श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। द्वात्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
ब्रह्मपुत्रस्य कुशस्य चतुर्णां पुत्राणां शोणभद्रतटवर्तिभूतलस्योपरि वसोरधिकरस्य प्रतिपादनं कुशनाभस्य कन्याशतस्य कोपेन कुब्जत्वम् -
ब्रह्मपुत्र कुशाच्या चार पुत्रांचे वर्णन, शोणभद्र तटवर्ती प्रदेशास वसुंची भूमि सांगणे, कुशनाभाच्या शंभर कन्यांचे वायुच्या कोपाने 'कुब्जा' होणे -
ब्रह्मयोनिर्महानासीत् कुशो नाम महातपाः ।
अक्लिष्टव्रतधर्मज्ञः सज्जनप्रतिपूजकः ॥ १ ॥
विश्वामित्र सांगू लागले - श्रीरामा ! पूर्वकाली कुश नावाचा एक प्रसिद्ध महातेजस्वी राजा होऊन गेला. तो साक्षात् ब्रह्मदेवाचा पुत्र होता. त्याचे प्रत्येक व्रत आणि संकल्प कुठल्याही क्लेशाशिवाय अथवा अडचणीशिवाय पूर्ण होत असत. तो धर्माचा ज्ञाता आणि सत्पुरुषांचा आदर करणारा आणि महान् होता. ॥ १ ॥
स महात्मा कुलीनायां युक्तायां सुमहाबलान् ।
वैदर्भ्यां जनयामास चतुरः सदृशान् सुतान् ॥ २ ॥
उत्तम कुळात उत्पन्न विदर्भदेशाची राजकुमारी त्याची पत्‍नी होती. तिच्या गर्भांपासून त्या महात्मा नरेशाने स्वतः सारखेच चार पुत्र उत्पन्न केले. ॥ २ ॥
कुशाम्बं कुशनाभं च असूर्तरजसं वसुम् ।
दीप्तियुक्तान् महोत्साहान् क्षत्रधर्मचिकीर्षया ॥ ३ ॥

तानुवाच कुशः पुत्रान् धर्मिष्ठान् सत्यवादिनः ।
क्रियतां पालनं पुत्रा धर्मं प्राप्स्यथ पुष्कलम् ॥ ४ ॥
त्यांची नावे, कुशाम्ब, कुशनाभ, असूर्तरजस आणि वसु अशी होती. ते सर्वच्या सर्व तेजस्वी तथा महान् उत्साही होते. राजा कुशाने 'प्रजारक्षणरूप' क्षत्रिय धर्माच्या पालनाच्या इच्छेने आपल्या धर्मिष्ठ आणि सत्यवादी पुत्रांना म्हटले - "पुत्रांनो ! प्रजेचे पालन करा. या योगे तुम्हाला धर्माचे पुरेपूर फल प्राप्त होईल." ॥ ३-४ ॥
कुशस्य वचनं श्रुत्वा चत्वारो लोकसत्तमाः ।
निवेशं चक्रिरे सर्वे पुराणां नृवरास्तदा ॥ ५ ॥
आपला पिता महाराज कुश याचे हे बोलणे ऐकून त्या चारी लोकशिरोमणि नरश्रेष्ठ राजकुमारांनी त्या समयी आपापल्यासाठी पृथक् पृथक् नगरे निर्माण केली. ॥ ५ ॥
कुशाम्बस्तु महातेजाः कौशाम्बीमकरोत् पुरीम् ।
कुशनाभस्तु धर्मात्मा पुरं चक्रे महोदयम् ॥ ६ ॥
महातेजस्वी कुशाम्बाने 'कौशाम्बी' पुरी वसविली (जिला आजकाल 'कोसम' म्हटले जाते). धर्मात्मा कुशनाभाने 'महोदय' नामक नगर निर्माण करविले. ॥ ६ ॥
आसूर्तरजसो नाम धर्मारण्यं महीपतिः ।
चक्रे पुरवरं राजा वसुनाम गिरिव्रजम् ॥ ७ ॥
'परम बुद्धिमान् असूर्तरजसने 'धर्माख्य' नामक एक श्रेष्ठ नगर वसविले आणि राजा वसुने 'गिरिव्रज' नगराची स्थापना केली. ॥ ७ ॥
एषा वसुमती नाम वसोस्तस्य महात्मनः ।
एते शैलवराः पञ्च प्रकाशंते समन्ततः ॥ ८ ॥
'महात्मा वसुची ही 'गिरिव्रज' नामक राजधानी वसुमती नावाने प्रसिद्ध झाली. तिच्या चारी बाजूला हे पाच पर्वत सुशोभित होत होते. ॥ ८ ॥
सुमागधी नदी रम्या मगधान् विश्रुताऽऽययौ ।
पञ्चानां शैलमुख्यानां मध्ये मालेव शोभते ॥ ९ ॥
'ही रमणीय सोन नदी दक्षिण-पश्चिम दिशेकडे वाहात मगध देशात आली आहे. म्हणून येथे 'सुमागधी' नावाने विख्यात झाली आहे. ही या पाच श्रेष्ठ पर्वतांच्या मध्ये माळेसारखी सुशोभित होत आहे. ॥ ९ ॥
सैषा हि मागधी राम वसोस्तस्य महात्मनः ।
पूर्वाभिचरिता राम सुक्षेत्रा सस्यमालिनी ॥ १० ॥
'श्रीरामा ! या प्रकारे 'मागधी' नावाने प्रसिद्ध झालेली ही सोन नदी पूर्वोक्त महात्मा वसुशी संबंधित आहे. रघुनंदना ! ही दक्षिण पश्चिमेकडून येऊन पूर्वोत्तर दिशेकडे प्रवाहित झाली आहे. हिच्या दोन्ही तटावर सुंदर क्षेत्र (सुपीक जमीन) आहे म्हणून ही सदा सस्य-मालांनी अलंकृत, हिरव्यागार शेतांनी सुशोभित असते. ॥ १० ॥
कुशनाभस्तु राजर्षिः कन्याशतमनुत्तमम् ।
जनयामास धर्मात्मा घृताच्यां रघुनन्दन ॥ ११ ॥
'हे रघुनंदना ! धर्मात्मा राजर्षि कुशनाभाने घृताची अप्सरेच्या गर्भापासून परम उत्तम शंभर कन्यांना जन्म दिला. ॥ ११ ॥
तास्तु यौवनशालिन्यो रूपवत्यः स्वलङ्‍कृताः ।
उद्यानभूमिमागम्य प्रावृषीव शतह्रदाः ॥ १२ ॥

गायन्त्यो नृत्यमानाश्च वादयत्यस्तु राघव ।
आमोदं परमं जग्मुर्वराभरणभूषिताः ॥ १३ ॥
त्या सर्वच्या सर्व सुंदर रूप लावण्यांनी सुशोभित होत्या. हळू हळू युवावस्थेने येऊन त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर घातली. रघुवीरा ! एक दिवस वस्त्रे आणि आभूषणांनी विभूषित होऊन त्या सर्व राजकन्या उद्यान भूमिमध्ये येऊन वर्षा ऋतूत प्रकाशित होणार्‍या विद्युन्मालांप्रमाणे शोभून दिसत होत्या. सुंदर अलंकारांनी अलंकृत झालेल्या त्या अंगना गात, वाद्ये वाजवीत आणि नृत्य करीत तेथे परम आमोद-प्रमोदात मग्न होऊन गेल्या. ॥ १२-१३ ॥
अथ ताश्चारुसर्वाङ्‍ग्यो रूपेणाप्रतिमा भुवि ।
उद्यानभूमिमागम्य तारा इव घनान्तरे ॥ १४ ॥
त्यांची सारी अंगे मनोहर होती. या भूतलावर त्यांच्या रूप सौंदर्याची कुठे तुलना होऊ शकत नव्हती. उद्यानात येऊन त्या ढगांमध्ये थोड्या थोड्या लपलेल्या तारकांप्रमाणे शोभून दिसत होत्या. ॥ १४ ॥
ताः सर्वगुणसम्पन्‍ना रूपयौवनसंयुताः ।
दृष्ट्‍वा सर्वात्मको वायुरिदं वचनमब्रवीत् ॥ १५ ॥
त्या समयी उत्तम गुणांनी संपन्न आणि रूप व यौवनाने सुशोभित त्या सर्व राजकन्यांना पाहून सर्वस्वरूप वायुदेवाने त्यांना या प्रकारे म्हटले - ॥ १५ ॥
अहं वः कामये सर्वा भार्या मम भविष्यथ ।
मानुषस्त्यज्यतां भावो दीर्घमायुरवाप्स्यथ ॥ १६ ॥
"सुंदरींनो, मी तुम्हां सर्वांना आपल्या प्रेयसीच्या रूपात प्राप्त करण्याची इच्छा करीत आहे. तुम्ही सर्व माझ्या भार्या बना. आता मनुष्यभावाचा त्याग करा आणि माझा अंगिकार करून देवांगनांप्रमाणे दीर्घ आयु प्राप्त करा. ॥ १६ ॥
चलं हि यौवनं नित्यं मानुषेषु विशेषतः ।
अक्षयं यौवनं प्राप्ता अमर्यश्च भविष्यथ ॥ १७ ॥
" विशेषतः मानव शरीरात यौवन कधी स्थीर राहात नाही. प्रतिक्षण क्षीण होत जाते. माझ्याशी संबंध झाल्याने तुम्हाला अक्षय यौवन प्राप्त होऊन तुम्ही अमर होऊन जाल." ॥ १७ ॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा वायोरक्लिष्टकर्मणः ।
अपहास्य ततो वाक्यं कन्याशतमथाब्रवीत् ॥ १८ ॥
अनायास महान् कर्म करणार्‍या वायुदेवाचे हे कथन ऐकून त्या शंभर कन्या अवहेलनापूर्वक हसत म्हणाल्या - ॥ १८ ॥
अन्तश्चरसि भूतानां सर्वेषां सुरसत्तम ।
प्रभावज्ञाश्च ते सर्वाः किमर्थमवमन्यसे ॥ १९ ॥
'सुरश्रेष्ठ ! आपण प्राणवायुच्या रूपाने समस्त प्राण्यांच्या अंतरंगात विचरत असता (म्हणून सर्वांच्या मनांतील गोष्टी जाणता आणि आपल्याला हे माहित असेल की आमच्या मनांत आपल्याविषयी कोणतेही आकर्षण नाही). आम्ही सर्व बहिणी आपला अनुपम प्रभावही जाणतो (तरीही आमच्या मनांत आपल्याविषयी अनुराग नाही). अशा स्थितीमध्ये हा अनुचित प्रस्ताव करून आमचा अपमान कशासाठी करीत आहांत ? ॥ १९ ॥
कुशनाभसुताः देव समस्ताः सुरसत्तम ।
स्थानाच्च्यावयितुं देवं रक्षामस्तु तपो वयम् ॥ २० ॥
'देव ! देवशिरोमणि ! आम्ही सर्वच्या सर्व राजर्षि कुशनाभाच्या कन्या आहोत. देवता असूनही आपल्याला शाप देऊन वायुपदापासून आम्ही भ्रष्ट करू शकतो, परंतु आम्ही असे करू इच्छित नाही; कारण आम्ही आमच्या तपास सुरक्षित ठेवीत आहोत. ॥ २० ॥
मा भूत् स कालो दुर्मेधः पितरं सत्यवादिनम् ।
नावमन्य स्वधर्मेण स्वयं वरमुपास्महे ॥ २१ ॥
'दुर्मते ! अशी वेळ कधी येऊ नये की आम्ही आमच्या सत्यवादी पित्याची अवहेलना करून कामवश अथवा अत्यंत अधर्मपूर्वक स्वतःच वर शोधू लागू. ॥ २१ ॥
पिता हि प्रभुरस्माकं दैवतं परमं च सः ।
यस्य नो दास्यति पिता स नो भर्ता भविष्यति ॥ २२ ॥
आमच्यावर आमच्या पित्याचे प्रभुत्व आहे. ते आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत. पिता आम्हाला ज्याच्या हाती सोपवतील तोच आमचा पति असेल." ॥ २२ ॥
तासां तु वचनं श्रुत्वा हरिः परमकोपनः ।
प्रविश्य सर्वगात्राणि बभञ्ज भगवान् प्रभुः ॥ २३ ॥

अरत्‍निमात्राकृतयो भग्नगात्रा भयार्दिताः ।
त्यांचे हे बोलणे ऐकून वायुदेव अत्यंत कुपित झाले. त्या ऐश्वर्यशाली प्रभुने त्यांच्यात प्रविष्ट होऊन त्यांच्या सार्‍या अंगांना वाकवून तिरके करून टाकले. शरीर वाकडे केले गेल्याने त्या सर्व कुब्जा बनल्या. त्यांची आकृति मूठ वळलेल्या एका हाताएवढी झाली. त्या भयाने व्याकुळ झाल्या. ॥ २३ १/२ ॥
ताः कन्याः वायुना भग्ना विविशुर्नृपतेर्गृहम् ।
प्रविश्य च सुसम्भ्रान्ताः सलज्जाः साश्रुलोचनाः ॥ २४ ॥
वायुदेव द्वारा कुबडी बनविल्या गेलेल्या त्या कन्यांनी राजभवनात प्रवेश केला. प्रवेश करतांच त्या लज्जित आणि उद्विग्न झाल्या. त्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ॥ २४ ॥
स च ता दयिता भग्नाः कन्याः परमशोभनाः ।
दृष्ट्‍वा दीनास्तदा राजा सम्भ्रान्त इदमब्रवीत् ॥ २५ ॥
आपल्या परम सुंदर प्रिय कन्यांना कुबड आल्याने अत्यंत दयनीय अवस्थेत पडलेल्या पाहून राजा कुशनाभ घाबरून गेले आणि म्हणाले - ॥ २५ ॥
किमिदं कथ्यतां पुत्र्यः को धर्ममवमन्यते ।
कुब्जाः केन कृताः सर्वाश्चेष्टन्त्यो नाभिभाषथ ।
एवं राजा विनिःश्वस्य समाधिं संदधे ततः ॥ २६ ॥
'मुलिंनो ! हे काय झाले ? सांगा बरे ! कोण प्राणी धर्माची अवहेलना करीत आहे ? कुणी तुम्हाला असे कुबडे बनविले आहे, की ज्यामुळे तुम्ही तडफडत आहात परंतु काही सांगत नाही आहात." असे म्हणून राजाने दीर्घ श्वास घेतला आणि त्यांचे उत्तर ऐकण्यासाठी सावधान होऊन बसला. ॥ २६ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकाये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे द्वात्रिंशः सर्गः ॥ ३२ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा बत्तिसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३२ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP