॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

किष्किंधाकांड

॥ अध्याय आठवा ॥
मागील अनुसंधान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामें उद्धरिलें वाळीसी । राज्यभिषिंचन सुग्रीवासी ।
सुखी केलें स्वयें तारेसी । देवोनि अंगदासी यौवराज्य ॥१॥
सुग्रीव राजा निजभ्रतार । युवराज निजकुमर ।
तारा तेणें सुखनिर्भर । श्रीरामचंद्रप्रसादें ॥२॥

अभिषेके तु सुग्रीवे प्रविष्टे वानरे गुहाम् ।
आजगाम सहभ्राता रामळ पस्रवणं गिरिम् ॥१॥

प्रधान अंगदसमवेत । सुग्रीव गेला किष्किंधेत ।
श्रीरामें वसविला माल्यवंत । गुहा प्रशस्त देखोनि ॥३॥

पावसाळा संपल्यावरही सुग्रीवाच्या उपेक्षेमुळे रामांचा क्रोध :

माल्यवंतगिरिवरीं । प्रस्रवणगुहेभीतरीं ।
श्रीराम राहिला मास चारी । सहे साहाकारी सौमित्र ॥४॥
चारी मास पर्जन्यकाळ । श्रीराम राहिला सुनिश्चळ ।
श्रीरामकार्या उतावेळ । शरत्काल स्वयें आला ॥५॥
ग्रासोनि वर्षाकाळ । शीघ्र पावला शरत्काळ ।
श्रीराम काळाचाही काळ । सुनिश्चळ स्वस्थानीं ॥६॥
जेवीं साधूंचे मानस । नित्य निर्मळ निर्दोष ।
मेघीं सांडीलें आकाश । स्वप्रकाश तेंवी भासें ॥७॥
शारदी निर्मळता आकाशीं । प्रसन्नप्रभा शशीसूर्यांसी ।
तो सुखकाळ साधकांसी । पुरुषार्थांसी साधावया ॥८॥
तीर्था निघाले तीर्थवासी । अभ्यासी बैसले आभ्यासासीं ।
राजे करिती प्रस्थानासी । अरिगवर्गांसी जिंकावया ॥९॥
काळ काळातें आकळित । काळा नाकळे श्रीरघुनाथ ।
तो बैसला असे गिरिगुहेंत । सीताशुद्ध्यर्थ नटनाट्ये ॥१०॥
देखोनियां शरत्काळातें । श्रीरामें म्हणे लक्ष्मणातें ।
सुग्रीव नयेचि कां येथें । निजनियमातें विसरला ॥११॥
जें रंगलें विषयस्वार्थीं । ते नव्हेति परमार्थी ।
त्यांसी दंडोनियां संतीं । हितकार्यार्थीं लावावें ॥१२॥
जो अतिशयेंसी विषयासक्त । तो कदा ना देखेचि परमार्थ ।
तो शुद्ध उपकारार्थ । येईल निश्चित हें न घडे ॥१३॥

चातुर्मास्ये गतेऽभ्येत्य सीतायाः परिमार्गणे ।
कृतार्थः समयं कृत्वा दुर्मतिर्नाभिमन्यते ॥२॥

क्रमलिया चातुर्मास्यासी । शीघ्र यावें सीताशूद्धीसी ।
तेंही नाठवें सुग्रीवासी । जो मजमासीं नेम केला ॥१४॥
किष्किंधे जावोनि आपण । सुग्रीवा द्यावी आठवण ।
जरी तो न मानी माझे वचन । विंधोनि बाण वधावा ॥१५॥
तारा रुमा दोघी पत्‍नी । जो उन्मत्त मद्यपानीं ।
माझे वचन न गणी । तो तत्क्षणीं मारावा ॥१६॥
ज्यासी नाहीं माझी आठवण । नाहीं मत्कर्माचें स्मरण ।
त्यासी मारावें आपण । विंधोनि बाण सौमित्रा ॥१७॥
जेणें केलें वाळिनिर्दळण । तोचि सोडोनियां बाण ।
घ्यावा सुग्रीवाचा प्राण । अर्ध क्षण न लागतां ॥१८॥
शठ नष्ट कूतघ्न वानर । नेणती उपकार प्रत्युपकार ।
मिथ्यावादी पालेखाइर । हा कुमित्र मित्रत्वा ॥१९॥
तूं तंव सखा सौमित्र । सुग्रीव केवळ कुमित्र ।
त्याचें विचारोनि अभ्यंतर । मग संहार करावा ॥२०॥

श्रीरामवचन ऐकून लक्ष्मण क्रोधायमान व शस्रसज्ज होऊन त्याचे प्रयाण :

ऐकोनि श्रीरामाचे वचन । करोनियां साष्टांग नमन ।
लक्ष्मण निघाला आपण । कोपायमान रामाज्ञें ॥२१॥

शक्रचापानिभं घोरं धनुः कालांतकोपमम् ।
प्रगृह्य गिरिशृंगाभं प्रययौ लक्ष्मणस्तदा ॥३॥
शालतालांश्च कर्णांश्च तरसा पातायन्दुमान् ।
शिलाश्च शकलीकुर्वन्पद्‌भ्यां गज इवाशुगः॥४॥

लक्ष्मणाचा अति साटोप । इंद्रधनुष्यासमान चाप ।
हातीं घेवोनि सकोप । पदाक्षेप अवधारा ॥२२॥
सक्रोध पाद सबळ शक्ती । सायसादडे नेणों किती ।
शाळ ताळ उन्मूळती । वृक्ष उपडती कर्णिकार ॥२३॥
अति सक्रोध क्रोधानळीं । वज्रनिर्घातपादें बळीं ।
शिळा पाषाण पायांतळीं । होत रांगोळी पदोपदीं ॥२४॥

हनुमंताची सुग्रीवाल पूर्वसूचना :

पूर्वसूचना स्वये हनुमंत । सुग्रीवासी असे सांगत ।
विसरलासी रामकार्यार्थ अति उन्मत्त विषयांध ॥२५॥
स्रीविषय मद्यपान । त्याहीवरी धन मान ।
त्याही वरी शब्दज्ञान । हेचि नागवण स्वहिताविषयीं ॥२६॥
द्रव्य दारा मद्यपान । तुझे बुडालें स्वहितज्ञान ।
विसरलासी श्रीरामभजन । परम विघ्न तुज आलें ॥२७॥
गेला काळ तूं नेणसी । आयुष्य वेंचले विषयासीं ।
लोटलिया चातुर्मास्यासी । सीताशुद्धीसी न निघवीं ॥२८॥
सीता शुद्धीसी न करितां । कोप येईल श्रीरघुनाथा ।
तो करील तुझिया घाता । सत्य सर्वथा सुग्रीवा ॥२९॥

हनुमंताची व्यवस्था व वानरांना पाचारण :

ऐकोनि हनुमंताचे वचन । सुग्रीव नव्हेचि सावधान ।
वाक्य बोलिला उदासीन । अति गौण कार्यार्थ ॥३०॥
सुग्रीव सांगे हनुमंतांसी । शीघ्र मूळ धाडावे सैन्यासी ।
ऐसें सांगोनिया त्यासी । राव राणिवसासीं निघाला ॥३१॥
हनुमंते येवोनि अति शीघ्र । दहा सहस्र वानरवीर ।
आणावया सेना सैन्यधर । स्वयें सत्वर धाडिले ॥३२॥

लक्ष्मण किष्किंधेला जातो :

येरीकडे सौमित्र । कोपें चालिला काळाग्नि रुद्र ।
त्यातें देखोनि वानरवीर । थोर थोर गजबजिलें ॥३३॥
किष्किंधेची धरोनी वाट । पायें पाषाण करीत पीठ ।
लक्ष्मण येता हे उद्‌भट । वानर समस्त हडबडिले ॥३४॥

दशनागबलाः केचित्केचिद्दशगुणोत्तराः ।
केचिन्नागसहस्रस्य वभूवुस्तुल्पवर्चसः ॥५॥
शतकोटिबलाः केचित्केचिद्वायुबलोपमाः ।
अप्रमेयवलाश्चान्ये तत्रासन्हरिपुंगवाः ॥६॥
ततो भयपरीतांगाः क्रुद्धं द्दष्ट्वां तु लक्ष्मणम् ।
कालमृत्युयुगान्ताभं शतशो दुदुवुस्तदा ॥७॥

एका दहा हस्तींचें बळ वानरा । एका त्यांहूनि दशोत्तरा ।
एका नागबळसहस्रा । त्यास अपार असंख्य ॥३५॥
एकाचे अंगी विद्युल्लताबळ । एकाचें अंगी असंख्य बळ ।
एकएकाहूनि सबळ । तुला अतुळ अप्रमेय ॥३६॥
ऐसे वानरांचे संभार । किष्किंधेमाजी अपार ।
नगर राखिती महावीर । अति दूर्धर बलिष्ठ ॥३७॥
लक्ष्मण शरचापधर । काळ कृत्तांत प्रळयरुद्र ।
त्यातें देखोनियां वानर । लहान थोर भयभीत ॥३८॥
देखोनि लक्ष्मणाचा यावा । चळकाप वानरांच्या जीवा ।
कोणें कोणा धीर द्यावा । भय सर्वां समान ॥३९॥
लक्ष्मणें टणत्कारिलें सीत । वानर उडाले समस्त ।
एक एकापुढें पळत । अति आकांत नगरामाजी ॥४०॥
एका मनुष्याची आली धाडी । तेणें पळती वानरकोडी ।
राजगृहीं हडवड गाढी । वानरें बापडीं किलकिलती ॥४१॥
वानर बोलती विकडीं । वाळिप्रतापख्याती गाढी ।
तो मरतांचि आली धाडी । काढाकाढी कोण करी ॥४२॥
तारा सुग्रीवासी सांगत । नगरीं होतो अति आकांत ।
अझूनि काय कामासक्त । होईं सावचित्त उन्मत्ता ॥४३॥
प्रधान सांगती रायासी । सीताशुद्धिमर्यादेसी ।
तूं जावया चुकलासी । श्रीराम आवेशी क्षोभला ॥४४॥
तुझा करावया घात । श्रीरामें लक्ष्मण धाडिला येथ ।
वानर पळाले समस्त । अति आकांत नगरामाजी ॥४५॥
समयों चुकलों आपण । सत्य कोपला श्रीरघुनंदन ।
लक्ष्मणासी अनन्य शरण । रिघों आपण सकळही ॥४६॥

तं द्दष्ट्वा क्रोधरक्ताक्षं सुगृहीतशरासनम् ।
सुग्रीवः सहसोत्तस्थौ कृतांजलिपुटस्तदा ॥८॥
तस्य तारा रुमा चैव द्वे भार्ये पुरतः स्थिते ।
कृतांजलिपुटे भूत्वा लक्ष्मणाभिमुखे तदा ॥९॥

धनुष्याचा वाहोनि गुण । सीतीं सज्जोनियां बाण ।
लक्ष्मण सक्रोधलोचन । सुग्रीव देखोन भयभीत ॥४७॥

तारा, रुमा व सुग्रीव विनंती करितात :

तारा रुमा दोघी पत्‍नी । पुढें बद्धांजलि करोनी ।
सुग्रीव आला लोटांगणीं । कर जोडोनि राहिला ॥४८॥
सुग्रीव म्हणे मी अपराधी । रामबाणें होय वधी ।
लक्ष्मणां तूं कृपानिधी । मज त्रिशुद्धीं वांचवावें ॥४९॥
सुग्रीव येतां काकुळती । वांचवावया निजपती ।
तारा करितसे विनंती । सत्वयुक्तीं दीनवचनें ॥५०॥
लटिका तरी शरणागत । याचा करूं नये घात ।
मारिल्या अपकीर्ती जगांत । श्रीरघुनाथ पावेल ॥५१॥
सुग्रीव शरणागत जाला । श्रीरामें राज्यीं स्थापिला ।
तोचि श्रीरामें मारिला । स्वकीर्ती केला शिषच्छेद ॥५२॥
शरणागतमज्रपंजर । सुर्यवंशींचा हा वडिवार ।
तेथें मारिलिया वानर । वंशीं श्रीरघुवीर अपकीर्ती ॥५३॥
वाळी वधिला अवचितां । हे अपकीर्ती श्रीरघुनाथा ।
सुग्रीव मारिल्या आता । दुसरी माथां अपकीर्ती ॥५४॥
बाळक अंकावरी मुतलें । बापें धुतलें कीं मारिलें ।
तैसें शरणागत आपुलें । वांचवीं वहिलें सौमित्रा ॥५५॥
तुझें नाम सौमित्र । वधितां शरणागत वानर ।
सौमित्रा होसी तूं कुमित्र । नाम अपवित्र होऊं नेदीं ॥५६॥
वांचवीं सुग्रीवाचा प्राण । वांचवी आमचें अहेवपण ।
तारा रुमा दोघी धांवोन । धरिले चरण मस्तकीं ॥५७॥
ऐकोनि तारेच्या सद्युक्ती । लक्ष्मण सुखावला चित्तीं ।
सुग्रीव महापापमूर्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥५८॥
असत्यवादें अधोगती । तेंही असत्य श्रीरामाप्रती ।
अनुवादलासी पापमूर्ती । ऐक शास्रार्थी निर्णयो ॥५९॥

पंच स्वार्थानृतं हंति दश हंति गवानृतम ।
शतमश्वानृते हंति सहस्रं पुरुषानृतें ॥१०॥
हंति जातानजातांश्च हिरण्यार्थेऽनृतं वदन् ।
सर्वं भूम्यनृतं हन्ति मा स्म भूम्यनृतं वदः ॥११॥
आत्मानं स्वजनं हंति पुरुषः पुरुषानूते ।
पूर्व कृतार्थो मित्राणां न तत्प्रतिकरोति यः ।
कृतघ्नः सर्वभूतानां स वध्यः पुरुषाधमः ॥१२॥

आपस्वार्थी असत्य वदती । पंच पूर्वज नरकीं जातीं ।
असत्य वदलिया गोस्वार्थीं । नरका जाती दशपूर्वज ॥६०॥
अश्वार्थीं असत्य वदती । शत पूर्वज नरका जाती ।
सहस्र पूर्वजां अधोगती । जे मिथ्या बोलती पुरुषार्थ ॥६१॥
जे द्रव्यार्थीं असत्या वदती । त्याचेनि जितां मेल्या अधोगती ।
सकळ कुळ नरका नेती । जे असत्य वदती भूम्यर्थ ॥६२॥
येवोनि सत्पुरुषाप्रती । निश्चय कर्तव्यार्थ बोलती ।
तोचि नेमू न करिती । त्यांची दुर्गती अवधारीं ॥६३॥
सकलकुलस्वजनयुक्त । ते पावती निजात्मघात ।
मेल्यामागें नरक प्राप्त । त्यांसी निश्चितार्थ शास्र हें ॥६४॥
मित्रापासूनि स्वकार्य करूनि घेती । मित्रकार्य स्वयें न करिती ।
तंव ते वधावे सर्वभूतीं । नेमू शास्रार्थी ब्रह्मवाक्य ॥६५॥
परोपकारी सर्वकार्यार्थीं । ते वंदावे सर्व भूतीं ।
जे वंचक मित्रकार्यार्थीं । ते सर्व भूतीं निरसावे ॥६६॥
असतां घराश्रममढी । लटिका दोष लावोनि दुसरियांते पीडी ।
त्याच्या नरकाची परवडी । संख्या कोण करील ॥६७॥
त्यासी सर्प स्वयें डंखिती । व्याघ्र ऋक्ष वृक स्वयें भक्षिती ।
धर्मनियामक त्यासी विंधिती । वध्य होती सर्वांसी ॥६८॥

तारेची प्रार्थना व सुग्रीवाची शरणागती :

ऐकोनि लक्ष्मणाची युक्ती । तारा विनवीतसे पुढती ।
सुग्रीव पापी होय निश्चिंतीं । पापनिर्मुक्ती तुझेनि ॥६९॥
करिता श्रीरामनामस्मरण । सकळ पापां होय दहन ।
तो देखिल्या रघुनंदन । पाप निर्दळण सत्संगे ॥७०॥
आवडीं करितां रामगोष्टी । पापें जळते कल्पकोटी ।
श्रीराम देखिल्या निजदृष्टीं । निष्पाप सृष्टीं श्रीरामें ॥७१॥
रामनामप्रतापशक्ती । पायां लागती चारी मुक्ती ।
नाम ब्रह्मादिक वंदिती । पापनिर्मुक्ती श्रीरामनामें ॥७२॥
तारावाक्य नाममहिमान । तेणें सौमित्रा प्रेम पूर्ण ।
तारेने धरिले दोनी चरण । पतिदान मज द्यावें ॥७३॥
तारसौमित्रसंभाषण । ऐकोनि सुग्रीव आलें रुदन ।
श्रीरामसेवा चुकलपं जाण । वध्य संपूर्ण मी होय ॥७४॥
लागल्या श्रीरामाचा बाण । तत्काळ जाईल माझा प्राण ।
सौमित्रा तुज मी अनन्य शरण । जीवदान मज द्यावें ॥७५॥

भ्रातृव्यसनसंतप्तं द्दष्ट्वा दशरथात्मजम् ।
सौवर्णमासनं हित्वा नत्वा तच्चरणांबुजम् ॥१३॥

सांडोनि हेमसिंहासन । सांडोनि राज्यसन्मान ।
सांडोनियां राज्यभिमान । वंदिले चरण लक्ष्मणाचें ॥७६॥

कृतघ्नाची निंदा, महापातकांहूनही अधम :

सीताशुद्धिकार्याकारण । श्रीरामाज्ञेस्तव जाण ।
कोपोनियां लक्ष्मण । काय आपण बोलत ॥७७॥
कामचारिया स्रीलंपटा । स्वकार्यवादिया महाशठा ।
श्रीरामकार्या परिभ्रष्टा । आतिपापिष्ठा तूं ऐक ॥७८॥

ब्रह्मघ्ने च सुरापे च चौरे भग्नवते तथा ।
निष्कृतिर्विहिता लोके कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ॥१४॥

सुरापानी ब्रह्मघाती । असे यासी प्रायश्चित्त शास्रार्थीं ।
चोर शठक भग्नव्रतीं । त्यांसीही निष्कृति शास्रीं असे ॥७९॥
मित्रोपकारा जो कृतघ्न । त्यासी निष्कृति नाहीं जाण ।
तुवां चाळविला रघुनंदन । पापी संपूर्ण तूं एक ॥८०॥

मारुतीची मध्यस्थी व लक्ष्मणाचा संतोष :

कठिण बोलतां लक्ष्मण । तारा सुग्रीव अति उद्विग्न ।
ऐसें संकट अवलोकोन । वायुनंदन तेथें आला ॥८१॥
सीताशुद्धीचा कार्यार्थ । सांडोनि ठकिला श्रीरघुनाथ ।
यालागीं रामें करविला घात । महापापी तूं कृतघ्न ॥८२॥
साधावया उभयकार्यार्थ । उचित बोले हनुमंत ।
न करोनि सुग्रीवाचा घात । रामाकार्यार्थ साधावा ॥८३॥
सेवा चुकल्या श्रीरघुनाथा । कोटि अपराध याचे माथां ।
क्षमा करोनि शरणागता । रामकार्यार्था साधणें ॥८४॥
आणावया वानरसैन्यासी । दूत धाडिले देशोदेंशी ।
क्षमा करोनि सुग्रीवासी । रामकार्यासी साधावें ॥८५॥
ऐकोनि हनुमंताचें वचन । सौमित्र झाला सुखसंपन्न ।
तेव्हां सुग्रीव संतोषोन । केलें नमन आल्हादें ॥८६॥

प्रणम्य लक्ष्मणं राजा सुग्रीवस्त्विदमब्रवीत् ।
सर्व एव यतिष्यामो यद्रामस्य चिकीर्षितम ॥१५॥

सीताशुद्धि रामाकार्यार्था । अति आल्हाद वानरनाथा ।
सौमित्रचरणीं ठेवोनि माथा । होय बोलता सुग्रीव ॥८७॥
सेना यूथप सैन्य प्रधान । अंगदासहित आपण ।
श्रीरामसेवेसी विकिला प्राण । सत्य जाण सौमित्रा ॥८८॥
श्रीरामाचें मनोगत । सिद्धि पाववीन समस्त ।
सैन्य आणावया येथ । दूत त्वरित धाडिले ॥८९॥
माझे सेनानी सैन्यसंभार । रणकर्कश अति झुंजार ।
आतुर्बळी येती वानर । दूत सत्वर धाडिले ॥९०॥

लक्ष्मणाचा सन्मान व त्याचे रामांकडे परतणे :

अर्घ्यपाद्यादि चंदन । धूपदीप माळा सुमन ।
करोनि लक्ष्मणाचें पूजन । केलें नमन सुग्रीवें ॥९१॥
सौमित्र म्हणे सुग्रीवासी । शीघ्र निघावें रामापासीं ।
एकाकी मी सांडोनि त्यासी । येथें आम्हांसी राहों नये ॥९२॥
ऐकोनि सौमित्राचें वचन । उभे अवघे करोनि प्रधान ।
सुग्रीवे वाहियला पण । अति निर्वाण तो ऐका ॥९३॥

कार्यपूर्ती करण्यापूर्वीं परत येईल त्यास दंड :

जो परतेल किष्किंधावनीं । तो दंडीन रासभारोहणीं ।
तारा रूमा पाहे परतोनी । तो मातृगमनी माहापापी ॥९४॥
सीताशूद्धी साध्य न होतां । श्रीराम सुखी न करितां ।
जो परतेल मागुता । तो दंडिजे पालथा तप्ततैलीं ॥९५॥

सर्वांचे रामांना नमन :

ऐसें सुग्रीवें नेमून । निशाणें त्राहाटिलीं गर्जोन ।
रथशिबिका संजोगून । तत्क्षणीं निघाले ॥९६॥
अंगद सौमित्र सुग्रीव वीर । रथीं चढले महाशूर ।
वालव्यजन श्वेतातपत्र । धरिले क्षत्र रायासीं ॥९७॥
जाला वाद्यांचा एक गजर । भाट गर्जती गंभीर ।
वानर वीरांचा संभार । अति सत्वर चालिला ॥९८॥
माल्यवंतपर्वतामाझारीं । प्रस्रणगिरिशिखरीं ।
राम मणिमय शिळेवरी । गुहाद्वारी उपविष्ट ॥९९॥
श्रीरामा देखोनि वानर । अवघीं केला जयजयकार ।
अंगद सौमित्र सुग्रीव वीर । केला नमस्कार साष्टांगी ॥१००॥

वानरसैन्याचा प्रचंड मेळावा :

अजानबाहु पसरोन । श्रीरामें दिधलें आलिंगन ।
सुग्रीव पावोनि समाधान । काय गर्जोन बोलत ॥१०१॥
दूत धाडिले सत्वर । यूतयूथप माहावीर ।
वानरसेना सैन्यसंभार । अति सत्वर येताती ॥१०२॥

एतस्मिन्नंतरे घोरं वानराणां महाबलम् ।
उत्पपात महावीरं चालयन्वसुधातलम् ॥१६॥
ततो नागेंद्रसकाशैस्तीक्ष्णदंष्ट्रमहाबलैः ।
बभूबुर्वानरैघौरोर्दिशः सर्वाः समावृताः ॥१७॥

ऐसें बोलतां महावीर । वानरसेनासंभार ।
येवों सरले अपार । धरा समग्र व्यापोनि ॥१०३॥
वानरसेना अतिप्रबळ । रितें न दिसे क्षितितळ ।
व्यापोनियां कुलाचळ । गोळांगूळ पैं आले ॥१०४॥
एक वानर पर्वताकार । एक वानरांमाजी गजेंद्र ।
तीक्ष्णनखें दंष्ट्रा क्रूर । अति दुर्धर युद्धार्थी ॥१०५॥
मारितां पुच्छांचा पैंसांट । शत सहस्रां होय आट ।
नखें पर्वतां करिती पीठ । दांती तिखट वीर मारिती ॥१०६॥
पूर्वे वानरांचे थाट । पश्चिमे दाटले घनदाट ।
उत्तरदक्षिणे वानरश्रेष्ठ । वीर उद्‌भट कोंदले ॥१०७॥
आग्नेय वायव्य नैर्ऋत्य । वानर कोंदले अमित ।
ईशान्य दिशेचा प्रांत । किळकिळीच वानरीं ॥१०८॥
वानरीं व्याप्त नभःस्थळ । वानरीं व्याप्त भूमंडळ ।
वानरीं व्यापिले सकळ । कुलाचळ पर्वत ॥१०९॥
एक ते अंजनाभ काळे । एक ते पीतवर्ण पिंवळे ।
एक ते गौरवर्ण सोनसळे । एक ते निळे सुनीळ ॥११०॥
सिंदूरारक्त वानरगण । एक ते विद्युत्प्राय पुर्ण ।
एक ते शुद्ध शुभ्रवर्ण । धूम्रवर्ण पैं एक ॥१११॥
एक ते भूरकट वानर । एक ते दाळिंबीसुमनाकार ।
एक ते पेरीजाचे डोंगर । अभ्रशरीर पै एक ॥११२॥
एक चंद्रप्राय चोखडे । एक कुंकुमांकित तांबडे ।
समोमलोमीं रीस गाढे । सैन्यापुढें गुणगुणिती ॥११३॥
होतां श्रीरामदर्शन । रिसां रामनामगुणगुण ।
वानर करिती रामस्मरण । नामें त्रिभुवन कोंदलें ॥११४॥
देखता श्रीरामाची मूर्ती । पालटल्या चित्तवृत्ती ।
वानरां आवडे श्रीरामभक्ती । नाम स्मरती अहर्निशीं ॥११५॥
बाप सत्संगाचा महिमा । पशु विनटले रामनामा ।
श्रीरामभक्ति प्लवंगमां । तिहीं हनुमान गुरु केला ॥११६॥
श्रीरामनामाचा गजर । वानरीं केला भुभुःकार ।
श्रीरामचंद्र सुखसागर । आणि सौमित्र आल्हादे ॥११७॥
स्वयें श्रीरामें अति उल्लासीं । सुग्रीवा धरिलें पोटांसीं ।
सत्य सखा माझा होसी । दृढविश्वासी कार्यकरिता ॥११८॥
सौमित्र पुसे सुग्रीवासी । मर्यादा न दिसे वानरांसी ।
त्यांची संख्या आहे कैसी । तेचि श्रीरामापांसी सांगावी ॥११९॥

स्वैः स्वैः परिवृताः सैन्यैः सर्वे तिष्ठन्ति राघव ।
शतैः शतसहस्रैश्व वर्तंते कोटिभिस्तथा ॥१८॥
अयुतैरागमिष्यंति संकुमिश्व परंतप ।
अर्बुदैरर्बुदशतैर्मध्यैरंत्यैश्च वानराः ॥१९॥

श्रीरामा तुझी प्रतापप्रौढी । सैन्यें आलीं तंव हीं थोडीं ।
पुढे येतील कल्पकोडी । संख्यापरवडी असंख्य ॥१२०॥
अर्बुद निर्बुद हें अल्पक । शंक महाशंखाहूनि अधिक ।
सैन्य मिळालें असंख्य । करितां शंख नव्हे संख्या ॥१२१॥
समु्द्राचे थोडे खडे । इतुकें सैन्य मिळेल पुढें ।
रावण कायसें बापुडें । आणिन रोकडें बांधोनी ॥१२२॥
ऐसें बोलोनीयां पाहें । सुग्रीवें आफळिली बाहे ।
शिवोनी श्रीरामाचे पाये । करील काय तें ऐका ॥१२३॥
रणीं राक्षसां रवंदळी । करीन लंकेची पै होळी ।
त्रिकूट उपटोनि समूळीं । जनकबाळी आणीन ॥१२४॥
वधोनियां लंकानाथा । स्वयें आणोनिया सीता ।
सुखी करीन श्रीरघुनाथा । होय गर्जता आल्हादें ॥१२५॥
ऐकोनि सुग्रीवाची मात । संतोषोनि श्रीरघुनाथ ।
सुग्रीवास कडिये घेत । स्वयें नाचत स्वानंदे ॥१२६॥
जैसी आणोनि दिधली सीता । तैसें सुख झालें श्रीरघुनाथा ।
उचलोनियां निजभक्ता । होय नाचता श्रीराम ॥१२७॥
वानरीं केला भुभुःकार । ऋषी करिती जयजयकार ।
सुमनें वर्षती सुरवर । सुखनिर्भर श्रीराम ॥१२८॥
सुग्रीव रामें उचलितां । सुखें विसरला देव भक्ता ।
मीतूंपण नाठवे रघुनाथा । भक्तप्रेमता निजऐक्य ॥१२९॥
एकाजर्दादना शरण । देवभक्तां ऐक्य पूर्ण ।
खुंटला बोल तुटलें मौन । सुखैकघन श्रीराम ॥१३०॥
सुख द्यावया सर्वांसी । श्रीराम आला वनवासासी ।
तेणें सुखी केलें सुग्रीवासी । निजसमरसीं निजांगे ॥१३१॥
स्तस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
सुग्रीवागमनं नाम अष्टमोध्यायः ॥ ८ ॥
॥ ओंव्या १३१ ॥ श्लोक १९ ॥ एवं १५० ॥



GO TOP