श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ अष्टनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अङ्‌देन महापार्श्वस्य वधः -
अंगदाच्या द्वारा महापार्श्वाचा वध -
महोदरे तु निहते महापार्श्वो महाबलः ।
सुग्रीवेण समीक्ष्याथ क्रोधात् संरक्तलोचनः ॥ १ ॥
सुग्रीवाच्या द्वारे महोदर मारला गेल्यावर त्याच्याकडे पाहून महाबली महापार्श्वाचे नेत्र क्रोधाने लाल झाले. ॥१॥
अङ्‌गदस्य चमूं भीमां क्षोभयामास मार्गणैः ।
स वानराणां मुख्यानां उत्तमाङ्‌गानि राक्षसः ॥ २ ॥
त्याने आपल्या बाणांच्या द्वारा अंगदाच्या भयंकर सेनेत खळबळ उडवून दिली. तो राक्षस मुख्य मुख्य वानरांची मस्तके धडापासून कापून टाकून खाली पाडू लागला, जणु वायु देठापासून फळे खाली पाडत असावा. ॥२॥
पातयामास कायेभ्यः फलं वृन्तादिवानिलः ।
केषाञ्चिदिषुभिर्बाहून् चिच्छेदाथ स राक्षसः ॥ ३ ॥

वानराणां सुसंरब्धः पार्श्वं केषांचिदाक्षिपत् ।
क्रोधाने भरलेल्या महापार्श्वाने आपल्या बाणांनी कित्येकांचे बाहु कापून टाकले आणि कित्येक वानरांच्या बरगड्‍या मोडून टाकल्या. ॥ ३ १/२॥
तेऽर्दिता बाणवर्षेण महापार्श्वेन वानराः ॥ ४ ॥

विषादविमुखाः सर्वे बभूवुर्गतचेतसः ।
महापार्श्वाच्या बाणांच्या वृष्टिने पीडित होऊन बरेचसे वानर युद्धापासून विमुख झाले. सर्वांची चेतना नष्ट होऊ लागली. ॥४ १/२॥
निरीक्ष्य बलमुद्विग्नं अङ्‌गदो राक्षसार्दितम् ॥ ५ ॥

वेगं चक्रे महावेगः समुद्र इव पर्वसु
त्या राक्षसाकडून पीडित वानरसेनेला उद्विग्न होतांना पाहून महान्‌ वेगशाली अंगदांनी पौर्णिमेच्या दिवशीच्या समुद्राप्रमाणे आपला भारी वेग प्रकट केला. ॥५ १/२॥
आयसं परिघं गृह्य सूर्यरश्मिसमप्रभम् ॥ ६ ॥

समरे वानरश्रेष्ठो महापार्श्वे न्यपातयत्
त्या वानरशिरोमणीने सूर्याच्या किरणांप्रमाणे चमकणारा एक लोखंडाचा परिघ उचलून महापार्श्वावर फेकून मारला. ॥६ १/२॥
स तु तेन प्रहारेण महापार्श्वो विचेतनः ॥ ७ ॥

ससूतः स्यन्दनात् तस्माद् विसंज्ञश्चापतद्‌भुवि
त्या प्रहाराने महापार्श्व बेशुद्ध झाला आणि मूर्च्छित होऊन सारथ्यासह रथांतून खाली पडला. ॥७ १/२॥
तस्यर्क्षराजतेजस्वी नीलाञ्जनचयोपमः ॥ ८ ॥

निष्पत्य सुमहावीर्यः स्वयूथान् मेघसन्निभात्
प्रगृह्य गिरिशृङ्‌गाभां क्रुद्धः स विपुलां शिलाम् ॥ ९ ॥

अश्वान् जघान तरसा बभञ्ज स्यन्दनं च तम्
त्याच समयी काळ्या कोळशाच्या ढीगासमान कृष्ण वर्णाचे महान्‌ पराक्रमी आणि तेजस्वी ऋक्षराज जाम्बवानांनी मेघांच्या समुदायासदृश्य आपल्या यूथातून बाहेर पडून कुपित होऊन एक पर्वतशिखरासमान विशाल शिला हातात घेतली आणि तिच्या द्वारे त्या राक्षसाच्या घोड्‍यांना मारून टाकले आणि त्याच्या रथाचाही चुराडा करून टाकला. ॥८-९ १/२॥
मुहूर्ताल्लब्धसंज्ञस्तु महापार्श्वो महाबलः ॥ १० ॥

अङ्‌गदं बहुभिर्बाणैः भूयस्तं प्रत्यविध्यत
जाम्बवन्तं त्रिभिर्बाणैः राजघान स्तनान्तरे ॥ ११ ॥
एका मुहूर्तानंतर भानावर आल्यावर महाबली महापार्श्वाने बर्‍याचशा बाणांच्या द्वारे पुन्हा अंगदाला घायाळ केले आणि जाम्बवानाच्या छातीमध्येही तीन बाण मारले. ॥१०-११॥
ऋक्षराजं गवाक्षं च जघान बहुभिः शरैः
जाम्बवन्तं गवाक्षं च स दृष्ट्‍वा शरपीडितौ ॥ १२ ॥

जग्राह परिघं घोरं अङ्‌गदः क्रोधमूर्च्छितः
इतकेच नाही तर त्याने ऋक्षराज गवाक्षालाही बर्‍याचशा बाणांच्या द्वारा क्षत-विक्षत करून टाकले. गवाक्ष आणि जाम्बवानांना बाणांनी पीडित झालेले पाहून अंगदांच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. त्यांनी एक भयंकर परिघ हातात घेतला. ॥१२ १/२॥
तस्याङ्‌गदः सरोषाक्षो राक्षसस्य तमायसम् ॥ १३ ॥

दूरस्थितस्य परिघं रविरश्मिसमप्रभम्
द्वाभ्यां भुजाभ्यां सङ्‌गृह्य भ्रामयित्वा च वेगवत् ॥ १४ ॥

महापार्श्वस्य चिक्षेप वधार्थं वालिनः सुतः
त्यांचा तो परिघ सूर्याच्या किरणांप्रमाणे आपली प्रभा पसरत राहिला होता. वालिपुत्र अंगदाचे नेत्र क्रोधाने लाल झाले होते. त्यांनी त्या लोहमय परिघाला दोन्ही हातांनी पकडून फिरवले आणि दूर उभा असलेल्या महापार्श्वाच्या वधासाठी वेगपूर्वक फेकले. ॥१३-१४ १/२॥
स तु क्षिप्तो बलवता परिघस्तस्य रक्षसः ॥ १५ ॥

धनुश्च सशरं हस्तात् शिरस्त्राणं च पातयत्
बलवान्‌ वीर अंगदाने फेकलेल्या त्या परिघाने राक्षस महापार्श्वाच्या हातातून बाणासहित धनुष्य आणि मस्तकावरील शिरस्त्राण खाली पडले. ॥१५ १/२॥
तं समासाद्य वेगेन वालिपुत्रः प्रतापवान् ॥ १६ ॥

तलेनाभ्यहनत् क्रुद्धः कर्णमूले सकुण्डले
नंतर प्रतापी वालिपुत्र अंगद अत्यंत वेगाने त्याच्याजवळ जाऊन पोहोचले आणि कुपित होऊन त्यांनी त्याच्या कुण्डलयुक्त कानाजवळ गालावर एक थप्पड मारली. ॥१६ १/२॥
स तु क्रुद्धो महावेगो महापार्श्वो महाद्युतिः ॥ १७ ॥

करेणैकेन जग्राह सुमहान्तं परश्वधम्
तेव्हा महान्‌ वेगशाली महातेजस्वी महापार्श्वाने कुपित होऊन एका हातात फार मोठा परशु घेतला. ॥१७ १/२॥
तं तैलधौतं विमलं शैलसारमयं दृढम् ॥ १८ ॥

राक्षसः परमक्रुद्धो वालिपुत्रे न्यपातयत्
त्या परशुला तेलात बुडवून साफ केले गेले होते आणि तो चांगल्या लोखंडाचा बनविलेला आणि सुदृढ होता. राक्षस महापार्श्वाने अत्यंत कुपित होऊन तो परशु वालिपुत्र अंगदावर फेकून मारला. ॥१८ १/२॥
तेन वामांसफलके भृशं प्रत्यवपादितम् ॥ १९ ॥

अङ्‌गदो मोक्षयामास सरोषः स परश्वधम्
त्याने अंगदाच्या डाव्या खांद्यावर अत्यंत वेगाने त्या परशुचा प्रहार केला होता, परंतु रोषाने भरलेल्या अंगदाने तोंड चुकवून स्वतःला वाचवले आणि त्या परशुला व्यर्थ करून टाकले. ॥१९ १/२॥
स वीरो वज्रसङ्‌काशं अङ्‌गदो मुष्टिमात्मनः ॥ २० ॥

संवर्तयत् सुसङ्‌क्रुद्धः पितुस्तुल्यपराक्रमः
तत्पश्चात्‌ अत्यंत क्रोधाविष्ट झालेल्या वीर अंगदाने, जो आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होता, वज्रासमान मूठ आवळली. ॥२० १/२॥
राक्षसस्य स्तनाभ्याशे मर्मज्ञो हृदयं प्रति ॥ २१ ॥

इन्द्राशनिसमस्पर्शं स मुष्टिं विन्यपातयत्
ते हृदयाच्या मर्मस्थानाचे जाणकार होते म्हणून त्यांनी त्या राक्षसाच्या स्तनांच्या निकट छातीवर मोठ्‍या वेगाने मूठीने गुद्दा मारला, ज्याचा स्पर्श इंद्राच्या वज्राच्या समान असह्य होता. ॥२१ १/२॥
तेन तस्य निपातेन राक्षसस्य महामृधे ॥ २२ ॥

पफाल हृदयं चास्य स पपात हतो भुवि
त्यांचा तो गुद्दा लागताच त्या महासमरात राक्षस महापार्श्वाचे हृदय फाटून गेले आणि तो मरून पृथ्वीवर कोसळला. ॥२२ १/२॥
तस्मिन् विनिहते भूमौ तत् सैन्यं सम्प्रचुक्षुभे ॥ २३ ॥

अभवच्च महान् क्रोधः समरे रावणस्य तु
तो मरून पृथ्वीवर पडल्यावर त्याची सेना विक्षुब्ध झाली तसेच समरभूमीमध्ये रावणालाही महान्‌ क्रोध आला. ॥२३ १/२॥
वानराणां प्रहृष्टानां सिंहनादः सुपुष्कलः ॥ २४ ॥

स्फोटयन्निव शब्देन लङ्‌कां साट्टालगोपुराम्
महेन्द्रेणेव देवानां नादः समभवन्महान् ॥ २५ ॥
त्यासमयी हर्षाने भरलेल्या वानरांचा महान्‌ सिंहनाद होऊ लागला. तो अट्‍टालिका, तसेच गोपुरांसहित लंकापुरीला भेदून टाकत असल्यासारखा प्रतीत झाला. अंगदासहित वानरांचा तो महानाद इंद्रसहित देवतांच्या गंभीर घोषासारखा भासत होता. ॥२४-२५॥
अथेन्द्रशत्रुस्त्रिदिवालयानां
वनौकसां चैव महाप्रणादम् ।
श्रुत्वा सरोषं युधि राक्षसेन्द्रः
पुनश्च युद्धाभिमुखोऽवतस्थे ॥ २६ ॥
युद्धस्थळी देवता आणि वानरांची ती फार मोठी गर्जना ऐकून इंद्रदोही राक्षसराज रावण पुन्हा रोषपूर्वक युद्धासाठी उत्सुक होऊन तेथे येऊन उभा राहिला. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अष्टनवतितमः सर्गः ॥ ९८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा अठ्ठ्‍याणवावा सर्ग पूरा झाला. ॥९८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP