[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
।। त्रिपञ्चाशः सर्गः।।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण कैकेयीतः कौसल्याप्रभृतीमनिष्टस्याशङ्‌कां प्रतिपाद्य लक्ष्मणस्यायोध्यायां निवर्तनाय प्रयत्‍नकरणं श्रीरामं विना स्वीयं जीवनमसम्भवमुक्त्वा लक्ष्मणेन तत्र गमनस्यानङ्‌गी करणं ततः श्रीरामेण तस्मै वनवासायानुज्ञाप्रदानम् - श्रीरामांनी राजाला उपालंभ देत कैकेयी कडून कौसल्या आदिंच्या अनिष्टांची आशंका दाखवून लक्ष्मणांनी अयोध्येस परत जावे यासाठी प्रयत्‍न करणे, लक्ष्मणांनी श्रीरामाशिवाय आपले जीवन असंभव असे सांगून तेथे जाण्यास नकार देणे, नंतर श्रीरामांनी त्यांना वनवासाची अनुमती देणे -
स तं वृक्षं समासाद्य संध्यामन्वास्य पश्चिमाम् ।
रामो रमयतां श्रेष्ठ इति होवाच लक्ष्मणम् ॥ १ ॥
त्या वृक्षतळी पोहोचल्यावर आनंद प्रदान करणारांमध्ये श्रेष्ठ श्रीरामांनी सायंकाळची संध्योपासना करून लक्ष्मणास या प्रमाणे म्हटले- ॥१॥
अद्येयं प्रथमा रात्रिर्याता जनपदाद् बहिः ।
या सुमन्त्रेण रहिता तां नोत्कण्ठितुमर्हसि ॥ २ ॥
’सुमित्रानंदन ! आज आपण आपल्या जनपदातून बाहेर पडल्यावर ही पहिली रात्र प्राप्त झाली आहे, जिच्यात सुमंत्रही आपल्या बरोबर नाहीत. ही रात्र प्राप्त झाली असता तुम्ही नगरातील सुख-सुविधां (सोयी) करता उत्कंठित होता कामा नये. ॥२॥
जागर्तव्यमतन्द्रिभ्यामद्यप्रभृति रात्रिषु ।
योगक्षेमौ हि सीताया वर्तेते लक्ष्मणावयोः ॥ ३ ॥
’लक्ष्मणा ! आज पासून आपणा दोघा भावांना आळस सोडून रात्री जागत राहावे लागेल, कारण सीतेचा योगक्षेम आपणा दोघांच्या अधीन आहे. ॥३॥
रात्रिं कथञ्चिदेवेमां सौमित्रे वर्तयामहे ।
उपावर्तामहे भूमावास्तीर्य स्वयमार्जितैः ॥ ४ ॥
’सौमित्र ! ही रात्र आपण कशी तरी घालवू आणि स्वतः संग्रह करून आणलेल्या गवताची आणि पानांची शय्या बनवून तिला जमिनीवर पसरून कसे तरी त्यावर झोपून जाऊ.’ ॥४॥
स तु संविश्य मेदिन्यां महार्हशयनोचितः ।
इमाः सौमित्रये रामो व्याजहार कथाः शुभाः ॥ ५ ॥
जे बहुमूल्य शय्येवर झोपण्यास योग्य होते ते श्रीराम जमिनीवरच बसून सौमित्राला या शुभ गोष्टी सांगू लागले-(**) ॥५॥
[** श्लोक ६ पासून श्लोक २६ पर्यंत श्रीरामचद्रांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या लक्ष्मणांची परीक्षा घेण्याकरिता आणि त्यांना अयोध्येस परत धाडण्यासाठी सांगितलेल्या आहेत, वास्तविक त्यांची अशी मान्यता नव्हती. हीच गोष्ट येथे सर्व (व्याख्याकारांनी) टिकाकारांनी स्वीकार केली आहे.]
ध्रुवमद्य महाराजो दुःखं स्वपिति लक्ष्मण ।
कृतकामा तु कैकेयी तुष्टा भवितुमर्हति ॥ ६ ॥
’लक्ष्मणा ! आज महाराज (दशरथ) निश्चितच अत्यंत दुःखाने झोपलेले असतील, परंतु कैकेयी सफल मनोरथ झाल्याने अत्यंत संतुष्ट होईल. ॥६॥
सा हि देवी महाराजं कैकेयी राज्यकारणात् ।
अपि न च्यावयेत् प्राणान् दृष्ट्‍वा भरतमागतम् ॥ ७ ॥
’कधी असे न घडो की राणी कैकेयी भरताला आलेला पाहून राज्यासाठी महाराजांनाही प्राणांपासून विमुक्त करेल. ॥७॥
अनाथश्च हि वृद्धश्च मया चैव विना कृतः ।
किं करिष्यति कामात्मा कैकेय्या वशमागतः ॥ ८ ॥
’महाराजांचा कुणी रक्षक नसल्यामुळे ते या वेळी अनाथ आहेत, वृद्ध आहेत आणि त्यांना माझ्या वियोगास सामोरे जावे लागत आहे. त्यांची कामना मनांतच राहिली आहे आणि ते कैकेयीच्या अधीन होऊन पडले आहेत, अशा स्थितित ते बिचारे आपल्या रक्षणासाठी काय करू शकणार ? ॥८॥
इदं व्यसनमालोक्य राज्ञश्च मतिविभ्रमम् ।
काम एवार्थधर्माभ्यां गरीयानिति मे मतिः ॥ ९ ॥
’आपल्यावर आलेल्या या संकटाला आणि राजांच्या मतिभ्रांतिला पाहून मला असे वाटत आहे की अर्थ आणि धर्मापेक्षा कामाचाच गौरव अधिक आहे की काय ? ॥९॥
को ह्यविद्वानपि पुमान् प्रमदायाः कृते त्यजेत् ।
छन्दानुवर्तिनं पुत्रं ततो मामिव लक्ष्मण ॥ १० ॥
’लक्ष्मणा ! पित्याने ज्या प्रकारे माझा त्याग केला आहे त्या प्रकारे अत्यंत अज्ञ असून असा कोणता पुरुष असेल की जो एका स्त्रीसाठी आपल्या आज्ञाधारक पुत्राचा परित्याग करेल ? ॥१०॥
सुखी बत सुभार्यश्च भरतः केकयीसुतः ।
मुदितान् कोसलानेको यो भोक्ष्यत्यधिराजवत् ॥ ११ ॥
’कैकेयी कुमार भरतच सुखी आणि सौभाग्यवती स्त्रीचा पति आहे, जो एकटाच हृष्ट-पुष्ट मनुष्यांनी भरलेल्या कोसलदेशाचे सम्राटाप्रमाणे पालन करील. ॥११॥
स हि राज्यस्य सर्वस्य सुखमेकं भविष्यति ।
ताते च वयसातीते मयि चारण्यमास्थिते ॥ १२ ॥
’पिता अत्यंत वृद्ध झालेले आहेत, आणि मी वनात निघून आलो आहे, अशा स्थितीत केवळ भरतच समस्त राज्याच्या श्रेष्ठ सुखाचा उपभोग घेईल. ॥१२॥
अर्थधर्मौ परित्यज्य यः काममनुवर्तते ।
एवमापद्यते क्षिप्रं राजा दशरथो यथा ॥ १३ ॥
’खरेच आहे की जो अर्थ आणि धर्माचा परित्याग करून केवळ कामाचे अनुसरण करतो, तो त्याचप्रमाणे लवकरच संकटात पडतो जसे या समयी दशरथ महाराज पडले आहेत. ॥१३॥
मन्ये दशरथान्ताय मम प्रव्राजनाय च ।
कैकेयी सौम्य सम्प्राप्ता राज्याय भरतस्य च ॥ १४ ॥
’सौम्य ! मी समजतो की महाराज दशरथांच्या प्राणांचा अंत करणे, मला देशातून घालवून देणे आणि भरताला राज्य देण्यास लावण्यासाठीच कैकेयी या राजभवनात आली होती. ॥१४॥
अपीदानीं न कैकेयी सौभाग्यमदमोहिता ।
कौसल्यां च सुमित्रां च सा प्रबाधेत मत्कृते ॥ १५ ॥
’या समयी सुद्धा सौभाग्याच्या मदाने मोहित झालेली कैकेयी माझ्यामुळे कौसल्या आणि सुमित्रा यांना कष्ट देऊ शकते. ॥१५॥
मातास्मत्कारणाद् देवी सुमित्रा दुःखमावसेत् ।
अयोध्यामित एव त्वं काले प्रविश लक्ष्मण ॥ १६ ॥
’आमच्यामुळेच तुझी माता सुमित्रादेवी हिला मोठ्या दुःखाने तेथे रहावे लागेल. म्हणून लक्ष्मणा ! तू येथूनच उद्या प्रातःकाळी अयोध्येस परत जावेस. ॥१६॥
अहमेको गमिष्यामि सीतया सह दण्डकान् ।
अनाथाया हि नाथस्त्वं कौसल्याया भविष्यसि ॥ १७ ॥
’मी एकटास सीतेसह दण्डक वनात जाईन. तू तेथे माझी असहाय माता कौसल्या हिचा सहायक होशील. ॥१७॥
क्षुद्रकर्मा हि कैकेयी द्वेषादन्यायमाचरेत् ।
परिदद्याद्धि धर्मज्ञ गरं ते मम मातरम् ॥ १८ ॥
’धर्मज्ञ लक्ष्मणा ! कैकेयीचे कर्म फार खोटे आहे. ती द्वेषवश अन्यायही करू शकते. तुझ्या आणि माझा मातेला ती विषही देऊ शकते. ॥१८॥
नूनं जात्यन्तरे कस्मिन् स्त्रियः पुत्रैर्वियोजिताः ।
जनन्या मम सौमित्रे तदद्यैतदुपस्थितम् ॥ १९ ॥
’तात सौमित्र ! निश्चितच पूर्वजन्मात माझ्या मातेने काही स्त्रियांची त्यांच्या पुत्रांपासून ताटातूट केली असली पाहिजे, त्याच पापाचे हे पुत्र वियोगरूपी फळ तिला प्राप्त झाले आहे. ॥१९॥
मया हि चिरपुष्टेन दुःखसंवर्धितेन च ।
विप्रयुज्यत कौसल्या फलकाले धिगस्तुमाम् ॥ २० ॥
’माझ्या मातेने चिरकाळापर्यत माझे पालन पोषण केले आणि स्वतः दुःख सोसून मला मोठे केले. आता जेव्हा पुत्राकडून प्राप्त होणारे सुखरूपी फळ भोगण्याचा अवसर आला तेव्हा मी स्वतःला माता कौसल्ये पासून विलग केले आहे, माझा धिक्कार आहे. ॥२०॥
मा स्म सीमम्तिनी काचिज्जनयेत् पुत्रमीदृशम् ।
सौमित्रे योऽहमम्बाया दद्मि शोकमनन्तकम् ॥ २१ ॥
’सौमित्रा ! कुणीही सौभाग्यवती स्त्रीने कधी अशा पुत्राला जन्म देऊ नये जसा की मी आहे, कारण मी माझ्या मातेला अनंत शोक देत आहे. ॥२१॥
मन्ये प्रीतिविशिष्टा सा मत्तो लक्ष्मण सारिका ।
यत्तस्याः श्रूयते वाक्यं शुक पादमरेर्दश ॥ २२ ॥
’लक्ष्मणा ! मी तर असे मानतो की माता कौसल्येच्या ठिकाणी माझ्या पेक्षाही अधिक प्रेम तिने पाळलेली सारिकाच करीत आहे कारण तिच्या मुखांतून मातेला नेहमी असे बोल ऐकू येतात की ’हे शुका ! तू शत्रूचे पाय तोडून खा !’ (अर्थात आपल्याला पाळणार्‍या माता कौसल्येच्या शत्रूंच्या पायांवर चोंच मार. ती पक्षिण असून मातेकडे इतके लक्ष (ध्यान) देते आणि मी तिचा पुत्र असून ही तिच्यासाठी काही करू शकत नाही.) ॥२२॥
शोचंत्याश्चाल्पभाग्याया न किञ्चिदुपकुर्वता ।
पुत्रेण किमपुत्राया मया कार्यमरिन्दम ॥ २३ ॥
’शत्रूमना ! जी माझ्यासाठी शोकमग्न रहात आहे, मंदभागिनी सारखी होत आहे आणि पुत्राचे काही फळ प्राप्त न झाल्याने निपुत्रिक असल्यासारखी झाली आहे, त्या माझ्या मातेला काहीही उपकार न करणार्‍या माझ्या सारख्या पुत्राशी काय प्रयोजन आहे ? ॥२३॥
अल्पभाग्या हि मे माता कौसल्या रहिता मया ।
शेते परमदुःखार्ता पतिता शोकसागरे ॥ २४ ॥
’माझा वियोग झाल्या कारणाने माता कौसल्या वास्तविक मंदभागिनी झाली आहे आणि शोकाच्या समुद्रात पडून अत्यंत दुःखाने आतुर होऊन त्यातच शयन करीत आहे. ॥२४॥
एको ह्यहमयोध्यां च पृथिवीं चापि लक्ष्मण ।
तरेयमिषुभिः क्रुद्धो ननु वीर्यमकारणम् ॥ २५ ॥
’लक्ष्मणा ! जर मी कुपित झालो तर आपल्या बाणांनी एकटाच अयोध्यापुरी तथा समस्त भूमण्डलास निष्कण्टक बनवून आपल्या अधिकारात आणीन, परंतु पारलौकिक हितसाधनात बल पराक्रम कारण ठरू शकत नाही. (म्हणून मी असे करत नाही.) ॥२५॥
अधर्मभयभीतश्च परलोकस्य चानघ ।
तेन लक्ष्मण नाद्याहमात्मानमभिषेचये ॥ २६ ॥
’निष्पाप लक्ष्मणा ! मी अधर्म आणि परलोकाच्या भयाने रहात आहे, म्हणून आज अयोध्येच्या राज्यावर आपला अभिषेक करून घेत नाही.’ ॥२६॥
एतदन्यच्च करुणं विलप्य विजने बहु ।
अश्रुपूर्णमुखो दीनो निशि तूष्णीमुपाविशत् ॥ २७ ॥
ही आणि या प्रमाणेच बर्‍याचशा गोष्टी सांगून श्रीरामांनी त्या निर्जन वनात करुणाजनक विलाप केला तत्पश्चात ते त्या रात्री गुपचूप बसून राहिले. त्यावेळी त्यांच्या मुखावरून आसवांची धार वहात होती आणि दीनता पसरली होती. ॥२७॥
वि्लापोपरतं रामं गतार्चिषमिवानलम् ।
समुद्रमिव निर्वेगमाश्वासयत लक्ष्मणः ॥ २८ ॥
विलापांतून निवृत्त झाल्यावर श्रीराम ज्वालारहित अग्नि आणि वेग शून्य समुद्राप्रमाणे शान्त प्रतीत होत होते. त्या समयी लक्ष्मणांनी त्यांना आश्वासन देत म्हटले- ॥२८॥
ध्रुवमद्य पुरी राम अयोध्याऽऽयुधिनां वर ।
निष्प्रभा त्वयि निष्क्रान्ते गतचन्द्रेव शर्वरी ॥ २९ ॥
’अस्त्रधारी लोकामध्ये श्रेष्ठ श्रीरामा ! आपण निघून आल्याने निश्चितच आज अयोध्यापुरी चंद्रहीन रात्रीसमान निस्तेज झाली आहे. ॥२९॥
नैतदौपयिकं राम यदिदं परितप्यसे ।
विषादयसि सीतां च मां चैव पुरुषर्षभ ॥ ३० ॥
’पुरुषोत्तम श्रीरामा ! आपण जे याप्रकारे संतप्त होत आहात हे आपल्याला उचित नाही. आपण असे करून सीतेला आणि मलाही विषादात टाकत आहात. ॥३०॥
न च सीता त्वया हीना न चाहमपि राघव ।
मुहूर्तमपि जीवावो जलान्मत्स्याविवोद्धृतौ ॥ ३१ ॥
’हे राघवा ! आपल्या शिवाय सीता आणि मी दोघेही मुहूर्तपर्यंतही जिवंत राहू शकत नाही. ज्याप्रमाणे मासा जलातून काढल्यावर जिवंत राहू शकत नाही अगदी त्याच प्रमाणे. ॥३१॥
न हि तातं न शत्रुघ्नं न सुमित्रां परंतप ।
द्रष्टुमिच्छेयमद्याहं स्वर्गं वापि त्वया विना ॥ ३२ ॥
’परंतप रघुवीरा ! आपल्याशिवाय आज मी पित्याला, बंधु शत्रुघ्नाला अथवा माता सुमित्रेलाही पाहू इच्छित नाही, अथवा स्वर्गलोकाची ही इच्छा करीत नाही.’ ॥३२॥
ततस्तत्र सनासीनौ नातिदूरे निरीक्ष्य ताम् ।
न्यग्रोधे सुकृतां शय्यां भेजाते धर्मवत्सलौ ॥ ३३ ॥
त्यानंतर तेथे बसलेल्या धर्मवत्सल सीता आणि रामांनी थोड्याच दूर अंतरावर वटवृक्षाच्या खाली लक्ष्मण द्वारा सुंदर रीतीने निर्मित झालेली शय्या पाहून तिचा आश्रय घेतला. (अर्थात ती दोघे तेथे जाऊन झोपी गेली). ॥३३॥
स लक्ष्मणस्योत्तमपुष्कलं वचो
     निशम्य चैवं वनवासमादरात् ।
समाः समस्ता विदधे परंतपः
     प्रपद्य धर्मं सुचिराय राघवः ॥ ३४ ॥
(शत्रूंना संताप देणार्‍या) परंतप राघवांनी याप्रकारे वनवासासंबंधी आदरपूर्वक सांगितल्या गेलेल्या लक्ष्मणांच्या अत्यंत उत्तम वचनांना ऐकून स्वतः ही दीर्घकालपर्यत वनवासरूप धर्म स्वीकारून संपूर्ण चौदा वर्षांपर्यत लक्ष्मणालाही आपल्या बरोबर वनात राहण्यासाठी अनुमति दिली. ॥३४॥
ततस्तु तस्मिन् विजने महाबलौ
     महावने राघववंशवर्धनौ ।
न तौ भयं सम्भ्रममभ्युपेयतु-
     र्यथैव सिंहौ गिरिसानुगोचरौ ॥ ३५ ॥
त्यानंतर त्या महान निर्जन वनात रघुवंशाची वृद्धि करणारे ते दोन्ही महाबलवान वीर, पर्वतशिखरावर विचरण करणार्‍या दोन सिंहाप्रमाणे कधीही भय आणि उद्वेगास प्राप्त झाले नाहीत. ॥३५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे त्रिपञ्चाशः सर्गः ॥ ५३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा त्रेपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP