[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ एकोनत्रिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
सीतायाः शुभशकुनानि -
सीतेला शुभ शकुन -
तथागतां तां व्यथितामनिन्दितां
व्यतीतहर्षां परिदीनमानसाम् ।
शुभां निमित्तानि शुभानि भेजिरे
नरं श्रिया जुष्टमिवोपसेविनः ॥ १ ॥
याप्रकारे अशोकवृक्षाखाली आल्यावर अनेक प्रकारचे शुभ शकुन प्रकट होऊन, श्री संपन्न पुरुषाजवळ सेवा करणारे लोक ज्याप्रमाणे स्वतःहून जातात, त्याप्रमाणे त्या व्यथित हृदय असलेल्या सती-साध्वी हर्षशून्य, दीनचित्त आणि शुभलक्षणी सीतेची सेवा करू लागले. ॥१॥
तस्याः शुभं वाममरालपक्ष्म-
राज्यावृतं कृष्णविशालशुक्लम् ।
प्रास्पन्दतैकं नयनं सुकेश्या
मीनाहतं पद्ममिवाभिताम्रम् ॥ २ ॥
त्या समयी वक्र पापण्या, काळीभोर बुबुळे आणि भोवती श्वेतवण असलेला आणि दोन्ही बाजून आरक्तवर्ण असलेला - उत्कृष्ट केशपाशाने युक्त असलेल्या त्या सीतेचा डावा डोळा, सभोवती आरक्त वर्ण असून मत्स्याचा धक्का लागल्यामुळे स्फुरण पावत असलेल्या कमळाप्रमाणे स्फुरण पावू लागला. ॥२॥
भुजश्च चार्वञ्चितवृत्तपीनः
परार्ध्यकालागरुचन्दनार्हः ।
अनुत्तमेनाध्युषितः प्रियेण
चिरेण वामः समवेपताशु ॥ ३ ॥
त्याच बरोबर तिची सुन्दर प्रशंसनीय गोलाकार, मोठी, बहुमूल्य अगुरू आणि चन्दनानी चर्चित होण्यास योग्य आणि परम उत्तम प्रियकराकडून चिरकाल सेवित डावी भुजाही तात्काळ फडकू लागली (स्फुरण पावू लागली.) ॥३॥
गजेन्द्रहस्तप्रतिमश्च पीन-
स्तयोर्द्वयोः संहतयोस्तु जातः ।
प्रस्पन्दमानः पुनरूरुरस्या
रामं पुरस्तात् स्थितमाचचक्षे ॥ ४ ॥
नन्तर तिच्या परस्पर संलग्न अशा दोन जांघांपैकी एक डावी जांघ जी गजराजाच्या सोंडेप्रमाणे पीन (मोठी, पुष्ट) होती, वारंवार स्फुरण पावू लागली आणि जणुं भगवान श्रीराम तुझ्या पुढेच उभे आहेत, अशी सूचना देऊ लागली. ॥४॥
शुभं पुनर्हेमसमानवर्ण-
मीषद्‌रजोध्वस्तमिवातुलाक्ष्याः ।
वासः स्थितायाः शिखराग्रदन्त्याः
किंचित् परिस्रंसत चारुगात्र्याः ॥ ५ ॥
त्यानन्तर अशोक वृक्षाखाली उभ्या असलेल्या, डाळींबाच्या बीजाप्रमाणे जिचे सुन्दर दात आहेत अशी मनोहर गात्रे असलेली, अनुपम नेत्र असलेल्या सीतेचे सोन्यासारखा रंग असलेले किंचित मलीन रेशमी पिवळे वस्त्र थोडेसे घसरले आणि भावी शुभ घटनेची सूचना देऊ लागले. ॥५॥
एतैर्निमित्तैरपरैश्च सुभ्रूः
संचोदिता प्रागपि साधु सिद्धैः ।
वातातपक्लान्तमिव प्रणष्टं
वर्षेण बीजं प्रतिसञ्जहर्ष ॥ ६ ॥
यामुळे तसेच आणखीही अनेक शकुनांनी, ज्यांच्या द्वारे पूर्वीही मनोरथसिद्धीचा परिचय मिळाला होता, प्रेरित होऊन सुन्दर भुवया असणारी सीता, ज्याप्रमाणे हवा आणि ऊन यांनी सुकून नष्ट झालेले बीज वर्षाऋतूत पावसाच्या पाण्याने जसे अंकुरित होऊन हिरवेगार व्हावे तशी हर्षाने प्रफुल्लित झाली. ॥६॥
तस्याः पुनर्बिम्बफलोपमोष्ठं
स्वक्षिभ्रु केशान्तमरालपक्ष्म ।
वक्त्रं बभासे सितशुक्लदंष्ट्रं
राहोर्मुखाच्चन्द्र इव प्रमुक्तः ॥ ७ ॥
तिचे बिम्बफळाप्रमाणे लाल ओठ, सुन्दर नेत्र, मनोहर भुवया, रुचिर केस, वक्र पापण्या तसेच श्वेत आणि उज्वळ दातांनी सुशोभित मुख, राहूच्या ग्रासातून मुक्त झालेल्या चन्द्रम्यासारखे प्रकाशित होऊ लागले. ॥७॥
सा वीतशोका व्यपनीततन्द्रा
शान्तज्वरा हर्षविबुद्धसत्त्वा ।
अशोभतार्या वदनेन शुक्ले
शीतांशुना रात्रिरिवोदितेन ॥ ८ ॥
तिचा शोक कमी होऊ लागला, सर्व थकवा दूर झाला, मनाचा ताप शान्त झाला आणि हृदय हर्षाने प्रफुल्लित झाले. त्यावेळी आर्या सीता शुक्लपक्षात उदित होणार्‍या शीतरश्मी चन्द्रामुळे सुशोभित झालेल्या रात्रीप्रमाणे आपल्या मनोहर मुखामुळे अद्‍भुत शोभा प्राप्त करती झाली. ॥८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे एकोनत्रिंशः सर्गः ॥ २९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा एकोणतीसावा सर्व पूर्ण झाला. ॥२९॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP