श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकोनसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणस्य पुत्राणां बन्धूनां च युद्धाय प्रस्थानं, अंगदेन नरान्तकस्य वधश्च -
रावणाचे पुत्र आणि भाऊ यांचे युद्धासाठी जाणे आणि नरांतकाचा अंगदद्वारा वध -
एवं विलपमानस्य रावणस्य दुरात्मनः ।
श्रुत्वा शोकाभिभूतस्य त्रिशिरा वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥
दुरात्मा रावण ज्यावेळी शोकाने पीडित होऊन याप्रकारे विलाप करू लागला, तेव्हा त्रिशिराने म्हटले - ॥१॥
एवमेव महावीर्यो हतो नस्तातमध्यमः ।
न तु सत्पुरुषा राजन् विलपन्ति यथा भवान् ॥ २ ॥
राजन् ! यात संदेह नाही की आमचे मधले काका (चुलते) जे या समयी युद्धात मारले गेले आहेत, असेच महान् पराक्रमी होते, परंतु आपण ज्याप्रकारे रडत विलाप करत आहात त्याप्रकारे श्रेष्ठ पुरूष कुणासाठीही विलाप करत नाहीत. ॥२॥
नूनं त्रिभुवनस्यापि पर्याप्तस्त्वमसि प्रभो ।
स कस्मात् प्राकृत इव शोचस्यात्मानमीदृशम् ॥ ३ ॥
प्रभो ! निश्चितच आपण एकटेच तीन्ही लोकांशी सामना करण्यास समर्थ आहात, मग याप्रकारे साधारण पुरूषाप्रमाणे का आपण आपल्याला शोकात पाडत आहा ? ॥३॥
ब्रह्मदत्ताऽस्ति ते शक्तिः कवचः सायको धनुः ।
सहस्रखरसंयुक्तो रथो मेघसमस्वनः ॥ ४ ॥
आपल्या जवळ ब्रह्मदेवांनी दिलेली शक्ति, कवच, धनुष्य तसेच बाण आहेत; त्याच बरोबर मेघगर्जने प्रमाणे शब्द करणारा रथही आहे; ज्याला एक हजार गाढवे जुंपली जातात. ॥४॥
त्वयाऽसकृद्धि शस्त्रेण विशस्ता देवदानवाः ।
स सर्वायुधसंपन्नो राघवं शास्तुमर्हसि ॥ ५ ॥
आपण एकाच शस्त्राने देवता आणि दानवांना अनेक वेळा चीत केले आहे म्हणून सर्व प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांनी सुसज्जित असून आपण राघवासही दण्ड करू शकता. ॥५॥
कामं तिष्ठ महाराज निर्गमिष्याम्यहं रणे ।
उद्धरिष्यामि ते शत्रून् गरुडः पन्नगानिव ॥ ६ ॥
अथवा महाराज ! आपली इच्छा असेल तर येथेच राहावे. मी स्वतः युद्धासाठी जाईन आणि गरूड जसा सर्पांचा संहार करतो त्याचप्रमाणे आपल्या शत्रूंना मी समूळ उपटून फेकून देईन. ॥६॥
शम्बरो देवराजेन नरको विष्णुना यथा ।
तथाऽद्य शयिता रामो मया युधि निपातितः ॥ ७ ॥
जसे इंद्राने शंबरासुराला आणि भगवान् विष्णुनी नरकासुराला(**) मारून टाकले होते त्याच प्रकारे युद्धस्थळी आज माझ्या कडून मारले जाऊन राम कायमचे झोपी जातील. ॥७॥ (**- येथे ज्या नरकासुराचे नाव आले आहे, तो विप्रचित्ति नामक दानवाद्वारे सिंहिकेच्या गर्भापासून उत्पन्न झालेल्या वातापि आदि सात पुत्रांपैकी एक होता. त्यांची नावे क्रमशः या प्रकारे आहेत - वातापि, नमुचि, इल्वल, सृमर, अंधक, नरक आणि कालनाभ. भगवान् श्रीकृष्णांनी द्वापारात ज्या भूमिपुत्र नरकासुराचा वध केला होता, तो येथे उल्लेखित नरकासुराहून भिन्न होता. त्रिशिरा आणि रावणाच्या वेळी तर त्याचा जन्मही झाला नव्हता)
श्रुत्वा त्रिशिरसो वाक्यं रावणो राक्षसाधिपः ।
पुनर्जातमिवात्मानं मन्यते कालचोदितः ॥ ८ ॥
त्रिशिराचे हे बोलणे ऐकून राक्षसराज रावणाला इतका संतोष झाला की तो आपला जणु नवीन जन्म झाला असे मानू लागला. काळाने प्रेरित होऊनच त्याची अशी बुद्धि झाली होती. ॥८॥
श्रुत्वा त्रिशिरसो वाक्यं देवान्तकनरान्तकौ ।
अतिकायश्च तेजस्वी बभूवुर्युद्धहर्षिताः ॥ ९ ॥
त्रिशिराचे उपर्युक्त कथन ऐकून देवांतक, नरांतक आणि तेजस्वी अतिकाय - हे तिघे ही युद्धासाठी उत्साहित झाले. ॥९॥
ततोऽहमहमित्येवं गर्जन्तो नैर्ऋतर्षभाः ।
रावणस्य सुता वीराः शक्रतुल्यपराक्रमाः ॥ १० ॥
मी युद्धासाठी जाईन, मी जाईन असे म्हणत आणि गर्जना करत ते तीन्ही श्रेष्ठ निशाचर युद्धासाठी तयार झाले. रावणाचे हे वीर पुत्र इंद्राप्रमाणे पराक्रमी होते. ॥१०॥
अन्तरिक्षगताः सर्वे सर्वे मायाविशारदाः ।
सर्वे त्रिदशदर्पघ्नाः सर्वे समरदुर्मदाः ॥ ११ ॥
ते सर्वच्या सर्व आकाशात विचरण करणारे, मायाविशारद, रणदुर्मद तसेच देवतांचाही दर्प दलन करणारे होते. ॥११॥
सर्वे सुबलसंपन्नाः सर्वे विस्तीर्णकीर्तयः ।
सर्वे समरमासाद्य न श्रूयन्ते स्म निर्जिताः ॥ १२ ॥

देवैरपि सगन्धर्वैः सकिन्नरमहोरगैः ।
सर्वेऽस्त्रविदुषो वीराः सर्वे युद्धविशारदाः ।
सर्वे प्रवरविज्ञानाः सर्वे लब्धवरास्तथा ॥ १३ ॥
ते सर्व उत्तम बलाने संपन्न होते. त्या सर्वांची कीर्ती तीन्ही लोकात पसरलेली होती आणि समरभूमीवर आल्यावर गंधर्व, किन्नर तसेच मोठ मोठ्या नागांसहित देवतांकडूनही कधी त्या सर्वांचा पराजय झाल्याचे ऐकिवात नव्हते. ते सर्व अस्त्रवेत्ते, सर्व वीर आणि सर्व युद्धाच्या कलेत निपुण होते. त्या सर्वांना शस्त्रे आणि अस्त्रे यांचे उत्तम ज्ञान होते. आणि सर्वांनी तपस्येच्या द्वारा वरदान प्राप्त केलेले होते. ॥१२-१३॥
स तैस्तदा भास्करतुल्यवर्चसैः
सुतैर्वृतः शत्रुबलश्रियार्दनैः ।
रराज राजा मघवान् यथामरैः
वृतो महादानवदर्पनाशनैः ॥ १४ ॥
सूर्याच्या समान तेजस्वी तथा शत्रूंची सेना आणि संपत्तिला नष्ट करून टाकणार्‍या त्या पुत्रांनी घेरलेला राक्षसांचा राजा रावण मोठ मोठ्या दानवांचा दर्प चूर्ण करणार्‍या देवतांनी घेरलेल्या इंद्राप्रमाणे शोभा प्राप्त करत होता. ॥१४॥
स पुत्रान् संपरिष्वज्य भूषयित्वा च भूषणैः ।
आशीर्भिश्च प्रशस्ताभिः प्रेषयामास वै रणे ॥ १५ ॥
त्याने आपल्या पुत्रांना हृदयाशी धरून नाना प्रकारच्या आभूषणांनी विभूषित केले आणि उत्तम आशीर्वाद देऊन रणभूमीत धाडले. ॥१५॥
युद्धोन्मत्तं च मत्तं च भ्रातरौ चापि रावणः ।
रक्षणार्थं कुमाराणां प्रेषयामास संयुगे ॥ १६ ॥
रावणाने आपले दोन्ही भाऊ युद्धोन्मत्त (महापार्श्व) आणि मत्त (महोदर) यांनाही युद्धात कुमारांच्या रक्षणासाठी धाडले. ॥१६॥
तेऽभिवाद्य महात्मानं रावणं लोकरावणम् ।
कृत्वा प्रदक्षिणं चैव महाकायाः प्रतस्थिरे ॥ १७ ॥
ते सर्व महाकाय राक्षस समस्त लोकांना रडविणार्‍या महामना रावणाला प्रणाम करून आणि त्याची परिक्रमा करून युद्धासाठी प्रस्थित झाले. ॥१७॥
सर्वौषधीभिर्गन्धैश्च समालभ्य महाबलाः ।
निर्जग्मुर्नैर्ऋतश्रेष्ठाः षडेते युद्धकाङ्‌क्षिणः ॥ १८ ॥

त्रिशिराश्चातिकायश्च देवान्तकनरान्तकौ ।
महोदरमहापार्श्वौ निर्जग्मुः कालचोदिताः ॥ १९ ॥
सर्व प्रकारच्या औषधि तसेच गंधांना स्पर्श करून युद्धाची अभिलाषा ठेवणारे त्रिशिरा, अतिकाय, देवांतक, महोदर आणि महापार्श्व - हे सहा महाबली श्रेष्ठ निशाचर काळाने प्रेरित होऊन युद्धासाठी पुरीतून बाहेर पडले. ॥१८-१९॥
ततः सुदर्शनं नाम नीलजीमूतसंनिभम् ।
ऐरावतकुले जातं आरुरोह महोदरः ॥ २० ॥
त्यासमयी महोदर ऐरावताच्या कुळात उत्पन्न झालेल्या काळ्या मेघासमान रंगाच्या सुदर्शन नावाच्या हत्तीवर स्वार झाला. ॥२०॥
सर्वायुधसमायुक्तः तूणीभिश्च स्वलंकृतः ।
रराज गजमास्थाय सवितेवास्तमूर्धनि ॥ २१ ॥
समस्त आयुधांनी संपन्न आणि तूणीरांनी अलंकृत महोदर त्या हत्तीच्या पाठीवर बसून अस्ताचलाच्या शिखरावर विराजमान सूर्यदेवाप्रमाणे शोभत होता. ॥२१॥
हयोत्तमसमायुक्तं सर्वायुधसमाकुलम् ।
आरुरोह रथश्रेष्ठं त्रिशिरा रावणात्मजः ॥ २२ ॥
रावणकुमार त्रिशिरा एका उत्तम रथावर आरूढ झाला ज्यात सर्व प्रकारची अस्त्रे-शस्त्रे ठेवलेली होती आणि उत्तम घोडे जुंपलेले होते. ॥२२॥
त्रिशिरा रथमास्थाय विरराज धनुर्धरः ।
सविद्युदुल्कः सज्वालः सेन्द्रचाप इवाम्बुदः ॥ २३ ॥
त्या रथात बसून धनुष्य धारण केलेला त्रिशिरा विद्युत्, उल्का, ज्वाला आणि इंद्रधनुष्याने मेघासमान शोभून दिसू लागला. ॥२३॥
त्रिभिः किरीटैस्त्रिशिरा शुशुभे स रथोत्तमे ।
हिमवानिव शैलेन्द्रः त्रिभिः काञ्चनपर्वतैः ॥ २४ ॥
त्या उत्तम रथामध्ये स्वार होऊन तीन किरीटांनी युक्त त्रिशिरा तीन सुवर्णमय शिखरांनी युक्त गिरिराज हिमालयासमान शोभत होता. ॥२४॥
अतिकायोऽति तेजस्वी राक्षसेन्द्रसुतस्तदा ।
आरुरोह रथश्रेष्ठं श्रेष्ठः सर्वधनुष्मताम् ॥ २५ ॥
राक्षसराज रावणाचा अत्यंत तेजस्वी पुत्र अतिकाय समस्त धनुर्धारी लोकांमध्ये श्रेष्ठ होता. तोही त्या समयी एका उत्तम रथावर आरूढ झाला. ॥२५॥
सुचक्राक्षं सुसंयुक्तं स्वनुकर्षं सुकूबरम् ।
तूणीबाणासनैर्दीप्तं प्रासासिपरिघाकुलम् ॥ २६ ॥
त्या रथाची चाके आणि धुरे फार सुंदर होते. त्याला उत्तम घोडे जुंपलेले होते तसेच त्याचे अनुकर्ष आणि कूबर सुदृढ होते. तूणीर, बाण आणि धनुष्यामुळे तो रथ उद्दीप्त होत होता. प्रास, खड्ग आणि परिघांनी तो भरलेला होता. ॥२६॥
स काञ्चनविचित्रेण किरीटेन विराजता ।
भूषणैश्च बभौ मेरुः प्रभाभिरिव भासयन् ॥ २७ ॥
तो सुवर्णनिर्मित विचित्र एवं दीप्तीशाली किरीट तसेच अन्य आभूषणांनी विभूषित होऊन आपल्या प्रभेने प्रकाशाचा विस्तार करत मेरूपर्वतासमान सुशोभित होत होता. ॥२७॥
स रराज रथे तस्मिन् राजसूनुर्महाबलः ।
वृतो नैर्ऋतशार्दूलैः वज्रपाणिरिवामरैः ॥ २८ ॥
त्या रथावर श्रेष्ठ निशाचरांनी घेरून बसलेला तो महाबली राक्षस राजकुमार देवतांनी घेरलेल्या वज्रपाणि इंद्रासमान शोभा प्राप्त करत होता. ॥२८॥
हयमुच्चैःश्रवःप्रख्यं श्वेतं कनकभूषणम् ।
मनोजवं महाकायं आरुरोह नरान्तकः ॥ २९ ॥
नरांतक उच्चैःश्रव्या समान श्वेतवर्णाच्या एका सुवर्णभूषित विशालकाय आणि मनाप्रमाणे वेगवान् अश्वावर आरूढ झाला. ॥२९॥
गृहीत्वा प्रासमुल्काभं विरराज नरान्तकः ।
शक्तिमादाय तेजस्वी गुहः शिखिगतो यथा ॥ ३० ॥
उल्केप्रमाणे दीप्तिमान् प्रास हातात घेऊन तेजस्वी नरांतक शक्ति घेऊन मोरावर बसून तेजपुंजाने संपन्न कुमार कार्तिकेयासमान सुशोभित होत होता. ॥३०॥
देवान्तकः समादाय परिघं हेमभूषणम् ।
परिगृह्य गिरीं दोर्भ्यां वपुर्विष्णोर्विडम्बयन् ॥ ३१ ॥
देवांतक स्वर्णभूषित परिघ घेऊन समुद्रमंथनाच्या समयी दोन्ही हातांनी मंदराचल उचलून घेतलेल्या भगवान् विष्णुच्या स्वरूपाचे जणु अनुकरण करत होता. ॥३१॥
महापार्श्वो महातेजा गदामादाय वीर्यवान् ।
विरराज गदापाणिः कुबेर इव संयुगे ॥ ३२ ॥
महातेजस्वी आणि पराक्रमी महापार्श्व हातात गदा घेऊन युद्धस्थळी गदाधारी कुबेरासमान शोभा पावू लागला. ॥३२॥
ते प्रतस्थुः महात्मानो अमरावत्याः सुरा इव ।
तान् गजैश्च तुरङ्‌गैश्च रथैश्चाम्बुदनिःस्वनैः ॥ ३३ ॥

अनूत्पेतुर्महात्मानो राक्षसाः प्रवरायुधाः ।
अमरापुरीतून बाहेर पडणार्‍या देवतांसमान ते सर्व महाकाय निशाचर लंकापुरीतून निघाले. त्यांच्या पाठीमागे श्रेष्ठ आयुधे धारण करून विशालकाय राक्षस हत्ती, घोडे तसेच मेघाच्या गर्जनेप्रमाणे घडघडाट उत्पन्न करणार्‍या रथांवर स्वार होऊन युद्धासाठी निघाले. ॥३३ १/२॥
ते विरेजुर्महात्मानः कुमाराः सूर्यवर्चसः ॥ ३४ ॥

किरीटिनः श्रिया जुष्टा ग्रहा दीप्ता इवाम्बरे ।
ते सूर्यतुल्य तेजस्वी, महामनस्वी राक्षसराजकुमार मस्तकावर किरीट धारण करून उत्तम शोभा-संपत्तिने सेवित होऊन आकाशात प्रकाशित होणार्‍या ग्रहांच्या समान सुशोभित होत होते. ॥३४ १/२॥
प्रगृहीता बभौ तेषां शस्त्राणामावलिः सिता ॥ ३५ ॥

शारदाभ्रप्रतीकाशा हंसावलिरिवाम्बरे ।
त्यांच्या द्वारा धारण केलेल्या अस्त्र-शस्त्रांनी श्वेत पंक्ती आकाशातील शरदऋतुच्या मेघांप्रमाणे उज्ज्वल कांतिने युक्त हंसांच्या श्रेणीप्रमाणे शोभा प्राप्त करत होती. ॥३५ १/२॥
मरणं वापि निश्चित्य शत्रूणां वा पराजयम् ॥ ३६ ॥

इति कृत्वा मतिं वीरा संजग्मुः संयुगार्थिनः ।
आज एक तर आम्ही शत्रूंना परास्त करून टाकू अथवा स्वयं मृत्युच्या मांडीवर कायमचे झोपून जाऊ - असा निश्चय करून ते वीर राक्षस युद्धासाठी पुढे निघाले. ॥३६ १/२॥
जगर्जुश्च प्रणेदुश्च चिक्षिपुश्चापि सायकान् ॥ ३७ ॥

जगृहुश्च महात्मानो निर्यान्तो युद्धदुर्मदाः ।
ते युद्धदुर्मद महामनस्वी निशाचर गर्जना करत, सिंहनाद करत बाण हातात घेत होते आणि त्यांना शत्रूंवर सोडत होते. ॥३७ १/२॥
क्ष्वेडितास्फोटितानां वै संचचालेव मेदिनी ॥ ३८ ॥

रक्षसां सिंहनादैश्च संस्फोटितमिवांबरम् ।
त्या राक्षसांच्या गर्जना करण्याने, षड्डू ठोकणे आणि सिंहनाद करण्याने पृथ्वी जणु कंपित होऊ लागली आणि आकाश जणु फाटू लागले. ॥३८ १/२॥
तेऽभिनिष्क्रम्य मुदिता राक्षसेन्द्रा महाबलाः ॥ ३९ ॥

ददृशुर्वानरानीकं समुद्यतशिलानगम् ।
त्या महाबली राक्षसश्रेष्ठ वीरांनी प्रसन्नतापूर्वक नगराच्या सीमेतून बाहेर येऊन पाहिले, वानरांची सेना पर्वतशिखरे आणि मोठ मोठे वृक्ष उचलून युद्धासाठी तयार होऊन उभी आहे. ॥३९ १/२॥
हरयोऽपि महात्मानो ददृशू राक्षसं बलम् ॥ ४० ॥

हस्त्यश्वरथसंबाधं किङ्‌किणीशतनादितम् ।
नीलजीमूतसंकाशं समुद्यतमहायुधम् ॥ ४१ ॥
महामना वानरांनी राक्षससेनेवर दृष्टिपात केला. ती हत्ती, घोडे आणि रथांनी भरलेली होती, शेकडो - हजारो घुंघुरांच्या रूणझुण ध्वनीने निनादित होत होती. काळ्या मेघांचा समुदाय जसा दिसत असतो तशी दिसत होती आणि हातात मोठ मोठी आयुधे घेतलेली होती. ॥४०-४१॥
दीप्तानलरविप्रख्यैः नैर्ऋतैः सर्वतो वृतम् ।
तद् दृष्ट्‍वा बलमायान्तं लब्धलक्षाः प्लवंगमाः ॥ ४२ ॥

समुद्यतमहाशैलाः संप्रणेदुर्मुहुर्मुहुः ।
अमृष्यमाणा रक्षांसि प्रतिनर्दन्ति वानराः ॥ ४३ ॥
प्रज्वलित अग्नि आणि सूर्यासमान तेजस्वी राक्षसांनी तिला सर्व बाजुनी घेरून ठेवले होते. निशाचरांची ती सेना येत असलेली पाहून वानर प्रहार करण्याची संधि मिळाल्याने महान् पर्वतशिखरे उचलून वारंवार गर्जना करू लागले. ते राक्षसांचा सिंहनाद सहन करू शकले नाहीत म्हणून बदल्यात जोरजोराने आरोळ्या मारू लागले. ॥४२-४३॥
ततः समुत्कृष्टरवं निशम्य
रक्षोगणा वानरयूथपानाम् ।
अमृष्यमाणाः परहर्षमुग्रं
महाबला भीमतरं प्रणेदुः ॥ ४४ ॥
वानर यूथपतिंची ती उच्च स्वरात केली गेलेली गर्जना ऐकून भयंकर आणि महान् बलाने संपन्न राक्षसगण शत्रुंचा हर्ष सहन करू शकले नाहीत, म्हणून स्वतःही अत्यंत भीषण सिंहनाद करू लागले. ॥४४॥
ते राक्षसबलं घोरं प्रविश्य हरियूथपाः ।
विचेरुरुद्यतैः शैलैः नगाः शिखरिणो यथा ॥ ४५ ॥
तेव्हां वानर यूथपति राक्षसांच्या त्या भयंकर सेनेत घुसून गेले आणि शैलशृंग उचलून शिखरयुक्त पर्वतांप्रमाणे तेथे विचरण करू लागले. ॥४५॥
केचिदाकाशमाविश्य केचिदुर्व्यां प्लवंगमाः ।
रक्षस्सैन्येषु संक्रुद्धाःन्केचिद् द्रुमशिलायुधाः ॥ ४६ ॥

द्रुमांश्च विपुलस्कन्धान् गृह्य वानरपुङ्‌गवाः ।
वृक्ष आणि शिलांना आयुधरूपाने धारण करून वानर योद्धे राक्षससैनिकांवर अत्यंत कुपित होऊन आकाशात उडून विचरण करु लागले. कित्येक वानरश्रेष्ठ वीर मोठ मोठ्या शाखा असलेल्या वृक्षांना हातात घेऊन पृथ्वीवर विचरण करू लागले. ॥४६ १/२॥
तद्युद्धमभवद् घोरं रक्षोवानरसङ्‌कुलम् ॥ ४७ ॥

ते पादपशिलाशैलैः चक्रुर्वृष्टिमनूपमाम् ।
बाणौघैर्वार्यमाणाश्च हरयो भीमविक्रमाः ॥ ४८ ॥
त्या समयी राक्षस आणि वानरांच्या त्या युद्धाने फार भयंकर रूप धारण केले. राक्षसांनी बाणसमूहांच्या वृष्टि द्वारा जेव्हा वानरांना पुढे येण्यापासून रोखले, त्या समयी ते भयंकर पराक्रमी वानर त्यांच्यावर वृक्ष, शिला, तसेच शैलशिखरांची अनुपम वृष्टि करू लागले. ॥४७-४८॥
सिंहनादान् विनेदुश्च रणे राक्षसवानराः ।
शिलाभिश्चूर्णयामासुः यातुधानान् प्लवंगमाः ॥ ४९ ॥

निजघ्नुः संयुगे क्रुद्धाः कवचाभरणावृतान् ।
राक्षस आणि वानर दोन्हीही तेथे रणक्षेत्रात सिंहाप्रमाणे डरकाळ्या फोडीत होते. कुपित झालेल्या वानरांनी कवचांनी आणि आभूषणांनी विभूषित बर्‍याचशा राक्षसांना युद्धस्थळी शिलांच्या मार्‍यांनी चिरडून टाकले - मारून टाकले. ॥४९ १/२॥
केचित् रथगतान् वीरान् गजवाजिगतानपि ॥ ५० ॥

निर्जघ्नुः सहसाऽऽप्लुत्य यातुधानान् प्लवंगमाः ।
कित्येक वानरांनी रथ, हत्ती आणि घोड्यावर बसलेल्या वीर राक्षसांनाही एकाएकी उडी मारून ठार केले. ॥५० १/२॥
शैलशृङ्‌गान् विरांगास्ते मुष्टिभिर्वान्तलोचनाः ॥ ५१ ॥

चेलुः पेतुश्च नेदुश्च तत्र राक्षसपुङ्‌गवाः ।
तेथे मुख्य-मुख्य राक्षसांची शरीरेही पर्वत शिखरांनी आच्छादित झाली होती. वानरांच्या मुष्टि-प्रहारांचा मार खाऊन कित्येकांचे डोळे बाहेर निघून आले होते. ते निशाचर पळत होते, पडत होते आणि चीत्कार करत होते. ॥५१ १/२॥
राक्षसाश्च शरैस्तीक्ष्णैः बिभिदुः कपिकुञ्जरान् ॥ ५२ ॥

शूलमुद्‌गरखड्गैश्च जघ्नुः प्रासैश्च शक्तिभिः ।
राक्षसांनीही तीक्ष्ण बाणांनी कित्येक वानरश्रेष्ठांना विदीर्ण करून टाकले होते तसेच शूल, मुद्‍गर, खड्ग, प्रास आणि शक्ति यांच्या द्वारा अनेकांना ठार मारले होते. ॥५२ १/२॥
अन्योन्यं पातयामासुः परस्परजयैषिणः ॥ ५३ ॥

रिपुशोणितदिग्धाङ्‌गाः तत्र वानरराक्षसाः ।
शत्रूंचे रक्त ज्यांच्या शरीरांना चिकटले होते, असे वानर आणि राक्षस तेथे परस्परांवर विजय मिळविण्याच्या इच्छेने एक दुसर्‍याला धराशायी करीत होते. ॥५३ १/२॥
ततः शैलैश्च खड्गैश्च विसृष्टैर्हरिराक्षसैः ॥ ५४ ॥

मुहूर्तेनावृता भूमिः अभवच्छोणितोक्षिता ।
थोड्याच वेळात ती युद्धभूमी वानर आणि राक्षसांद्वारा फेकल्या गेलेल्या पर्वतशिखरांनी तसेच तलवारींनी आच्छादित होऊन रक्ताच्या प्रवाहाने भिजून गेली. ॥५४ १/२॥
विकीर्णैः पर्वताकारै रक्षोभिरभिमर्दितैः ।
आसीद् वद्वसुमती पूर्णा तदा युद्धमदान्वितैः ॥ ५५ ॥
युद्धाच्या मदाने उन्मत्त झालेले पर्वताकार राक्षस जे शिलांच्या भाराने चिरडले गेले होते, सर्वत्र विखरून पडले होते. त्यांनी तेथील सारी भूमी भरून गेली होती. ॥५५॥
आक्षिप्ताः क्षिप्यमाणाश्च भग्नशूलाश्च वानराः ।
पुनरङ्‌गैस्तदा चक्रुः आसन्ना युद्धमद्‌भुतम् ॥ ५६ ॥
राक्षसांनी ज्यांच्या युद्धाच्या साधनभूत शैल-शिखरांना तोडून-फोडून टाकले होते, ते वानर त्यांच्या प्रहाराने विचलित केले गेल्यावर त्या राक्षसांच्या अत्यंत निकट जाऊन विचलित केले गेल्यावर त्या राक्षसांच्या अत्यंत निकट जाऊन आपल्या हात-पाय आदि अंगांच्या द्वाराच अद्‍भुत युद्ध करू लागले. ॥५६॥
वानरान् वानरैरेव जघ्नुस्ते नैरृतर्षभाः ।
राक्षसान् राक्षसैरेव जघ्नुस्ते वानरा अपि ॥ ५७ ॥
राक्षसांतील प्रधान प्रधान वीर वानरांना पकडून त्यांना दुसर्‍या वानरांवर आपटत होते. याच प्रकारे वानरही राक्षसांनीच राक्षसांना मारत होते. ॥५७॥
आक्षिप्य च शिलाः शैलान् जघ्नुस्ते राक्षसास्तदा ।
तेषां चाच्छिद्य शस्त्राणि जघ्नू रक्षांसि वानराः ॥ ५८ ॥
त्या समयी राक्षस आपल्या शत्रुंच्या हातातून शिला आणि शैल-शिखरांना हिसकावून त्यांच्याच द्वारा त्यांचावर प्रहार करू लागले तसेच वानरही राक्षसांची हत्यारे हिसकावून त्यांच्याच द्वारा वध करू लागले. ॥५८॥
निजघ्नुः शैलशृंगैश्च बिभिदुश्च परस्परम् ।
सिंहनादान् विनेदुश्च रणे राक्षसवानराः ॥ ५९ ॥
याप्रकारे राक्षस आणि वानर दोन्ही दलांचे योद्धे एक-दुसर्‍याला पर्वत-शिखरांनी मारू लागले, अस्त्र-शस्त्रांनी विदीर्ण करू लागले आणि रणभूमीमध्ये सिंहासमान डरकाळ्या फोडू लागले. ॥५९॥
छिन्नवर्मतनुत्राणा राक्षसा वानरैर्हताः ।
रुधिरं प्रस्रुतास्तत्र रससारमिव द्रुमाः ॥ ६० ॥
राक्षसांच्या शरीर रक्षणास साधनभूत कवचे आदि छिन्न-भिन्न झाली, वानरांचा मार खाऊन ते आपल्या शरीरातून, वृक्ष ज्याप्रमाणे आपल्या खोडातून डिंक वाहावतो त्याप्रमाणे रक्त वाहवू लागले. ॥६०॥
रथेन च रथं चापि वारणेनैव वारणम् ।
हयेन च हयं केचिद् निर्जघ्नुर्वानरा रणे ॥ ६१ ॥
कित्येक वानर रणभूमीमध्ये रथाने रथाला, हत्तीने हत्तीला आणि घोड्याने घोड्याला ठार करून पाडू लागले. ॥६१॥
क्षुरप्रैरर्धचन्द्रैश्च भल्लैश्च निशितैः शरैः।
राक्षसा वानरेन्द्राणां बिभिदुः पादपान् शिलाः ॥ ६२ ॥
वानर-यूथपतिनी फेकलेल्या वृक्षांना आणि शिलांना निशाचर योद्धे तीक्ष्ण क्षुरप्र, अर्धचंद्र आणि भल्ल नामक बाणांनी तोडून फोडून टाकत होते. ॥६२॥
विकीर्णाः पर्वतास्तैश्च द्रुमैश्छिन्नैश्च संयुगे ।
हतैश्च कपिरक्षोभिः दुर्गमा वसुधाभवत् ॥ ६३ ॥
तुटून फुटून पडलेल्या पर्वतांनी, तोडलेल्या वृक्षांनी तसेच वानर आणि राक्षसांच्या प्रेतांनी भरून गेल्याने त्या रणभूमीमध्ये चालणे फिरणे कठीण झाले. ॥६३॥
ते वानरा गर्वितहृष्टचेष्टाः
संग्राममासाद्य भयं विमुच्य ।
युद्धं स्म सर्वे सह राक्षसैस्ते
नानायुधाश्चक्रुरदीनसत्त्वाः ॥ ६४ ॥
वानरांच्या सर्व हालचाली गर्वाने युक्त तसेच हर्ष आणि उत्साहाने युक्त होत्या. त्यांच्या हृदयात दीनता नव्हती तसेच त्यांनी राक्षसांचीच नाना प्रकारची आयुधे हिसकावून हस्तगत करून घेतली होती. म्हणून ते सर्व संग्रामात पोहोचून राक्षसांशी भय सोडून युद्ध करत होते. ॥६४॥
तस्मिन् प्रवृत्ते तुमुले
विमर्दे प्रहृष्यमाणेषु वलीमुखेषु ।
निपात्यमानेषु च राक्षसेषु
महर्षयो देवगणाश्च नेदुः ॥ ६५ ॥
याप्रकारे जेव्हा भयंकर मारामारी चाललेली होती, वानर प्रसन्न होते, आणि राक्षसांची प्रेते पडत होती, त्या समयी महर्षि आणि देवगण हर्षनाद करू लागले. ॥६५॥
ततो हयं मारुततुल्यवेगं
आरुह्य शक्तिं निशितां प्रगृह्य ।
नरान्तको वानरसैन्यमुग्रं
महार्णवं मीन इवाविवेश ॥ ६६ ॥
त्यानंतर वायुसमान तीव्र वेग असलेल्या घोड्यावर स्वार होऊन हातात तीक्ष्ण शक्ति घेऊन नरांतक वानरांच्या भयंकर सेनेमध्ये, एखादा मत्स्य महासागरात प्रवेश करतो त्याप्रमाणे घुसला. ॥६६॥
स वानरान् सप्त शतानि वीरः
प्रासेन दीप्तेन विनिर्बिभेद ।
एकः क्षणेनेन्द्ररिपुर्महात्मा
जघान सैन्यं हरिपुङ्‌गवानाम् ॥ ६७ ॥
त्या महाकाय इंद्रद्रोही वीर निशाचराने चमचमणार्‍या भाल्याने एकट्यानेच सातशे वानरांना चिरून टाकले आणि क्षणभरात वानरयूथपतिंच्या एका फार मोठ्या सेनेचा संहार करून टाकला. ॥६७॥
ददृशुश्च महात्मानं हयपृष्ठप्रतिष्ठितम् ।
चरन्तं हरिसैन्येषु विद्याधरमहर्षयः ॥ ६८ ॥
घोड्याच्या पाठीवर बसलेल्या त्या महामनस्वी वीराला विद्याधर आणि महर्षि यांनी वानरांच्या सेनेमध्ये विचरतांना पाहिले. ॥६८॥
स तस्य ददृशे मार्गो मांसशोणितकर्दमः ।
पतितैः पर्वताकारैः वानरैरभिसंवृतः ॥ ६९ ॥
तो ज्या मार्गाने निघून जात होता तो मार्ग धराशायी झालेल्या पर्वताकार वानरांनी झाकून गेलेला दिसत होता आणि तेथे रक्त आणि मांसाचा चिखल माजत होता. ॥६९॥
यावद् विक्रमितुं बुद्धिं चक्रुः प्लवगपुङ्‌गवाः ।
तावदेतानतिक्रम्य निर्बिभेद नरान्तकः ॥ ७० ॥
वानरांचे मुख्य मुख्य वीर जो पर्यंत पराक्रम करण्याचा विचार करत तो पर्यंतच नरांतक त्या सर्वांना ओलांडून भाल्याच्या माराने घायाळ करत होता. ॥७०॥
ज्वलन्तं प्रासमुद्यम्य संग्रामाग्रे नरान्तकः ।
ददाह हरिसैन्यानि वनानीव विभावसुः ॥ ७१ ॥
जसे दावानल वाळलेल्या जंगलांना जाळून टाकतो त्याप्रकारे प्रज्वलित प्रास घेऊन नरांतक युद्धाच्या तोंडावरच वानर सेनांना दग्ध करू लागला. ॥७१॥
यावदुत्पाटयामासुः वृक्षान् शैलान् वनौकसः ।
तावत् प्रासहताः पेतुः वज्रकृत्ता इवाचलाः ॥ ७२ ॥
वानर लोक जो पर्यंत वृक्ष आणि पर्वत शिखरांना उपटू लागत तोच त्याच्या भाल्याचा मार खाऊन वज्राच्या माराने कोसळणार्‍या पर्वताप्रमाणे कोसळून पडत होते. ॥७२॥
दिक्षु सर्वासु बलवान् विचचार नरान्तकः ।
प्रमृद्‌गन् सर्वतो युद्धे प्रावृट्काले यथानिलः ॥ ७३ ॥
ज्याप्रमाणे वर्षाकाळी प्रचण्ड वायु सर्वत्र वृक्षांना तोडून उपटून टाकत वहात असतो त्याचप्रकारे बलवान् नरांतक रणभूमीमध्ये वानरांना चिरडून टाकत संपूर्ण दिशांमध्ये विचरण करू लागला. ॥७३॥
न शेकुर्धावितुं वीरा न स्थातुं स्पन्दितुं भयात् ।
उत्पतन्तं स्थितं यान्तं सर्वान् विव्याध वीर्यवान् ॥ ७४ ॥
वानर वीर भयामुळे पळून जाऊ शकत नव्हते, उभेही राहू शकत नव्हते किंवा त्यांच्याकडून दुसरी काही हालचाल करणे जमत नव्हते. पराक्रमी नरांतक उड्या मारणार्‍या, खाली पडणार्‍या आणि जाणार्‍या सर्व वानरांवर भाल्याचा प्रहार करत होता. ॥७४॥
एकेनान्तककल्पेन प्रासेनादित्यतेजसा ।
भिन्नानि हरिसैन्यानि निपेतुर्धरणीतले ॥ ७५ ॥
त्याचा प्रास आपल्या प्रभेने सूर्यासमान उद्दीप्त होत होता आणि यमराजा सारखा भयंकर भासत होता. त्या भाल्याच्या एकाच आघाताने घायाळ होऊन वानरांच्या झुंडीच्या झुंडी जमिनीवर झोपून गेल्या. ॥७५॥
वज्रनिष्पेषसदृशं प्रासस्याभिनिपातनम् ।
न शेकुर्वानराः सोढुं ते विनेदुर्महास्वनम् ॥ ७६ ॥
वज्राच्या आघातावर मात करणार्‍या त्या प्रासाच्या दारूण प्रहाराला वानर सहन करू शकले नाहीत. ते जोर जोराने चीत्कार करू लागले. ॥७६॥
पततां हरिवीराणां रूपाणि प्रचकाशिरे ।
वज्रभिन्नाग्रकूटानां शैलानां पततामिव ॥ ७७ ॥
तेथे पडणार्‍या वानरांचे रूप, वज्राच्या आघाताने शिखरे विदीर्ण झाल्याने धराशायी होणार्‍या पर्वतांप्रमाणे दिसत होते. ॥७७॥
ये तु पूर्वं महात्मानः कुंभकर्णेन पातिताः ।
ते स्वस्था वानरश्रेष्ठाः सुग्रीवमुपतस्थिरे ॥ ७८ ॥
प्रथम कुंभकर्णाने ज्यांना रणभूमीमध्ये पाडले होते, ते महामनस्वी श्रेष्ठ वानर त्यासमयी स्वस्थ होऊन सुग्रीवाच्या सेवेत उपस्थित झाले. ॥७८॥
प्रेक्षमाणः स सुग्रीवो ददृशे हरिवाहिनीम् ।
नरान्तकभयत्रस्तां विद्रवन्तीं यतस्ततः ॥ ७९ ॥
सुग्रीवांनी जेव्हा सर्व बाजूस दृष्टिपात केला तेव्हा पाहिले की वानरांची सेना नरांतकामुळे भयभीत होऊन इकडे - तिकडे पळून जात आहे. ॥७९॥
विद्रुतां वाहिनीं दृष्ट्‍वा स ददर्श नरान्तकम् ।
गृहीतप्रासमायान्तं हयपृष्ठ प्रतिष्ठितम् ॥ ८० ॥
सेनेला पळतांना पाहून त्यांनी नरांतकावर दृष्टि टाकली, जो घोड्याच्या पाठीवर बसून हातात भाला घेऊन येत होता. ॥८०॥
दृष्ट्‍वोवाच महातेजाः सुग्रीवो वानराधिपः ।
कुमारमङ्‌गदं वीरं शक्रतुल्यपराक्रमम् ॥ ८१ ॥
त्याला पाहून महातेजस्वी वानरराज सुग्रीवांनी इंद्रतुल्य पराक्रमी वीर कुमार अंगदास म्हटले - ॥८१॥
गच्छ त्वं राक्षसं वीरं योऽसौ तुरगमास्थितः ।
क्षोभयन्तं हरिबलं क्षिप्रं प्राणैर्वियोजय ॥ ८२ ॥
मुला ! तो जो घोड्यावर बसलेला वानरसेनेत खळबळ उडवून देत आहे त्या वीर राक्षसाचा सामना करण्यासाठी जा आणि त्याच्या प्राणांचा शीघ्रच अंत करून टाक. ॥८२॥
स भर्तुर्वचनं श्रुत्वा निष्पपाताङ्‌गदस्तदा ।
अनीकान्मेघसंकाशाद् अंशुमानिव वीर्यवान् ॥ ८३ ॥
स्वामीची ही आज्ञा ऐकून पराक्रमी अंगद त्यासमयी मेघांच्या समूहासमान प्रतीत होणार्‍या वानर सेनेतून, ढगांच्या मागून सूर्यदेव जसे प्रकट होतात तसे निघाले. ॥८३॥
शैलसङ्‌घातसंकाशो हरीणामुत्तमोऽङ्‌गदः ।
रराजाङ्‌गदसन्नद्धः सधातुरिव पर्वतः ॥ ८४ ॥
वानरांमध्ये श्रेष्ठ अंगद शैलसमूहासमान विशालकाय होते. त्यांनी आपल्या बाहूवर बाजूबंद धारण केलेले होते, म्हणून सुवर्ण आदि धातुनी युक्त पर्वतासमान शोभत होते. ॥८४॥
निरायुधो महातेजाः केवलं नखदंष्ट्रवान् ।
नरान्तकमभिक्रम्य वालिपुत्रोऽब्रवीद् वचः ॥ ८५ ॥
वालिपुत्र अंगद महातेजस्वी होते. त्यांच्याजवळ कुठलेही हत्यार नव्हते. केवळ नखे आणि दाढा हीच त्यांची अस्त्रे-शस्त्रे होती. ते नरांतकाजवळ पोहोचून याप्रकारे बोलले - ॥८५॥
तिष्ठ किं प्राकृतैरेभिः हरिभिस्त्वं करिष्यसि ।
अस्मिन् वज्रसमस्पर्शं प्रासं क्षिप ममोरसि ॥ ८६ ॥
अरे निशाचरा ! थांब ! या साधारण वानरांना मारुन तू काय करशील ? तुझ्या भाल्याचा प्रहार वज्रासमान असह्य आहे परंतु जरा त्याला माझ्या या छातीवर तर मार. ॥८६॥
अङ्‌गदस्य वचः श्रुत्वा प्रचुक्रोध नरान्तकः ।
संदश्य दशनैरोष्ठं विनिश्वस्य भुजंगवत् ।
अभिगम्याङ्‌गदं क्रुद्धो वालिपुत्रं नरान्तकः ॥ ८७ ॥
अंगदाचे हे बोलणे ऐकून नरांतकाला फार क्रोध आला. तो कुपित होऊन दातांनी ओठ चावून सर्पाप्रमाणे दीर्घ श्वास घेऊन, वालिपुत्र अंगदाच्या जवळ येऊन उभा राहिला. ॥८७॥
प्रासं समाविध्य तदाऽङ्‌गदाय
समुज्ज्वलन्तं सहसोत्ससर्ज ।
स वालिपुत्रोरसि वज्रकल्पे
बभूव भग्नो न्यपतच्च भूमौ ॥ ८८ ॥
त्याने त्या चमकणार्‍या भाल्याला गोल फिरवून एकाएकी त्याला अंगदावर फेकले. वालिपुत्र अंगदाचे वक्षःस्थळ वज्रासमान कठोर होते. नरांतकाचा भाला त्याच्यावर आदळून तुटून गेला आणि जमीनीवर जाऊन पडला. ॥८८॥
तं प्रासमालोक्य तदा विभग्नं
सुपर्णकृत्तोरगभोगकल्पम् ।
तलं समुद्यम्य स वालिपुत्रः
तुरङ्‌गस्याभिजघान मूर्ध्नि ॥ ८९ ॥
तो भाला गरूडाच्या द्वारा खण्डित केल्या गेलेल्या सर्पाच्या शरीराप्रमाणे तुकडे तुकडे होऊन पडलेला पाहून वालिपुत्र अंगदाने हात उंच करून नरांतकाच्या घोड्याच्या मस्तकावर फार जोराने थप्पड मारली. ॥८९॥
निमग्नपादः स्फुटिताक्षितारो
निष्क्रान्तजिह्वोऽचलसंनिकाशः ।
स तस्य वाजी निपपात भूमौ
तलप्रहारेण विकीर्णमूर्धा ॥ ९० ॥
त्या प्रहाराने घोड्याचे डोके फुटून गेले, पाय खालच्या बाजूस खचले, डोळे फुटून गेले आणि जीभ बाहेर निघून आली. तो पर्वताकार अश्व प्राणहीन होऊन पृथ्वीवर कोसळला. ॥९०॥
नरान्तकः क्रोधवशं जगाम
हतं तुरंगं पतितं समीक्ष्य ।
स मुष्टिमुद्यम्य महाप्रभावो
जघान शीर्षे युधि वालिपुत्रम् ॥ ९१ ॥
घोडा मरून पृथ्वीवर पडलेला पाहून नरांतकाच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. त्या महाप्रभावशाली निशाचराने युद्धस्थळी मूठ उगारून वालिकुमाराच्या मस्तकावर मारली. ॥९१॥
अथाङ्‌गदो मुष्टिविशीर्णमूर्धा
सुस्राव तीव्रं रुधिरं भृशोष्णम् ।
मुहुर्विजज्वाल मुमोह चापि
संज्ञां समासाद्य विसिस्मिये च ॥ ९२ ॥
मूठीच्या माराने अंगदाचे शिर फुटले. त्यांतून वेगपूर्वक गरम गरम रक्ताची धार वाहू लागली. त्यांच्या मस्तकात खूप दाह झाला. ते मूर्च्छित झाले आणि थोड्या वेळाने जेव्हा शुद्धिवर आले तेव्हा त्या राक्षसाची शक्ति पाहून आश्चर्यचकित झाले. ॥९२॥
अथाङ्‌गदो मृत्युसमानवेगं
संवर्त्य मुष्टिं गिरिशृंगकल्पम् ।
निपातयामास तदा महात्मा
नरान्तकस्योरसि वालिपुत्रः ॥ ९३ ॥
नंतर अंगदांनी पर्वत शिखरासमान आपली मूठ आवळली जिचा वेग मृत्युसमान होता आणि नंतर त्या महात्मा वालिकुमाराने तिने नरांतकाच्या छातीवर प्रहार केला. ॥९३॥
स मुष्टिनिर्भिन्ननिमग्नवक्षा
ज्वालावमन् शोणितदिग्धगात्रः ।
नरान्तको भूमितले पपात
यथाचलो वज्रनिपातभग्नः ॥ ९४ ॥
त्या मुष्टिच्या आघाताने नरांतकाचे हृदय विदीर्ण झाले. तो मुखातून आगीच्या जणु ज्वाळा ओकू लागला. त्याचे सारे अंग रक्तबंबाळ झाले आणि वज्र मारलेल्या पर्वताप्रमाणे तो पृथ्वीवर कोसळला. ॥९४॥
अथान्तरिक्षे त्रिदशोत्तमानां
वनौकसां चैव महाप्रणादः ।
बभूव तस्मिन् निहतेऽग्र्यवीर्ये
नरान्तके वालिसुतेन संख्ये ॥ ९५ ॥
वालिकुमार द्वारा युद्धस्थळी उत्तम पराक्रमी नरांतक मारला गेल्यावर त्यासमयी आकाशात देवतांनी आणि भूतलावर वानरांनी फार जोराने हर्षनाद केला. ॥९५॥
अथाङ्‌गदो राममनःप्रहर्षणं
सुदुष्करं तत् कृतवान् हि विक्रमम् ।
विसिष्मिये सोऽप्यथ भीमकर्मा
पुनश्च युद्धे स बभूव हर्षितः ॥ ९६ ॥
अंगदाने श्रीरामचंद्रांच्या मनाला अत्यंत हर्ष प्रदान करणारा हा परम दुष्कर पराक्रम केला होता. त्यायोगे श्रीरामचंद्रांनाही फार विस्मय वाटला. तत्पश्चात् भीषण कर्म करणारे अंगद पुन्हा युद्धासाठी हर्ष आणि उत्साहाने भरून गेले. ॥९६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे एकोनसप्ततितमः सर्गः ॥ ६९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकोणसत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥६९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP