॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय एक्केचाळिसावा ॥
भरतकृत श्रीरामस्तुती

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


गेले ऋक्ष राक्षस वानर । मागें बंधूंसहित श्रीरघुवीर ।
बसले असती सुखें अपार । आनंदें निर्भर ते समयीं ॥१॥
तेव्हां माध्यान्हकाळ प्रवर्तला । स्नानसंध्या विधी सर्व केला ।
भोजन सारोनि ऋषि सकळां । बंधूंसहित राघवें ॥२॥
तंव अकस्मात मधुर वाणी । आकाशींहूनि श्रीरामश्रवणीं ।
पडली तये सभास्थानी । पाहें गगनीं मज श्रीरामा ॥३॥

कुबेराचे पुष्पक विमान पुनः श्रीरामांजवळ त्यांच्या सेवेसाठी आले :

कृपेंकरोनि राघवा । मज पाहें कृपार्णवा ।
मी पुष्पक कैलासाहूनि देवा । धनेशें मज पाठविलें ॥४॥
बोलिलें मंजुळ उत्तरें । तें अवधारावें राजीवनेत्रें ।
म्हणे पुष्पकावरी श्रीरामचंद्रें । पूर्वी आरोहण पैं केलें ॥५॥
मी तुझे आज्ञेनें रघुपती । गेलों होतो धनेशाप्रती ।
तेणें मज पुनरपि नरपती । तुझे सेवेसी पाठविलें ॥६॥
ज्यावरी आरुढला श्रीरघुनाथ । तें पूज्य मज पूजित ।
मी त्यावरी न आरुढें निश्चित । हा संकल्प कृत पैं माझा ॥७॥
अगा पुष्पका अवधारीं । श्रीरामें मारिलें दुराचारी ।
रावण वधिला सहपरिवारीं । जो कां करी निंद्य कर्म ॥८॥
मज झालें परम सुख । त्रैलोक्यासि अति हरिख ।
दुरात्मा वधून सधमुख । प्रधानेंसीं देख रणांगणीं ॥९॥
अगा पुष्पका रघुनाथातें । तुवां वहावें माझें आज्ञेतें ।
ऐसे निरोपोनि धनेशें येथें । तुमचें सेवेतें पाठविलें ॥१०॥

रामांनी स्वीकार करुन त्याची पूजा केली :

ऐकोनि श्रीरामें त्याची मात । मनीं संतोषला जनकजामात ।
बरवें म्हणोनि अंगिकारित । कुबेराच्या विमाना ॥११॥
तदनंतरें श्रीरघुपती । पुष्पका पूजी अत्ति निगुतीं ।
धूप दीप पंचारती । नाना सुगंधीं पूजिलें ॥१२॥
पुष्पका म्हणे श्रीराम । तूं अद्दश्यगतीं विचरें व्योम ।
जैसे सिद्ध साधु भक्त परम । अदृश्यगती विचरती ॥१३॥
तैशी तुवां पुष्पकेंही । स्वइच्छेनें विचरावी मही ।
मी स्मरण करीन जे काळीं पाहीं । तेव्हा त्वरित पैं यावें ॥१४॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । पुष्पकें करोनि प्रदक्षिण ।
श्रीरामा माथा लावून । सुखें गमन करितें झालें ॥१५॥
ऐसें पुष्पक विमान । कोणा दुःख नेदितां गगन ।
विचरे पुरें पाटणें आणि उद्यान । अदृश्य होवोन ते काळीं ॥१६॥

सर्वत्र सुखसमृद्धी पाहून भरताचे आश्चर्य :

तंव येरीकडे कैकेयीसुत । जितजामदग्न्या विनवीत ।
स्वामी आश्चर्य थोर येथ । देखतसें राजेंद्रा ॥१७॥
श्रीरामाराज्यमहिमान । कोणा नाहीं दुःख दैन्य ।
कोणा नाहीं मीतूंपण । सुखसंपन्न पुरवासीं ॥१८॥
कोणा नाहीं जरेची वार्ता । कोणा नाहीं हृदयीं चिंता ।
कोणा नाहीं देहीं कृशता । स्वानंदता पुरवासी ॥१९॥
मृत्यूचें भय नाहीं कोणासी । राम राज्य करितां जनासी ।
सुखी स्वानंदें पुरवसी । अहर्निशीं रामभजन ॥२०॥
राज्यीं असतां सीताकांत । सर्व जन सुखी स्वस्थ ।
राज्य करिती आनंदभरित । पूर्ण मनोरथ सर्वांचे ॥२१॥
श्रीरामाज्ञेकरुन । मृत्यु भक्तांचे वंदी चरण ।
अयोध्यावासी स्वधर्मचरण । नित्यमेव करिताती ॥२२॥
बाळत्व तारुण्य जरा । न बाधी श्रीरामाच्या किंकरा ।
सर्वां सुख देतसे वारा । सर्वांतरीं राहून ॥२३॥
यथाकाळीं पर्जन्य । वर्षाव करी श्रीरामाज्ञेकरुन ।
तेणें पिकती नाना धान्य । सुकाळ पूर्ण अयोध्येसीं ॥२४॥
जे जे काळीं जो जो ऋतु । तो तो यथाकाळी प्रवर्ततु ।
सूर्य खडतर नाहीं तपतु । श्रीरामाज्ञेकरोनी ॥२५॥
समुद्र नुल्लंघीच मर्यादा । साधु न प्रवर्तती निंद्य वादा ।
वेदशास्त्रांच्या संवादा । अन्यथा भाषण न करिती ॥२६॥
घरोघरीं वेदाध्ययन । पुराण आणि हरिकीर्तन ।
अखंड वाचे नामस्मरण । कोणा विस्मरण पैं नाहीं ॥२७॥

रामनाममहिमा :

ऐसा श्रीराम सच्चिदानंदघन । जो कां योगीशवरांचे हृदयरत्न ।
जो कां भक्तजननिजजीवन । तो स्वानंदें पूर्ण लीला दावी ॥२८॥
जो चिदाकाशींचें गगन । जो भक्तजनवनींचा चंदन ।
जो कां आर्तचकोरां निजजीवन । तो स्वानंदें पूर्ण लीला दावी ॥२९॥
जो भक्तसागरींची नौका । जो योग्यां हृदयीं चित्काळिका ।
तो श्रीराम अकिंचनसखा । ज्याचे नामें देखा पातकें हरती ॥३०॥
एकचि एक जयाचें नाम । महादोषां करी भस्म ।
कलियुगीं साधनांचें नाहीं काम । रामनामावांचोनी ॥३१॥
कलियुगीं मुख्य साधन । श्रीरामाचें नाम जाण ।
पार्वतीप्रति मदनारी आपण । नाममहिमान सांगतसे ॥३२॥
नामें भक्ति नामें मुक्ती । नामें यश नामें कीर्ती ।
नामें होय परमपदप्राप्ती । नामें हरती महदोष ॥३३॥
अबद्ध करितां वेदपठण । अवश्य निषेध बाधी जाण ।
अबद्ध म्हणतां श्रीराम नारायण । अगणित पुण्य स्मर्त्यातें ॥३४॥
अबद्ध मंत्र उच्चारिती । जापक चळणी नेणों किती ।
अबद्ध नाम नित्य जपती । ते पावती सायुज्य ॥३५॥
नामें कळिकाळा सीक । नामें पातकां महाधाक ।
नामें यमादिकां हाक । नामें प्राप्त सायुज्य ॥३६॥
नामें उद्धरिली कुट्टिनी । नामें गणिका चढली विमानीं ।
नामें पावन हे अवनी । नामें त्रिभुवनीं आनंद ॥३७॥
नामें वाल्मीक चोरटा । कळिकाळें घेत झटा ।
नामें मुक्तीच्या पिकल्या पेठां । नामें देशवटा भवदोषां ॥३८॥


गोकोटिदानं ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुतकल्पवासः ।
यज्ञायुतं मेरुसुवर्णदानं गोविन्दनाम स्मरणेन तुल्यम् ॥१॥


गोविंदनामाच्या तुळणेंसीं । न येती पुण्याचिया राशी ।
ग्रहणकाळीं कोटिधेनूंसी । जरी दिधलिया शृंगारुन ॥३९॥
सुवर्णशृंगी रौप्यखुरीं । सत्वत्सा आभारणेंसीं कोटिवरी ।
दिधल्या फळ नामाबरोबरी । न ये निर्धारीं तुळितांही ॥४०॥
अथवा दश सहस्त्र वर्षेपर्यंत । त्रिवेणीतीर आश्रयोनि तेथ ।
राहिल्या पुण्य अगणित । नामतुळणेसीं पैं नये ॥४१॥
एक अयुत महायज्ञ । सांगोपांग करोनि जाण ।
अथवा मेरुइतकें सुवर्णदान । दिधल्या नामामहिमान अधिक ॥४२॥
इतुकीं पुण्यें एकीकडे । घालितां नामाच्या पारडे ।
तुळणेसी न पावे चंद्रचूडें । म्हणोनि हृदयीं धरियेलें ॥४३॥
आधींच तो पिनाकपाणी । सकळ देवांचा मुकुटमणी ।
तोही राहिला नामसंजीवनीं । उपासक होवोनी नामाचा ॥४४॥
ऐसी भरतें स्तुति करुन । ऐकोनि श्रीराम दे आलिंगन ।
देवोनि दोघां समाधान । वेगळेपण दिसेना ॥४५॥
अग्रजमुखां खेंवा पडली मिठी । जेंवी गगना गगनीं होय भेटी ।
ऐसी आलिंगनसुखसंतुष्टी । येरयेरां पैं झाली ॥४६॥
रवि सोम मासाअंती । सम मंडळा जेंवी येती ।
तेंवी मांडवीकांत आणि जानकीपती । समसाम्य भेटले ॥४७॥
एका जनार्दना शरण । चवघे बंधु जानकीरमण ।
करिता झाला चरित्रकथन । तें सावधान अवधारा ॥४८॥
मागील कथेची संगती । राजे बोळवोनि श्रीरघुपती ।
पुष्पक पूजोनि अति निगुतीं । तें विचरावया क्षितीं पाठविलें ॥४९॥
तदपरी भरताचे स्तवन । ऐकोनि श्रीराम सुखसंपन्न ।
भरत भक्तराज म्हणोन । आलिंगन देवोन सुखी केला ॥५०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
भरतस्तवनं नाम एकचत्वारिंशोऽध्यायः ॥४१॥
ओंव्या ॥५०॥ श्लोक ॥१॥ एवं ॥५१॥

GO TOP