श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ पञ्चपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अङ्‌गदसहितानां वानराणां प्रायोपवेशनम् - अंगदासहित वानरांचे प्रायोपवेशन -
श्रुत्वा हमुमतो वाक्यं प्रश्रितं धर्मसंहितम् ।
स्वामिसत्कारसंयुक्तं अङ्‌गवदो वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥
हनुमानांचे वचन विनययुक्त, धर्मानुकूल आणि स्वामींच्या प्रती सन्मानांनी युक्त होते. ते ऐकून अंगदाने म्हटले- ॥१॥
स्थैर्यमात्ममनःशौचं आनृशंस्यमथार्जवम् ।
विक्रमश्चैव धैर्यं च सुग्रीवे नोपपद्यते ॥ २ ॥
’कपिश्रेष्ठ ! राजा सुग्रीवाच्या ठिकाणी स्थिरता, शरीर आणि मनाची पवित्रता, क्रूरतेचा अभाव, सरलता, पराक्रम आणि धैर्य आहे - ही मान्यता ठीक वाटत नाही. ॥२॥
भ्रातुर्ज्येष्ठस्य यो भार्यां जीवतो महिषीं प्रियाम् ।
धर्मेण मातरं यस्तु स्वीकरोति जुगुस्पितः ॥ ३ ॥

कथं स धर्मं जानीते येन भ्रात्रा दुरात्मना ।
युद्धायाभिनियुक्तेन बिलस्य पिहितं मुखम् ॥ ४ ॥
’ज्याने आपल्या मोठ्या भावाच्या प्रिय महाराणीचे, जी धर्मतः त्यास मातेसमान होती, तो जिवंत असतांनाच कुत्सित भावाने ग्रहण केले होते, तो धर्मास जाणतो असे कसे म्हणता येईल ? ज्या दुरात्म्याने युद्धासाठी जाणार्‍या भावाकडून बिळाच्या रक्षणासाठी नियुक्त केले गेले असताही त्याच्या समोर शिळा ठेवून त्याचे तोंड बंद केले त्याला धर्मज्ञ कसे मानले जाऊ शकते ? ॥३-४॥
सत्यात् पाणिगृहीतश्च कृतकर्मा महायशाः ।
विस्मृतो राघवो येन स कस्य सुकृतं स्मरेत् ॥ ५ ॥
’ज्यांनी सत्याला साक्षी ठेवून त्यांचा हात पकडला आणि प्रथमच त्यांचे कार्यही सिद्ध करून दिले, त्या महायशस्वी भगवान् श्रीरामांनाही जे विसरून गेले, ते दुसर्‍या कुणाच्या उपकाराची आठवण कशी ठेवू शकतील ? ॥५॥
लक्ष्मणस्य भयेनेह नाधर्मभयभीरुणा ।
आदिष्टा मार्गितुं सीतां धर्मस्तस्मिन् कथं भवेत् ॥ ६ ॥
’ज्यांनी अधर्माच्या भयाने घाबरून नव्हे तर लक्ष्मणांच्याच भयाने घाबरून आम्हा लोकांना सीतेच्या शोधासाठी धाडून दिले आहे, त्यांच्या ठिकाणी धर्माची संभावना कशी होऊ शकते ? ॥६॥
अस्मिन् पापे कृतघ्ने तु स्मृतिभिन्ने चलात्मनि ।
आर्यः को विश्वसेज्जातु तत्कुलीनो विशेषतः ॥ ७ ॥
’त्या पापी, कृतघ्न, स्मरणशक्तीहीन आणि चंचल सुग्रीवांवर कोणीही श्रेष्ठ पुरुष, बिशेषतः जो उत्तम कुळात उत्पन्न झालेला असेल, तो कधीही कशा प्रकारे विश्वास करू शकतो ? ॥७॥
राज्ये पुत्रः प्रतिष्ठाप्यः सगुणो निर्गुणोऽपि वा ।
कथं शत्रुकुलीनं मां सुग्रीवो जीवयिष्यति ॥ ८ ॥
’आपला पुत्र गुणवान् असो अथवा गुणहीन, त्यालाच राज्यावर बसविले पाहिजे, अशी धारणा ठेवणारा सुग्रीव, मला शत्रुकुलात उत्पन्न झालेल्या बालकाला कसा जिवंत राहू देईल ? ॥८॥
भिन्नमंत्रोऽपराद्धश्च भिन्नशक्तिः कथं ह्यहम् ।
किष्किंधां प्राप्य जीवेयं अनाथ इव दुर्बलः ॥ ९ ॥
’सुग्रीवापासून अलग राहाण्याचा माझा जो गूढ विचार होता, तो आज प्रकट झाला आहे. एवढेच नव्हे तर माझी शक्ती क्षीण झालेली आहे, मी अनाथासमान दुर्बल आहे. अशा परिस्थितित किष्किंधामध्ये जाऊन मी कसा जिवंत राहू शकेन ? ॥९॥
उपांशुदण्डेन हि मां बंधनेनोपपादयेत् ।
शठः क्रूरो नृशंसश्च सुग्रीवो राज्यकारणात् ॥ १० ॥
’सुग्रीव शठ, क्रूर आणि निर्दय आहे. तो राज्यासाठी मला गुप्तरूपाने दण्ड देईल अथवा कायमचे मला बंधनात ठेवेल. ॥१०॥
बंधनाच्चावसादान्मे श्रेयः प्रायोपवेशनम् ।
अनुजानन्तु मां सर्वे गृहं गच्छंतु वानराः ॥ ११ ॥
’या प्रकारे बंधनजनित कष्ट भोगण्यापेक्षा उपवास करून प्राण देणे माझ्यासाठी अधिक श्रेयस्कर आहे; म्हणून सर्व वानर मला येथेच राहण्याची आज्ञा देवोत आणि आपापल्या घरी निघून जावोत. ॥११॥
अहं वः प्रतिजानामि नागमिष्याम्यहं पुरीम् ।
इहैव प्रायमासिष्ये श्रेयो मरणमेव मे ॥ १२ ॥
’मी आपणा लोकांना प्रतिज्ञापूर्वक सांगतो की मी किष्किंधापुरीला जाणार नाही. येथेच मरणांत उपवास करीन. मी मरून जाणेच चांगले आहे. ॥१२॥
अभिवादनपूर्वं तु राजा कुशलमेव च ।
अभिवादनपूर्वं तु राघवौ बलशालिनौ ॥ १३ ॥
’आपण राजा सुग्रीवांना प्रणाम करून त्यांना माझा कुशल समाचार सांगावा. आपल्या बलामुळे शोभून दिसणार्‍या दोघा रघुवंशी बंधुंना ही माझा सादर प्रणाम निवेदन करून कुशल समाचार सांगावा. ॥१३॥
वाच्यस्तातो यवीयान् मे सुग्रीवो वानरेश्वरः ।
आरोग्यपूर्वं कुशलं वाच्या माता रुमा च मे ॥ १४ ॥
’माझे लहान पिता वानरराज सुग्रीव आणि माता रूमा हिलाही आरोग्यपूर्वक कुशल-समाचार सांगावा. ॥१४॥
मातरं चैव मे तारां आश्वासयितुमर्हथ ।
प्रकृत्या प्रियपुत्रा सा सानुक्रोशा तपस्विनी ॥ १५ ॥
’माझी माता तारा हिलाही धीर द्यावा. ती बिचारी स्वभावानेच दयाळू आणि पुत्रावर प्रेम करणारी आहे. ॥१५॥
विनष्टमिह मां श्रुत्वा व्यक्तं हास्यति जीवितम् ।
एतावदुक्त्वा वचनं वृद्धांस्तानभिवाद्य च ॥ १६ ॥

विवेश चाङ्‌गादो भूमौ रुदन् दर्भेषु दुर्मनाः ।
’येथे मी नष्ट झाल्याचा समाचार ऐकून ती निश्चितच आपल्या प्राणांचा त्याग करील.’ इतके सांगून अंगदाने त्या सर्व वयोवृद्ध वानरांना प्रणाम केला आणि जमीनीवर कुश (दर्भ) अंथरून उदास मुखाने रडत-रडत ते मरणांत उपवास करण्यासाठी बसले. ॥१६ १/२॥
तस्य संविशतस्तत्र रुदंतो वानरर्षभाः ॥ १७ ॥

नयनेभ्यः प्रमुमुचुः उष्णं वै वारि दुःखिताः ।
सुग्रीवं चैव निंदंतः प्रशंसंतश्च वालिनम् ॥ १८ ॥

परिवार्याङ्‌ग दं सर्वे व्यवसन् प्रायमासितुम् ।
ते याप्रकारे बसल्यावर सर्व श्रेष्ठ वानर रडू लागले आणि दुःखी होऊन नेत्रातून ऊष्ण अश्रु ढाळू लागले. सुग्रीवांची निंदा आणि वालीची प्रशंसा करीत त्या सर्वांनी अंगदाला सर्व बाजूंनी घेरून आमरण उपवास करण्याचा निश्चय केला. ॥१७-१८ १/२॥
तद् वाक्यं वालिपुत्रस्य विज्ञाय प्लवगर्षभाः ॥ १९ ॥

उपस्पृश्योदकं तत्र प्राङ्‌मु खाः समुपाविशन् ।
दक्षिणाग्रेषु दर्भेषु उदक्तीरं समाश्रिताः ॥ २० ॥

मुमूर्षवो हरिश्रेष्टा एतत्क्षममिति स्म ह ।
वालिकुमाराच्या वचनांवर विचार करून त्या वानर शिरोमणींनी मरणेच उचित समजून आणि मृत्युच्या इच्छेने आचमन करून समुद्राच्या उत्तर तटावर दक्षिणाग्र कुश अंथरून ते सर्वच्या सर्व पूर्वाभिमुख होऊन बसले. ॥१९-२० १/२॥
रामस्य वनवासं च क्षयं दशरथस्य च ॥ २१ ॥

जनस्थानवधं चैव वधं चैव जटायुषः ।
हरणं चैव वैदेह्या वालिनश्च वधं रणे ।
रामकोपं च वदतां हरीणां भयमागतम् ॥ २२ ॥
श्रीरामांचा वनवास, राजा दशरथांचा मृत्यु, जनस्थानवासी राक्षसांचा संहार, वैदेही सीतेचे अपहरण, जटायुचे मरण, वालीचा वध आणि श्रीरामांच्या क्रोधाची चर्चा करीत असणार्‍या त्या वानरांवर एक दुसरेच भय (संकट) येऊन कोसळले. ॥२१-२२॥
स संविशद्‌भिर्बहुभिर्महीधरो
महाद्रिकूटप्रतिमैः प्लवंगमैः ।
बभूव सन्नादितनिर्दरांतरो
भृशं नदद्‌भिर्जलदैरिवोल्बणैः ॥ २३ ॥
महान पर्वत शिखरांप्रमाणे शरीर असलेले तेथे बसलेले ते बहुसंख्य वानर भयामुळे जोरजोराने आवाज करू लागले, ज्यामुळे त्या पर्वताच्या कंदरामधील भागात प्रतिध्वनी उठू लागला आणि गर्जना करणार्‍या मेघांनी युक्त आकाशाप्रमाणे प्रतीत होऊ लागला. ॥२३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे पञ्चपञ्चाशः सर्गः ॥ ५५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा पंचावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP