श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। अष्टचत्वारिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राज्ञा सत्कृतस्यैकरात्रौ विशालायां कृतवासस्य मुनिसहितस्य श्रीरामस्य मिथिलायामुपस्थानं तत्रत्यशून्याश्रमविषये श्रीरामस्य जिज्ञासामधिगम्य विश्वामित्रेण गौतमपत्‍न्या अहल्यायाः शापप्राप्तेर्वृत्तान्तस्य वर्णनम् - राजा सुमतिकडून सत्कृत होऊन एक रात्र विशालामध्ये राहून मुनिंसहित श्रीरामाचे मिथिलापुरीत पोहोचणे आणि तेथे शून्य आश्रमाविषयी विचारल्यावर विश्वामित्रांनी त्यांना अहल्येला शाप प्राप्त झाल्याची कथा ऐकविणे -
पृष्ट्‍वा तु कुशलं तत्र परस्परसमागमे ।
कथान्ते सुमतिर्वाक्यं व्याजहार महामुनिम् ॥ १ ॥
तेथे परस्पर समागमाच्या वेळी एक दुसर्‍याचे कुशल मंगल विचारल्यावर संभाषणाच्या शेवटी राजा सुमतिने महामुनि विश्वामित्रांना म्हटले - ॥ १ ॥
इमौ कुमारौ भद्रं ते देवतुल्यपराक्रमौ ।
गजसिंहगती वीरौ शार्दूलवृषभोपमौ ॥ २ ॥
'ब्रह्मन् ! आपले कल्याण होवो ! हे दोन्ही कुमार देवतातुल्य पराक्रमी वाटत आहेत. यांची चाल-चलवणूक हत्ती अथवा सिंहाच्या गतिसमान आहे. हे दोन्ही वीर सिंह आणि वृषभाप्रमाणे प्रतीत होत आहेत. ॥ २ ॥
पद्मपत्रविशालाक्षौ खड्गतूणधनुर्धरौ ।
अश्विनाविव रूपेण समुपस्थितयौवनौ ॥ ३ ॥
यांचे मोठेमोठे डोळे विकसित कमलदलासमान शोभून दिसत आहेत. हे दोघेही तलवार, तरकस आणि धनुष्य धारण केलेले आहेत. आपल्या सुंदर रूपाने हे दोघे अश्विनीकुमारांना लज्जित करीत आहेत आणि युवावस्थेत पदार्पण केलेले दिसत आहेत. ॥ ३ ॥
यदृच्छयैव गां प्राप्तौ देवलोकादिवामरौ ।
कथं पद्‍भ्यामिह प्राप्तौ किमर्थं कस्य वा मुने ॥ ४ ॥
त्यांना पाहून असे वाटत आहे की जणु दोन देवकुमार दैवेच्छावश देवलोकातून पृथ्वीवर आलेले आहेत. ॥ ४ ॥
भूषयन्ताविमं देशं चन्द्रसूर्याविवाम्बरम् ।
परस्परेण सदृशौ प्रमाणेङ्‌गितचेष्टितैः ॥ ५ ॥
ज्याप्रमाणे चंद्रमा आणि सूर्य आकाशाची शोभा वाढवित असतात, त्याप्रमाणे हे दोन्ही कुमार या देशाला सुशोभित करीत आहेत. शरीराची उंची, मनोभावसूचक संकेत तसेच बोलणे चालणे यात हे दोघे एक दुसर्‍यासारखेच आहेत. ॥ ५ ॥
किमर्थं च नरश्रेष्ठौ सम्प्राप्तौ दुर्गमे पथि ।
वरायुधधरौ वीरौ श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ॥ ६ ॥
श्रेष्ठ आयुधे धारण करणारे हे दोन्ही नरश्रेष्ठ वीर या दुर्गम मार्गात कशासाठी आले आहेत ? हे मी यथार्थपणे जाणू इच्छितो. ॥ ६ ॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा यथावृत्तं न्यवेदयत् ।
सिद्धाश्रमनिवासं च राक्षसानां वधं यथा ।
विश्वामित्रवचः श्रुत्वा राजा परमविस्मितः ॥ ७ ॥
सुमतिचे हे वचन ऐकून विश्वामित्रांनी त्यांना सर्व वृत्तांत यथार्थरूपाने निवेदन केला. सिद्धाश्रमात निवास आणि राक्षसांच्या वधाचा प्रसंगही यथावत् ऐकविला. विश्वामित्रांचे बोलणे ऐकून सुमतिला फारच विस्मय वाटला. ॥ ७ ॥
अतिथी परमं प्राप्तौ पुत्रौ दशरथस्य तौ ।
पूजयामास विधिवत् सत्कारार्हौ महाबलौ ॥ ८ ॥
त्यांनी परम आदरणीय रूपात आलेल्या त्या दोन्ही महाबली दशरथ पुत्रांचा विधिपूर्वक अतिथि सत्कार केला ॥ ८ ॥
ततः परमसत्कारं सुमतेः प्राप्य राघवौ ।
उष्य तत्र निशामेकां जग्मतुर्मिथिलां ततः ॥ ९ ॥
सुमतिकडून उत्तम आदर सत्कार प्राप्त करून रघुवंशीकुमार तेथे एक रात्र राहिले आणि सकाळी उठून मिथिलेकडे चालू लागले. ॥ ९ ॥
तां दृष्ट्‍वा मुनयः सर्वे जनकस्य पुरीं शुभाम् ।
साधु साध्विति शंसन्तो मिथिलां समपूजयन् ॥ १० ॥
मिथिलेस पोहोचून जनकपुरीची सुंदर शोभा पाहून सर्व महर्षि 'साधु साधु' म्हणत तिची भूरि भूरि प्रशंसा करू लागले. ॥ १० ॥
मिथिलोपवने तत्र आश्रमं दृश्य राघवः ।
पुराणं निर्जनं रम्यं पप्रच्छ मुनिपुङ्‍गवम् ॥ ११ ॥
मिथिलेच्या उपवनात एक प्राचिन आश्रम होता, जो अत्यंत रमणीय असूनही निर्जन भासत होता. तो पाहून श्रीरामचंद्रांनी मुनिवर विश्वामित्रांना विचारले - ॥ ११ ॥
इदमाश्रमसङ्‍काशं किं न्विदं मुनिवर्जितम् ।
श्रोतुमिच्छामि भगवन् कस्यायं पूर्व आश्रमः ॥ १२ ॥
'भगवन् ! हे कसे स्थान आहे की जे दिसण्यात तर आश्रमासारखे आहे, परंतु एकही मुनि येथे दृष्टिगोचर होत नाही. मी हा आश्रम पहिल्याने कुणाचा होता हे ऐकण्याची इच्छा करतो. ॥ १२ ॥
तच्छ्रुत्वा राघवेणोक्तं वाक्यं वाक्यविशारदः ।
प्रत्युवाच महातेजा विश्वामित्रो महामुनिः ॥ १३ ॥
श्रीरामचंद्रांचा प्रश्न ऐकून प्रवचनकुशल महातेजस्वी महामुनि विश्वामित्रांनी या प्रमाणे उत्तर दिले - ॥ १३ ॥
हन्त ते कथयिष्यामि शृणु तत्त्वेन राघव ।
यस्यैतदाश्रमपदं शप्तं कोपान्महात्मना ॥ १४ ॥
'राघवा ! पूर्वकाली हा ज्या महात्म्याचा आश्रम होता आणि ज्यांनी क्रोधपूर्वक याला शाप दिलेला आहे, त्यांचा आणि त्यांच्या या आश्रमाचा वृतांत मी तुला सांगतो. यथार्थपणे ऐक. ॥ १४ ॥
गौतमस्य नरश्रेष्ठ पूर्वमासीन्महात्मनः ।
आश्रमो दिव्यसंकाशः सुरैरपि सुपूजितः ॥ १५ ॥
नरश्रेष्ठ ! पूर्व कालात हे स्थान म्हणजे महात्मा गौतमांचा आश्रम होता. त्यावेळी हा आश्रम फारच दिव्य भासत असे. देवतासुद्धा याची पूजा आणि प्रशंसा करीत असत. ॥ १५ ॥
स चात्र तप आतिष्ठदहल्यासहितः पुरा ।
वर्षपूगान्यनेकानि राजपुत्र महायशः ॥ १६ ॥
'महायशस्वी राजपुत्रा ! पूर्वकाली महर्षि गौतम आपली पत्‍नी अहल्या हिच्या बरोबर येथे राहून तपस्या करीत होते. त्यांनी बराच काळ येथे तप केले होते. ॥ १६ ॥
तस्यान्तरं विदित्वा तु सहस्राक्षः शचीपतिः ।
मुनिवेषधरो भूत्वा अहल्यामिदमब्रवीत् ॥ १७ ॥
एक दिवस जेव्हां महर्षि गौतम आश्रमात नव्हते, तेव्हां उपयुक्त अवसर समजून शचिपति (सहस्राक्ष इंद्र) गौतम मुनिंचा वेष धारण करून तेथे आले आणि अहल्येला या प्रकारे म्हणाले - ॥ १७ ॥
ऋतुकालं प्रतीक्षन्ते नार्थिनः सुसमाहिते ।
सङ्‍गमं त्वहमिच्छामि त्वया सह सुमध्यमे ॥ १८ ॥
'सदा सावधान राहणार्‍या सुंदरी ! रतिची इच्छा ठेवणारे प्रार्थी पुरुष ऋतुकालाची प्रतीक्षा करीत नाहीत. सुंदर कटिप्रदेश असणार्‍या सुंदरी ! मी तुझ्याशी समागम करू इच्छितो. ॥ १८ ॥
मुनिवेषं सहस्राक्षं विज्ञाय रघुनन्दन ।
मतिं चकार दुर्मेधा देवराजकुतूहलात् ॥ १९ ॥
'रघुनन्दना ! महर्षि गौतमांचा वेष धारण करून आलेल्या इंद्राला ओळखूनही त्या दुर्बुद्धि नारीने त्यांच्याबरोबर समागमाचा निश्चय करून त्यांचा प्रस्ताव स्विकारला. ॥ १९ ॥
अथाब्रवीत् सुरश्रेष्ठं कृतार्थेनान्तरात्मना ।
कृतार्थास्मि सुरश्रेष्ठ गच्छ शीघ्रमितः प्रभो ॥ २० ॥
रतिक्रिडेनंतर तिने देवराज इंद्रास संतुष्टचित्त होऊन म्हटले - "सुरश्रेष्ठ ! मी आपल्या समागमाने कृतार्थ झाले आहे. प्रभो ! आता आपण शीघ्र येथून निघून जावे. देवेश्वर ! महर्षि गौतमांच्या कोपापासून आपण आपले आणि माझे सर्व प्रकारे रक्षण करावे." ॥ २० ॥
आत्मानं मां च देवेश सर्वथा रक्ष गौतमात् ।
इन्द्रस्तु प्रहसन् वाक्यमहल्यामिदमब्रवीत् ॥ २१ ॥

सुश्रोणि परितुष्टोऽस्मि गमिष्यामि यथागतम् ।
तेव्हां इंद्राने हसत हसत अहल्येस म्हटले - "सुंदरी ! मीही संतुष्टचित्त झालो आहे. आता जसा आलो होतो तसाच परत निघून जाईन. ॥ २१ १/२ ॥
एवं सङ्‍गम्य तु तदा निश्चक्रामोटजात् ततः ॥ २२ ॥
'श्रीरामा ! अशा प्रकारे अहल्येशी समागम करून इंद्र जेव्हां कुटीतून बाहेर निघाले तेव्हां गौतमांच्या येण्याच्या आशंकेने मोठ्या उतावळेपणाने वेगपूर्वक पळून जाण्याचा प्रयत्‍न करू लागले. ॥ २२ ॥
स सम्भ्रमात् त्वरन् राम शङ्‌कितो गौतमं प्रति ।
गौतमं स ददर्शाथ प्रविशन्तं महामुनिम् ॥ २३ ॥

देवदानवदुर्धर्षं तपोबलसमन्वितम् ।
तीर्थोदकपरिक्लिन्नं दीप्यमानं इवानलम् ॥ २४ ॥

गृहीतसमिधं तत्र सकुशं मुनिपुङ्‍गवम् ।
'इतक्यातच त्यांनी पाहिले की देवता आणि दानवांनाही दुर्धर्ष, तपोबल संपन्न महामुनि गौतम हातात समिधा घेऊन आश्रमात प्रवेश करीत आहेत. त्यांचे शरीर तीर्थाच्या जलाने भिजलेले होते आणि ते प्रदीप्त अग्निप्रमाणे तेजस्वी दिसत होते. ॥ २३-२४ १/२ ॥
दृष्ट्‍वा सुरपतिस्त्रस्तो विषण्णवदनोऽभवत् ॥ २५ ॥

अथ दृष्ट्‍वा सहस्राक्षं मुनिवेषधरं मुनिः ।
दुर्वृत्तं वृत्तसम्पन्नो रोषाद् वचनमब्रवीत् ॥ २६ ॥
त्यांच्यावर दृष्टि पडताच देवराज इंद्रांचा भयाने थरकांप उडाला. त्यांच्या मुखावर विषाद पसरला. दुराचारी इंद्राने मुनिंचा वेष धारण केलेले पाहून सदाचार संपन्न मुनिवर गौतमांनी रोषाने म्हटले - ॥ २५-२६ ॥
मम रूपं समास्थाय कृतवानसि दुर्मते ।
अकर्तव्यमिदं यस्माद् विफलस्त्वं भविष्यसि ॥ २७ ॥
'दुर्मते ! तू माझे रूप धारण करून हे न करण्यासारखे पापकर्म केले आहेस म्हणून तू विफल (अण्डकोष रहित) होऊन जाशील." ॥ २७ ॥
गौतमेनैवमुक्तस्य सरोषेण महात्मना ।
पेततुर्वृषणौ भूमौ सहस्राक्षस्य तत्क्षणात् ॥ २८ ॥
रोषाने भरलेल्या महात्मा गौतमांनी हे शब्द उच्चारतांच सहस्राक्ष इंद्राचे दोन्ही अण्डकोष त्याक्षणीच पृथ्वीवर गळून पडले. ॥ २८ ॥
तथा शप्त्वा च वै शक्रं भार्यामपि च शप्तवान् ।
इह वर्षसहस्राणि बहूनि निवसिष्यसि ॥ २९ ॥

वातभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी ।
अदृश्या सर्वभूतानामाश्रमेऽस्मिन् वसिष्यसि ॥ ३० ॥

यदा त्वेतद् वनं घोरं रामो दशरथात्मजः ।
आगमिष्यति दुर्धर्षस्तदा पूता भविष्यसि ॥ ३१ ॥

तस्यातिथ्येन दुर्वृत्ते लोभमोहविवर्जिता ।
मत्सकाशं मुदा युक्ता स्वं वपुर्धारयिष्यसि ॥ ३२ ॥

इंद्राला याप्रकारे शाप देऊन गौतमांनी आपल्या पत्‍नीलाही शाप दिला - "दुराचारिणी ! तूही येथे कित्येक हजार वर्षेपर्यंत केवळ वायु भक्षण करीत उपवास करून कष्ट सहन करीत भस्म होऊन पडून रहशील. समस्त प्राण्यांपासून अदृष्य राहून या आश्रमात निवास करशील. जेव्हां दुर्धर्ष दशरथनन्दन श्रीराम या घोर वनात पदार्पण करतील त्यावेळी तू पवित्र होशील. त्यांचे आतिथ्य सत्कार करण्याने तुझे लोभ-मोह आदि दोष दूर होतील आणि तू प्रसन्नतापूर्वक माझ्यापाशी पोहोंचून आपले पूर्व शरीर धारण करशील. " ॥ २९-३२ ॥
एवमुक्त्वा महातेजा गौतमो दुष्टचारिणीम् ।
इममाश्रममुत्सृज्य सिद्धचारणसेविते ।
हिमवच्छिखरे रम्ये तपस्तेपे महातपाः ॥ ३३ ॥
आपल्या दुराचारिणी पत्‍नीला असे म्हणून महातेजस्वी, महातपस्वी गौतम ऋषि आश्रमातून निघून गेले आणि जेथे सिद्ध व चारण सदा तपाचरणात रत असतात अशा हिमालयाच्या रमणीय शिखरस्थानी राहून परत तपस्या करू लागले. ॥ ३३ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे अष्टचत्वारिंशः सर्गः ॥ ४८ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा अठ्ठेचाळीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४८ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP