[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ चतुःसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामलक्ष्मणाभ्यां पम्पातटे मतङ्‌गवने शबर्य्या आश्रमं गत्वा तस्याः सत्कारस्य ग्रहणं तया सह मतङ्‌गवनस्य निरीक्षणं शबर्य्या स्वशरीरस्याहुतिं दत्त्वा ततो दिव्यधाम्नि गमनम् -
श्रीराम आणि लक्ष्मणाचे पंपासरोवराच्या तटावर मतंगवनांत शबरीच्या आश्रमात जाणे, तिचा सत्कार ग्रहण करणे आणि तिच्या बरोबर मतंगवन पहाणे, शबरीचे आपल्या शरीराची आहुति देऊन दिव्यधामास प्रस्थान करणे -
तौ कबन्धेन तं मार्गं पम्पाया दर्शितं वने ।
आतस्थतुर्दिशं गृह्य प्रतीचीं नृवरात्मजौ ॥ १ ॥
त्यानंतर राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण कबंधाने सांगितलेल्या पंपासरोवराच्या मार्गाचा आश्रय घेऊन पश्चिम दिशेकडे चालू लागले. ॥१॥
तौ शैलेष्वाचितानेकान् क्षौद्रकल्पफलान् द्रुमान् ।
वीक्षन्तौ जग्मतुर्द्रष्टुं सुग्रीवं रामलक्ष्मणौ ॥ २ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण, दोघे भाऊ पर्वतावर पसरलेल्या फुले, फळे आणि मधुनी संपन्न असलेल्या बर्‍याचशा वृक्षांना पहात पहात सुग्रीवास भेटण्यासाठी पुढे निघाले. ॥२॥
कृत्वा तु शैलपृष्ठे तु तौ वासं रघुनंदनौ ।
पम्पायाः पश्चिमं तीरं राघवावुपतस्थस्तुः ॥ ३ ॥
रात्री एका पर्वत शिखरावर निवास करून ते दोघे ही रघुनंदन पंपासरोवराच्या पश्चिम तटावर जाऊन पोहोचले. ॥३॥
तौ पुष्करिण्याः पम्पायाः तीरमासाद्य पश्चिमम् ।
अपश्यतां ततस्तत्र शबर्या रम्यमाश्रमम् ॥ ४ ॥
पंपानामक पुष्करिणीच्या पश्चिम तटावर पोहोचून त्या दोघा भावांनी तेथे शबरीचा रमणीय आश्रम पाहिला. ॥४॥
तौ तमाश्रममासाद्य द्रुमैर्बहुभिरावृतम् ।
सुरम्यमभिवीक्षन्तौ शबरीमभ्युपेयतुः ॥ ५ ॥
त्याची शोभा निरखत ते दोघे भाऊ बहुसंख्य वृक्षांनी घेरलेल्या त्या सुरम्य आश्रमात जाऊन शबरीला भेटले. ॥५॥
तौ च दृष्ट्‍वा तदा सिद्धा समुत्थाय कृतांजलिः ।
पादौ जग्राह रामस्य लक्ष्मणस्य च धीमतः ॥ ६ ॥
शबरी सिद्ध तपस्विनी होती. त्या दोघा भावांना आश्रमात आलेले पाहून ती हात जोडून उभी राहिली आणि तिने बुद्धिमान्‌ श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या चरणीं प्रणाम केला. ॥६॥
पाद्यमाचमनीयं च सर्वं प्रादाद् यथाविधि ।
तामुवाच ततो रामः श्रमणीं धर्मसंस्थिताम् ॥ ७ ॥
नंतर पाद्य, अर्ध्य आणि आचमनीय आदि सर्व सामग्री समर्पित केली आणि विधिवत्‌ त्यांचा सत्कार केला. तत्पश्चात्‌ श्रीरामचंद्र त्या धर्मपरायण तपस्विनीस म्हणाले- ॥७॥
कच्चित्ते निर्जिता विघ्नाः कच्चिते वर्धते तपः ।
कच्चित्ते नियतः कोप आहारश्च तपोधने ॥ ८ ॥
तपोधने ! काय तू सर्व विघ्नांवर विजय प्राप्त केला आहेस ? काय तुझी तपस्या वाढत आहे ? काय तू क्रोध आणि आहार यांना काबूमध्ये आणले आहेस ? ॥८॥
कच्चित्ते नियमाः प्राप्ताः कच्चित्ते मनसः सुखम् ।
कच्चिते गुरुशुश्रूषा सफला चारुभाषिणि ॥ ९ ॥
तू ज्या नियमांचा स्वीकार केला आहेस ते निभावले तर जात आहेत ना ? तुझ्या मनात सुख आणि शांति आहे ना ? चारूभाषिणी ! तू जी गुरूजनांची सेवा केली आहेस ती पूर्णरूपाने सफल झाली आहे ना ? ॥९॥
रामेण तापसी पृष्टा सा सिद्धा सिद्धसम्मता ।
शशंस शबरी वृद्धा रामाय प्रत्यवस्थिता ॥ १० ॥
श्रीरामचंद्रांनी या प्रकारे विचारल्यावर ती सिद्ध तपस्विनी वृद्ध शबरी, जी सिद्धांच्या द्वारे सन्मानित होती त्यांच्या समोर उभी राहून म्हणाली- ॥१०॥
अद्य प्राप्ता तपःसिद्धिस्तव सन्दर्शनान्मया ।
अद्य मे सफलं जन्म गुरवश्च सुपूजिताः ॥ ११ ॥
रघुनंदना ! आज आपले दर्शन झाल्यानेच मला आपल्या तपस्येत सिद्धि प्राप्त झाली आहे. आज माझा जन्म सफल झाला आणि गुरूजनांची उत्तम पूजाही सार्थक झाली आहे. ॥११॥
अद्य मे सफलं तप्तं स्वर्गश्चैव भविष्यति ।
त्वयि देववरे राम पूजिते पुरुषर्षभ ॥ १२ ॥
पुरुषप्रवर श्रीराम ! आपला देवेश्वरांचा येथे सत्कार झाला त्यामुळे माझी तपस्या सफल झाली आहे आणि आता मला आपल्या दिव्यधामाची प्राप्तीही होईलच. ॥१२॥
तवाहं चक्षुषा सौम्य पूता सौम्येन मानद ।
गमिष्याम्यक्षयांल्लोकांअत्वत्प्रसादादरिंदम ॥ १३ ॥
सौम्य ! मानद ! आपली सौम्य दृष्टि पडल्याने मी परम पवित्र झाली आहे. शत्रुदमना ! आपल्या प्रसादानेच मी आतां अक्षय लोकात जाईन. ॥१३॥
चित्रकूटं त्वयि प्राप्ते विमानैरतुलप्रभैः ।
इतस्ते दिवमारूढा यानहं पर्यचारिषम् ॥ १४ ॥
ज्यावेळी आपण चित्रकूट पर्वतावर आला होता त्याच समयी माझे गुरूजन, ज्यांची मी सदा सेवा करीत असे, अतुल कान्तिमान्‌ विमानावर बसून येथून दिव्यलोकास निघून गेले. ॥१४॥
तैश्चाहमुक्ता धर्मज्ञैर्महाभागैर्महर्षिभिः ।
आगमिष्यति ते रामः सुपुण्यमिममाश्रमम् ॥ १५ ॥

स ते प्रतिग्रहीतव्यः सौमित्रिसहितोऽतिथिः ।
तं च दृष्ट्‍वा वरांल्लोकानक्षयांस्त्वं गमिष्यसि ॥ १६ ॥
त्या धर्मज्ञ महाभाग महर्षिंनी जाते वेळी मला सांगितले होते की तुझ्या या परम पवित्र आश्रमात श्रीरामचंद्र येतील आणि लक्ष्मणासह तुझे अतिथी होतील. तू त्यांचा यथावत्‌ सत्कार कर. त्यांचे दर्शन करून तू श्रेष्ठ आणि अक्षय लोकास जाशील. ॥१५-१६॥
एवमुक्ता महाभागैस्तदाहं पुरुषर्षभ ।
मया तु संचितं वन्यं विविधं पुरुषर्षभ ॥ १७ ॥

तवार्थे पुरुषव्याघ्र पम्पायास्तीरसंभवम् ।
पुरुषप्रवर ! त्या महाभाग महात्म्यांनी मला त्या समयी अशी गोष्ट सांगितली होती म्हणून पुरुषसिंह ! मी आपल्या साठी पंपा तटावर उत्पन्न होणार्‍या नाना प्रकारच्या जंगली फल-मुळांचा संचय केला आहे. ॥१७ १/२॥
एवमुक्तः स धर्मात्मा शबर्या शबरीमिदम् ॥ १८ ॥

राघवः प्राह विज्ञाने तां नित्यमबहिष्कृताम् ।
शबरी (जातिने वर्णबाह्य असूनही) विज्ञानात बहिष्कृत नव्हती - तिला परमात्म तत्वाचे नित्य ज्ञान प्राप्त झालेले होते. तिचे पूर्वोक्त बोलणे ऐकून धर्मात्मा श्रीराम तिला म्हणाले- ॥१८ १/२॥
दनोः सकाशात् तत्त्वेन प्रभावं ते महात्मनः ॥ १९ ॥

श्रुतं प्रत्यक्षमिच्छामि सन्द्रष्टुं यदि मन्यसे ।
तपोधने ! मी कबंधाच्या मुखाने तुझ्या महात्मा गुरूजनांचा यथार्थ प्रभाव ऐकला आहे. जर तुला मान्य असेल तर मी त्यांचा तो प्रभाव प्रत्यक्ष पाहू इच्छितो. ॥१९ १/२॥
एतत्तु वचनं श्रुत्वा रामवक्त्रविनिःसृतम् ॥ २० ॥

शबरी दर्शयामास तावुभौ तद्वनं महत् ।
श्रीरामांच्या मुखांतून निघालेले हे वचन ऐकून शबरीने त्या दोघां भावांना त्या महान्‌ वनाचे दर्शन करवीत म्हटले- ॥२० १/२॥
पश्य मेघघनप्रख्यं मृगपक्षिसमाकुलम् ॥ २१ ॥

मतङ्‌गवनमित्येव विश्रुतं रघुनन्दन ।
रघुनंदना ! मेघांच्या समूहाप्रमाणे श्याम आणि नाना प्रकारच्या पशु-पक्ष्यांनी भरलेल्या या वनाकडे दृष्टिपात करावा. हे मतंगवन या नावाने प्रसिद्ध आहे. ॥२१ १/२॥
इह ते भावितात्मानो गुरवो मे महाद्युते ।
जुहवाञ्चक्रिरे नीडं मंत्रवन् मन्त्रवन्मन्त्रपूजितम् ॥ २२ ॥
महातेजस्वी श्रीरामा ! येथेच माझे भावितात्मा (शुद्ध अंतःकरणाचे आणि परमात्म चिन्तन परायण) गुरूजन निवास करीत होते. याच स्थानावर त्यांनी गायत्री मंत्राच्या जपाने विशुद्ध झालेल्या आपल्या देहरूपी पंजरास मंत्रोच्चारणपूर्वक अग्निमध्ये होमून टाकले. ॥२२॥
इयं प्रत्यक्स्थली वेदी यत्र ते मे सुसत्कृताः ।
पुष्पोपहारं कुर्वन्ति श्रमादुद्वेपिभिः करैः ॥ २३ ॥
ही प्रत्यक्‌स्थली नावाची वेदी आहे जेथे माझ्या द्वारे उत्तम प्रकारे पूजित झालेले ते महर्षि वृद्धावस्थेमुळे श्रमांनी कांपणार्‍या हातांनी देवतांना फुलांचा बळी अर्पण करीत असत. ॥२३॥
तेषां तपःप्रभावेण पश्याद्यापि रघूत्तम ।
द्योतयन्ती दिशः सर्वाः श्रिया वेद्यतुलप्रभाः ॥ २४ ॥
रघूत्तमा ! पहा त्यांच्या तपस्येच्या प्रभावाने आज ही वेदी आपल्या तेजाने संपूर्ण दिशांना प्रकाशित करीत आहे या समयी सुद्धा तिची प्रभा अतुलनीय आहे. ॥२४॥
अशक्नुवद्‌भिस्तैर्गन्तुमुपवासश्रमालसैः ।
चिन्तितेनागतान् पश्य सहितान् सप्त सागरान् ॥ २५ ॥
उपवास केल्याने दुर्बल झाल्यामुळे जेव्हा ते हिंडण्या फिरण्यास असमर्थ झाले, तेव्हा त्यांच्या चिंतन मात्राने तेथे सात समुद्रांचे जल प्रकट झाले. ते सप्तसागर तीर्थ आजही विद्यमान आहे. त्यात सातही समुद्रांचे जल एकत्र मिळालेले आहे, ते आपण येऊन पहावे. ॥२५॥
कृताभिषेकैस्तैर्न्यस्ता वल्कलाः पादपेष्विह ।
अद्यापि नि विशुष्यन्ति प्रदेशे रघुनन्दन ॥ २६ ॥
रघुनंदना ! त्यात स्नान करून त्यांनी वृक्षांवर जी वल्कल वस्त्रे पसरली होती, ती या प्रदेशात आतापर्यंत वाळलेली नाहीत. ॥२६॥
देवकार्याणि कुर्वद्‌भिर्यानीमानि कृतानि वै ।
पुष्पैः कुवलयैः सार्धं म्लानत्वं न तु यान्ति वै ॥ २७ ॥
देवतांची पूजा करतांना माझ्या गुरूजनांनी कमलांच्या बरोबर अन्य फुलांच्या ज्या माळा बनविल्या होत्या त्या आजही कोमेजलेल्या नाहीत. ॥२७॥
कृत्स्नं वनमिदं दृष्टं श्रोतव्यं च श्रुतं त्वया ।
तदिच्छाम्यभ्यनुज्ञाता त्यक्ष्याम्येतत् कलेवरम् ॥ २८ ॥
भगवन्‌ ! आपण सारे वन पाहिले आहे आणि या स्थळासंबंधी ज्या गोष्टी ऐकण्यायोग्य होत्या त्याही आपण ऐकल्या आहेत. आता मी आपली आज्ञा घेऊन या देहाचा परित्याग करू इच्छिते. ॥२८॥
तेषामिच्छाम्यहं गन्तुं समीपं भावितात्मनाम् ।
मुनीनामाश्रमो येषामहं च परिचारिणी ॥ २९ ॥
ज्यांचा हा आश्रम आहे आणि ज्यांच्या चरणांची मी दासी आहे त्याच पवित्रात्मा महर्षिंच्या समीप आता मी जाऊ इच्छिते. ॥२९॥
धर्मिष्ठं तु वचः श्रुत्वा राघवः सहलक्ष्मणः ।
प्रहर्षमतुलं लेभे आश्चर्यमिति चाब्रवीत् ॥ ३० ॥
शबरीचे धर्मयुक्त वचन ऐकून लक्ष्मणासहित श्रीरामांना अनुपम प्रसन्नता प्राप्त झाली. त्यांच्या मुखातून शब्द निघाले, "आश्चर्य आहे !" ॥३०॥
तामुवाच ततो रामः श्रमणीं संशितव्रताम् ।
अर्चितोऽहं त्वया भद्रे गच्छ कामं यथासुखम् ॥ ३१ ॥
त्यानंतर श्रीरामांनी कठोर व्रताचे पालन करणार्‍या शबरीला म्हटले- भद्रे ! तू माझा मोठा सत्कार केलास. आता तू आपल्या इच्छेनुसार आनंदपूर्वक अभीष्ट लोकाची यात्रा कर. ॥३१॥
इत्येवमुक्ता जटिला चीरकृष्णाजिनाम्बरा ।
अनुज्ञाता तु रामेण हुत्वाऽऽत्मानं हुताशने ॥ ३२ ॥

ज्वलत्पावसंकाशा स्वर्गमेव जगाम ह ।
दिव्याभरणसंयुक्ता दिव्यमाल्यानुलेपना ॥ ३३ ॥

दिव्याम्बरधरा तत्र बभूव प्रियदर्शना ।
विराजयन्ती तं देशं विद्युत्सौदामिनी यथा ॥ ३४ ॥
श्रीरामचंद्रांनी याप्रकारे आज्ञा दिल्यावर मस्तकावर जटा आणि शरीरावर चीर आणि काळे मृगचर्म धारण करणार्‍या शबरीने आपल्याला आगीत होमून प्रज्वलित अग्निप्रमाणे तेजस्वी शरीर प्राप्त केले. ती दिव्य वस्त्रे, दिव्य आभूषणे, दिव्य फुलांच्या माळा आणि दिव्य अनुलेपन धारण करून फार मनोहर दिसू लागली तसेच सुदाम पर्वतावर प्रकट होणार्‍या वीजेप्रमाणे त्या प्रदेशाला प्रकाशित करीत स्वर्ग लोकास निघून गेली. ॥३२-३४॥
यत्र ते सुकृतात्मानो विहरंति महर्षयः ।
तत् पुण्यं शबरी स्थानं जगमात्मसमाधिना ॥ ३५ ॥
तिने आपले चित्त एकाग्र करून त्या पुण्यधामाची यात्रा केली, जेथे तिचे ते गुरूजन पुण्यात्मा महर्षि विहार करीत होते. ॥३५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे चतुःसप्ततितमः सर्गः ॥ ७४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा चौर्‍याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP