श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकाधिशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
गन्धर्वान् आक्रम्य संहृत्य च तत्र द्वे नगरे निवेश्य द्वाभ्यां पुत्राभ्यां समर्प्य भरतस्य पुनः अयोध्यायां निवृत्तिः -
भरतांचे गंधर्वांवर आक्रमण आणि त्यांचा संहार करून तेथे दोन सुंदर नगरे वसवून आपल्या दोन्ही पुत्रांकडे सोपविणे आणि परत अयोध्येस येणे -
श्रुत्वा सेनापतिं प्राप्तं भरतं केकयाधिपः ।
युधाजिद् गार्ग्यसहितं परां प्रीतिमुपागमत् ॥ १ ॥
केकयराज युधाजितांनी जेव्हा ऐकले की महर्षि गार्ग्यांच्या बरोबर स्वयं भरत सेनापति होऊन येत आहेत तेव्हा त्यांना फार प्रसन्नता वाटली. ॥१॥
स निर्ययौ जनौघेन महता केकयाधिपः ।
त्वरमाणोऽभिचक्राम गन्धर्वान् कामरूपिणः ॥ २ ॥
ते कैकेयनरेश भारी जनसमुदायासह निघाले आणि भरतांना भेटून मोठ्‍या उतावीळपणाने इच्छानुसार रूप धारण करणार्‍या गंधर्वांच्या देशाकडे निघाले. ॥२॥
भरतश्च युधाजिच्च समेतौ लघुविक्रमैः ।
गन्धर्वनगरं प्राप्तौ सबलौ सपदानुगौ ॥ ३ ॥
भरत आणि युधाजित दोघांनी मिळून अत्यंत तीव्रगतिने सेना आणि वाहनांसह गंधर्वांच्या राजधानीवर हल्ला केला. ॥३॥
श्रुत्वा तु भरतं प्राप्तं गन्धर्वास्ते समागताः ।
योद्धुकामा महावीर्या व्यनदन् ते समन्ततः ॥ ४ ॥
भरताचे आगमन ऐकून ते महापराक्रमी गंधर्व युद्धाच्या इच्छेने एकत्र होऊन सर्वत्र जोरजोराने गर्जना करू लागले. ॥४॥
ततः समभवद् युद्धं तुमुलं रोमहर्षणम् ।
सप्तरात्रं महाभीमं न चान्यतरयोर्जयः ॥ ५ ॥
नंतर तर दोन्ही बाजुच्या सेनांमध्ये फार भयंकर आणि अंगावर काटे आणणारे युद्ध जुंपले. तो महाभयंकर संग्राम अखंड सात रात्रीपर्यंत चालला होता, परंतु दोहोपैकी कुठल्याही एक पक्षाचा विजय झाला नाही. ॥५॥
खड्गशक्तिधनुर्ग्राहा नद्यः शोणितसंस्रवाः ।
नृकलेवरवाहिन्यः प्रवृत्ताः सर्वतोदिशम् ॥ ६ ॥
चोहो बाजूस रक्ताच्या नद्या वाहू लागल्या, तलवारी, शक्ति आणि धनुष्ये त्या नदी मध्ये विचरण करणार्‍या ग्राहाप्रमाणे वाटत होती; तिच्या धारेत मनुष्यांची प्रेते वहात जात होती. ॥६॥
ततो रामानुजः क्रुद्धः कालस्यास्त्रं सुदारुणम् ।
संवर्तं नाम भरतो गन्धर्वेष्वभ्यचोदयत् ॥ ७ ॥
तेव्हा रामानुज भरतांनी कुपित होऊन गंधर्वांवर काळदेवतेच्या अत्यंत भयंकर अस्त्राचा, जे संवर्त नावाने प्रसिद्ध आहे, प्रयोग केला. ॥७॥
ते बद्धाः कालपाशेन संवर्तेन विदारिताः ।
क्षणेनाभिहतास्तेन तिस्रः कोट्यो महात्मनाम् ॥ ८ ॥
याप्रकारे महात्मा भरतांनी क्षणभरात तीन कोटी गंधर्वांचा संहार करून टाकला. ते गंधर्व काळपाशाने बद्ध होऊन संवर्तास्त्राने विदीर्ण करून टाकले गेले. ॥८॥
तद् युद्धं तादृशं घोरं न स्मरन्ति दिवौकसः ।
निमेषान्तरमात्रेण तादृशानां महात्मनाम् ॥ ९ ॥

हतेषु तेषु सर्वेषु भरतः केकयीसुतः ।
निवेशयामास तदा समृद्धे द्वे पुरोत्तमे ॥ १० ॥
असे भयंकर युद्ध देवतांनीही कधी पाहिले होते असे त्यांना आठवत नव्हते. डोळ्याची पापणी लवेपर्यंत तशा पराक्रमी महामनस्वी समस्त गंधर्वांचा संहार झाल्यावर कैकेयीकुमार भरतांनी त्या समयी तेथे दोन समृद्धशाली सुंदर नगरे वसविली. ॥९-१०॥
तक्षं तक्षशिलायां तु पुष्कलं पुष्कलावते ।
गन्धर्वदेशे रुचिरे गान्धारविषये च सः ॥ ११ ॥
मनोहर गंधर्वदेशात तक्षशिला नावाची नगरी वसवून तिच्यामध्ये त्यांनी तक्षाला राजा बनविले आणि गांधार देशात पुष्कलावत नगर वसवून त्याचे राज्य पुष्कलाकडे सोपविले. ॥११॥
धनरत्‍नौतघसङ्‌कीर्णे काननैरुपशोभिते ।
अन्योन्यसङ्‌घर्षकृते स्पर्धया गुणविस्तरैः ॥ १२ ॥
ती दोन्ही नगरे धनधान्य तसेच रत्‍नसमूहांनी भरलेली होती. अनेकानेक कानने त्यांची शोभा वाढवत होती. गुणविस्ताराच्या दृष्टिने ती जणु परस्परात स्पर्धा करत संघर्षपूर्वक प्रगति करत होती. ॥१२॥
उभे सुरुचिरप्रख्ये व्यवहारैरकिल्बिषैः ।
उद्यानयानसम्पूर्णे सुविभक्तान्तरापणे ॥ १३ ॥
दोन्ही नगरांची शोभा परम मनोहर होती. दोन्ही स्थानांचा व्यवहार (व्यापार), निष्कपट, शुद्ध तसेच सरळ होता. दोन्ही नगरे उद्याने तसेच नाना प्रकारच्या वाहानांनी परिपूर्ण होती. त्यांच्यामध्ये अलग अलग काही बाजार होते. ॥१३॥
उभे पुरवरे रम्ये विस्तरैरुपशोभिते ।
गृहमुख्यैः सुरुचिरैः विमानैः बहुभिर्वृते ॥ १४ ॥
दोन्ही श्रेष्ठ पुरांची रमणीयता पाहूनही कळण्यासारखी होती. असे अनेक विस्तृत पदार्थ त्यांची शोभा वाढवीत होते ज्यांचे नाव आजपर्यंत घेतले गेलेले नाही. सुंदर श्रेष्ठ गृह तसेच बरेचसे सात मजली महाल, घरे त्यांची श्रीवृद्धि करत होते. ॥१४॥
शोभिते शोभनीयैश्च देवायतनविस्तरैः ।
तालैस्तमालैस्तिलकैः बकुलैरुपशोभिते ॥ १५ ॥
अनेकानेक शोभासंपन्न देवमंदिरे तसेच ताल, तमाल, तिलक आणि बकुली आदिंच्या वृक्षांनीही त्या दोन्ही नगरांची शोभा आणि रमणीयता वाढलेली होती. ॥१५॥
निवेश्य पञ्चभिर्वर्षैः भरतो राघवानुजः ।
पुनरायान्महाबाहुः अयोध्यां केकयीसुतः ॥ १६ ॥
पाच वर्षात त्या राजधान्यांना चांगल्या प्रकारे वसवून श्रीरामांचे लहान भाऊ कैकेयीसुत महाबाहु भरत परत अयोध्येला आले. ॥१६॥
सोऽभिवाद्य महात्मानं साक्षाद् धर्मं इवापरम् ।
राघवं भरतः श्रीमान् ब्रह्माणमिव वासवः ॥ १७ ॥
तेथे पोहोचून श्रीमान्‌ भरतांनी द्वितीय धर्मराजा समान महात्मा राघवांना, इंद्र जसे ब्रह्मदेवांना प्रणाम करतात त्याप्रमाणे प्रणाम केला. ॥१७॥
शशंस च यथावृत्तं गन्धर्ववधमुत्तमम् ।
निवेशनं च देशस्य श्रुत्वा प्रीतोऽस्य राघवः ॥ १८ ॥
त्यानंतर त्यांनी गंधर्वांचा वध आणि त्या देशाला उत्तम प्रकारे वसविल्याचा यथावत्‌ समाचार ऐकविला. ऐकून राघव त्यांच्यावर फार प्रसन्न झाले. ॥१८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकोत्तरशततमः सर्गः ॥ १०१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकशे एकावा सर्ग पूरा झाला. ॥१०१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP