाप देखतां दृष्टीं । सर्वांगीं कांटा उठी ।
तें सज्जावया जगजेठी । धैर्याचा पोटीं निर्धारु ॥ १६ ॥

पण सिद्ध करण्यासाठी रामांचे आगमन, त्यामुळे झालेला परिणाम :

एक म्हणती ऋषीश्वर वेडे । आपुले प्रतिष्ठेचे चाडें ।
लोकांची बाळें लळिवाडें । चापापुढें घालिती ॥ १७ ॥
एम म्हणती श्यामसुंदर । शोभा अत्यंत मनोहर ।
संडून चापारोपणप्रकार । सीता सुंदर यासी द्यावी ॥ १८ ॥
बोलता नरनारी समस्ता । यासी अवश्य द्यावी सीता ।
चनुष्य वाहावयाची कथा । कोणी सर्वथा न करावी ॥ १९ ॥
श्रीरामसीतेचा जोडा । देवें मेळविला चोखडा ।
जनक आहे केवळ वेडा । धनुष्याचा तडा गोण्वितो ॥ २० ॥

जनक व सीतेची मानसिक अवस्था :

सीता कृतनिश्चयेंसीं । स्वयें रातली श्रीरामासीं ।
जनकमन गुंतलें रामापासीं । राम जनकासी आवडला ॥ २१ ॥
बापलेकींचें मनोगत । श्रीरामापासीं एक होत ।
त्याच्या स्वरूपाचा इत्यर्थ । दोघें लक्षित एकत्वें ॥ २२ ॥
त्या श्रीरामाची निजस्थिती । चिन्मात्रैकचैतन्यमूर्ती ।
अव्यक्त आलासे व्यक्ती । भक्तभावार्थी साकार ॥ २३ ॥
जेवीं कपिलेचें शुद्ध क्षीर । आळोनि करिती दध्याकार ।
तेंचि मथूनि साचार काठिती सार नवनीत ॥ २४ ॥
तें ठेवितां नवनीत । होऊम पाहे विकारवम्त ।
तें अग्नीनें करूनि संतप्त । साधिती घृत परिकर ॥ २५ ॥
तें थिजोनि अविकारता । स्वयें भासे साकारता ।
कणिकारूपें अनेकता । दिसे स्वभावता घृत घृतीं ॥ २६ ॥
तेवीं वैराग्यविवेकचतुर । नित्यानित्य निजविचार ।
करूनि साधिती शुद्धसार । चिदचिन्मात्रस्वरूप ॥ २७ ॥
तेंचि स्वरूप स्वभावेंसीं । आलें साकार दशेसी ।
सगुण मूर्ति भासे कैसी । चिद्विलासी श्रीराम ॥ २८ ॥
श्रीराम कौसल्येच्या उदरीं । कीं तो सबाह्य अंतरीं ।
राम परमात्मा चराचरीं । तो दशरथाच्या घ्रीं अवतार ॥ २९ ॥
राम अवतारींचा अवतारी । तो स्वयें आला स्वयंवरीं ।
सीता निजशक्ति नोवरी । पर्णावया करील उल्लास ॥ ३० ॥
नोवरीची इच्छा स्वभावता । सुम्दर व्र यावा हाता ।
ते श्र्रीरामाची सगुनता । निर्धारी सीता सांगोपांग ॥ ३१ ॥
श्रीरामाचें पूर्णपण । सीताच जाने संपूर्ण ।
यालागीं त्याचें सगुणपन । पाहे आपण सर्वावयवीं ॥ ३२ ॥

श्रीरामस्वरूपस्तवन :

श्रीरामाची श्रीमूर्ती । वर्णितां मौनावल्या श्रुती ।
वेद म्हणती नेति नेती । रामशब्दार्थीं अर्थवेना ॥ ३३ ॥
चाटू मधुर रस वाढी । तो चाटू खातां न लाभे गोडी ।
तेवीं सांडून शब्दांचिया वोढी । पहावी रोकडी श्रीरामशोभा ॥ ३४ ॥
शब्दीं बोलतां राम परेश । बोलत्याचे बोल पडती ओस ।
मोटे बांधितां आकाश । ये हातास चौपालवी ॥ ३५ ॥
आकाशाची बांधितां मोट । कर्त्याचे व्यर्थ जाती कष्ट ।
करितां शब्दाची खटपट । श्रीराम स्पष्ट न बोलवे ॥ ३६ ॥
राम सगुण तोचि निर्गुण । राम परमात्मा परिपूर्ण ।
राम चिन्मात्रैक चैतन्यघन । जगज्जीवन श्रीराम ॥ ३७ ॥
त्या श्रीरामाचें सगुनपण । बोलावयासि मी अति दीन ।
वाचावाचक श्रीजनार्दन । आपुलें आपन स्वरूप वदवी ॥ ३८ ॥
राम सर्वांगें निजनिर्मळ । ते निर्मळीं बिंबलें नभ सुनीळ ।
यालागीं श्यामता सोज्ज्वळ । भासे निर्मळ निजभक्ता ॥ ३९ ॥
राम श्यामता मेघश्याम । त्या श्यामता गर्जे अहंब्रह्म ।
यालागीं राम मेघश्याम । बोलती निगम श्रुतिशास्त्रे ॥ ४० ॥
राम निर्मळत्वें परम । हें सुरवरां न कळे वर्म ।
अंगीं विंबलें देखोनियां व्योम । राम मेघश्याम म्हणताती ॥ ४१ ॥
यापरी स्वयें श्रीराम । शोभा शोभे मेघश्याम ।
त्याचे पदींचा पराक्रम । त्रिविक्रम आक्रमे ॥ ४२ ॥
शेषासी मुखें उदंडे । चरण वर्णावया धरिलीं बंडें ।
त्याचिया जिव्हा जालिया दुखंडें । शेषाचेनि तोंडें न वर्णवे ॥ ४३ ॥
तेथें माझी युक्ति केउती । सरों शके कैशा रीतीं ।
बाळभाषे बाबडी स्थिती । संतोषती सुखें साधु ॥ ४४ ॥

श्रीरामाचे सामुद्रिक :

ध्वज वज्रांकुश रेखा । दोहीं पायीं पद्म देखा ।
पाहतां पायींच्या सामुद्रिका । महापातक्यां उद्धार ॥ ४५ ॥
चहूं मुक्ती लावोनि लाज । चरणीं शोभे भक्तीचा ध्वज ।
वज्रें निर्दाळी कर्मवीज । स्मरणाचा सहज नित्यांकुश ॥ ४६ ॥
शोधितां सत्वाचेनि आक्रमें । दोहीं पायीं झळकतीं पद्में ।
तळवे आरक्त संध्यारामप्रेमें । त्या शोभा कुंकुमें लाजिजे ॥ ४७ ॥
जडजाड्य निस्तरावया त्रिगुण । वेगीं ठाकले श्रीरामचरम ।
घोटी जाली जी त्रिकोण । चरणीं संपूर्ण जडोनी ॥ ४८ ॥
कळावया कळसल्या चित्कळा । सरळ शोभती सोज्वळा ।
भक्तांची ते जीवन कळा । निजजिव्हाळा साधकां ॥ ४९ ॥
तोडरू ना प्रळयगंघाळ । गजरें कांपे कळिकाळ ।
वांकी अंदुवांचा खळाळ । सुखकल्लोळ अहं सोहं ॥ ५० ॥
कंदनें कदर्थलें काळचक्र । तें जालें रामाचें जानुचक्र ।
चरणीं पावोनि सुखसार । सुरासुर स्वयें वंदिती ॥ ५१ ॥
रामाची जानुचक्रें देखतां । काळचक्र वंदी भक्तां ।
चरणसामर्थ्य रघुनाथा । वेदशास्त्रां अलक्ष ॥ ५२ ॥
लागतां रामचरणकमळा । सवेग उद्धरली अहल्या शिळा ।
चरणप्रसाद जिहीं घेतला । ते कळिकाळा नागविती ॥ ५३ ॥
ऊरू मृदुत्वें सरळ शोभा । तेणें लाजविलें कर्दळीस्तंभा ।
केळीच्या पोटीं वक्र गर्भा । अवक्रशोभा श्रीरामांकीं ॥ ५४ ॥
श्रीरामाचें गुह्य स्थान । पावावया सीताच संपन्न ।
वेद तेथें लज्जायमान । शास्त्रें संपूर्ण कचकचती ॥ ५५ ॥
त्यजोनि वासनावासासी । जे निर्लज्ज लोकलाजेसी ।
ते पावती रामगुह्यासी । अहर्निशीं सुखरूप ॥ ५६ ॥
श्रीरामासी एकपत्नीगव्रत । भक्त पतिपत्नीा स्वयें होत ।
त्यासीच गुह्याचें गुह्य प्राप्त । भक्तभावार्थ अलोलिक ॥ ५७ ॥
क्षणक्षणां उदयास्त विजेसी । ते लागली रामकांतेसी ।
गिळोनियां निजवस्तूसी । अहर्निशीं तेजस्वी ॥ ५८ ॥
यालागीं तडतडीत पीतांबर । कांसे रविरश्मिचंद्र ।
रामसौंदर्या निजसौंदर्य । मनोहर सर्वांगी ॥ ५९ ॥
ज्यामाजी राम सांपडे सगळा । ते लेइला भक्तिभाव मेखळा ।
त्यासी किंकिणीजाळमाळा । शोभती सकळा सद्विद्या ॥ ६० ॥
पावोनि श्रीरामाचेंमुख । क्षुद्रघंटिला अधोमुख ।
मुक्तलग अलोलिक । शोभे निर्दोष कटिमेखळा ॥ ६१ ॥
अति सूक्ष्म मध्यमान । होता पंचानन अभिमान ।
तेही राममध्य देखोन । गेले पळोन वनवासा ॥ ६२ ॥
पहावया श्रीराम मध्यासी । शाहाडे जडले मेखळेसी ।
शेखीं भुलले श्रीरामासी । गमनागमनासी विसरले ॥ ६३ ॥
नाभीं निमग्न निजनाभीं । पूर्वी ब्रह्मा शिणला पद्मगर्भीं ।
तो देवोनि स्थापिला नाभीं । उदरांरंभी वर्तुळ ॥ ६४ ॥
ज्ञेय ज्ञाता नव्हाळी । हेचि उदरोदरीं त्रिवळी ।
सत्कर्में रेखिल्या रोमावळी । हृदयकमळीं शोभती ॥ ६५ ॥
श्रीरामहृदयींचा अवकाश । घनानंदें निरवकाश ।
संत जडले सावकाश । त्यांसी नाश नाहीं कल्पांनी ॥ ६६ ॥
समाधीचें सोलींव सुख अ। तेंचि रामहृदयींचें पदक ।
संत माणकुली अनेक । जडलें देख सत्कोंदणें ॥ ६७ ॥
अनन्यभावाच्या सत्प्रीतीं । रूळे तेथें वैजयंती ।
सुमनमनाच्या रघुपती । माळा शोभती सहिततुळसी ॥ ६८ ॥
मुक्तसद्भााव मुक्ताफळी । पूर्णानुसंधानें ओंविली ।
श्रीरामकंठीं शोभली । एकावळी मुक्तांची ॥ ६९ ॥
श्रीरामाचा कंबुकंठ । तेंचि वेदांचे मूळपीठ ।
स्वरवर्णींची वाहती वाट । तेथोनि प्रकट परमार्थ ॥ ७० ॥
मुख्य मुळीं तो अबाहु । त्यासी शोभती अजानुबाहु ।
बाहूंचा पराक्रम बहु । दैत्यांचा ठाऊ निर्दाळी ॥ ७१ ॥
बामहस्तींचें निजचाप । निःशेष निर्दळी पुण्यपाप ।
निवटी संकल्प विकल्प । कंदर्पाचा दर्प समूळ छेदी ॥ २८ ॥
बाण लखलखीत दक्षिण करीं । धायें समान भक्तवैरी ।
अहंममता जीवें मारी । द्वैताची उरी उरों नेदी ॥ ७३ ॥
चैतन्यतेजेण् अति तेजिष्ठ । अहं सोहं निःशेष आटे ।
तेचि श्रीरामाचे बाहुवटे । कीर्तिमुखें चोखट उपनिषदें ॥ ७४ ॥
वीर्य धैर्य जाणें । तींचि श्रीरामाची निजकंकणें ।
करीं बाणलीं पूर्णपणें । लेणियां लेणे श्रीराम ॥ ७५ ॥
राममुद्रा बाणल्या हातीं । तो वंद्य होय त्रिजगती ।
कळिकाळ पायां लागती । चारी मुक्ती आंदण्या ॥ ७६ ॥
ऐशा दशांगुलीं दशमुद्रा । करी प्रतिपाळ दशावतारां ।
करीं धरील सीता सुम्दरा । लंकानाथा नोकोनी ॥ ७७ ॥
आजानुबाहु पंचानन । राम त्र्यंबकभंजन ।
सभेसि रावणा गांजून । पाणिग्रहण सीतेचें ॥ ७८ ॥
श्रवनीं कुंडलें मकराकार । हा लौकिक बाह्यविचार ।
तेचि आकारी निराकार । श्रवणें विकार निर्दाळी ॥ ७९ ॥
गाळींव आनंदाची मूस देख । कीं सोलींव सुखाचे हें सुख ।
तेंचि श्रीरामाचें श्रीमुख । जें करी निर्दोष देखत्यांसी ॥ ८० ॥
नवल शोभा ते श्रवनांसी । नित्य मिळणी निजात्मयासी ।
श्रवणें देखणें निर्दोषी । अंशाअंशीं समरस ॥ ८१ ॥
श्रीरामाचा मुखमृगांक । पूर्णत्वें नित्य निष्कळंक ।
तो देखोनियां शशांक । लाजे अधोमुख स्वयें जाला ॥ ८२ ॥
पक्षा वाढे पक्षा मोडे । हे चंद्रासी दुःख गाधें ।
येवोनि चरनांगुष्ठी जडे । जग पायां पडे नखचंद्रीं ॥ ८३ ॥
जडतां श्रीरामांगुष्ठीं । चंद्रासी जाली पुष्टितुष्टी ।
रामचरणीं सुखाच्या कोठी । देखता दृष्टीं आल्हाद ॥ ८४ ॥
देखतां श्रीरामाचें श्रीमुख । समूळ निर्दळे जन्मदुःख ।
परमानंदें कोंदे सुख । हरिखें हरिख ओसंडे ॥ ८५ ॥
अकार उकार मकार स्थिती । ओंकारीं कर्मनिष्कर्म श्रुती ।
तैशा मुखीं दो भागीं दंतपंक्तीं । चतुर्वेदोक्ती चौकिचे चारी ॥ ८६ ॥
जगाचे अधर ते अधर । राममुखीचें अधर सधर ।
परमामृतासी निजमाहेर । निजजिव्हार सीतेचें ॥ ८७ ॥
श्रीरामाची हनुवटी । देखतां सुख ओसंडे सृष्टी ।
धन्य देखत्याची दृष्टी । ते जाणे हनुवटी हनुमंत ॥ ८८ ॥
जगीं सौंदर्या शोभनिक । तेचि श्रीरामाचे निजनासिक ।
ते नासिकीं निर्नासिक । करील आवश्यक शूर्पनखा ॥ ८९ ॥
श्रीरामाचेनि प्राणें जाण । जगाचे विचरती प्राण ।
तेथें वसतां समाधान । निजजीवन वायूसी ॥ ९० ॥
चैतन्याचें विश्रांतिस्थान । तेंचि श्रीरामाचें श्रीनयन ।
सबाह्य डोळस संपूर्ण । आपणा आपण देखनें ॥ ९१ ॥
देखतां श्रीरामाची दृष्टी । ब्रह्मानंदें जीव उठी ।
दृश्य द्रष्टा न दिसे त्रिपुटी । हेलावे सृष्टी स्वानंदे ॥ ९२ ॥
श्रीरामाची भ्रुकुटी । रची ब्रह्मांडांच्या कोटी ।
भ्रूविक्षेप कळिकाळ घोटी । छेदी गांठी चहूं देहांची ॥ ९३ ॥
श्रवणातें देखणें नयन । याचें नांव डोळसपण ।
पदार्थीं परमार्थदर्शन । तें समाधान नयनांसी ॥ ९४ ॥
श्रेष्ठ श्रीरामाचें निढळ । तेणेंचि अधिष्ठान सबळ ।
सच्चिदानंदरेखा सरळ । शोभे कपाळ त्रिविळिया ॥ ९५ ॥
गाळूनि अहंकठिणपण । सोहं काढिले शुद्ध चंदन ।
तेंचि केलें रामार्पन । गम्धार्चन श्रीरामा ॥ ९६ ॥
श्रद्धाकेशराचा मेळा । टिळक रेखिला पिंवळा ।
सप्रेमें रंगे सुरंगकळा । अक्षता निढळां शोभत ॥ ९७ ॥
श्रीराम सकळां मुकुटमणी । राम शिरोरत्ना राजस्थानीं ।
त्याचे माथ्याचा मुकुटमणी । ऐसा कोनी दिसेना ॥ ९८ ॥
राममुकुटीं निजशोभा । राम शिरोरत्न निजगाभा ।
त्या श्रीरामाची मुकुटप्रभा । वचनारम्भा दुर्लभ ॥ ९९ ॥
श्रीरामाच्या शिरावरतें । कांही उरले असतें रितें ।
तरी मुकुट वर्णावया तेथें । अवकाश वाचेतें सुखें असता ॥ १०० ॥
श्रीरामावरतें कांही । सर्वथा रितें उरलें नाहीं ।
मा मुकुट वानावा कोणे ठायीं । वाचेनें कायी बोलावें ॥ १ ॥
श्रीरामाचा निजप्रताप । नित्यत्वें निर्विकल्प ।
तोचि शिरीं मुकुट सद्‌रूप । चित्स्वरूप शोभत ॥ २ ॥
यालागीं रामाचें माथां । लेणियाचें लेणे सर्वथा ।
श्रीमुकुटत्वें श्रीरघुनाथा । अंगें निजांगता शोभवी ॥ ३ ॥
जेवीं सोनियाचें सोनेंचि कोंदणें । तेंवी श्रीरामा श्रीरामचि लेणें ।
हें स्वयें सीताचि लक्षूं जाणे । इतरांचे जाणनें दिवा खद्योत ॥ ४ ॥
सीतेचें सद्रूेपपण । स्वयें श्रीराम जाणे आपण ।
श्रीरामाचें पूर्णपण । जाणे संपूर्ण स्वयें सीता ॥ ५ ॥
येरायेरांची ऊणखूण । दोघे जाणती संपूर्ण ।
एकाजनार्दना शरण । चापनिर्दळण अवधारा ॥ १०६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
श्रीरामस्वरूपवर्णनं नाम एकोनविंशतितमोऽध्यायः ॥ १९ ॥
॥ ओव्या १०६ ॥



GO TOP