श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। चतुःपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
लक्ष्मणसीतासहितस्य श्रीरामस्य प्रयागे गङ्गायमुनासंगमसंनिधौ भरद्वाजाश्रमे गमनं मुनिना तस्यातिथ्यकरणं चित्रकूटेऽवस्थातुं तस्मै सम्मतिदानं चित्रकूटस्य महत्तायाः शोभायाश्च वर्णनम् -
लक्ष्मण आणि सीतेसहित श्रीरामांचे प्रयागात गंगा-यमुना संगमासमीप भरद्वाज आश्रमात जाणे, मुनिंच्या द्वारा त्यांचा अतिथिसत्कार, त्यांना चित्रकूट पर्वतावर रहाण्याचा आदेश तथा चित्रकूटाची महत्ता एवं शोभेचे वर्णन -
ते तु तस्मिन् महावृक्षे उषित्वा रजनीं शुभाम् ।
विमलेऽभ्युदिते सूर्ये तस्माद् देशात् प्रतस्थिरे ॥ १ ॥
त्या महान वृक्षाखाली ती सुंदर रात्र घालवून ते सर्व लोक (तिघे) निर्मल सूर्योदयकाळी त्या स्थांनातून पुढे जाण्यास प्रस्थित झाले. ॥१॥
यत्र भागीरथीं गङ्गां यमुनाभिप्रवर्तते ।
जग्मुस्तं देशमुद्दिश्य विगाह्य सुमहद् वनम् ॥ २ ॥
जेथे भागीरथी गंगा यमुनेला मिळते त्या स्थानी जाण्यासाठी ती (तिघे) महान वनांतून यात्रा करू लागली. ॥२॥
ते भूमिभागान् विविधान् देशांश्चापि मनोहरान् ।
अदृष्टपूर्वान् पश्यन्तस्तत्र तत्र यशस्विनः ॥ ३ ॥
ते तिन्ही यशस्वी यात्रेकरू मार्गात जेथे तेथे जे पूर्वी कधीही पहाण्यात आले नव्हते असे अनेक प्रकारचे भूभाग आणि मनोहर प्रदेश पहात पुढे पुढे जात होते. ॥३॥
यथाक्षेमेण सम्पश्यन् पुष्पितान् विविधान् द्रुमान् ।
निवृत्तमात्रे दिवसे रामः सौमित्रिमब्रवीत् ॥ ४ ॥
सुखपूर्वक आरामात उठत-बसत यात्रा करीत असता त्या तिघांनी फुलांनी सुशोभित विविध प्रकारच्या वृक्षांचे दर्शन केले. या प्रकारे ज्यावेळी दिवस प्रायः समाप्त व्हावयास आला तेव्हा राम सौमित्रास म्हणाले- ॥४॥
प्रयागमभितः पश्य सौमित्रे धूममुत्तमम् ।
अग्नेर्भगवतः केतुं मन्ये सन्निहितो मुनिः ॥ ५ ॥
’सौमित्रा ! तो पहा प्रयागाजवळ भगवान अग्निदेवाच्या ध्वजारूप उत्तम धूप (धूर) उठत आहे. यावरून कळून येत आहे की मुनिवर भरद्वाज येथेच आहेत. ॥५॥
नूनं प्राप्ताः स्म सम्भेदं गङ्गायमुनयोर्वयम् ।
तथा हि श्रूयते शब्दो वारिणोर्चारिघर्षजः ॥ ६ ॥
’आपण निश्चितच गंगा-यमुनेच्या संगमाजवळ येऊन पोहोंचलो आहोत, कारण दोन नद्यांच्या जलांच्या परस्पर होण्यार्‍या टक्करीमुळे जो आवाज प्रकट होतो तो ऐकू येत आहे. ॥६॥
दारूणि परिभिन्नानि वनजैरुपजीविभिः ।
छिन्नाश्चाप्याश्रमे चैते दृश्यन्ते विविधा द्रुमाः ॥ ७ ॥
’वनात उत्पन्न होणार्‍या फल-मूल आणि काष्ठ आदिनी जीविका चालविणार्‍या लोकांनी जी लाकडे तोडली आहेत ते नाना प्रकारचे वृक्ष ही आश्रमासमीप दृष्टीगोचर होत आहेत.’ ॥७॥
धन्विनौ तौ सुखं गत्वा लम्बमाने दिवाकरे ।
गङ्गायमुनयोः संधौ प्रापतुर्निलयं मुनेः ॥ ८ ॥
या प्रकारे गप्पागोष्टी करत ते दोघे धनुर्धर वीर श्रीराम आणि लक्ष्मण सूर्यास्त होता होता गंगा-यमुनेच्या संगमाजवळील मुनिवर भरद्वाजांच्या आश्रमात जाऊन पोहोंचले. ॥८॥
रामस्त्वाश्रममासाद्य त्रासयन् मृगपक्षिणः ।
गत्वा मुहूर्तमध्वानं भरद्वाजमुपागमत् ॥ ९ ॥
श्रीराम आश्रमाच्या सीमेत पोहोंचून आपल्या धनुर्धर वेषाच्या द्वारा तेथील पशु-पक्ष्यांना भयभीत करीत एका मुहूर्तामध्ये चालत जाण्यायोग्य मार्गाने जाऊन भरद्वाज मुनींच्या समीप जाऊन पोहोंचले. ॥९॥
ततस्त्वाश्रममासाद्य मुनेर्दर्शनकाङ्‌क्षिणौ ।
सीतयानुगतौ वीरौ दूरादेवावतस्थतुः ॥ १० ॥
आश्रमात पोहोचून महर्षिंच्या दर्शनाची इच्छा करणारे हे दोन्ही वीर सीतेसहित थोड्या अंतरावर जाऊन उभे राहिले. ॥१०॥
स प्रविश्य महात्मानमृषिं शिष्यगणैर्वृतम् ।
संशितव्रतमेकाग्रं तपसा लब्धचक्षुषम् ॥ ११ ॥

हुताग्निहोत्रं दृष्ट्वैव महाभागं कृताञ्जलिः ।
रामः सौमित्रिणा सार्धं सीतया चाभ्यवादयत् ॥ १२ ॥
(दूर उभे राहूनच महर्षिंच्या शिष्यांकडून आपल्या आगमनाची सूचना देववून आत जाण्याची अनुमति प्राप्त केल्यानंतर) पर्णशाळेत प्रवेश करून त्यांनी तपस्येच्या प्रभावाने तिन्ही काळातील सर्व गोष्टी पहाण्याची दिव्यदृष्टी प्राप्त करण्यार्‍या एकाग्रचित्त तथा तीक्ष्ण व्रतधारी महात्मा भरद्वाज ऋषिंचे दर्शन केले, जे अग्निहोत्र करून शिष्यांनी घेरलेले असे आसनावर विराजमान होते. महर्षिंना पहाताच लक्ष्मण आणि सीतेसहित महाभाग्यवान श्रीरामांनी हात जोडून त्यांच्या चरणी प्रणाम केला. ॥११-१२॥
न्यवेदयत चात्मानं तस्मै लक्ष्मणपूर्वजः ।
पुत्रौ दशरथस्यावां भगवन् रामलक्ष्मणौ ॥ १३ ॥

भार्या ममेयं कल्याणी वैदेही जनकात्मजा ।
मां चानुयाता विजनं तपोवनमनिन्दिता ॥ १४ ॥
तत्पश्चात लक्ष्मणाचे मोठे भाऊ श्रीरघुनाथ यांनी त्यांना या प्रकारे आपला परिचय करून दिला - ’भगवन ! आम्ही दोघे राजा दशरथांचे पुत्र आहोत. माझे नाव राम आणि याचे लक्ष्मण आहे. तसेच ही विदेहराज जनकांची कन्या आणि माझी कल्याणमयी पत्‍नी सती साध्वी सीता आहे, जी निर्जन तपोवनातही मला साथ देण्यासाठी आलेली आहे. ॥१३-१४॥
पित्रा प्रव्राज्यमानं मां सौमित्रिरनुजः प्रियः ।
अयमन्वगमद् भ्राता वनमेव धृतव्रतः ॥ १५ ॥
’पित्याच्या आज्ञेने मला वनाकडे येताना पाहून हा माझा प्रिय अनुज सौमित्र लक्ष्मणही वनातच रहाण्याचे व्रत घेऊन माझ्या पाठोपाठ निघून आला आहे. ॥१५॥
पित्रा नियुक्ता भगवन् प्रवेक्ष्यामस्तपोवनम् ।
धर्ममेवाचरिष्यामस्तत्र मूलफलाशनाः ॥ १६ ॥
’भगवन ! या प्रकारे पित्याच्या आज्ञेने आम्ही तिघे तपोवनात जाऊ आणि तेथे फल-मूलांचा आहार करीत धर्माचे आचरण करूं.’ ॥१६॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा राजपुत्रस्य धीमतः ।
उपानयत धर्मात्मा गामर्घ्यमुदकं ततः ॥ १७ ॥
परम बुद्धिमान राजकुमार श्रीरामांचे वचन ऐकून धर्मात्मा भरद्वाज मुनिंनी त्यांच्यासाठी अतिथी सत्काराच्या रूपात एक गाय तथा अर्घ्यजल समर्पित केले. ॥१७॥
नानाविधानन्नरसान् वन्यमूलफलाश्रयान् ।
तेभ्यो ददौ तप्ततपा वासं चैवाभ्यकल्पयत् ॥ १८ ॥
त्या तपस्वी महात्मांनी त्या सर्वांना नाना प्रकारचे अन्न, रस आणि जंगली फल-मूल प्रदान केले. त्याच बरोबर त्यांच्या रहाण्याच्या स्थानाची व्यवस्था केली. ॥१८॥
मृगपक्षिभिरासीनो मुनिभिश्च समन्ततः ।
राममागतमभ्यर्च्य स्वागतेनागतं मुनिः ॥ १९ ॥

प्रतिगृह्य च तामर्चामुपविष्टं स राघवम् ।
भरद्वाजोऽब्रवीद् वाक्यं धर्मयुक्तमिदं तदा ॥ २० ॥
महर्षिंच्या चारी बाजूस मृग, पक्षी आणि ऋषि-मुनि बसलेले होते आणि मध्यभागी ते विराजमान होते. त्यांनी आपल्या आश्रमावर अतिथी रूपात आलेल्या श्रीरामांचा स्वागतपूर्वक सत्कार केला. त्यांचा सत्कार ग्रहण करून राघव जेव्हा आसनावर विराजमान झाले तेव्हा भरद्वाजांनी त्यांना उद्देशून हे धर्मयुक्त वचन उच्चारले- ॥१९-२०॥
चिरस्य खलु काकुत्स्थ पश्याम्यहमुपागतम् ।
श्रुतं तव मया चैव विवासनमकारणम् ॥ २१ ॥
’काकुत्स्थकुलभूषण श्रीरामा ! मी या आश्रमात दीर्घकाळपासून तुमच्या शुभागमनाची प्रतिक्षा करीत आहे. (आज माझा मनोरथ सफल झाला आहे.) मी असे ही ऐकले आहे की तुम्हांला अकारणच वनवास दिला गेला आहे. ॥२१॥
अवकाशो विविक्तोऽयं महानद्योः समागमे ।
पुण्यश्च रमणीयश्च वसत्विह भवान् सुखम् ॥ २२ ॥
’गंगा आणि यमुना - या दोन महानद्यांच्या संगमाजवळील हे स्थान फारच पवित्र आणि एकांत आहे. येथील प्राकृतिक छटाही मनोरम आहे म्हणून तुम्ही येथेच सुखपूर्वक निवास करा.’ ॥२२॥
एवमुक्तस्तु वचनं भरद्वाजेन राघवः ।
प्रत्युवाच शुभं वाक्यं रामः सर्वहिते रतः ॥ २३ ॥
भरदाज मुनिंनी असे म्हटल्यावर समस्त प्राण्यांच्या हितात तत्पर राहाणारे राघवाने या शुभ वचनांच्या द्वारा त्यांना उत्तर दिले- ॥२३॥
भगवन्नित आसन्नः पौरजानपदो जनः ।
सुदर्शमिह मां प्रेक्ष्य मन्येऽहमिममाश्रमम् ॥ २४ ॥

आगमिष्यति वैदेहीं मां चापि प्रेक्षको जनः ।
अनेन कारणेनाहमिह वासं न रोचये ॥ २५ ॥
’भगवन ! माझ्या नगरातील आणि जनपदांतील लोक समीपच आहेत, म्हणून मी समजतो की येथे मला भेटणे सुगम समजून लोक या आश्रमावर मला आणि सीतेला पहाण्यासाठी प्रायः येत जात राहातील. या कारणामुळे येथे निवास करणे मला ठीक वाटत नाही. ॥२४-२५॥
एकांते पश्य भगवन्नाश्रमस्थानमुत्तमम् ।
रमेत यत्र वैदेही सुखार्हा जनकात्मजा ॥ २६ ॥
’भगवन ! एखाद्या एकान्त प्रदेशात आश्रमास योग्य उत्तम स्थान आपण पहावे. (विचार करून सांगावे) जेथे सुख भोगण्यास योग्य जनकात्मजा वैदेही प्रसन्नतापूर्वक राहू शकेल.’ ॥२६॥
एतच्छ्रुत्वा शुभं वाक्यं भरद्वाजो महामुनिः ।
राघवस्य तु तद् वाक्यमर्थग्राहकमब्रवीत् ॥ २७ ॥
राघवाचे हे शुभ वचन ऐकून महामुनि भरद्वाजांनी त्यांनी सांगितलेल्या उद्देश्याच्या सिद्धिचा बोध करविणारी गोष्ट सांगितली- ॥२७॥
दशक्रोश इतस्तात गिरिर्यस्मिन् निवत्स्यसि ।
महर्षिसेवितः पुण्यः पर्वतः शुभदर्शनः ॥ २८ ॥
’तात ! येथून दहा कोसा (अन्य व्याख्यांच्या अनुसार ३० कोसा) (**) च्या अंतरावर एक सुंदर आणि महर्षींच्या द्वारा सेवित परम पवित्र पर्वत आहे, ज्यावर आपण निवास करू शकाल. ॥२८॥
[** रामायणशिरोमणीकार दहा कोसाचा अर्थ तीस कोस करतात. आणि ’दशच दशच दशच’ अशी व्युत्पत्ति करून एक शेषच्या नियमानुसार एकाच दश चा प्रयोग होऊन ही त्यास ३० संख्येचा बोधक मानतात. प्रयागापासून चित्रकूट चे अंतर जवळ जवळ २८ कोस मानले जाते, जे उपर्युक्त संख्येशी मिळते जुळते आहे. आधुनिक मापाप्रमाणे प्रयागापासून चित्रकूट ८० मैल आहे. या हिशोबाने चाळीस कोसांचे अंतर झाले. परंतु पूर्वीचे क्रोशमान आधुनिक मानाहून थोडे मोठे असले पाहिजे म्हणून हे अंतर आहे.]
गोलाङ्गूलानुचरितो वानरर्क्षनिषेवितः ।
चित्रकूट इति ख्यातो गन्धमादनसन्निभः ॥ २९ ॥
’त्याच्यावर बरेचसे लंगूर विचरत राहातात. तेथे वानर आणि अस्वले ही निवास करतात. तो पर्वत चित्रकूट नामाने विख्यात आहे आणि गंधमादनाप्रमाणे मनोहर आहे. ॥२९॥
यावता चित्रकूटस्य नरः श्रृङ्गाण्यवेक्षते ।
कल्याणानि समाधत्ते न पापे कुरुते मनः ॥ ३० ॥
’ज्यावेळी मनुष्य चित्रकूटाच्या शिखरांचे दर्शन करतो तेव्हा कल्याणकारी पुण्य कर्मांचे फळ प्राप्त करतो आणि कधी पापात मन लावत नाही. ॥३०॥
ऋषयस्तत्र बहवो विहृत्य शरदां शतम् ।
तपसा दिवमारूढाः कपालशिरसा सह ॥ ३१ ॥
’तेथे बरेचसे ऋषि, ज्यांच्या मस्तकावरील केस वृद्धावस्थेमुळे कवटी प्रमाणे सफेद (पांढरे) होऊन गेले होते, तपस्येच्या द्वारा शेकडो वर्षापर्यंत क्रीडा करून स्वर्गलोकास निघून गेले आहेत. ॥३१॥
प्रविविक्तमहं मन्ये तं वासं भवतः सुखम् ।
इह वा वनवासाय वस राम मया सह ॥ ३२ ॥
’तोच पर्वत मी तुमच्यासाठी एकांतवासयोग्य आणि सुखद मानतो, अथवा श्रीरामा ! तुम्ही वनवासाच्या हेतूने माझ्या बरोबर या आश्रमातच रहा. ॥३२॥
स रामं सर्वकामैस्तं भरद्वाजः प्रियातिथिम् ।
सभार्यं सह च भ्रात्रा प्रतिजग्राह हर्षयन् ॥ ३३ ॥
असे म्हणून भरद्वाजांनी पत्‍नी आणि भ्रात्यासह प्रिय अतिथि रामांचा हर्ष वाढवित सर्व प्रकारच्या मनोवाञ्छित वस्तुंच्या द्वारा त्या सर्वांचा अतिथि सत्कार केला. ॥३३॥
तस्य प्रयागे रामस्य तं महर्षिमुपेयुषः ।
प्रपन्ना रजनी पुण्या चित्राः कथयतः कथाः ॥ ३४ ॥
प्रयागात श्रीराम महर्षिंच्या जवळ बसून विचित्र गोष्टी करीत राहिले, इतक्यांतच पुण्यमय रात्रिचे आगमन झाले. ॥३४॥
सीतातृतीयः काकुत्स्थः परिश्रान्तः सुखोचितः ।
भरद्वाजाश्रमे रम्ये तां रात्रिमवसत् सुखम् ॥ ३५ ॥
ती (तिघेही) सुख भोगण्यास योग्य असूनही परिश्रमांनी फार थकलेली होती म्हणून भरद्वाज मुनिंच्या मनोहर आश्रमात श्रीरामांनी लक्ष्मण आणि सीतेसह ती रात्र सुखपूर्वक व्यतीत केली. ॥३५॥
प्रभातायां तु शर्वर्यां भरद्वाजमुपागमत् ।
उवाच नरशार्दूलो मुनिं ज्वलिततेजसम् ॥ ३६ ॥
त्यानंतर जेव्हा रात्र सरली आणि प्रातःकाळ झाला तेव्हा पुरुषसिंह राम प्रज्वलित तेज असणार्‍या भरद्वाज मुनींच्या जवळ गेले आणि म्हणाले - ॥३६॥
शर्वरीं भगवन्नद्य सत्यशील तवाश्रमे ।
उषिताः स्मोऽह वसतिमनुजानातु नो भवान् ॥ ३७ ॥
’भगवन् ! आपण स्वभावतःच सत्य बोलणारे आहात. आज आम्ही आपल्या आश्रमात अत्यंत आरामात रात्र घालविली आहे, आता आपण आम्हांला पुढील गंतव्य स्थानी जाण्यासाठी आज्ञा प्रदान करावी.’ ॥३७॥
रात्र्यां तु तस्यां व्युष्टायां भरद्वाजोऽब्रवीदिदम् ।
मधुमूलफलोपेतं चित्रकूटं व्रजेति ह ॥ ३८ ॥

वासमौपयिकं मन्ये तव राम महाबल ।
रात्र जाऊन सकाळ झाल्यावर श्रीरामांनी या प्रकारे विचारल्यावर भरद्वाजांनी म्हटले- ’महाबली श्रीरामा ! तुम्ही मधुर फल-मूलांनी संपन्न चित्रकूट पर्वतावर जा. आम्ही तेच तुमच्यासाठी उपयुक्त निवासस्थान मानतो. ॥३८ १/२॥
नानानगगणोपेतः किन्नरोरगसेवितः ॥ ३९ ॥

मयूरनादाभिरतो गजराजनिषेवितः ।
गम्यतां भवता शैलश्चित्रकूटः स विश्रुतः ॥ ४० ॥
’तो सुविख्यात चित्रकूट पर्वत नाना प्रकारच्या वृक्षांनी हिरवागार आहे. तेथे बरेचसे किन्नर आणि सर्प निवास करतात. मोरांच्या कलरवाने तो अधिकच रमणीय प्रतीत होत असतो. बरेचसे गजराज त्या पर्वताचे सेवन करतात. तुम्ही तेथेच निघून जा. ॥३९-४०॥
पुण्यश्च रमणीयश्च बहुमूलफलायुतः ।
तत्र कुञ्जरयूथानि मृगयूथानि चैव हि ॥ ४१ ॥

विचरन्ति वनान्तेषु तानि द्रक्ष्यसि राघव ।
सरित्प्रस्रवणप्रस्थान् दरीकन्दरनिर्झरान् ।
चरतः सीतया सार्धं नन्दिष्यति मनस्तव ॥ ४२ ॥
’तो पर्वत परम पवित्र, रमणीय तथा बहुसंख्यांक फलमूलांनी संपन्न आहे. तेथे हत्ती आणि हरणांच्या झुंडीच्या झुंडी वनात विचरत असतात. राघवा ! तुम्ही त्या सर्वांना प्रत्यक्ष पहाल. मंदाकिनी नदी, अनेकानेक जलस्त्रोत, पर्वत शिखरे, गुफा, दर्‍या आणि निर्झर ही तुमच्या पहाण्यात येतील. तो पर्वत सीतेसह विचरत असणार्‍या तुमच्या मनाला आनंद प्रदान करील. ॥४१-४२॥
प्रहृष्टकोयष्टिभकोकिलस्वनै-
     र्विनोदयन्तं च सुखं परं शिवम् ।
मृगैश्च मत्तैर्बहुभिश्च कुञ्जरैः
     सुरम्यमासाद्य समावसाश्रमम् ॥ ४३ ॥
’हर्षाने भरलेल्या टिट्टिभ आणि कोकिळांच्या कलरवांच्या द्वारे तो पर्वत यात्रेकरूंचे मनोरञ्जनच जणु करत असतो. तो परम सुखद आणि कल्याणकारी आहे. मदमत्त मृग आणि विपुल संख्येत असणारे मत्त हत्ती यांनी त्याची रमणीयता आणखीन वाढवली आहे. तुम्ही त्याच पर्वतावर जाऊन (तंबू) मुक्काम ठोका आणि त्यातच निवास करा.’ ॥४३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे चतुःपञ्चाशस्सर्गः ॥ ५४ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्ष रामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा चौपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP