॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय एकूणसाठावा ॥
शत्रुघ्नाचा लवणपुरीत प्रवेश

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


मागिलें प्रसंगीं शत्रुघ्नासी । अभिषेकोनि मधुपुरीसीं ।
पाठवितसे लवणासुरासी । वधावयाकरणें ॥१॥

शत्रुघ्नाला युद्धनीतीची शिकवण :

श्रीराम म्हणे शत्रुघ्ना । सवें घेईं असंख्य धना ।
धान्याचा संग्रह करोनि जाणा । मार्गक्रमण करावी ॥२॥
अश्व उत्तम अनेक । सर्वे घेईं असंख्य ।
रथ कुंजर सेना सेवक । नृत्यकारक तेही नेईं ॥३॥
जे मार्गीं चालतां श्रमलियासी । गीत विनोद करिती संतोषीं ।
आप्तवर्गसेवकांसीं । धन बहुत पैं द्यावें ॥४॥
मार्गीं वैरियासी कळों न द्यावें । हळू हळू सैन्य पाठवावें ।
आपण स्थिर होवोनि जावें । उत्तम मार्ग पाहोनी ॥५॥
एकाएकीं मधुपुरीस जाण । धाडी घालोनि आपण ।
करीं लवणासुराचें निर्दळण । अन्यहस्तें मरण त्यासी नाहीं ॥६॥
आपण जावोनि मधुपुरीसी । कळों न द्यावें त्या दैत्यासी ।
एकाएकीं पाचरीं संग्रामासी । सावध मानसीं होवोनी ॥७॥
जान्हवीचे तीरीं । सेना नेई बा झडकरी ।
एक मास मार्ग क्रमोनि वैरी । दुश्चित करोनि मारावा ॥८॥
वरदबळें तो अति लाठा । तया कळों नेदीं वीरसुभाटा ।
मग एकाएकीं मोक्षपुरीचा वाटां । रणरंगीं लावावा ॥९॥

शत्रुघ्न युद्धार्थ निघाला :

ऐकोनियां श्रीरामवचन । शत्रुघ्नें वंदोनि श्रीरामचरण ।
रघुनाथा करोनि प्रदक्षिणा । माता जाण वंदिल्या ॥१०॥
सद्गुरु जो कां वसिष्ठ । तयासि वंदोनियां स्पष्ट ।
लक्ष्मण आणि भरत ज्येष्ठ । तया नमन पैं केलें ॥११॥
श्रीरामाज्ञा वंदोनि शिरीं । शत्रुघ्नें तया अवसरीं ।
प्रयाण करोनि पुरीबाहेरी । सेनासहित उतरला ॥१२॥
तो शत्रुघ्न वीर कैसा । वैरितमनाशनीं सूर्य जैसा ।
पुढें चालिला धरोनि जयाशा । लवणासुरवधाची ॥१३॥
सन्नद्ध सेना दळभार । सवें सैनिकवीर अपार ।
तयां पुढें करोनि शत्रुघ्न वीर । मागें आपण चालिला ॥१४॥
सेना करोनि पुढारी । शत्रुघ्नें मार्ग क्रमोनि मासवरी ।
सवेंचि सत्वर दों दिवसांभीतरीं । मधुपुरीस येता झाला ॥१५॥

शत्रुघ्नाचे वाल्मीकाश्रमास आगमन :

तंव त्या मार्गी वाल्मिकाश्रम । तेथे आला ज्येष्ठ बंधु जयाचा राम ।
सवें सेवक आज्ञाधर परम । पराक्रम जयाचा ॥१६॥
ऐसा वीर दाशरथी । वाल्मीकाच्या आश्रमाप्रती ।
येवोनि ऋषींस विनंती । कर जोडून पैं केली ॥१७॥
अग ये स्वामी वाल्मीकमुनी । तुम्ही परोपकारी जनांलागोनीं ।
तुमच्या दर्शनें कृतार्थ प्राणी । जे यमनियमीं शिणताती ॥१८॥
तुमचें आश्रमीं आजि निशी । क्रमोनि उदयिक प्राचीदिशेसी ।
जाणें आहे कर्तव्यकार्यासी । म्हणोनि तुमच्या दर्शनें सुखी झालों ॥१९॥
ऐकोनि शत्रुघ्नाचें वचन । सुखावला ऋषि संतोषोन ।
प्रेमें दिधलें आलिंगन । उल्हासे मन ऋषीचें ॥२०॥
ऋषि म्हणे शत्रुघ्नासी । जे जे नृप सूर्यवंशी ।
तयांचिये वस्तीसी । या आश्रमासी निर्मिलें ॥२१॥
वाल्मीक म्हणे दशरथात्मजा । माझी अंगीकारिजे पूजा ।
मग अर्पिली फळें मूळें वोजा । श्रीरामराजसुखार्थ ॥२२॥
करोनि मुनीचें पूजन । मग बोलता झाला शत्रुघ्न ।
दोनी करकमळ जोडून । वाल्मीकासी ते काळीं ॥२३॥
पूर्वील यज्ञींच्या विभूती । वाल्मीकमुनि कोठे असती ।
ऐकोनि वाल्मीक शत्रुघ्नाप्रती । बोलता झाला ते समयीं ॥२४॥
अगा ये शत्रुघ्ना अवधारीं । पूर्वी येथें याग केला त्याची नवलपरी ।
सौदासनामें राजा पृथ्वीवरी । तयाचे पुत्राचे वीर्यजस हो नाम ॥२५॥
वीर्यजन सौदासाचा पुत्र । अति धार्मिक गुणवंत ।
प्रतापें परवीरा अंत । भुजबळें करी ऐसा ॥२६॥
सौदासपुत्र शौर्यसंपन्न । निघाला पारधीलागून ।
तंव दोघे राक्षस दारुण । मृग मारितां देखिले ॥२७॥
शार्दूळरुपें राक्षस घोर । देखोनि सौदासपुत्रा क्रोध थोर ।
त्यासीं युद्ध करोनि घोर । राक्षस एक मारिला ॥२८॥
मुष्टिघातेंकरोनि जाण । सौदासपुत्रें असुराचा घेतला प्राण ।
तयाचे साह्यालागोन । दुसरा राक्षस धांविन्नला ॥२९॥
तो राक्षस म्हणे वीर्यजसासी । निरपराधे माझे बंधूसी ।
मारोनि तूं कोठे जासी । तुझ्या प्राणासी मी घेईन ॥३०॥

त्या राक्षसबंधूची सूड घेण्याची प्रतिज्ञा :

माझे बंधूसीं करोनि रण । निरपराधें घेतला प्राण ।
त्याचा सूड मी घेईन । अवकाशकाळें राजेंद्रा ॥३१॥
ऐसें राक्षस बोलिल्यावरी । मग सौदासपुत्र नृपकेसरी ।
येवोनि माझे आश्रमाअरवरी । अश्वमेध मांडिला ॥३२॥
अश्वमेध महायज्ञ । आरंभिला वसिष्ठा पाचारुन ।
रायें यक्षदीक्षा घेवोन । बहु सहस्त्र वर्षे पैं झाली ॥३३॥
यज्ञसमाप्तीचे अंतीं । पूर्व वैर स्मरोनि राक्षस निश्चितीं ।
येता झाला वसिष्ठरुपाची बुंथी । घेवोनियां ते काळी ॥३४॥
वसिष्ठाचें रुप धारोन । आला राक्षस कपटी जाण ।
रायसि म्हणता झाला आपण । मांसभोजन मज दीजे ॥३५॥
यज्ञसमाप्तीचे अंतीं । मांसभोजन मज करी तृप्ती ।
ऐसें वचन ऐकोनि नृपती । पाककर्त्या आज्ञा केली ॥३६॥
आजि वसिष्ठतृप्यर्थी । करीं मांसाची पाकनिष्पत्ती ।
येरें आज्ञा वंदोनि शीघ्रगतीं । विचार करिता पैं झाला ॥३७॥
येरीकडे राक्षस मायवी जाण । भाणवसां गेला नरमांस घेउन ।
सवेग पाकनिष्पत्ति करुन । रायाजवळी देता झाला ॥३८॥
अहो जी राया मांस मिष्टान्न । याचा स्वाद अति गहन ।
वसिष्ठा देवोनि तृप्तिभोजन । आशीर्वचन पैं घ्यावें ॥३९॥
ऐसें करोनि रजनीचर । सवेंचि प्रवेशला वन घोर ।
येरीकडे नृपें सत्वर । वसिष्ठा भोजना पाचारिलें ॥४०॥

मांसभक्षण घडल्यामुळे वसिष्ठांचा राजाला शाप व उःशाप :

वसिष्ठासि करोनि आदर । भोजनीं बैसवी नृपवर ।
ऋषीनें जाणोनि नरमांसविचार । रायासि शापिता पैं झाला ॥४१॥
सक्रोध उंचबळोनि । म्हणे भला रे राया मजलागूनी ।
नरमांस देतोसी भोजनीं । म्हणोनि शाप दीधला ॥४२॥
मज करविसी नरमांसभोजन । तो तूं होसी मांसभक्षक जाण ।
ऐसा रायें शाप ऐकोन । स्रियेसहित विनविता झाला ॥४३॥
म्हणे स्वामी वसिष्ठमुनी । तुमचे आज्ञेकरूनी ।
मांस मागितलें म्हणोनी । ब्रह्मऋषे म्यां दिधलें ॥४४॥
ऐकोनि रायाचें विनीत वचन । क्षण एक वसिष्ठ धरोनि ध्यान ।
कळों सरलें राक्षस मायावी शापसी । येवढें विंदान पैं केलें ॥४५॥
तंव वसिष्ठ म्हणे रायासी । द्वादश वर्षे क्रमिलिया शापसी ।
निष्कृति होईल तुझ्या देहासी । आनंदतें पावसील ॥४६॥
पूर्वील शापस्तव कर्म जाण । तयाची तुज न होईल आठवण ।
शापापासोन राया सुटोन । प्रजापाळण स्वधर्मे करिसी ॥४७॥
ऐसा वसिष्ठशापें भूपती । शाप पावला शत्रुघ्ना तुजप्रती ।
म्यां कथा सांगितली संकळितीं । तयाचें यज्ञस्थळ पैं हें ॥४८॥
माझ्या आश्रमासमीप जाण । येथे करीत होता यज्ञ ।
तंव तो राक्षस येऊन । विघ्न केलें शेवटीं ॥४९॥
ऐसा वीर दाशरथी । कथा ऐकोनि सुखावला चित्तीं ।
सवेंचि अस्ता गेला गभस्ती । निशाप्राप्ती पैं झाली ॥५०॥
पर्णशाळेसिं शत्रुघ्न । केलें सतां सुखें शयन ।
प्रहरद्वय शर्वरी क्रमिल्या जाण । तंव वाल्मीकाश्रमीं नवल झालें ॥५१॥

सीता प्रसूत होऊन तिला दोन पुत्र झाले :

सीता होती गर्भवती । तियेसी झाली प्रसूती ।
पुत्रद्वय उपजले राती । बाळचंद्रासारिखे ॥५२॥
ऋषिपुत्रें मिळोनि जाण । वाल्मीकासी जाणवून ।
तंव सत्वर वाल्मीकें येऊन । जातकर्म करिता झाला ॥५३॥
वाल्मीकें कुश घेवोन । जातकर्मातें करोन ।
पहिल्या पुत्रा नामाभिधान । कुश ऐसें ठेविलें ॥५४॥
दुस-या नाम लव ऐसें । ठेविलें ऋषीं परमपुरुषें ।
वर देता झाला तुमचीं यशें । भुवनत्रयीं विकासती ॥५५॥
रक्षा करोनि बाळकांसी । सवेंचि जाणविलें शत्रुघ्नासी ।
येरें येवोनि उल्हासेंसीं । बाळकांसी पाहिलें ॥५६॥
तेथे क्रमोनियां निशी । उदय होतां गरुडाग्रजासी ।
पूर्वाण्हिक करोनि वाल्मीकासी । नमस्कारोनि निघाला ॥५७॥
तो शत्रुघ्न यमुनातीरीं । सप्त रात्री क्रमोनि मार्गीं ।
ऋषिआश्रमीं तया प्रसंगीं । हळू हळू काळ क्रमितसे ॥५८॥

शत्रुघ्नाचे च्यवनऋषींच्या आश्रमात आगमन :

तंव देखिला च्यवनाश्रम । अति रमणीय पावन परम ।
तेथें वसती ऋषिसत्तम । तपोधन तेजस्वी ॥५९॥
च्यवनाश्रमीं करोनि वस्ती । ऋषीस नमन साष्टांगें करी विनंती ।
लवणासुराची बळशक्ती । मजप्रती सांगावी ॥६०॥
ऐकोनि दाशरथीचें वचन । बोलता झाला ऋषि च्यवन ।
म्हणे शत्रुघ्ना सावधान । लवणाख्यान अवधारीं ॥६१॥
तेणें शूळबळेंकरुन । मारिले ऋषि तपोधन ।
निवटिले राक्षस दारुण । प्राणिजन पीडिले ॥६२॥

मांधात्याची कथा :

पूर्वी अयोध्यानगरीचे ठायीं । इक्श्वाकुकुळींचा युवानाश्व पाहीं ।
तयाचा पुत्र मांधाता लोकयात्रीं । विख्यात अति प्रसिद्ध ॥६३॥
तेणें पृथ्वी वश करुन । राज्य करिता झाला आपण ।
कोणे एके काळीं स्वर्गा गमन । सुरलोक घ्यावया निघाला ॥६४॥
सर्व सेना असंख्य वीर । कोट्यानुकोटि कुंजर ।
अगणित घेतले रहंवर । इंद्रलोकअभिलाषार्थ ॥६५॥
शचीपतीचें राज्य घेईन । ऐसी उत्कंठा धरोनि मनें । प्
पातला अमरावतीस जाण । इंद्रासनीं बैसावया ॥६६॥
ते पाकशासनें जाणोन । बुद्धयाच मांधात्या प्रतिवचन ।
बोलता झाला गुणसंपन्न । सावकाश अवधारा ॥६७॥
अहो जी रविवंशनृपती । तुमची मृत्युलोकीं वस्ती ।
ते वश न करितां स्वर्गप्रती । काय कारणें आलांती ॥६८॥
आधीं मृत्युलोक वश करुन । मग घ्यावें सुरसदन ।
ऐसें ऐकोनि मांधाता जाण । क्रोधें संपूर्ण खवळला ॥६९॥
म्हणे अगा ये शचीपती । मज कोण वश नाहीं नृपती ।
ते मज सांगे गा शीघ्रगतीं । नाहीं तरी दंड करीन ॥७०॥
इंद्र म्हणे लवणासुर । जेणें बळकाविलें मधुपुर ।
तुमच्या देशासमीप नगर । त्यांसी कांही न चले तुमचें ॥७१॥
तो नाहीं तुमच्या अधीन । तो न जिंतितां इच्छितां स्वर्गभुवन ।
तंव मांधाता लज्जायमान । होवोनि समौन तटस्थ ॥७२॥
लवणासुराचे शिक्षेसी । मांधाता धाडी दूतांसी ।
असुरें भक्षिलें तयासीं । ऐकोनि क्रोधासी मांधाता चढला ॥७३॥
तैसाचि उठोनि सूर्यवंशी वीर । प्रवेशता झाला मधुपुर ।
युद्धा पाचरोनि लवणासुर । संग्राम घोर मांडिला ॥७४॥
मांधाता आणि लवणासुर । संग्राम करिते झाले घोर ।
लवणें शूळ टकोनि सत्वर । मांधाता जीवें मारिला ॥७५॥
राजा निवटिला रणीं । सैन पडिलें रणमेदिनीं ।
लवणासुर विजयी होवोनी । मधुपुरीसी प्रवेशला ॥७६॥
शत्रुघ्ना शूळेंकरुन । तेणें मारिले वीर दारुण ।
आतांच युद्धालागीं जाण । मधुपुरीस नव जावें ॥७७॥
शूळ नाहीं लवणाकरीं । ऐसें जाणोनि युद्धा पाचारीं ।
मग तया जिंतोनि विजयकरीं । गुढी उभवी राजकुमरा ॥७८॥
रुद्रहस्तींचा शूळ कठोर । मधूनें प्रसन्न केला कर्पूरगौर ।
तयाचा शूळ आणि वर । प्राप्त झाला मधूसी ॥७९॥
तो शूळ मधूनें लावणासुरातें । दिधला शत्रुघ्ना निश्चितें ।
त्याचा मृत्यु तुझेनि हातें । जाण उदयिक होईल ॥८०॥
शत्रुघ्नें तेथें क्रमोनि निशी । उदय होतां गभस्तीसी ।
मनस्कारोनि च्यवनासी । प्रयाण करिता पैं झाला ॥८१॥

शत्रुघ्न मधुपुरीस आला त्या वेळी प्रातःकाळीच
लवणासुर शिकारीला बाहेर गेला होता :

जे उतरोनि यमुनातीर । मार्गी चालतां शत्रुघ्न वीर ।
लोटलें जी दोन प्रहर । ते समयीं मधुपुर पावला ॥८२॥
मग येवोनि नगरद्वारीं । शस्त्रेंसीं शत्रुघ्न ते असवरीं ।
तिष्ठत राहिल्याउपरी । येरीकडे काय वर्तलें ॥८३॥
मधुपुरें काय केलें । प्रातःकाळीं उठोन वन सेविलें ।
पारधी खेळतां मारिले चितळे । मृग व्याघ्र असंख्यात ॥८४॥
मारोनि श्वापदांच्या थाटी । वनीं भक्षी उठाउठीं ।
कित्येकांचा भार बांधोनि पाठीं । नगरा उजु मुरडला ॥८५॥
रुधिरें डवरिला असुर । जैसा सेंदुराचा गिरिवर ।
खांदी कावडी सजीव क्रूर । मारोनि मांस घेतलेसें ॥८६॥
जैसा काळ प्रयळकाळीं । जीवमात्राची करी रांगोळी ।
होट न लावितां सगळेंचि गिळी । चाटी अवाळी पुनरपि ॥८७॥

लवणासुर नगराकडे परतला :

ऐसा राक्षस महाक्रूर । खांदी मांस चिथळत रुधिर ।
प्रवेशतां नगरद्वार । तंव शत्रुघ्नें देखिला ॥८८॥
जैसा कुठार धरोनि करीं । उभ्या पादपाची करी कांडोरी ।
तैसा लवण राक्षसारी । देखता झाला ते समयीं ॥८९॥
लवण म्हणे धनुर्धरा । अनेक शस्त्रांचा करोनि भारा ।
उभा राहिलास चतुरा । आपुले वृत्तांता सांगावें ॥९०॥
म्यां भक्षिले अनेक प्राणी । न सांगता गिळीन तुजलागोनी ।
अगा नराधमा झडकरोनी । आपला समाचार सांगावा ॥९१॥

शत्रुघ्नाचे त्याला प्रत्युत्तर :

शत्रुघ्न ऐकोनि राक्षस वचन । बोलता झाला वीरपंचानन ।
म्हणे राक्षसा तुझा घ्यावया प्राण । मी आलों जाण दशरथात्मज ॥९२॥
जेणें मारिले रावण कुंभकर्ण । राज्यीं स्थापिला बिभीषण ।
तो श्रीराम माझा अग्रज जाण । मी तुझा प्राण घेऊं आलों ॥९३॥
शत्रुघ्न नाम पैं माझें । आलों असे युद्धाचें व्याजें ।
तुवां थांबोनि युद्ध कीजे । आर्त पुरविजे पैं माझें ॥९४॥
शत्रुघ्नाचें कठिन वचन । ऐकोनि हांसे राक्षस जाण ।
म्हणे माझा मातुळ रावण । मजसीं युद्ध करुं न शके ॥९५॥
त्या रावणासी रामें मारिलें । हें अपूर्व श्रवणीं ऐकिलें ।
क्रोधाचें भरितें असे दाटलें । तयाच्या वधाकारणें ॥९६॥
तरी प्रथम तुझा वध करणें । मग श्रीरामासी मारणें ।
मातुळाचा सूड घेणें । दिनकरवंश निर्दळूनी ॥९७॥
तरी तिष्ठत रोहें क्षणभरी । मी शस्त्रें आणिन तंववरी ।
येरू म्हणे सांपडल्या वैरी । हातींचा कैसा सोडावा ॥९८॥
आतां कैसा जासी मजपासून । निमेषें एका घेईन प्राण ।
ऐसें शत्रुघ्नें बोलोन । बाण गुणीं चढविला ॥९९॥
तुवां मारिले ऋषीश्वर । तापस मारोनियां जाण ।
त्याचा सूड घ्यावया शत्रुघ्नवीर । जाण निर्धार आलासे ॥१००॥
तुज मारोनियां जाण । सुखी करावे मुनिजन ।
मग येथील राज्यसन । रघुनंदन मज देईल ॥१॥
एका जनार्दना शरण । पुढिले प्रसंगीं लवणमरण ।
तेणें देव सुखी होतील जाण । आणि तपोधन सुखावती ॥२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
शत्रुघ्नलवणपुरीप्रवेशो नाम नवपंचाशत्तमोऽध्यायः ॥५९॥ ओंव्या ॥१०२॥

GO TOP