श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षण्णनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सुग्रीवेण राक्षससेनायाः संहारो विरूपाक्षस्य वधश्च -
सुग्रीव द्वारा राक्षससेनेचा संहार आणि विरूपाक्षाचा वध -
तथा तैः कृत्तगात्रैस्तु दशग्रीवेण मार्गणैः ।
बभूव वसुधा तत्र प्रकीर्णा हरिभिस्तदा ॥ १ ॥
याप्रकारे जेव्हा रावणाने आपल्या बाणांनी वानरांची अंगे भंग करून टाकली, तेव्हा तेथे धराशायी झालेल्या वानरांनी ती सारी रणभूमी भरून गेली. ॥१॥
रावणस्याप्रसह्यं तं शरसम्पातमेकतः ।
न शेकुः सहितुं दीप्तं पतङ्‌गा ज्वलनं यथा ॥ २ ॥
रावणाच्या त्या असह्य बाणप्रहारांना ते वानर एक क्षणही सहन करू शकले नाहीत. जसे पतंग जळत्या आगीचा स्पर्श क्षणभरही सहन करू शकत नाहीत त्याप्रमाणे. ॥२॥
तेऽर्दिता निशितैर्बाणैः क्रोशन्तो विप्रदुद्रुवुः ।
पावकार्चिःसमाविष्टा दह्यमाना यथा गजाः ॥ ३ ॥
राक्षसराजाच्या तीक्ष्ण बाणांच्या मार्‍याने पीडित होऊन ते वानर, दावानलाच्या ज्वालांनी घेरले जाऊन जळणारे हत्ती जसे चीत्कार करीत पळू लागतात त्याप्रमाणे आरडा ओरडा करीत पळाले. ॥३॥
प्लवङ्‌गानामनीकानि महाभ्राणीव मारुतः ।
स ययौ समरे तस्मिन् विधमन् रावणः शरैः ॥ ४ ॥
जसा वारा मोठ मोठ्‍या ढगांना छिन्न-भिन्न करून टाकतो, त्याचप्रकारे रावण आपल्या बाणांनी वानरसेनांचा संहार करीत समरांगणात विचरू लागला. ॥४॥
कदनं तरसा कृत्वा राक्षसेन्द्रो वनौकसाम् ।
आससाद ततो युद्धे त्वरितं राघवं रणे ॥ ५ ॥
मोठ्‍या वेगाने वानरांचा संहार करून तो राक्षसराज समरांगणात लढण्यासाठी तात्काळच राघवांजवळ जाऊन पोहोचला. ॥५॥
सुग्रीवस्तान् कपीन् दृष्ट्‍वा भग्नान् विद्रावितान् रणे ।
गुल्मे सुषेणं निक्षिप्य चक्रे युद्धे द्रुतं मनः ॥ ६ ॥
इकडे सुग्रीवांनी पाहिले की वानर सैनिक रावणाकडून पिटाळले जाऊन समरभूमीपासून पळून जात आहेत तेव्हा त्यांनी सेनेला स्थिर ठेवण्याचा भार सुषेणावर सोपवून स्वतःच शीघ्र युद्ध करण्याचा विचार केला. ॥६॥
आत्मनः सदृशं वीरः स तं निक्षिप्य वानरम् ।
सुग्रीवोऽभिमुखः शत्रुं प्रतस्थे पादपायुधः ॥ ७ ॥
सुषेणांना आपल्याच सारखे पराक्रमी वीर समजून त्यांनी त्यांच्यावर सेनेच्या रक्षणाचे कार्य सोपवले आणि स्वतः वृक्ष घेऊन शत्रुंच्यासमोर प्रस्थान केले. ॥७॥
पार्श्वतः पृष्टतश्चास्य सर्वे सर्वे वानरयूथपाः ।
अनुजह्रुर्महाशैलान् विविधांश्च वनस्पतीन् ॥ ८ ॥
त्यांच्या आजूबाजूला आणि मागे समस्त वानरयूथपति मोठ मोठे पत्थर आणि नाना प्रकारचे वृक्ष घेऊन निघाले. ॥८॥
ननर्द युधि सुग्रीवः स्वरेण महता महान् ।
पातयन् विविधांश्चान्यान् जगामोत्तमराक्षसान् ॥ ९ ॥

ममर्द च महाकायो राक्षसान् वानरेश्वरः ।
युगान्तसमये वायुः प्रवृद्धानगमानिव ॥ १० ॥
त्यासमयी सुग्रीवांनी युद्धात उच्चस्वराने गर्जना केली आणि प्रलयकालात मोठ मोठ्‍या वृक्षांना उपटून फेकून देणार्‍या वायुदेवाप्रमाणे त्या विशालकाय वानरराजांनी विभिन्न प्रकारच्या आकृति असणार्‍या मोठ मोठ्‍या राक्षसांना पाडून पाडून मथून आणि चिरडून टाकले. ॥९-१०॥
राक्षसानामनीकेषु शैलवर्षं ववर्ष ह ।
अश्मवर्षं यथा मेघः पक्षिसङ्‌घेषु कानने ॥ ११ ॥
जसा मेघ वनात पक्ष्यांच्या वर गारांची वृष्टि करतो, त्याच प्रकारे सुग्रीव राक्षसांच्या सेनाच्यावर मोठ मोठ्‍या पत्थरांचा वर्षाव करू लागले. ॥११॥
कपिराजविमुक्तैस्तैः शैलवर्षैस्तु राक्षसाः ।
विकीर्णशिरसः पेतुः विकीर्णा इव पर्वताः ॥ १२ ॥
वानरराजांनी फेकलेल्या शैलखण्डांच्या वृष्टिने राक्षसांची मस्तके फुटून जात होती आणि ते ढासळलेल्या पर्वतांप्रमाणे धराशायी होऊन जात होते. ॥१२॥
अथ सङ्‌क्षीयमाणेषु राक्षसेषु समन्ततः ।
सुग्रीवेण प्रभग्नेषु नदत्सु च पतत्सु च ॥ १३ ॥

विरूपाक्षः स्वकं नाम धन्वी विश्राव्य राक्षसः ।
रथादाप्लुत्य दुर्धर्षो गजस्कन्धमुपारुहत् ॥ १४ ॥
याप्रकारे सुग्रीवांच्या मार्‍याने जेव्हा सर्वत्र राक्षसांचा विनाश होऊ लागला तसेच ते पळू लागले आणि आर्तनाद करीत पृथ्वीवर कोसळू लागले तेव्हा विरूपाक्ष नामक दुर्जय राक्षस हातात धनुष्य घेऊन आपल्या नावाची घोषणा करीत रथांतून उडी मारून उतरून हत्तीच्या पाठीवर जाऊन चढला. ॥१३-१४॥
स तं द्विपममारुह्य विरूपाक्षो महाबलः ।
ननर्द भीमनिर्ह्रादं वानरानभ्यधावत ॥ १५ ॥
त्या हत्तीवर चढून महाबली विरूपाक्षाने फार भयानक आवाजात गर्जना केली आणि वानरांवर वेगपूर्वक हल्ला केला. ॥१५॥
सुग्रीवे स शरान् घोरान् विससर्ज चमूमुखे ।
स्थापयामास चोद्विग्नान् राक्षसान् सम्प्रहर्षयन् ॥ १६ ॥
त्याने सेनेच्या तोंडावरच सुग्रीवाला लक्ष्य करून मोठे भयंकर बाण सोडले आणि ठाम उभे असलेल्या राक्षसांचा हर्ष वाढवीत त्यांना स्थिरतापूर्वक स्थापित केले. ॥१६॥
सोऽतिविद्धः शितैर्बाणैः कपीन्द्रस्तेन रक्षसा ।
चक्रोध स महाक्रोधो वधे चास्य मनो दधे ॥ १७ ॥
त्या राक्षसाच्या तीक्ष्ण बाणांनी अत्यंत घायाळ झालेल्या वानरराज सुग्रीवांनी महान्‌ क्रोधाने भरून भीषण गर्जना केली आणि विरूपाक्षाला मारून टाकण्याचा विचार केला. ॥१७॥
ततः पादपमुद्धृत्य शूरः सम्प्रधनो हरिः ।
अभिपत्य जघानास्य प्रमुखे तु महागजम् ॥ १८ ॥
शूरवीर तर ते होतेच, सुंदर रीतीने युद्ध करणे ही जाणत होते, म्हणून एक वृक्ष उपटून पुढे निघाले आणि आपल्या समोर उभ्या असलेल्या त्याच्या विशाल हत्तीवर त्यांनी तो वृक्ष फेकून मारला. ॥१८॥
स तु प्रहाराभिहतः सुग्रीवेण महागजः ।
अपासर्पद् धनुर्मात्रं निषसाद ननाद च ॥ १९ ॥
सुग्रीवांच्या प्रहाराने घायाळ होऊन तो गजराज एक धनुष्य मागे सरकून बसून गेला आणि पीडेने आर्तनाद करू लागला. ॥१९॥
गजात् तु मथितात् तूर्णं अपक्रम्य स वीर्यवान् ।
राक्षसोऽभिमुखः शत्रुं प्रत्युद्‌गम्य ततः कपिम् ॥ २० ॥

आर्षभं चर्म खड्गं च प्रगृह्य लघुविक्रमः ।
भर्त्सयन्निव सुग्रीवं आससाद व्यवस्थितम् ॥ २१ ॥
पराक्रमी राक्षस विरूपाक्षाने त्या घायाळ हत्तीच्या पाठीवरून तात्काळ खाली उडी मारली आणि ढाळ तलवार घेऊन शीघ्रतापूर्वक आपला शत्रु सुग्रीव यांच्याकडे चालला. सुग्रीव एका स्थानी स्थिरतापूर्वक उभे होते. तो त्यांची निर्भसना करीत त्यांच्या जवळ जाऊन पोहोचला. ॥२०-२१॥
स हि तस्याभिसङ्‌क्रुद्धः प्रगृह्य विपुलां शिलाम् ।
विरूपाक्षाय चिक्षेप सुग्रीवो जलदोपमाम् ॥ २२ ॥
हे पाहून सुग्रीवांनी एक फार मोठी शिला हातात घेतली, जी मेघासमान काळी होती, ती त्यांनी क्रोधपूर्वक विरूपाक्षाचा शरीरावर फेकून मारली. ॥२२॥
स तां शिलां आपतन्तीं दृष्ट्‍वा राक्षसपुङ्‌गवः ।
अपक्रम्य सुविक्रान्तः खड्गेन प्राहरत्तदा ॥ २३ ॥
ती शिला आपल्यावर येत आहे हे पाहून त्या परम पराक्रमी राक्षसशिरोमणी विरूपाक्षाने मागे सरकून आत्मरक्षण केले आणि सुग्रीवांवर तलवार चालवली. ॥२३॥
तेन खड्गप्रहारेण रक्षसा बलिना हतः ।
मुहूर्तमभवद् भूमौ विसंज्ञ इव वानरः ॥ २४ ॥
या बलवान्‌‍ निशाचराच्या तलवारीने घायाळ होऊन वानरराज सुग्रीव मूर्च्छित होऊन थोडा वेळ जमिनीवर पडून राहिले. ॥२४॥
सहसा स तदोत्पत्य राक्षसस्य महाहवे ।
मुष्टिं संवर्त्य वेगेन पातयामास वक्षसि ॥ २५ ॥
नंतर एकाएकी उडी मारून त्यांनी त्या महासमरात मूठ आवळून विरूपाक्षाच्या छातीवर वेगपूर्वक एक बुक्का मारला. ॥२५॥
मुष्टिप्रहाराभिहतो विरूपाक्षो निशाचरः ।
तेन खड्गेन सङ्‌क्रुद्धः सुग्रीवस्य चमूमुखे ॥ २६ ॥

कवचं पातयामास पद्‌भ्यां अभिहतोऽपतत् ।
त्यांच्या बुक्क्याचा मार खाऊन निशाचर विरूपाक्षाचा क्रोध अधिकच भडकला आणि सेनेच्या देखतच त्याने सुग्रीवांचे कवच तोडून खाली पाडले, त्याच बरोबर त्याच्या पायांच्या आघाताने ते पृथ्वीवर कोसळले. ॥२६ १/२॥
स समुत्थाय पतितः कपिस्तस्य व्यसर्जयत् ॥ २७ ॥

तलप्रहारमशनेः समानं भीमनिःस्वनम् ।
पडलेले सुग्रीव पुन्हा उठून उभे राहिले आणि त्या राक्षसाला वज्राप्रमाणे भीषण शब्द करणारी थप्पड मारली. ॥२७ १/२॥
तलप्रहारं तद् रक्षः सुग्रीवेण समुद्यतम् ॥ २८ ॥

नैपुण्यान् मोचयित्वैनं मुष्टिनोरसि ताडयत् ।
सुग्रीवानी मारलेल्या त्या थपडीचा प्रहार त्या राक्षसाने आपल्या युद्धकौशल्याने चुकवला आणि तो वाचला आणि त्याने सुग्रीवाच्या छातीवर मुठीने एक गुद्दा मारला. ॥२८ १/२॥
ततस्तु सङ्‌क्रुद्धतरः सुग्रीवो वानरेश्वरः ॥ २९ ॥

मोक्षितं चात्मनो दृष्ट्‍वा प्रहारं तेन रक्षसा ।
स ददर्शान्तरं तस्य विरूपाक्षस्य वानरः ॥ ३० ॥
आता तर वानरराज सुग्रीवांच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. त्यांनी पाहिले की राक्षसाने माझा प्रहार व्यर्थ केला आहे आणि आपल्यावर त्याचा स्पर्श होऊ दिलेला नाही, तेव्हा ते विरूपाक्षावर प्रहार करण्यासाठी अवसर शोधू लागले. ॥२९-३०॥
ततोन्यं पातयत् क्रोधाद् शङ्‌खदेशे महातलम् ।
महेन्द्राशनिकल्पेन तलेनाभिहतः क्षितौ ॥ ३१ ॥

पपात रुधिरक्लिन्नः शोणितं च समुद्‌गिरन् ।
स्रोतोभ्यस्तु विरूपाक्षो जलं प्रस्रवणादिव ॥ ३२ ॥
त्यानंतर सुग्रीवांनी विरूपाक्षाच्या ललाटावर क्रोधपूर्वक दुसरी महान्‌ थप्पड मारली जिचा स्पर्श इंद्राच्या वज्राप्रमाणे दुःसह होता. तिने आहत होऊन विरूपाक्ष जमिनीवर कोसळला. त्याचे सारे शरीर रक्ताने भिजून गेले आणि तो समस्त इंद्रियगोलकातून, झर्‍यातून पाणी पडत राहावे त्याप्रमाणे रक्त ओकू लागला. ॥३१-३२॥
विवृत्तनयनं क्रोधात् सफेनं रुधिराप्लुतम् ।
ददृशुस्ते विरूपाक्षं विरूपाक्षतरं कृतम् ॥ ३३ ॥

स्फुरन्तं परिवर्तन्तं पार्श्वेन रुधिरोक्षितम् ।
करुणं च विनर्दन्तं ददृशुः कपयो रिपुम् ॥ ३४ ॥
त्या राक्षसाचे डोळे क्रोधाने फिरत होते. तो फेनयुक्त रूधिरात बुडून गेला होता. वानरांनी पाहिले विरूपाक्ष अत्यंत विरूपाक्ष (कुरूप नेत्र असणारा आणि भयंकर) झाला आहे. रक्ताने भिजून जाऊन तो तडफडत कुशी बदलत असून करूणाजनक आर्तनाद करत आहे. ॥३३-३४॥
तथा तु तौ संयति सम्प्रयुक्तौ
तरस्विनौ वानरराक्षसानाम् ।
बलार्णवौ सस्वनतुश्च भीमं
महार्णवौ द्वाविव भिन्नसेतू ॥ ३५ ॥
याप्रकारे ते दोन्ही वेगशाली वानर आणि राक्षसांची सेना समुद्र मर्यादा ओलांडून वाहणार्‍या दोन भयानक महासागरांप्रमाणे परस्पर संयुक्त होऊन युद्धभूमीमध्ये महान्‌ कोलाहल करू लागली. ॥३५॥
विनाशितं प्रेक्ष्य विरूपनेत्रं
महाबलं तं हरिपार्थिवेन ।
बलं समेतं कपिराक्षसानां उद्‌वृत्तगङ्‌गाप्रतिमं बभूव ॥ ३६ ॥
वानरराज सुग्रीवांच्या द्वारा महाबली विरूपाक्षाचा वध झालेला पाहून वानर आणि राक्षसांच्या सेना एकत्र येऊन पूर आलेल्या गंगेप्रमाणे उद्वेलित झाल्या. (एका बाजूला आनंदजनित कोलाहल होता तर दुसर्‍या बाजूला शोकामुळे आर्तनाद होत होता.) ॥३६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षण्णनवतितमः सर्गः ॥ ९६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा शहाण्णवावा सर्ग पूरा झाला. ॥९६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP