श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ षड्‌विंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणस्य रम्भाया उपरि बलात्कारो, नलकूबरेण रावणाय घोरशापदानं च -
रावणाचा रंभेवर बलात्कार आणि नलकूबराने रावणाला भयंकर शाप देणे -
स तु तत्र दशग्रीवः सह सैन्येन वीर्यवान् ।
अस्तं प्राप्ते दिनकरे निवासं समरोचयत् ॥ १ ॥
जेव्हा सूर्य अस्तास गेला तेव्हा पराक्रमी दशग्रीवाने आपल्या सेनेसह कैलासावरच रात्री निवास करणे योग्य असे ठरविले. ॥१॥
उदिते विमले चन्द्रे तुल्यपर्वतवर्चसि ।
प्रसुप्तं सुमहत् सैन्यं नानाप्रहरणायुधम् ॥ २ ॥
(त्याने तेथेच छावणी ठोकली) नंतर कैलासाप्रमाणेच श्वेत कान्ति असलेल्या चंद्राचा उदय झाला आणि नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांनी सुसज्जित निशाचरांची ती विशाल सेना गाढ निद्रेमध्ये निमग्न झाली. ॥२॥
रावणस्तु महावीर्यो निषण्णः शैलमूर्धनि ।
स ददर्श गुणांस्तत्र चन्द्रपादपशोभितान् ॥ ३ ॥
परंतु महापराक्रमी रावण त्या पर्वताच्या शिखरावर गुपचुप बसून चंद्रम्याच्या चांदण्याने सुशोभित होणार्‍या त्या पर्वताच्या विभिन्न स्थानांची (जी संपूर्ण कामभोगांसाठी उपयुक्त होती) नैसर्गिक छटा न्याहळू लागला. ॥३॥
कर्णिकारवनैर्दीप्तैः कदम्बगहनैस्तथा ।
पद्मिनीभिश्च फुल्लाभिः मन्दाकिन्या जलैरपि ॥ ४ ॥

चम्पकाशोकपुन्नाग मन्दारतरुभिस्तथा ।
चूतपाटललोध्रैश्च प्रियङ्‌ग्वर्जुनकेतकैः ।
तगरैर्नारिकेलैश्च प्रियालपनसैस्तथा ॥ ५ ॥

आरग्वधैस्तमालैश्च प्रियालवकुलैरपि ।
एतैरन्यैश्च तरुभिः उद्‌भासितवनान्तरे ॥ ६ ॥
कुठे कण्हेरीची दीप्तिमान्‌ कानने शोभत होती, कोठे कदंब आणि बकुळ वृक्षांचे समूह आपली रमणीयता पसरवीत होते, कोठे मंदाकिनीच्या जलानी भरलेल्या आणि प्रफुल्ल कमळांनी अलंकृत पुष्करिणी शोभत होत्या, तर कोठे चंपक, अशोक, पुन्नाग (नागकेशर), मंदार, आम्र, पाडर, लोध, प्रियङ्‌ग, अर्जुन, केतकी, तगार, नारळ, प्रियाळ आणि पनस आदि वृक्ष आपल्या पुष्प आदिंच्या शोभेने त्या पर्वतशिखराच्या वन्यप्रांताला उद्‌भासित करत होते. ॥४-६॥
किन्नरा मदनेनार्ता रक्ता मधुरकण्ठिनः ।
समं सम्प्रजगुर्यत्र मनस्तुष्टिविवर्धनम् ॥ ७ ॥
मधुर कण्ठ असणारे कामार्त किन्नर आपल्या कामिनीसह तेथे रागयुक्त गीत गात होते जे कानावर पडून मनाचा आनंद वाढवीत होते. ॥७॥
विद्याधरा मदक्षीबा मदरक्तान्तलोचनाः ।
योषिद्‌भिः सह सङ्‌क्रान्ताः चिक्रीडुर्जहृषुश्च वै ॥ ८ ॥
ज्यांचे नेत्रप्रान्त मदाने काहीसे लाल झालेले आहेत, ते मदमत्त विद्याधर युवतीबरोबर क्रीडा करत होते आणि हर्षमग्न होत होते. ॥८॥
घण्टानामिव सण्नादः शुश्रुवे मधुरस्वनः ।
अप्सरोगणसङ्‌घानां गायतां धनदालये ॥ ९ ॥
तेथून कुबेराच्या भवनात गात असलेल्या अप्सरांच्या गीताचा मधुर ध्वनि घण्टानादासमान ऐकू येत होता. ॥९॥
पुष्पवर्षाणि मुञ्चन्तो नगाः पवनताडिताः ।
शैलं तं वासयन्तीव मधुमाधवगन्धिनः ॥ १० ॥
वसंत ऋतुच्या सर्व पुष्पांच्या गंधाने युक्त वृक्ष वार्‍याच्या वेगाने झोडपलेले वृक्ष फुलांची वृष्टि करीत त्या संपूर्ण पर्वताला जणु सुवासित करीत होते. ॥१०॥
मधुपुष्परजःपृक्तं गन्धमादाय पुष्कलम् ।
प्रववौ वर्धयन् कामं रावणस्य सुखोऽनिलः ॥ ११ ॥
विविध कुसुमांचे मधुर मकरंद तसेच परागाचे मिश्रित प्रचुर सुगंध घेऊन मंद मंद वाहणारा सुखद वायु रावणाच्या कामवासनेला वाढवीत होता. ॥११॥
गेयात् पुष्पसमृद्ध्या च शैत्याद् वायोर्गिरेर्गुणात् ।
प्रवृत्तायां रजन्यां च चन्द्रस्योदयनेन च ॥ १२ ॥

रावणस्तु महावीर्यः कामस्य वशमागतः ।
विनिःश्वस्य विनिःश्वस्य शशिनं समवैक्षत ॥ १३ ॥
संगीताची मधुर तान, विविध प्रकारच्या पुष्पांची समृद्धि, शीतल वायुचा स्पर्श, पर्वताचे आकर्षक गुण, रजनीची मधुर वेळ आणि चंद्रम्याचा उदय - उद्दीपनाच्या या सर्व उपकरणांमुळे तो महापराक्रमी रावण कामाच्या अधीन झाला आणि वारंवार दीर्घ श्वास घेऊन चंद्रम्याकडे पाहू लागला. ॥१२-१३॥
एतस्मिन्नन्तरे तत्र दिव्याभरणभूषिता ।
सर्वाप्सरोवरा रम्भा पूर्णचंद्रनिभानना ॥ १४ ॥
इतक्यातच समस्त अप्सरांमध्ये श्रेष्ठ सुंदरी, पूर्णचंद्रमुखी रंभा दिव्य वस्त्राभूषणांनी विभूषित होऊन त्या मार्गाने येऊ लागली. ॥१४॥
दिव्यचन्दनलिप्ताङ्‌गी मन्दारकृतमूर्धजा ।
दिव्योत्सवकृतारम्भा दिव्यपुष्पविभूषिता ॥ १५ ॥
तिच्या अंगावर दिव्य चंदनाचा अनुलेप लागलेला होता आणि केशपाशात पारिजाताची फुले गुंफलेली होती. दिव्य पुष्पांनी आपला शृंगार करून ती दिव्य समागमरूप दिव्य उत्सवासाठी जात होती. ॥१५॥
चक्षुर्मनोहरं पीनं मेखलादामभूषितम् ।
समुद्‌वहन्ती जघनं रतिप्राभृतमुत्तमम् ॥ १६ ॥
मनोहर नेत्र तथा (काञ्चीच्या) मेखलेल्या लड्‍यांनी विभूषित पीन जघन-स्थलास ती रतिच्या उत्तम उपहाराच्या रूपांत धारण करत होती. ॥१६॥
कृतैर्विशेषकैरार्द्रैः षडर्तुकुसुमोद्‌भवैः ॥ १७ ॥
तिच्या कपोल आदिवर हरिचंदनांनी चित्र-रचना केली गेली होती. ती साही ऋतूंमध्ये होणार्‍या नूतन पुष्पांच्या आर्द्र हारांनी विभूषित होती आणि आपल्या अलौकिक कान्ति, शोभा, द्युति तसेच कीर्तिने युक्त होऊन त्या समयी दुसर्‍या लक्ष्मीप्रमाणे वाटत होती. ॥१७॥
बभावन्यतमेव श्रीः कान्तिश्रीद्युतिकिर्तिभिः ।
नीलं सतोयमेघाभं वस्त्रं समवजुण्ठिता ॥ १८ ॥
तिचे मुख चंद्रम्या समान मनोहर होते आणि दोन्ही सुंदर भुवया कमानीसारख्या दिसत होत्या. तिने सजल जलधराप्रमाणे नील रंगाच्या साडीने आपले अंग झाकून घेतले होते. ॥१८॥
यस्या वक्त्रं शशिनिभं भ्रुवौ चापनिभे शुभे ।
ऊरू करिकराकारौ करौ पल्लवकोमलौ ।
सैन्यमध्येन गच्छन्ती रावणेनोपलक्षिता ॥ १९ ॥
तिच्या मांड्‍यांचा चढ-उतार हत्तीच्या सोंडेसमान होता. दोन्ही हात असे कोमल होते जणु (देहरूपी रसालाच्या डहाळीचे) नूतन पल्लवच आहेत. ती सेनेच्या मधूनच जात होती, म्हणून रावणाने तिला पाहिले. ॥१९॥
तां समुत्थाय गच्छन्तीं कामबाणवशं गतः ।
करे गृहीत्वा लज्जन्तीं स्मयमानोऽभ्यभाषत ॥ २० ॥
पहाताच तो कामदेवांच्या बाणांची शिकार बनला आणि उभा राहून त्याने अन्यत्र जात असलेल्या रंभेचा हात पकडला. बिचारी अबला लाजून चूर झाली. परंतु तो निशाचर हसत हसत तिला म्हणाला - ॥२०॥
क्व गच्छसि वरारोहे कां सिद्धिं भजसे स्वयम् ।
कस्याभ्युदयकालोऽयं यस्त्वां समुपभोक्ष्यते ॥ २१ ॥
वरारोहे ! कोठे जात आहेस ? कुणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच निघाली आहेस ? कुणाचा भाग्योदयाचा समय आला आहे की जो तुझा उपभोग घेईल ? ॥२१॥
त्वदाननरसस्याद्य पद्मोत्पलसुगन्धिनः ।
सुधामृतरसस्येव कोऽद्य तृप्तिं गमिष्यति ॥ २२ ॥
कमल आणि उत्पलाचा सुगंध धारण करणारा तुझ्या ह्या मनोहर मुखारविंदाचा रस अमृताचेही अमृत आहे. आज या अमृतरसाचे आस्वादन करून कोण तृप्त होणार आहे ? ॥२२॥
स्वर्णकुम्भनिभौ पीनौ शुभौ भीरु निरन्तरौ ।
कस्योरःस्थलसंस्पर्शं दास्यतस्ते कुचाविमौ ॥ २३ ॥
भीरू ! परस्परांस भिडलेले तुझे हे सुवर्णमय कलशांसदृश्य सुंदर पीन उरोज कुणाच्या वक्षःस्थलास आपला स्पर्श प्रदान करणार आहेत ? ॥२३॥
सुवर्णचक्रप्रतिमं स्वर्णदामचितं पृथु ।
अध्यारोहति कस्तेऽद्य जघनं स्वर्गरूपिणम् ॥ २४ ॥
सोन्याच्या लड्‍यांनी विभूषित तसेच सुवर्णमय चक्राप्रमाणे विपुल विस्ताराने युक्त तुझे पीन जघनस्थळ, जे मूर्तीमान स्वर्गासारखेच भासत आहे, आज कोण आरोहण करणार आहे ? ॥२४॥
मद्विशिष्टः पुमान् कोऽद्य शक्रो विष्णुरथाश्विनौ ।
मामतीत्य हि यं च त्वं यासि भीरु न शोभनम् ॥ २५ ॥
इंद्र, उपेंद्र अथवा अश्विनीकुमार का असेना, यासमयी कोण पुरुष माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे ? भीरू ! तू मला सोडून अन्यत्र जात आहेस, हे चांगले नाही. ॥२५॥
विश्रम त्वं पृथुश्रोणि शिलातलमिदं शुभम् ।
त्रैलोक्ये यः प्रभुश्चैव मदन्यो नैव विद्यते ॥ २६ ॥
स्थूल नितंब असणार्‍या सुंदरी ! ही सुंदर शिला आहे, हिच्यावर बसून विश्राम कर. या त्रिभुवनाचा जो स्वामी आहे तो माझ्याहून भिन्न नाही आहे - मीच संपूर्ण लोकांचा अधिपति आहे. ॥२६॥
तदेवं प्राञ्जलिः प्रह्वो याचते त्वां दशाननः ।
भर्तुर्भर्ता विधाता च त्रैलोक्यस्य भजस्व माम् ॥ २७ ॥
तीन्ही लोकांच्या स्वामीचाही स्वामी तसेच विधाता हा दशमुख रावण आज याप्रकारे विनीतभावाने हात जोडून तुझ्याकडे याचना करत आहे. सुंदरी ! माझा स्वीकार कर ! ॥२७॥
एवमुक्ताऽब्रवीद् रम्भा वेपमाना कृताञ्जलिः ।
प्रसीद नार्हसे वक्तुं ईदृशं त्वं हि मे गुरुः ॥ २८ ॥
रावणाने असे म्हटल्यावर रंभेचा थरकाप झाला आणि हात जोडून ती म्हणाली - प्रभो ! प्रसन्न व्हा ! माझ्यावर कृपा करावी. आपण माझे गुरूजन आहात, पित्यासमान आहात. आपण अशा गोष्टी तोंडाने बोलता कामा नयेत. ॥२८॥
अन्येभ्योऽपि त्वया रक्ष्या प्राप्नुयां धर्षणं यदि ।
तद्धर्मतः स्नुषा तेऽहं तत्त्वमेव ब्रवीमि ते ॥ २९ ॥
जर दुसरा कोणी पुरुष माझा तिरस्कार करण्यास उद्यत झाला तर त्याच्यापासूनही आपण माझे रक्षण केले पाहिजे. मी धर्मतः आपली पुत्रवधू आहे - ही मी आपल्याला खरी गोष्ट सांगत आहे. ॥२९॥
अथाब्रवीद्दशग्रीवः चरणाधोमुखीं स्थिताम् ।
रोमहर्षमनुप्राप्तां दृष्टमात्रेण तां तदा ॥ ३० ॥
रंभा आपल्या चरणांकडे पहात, खाली तोंड करून उभी होती. रावणाची दृष्टि पडतांच भयामुळे तिचा अंगावर काटा आला होता. त्या समयी रावण तिला म्हणाला - ॥३०॥
सुतस्य यदि मे भार्या ततस्त्वं हि स्नुषा भवेः ।
बाढमित्येव सा रम्भा प्राह रावणमुत्तरम् ॥ ३१ ॥
रंभे ! जर हे सिद्ध झाले की तू माझ्या मुलाची वधू आहेस तरच तू माझी पुत्र-वधू होऊ शकतेस, अन्यथा नाही. तेव्हा रंभेने फार चांगले असे म्हणून रावणास याप्रकारे उत्तर दिले - ॥३१॥
धर्मतस्ते सुतस्याहं भार्या राक्षसपुङ्‌गव ।
पुत्रः प्रियतरः प्राणैः भ्रातुर्वैश्रवणस्य ते ॥ ३२ ॥
राक्षसशिरोमणी ! धर्माला अनुसरून मी आपल्या पुत्राचीच भार्या आहे. आपले मोठे भाऊ कुबेर यांचे पुत्र मला प्राणांपेक्षाही अधिक प्रिय आहेत. ॥३२॥
विख्यातस्त्रिषु लोकेषु नलकूबर इत्ययम् ।
धर्मतो यो भवेद् विप्रः क्षत्रियो वीर्यतो भवेत् ॥ ३३ ॥
ते तीन्ही लोकात नलकूबर नामाने विख्यात आहेत तसेच धर्मानुष्ठानाच्या दृष्टीने ब्राह्मण आणि पराक्रमाच्या दृष्टीने क्षत्रिय आहेत. ॥३३॥
क्रोधाद्यश्च भवेदग्निः क्षान्त्या च वसुधासमः ।
तस्यास्मि कृतसङ्‌केता लोकपालसुतस्य वै ॥ ३४ ॥
ते क्रोधामध्ये अग्नि आणि क्षमेमध्ये पृथ्वीसमान आहेत. त्याच लोकपालकुमार प्रियतम नलकूबरांनाच आज मी भेटण्यासाठी संकेत दिलेला आहे. ॥३४॥
तमुद्दिश्य तु मे सर्वं विभूषणमिदं कृतम् ।
तथा तस्य हि नान्यस्य भावो मां प्रति तिष्ठति ॥ ३५ ॥
हा सारा शृंगार मी त्यांच्यासाठीच केला आहे. जसा त्यांचा माझ्याप्रति अनुराग आहे, त्याच प्रकारे माझेही त्यांच्यावर प्रगाढ प्रेम आहे, दुसर्‍या कुणावर नाही. ॥३५॥
तेन सत्येन मां राजन् मोक्तुमर्हस्यरिन्दम ।
स हि तिष्ठति धर्मात्मा मां प्रतीक्ष्य समुत्सुकः ॥ ३६ ॥
शत्रुंचे दमन करणार्‍या राक्षसराजा ! हे सत्य दृष्टीसमोर ठेवून आपण यासमयी मला सोडून द्यावे, ते धर्मात्मा प्रियतम उत्सुक होऊन माझी प्रतीक्षा करत असतील. ॥३६॥
तत्र विघ्नं तु तस्येह कर्तुं नार्हसि मुञ्च माम् ।
सद्‌भिराचरितं मार्गं गच्छ राक्षसुपुङ्‌गव ॥ ३७ ॥
त्यांच्या सेवेच्या या कार्यात येथे आपण विघ्न आणता कामा नये. मला सोडून द्यावे ! राक्षसराज ! आपण सत्पुरुषांच्या द्वारा आचरित धर्माच्या मार्गावर चालावे. ॥३७॥
माननीयो मम त्वं हि पालनीया तथाऽस्मि ते ।
एवमुक्तो दशग्रीवः प्रत्युवाच विनीतवत् ॥ ३८ ॥
आपण माझे माननीय गुरूजन आहात, म्हणून आपण माझे रक्षण केले पाहिजे. हे ऐकून दशग्रीवाने तिला नम्रतापूर्वक उत्तर दिले - ॥३८॥
स्नुषाऽस्मि यदवोचस्त्वं एकपत्‍नीवष्वयं क्रमः ।
देवलोकस्थितिरियं सुराणां शाश्वती मता ॥ ३९ ॥

पतिरप्सरसां नास्ति न चैकस्त्रीपरिग्रहः ।
रंभे ! तू स्वतःला जे माझी पुत्रवधू म्हणून सांगत आहेस ते मला ठीक वाटत नाही. हे नाते वगैरे त्याच स्त्रियांना लागू पडते ज्या कुणा एका पुरुषाची पत्‍नी असतात. तुमच्या देवलोकातील स्थिति तर दुसरीच आहे. तेथे सदा हाच नियम चालत आलेला आहे की अप्सरांचा कोणी पति नसतो. तेथे कोणीही एका स्त्रीशी विवाह करून राहात नाही. ॥३९ १/२॥
एवमुक्त्वा स तां रक्षो निवेश्य च शिलातले ॥ ४० ॥

कामभोगाभिसंसक्तो मैथुनायोपचक्रमे ।
असे म्हणून त्या राक्षसाने रंभेला बलपूर्वक शिलेवर बसविले आणि कामभोगात आसक्त होऊन तिच्याशी समागम केला. ॥४० १/२॥
सा विमुक्ता ततो रम्भा भ्रष्टमाल्यविभूषणा ॥ ४१ ॥

गजेन्द्राक्रीडमथिता नदीवाकुलतां गता ।
तिचे पुष्पहार तुटून खाली पडले, सारी आभूषणे अस्तव्यस्त झाली. उपभोगानंतर रावणाने रंभेला सोडून दिले. तिची दशा कुणी गजराजाने क्रीडा करून घुसळून काढलेल्या नदीप्रमाणे झाली. ती अत्यंत व्याकुळ झाली. ॥४१ १/२॥
लुलिताकुलकेशान्ता करवेपितपल्लवा ॥ ४२ ॥

पवनेनावधूतेव लता कुसुमशालिनी ।
वेणीबंध तुटून गेल्याने मोकळे झालेले तिचे केस वार्‍याने उडू लागले. तिचा शृंगार बिघडून गेला. करपल्लव कापू लागले. फुलांनी सुशोभित होणार्‍या एखाद्या लतेला वार्‍याने झटके देऊन हलवावे त्याप्रमाणे ती भासत होती. ॥४२ १/२॥
सा वेपमाना लज्जन्ती भीता करकृताञ्जलिः ॥ ४३ ॥

नलकूबरमासाद्य पादयोर्निपपात ह ।
लज्जा आणि भय यांनी थरथरत ती नलकूबराजवळ गेली आणि हात जोडून त्याच्या पायावर कोसळली. ॥४३ १/२॥
तदवस्थां च तां दृष्ट्‍वा महात्मा नलकूबरः ॥ ४४ ॥

अब्रवीत् किमिदं भद्रे पादयोः पतिताऽसि मे ।
रंभेला या अवस्थेत पाहून महामना नलकूबराने विचारले -भद्रे ! काय हकिगत आहे ? तू या प्रकारे माझ्या पायांवर का येऊन पडली आहेस ? ॥४४ १/२॥
सा वै निःश्वसमाना तु वेपमाना कृताञ्जलिः ॥ ४५ ॥

तस्मै सर्वं यथातत्त्वं आख्यातुमुपचक्रमे ।
ती थरथरत कापत होती. तिने दीर्घ श्वास घेऊन हात जोडले आणि जे काही घडले होते ते सर्व ठीक ठीक सांगावयास आरंभ केला - ॥४५ १/२॥
एष देव दशग्रीवः प्राप्तो गन्तुं त्रिविष्टपम् ॥ ४६ ॥

तेन सैन्यसहायेन निशेयं परिणामिता ।
देव ! हा दशमुख रावण स्वर्गलोकावर आक्रमण करण्यासाठी आला आहे. त्याच्या बरोबर फार मोठी सेना आहे. त्याने आजची रात्र येथे तळ ठोकला आहे. ॥४६ १/२॥
आयन्ती तेन दृष्टाऽस्मि त्वत्सकाशमरिन्दम ॥ ४७ ॥

गृहीता तेन पृष्टाऽस्मि कस्य त्वमिति रक्षसा ।
शत्रुदमन वीरा ! मी आपल्यापाशी येत होते परंतु त्या राक्षसाने मला पाहिले आणि माझा हात पकडला. नंतर विचारले - तू कोणाची स्त्री आहेस ? ॥४७ १/२॥
मया तु सर्वं यत् सत्यं तस्मै सर्वं निवेदितम् ॥ ४८ ॥

काममोहाभिभूतात्मा नाश्रौषीत् तद् वचो मम ।
मी त्याला सर्व काही खरे खरे सांगितले, परंतु त्याचे हृदय कामजनित मोहाने आक्रान्त झालेले होते, म्हणून त्याने माझे काहीही ऐकून घेतले नाही. ॥४८ १/२॥
याच्यमानो मया देव स्नुषा तेऽहमिति प्रभो ॥ ४९ ॥

तत्सर्वं पृष्ठतः कृत्वा बलात् तेनास्मि धर्षिता ।
देवा ! मी वारंवार प्रार्थना करतच राहिले की प्रभो ! मी आपली पुत्रवधू आहे, मला सोडून द्या, परंतु त्याने माझे सर्व बोलणे ऐकून न ऐकल्या सारखे केले आणि बलपूर्वक माझ्यावर अत्याचार केला. ॥४९ १/२॥
एवं त्वमपराधं मे क्षन्तुमर्हसि सुव्रत ॥ ५० ॥

न हि तुल्यं बलं सौम्य स्त्रियाश्च पुरुषस्य च ।
हे सुव्रता ! या विवश दशेमध्ये माझ्याकडून जो अपराध घडला आहे, तो आपण क्षमा करावा. सौम्य ! नारी अबला असते. तिच्या ठिकाणी पुरुषाच्या बरोबरीचे शारिरीक बल असत नाही. (म्हणून मी त्या दुष्टापासून स्वतःचे संरक्षण करू शकले नाही.) ॥५० १/२॥
एतत् श्रुत्वा तु सङ्‌क्रुद्धः तदा वैश्रवणात्मजः ॥ ५१ ॥

धर्षणां तां परां श्रुत्वा ध्यानं सम्प्रविवेश ह ।
हे ऐकून वैश्रवण नलकूबराला फार क्रोध आला. रंभेवर केला गेलेला तो महान्‌ अत्याचार ऐकून त्यांनी ध्यान लावले. ॥५१ १/२॥
तस्य तत्कर्म विज्ञाय तदा वैश्रवणात्मजः ॥ ५२ ॥

मुहूर्तात् क्रोधताम्राक्षः तोयं जग्राह पाणिना ।
त्यासमयी मुहूर्तभरात रावणाची ती करणी जाणून वैश्रवणकुमार नलकूबराचे नेत्र क्रोधाने लाल झाले आणि त्यांनी आपल्या हातात जल घेतले. ॥५२ १/२॥
गृहीत्वा सलिलं सर्वं उपस्पृश्य यथाविधि ॥ ५३ ॥

उत्ससर्ज यथा शापं राक्षसेन्द्राय दारुणम् ।
जल घेऊन प्रथम विधिपूर्वक आचमन करून नेत्र आदि सार्‍या इंद्रियांना स्पर्श केल्यानंतर त्यांनी राक्षसराजाला फार भयंकर शाप दिला. ॥५३ १/२॥
अकामा तेन यस्मात् त्वं बलाद्‌ भद्रे प्रधर्षिता ॥ ५४ ॥

तस्मात् स युवतीमन्यां नाकामामुपयास्यति ।
ते म्हणाले - भद्रे ! तुझी इच्छा नसतांनाही रावणाने तुझ्यावर बलपूर्वक अत्याचार केला आहे. म्हणून तो आजपासून दुसर्‍या कुणाही युवतिवर अत्याचार करू शकणार नाही जी त्याची इच्छा करत नसेल. ॥५४ १/२॥
यदा ह्यकामां कामार्तो धर्षयिष्यति योषितम् ॥ ५६ ॥

मूर्धा तु सप्तधा तस्य शकलीभविता तदा ।
जर त्याने कामपीडित होऊन त्याची इच्छा न करणार्‍या युवतीवर बलात्कार केला तर तात्काळ त्याच्या मस्तकाचे सात तुकडे होऊन जातील. ॥५५ १/२॥
तस्मिन् उदाहृते शापे ज्वलिताग्निसमप्रभे ॥ ५६ ॥

देवदुन्दुभयो नेदुः पुष्पवृष्टिश्च खाच्च्युता ।
नलकूबराच्या मुखातून प्रज्वलित अग्निप्रमाणे दग्ध करणारा हा शाप निघताच देवतांच्या दुंदुभि वाजू लागल्या आणि आकाशातून पुष्पवृष्टि होऊ लागली. ॥५६ १/२॥
पितामहमुखाश्चैव सर्वे देवाः प्रहर्षिताः ॥ ५७ ॥

ज्ञात्वा लोकगतिं सर्वां तस्य मृत्युं च रक्षसः ।
ऋषयः पितरश्चैव प्रीतिमापुरनुत्तमाम् ॥ ५८ ॥
ब्रह्मदेव आदि सर्व देवतांना फार हर्ष झाला. रावणाच्या द्वारा केली गेलेली लोकांची सारी दुर्दशा आणि त्या राक्षसाचा मृत्युही जाणून ऋषि आणि पितरांना फार प्रसन्नता प्राप्त झाली. ॥५७-५८॥
श्रुत्वा तु स दशग्रीवः तं शापं रोमहर्षणम् ।
नारीषु मैथुनी भावं नाकामास्वभ्यरोचयत् ॥ ५९ ॥
तो रोमांचकारी शाप ऐकून दशग्रीवाने आपली इच्छा न करणार्‍या स्त्रियांवर बलात्कार करणे सोडून दिले. ॥५९॥
तेन नीताः स्त्रियः प्रीतिं आपुः सर्वाः पतिव्रताः ।
नलकूबरनिर्मुक्तं शापं श्रुत्वा मनःप्रियम् ॥ ६० ॥
त्याने ज्या ज्या पतिव्रता स्त्रियांना हरण करून आणले होते, त्या सर्वांच्या मनाला नलकूबराने दिलेला शाप फार प्रिय वाटला. तो ऐकून त्या सर्वच्या सर्व फारच प्रसन्न झाल्या. ॥६०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षड्वविंशः सर्गः ॥ २६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा सव्वीसावा सर्ग पूरा झाला. ॥२६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP