॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥


॥ श्रीभावार्थरामायण ॥


युद्धकांड


॥ अध्याय शहाऐंशिवा ॥
भरताला अभिषेक -


॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामें प्रार्थितां बहुत रीतीं । राज्य न घेचि ऊर्मिलापती ।
तेणें तटस्थ सुरपंक्ती । वानर चित्तीं विस्मित ॥ १ ॥


सर्वात्मना पर्यनुनीयमानो यदा न सौमित्रिरुपैति योगम् ।
नियुज्यमाजो भुवि यौवराज्ये ततोऽभ्यषिंचत्‌भरतं महात्मा ॥ १ ॥


यौवराज्यपद स्वीकारण्याची भरताला सर्वांची विनंती :


भरत शत्रुघ्न बिभीषण । सुग्रीवादि वानरगण ।
इंद्रब्रह्मादि सुरगण । प्रार्थितां लक्ष्मण राज्य न घे ॥ २ ॥
वसिष्ठादि रघुपती । तिही प्रार्थिला बहुत रीतीं ।
राज्य न घे ऊर्मिलापती । विस्मित चित्तीं सुरसिद्ध ॥ ३ ॥
तेणें काळें भरतासी । सकळीं प्राथिलें प्रीतीसीं ।
सौमित्र न घे यौवराज्यासी । तूं विनंतीसी अंगीकारीं ॥ ४ ॥


त्यामुळे रामभक्तीत अंतर पडेल म्हणून भरताचा नकार :


ऐकोनि सकळांचे वचन । भरत विवंची आपण ।
अति कुशल सुमित्रानंदन । राज्यग्रहण न करीचि ॥ ५ ॥
राज्यीं असतां निमेषगती । अंध होवोनि ठाके वृत्ती ।
कैचा राम कोण भक्ती । उन्मत्त स्थिति राज्यमद ॥ ६ ॥
याचि कारणें लक्ष्मण । स्वयें न घे अभिषिंचन ।
बाप सौमित्राचें ज्ञान । अनवच्छिन्न निर्लोभ ॥ ७ ॥
ऐसें विचारोनि मनांत । भरत राहिला तटस्थ ।
युक्ति खुंटल्या समस्त । निश्चितार्थ योजेना ॥ ८ ॥
कांही न देववे प्रत्युत्तर । निवांत राहिला भरतवीर ।
तेणें काळें रघुवीर । पाहे सत्वर सद्‌गुरूकडे ॥ ९ ॥


वसिष्ठांचा भरताला उपदेश :


जाणोनि श्रीरामाचें मनोज्ञ । सद्‌गुरु बोलती आपण ।
भरता ऐकें सावधान । राज्यशासनकर्तव्यता ॥ १० ॥
जेणें कारणें तटस्थ । तूं राहिलासि निवांत ।
तें सकळ मनोगत । आम्हां साद्यंत कळों आलें ॥ ११ ॥
अंगीकारितां राज्यस्थिती । अंध होवोनि ठाके वृत्ती ।
सर्वथा नाठवे रघुपती । निमग्र वृत्ति मोहपंकीं ॥ १२ ॥
तेचिविशीं श्रीरामकृपा । सावध ऐके भरत बापा ।
श्रीरामनामेंचि पहा पां । भस्म पापाचें होय ॥ १३ ॥
मोह निजपापाचें फळ । सेवितां रघुकुळपाळ ।
केंवी राहती पापमळ । नामेंचि केवळ भस्म होती ॥ १४ ॥
ज्याचेनि नामें पाप पळे । त्याचेनि भजनें वृत्ति मळे ।
ऐसें न मानावें राउळें । निजभजनबळें उद्धरी ॥ १५ ॥
निजभजनाचिया प्रीतीं । भक्त उद्धरी रघुपती ।
तेच श्रीरामाची वचनोक्ती । सावध चित्तीं परियेसीं ॥ १६ ॥


सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्‌व्यपाश्रय: ।
मत्प्रसादादवाप्तोति शाश्वतं पदमव्यमू ॥ २ ॥


रामभक्ताला विषयाधा होत नाही असे वसिष्ठांनी भरताला सांगितले :


श्रीरामाचें वचन । भक्ताप्रति सनातन ।
भरता ऐकें सावधान । अति गहन निजनिष्ठा ॥ १७ ॥
माझ्या ठायीं ठेउनी मन । सर्वकर्मी वर्तता जाण ।
माझें स्वरूप सनातन । न लागतां क्षण तेथें पावे ॥ १८ ॥
स्वधर्माच्या चोखाळीं । सर्वात्मक मूर्ति भली ।
निजप्रीतीच्या कल्लोळी । सर्व काळीं पूजित ॥ १९ ॥
जेवढी माझी व्याप्ती । तेवढी करोनि चित्तवृत्ती ।
नित्य नवी चढती प्रीती । मातें भजती मी होउनी ॥ २० ॥
माझा आश्रयो मी होऊन । ऐक तयाचें लक्षण ।
सांडोनियां आपुलेपण । आश्रय कवण जळा जेंवी ॥ २१ ॥
कां सर्वत्र प्रभंजन । गगनीं विचरे आपण ।
भागोनि जेथें होय लीन । गगनीं गगन होवोनियां ॥ २२ ॥
तैसा कार्ये मनें वाचा । माझ्या निजात्मस्वरूपाचा ।
निश्चयो करोनि साचा । मद्‌भजनाचा आदर ॥ २३ ॥
तो मज आंतबाहेरी । मी तया सबाह्मभ्यंतरी ।
त्यासीही गत्यंतराची परी । बोलतां निर्धारीं जीभ तुटे ॥ २४ ॥
त्यासी बाध्यबाधकसंबंध । कैचा विधि कैंचा निषेध ।
सबाह्य सच्चिदानंद । स्वरूप शुद्ध स्वयें होती ॥ २५ ॥
ऐसे मी होवोनि मातें भजती । ते देहांतीं मातें पावती ।
इतका विलंब कोणाप्रती । मुळीच असती मद्‌रूप ॥ २६ ॥
तो आमुचें देवतार्चन । आम्ही त्याचें करूं पूजन ।
तो आमुचें ध्येय पूर्ण । करूं ध्यान आम्ही त्याचें ॥ २७ ॥
ऐसा निजभक्तां रघुनाथ । सर्व कर्मी संरक्षित ।
तुज भय काय येथ । आज्ञा निश्चित अंगीकारीं ॥ २८ ॥


श्रीरामांचे मनोगत वसिष्ठमुखाने ऐकल्यावर भरताची अनुमती, भरताचा अभिषेक सोहळा :


ऐसें श्रीरामाचें मनोज्ञ । सद्‌गुरुमुखें निरूपण ।
भरत जाणोनी संपूर्ण । मस्तकी वचनार्थ वंदिला ॥ २९ ॥
जैसा श्रीराम अभिषेक । त्याहूनि भरता केला विशेख ।
अभिषेकितां रघुकुळटिळक । अलोलिक निजसोहळा ॥ ३० ॥
सुमनें चंदनें गंधार्चनें । टिळेमाळा विचित्रभरणें ।
चिदंबराचीं प्रावरणें । अलंकार चिद्रत्‍नें जडित ॥ ३१ ॥
भावार्थाचें सिंहासन । चैतन्य मृदोलिया सुलक्षण ।
आनंदाचें वोठांगण । भरता रघुनंदन अर्पित ॥ ३२ ॥
सिंहासनीं अति सत्वर । भरता बैसवी श्रीरामचंद्र ।
तन्मयाचें धरी छत्र । व्यजन चामर बोधाचें ॥ ३३ ॥
चिद्‌रत्‍नांची नित्य दीप्ती । भरता उदयप्रकाशस्थिती ।
स्वयें अर्पिली रघुपती । अगाध स्थिति भाग्याची ॥ ३४ ॥
सच्चिदानंद पदें तिन्ही । भरतीं सांडिलीं निंबलोणीं ।
तेही विषींची विनवणी । सावधानीं अवधारा ॥ ३५ ॥
असताचे निराकरणें । निजवस्तुसी सत् म्हणणे ।
जडाच्या विवंचनें । चिद् म्हणणें वस्तुतें ॥ ३६ ॥
सुखाची करितां व्यावृती । आनंदमय वस्तुसी म्हणती ।
एवं त्रिपदाची स्थिती । अपवादभ्रांती वस्तूची ॥ ३७ ॥
त्रिगुण त्रिमात्रातीत पर । त्रिपदें निरसोनि साचार ।
अभिषेकिला भरतवीर । कृपा अपार भक्ताची ॥ ३८ ॥
ऐसें अभिषेकितां भरता । कार्यकारणकर्तव्यता ।
जितुकी श्रीरामाची सत्ता । आली हाता भरताच्या ॥ ३९ ॥
न सांगतां रघुनंदन । राज्यभारकार्यकारण ।
भरत संपादी संपूर्ण । नित्य सावधान श्रीरामीं ॥ ४० ॥
ऐसा श्रीरामें अभिषेकितां । मंत्रस्वरमंत्राक्षता ।
ऋषीं अभिषेकिलें भरता । विबुधीं तत्वतां सुमनाभिषेक ॥ ४१ ॥
त्राहाटिल्या सुरदुंदुभी । जयजयकार झाला नभी ।
सिद्ध नाचती निजवालभीं । पद्यनाभीं निजराज्य ॥ ४२ ॥
श्रीराम देव भरत भक्त । दोनी अभिषेकांची मात ।
अति अद्‌भुत चरितार्थ । त्रैलोक्यांत उत्सावो ॥ ४३ ॥
जयजयकार सिद्धांचा । दुंदुभिनाद विबुधांचा ।
मंत्रोच्चार द्विजांचा । धन्य भाग्याचा वीर भरत ॥ ४४ ॥
भुभुःकार वानरांचा । नादस्वर गंधर्वांचा ।
नृत्यगजर अप्परांचा । श्रीरामाच्या निजराज्यीं ॥ ४५ ॥
देवभक्तांच्या अभिषेकीं । सुर सिद्ध नागलोकीं ।
आनंदमय त्रिलोकीं । सत्यलोकी आनंद ॥ ४६ ॥


श्रीरामप्रतापप्रौढी :


रामनामाच्या निजगजरीं । नाद कोंदला अंबरीं ।
कैलासीं सत्यलोकवरी । वैकुंठावरी नाद भरला ॥ ४७ ॥
ब्रह्मांडी नाद भरला पूर्ण । नादे भरलें आवरण ।
चालिले स्वानंदजीवन । अभिषेक पूर्ण तेणें केला ॥ ४८ ॥
श्रीराम स्वानंदाची मूर्ती । स्वानंदाभिषेक रघुपती ।
स्वानंदमय त्रिजगती । श्रीरघुपतिनिजराज्यें ॥ ४९ ॥
दुरात्मा अहंरावण । बंदीं घातले सुरगण ।
तो एकचि बाणें निर्दाळून । सुरगण सोडविले ॥ ५० ॥
तेणें आनंदे पूर्ण भरित । श्रीरामाभिषेका त्वरित ।
विबुध आले धांवत । स्वस्थानी रघुनाथ त्यांसी धाडी ॥ ५१ ॥
अहंरावणबंदीतून । रामें सोडविले सुरगण ।
स्वपदीं स्थापिले संपूर्ण । ऐका लक्षण तयाचे ॥ ५२ ॥
ब्रह्मा पूर्ण वेदपीठ । वेदी स्वानंद यथेष्ट ।
रावणें हरोनियां स्पष्ट । शांतिपाठ नित्य पढवी ॥ ५३ ॥
स्वानंद हरितला रावणें । म्हणोनि लोलंगतें झालीं ब्राह्मणे ।
करिती नीचाचीं याजनें । पोट भरणें तरी नव्हे ॥ ५४ ॥
श्रेय देतां गायत्रीचें । तरी दुर्भर न भरे साचे ।
हेंचि रावण-बंदींचें । लागलें पिसें द्विजांसी ॥ ५५ ॥
बुद्धीच्या ठायीं ब्रह्मयाची वस्ती । रावणें त्याची बोधशक्ती ।
हरूनि केली अंधवृत्ती । बुद्धी आत्महितीं नाठवे ॥ ५६ ॥
सांडोनि चिदानंदस्फूर्ती । ब्रह्मा उपार्जी लंकापती ।
स्वसुखत्यागें रावणाप्रती । नित्य पढती शांतिपाठ ॥ ५७ ॥
न मागतां देती आशीर्वचन । करिती नीचाचें सेवन ।
हाता यावया उपाध्येपण । द्वारी संमार्जन यजमानाच्या ॥ ५८ ॥
तो निवटोनि दुर्बुद्धी । ब्रह्मा स्थापितां निजपदी ।
नित्यानंदचिदानंदीं । नित्य समाधी पावला ॥ ५९ ॥
मनी चंद्रम्याची वस्ती । नित्य असावें निर्विकल्पस्थितीं ।
तें हरितलें लंकाप्रती । चंचळवृत्ती तळमळी ॥ ६० ॥
आपुले निजानंद अमृत । चंद्र भोगूं न शके मनांत ।
तुषार सेवी लंकानाथ । फळले व्रत क्षयरोगी ॥ ६१ ॥
नित्यानंदपरिपूर्ण । पूर्णचंद्राचे लक्षण ।
तें हरितां दशानन । क्षयरोगें पूर्ण जन्ममृत्यु ॥ ६२ ॥
त्या निवटून लंकनाथा । चंद्र निजपदीं स्थापितां ।
मनी बाणली उन्मनी अवस्था । नित्यमुक्तता श्रीरामें ॥ ६३ ॥
अहंकारी रुद्राची वस्ती । शिव कल्याण ज्यातें म्हणती ।
वचने जड जीवां मुक्ती । पुराणें गर्जती आनंदवनीं ॥ ६४ ॥
तें हरितां लंकापती । क्षणें झाली विपरित वृत्ती ।
बुडाली निजानंदस्थिती । वाढली स्फूर्ति अहंदेहो ॥ ६५ ॥
निजात्मत्व विसरोनि कोडे । अहंदेहो हेंचि वाढे ।
विषयभोगीं हांव चढे । तंव तें उडे अहंभोगें ॥ ६६ ॥
कोटिवेळां विषयस्थिती । विविध भोग भोगिजती ।
कदा काळें नव्हे तृप्ती । न मनी निश्चितीं हे मिथ्या ॥ ६७ ॥
मागे मृगजळ प्राशना । हांव बांधे गगनसुमना ।
स्वप्नीचें षड्रस जाणा । मागे भोजना कांसवघृत ॥ ६८ ॥
ऐसें केलें लंकापतीं । त्यासी निवटोनि श्रीरघुपती ।
स्वयें स्थापिला निजस्थिती । झाली प्रतीती अहंआत्मा ॥ ६९ ॥
इंद्रयमादि कुबेर । रावणबंदीं समग्र ।
तळमळिती निरंतर । दुष्ट दशवक्त्रनिजसेवा ॥ ७० ॥
सकळ भोग सकळ समृद्धी । नित्य वोळंगती सकळ सिद्धी ।
अपार वैभव इंद्रपदीं । बोलतां शब्दीं अनिर्वाच्य ॥ ७१ ॥
कल्पतरू चिंतामणी । कामधेनूचीं दुभणीं ।
तें सकळही विसरोनी । करी याचणी यागाची ॥ ७२ ॥
रावणाचें परिचारकपण । बंदिपणें वोळगे जाण ।
विश्रांति नाहीं अर्धक्षण । नित्य वणवण शमेना ॥ ७३ ॥
तो निवटोनियां लंकापती । रामें सोडविला अमरपती ।
स्वपदीं स्थापितां निश्चिती । पावला विश्रांती निजानंदें ॥ ७४ ॥
वायु पीडिला रावणें । मंद सुशीतळ अनुदिन ।
भोगी श्रम निवारणें । पुंडो झाडणे विषयांचे ॥ ७५ ॥
गदळल्या बिदी राहतां । रावण दंडी सुबुद्धता ।
तो रामें वधोनि तत्वतां । निजमुक्तता वायूसी ॥ ७६ ॥
सोडविला प्रभंजन । तेणे झाला सुखसंपन्न ।
सेवावया रघुनंदन । आला शरण वेगिया ॥ ७७ ॥
शिवादिक सिद्ध पाहीं । अखंड राम त्यांचे हृदयीं ।
वायु जडोनि तथे ठायी । श्रीरामपायीं विनटला ॥ ७८ ॥
स्वभावें प्राण अंगुळें बारा । निगमागमसंचारा ।
अखंड पिडे नासिकाद्वारा । तेणें रघुवीरा सेविलें ॥ ७९ ॥
जडोन सिद्धांच्या हृदयी । निर्गमागमसंचार पाहीं ।
सांडोनियां लवलाहीं । श्रीरामापायीं सुस्थिर ॥ ८० ॥
कुबेर संपन्न निजधनें । त्यासी दंडोनियां रावणें ।
कामग विमान नेले तेणें । राखिला प्राणें बंधुत्वें ॥ ८१ ॥
त्या निवटोनि रावणासी । विमान देवोनि त्याचें त्यासी ।
स्वपदीं स्थापिलें धनदासी । ख्याति ऐसी रामाची ॥ ८२ ॥
देवगुरु बृहस्पती । धरोनि आणिले लंकापतीं ।
उपन्यास नित्य करिती । युक्तिप्रयुक्तिपर्यायें ॥ ८३ ॥
न विचारितां काळाकाळ । युक्ति वाढवितां प्रबळ ।
रावण त्यासी दंडी सबळ । कां युक्तिजाळ बरळसी ॥ ८४ ॥
ब्रह्मांडीं श्रेष्ठ गुरूची युक्ती । ते न मानी लंकापती ।
विषयोन्मत्त झाली वृत्ती । अपमानिती गुरूसी ॥ ८५ ॥
तो निवटोनि अहंरावण । स्वपदीं देवगुरु स्थापून ।
प्रकाशे देदीष्यमान । मान्य वचन त्रिलोकीं ॥ ८६ ॥
सकळ सिद्धींचा दाता । विघ्नहर रासभें राखतां ।
विषयाभिलाषाचिया लाता । बहु सोशितां शिणला ॥ ८७ ॥
गणेशाची आत्मसिद्धी । रावणें हरिली त्रिशुद्धी ।
म्हणोनि श्रीरामें कृपानिधी । निजानंदी उद्धरिला ॥ ८८ ॥
आत्मसिद्धि हिरोनि पूर्ण । जीवें जीतां रावण ।
षिषयरासभें राखवी पूर्ण । श्रम दारुण तेणें झाला ॥ ८९ ॥
जे जे काळीं इच्छा जैसी । ते ते पावतां वेगेंसीं ।
रावण त्यातें सुबुद्ध घुमसी । कासाविसी बहु तेणें ॥ ९० ॥
चिंतामणि मोरेश्वरा । तुज आणिलें लंकापुरा ।
माझ्या नगरींच्या समग्रां । अपेक्षित वरां सिद्धि देई ॥ ९१ ॥
ऐसें अहंरावणवचन । ऐकतांचि संकोचमन ।
बहुत पीडिला गजानन । विषयाभिलाषण करोनियां ॥ ९२ ॥
बाईल दग गा मोरया । बेल शेतालागोनियां ।
जात्यश्व पैं बैसावया । लवलाह्मा दे आम्हा ॥ ९३ ॥
आवारेभरी असावे कण । कोट्यनुकोटी असंख्य धन ।
पुत्रपौत्रादि संतान । संतति गहन दे आम्हासी ॥ ९४ ॥
ऐशा विषयलाता अद्‌भुत । तेणें पीडिला गणनाथ ।
तो निवटोनि लंकानाथ । शंकरसुत सोडविला ॥ ९५ ॥
देवोनियां निजात्मसिद्धी । स्वयें स्थापिली निजपदीं ।
तेणें प्रकाशली आत्मबुद्धी । निजानंदीं जग निववी ॥ ९६ ॥
काळ आतुडला रावणासी । त्रिकाळ वोळंगत समयासी ।
काळातरींच्या कर्मासी । अकाळेसीं करीतसे ॥ ९७ ॥
प्रत्यवायाचे भय नाहीं । दोष दंडिता यम पाहीं ।
तराळ झाली त्याच्या ठायी । दंड तो कायी कोणासी ॥ ९८ ॥
काळाचा काळ तो रघुनाथ । काळें वधोनि लंकानाथ ।
काळ सोडविला त्वरित । सुखें वर्तत यथाकाळें ॥ ९९ ॥
यम नियंता सकळ जगा । कर्मभोगें दंडी पै जगा ।
त्यासी रावण दंडी वेगा ॥ वाहवी टोणगा जीवन ॥ १०० ॥
तुटतां विषयांचें जीवन । यमासी दंडी क्षणक्षण ।
तो निवटोनियां रावण । धर्मसंस्थापन निजपदीं ॥ १०१ ॥
रावणबंदीं अग्नि पूर्ण । स्वप्रकाशतेज आच्छादून ।
मळ धूतसे आपण । रजरागें पूर्ण कवळिजे ॥ १०२ ॥
रावणवनिता कामें उन्मत्त । पक्षपक्षा रजा स्रवत ।
तितुकें अग्नि शुद्ध करित । डाग फेडित काटाचे ॥ १०३ ॥
अल्प डाग राहतां । सोटे वाजती अग्नीचे माथां ।
त्या निवटोनि लंकानाथा । अग्नि तत्वतां सोडविला ॥ १०४ ॥
देखोनियां निजतेजदीप्तीं । अग्नि स्थापिला स्वपदाप्रती ।
बाप कृपाळू रघुपती । बंदिमुक्ती सुरवरां ॥ १०५ ॥
रावणबंदीं असतां वरुण । सेवा करी अनुदिन ।
विषप्राय विषय पूर्ण । सुरस करोन त्यास पुरवी ॥ १०६ ॥
वरुण रसांचा अधिष्ठातां । रावण उन्मत्त भोगीं असतां ।
जो जो रस आवडे चित्ता । तो न पावतां दंडिजे ॥ १०७ ॥
त्यासी निवटोनि रघुनाथें । निजपदीं वरुणातें ।
तृप्ति करोनियां परमामृतें । निजनिश्चितें स्थापिलें ॥ १०८ ॥
काम भुलवी चराचरां । तो आतुडला दशवक्त्रा ।
वेगें करोनि कामारां । निजसेजारा झाडवी ॥ १०९ ॥
विविध भोग भोगिजेती । सवेंचि क्षणें सरोनि जाती ।
कदाकाळें नव्हे तृप्ती । वणवण चित्तीं निजबंदी ॥ ११० ॥
रामें निवटोनि रावण । कामा निष्कामीं स्थापन ।
स्वयें करोनि आपण । सावधान पावविला ॥ १११ ॥
वसंत रावणकारागृहीं । नित्य नूतन वन रंगारी ।
पुष्पे फळें कामाचारी । न पावतां भारी दडिजे ॥ ११२ ॥
त्याचें करोनि निःसंतान । निजानंदें करोनि पूर्ण ।
निजपदी संस्थापून । केला सुखसंपन्न वसंत ॥ ११३ ॥
तेणें हरिखें दोघेही जण । सेवावया रघुनंदन ।
काम वसंत आपण । अयोध्याभुवन वसविले ॥ ११४ ॥
श्रीरामभक्त नित्य निष्काम । त्यासी अनुसरोनिं काम ।
सेवावया रघुत्तम । भजनधर्म वाढवित ॥ ११५ ॥
विषयकर्दमीं शिणला । तृप्ति न पवेचि वहिला ।
श्रीरामभक्तांसी विनटला । सुख पावला श्रीरामें ॥ ११६ ॥
श्रीराम नित्यानंदें निर्दोष । क्रियामात्र न रिघे देख ।
भक्त झाले तदात्मक । रधुकुळटिळकनिजभजनें ॥ ११७ ॥
तेथें कामें नवलपरी । रिघोनि भक्तांचे अंतरी ।
भजन करित नानापरी । निजनिर्धारीं परियेसीं ॥ ११८ ॥
अनावरा आवरित । अमूर्ताची मूर्ति घडित ।
अगोचरातें पाहत । संभावित असंभाव्या ॥ ११९ ॥
अचिंत्याचें नित्य चिंतन । अध्येयाचे नित्य ध्यान ।
अनाम्याचें नामकीर्तन । गुणवर्णन अगुणाचें ॥ १२० ॥
अनर्च्यातें नित्य अर्चित । चिदंबरा पांघरवित ।
सर्वालंकारा अलंकारित । संभावित अंसंभाव्या ॥ १२१ ॥
चित्सच्चिदासी ओवाळणी । सर्वगंगळा मंगलश्रेणी ।
विचित्र पूजाच्या भरणी । प्रीति करोनि अर्पित ॥ १२२ ॥
संतोषावया श्रीराघव । ऐसा कामें योजिला भाव ।
तंव वर्तलें अपूर्व । निजलाघव रामाचें ॥ १२३ ॥
सेवा करितां पै हरिखें । म्हणे उतराई कवतुके ।
कांही झालों यथासुखे । तंव आपुलें देखे पूर्णत्व ॥ १२४ ॥
जेथें मनाची नखी नलगे । चित्त चिंतितां दाटी उबगे ।
बुद्धि बोधामागे रिघे । अहं उगे थोटावे ॥ १२५ ॥
रिघता इंद्रियां सांकडें । तेथेही म्यां निजानंदमूढे ।
अखंडाची करोनि खंडे । पूजाबंडें वाढविली ॥ १२६ ॥
ऐसी निजकर्माची खंती । कामें मानोनियां चित्तीं ।
स्वयें पावोनियां उपरती । विरे रधुपतीमाझारीं ॥ १२७ ॥
लंकाबंदींचा वसंत । रामे सोडविला त्वरित ।
सेवावया रघुनाथ । आला धांवत अयोध्येसी ॥ १२८ ॥
श्रीरामाराम मूर्तु । वसंत पावला तेथु ।
एके काळें सकळ ऋतु । आले त्वरित पूर्वीच ॥ १२९ ॥
नीरसें वोळलीं रसभारें । उलोनि खवती रसधारे ।
सकळ सारांचे निजसार । गोडी अपार अनिर्वाच्य ॥ १३० ॥
केवळ शुष्क निरंकुरें । ते पाल्हेजती भजनांकुरें ।
लसलसीत प्रेमभरें । मनोहरें देखतां ॥ १३१ ॥
श्रीरामआवडीचें फळ । जन्मांतरीं नेणती अबळ ।
तींही फुली आलीं सकळ । आमोद बहळ प्रेमाचा ॥ १३२ ॥
श्रीरामभजनाचें फळ । कल्पांती नेणती अबळ ।
श्रीरामागमनें पे सकळ । अफळ ते सफळ होवोनि ठेले ॥ १३३ ॥
धर्म अर्थ कामसेवा प्रबळ । चौथें मोक्ष फळ केवळ ।
तें निवटूनियां सकळ । आनंदफळ रामराज्यें ॥ १३४ ॥
बंधमोक्षातीत । श्रीरामफळ सेवितां भक्त ।
चहूं फळासी विटावित । वांकुल्या दावित सुरसिद्धां ॥ १३५ ॥
ऐसें देखोनियां वसंता । लाज आली निजव्रता ।
तेथें मी काय सेवा करिता । जडला तत्वतां चरणकमळीं ॥ १३६ ॥
ऐसे कामवसंतादि जाण । सकळ सुरवर आपण ।
श्रीरामराज्यसुखसंपन्न । श्रीरामें पूर्ण गौरविले ॥ १३७ ॥
वस्त्रें भूषणें परिकर । देवोनियां सुंदर ।
रामें गौरविले समग्र । धाडी समग्र निजपदा ॥ १३८ ॥
तेथें मिळोनियां सुरमादी । विचार करिती निजात्मबुद्धीं ।
आम्ही गौरविलें निजपदीं । परी शेष नेदी श्रीराम ॥ १३९ ॥
श्रीरामशेष न येतां हाता । स्वपद न राहे सर्वथा ।
क्षणें जाईल विकल्पता । होय विचारिता पै ब्रह्मा ॥ १४० ॥
भक्ता गौरविलें रघुपतीं । शेष देईल तयांप्रती ।
युक्ति साधूं त्याचिया पाती । प्रजापतीं नेमिलें ॥ १४१ ॥
घ्यावया स्वामीचे शेष । एक अंगवला सेवक ।
कां लडिवाळ बाळक । अंकस्थ देख धाकुटें ॥ १४२ ॥
या बुद्धी चतुरानन । भक्तांमाजीं रिघोनि जाण ।
श्रीरामशेषालागून । स्वयें विंदान साधिलें ॥ १४3 ॥
भरत शनुम बिभीषण । सुग्रीव अंगद वायुनंदन ।
जांबवंतादि वानरगण । गौरव पूर्ण पाहू यांचा ॥ १४४ ॥


शत्रुघ्नाला सेनापती करावे अशी भरताची रामांना प्रार्थना :


भरत पुढें होवोनि जाण । घालोनियां लोटांगण ।
विनविला रघुनंदन । स्वामी विनवण परिसावी ॥ १४५ ॥
राउळेंनकेलें वनाभिगमन । तेंचि मज व्रतग्रहण ।
तुमचें राज्यपरिपाळण । शत्रुघ्नें आपण स्वयें केलें ॥ १४६ ॥
निद्रालस्य सांडोनि दूरी । रामभजनीं प्रीति भारी ।
सत्सेवेसी निरंतरीं । सांडणें करी जीवित्वाचें ॥ १४७ ॥
राज्यलोभ नातळे चित्ता । सत्संगति रामकथा ।
शत्रुघ्नासी उल्लास चित्ता । अतिसावधता उभयार्थी ॥ १४८ ॥
नित्य यौवराज्यपालन । तेणें माझें राखे मन ।
स्वहितार्थी कुशल पूर्ण । सावधान सेवेसीं ॥ १४९ ॥
श्रीरामआज्ञेनें राज्यशासन । तें श्रीरामाचें भजन ।
ऐसा निश्चय मानोनी पूर्ण । सावधान सेवेसीं ॥ १५० ॥
सर्वकाळ सर्वावस्थीं । स्मरे शत्रुघ्न रघुपती ।
कर्माकर्माच्या निश्चितीं । चित्तवृत्ति भेदेना ॥ १५१ ॥
स्वामी आलिया निजराज्यासी । अति उल्हास शत्रुघ्नासी ।
अति कुशळ भजनासी । करावें यासी सेनानी ॥ १५२ ॥
ऐशी ऐकोनि भरतवाणी । राम संतोषला मनी ।
हृदयीं धरिला आलिंगोनी । होतें मनी तेंचि झालें ॥ १५३ ॥
श्रीरामाचें मनोगत । युवराजा पै भरत ।
शत्रुघ्न सेनानी निश्चित । आणि सुमंत प्रधान ॥ १५४ ॥
तेंचि भरतें सांगितले । सकळांचे मनास आलें ।
वसिष्ठेंहि आज्ञापिलें । भरतबोलें वर्तावें ॥ १५५ ॥


सर्वाच्या इच्छेप्रमाणे रामांनी शत्रुघ्नाला सेनापती व सुमंताला प्रधान केले :


सकळांची मनोगतें । सेनानीपण शत्रुघ्नातें ।
प्रधानत्व सुमंतातें । श्रीरघुनाथे अभिषेकिलें ॥ १५६ ॥
जैसी भरताची पूजा । तैसिया रीती पूजिलें वोजा ।
बाप कृपाळू रघुराजा । निजगणां वोजा पूजित ॥ १५७ ॥
सात शतें निजमाता । रामें गौरविल्या समस्ता ।
कैकेयी कौसल्या सुमित्रा । समानता गौरविल्या ॥ १५८ ॥
सकळ सैन्य अति प्रीतीसीं । आदिकरोनि दासदासी ।
गौरवितां निजमानसीं । श्रीरामासी आल्हाद ॥ १५९ ॥
आनंद श्रीरघुनाथा । निजदासांतें पूजितां ।
आश्चर्य सुरवरां समस्ता । वर्षती माथां सुमनभार ॥ १६० ॥
भरतादि बंधु जाण । सुमंतादि सकळ प्रधान ।
दीन जे कां अकिंचन । रामें संपूर्ण गौरविले ॥ १६१ ॥
एका जनार्दना शरण । झाली सकळांची गौरवण ।
सुग्रीव आणि बिभीषण । कपिसैन्य विसरला ॥ १६२ ॥
ऐसें न मानावे श्रोतां । राम न विसरे सर्वथा ।
निजभक्तांची पूजा करितां । उल्हास चित्ता रामाच्या ॥ १६३ ॥
तें अति गोड निरूपण । सकळ तृप्तीचें कारण ।
भोजनीं जेंवी दध्योदन । तेंवी पूजन भक्तांचें ॥ १६४ ॥
भक्तांमाजी मुखरी । हनुमंताची प्रीति थोरी ।
त्याच्या पूजनाची आवडी भारी । प्रीति रघुवीरी अतिशय ॥ १६५ ॥
अति गोड निरूपण । देवां भक्तां प्रेम पूर्ण ।
एका जनार्दना शरण । जगदुद्धरण रामकथा ॥ १६६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
भरताभिषेको नाम षडशीतितमोऽध्यायः ॥ ८६ ॥
ओंव्या ॥ १६६ ॥ श्लोक ॥ २ ॥ एवं १६८ ॥

GO TOP