श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण वाररर्क्षरक्षसां स्वदेशे प्रस्थापनम् -
वानरे, अस्वले आणि राक्षस यांना निरोप देणे -
तथा स्म तेषां वसतां ऋक्षवानर रक्षसाम् ।
राघवस्तु महातेजाः सुग्रीवमिदमब्रवीत् ॥ १ ॥
याप्रकारे तेथे सुखपूर्वक निवास करणार्‍या अस्वले, वानर आणि राक्षसांपैकी सुग्रीवाला संबोधित करून महातेजस्वी राघवांनी याप्रकारे म्हटले - ॥१॥
गम्यतां सौम्य किष्किन्धां दुराधर्षां सुरासुरैः ।
पालयस्व सहामात्यो राज्यं निहतकण्टकम् ॥ २ ॥
सौम्य ! आता तू देवता तसेच असुरांसाठीही दुर्जय किष्किंधापुरीला जा आणि तेथे मंत्र्यांसहित राहून आपल्या निष्कण्टक राज्याचे पालन कर. ॥२॥
अङ्‌गदं च महाबाहो प्रीत्या परमया युतः ।
पश्य त्वं हनुमन्तं च नलं च सुमहाबलम् ॥ ३ ॥

सुषेणं श्वशुरं वीरं तारं च बलिनां वरम् ।
कुमुदं चैव दुर्धर्षं नीलं चैव महाबलम् ॥ ४ ॥

वीरं शतवलिं चैव मैन्दं द्विविदमेव च ।
गजं गवाक्षं गवयं शरभं च महाबलम् ॥ ५ ॥

ऋक्षराजं च दुर्धर्षं जाम्बवन्तं महाबलम् ।
पश्य प्रीतिसमायुक्तो गन्धमादनमेव च ॥ ६ ॥
महाबाहो ! अंगद आणि हनुमानासही तू अत्यंत प्रेमपूर्ण दृष्टिने पहा. महाबली नल, आपले सासरे वीर सुषेण, बलवानात श्रेष्ठ तार, दुर्धर्ष वीर कुमुद, महाबली नील, वीर शतबली मैंद, द्विविद, गज, गवाक्ष, महाबली शरभ, महान्‌ बल-पराक्रमाने युक्त दुर्जय वीर ऋक्षराज जाम्बवान्‌ तसेच गंधमादन यांच्यावरही तू प्रेमपूर्ण दृष्टि ठेवावीस. ॥३-६॥
ऋषभं च सुविक्रान्तं प्लवगं च सुपाटलम् ।
केसरिं शरभं सुम्भं शङ्‌खचूडं महाबलम् ॥ ७ ॥
परम पराक्रमी ऋषभ, वानर, सुपाटल, केसरी, शरभ, शुम्भ तसेच महाबली शंखचूड यांनाही तू प्रेमपूर्ण दृष्टीने पहावेस. ॥७॥
ये ये मे सुमहात्मानो मदर्थे त्यक्तजीविताः ।
पश्य त्वं प्रीतिसंयुक्तो मा चैषां विप्रियं कृथाः ॥ ८ ॥
यांच्या शिवाय ज्या ज्या महामनस्वी वानरांनी माझ्यासाठी आपले प्राण पणास लावले होते, त्या सर्वांवर तू प्रेमदृष्टि ठेवावीस. कधी त्यांचे अप्रिय करू नये. ॥८॥
एवमुक्त्वा तु सुग्रीवं आश्लिष्य च पुनः पुनः ।
विभीषणमुवाचाथ रामो मधुरया गिरा ॥ ९ ॥
असे म्हणून रामांनी सुग्रीवाला वारंवार हृदयाशी धरून आलिंगन दिले आणि नंतर मधुर वाणीने विभीषणास म्हणाले - ॥९॥
लङ्‌कां प्रशाधि धर्मेण धर्मज्ञस्त्वं मतो मम ।
पुरस्य राक्षसानां च भ्रातुर्वैश्रवणस्य च ॥ १० ॥
राक्षसराज ! तू धर्मपूर्वक लंकेचे शासन कर. मी तुला धर्मज्ञ मानतो. तुझ्या नगरातील लोक, सर्व राक्षस तसेच तुझे भाऊ कुबेर ही तुला धर्मज्ञच समजतात. ॥१०॥
मा च बुद्धिमधर्मे त्वं कुर्या राजम् कथञ्चन ।
बुद्धिमन्तो हि राजानो ध्रुवमश्नन्ति मेदिनीम् ॥ ११ ॥
राजन्‌ ! तू कुठल्याही प्रकारे अधर्मात मन घालू नकोस. ज्यांची बुद्धि ठीक आहे, ते राजे निश्चितच दीर्घकाळपर्यंत पृथ्वीचे राज्य भोगतात. ॥११॥
अहं च नित्यशो राजन् सुग्रीवसहितस्त्वया ।
स्मर्तव्यः परया प्रीत्या गच्छ त्वं विगतज्वरः ॥ १२ ॥
राजन्‌ ! तू सुग्रीवासहित सदा माझे स्मरण ठेव. आता निश्चिंत होऊन प्रसन्नतापूर्वक येथून जावेस. ॥१२॥
रामस्य भाषितं श्रुत्वा ऋक्षवानर राक्षसाः ।
साधुसाध्विति काकुत्स्थं प्रशशंसुः पुनः पुनः ॥ १३ ॥
श्रीरामांचे हे भाषण ऐकून अस्वले, वानर आणि राक्षस सर्वांनी धन्य धन्य म्हणून त्यांची वारंवार प्रशंसा केली. ।१३॥
तव बुद्धिर्महाबाहो वीर्यं अद्‌भुतमेव च ।
माधुर्यं परमं राम स्वयम्भोरिव नित्यदा ॥ १४ ॥
ते म्हणाले - महाबाहु श्रीरामा ! स्वयंभू ब्रह्मदेवासमान आपल्या स्वभावातही सदा मधुरता राहात असते. आपली बुद्धि आणि पराक्रम अद्‌भुत आहे. ॥१४॥
तेषामेवं ब्रुवाणानां वानराणां च रक्षसाम् ।
हनूमान् प्रणतो भूत्वा राघवं वाक्यमब्रवीत् ॥ १५ ॥
वानर आणि राक्षस जेव्हा असे म्हणत होते, त्याच वेळी हनुमान्‌ विनम्र होऊन श्रीराघवांना म्हणाले - ॥१५॥
स्नेहो मे परमो राजन् त्वयि तिष्ठतु नित्यदा ।
भक्तिश्च नियता वीर भावो नान्यत्र गच्छतु ॥ १६ ॥
महाराज ! आपल्या प्रति माझा महान्‌ स्नेह सदा टिकून राहो. वीर ! आपल्याच ठिकाणी माझी निश्चल भक्ति राहावी. आपल्या शिवाय अन्यत्र कोठेही माझा आंतरिक अनुराग नसावा. ॥१६॥
यावद् रामकथा वीर चरिष्यति महीतले ।
तावच्छरीरे वत्स्यन्तु प्राणा मम न संशयः ॥ १७ ॥
वीर श्रीरामा ! या पृथ्वीवर जोपर्यंत रामकथा प्रचलित राहिल तोपर्यंत निःसंदेह माझे प्राण या शरीरांतच टिकून राहावे. ॥१७॥
यच्चैतच्चरितं दिव्यं कथा ते रघुनन्दन ।
तन्मयाप्सरसो नाम श्रावयेयुर्नरर्षभ ॥ १८ ॥
रघुनंदना ! नरश्रेष्ठ श्रीरामा ! आपले जे हे दिव्य चरित्र आणि कथा आहे. ती अप्सरांनी मला गाऊन ऐकवीत राहावे. ॥१८॥
तच्छ्रुत्वाहं ततो वीर तव चर्यामृतं प्रभो ।
उत्कण्ठां तां हरिष्यामि मेघलेखामिवानिलः ॥ १९ ॥
वीर प्रभो ! आपल्या या चरितामृताला ऐकून मी, वायु जसा मेघांच्या पंक्तिला उडवून दूर घेऊन जातो त्याप्रमाणे माझ्या उत्कंठतेला दूर करीत राहीन. ॥१९॥
एवं ब्रुवाणं रामस्तु हनूमन्तं वरासनात् ।
उत्थाय सस्वजे स्नेहाद् वाक्यमेतदुवाच ह ॥ २० ॥
हनुमानांनी असे म्हटल्यावर श्रीरघुनाथांनी श्रेष्ठ सिंहासनावरून उठून त्यांना हृदयाशी धरले आणि स्नेहपूर्वक याप्रमाणे म्हटले - ॥२०॥
एवमेतत् कपिश्रेष्ठ भविता नात्र संशयः ।
चरिष्यति कथा यावद् एषा लोके च मामिका ॥ २१ ॥

तावत् ते भविता कीर्तिः शरीरेऽप्यसवस्तथा ।
लोका हि यावत्स्थास्यन्ति तावत्स्थास्यति मे कथा ॥ २२ ॥
कपिश्रेष्ठ ! असेच होईल यात संशय नाही. संसारात जोपर्यंत माझी कथा प्रचलित राहील तोपर्यंत तुमची कीर्ति टिकून राहिल आणि तुमच्या शरीरांत प्राणही राहातीलच. जो पर्यंत हे लोक अस्तित्वात असतील, तो पर्यंत माझ्या कथाही स्थिर राहातील. ॥२१-२२॥
एकैकस्योपकारस्य प्राणान् दास्यामि ते कपे ।
शेषस्येहोपकाराणां भवाम ऋणिनो वयम् ॥ २३ ॥
कपे ! तू जे उपकार केले आहेस, त्यांतील एकेकासाठी मी आपले प्राण ओवाळून टाकू शकतो. तुमच्या शेष उपकारांसाठी तर मी ऋणीच राहून जाईन. ॥२३॥
मद्ङ्‌गे जीर्णतां यातु यत् त्वयोपकृतं कपे ।
नरः प्रत्युपकाराणां आपस्त्वायाति पात्रताम् ॥ २४ ॥
कपिश्रेष्ठ ! मी तर हेच इच्छितो की तुम्ही जे जे उपकार केले आहेत, ते सर्व माझ्या शरीरातच पचून जावेत. त्यांची परतफेड करण्याची संधीच मला मिळू नये; कारण की पुरुषामध्ये उपकाराचा बदला प्राप्त करण्याची योग्यता आपत्तिकाळातच येत असते. ( माझी अशी इच्छा नाही की तू ही संकटात पडावेस आणि मी तुझ्या उपकाराची परतफेड करावी.) ॥२४॥
ततोऽस्य हारं चन्द्राभं मुच्य कण्ठात्स राघवः ।
वैदुउर्यतरलं कण्ठे बबन्ध च हनूमतः ॥ २५ ॥
इतके म्हणून राघवांनी आपल्या कंठातून एक चंद्रम्यासमान उज्ज्वल हार काढला, ज्याच्या मध्यभागी वैडूर्यमणी होता. तो त्यांनी हनुमंताच्या गळ्यात घातला. ॥२५॥
तेनोरसि निबद्धेन हारेण महता कपिः ।
रराज हेमशैलेन्द्रः चन्द्रेणाक्रान्तमस्तकः ॥ २६ ॥
वक्षःस्थळावर रूळणार्‍या त्या विशाल हारामुळे सुवर्णमय गिरिराज सुमेरूच्या शिखरावर चंद्रम्याचा उदय व्हावा त्याप्रमाणे हनुमान सुशोभित झाले. ॥२६॥
श्रुत्वा तु राघवस्यैतद् उत्थायोत्थाय वानराः ।
प्रणम्य शिरसा पादौ निर्जग्मुस्ते महाबलाः ॥ २७ ॥
श्रीराघवांचे ते निरोपाचे शब्द ऐकून ते महाबली वानर एकेक करून उठले आणि त्यांच्या चरणी मस्तक नमवून प्रणाम करून तेथून निघून जाऊ लागले. ॥२७॥
सुग्रीवः स च रामेण निरन्तरमुरोगतः ।
विभीषणश्च धर्मात्मा सर्वे ते बाष्पविक्लवाः ॥ २८ ॥
सुग्रीव आणि धर्मात्मा विभीषण श्रीरामांच्या हृदयाशी भिडले आणि त्यांना गाढ आलिंगन देऊन दूर सरले. त्यासमयी ते सर्वच्या सर्व नेत्रातून अश्रु ढाळीत श्रीरामांच्या भावी विरहाने व्यथित झाले होते. ॥२८॥
सर्वे च ते बाष्पकलाः साश्रुनेत्रा विचेतसः ।
सम्मूढा इव दुःखेन त्यजन्तो राघवं तदा ॥ २९ ॥
राघवांना सोडून जातांना ते सर्व दुःखाने किंकर्तव्य विमूढ अथवा अचेतसे झाले होते. कुणाच्याही गळ्यातून आवाज निघत नव्हता आणि सर्वांच्या नेत्रांतून अश्रू झरत होते. ॥२९॥
कृतप्रसादास्तेनैवं राघवेण महात्मना ।
जग्मुः स्वं स्वं गृहं सर्वे देही देहमिव त्यजन् ॥ ३० ॥
महात्मा राघवांनी याप्रकारे कृपा तसेच प्रसन्नतापूर्वक निरोप दिल्यावर ते सर्व वानर विवश होऊन, जसा जीवात्मा विवशतापूर्वक शरीर सोडून परलोकास जातो त्याप्रमाणे आपापल्या घरी निघून गेले. ॥३०॥
ततस्तु ते राक्षसऋक्षवानराः
प्रणम्य रामं रघुवंशवर्धनम् ।
वियोगजाश्रुप्रतिपूर्णलोचनाः
प्रतिप्रयातास्तु यथा निवासिनः ॥ २९ ॥
ते राक्षस, अस्वल आणि वानर रघुवंशवर्धन श्रीरामांना प्रणाम करून नेत्रात वियोगाचे अश्रु घेऊन आपापल्या निवासस्थानी परत गेले. ॥३१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चत्वारिंशः सर्गः ॥ ४० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा चाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP