[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। नवाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामकर्तृकं जाबालिमुनेर्नास्तिकमतं निरस्यास्तिकमतस्य स्थापनम् -
श्रीरामांच्या द्वारा जाबालिंच्या नास्तिक मताचे खण्डण करून आस्तिक मताची स्थापना -
जाबालेस्तु वचः श्रुत्वा रामः सत्यपराक्रमः ।
उवाच परया सूक्त्या बुद्ध्याविप्रतिपन्नया ॥ १ ॥
जाबालिंची ही वचने ऐकून सत्यपराक्रमी श्रीरामचंद्रांनी आपला संशयरहित बुद्धीद्वारा श्रुतिसंमत सदुक्तिचा आश्रय घेऊन म्हटले - ॥ १ ॥
भवान् मे प्रियकामार्थं वचनं यदिहोक्तवान् ।
अकार्यं कार्यसङ्‌काशमपथ्यं पथ्यसंनिभम् ॥ २ ॥
’विप्रवर ! आपण माझे प्रिय करण्याच्या इच्छेने येथे जी गोष्ट सांगितलीत ती कर्तव्यासारखी दिसत असली तरी वास्तविक आचरण्यायोग्य नाही. ती पथ्यासारखी दिसत असूनही वास्तविक अपथ्यकारक आहे. ॥ २ ॥
निर्मर्यादस्तु पुरुषः पापाचारसमन्वितः ।
मानं न लभते सत्सु भिन्नचारित्रदर्शनः ॥ ३ ॥
’जो पुरुष धर्म अथवा वेदांच्या मर्यादेचा त्याग करतो तो पापकर्मात प्रवृत्त होतो. त्याचे आचार आणि विचार दोन्ही भ्रष्ट होऊन जातात, म्हणून तो सत्पुरुषांत कधी सन्मान मिळवू शकत नाही. ॥ ३ ॥
कुलीनमकुलीनं वा वीरं पुरुषमानिनम् ।
चारित्रमेव व्याख्याति शुचिं वा यदि वाशुचिम् ॥ ४ ॥
आचारच दाखवून देतो की कोण पुरुष उत्तम कुळात उत्पन्न झाला आहे आणि कोण अधम कुळात. कोण वीर आहे आणि कोण व्यर्थच आपल्याला पुरुष मानत आहे. तसेच कोण पवित्र आहे आणि कोण अपवित्र आहे. ॥ ४ ॥
अनार्यस्त्वार्यसंस्थानः शौचाद्धीनस्तथा शुचिः ।
लक्षण्यवदलक्षण्यो दुःशीलः शीलवानिव ॥ ५ ॥
आपण जो आचार सांगितलात त्याप्रमाणे वागणारा पुरुष श्रेष्ठ दिसत असला तरी आतून अपवित्र असेल. उत्तम लक्षणांनी युक्त असल्याप्रमाणे प्रतीत होऊनही वास्तविक त्याच्या विपरीत असेल; तसेच शीलवानाप्रमाणे भासत असूनही वस्तुतः तो दुःशीलच असेल. ॥ ५ ॥
अधर्मं धर्मवेषेण यद्यहं लोकसंकरम् ।
अभिपत्स्ये शुभं हित्वा क्रियां विधिविवर्जितम् ॥ ६ ॥

कश्चेतयानः पुरुषः कार्याकार्यविचक्षणः ।
बहु मन्येत मां लोके दुर्वृत्तं लोकदूषणम् ॥ ७ ॥
’आपल्या उपदेशाने वेष तर धर्माचा धारण केला आहे पण वास्तविक तो अधर्म आहे. या योगे संसारात वर्णसंकरतेचा प्रसार होईल. जर मी याचा स्वीकार करून वेदोक्त शुभकर्मांचे अनुष्ठान सोडून देईन आणि विधिहीन कर्मे करू लागेन तर कर्तव्य-अकर्तव्याचे ज्ञान असणारा कोण समजूतदार मनुष्य मला श्रेष्ठ समजून आदर देईल ? अशा स्थितीत तर मी जगतात दुराचारी आणि लोकाला कलंकित करणारा समजला जाईन. ॥ ६-७ ॥
कस्य यास्याम्यहं वृत्तं केन वा स्वर्गमाप्नुयाम् ।
अनया वर्तमानोऽहं वृत्त्या हीनप्रतिज्ञया ॥ ८ ॥
’जेथे आपण केलेली प्रतिज्ञा तोडली जाते, त्या वृत्तीला अनुसरून वर्तन केल्यावर मी कुठल्या साधनाने स्वर्गलोक प्राप्त करेन. तसेच आपण ज्या आचाराचा उपदेश दिला आहे तो कोणाचा आहे, ज्याचे मला अनुसरण करावे लागेल; कारण की आपल्या कथनानुसार मी पिता आदि पैकी कुणाचाही कोणी नाही. ॥ ८ ॥
कामवृत्तोऽन्वयं लोकः कृत्स्नः समुपवर्तते ।
यद्‌वृत्ताः संति राजानस्तद्‌वृत्ताः संति हि प्रजाः ॥ ९ ॥
आपण सांगितलेल्या मार्गाने चाललो तर प्रथम तर मी स्वेच्छाचारी होईन. नंतर हा सारा लोक स्वेच्छाचारी होऊन जाईल. कारण राजे लोकांचे जसे आचरण असते तसेच आचरण प्रजाही करू लागते. ॥ ९ ॥
सत्यमेवानृशंसं च राजवृत्तं सनातनम् ।
तस्मात् सत्यात्मकं राज्यं सत्ये लोकः प्रतिष्ठितः ॥ १० ॥
’सत्याचे पालन हाच राजांचा दयाप्रधान धर्म आहे, सनातन आचार आहे, म्हणून राज्य सत्यस्वरूप आहे. सत्यामध्येच संपूर्ण लोक प्रतिष्ठीत आहेत. ॥ १० ॥
ऋषयश्चैव देवाश्च सत्यमेव हि मेनिरे ।
सत्यवादी हि लोकेऽस्मिन् परं गच्छति चाक्षयम् ॥ ११ ॥
ऋषिंनी आणि देवतांनी सदा सत्याचाच आदर केला आहे.. या लोकात सत्यवादी मनुष्यच अक्षय परम धामात जातो. ॥ ११ ॥
उद्विजन्ते यथा सर्पान्नरादनृतवादिनः ।
धर्मः सत्यपरो लोके मूलं स्वर्गस्य चोच्यते ॥ १२ ॥
’खोटे बोलणार्‍या मनुष्यास सर्व लोक सापाला घाबरतात तसे घाबरत असतात. संसारात सत्यच धर्माची पराकाष्ठा आहे. तेच सर्वाचे मूळ म्हटले जाते. ॥ १२ ॥
सत्यमेवेश्वरो लोके सत्ये धर्मः सदाश्रितः ।
सत्यमूलानि सर्वाणि सत्यान्नास्ति परं पदम् ॥ १३ ॥
’जगतात सत्यच ईश्वर आहे. सदा सत्याच्याच आधारावर धर्माची स्थिती राहात असते. सत्य हेच सर्वांचे मूळ आहे. सत्याहून श्रेष्ठ दुसरे कुठलेही परम पद नाही. ॥ १३ ॥
दत्तमिष्टं हुतं चैव तप्तानि च तपांसि च ।
वेदाः सत्यप्रतिष्ठानास्तस्मात् सत्यपरो भवेत् ॥ १४ ॥
’दान, यज्ञ, होम, तपस्या आणि वेद या सर्वांचा आधार सत्यच आहे. म्हणून सर्वांनी सत्यपरायण झाले पाहिजे. ॥ १४ ॥
एकः पालयते लोकमेकः पालयते कुलम् ।
मज्जत्येको हि निरय एकः स्वर्गे महीयते ॥ १५ ॥
’एक मनुष्य संपूर्ण जगताचे पालन करतो, एक संपूर्ण कुळाचे पालन करतो, एक नरकात बुडतो आणि एक स्वर्गलोकात प्रतिष्ठित होत असतो. ॥ १५ ॥
सोऽहं पितुर्निदेशं तु किमर्थं नानुपालये ।
सत्यप्रतिश्रवः सत्यं सत्येन समयीकृतम् ॥ १६ ॥
’मी सत्यप्रतिज्ञ आहे आणि सत्याची शपथ घेऊन पित्याच्या सत्याचे पालन करण्याचा मी स्वीकार करून चुकलो आहे. अशा स्थितीमध्ये पित्याच्या आदेशाचे पालन कशासाठी करणार नाही ? ॥ १६ ॥
नैव लोभान्न मोहाद् वा न चाज्ञानात् तमोऽन्वितः ।
सेतुं सत्यस्य भेत्स्यामि गुरोः सत्यप्रतिश्रवः ॥ १७ ॥
’प्रथम सत्यपालनाची प्रतिज्ञा करून आता लोभ, मोह अथवा अज्ञानाने विवेकशून्य होऊन मी पित्याच्या सत्याच्या मर्यादेचा भंग करणार नाही. ॥ १७ ॥
असत्यसंधस्य सतश्चलस्यास्थिरचेतसः ।
नैव देवा न पितरः प्रतीच्छन्तीति नः श्रुतम् ॥ १८ ॥
आम्ही असे ऐकले आहे की जो आपली प्रतिज्ञा खोटी करण्यामुळे कर्मापासून भ्रष्ट होतो त्या चंचल चित्ताच्या पुरुषांनी दिलेल्या हव्य-कव्याचा देवता आणि पितर स्वीकार करीत नाहीत. ॥ १८ ॥
प्रत्यगात्ममिमं धर्मं सत्यं पश्याम्यहं ध्रुवम् ।
भारः सत्पुरुषैश्चीर्णस्तदर्थमभिनन्द्यते ॥ १९ ॥
’मी या सत्यरूपी धर्माला समस्त प्राण्यांसाठी हितकर आणि सर्व धर्मात श्रेष्ठ मानतो. सत्पुरुषांनी जटा-वल्कल आदिच्या धारणरूप तापस धर्माचे पालन केले आहे म्हणून मीही त्यांचे अभिनंदन करतो. ॥ १९ ॥
क्षात्रं धर्ममहं त्यक्ष्ये ह्यधर्मं धर्मसंहितम् ।
क्षुद्रैर्नृशंसैर्लुब्धैश्च सेवितं पापकर्मभिः ॥ २० ॥
’जो धर्मयुक्त प्रतीत होत आहे परंतु वास्तविक अधर्मरूप आहे; ज्याचे नीच, क्रूर, लोभी आणि पापाचारी पुरुषांनी सेवन केले आहे अशा क्षात्रधर्माचा (पित्याची आज्ञा भंग करून राज्य ग्रहण करण्याचा) मी अवश्य त्याग करीन. कारण ते न्याययुक्त नाही. ॥ २० ॥
कायेन कुरुते पापं मनसा सम्प्रधार्य तत् ।
अनृतं जिह्वया चाह त्रिविधं कर्म पातकम् ॥ २१ ॥
’मनुष्य आपल्या शरीराने जे पाप करतो, त्यास प्रथम मनाच्या द्वारे कर्तव्यरूपाने निश्चित करीत असतो. नंतर जिव्हेच्या साहाय्याने त्या अनृत पापकर्मास वाणीद्वारा संपन्न करीत असतो. याप्रकारे एकच पातक कायिक, वाचिक आणि मानसिक भेदाने तीन प्रकारचे होत असते. ॥ २१ ॥
भूमिः कीर्तिर्यशो लक्ष्मीः पुरुषं प्रार्थयन्ति हि ।
सत्यं समनुवर्तन्ते सत्यमेव भजेत् ततः ॥ २२ ॥
’पृथ्वी, कीर्ति, यश आणि लक्ष्मी - ही सर्वच्या सर्व सत्यवादी पुरुषाच्या प्राप्तीची इच्छा करीत असतात आणि शिष्ट पुरुष सत्याचेच अनुसरण करतात; म्हणून मनुष्याने सदा सत्याचेच सेवन केले पाहिजे. ॥ २२ ॥
श्रेष्ठं ह्यनार्यमेव स्याद् यद् भवानवधार्य माम् ।
आह युक्तिकरैर्वाक्यैरिदं भद्रं कुरुष्व ह ॥ २३ ॥
आपण उचित म्हणून सिद्ध करून तर्कपूर्ण वचनांच्या द्वारा मला जे सांगितले आहे की ’राज्य ग्रहण करण्यातच कल्याण आहे म्हणून ते अवश्य स्वीकार करा’; आपला हा आदेश श्रेष्ठसा प्रतीत होत असूनही सज्जन पुरुषांच्या द्वारे आचरणात आणण्यास योग्य नाही. कारण तो स्वीकार केल्याने सत्य आणि न्याय यांचे उल्लंघन होते. ॥ २३ ॥
कथं ह्यहं प्रतिज्ञाय वनवासमिमं गुरोः ।
भरतस्य करिष्यामि वचो हित्वा गुरोर्वचः ॥ २४ ॥
’मी पित्याच्या समक्ष वनात राहण्याची प्रतिज्ञा करून चुकलो आहे. आता त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करून मी भरताची गोष्ट कशी मान्य करू ? ॥ २४ ॥
स्थिरा मया प्रतिज्ञाता प्रतिज्ञा गुरुसन्निधौ ।
प्रहृष्टमानसा देवी कैकेयी चाभवत् तदा ॥ २५ ॥
’गुरूंच्या समीप केलेली माझी ती प्रतिज्ञा अटळ आहे - कुठल्याही प्रकारे ती तोडली जाऊ शकत नाही. ज्यावेळी प्रतिज्ञा केली होती त्या समयी देवी कैकेयीचे हृदय आनंदाने प्रफुल्ल झाले होते. ॥ २५ ॥
वनवासं वसन्नेवं शुचिर्नियतभोजनः ।
मूलैः पुष्पफलैः पुण्यैः पितॄन् देवांश्च तर्पयन् ॥ २६ ॥
’मी वनांतच राहून अंतर्बाह्य पवित्र होऊन नियमित भोजन करीन आणि पवित्र फल, मूल आणि पुष्पांच्या द्वारा देवता आणि पितरांना तृप्त करीत प्रतिज्ञेचे पालन करीन. ॥ २६ ॥
संतुष्टपञ्चवर्गोऽहं लोकयात्रां प्रवाहये ।
अकुहः श्रद्दधानः सन् कार्याकार्यविचक्षणः ॥ २७ ॥
’काय केले पाहिजे आणि काय करावयाचे नाही याचा निश्चय मी करून चुकलो आहे. म्हणून फल, मूल आदिंनी पांचही इंद्रियांना संतुष्ट करून निश्चल, श्रद्धापूर्वक लोकयात्रेचा (पित्याच्या आज्ञेचे पालनरूप व्यवहाराचा) निर्वाह करीन. ॥ २७ ॥
कर्मभूमिमिमां प्राप्य कर्तव्यं कर्म यच्छुभम् ।
अग्निर्वायुश्च सोमश्च कर्मणां फलभागिनः ॥ २८ ॥
’या कर्मभूमीची प्राप्ती झाल्यावर जे शुभ कार्य असेल त्याचे अनुष्ठान केले पाहिजे. कारण अग्नि, वायु, तसेच सोमही कर्मांच्याच फळाने त्या त्या पदांचे भागी झाले आहेत. ॥ २८ ॥
शतं क्रतूनामाहृत्य देवराट् त्रिदिवं गतः ।
तपांस्युग्राणि चास्थाय दिवं याता महर्षयः ॥ २९ ॥
’देवराज इंद्र शंभर यज्ञांचे अनुष्ठान करून स्वर्गलोकास प्राप्त झाले आहेत. महर्षिंनी उग्र तपस्या करून दिव्य लोकात स्थान प्राप्त केले आहे." ॥ २९ ॥
अमृष्यमाणः पुनरुग्रतेजा
     निशम्य तन्नास्तिकवाक्यहेतुम् ।
अथाब्रवीत् त नृपतेस्तनूजो
     विगर्हमाणो वचनानि तस्य ॥ ३० ॥
उग्र तेजस्वी राजकुमार श्रीराम परलोकाच्या सत्तेचे खण्डण करणार्‍या जाबालिंच्या पूर्वोक्त वचनांना ऐकून ती सहन करणे शक्य न झाल्याने त्या वचनांची निंदा करीत पुन्हा त्यांना म्हणाले - ॥ ३० ॥
सत्यं च धर्मं च पराक्रमं च
     भूतानुकम्पां प्रियवादितां च ।
द्विजातिदेवातिथिपूजनं च
     पन्थानमाहुस्त्रिदिवस्य सन्तः ॥ ३१ ॥
"सत्य, धर्म, पराक्रम, समस्त प्राण्यांच्यावर दया, सर्वांशी प्रियवचन बोलणे; तसेच देवता अतिथी आणि ब्राह्मणांची पूजा करणे - या सर्वांना साधु पुरुषांनी स्वर्गलोकाचा मार्ग म्हटले आहे. ॥ ३१ ॥ "
तेनैवमाज्ञाय यथावदर्थ-
     मेकोदयं संप्रतिपद्य विप्राः ।
धर्मं चरन्तः सकलं यथावत्
     काङ्‌क्षन्ति लोकागममप्रमत्ताः ॥ ३२ ॥
’सत्पुरुषांच्या या वचनानुसार धर्माचे स्वरूप जाणून तसेच अनुकूल तर्काने त्याचा यथार्थ निर्णय करून एका निश्चयावर पोहोचलेला सावधान ब्राह्मण उत्तमप्रकारे धर्माचरण करून त्या त्या उत्तम लोकांची प्राप्ती करण्याची इच्छा करतो. ॥ ३२ ॥
निन्दाम्यहं कर्म कृतं पितुस्तद्
     यस्त्वामगृह्णाद् विषमस्थबुद्धिम् ।
बुद्ध्यानयैवंविधया चरन्तं
     सुनास्तिकं धर्मपथादपेतम् ॥ ३३ ॥
’आपली बुद्धि विषम मार्गात स्थित झाली आहे. आपण वेदविरुद्ध मार्गाचा आश्रय घेतलेला आहे. आपण घोर नास्तिक आणि धर्म मार्गापासून कित्येक कोस दूर गेले आहात. अशा पाखण्डमयी बुद्धिच्या द्वारा अनुचित विचारांचा प्रचार करणार्‍या आपल्याला माझ्या पित्याने जो आपला याजक बनविले आहे, त्या त्यांच्या कार्याची मी निंदा करतो. ॥ ३३ ॥
यथा हि चोरः स तथा हि बुद्ध-
     स्तथागतं नास्तिकमत्र विद्धि ।
तस्माद्धि यः शङ्‌क्यतमः प्रजानां
     न नास्तिके नाभिमुखो बुधः स्यात् ॥ ३४ ॥
’ज्याप्रमाणे चोर दण्डनीय असतो त्या प्रकारेच (वेदविरोधी) बुद्ध (बौद्धमतावलंबी) ही दण्डनीय आहेत. तथागत (नास्तिकविशेष) आणि नास्तिक (चार्वक) यांनाही येथे याच कोटीचा समजले पाहिजे. म्हणून प्रजेवर अनुग्रह करण्यासाठी राजाच्या द्वारे या नास्तिकास दण्ड दिला जाणे शक्य व्हावे, त्याला तर चोराप्रमाणे दण्ड दिला जावा. परंतु जे अधिकाराच्या बाहेर असतील त्या नास्तिकाप्रति विद्वान ब्राह्मणाने कधी उन्मुख होऊ नये, त्याच्याशी वार्तालापही करू नये. ॥ ३४ ॥
त्वत्तो जनाः पूर्वतरे द्विजाश्च
     शुभानि कर्माणि बहूनि चक्रुः ।
छित्वा सदेमं च परं च लोकं
     तस्माद् द्विजाः स्वस्ति कृतं हुतं च ॥ ३५ ॥
’आपल्याखेरीज पूर्वीच्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी इहलोक आणि परलोकाच्या फल कामनेचा परित्याग करून वेदोक्त धर्म समजून सदाच बर्‍याचशा शुभकर्मांचे अनुष्ठान केले आहे. म्हणून जे कोणी ब्राह्मण आहेत ते वेदांनाच प्रमाण मानून स्वस्तिकृत (अहिंसा आणि सत्य आदि) तप, दान आणि परोपकार आदि; तसेच हुत (यज्ञ-याग आदि) कर्मांचे संपादन करतात. ॥ ३५ ॥
धर्मे रताः सत्पुरुषैः समेता-
     तेजस्विनो दानगुणप्रधानाः ।
अहिंसका वीतमलाश्च लोके
     भवन्ति पूज्या मुनयः प्रधानाः ॥ ३६ ॥
’जे धर्मात तत्पर राहतात, सत्पुरुषांच्या संगतीत राहतात, तेजाने संपन्न आहेत, आणि ज्यांच्या ठिकाणी दानरूपी गुणांची प्रधानता आहे, जे कुणी कुण्या प्राण्याची हिंसा करीत नाहीत; तसेच जे मलसंसर्गाने रहित आहेत असे श्रेष्ठ मुनिच संसारात पूजनीय होत असतात." ॥ ३६ ॥
इति ब्रुवन्तं वचनं सरोषं
     रामं महात्मानमदीनसत्त्वम् ।
उवाच पथ्यं पुनरास्तिकं च
     सत्यं वचः सानुनयं च विप्रः ॥ ३७ ॥
महात्मा श्रीराम स्वभावानेच दैन्यभाव रहित होते. त्यांनी जेव्हां रोषपूर्वक पूर्वोक्त गोष्ट सांगितली, तेव्हा ब्राह्मण जाबालि विनयपूर्वक हे आस्तिकतापूर्ण, सत्य आणि हितकर वचन बोलले - ॥ ३७ ॥
न नास्तिकानां वचनं ब्रवीम्यहं
     न नास्तिकोऽहं न च नास्ति किञ्चन ।
समीक्ष्य कालं पुनरास्तिकोऽभवं
     भवेय काले पुनरेव नास्तिकः ॥३८॥
’रघुनंदन ! मी नास्तिक नाही आणि नास्तिकांसारखे बोलत नाही. परलोक आदि काही नाही असे माझे मतही नाही. मी अवसर पाहून परत आस्तिक झालो आहे आणि लौकिक व्यवहाराच्या समयी आवश्यकता असेल तर पुन्हा नास्तिकही होऊ शकतो - नास्तिकांच्या सारखे बोलू शकतो. ॥ ३८ ॥
स चापि कालोऽयमुपागतः शनै-
     र्यथा मया नास्तिकवागुदीरिता ।
निवर्तनार्थं तव राम कारणात्
     प्रसादनार्थं तु मयैतदीरितम् ॥ ३९ ॥
"यावेळी असा अवसर आला होता, ज्यामुळे मी हळूहळू नास्तिकांसारखे बोललो. श्रीरामा ! मी जे जे बोललो यात माझा उद्देश हाच होता की कोणत्याही प्रकारे आपल्याला प्रसन्न करून अयोध्येस परत येण्यासाठी तयार करावे."॥ ३९ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे नवोत्तरशततमः सर्गः ॥ १०९ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे नववा सर्ग पूरा झाला ॥ १०९ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP