श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुंदरकाण्डे
॥ सप्तपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
समुद्रल्लङ्घ्य हनुमतो जाम्बवदङ्गदप्रभृतिभिः सुहृद्‌भिः सह समागमः -
हनुमंतांचे समुद्र ओलांडून जाम्बवान आणि अंगद आदि सुहृदांना भेटणे -
आप्लुत्य च महावेगः पक्षवानिव पर्वतः ।
भुजङ्गयक्षगंधर्व प्रबुद्धकमलोत्पलम् ॥ १ ॥

सचंद्रकुमुदं रम्यं सार्ककारण्डवं शुभम् ।
तिष्यश्रवणकादंबं अभ्रशैवालशाद्वलम् ॥ २ ॥

पुनलर्वसुमहामीनं लोहिताङ्‍गमहाग्रहम् ।
ऐरावतमहाद्वीपं स्वातीहंसविलासितम् ॥ ३ ॥

वातसङ्‍घातजातोर्मि चंद्रांशुशिशिरांबुमत् ।
हनुमानपरिश्रांतः पुप्लुवे गगनार्णवम् ॥ ४
पंख असलेल्या पर्वताप्रमाणे असलेल्या त्या महावेगवान हनुमानांनी न थकता उड्डाण करण्यास प्रारंभ केला. तो आकाशरूपी शुभ्रसागर चंद्ररूपी श्वेत कमल (कुमुद) आणि सूर्यरूपी कारंडवपक्षी यांनी युक्त असल्यामुळे रमणीय दिसत होता. पुष्य आणि श्रवण नक्षत्र त्यांतील कलहंसाप्रमाणे आणि मेघ हेच त्यांतील शेवाळ आणि हिरवे गवत होते. पुर्नवसु नक्षत्राचे तारे हे त्यातील विशाल मत्स्य होते आणि मंगळ हाच त्यांतील मोठा ग्राह (नक्र) होता. ऐरावत हत्ती त्यात महान द्वीपासारखा भासत होता आणि स्वाती नक्षत्ररूपी हंसाचा तेथे विलास चाललेला होता आणि तो वायुसमूहरूपी तरंगांनी आणि चंद्रकिरण रूपी शीतल जलाने भरलेला होता आणि भुजंग, यक्ष आणि गंधर्व ही त्यांतील उमललेली कमळे होती. सागरातून अत्यंत वेगाने जाणार्‍या महानौकेप्रमाणे हनुमान जरा ही न थकता त्या सुंदर आणि रमणीय आकाशरूपी समुद्रास पार करू लागला. ॥१-४॥
ग्रसमान इवाकाशं ताराधिपमिवोल्लिखन् ।
हरन्निव सनक्षत्रं गगनं सार्कमण्डलम् ॥ ५ ॥

अपारमपरिश्रांतश्च अम्बुधिं समगाहत ।
हनुमान् मेघजालानि विकर्षन्निव गच्छति ॥ ६ ॥
आकाश गिळूनच टाकीत आहे की काय, ताराधिपती चंद्राला नखांनी ओरबाडीतच आहे की काय आणि सूर्यमंडळ आणि नक्षत्रे या सर्वांसह आकाशच हरण करीत आहे की काय अशाप्रकारे ते श्रीमान वायुपुत्र महाकपि हनुमान जणु मेघपटलांना ओढीतच की काय आकाशांतून पुढे जाऊ लागला. ॥५-६॥
पाण्डरारुणवर्णानि नीलमाञ्जिष्ठकानि च ।
हरितारुणवर्णानि महाभ्राणि चकाशिरे ॥ ७ ॥
तेव्हा पांढरे, तांबूस, निळे, लाल, हिरवे आणि अरुण वर्णाचे मोठमोठे मेघ त्यांचा मागे ओढले जात असता अत्यंत शोभून दिसत होते. ॥७॥
प्रविशन्नभ्रजालानि निष्पतंश्च पुनः पुनः ।
प्रच्छन्नश्च प्रकाशश्च चंद्रमा इव दृश्यते ॥ ८ ॥
उड्डाण करीत असतां ते हनुमान कधी अभ्रपटलात प्रवेश करीत असत तर कधी त्यांतून बाहेर पडत असत. वारंवार असे करीत असता ते कधी लपणार्‍या आणि कधी प्रकट होणार्‍या (प्रकाशित होणार्‍या) चंद्रम्यासारखे दिसत होते. ॥८॥
विविधाभ्रघनापन्न गोचरो धवलांबरः ।
दृश्यादृश्यतनुर्वीरः तथा चंद्रायतेऽम्बरे ॥ ९ ॥
नाना प्रकारच्या मेघपंक्तितून जात असतांना त्या शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या वीरवर हनुमानांचे शरीर कधी दिसत असे, कधी अदृश्य होत असे त्यामुळे ते आकाशांत ढगांच्या आड लपणार्‍या आणि परत प्रकाशित होणार्‍या चंद्रासारखे दिसू लागले. ॥९॥
तार्क्ष्यायमाणो गगने बभासे वायुनंदनः ।
दारयन् मेघवृन्दानि निष्पतंश्च पुनः पुनः ॥ १० ॥
मेघसमुदायाला वारंवार भेदून टाकणारे आणि पुनरपि त्यातून बाहेर पडणारे वायुपुत्र हनुमान आकाशात गरूडासारखे भासू लागले. ॥१०॥
नदन् नादेन महता मेघस्वनमहास्वनः ।
प्रवरान् राक्षसान् हत्वा नाम विश्राव्य चात्मनः ॥ ११ ॥

आकुलां नगरीं कृत्वा व्यथयित्वा च रावणम् ।
अर्दयित्वा महावीरान् वैदेहीमभिवाद्य च ॥ १२ ॥

आजगाम महातेजाः पुनर्मध्येन सागरम् ।
याप्रकारे महातेजस्वी हनुमान आपल्या महान सिंहनादाने मेघांच्या गंभीर गर्जनेवरही मात करीत पुढे जात होते. प्रमुख राक्षसांना मारून त्यांनी आपले नाव गाजवले होते. मोठमोठ्‍या वीरांना पदाक्रांत करून त्यांनी लंकानगरीला व्याकुळ आणि रावणाला व्यथित केले होते आणि वैदेही सीतेला अभिवादन करून ते निघाले होते आणि ते महातेजस्वी हनुमान तीव्र गतीने पुन्हा सागराच्या मध्यभागी येऊन पोहोंचले. ॥११-१२ १/२॥
पर्वतेंद्रं सुनाभं च समुपस्पृश्य वीर्यवान् ॥ १३ ॥

ज्यामुक्त इव नाराचो महावेगोऽभ्युपागमत् ।
तेथे पर्वतराज सुनाभाला (मैनाकाला) स्पर्श करून ते पराक्रमी आणि महावेगवान वानरवीर धनुष्याच्या प्रत्यंचेपासून सुटलेल्या नाराच बाणाप्रमाणे वेगाने पुढे निघाले. ॥१३ १/२॥
स किंचिदारात् संप्राप्तः समालोक्य महागिरिम् ॥ १४ ॥

महेंद्रमेघसङ्‍काशं ननाद स महाकपिः ।
उत्तरतटाच्या जरा निकट आल्यावर महागिरी महेंद्रावर दृष्टी पडतांच त्या महाकपिने मेघाप्रमाणे अत्यंत जोराने गर्जना केली. ॥१४ १/२॥
स पूरयामास कपिः दिशो दश समंततः ॥ १५ ॥

नदन् नादेन महता मेघस्वनमहास्वनः ।
उच्च स्वराने गर्जना करता करता मेघाप्रमाणे गंभीर स्वर असलेल्या त्या वानर वीराने आपल्या गर्जनेने भोवतालच्या दाही दिशा दणाणून टाकल्या. ॥१५ १/२॥
स तं देशमनुप्राप्तः सुहृद्दर्शनलालसः ॥ १६ ॥

ननाद सुमहानादं लाङ्‍गूलं चाप्यकंपयत् ।
नंतर आपल्या सुहृदांना पाहण्यासाठी (त्यांचे दर्शन घेण्यासाठी) उत्सुक होऊन त्या प्रदेशात येतांक्षणी हनुमान उच्च स्वराने गर्जना करून आपले पुच्छ हालवू लागले. ॥१६ १/२॥
तस्य नानद्यमानस्य सुपर्णचरिते पथि ॥ १७ ॥

फलतीवास्य घोषेण गगनं सार्कमण्डलम् ।
ज्या मार्गाने गरूड जातो त्या आकाशमार्गाने जात असता हनुमान वारंवार सिंहनाद करू लागले तेव्हा त्यांच्या गर्जनेने सूर्यमंडलासह सर्व आकाशच विदीर्ण होत आहे की काय असा भास होऊ लागला. ॥१७ १/२॥
ये तु तत्रोत्तरे तीरे समुद्रस्य महाबलाः ॥ १८ ॥

पूर्वं संविष्ठिताः शूरा वायुपुत्रदिदृक्षवः ।
महतो वायुनुन्नस्य तोयदस्येव निःस्वनम् ।
शुश्रुवुस्ते तदा घोषं ऊरुवेगं हनूमतः ॥ १९ ॥
पूर्वी जे महाबलाढ्‍य आणि शूर वानर वायुपुत्राची मार्गप्रतीक्षा करीत समुद्राच्या उत्तर तीरावर बसलेले होते त्यांनी वायूशी धडक घेणार्‍या महान मेघांच्या गर्जनेप्रमाणे प्रचंड वेगाचा हनुमानांचा सिंहनाद ऐकला. ॥१८-१९॥

ते दीनमनसः सर्वे शुश्रुवुः काननौकसः ।
वानरेंद्रस्य निर्घोषं पर्जन्यनिनदोपमम् ॥ २० ॥
अनिष्टाच्या आशंकेने ज्यांच्या मनात दीनता पसरली होती, त्या समस्त वनवासी वानरांनी त्या वानरश्रेष्ठ हनुमानांचा मेघगर्जनेप्रमाणे भासणारा सिंहनाद ऐकला. ॥२०॥
निशम्य नदतो नादं वानरास्ते समंततः ।
बभूवुरुत्सुकाः सर्वे सुहृद्दर्शनकाङ्‌क्षिणः ॥ २१ ॥
गर्जना करणार्‍या हनुमानांचा सिंहनाद ऐकून सर्व बाजूस बसलेले ते समस्त वानर आपला सुहृदय हनुमान याच्या दर्शनासाठी उत्कण्ठित झाले. ॥२१॥
जांबवान् स हरिश्रेष्ठः प्रीतिसंहृष्टमानसः ।
उपामंत्र्य हरीन् सर्वान् इदं वचनमब्रवीत् ॥ २२ ॥
वानर-अस्वलांमध्ये श्रेष्ठ जाम्बवानाच्या मनाला अत्यंत हर्ष झाला आणि प्रसन्न अंतःकरणाने सर्व वानरांना जवळ बोलावून तो म्हणाला- ॥२२॥
सर्वथा कृतकार्योऽसौ हनूमान्नात्र संशयः ।
न ह्यस्याकृतकार्यस्य नाद एवंविधो भवेत् ॥ २३ ॥
हा हनुमान सर्वस्वी कार्य सिद्ध करून आला आहे यात जराही संशय नाही, कारण कार्य सिद्ध झाल्याशिवाय अशा प्रकारचा सिंहनाद त्याच्याकडून होण्याचा संभव नाही. ॥२३॥
तस्य बाहूरुवेगं च निनादं च महात्मनः ।
निशम्य हरयो हृष्टाः समुत्पेतुर्यतस्ततः ॥ २४ ॥
जाम्बवानाने हे सांगितल्यावर त्या महात्मा हनुमानाच्या हातापायांचा महान वेग पाहून आणि त्याचा सिंहनाद ऐकून सर्व वानर हर्षित होऊन इकडे तिकडे उड्‍या मारू लागले. ॥२४॥
ते नगाग्रान्नगाग्राणि शिखराच्छिखराणि च ।
प्रहृष्टाः समपद्यंत हनूमंतं दिदृक्षवः ॥ २५ ॥
हनुमानाला पहाण्याकरिता उत्सुक झालेले ते वानर आनंदाने या वृक्षाच्या शेंड्‍यावरून त्या वृक्षाच्या शेंड्‍यावर आणि एका पर्वतशिखरावरून दुसर्‍या पर्वतशिखरावर उड्‍या मारू लागले. ॥२५॥
ते प्रीताः पादपाग्रेषु गृह्य शाखामवस्थिताः ।
वासांसि वव प्रकाशानि समाविध्यंत वानराः ॥ २६ ॥
नंतर हनुमंतावरील प्रेमामुळे वृक्षांच्या सर्वात उंच शाखावर बसून (मनुष्य ज्याप्रमाणे दुरुन येणार्‍या स्वकीयांच्या स्वागतासाठी वस्त्रें/झेंडे हलवून स्वागत करतात त्याप्रमाणे) ते वानर स्पष्ट दिसून येणारी वस्त्रें हातात धरून हनुमानाच्या जणु स्वागतासाठी जोरजोरात हलवू लागले. ॥२६॥
गिरिगह्वरसंलीनो यथा गर्जति मारुतः ।
एवं जगर्ज बलवान् हनूमान् मारुतात्मजः ॥ २७ ॥
ज्याप्रमाणे पर्वताच्या गुहामधून अवरूद्ध झालेला वायु मोठ्‍या जोराने आवाज करतो त्याप्रमाणे बलवान पवनपुत्र हनुमान गर्जना करू लागले. ॥२७॥
तमभ्रघनसङ्‍काशं आपतंतं महाकपिम् ।
दृष्ट्वा ते वानराः सर्वे तस्थुः प्राञ्जलयस्तदा ॥ २८ ॥
मेघांच्या समूहाप्रमाणे जवळ येणार्‍या त्या महाकपि हनुमंताला पाहून ते सर्व वानर हात जोडून उभे राहिले. ॥२८॥
ततस्तु वेगवान् वीरो गिरेर्गिरिनिभः कपिः ।
निपपात गिरेस्तस्य शिखरे पादपाकुले ॥ २९ ॥
इतक्यात अरिष्ट पर्वतावरून उड्डाण करून निघालेले ते पर्वतासमान विशाल देह असलेले, वेगवान वीर वानर हनुमान त्या वृक्षांनी गजबजलेल्या महेंद्र पर्वताच्या शिखरावर येऊन थडकले. ॥२९॥
हर्षेणापूर्यमाणोऽसौ रम्ये पर्वतनिर्झरे ।
छिन्नपक्ष इवाकाशात् पपात धरणीधरः ॥ ३० ॥
सारांश- हर्षाने चित्त उचंबळत असलेले ते हनुमान रमणीय निर्झराजवळ पंख तुटलेल्या पर्वताप्रमाणे आकाशांतून खाली आले. ॥३०॥
ततस्ते प्रीतमनसः सर्वे वानरपुङ्‍गवाः ।
हनूमंतं महात्मानं परिवार्योपतस्थिरे ॥ ३१ ॥
तेव्हा मनामध्ये अत्यंत प्रसन्न झालेले ते सर्व वानरश्रेष्ठ महात्मा हनुमानाला सर्व बाजूनी गराडा घालून उभे राहिले. ॥३१॥
परिवार्य च ते सर्वे परां प्रीतिमुपागताः ।
प्रहृष्टवदनाः सर्वे तमागतमुपागमन् ॥ ३२ ॥

उपायनानि चादाय मूलानि च फलानि च ।
प्रत्यर्चयन् हरिश्रेष्ठं हरयो मारुतात्मजम् ॥ ३३ ॥
त्याला सर्व बाजूने घेरून उभे राहिलेल्या त्यांच्या मनांत परम प्रेम दाटून आले. त्याला सकुशल परत आलेला पाहून ते हर्षित वदनाने अगदी त्याच्याजवळ येऊ लागले आणि नुकताच आलेल्या त्या पवनपुत्र कपिश्रेष्ठ हनुमंताजवळ नाना प्रकारची भेट-सामग्री आणि नजराण्या दाखल फळे-मुळे आणून ठेवून त्याचा त्या वानरांनी आदर सत्कार केला. ॥३२-३३॥
विनेदुर्मुदिताः केचित् केचित् किलकिलां तथा ।
हृष्टाः पादपशाखाश्च आनिन्युर्वानरर्षभाः ॥ ३४ ॥
कुणी आनंदमग्न होऊन गर्जना करू लागले. कुणी किलकिल शब्द करू लागले आणि कित्येक श्रेष्ठ वानरांनी आनंदित होऊन हनुमानास बसण्यासाठी वृक्षांच्या शाखा तोडून आणल्या. ॥३४॥
हनुमांस्तु गुरून् वृद्धान् जांबवत्प्रमुखांस्तदा ।
कुमारमङ्‍गदं चैव सोऽवंदत महाकपिः ॥ ३५ ॥
नंतर महाकपि हनुमंतांनी सर्व वडील मंडळी, वृद्धमंडळी आणि जाम्बवंतादि प्रमुखांना तसेच कुमार अंगदालाही (स्वामी भावनेने) वंदन केले. ॥३५॥
स ताभ्यां पूजितः पूज्यः कपिभिश्च प्रसादितः ।
दृष्टा देवीति विक्रांतः संक्षेपेण न्यवेदयत् ॥ ३६ ॥
नंतर जाम्बवान आणि अंगद यांनीही आदरणीय हनुमानांचा आदर सत्कार केला आणि इतर सर्व वानरांनीही त्यांचा सन्मान करून त्यास संतुष्ट केले. त्यानंतर त्या पराक्रमी वानरवीराने ’मला सीतेचे दर्शन झाले आहे’ असे थोडक्यात निवेदन केले. ॥३६॥
निषसाद च हस्तेन गृहीत्वा वालिनः सुतम् ।
रमणीये वनोद्देशे महेंद्रस्य गिरेस्तदा ॥ ३७ ॥

हनुमानब्रवीत् पृष्टः तदा तान् वानरर्षभान् ।
अशोकवनिकासंस्था दृष्टा सा जनकात्मजा ॥ ३८ ॥
त्यानंतर वालीपुत्र अंगदाचा हात आपल्या हातात धरून ते हनुमान महेंद्र पर्वतावरील रमणीय वनप्रदेशात जाऊन बसले आणि सर्व वानरांनी प्रश्न केल्यावर ते त्या वानरश्रेष्ठांना म्हणाले- "ती जनककन्या सीता अशोकवनामध्ये बसलेली, अशी माझ्या दृष्टीस पडली. जनककन्या सीता लंकेच्या अशोकवनात निवास करीत आहे. तेथेच मी तिचे दर्शन घेतले आहे. ॥३७-३८॥
रक्ष्यमाणा सुघोराभी राक्षसीभिरनिंदिता ।
एकवेणीधरा बाला रामदर्शनलालसा ॥ ३९ ॥

उपवासपरिश्रांता मलिना जटिला कृशा ।
’अत्यंत भयंकर राक्षसी त्या साध्वी सीतेचे रक्षण करीत आहेत. साध्वी सीता अत्यंत साधी भोळी आहे. तिची नुसती एक वेणी आहे आणि ती बाला रामदर्शनाकरिता लालायित झाली आहे. उपवास करून करून ती अगदी थकली आहे, दुर्बल आणि मलिन झालेली आहे आणि तिचे केस जटेच्या रूपात परिणीत झाले आहे. (केसांच्या जटा बनल्या आहेत) ॥३९ १/२॥
ततो दृष्टेति वचनं महार्थममृतोपमम् ॥ ४० ॥

निशम्य मारुतेः सर्वे मुदिता वानराभवन् ।
परंतु त्यावेळी (दृष्टीस सीतेचे दर्शन झाले) हे महात्वाच्या अर्थाचे अमृततुल्य वाक्य मारुतीच्या मुखातून ऐकताच सर्वही वानर आपले प्रयोजन सिद्धिस गेले हे जाणून अत्यंत प्रसन्न, हर्षित झाले. ॥४० १/२॥
क्ष्वेडन्त्यन्ये नदंत्यन्ये गर्जन्त्यन्ये महाबलाः ॥ ४१ ॥

चक्रुः किलिकिलामन्ये प्रतिगर्जंति चापरे ।
कोणी सिंहनाद करू लागले, कुणी अव्यक्त शब्द उच्चारू लागले, कुणी हर्षनाद करू लागले तर दुसरे महाबलाढ्‍य वानर गर्जना करू लागले. कित्येक किलकिला शब्द करू लागले तर दुसरे काही वानर एकाच्या गर्जनेस प्रत्त्युत्तर म्हणून स्वतः ही गर्जना करू लागले. ॥४१ १/२॥
केचिदुच्छ्रितलाङ्‍गूलाः प्रहृष्टाः कपिकुञ्जराः ॥ ४२ ॥

आयताञ्चितदीर्घाणि लांगूलानि प्रविव्यधुः ।
अनेक कपिकुंजर हर्षाने उत्साहित होऊन आपले पुच्छ वर करून नाचू लागले तर कित्येक आपली रोमांचयुक्त लांब आणि मोठी पुच्छे हलवू लागले अथवा गरगर फिरवू लागले. ॥४२ १/२॥
अपरे च हनूमंतं श्रीमंतं वानरोत्तमम् ॥ ४३ ॥

आप्लुत्य गिरिश्रृङ्‍गेषु संस्पृशंति स्म हर्षिताः ।
इतर काही वानर अत्यंत आनंदित होऊन पर्वतशिखरावर उड्डाण करून त्या उदार श्रीमान वानरश्रेष्ठ हनुमंताला स्पर्श करू लागले. ॥४३ १/२॥
उक्तवाक्यं हनूमंतं अंगदस्तु तदाब्रवीत् ॥ ४४ ॥

सर्वेषां हरिवीराणां मध्ये वचनमुत्तमाम् ।
हनुमंतांचे भाषण ऐकून अंगद त्यावेळी समस्त वानर वीरांच्यामध्ये अतिउत्तम असे याप्रमाणे वचन बोलला- ॥४४ १/२॥
सत्त्वे वीर्ये न ते कश्चित् समो वानर विद्यते ॥ ४५ ॥

यदवप्लुत्य विस्तीर्णं सागरं पुनरागतः ।
हे वानरश्रेष्ठा ! धैर्य आणि पराक्रम यामध्ये तुझी बरोबरी करणारा कोणीही नाही कारण एका उड्डाणात एवढा विस्तीर्ण सागर उल्लंघन करून तू पुन्हा परत आला आहेस. ॥४५ १/२॥
जीवितस्य प्रदाता नः त्वमेको वानरोत्तमम् ॥ ४६ ॥

त्वत्प्रसादात् समेष्यामः सिद्धार्था राघवेण ह ।
म्हणून हे वानरोत्तमा ! आम्हाला जीवनदान देणारा तूच एक आहेस. तुझ्या प्रासादाने आम्ही सर्व जण सफल मनोरथ होऊन रघुवंशज श्रीरामाला आता भेटू. ॥४६ १/२॥
अहो स्वामिनि ते भक्तिः अहो वीर्यमहो धृतिः ॥ ४७ ॥

दिष्ट्या दृष्टा त्वया देवी रामपत्‍नी यशस्विनी ।
दिष्ट्या त्यक्ष्यति काकुत्स्थः शोकं सीतावियोगजम् ॥ ४८ ॥
काय रे तुझी ही स्वामीभक्ती ! काय हे तेज ! आणि काय हे धैर्य ! श्रीरामपत्‍नी यशस्विनी सीतादेवीचे सुदैवाने तुला दर्शन झाले ही फार उत्तम गोष्ट झाली. आता काकुत्स्थ श्रीरामही सीतेच्या वियोगाने झालेल्या शोकाचा त्याग करतील, ही पण भाग्याची गोष्ट आहे. ॥४७-४८॥
ततोऽङ्‍गदं हनूमंतं जांबवंतं च वानराः ।
परिवार्य प्रमुदिता भेजिरे विपुलाः शिलाः ॥ ४९ ॥

उपविष्टा गिरेस्तस्य शिलासुः विपुलासु ते ।
श्रोतुकामाः समुद्रस्य लङ्‍घनं वानरोत्तमाः ॥ ५०॥

दर्शनं चापि लङ्‍कायाः सीताया रावणस्य च ।
तस्थुः प्राञ्जलयः सर्वे हनुमद् वदनोन्मुखाः ॥ ५१ ॥
त्यानंतर अंगद, हनुमंत, जाम्बवान व इतर वानर यांना गराडा देऊन वानरश्रेष्ठ हनुमंतांनी समुद्र उल्लंघन कसे केले वगैरे वृत्त ऐकण्याच्या इच्छेने तेथील मोठमोठ्‍या शिळांवर बसले आणि लंका, सीता आणि रावण, ही त्यांच्या कशी दृष्टीस पडली, यांचे दर्शन हनुमंतास कसे घडले, हे ऐकण्याकरिता हनुमंताच्या मुखाकडे पहात ते सर्व वानर हात जोडून बसले. ॥४९-५१॥
तस्थौ तत्राङ्‍गदः श्रीमान् वानरैर्बहुभिर्वृतः ।
उपास्यमानो विबुधैः दिवि देवपतिर्यथा ॥ ५२ ॥
ज्याप्रमाणे देवराज इंद्र स्वर्गात सर्व देवांच्याद्वारे सेवित होऊन बसतो त्याप्रमाणेच अनेक वानरांनी परिवेष्टित असलेले श्रीमान अंगद तेथे विराजमान झाले होते. ॥५२॥
हनूमता कीर्तिमता यशस्विना
तथाऽङ्‍गदेनाङ्‍गदबद्धबाहुना ।
मुदा तदाध्यासितमुन्नतं महन्
महीधराग्रं ज्वलितं श्रियाभवत् ॥ ५३ ॥
आणि याप्रमाणे किर्तीमान आणि यशस्वी हनुमान आणि बाहुवर बाजूबंद धारण केलेला अंगद, हे आनंदाने त्या पर्वताच्या शिखरावर बसले तेव्हा ते अत्युच्च पर्वतशिखर त्यांच्या दिव्यकांतीने प्रकाशित दिसू लागले. ॥५३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुंदरकाण्डे सप्तपञ्चाशः सर्गः ॥ ५७ ॥
॥याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील सुंदरकाण्डाचा सत्तावन्नावा सर्ग पूर्ण झाला. ॥५७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP