[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। पञ्चमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राज्ञोऽनुरोधेन सीतासहिताय श्रीरामाय वसिष्ठकर्तृकमुपवासव्रतदीक्षादानं वसिष्ठेन राजानं प्रति वृत्तस्यास्य निवेदनं राज्ञः स्वान्तःपुरे प्रवेशः - राजा दशरथांच्या अनुरोधाने वसिष्ठांनी सीतेसहित श्रीरामास उपवास व्रताची दीक्षा देऊन येणे आणि राजाला हा समाचार अवगत करणे, राजाचा अंतःपुरात प्रवेश -
संदिश्य रामं नृपतिः श्वोभाविन्यभिषेचने ।
पुरोहितं समाहूय वसिष्ठमिदमब्रवीत् ॥ १ ॥
इकडे महाराज दशरथ जेव्हा रामांना दुसर्‍या दिवशी होणार्‍या अभिषेकाविषयी आवश्यक संदेश देऊन आपले पुरोहित वसिष्ठ यांना बोलावून म्हणाले- ॥१॥
गच्छोपवासं काकुत्स्थं कारयाद्य तपोधन ।
श्रेयसे राज्यलाभाय वध्वा सह यतव्रत ॥ २ ॥
'नियमपूर्वक व्रतांचे पालन करण्यार्‍या तपोधना ! आपण जावे आणि विघ्न निवारणरूप कल्याणाच्या सिद्धिकरिता आणि राज्याच्या प्राप्तिसाठी वधूसहित काकुस्थाकडून उपवास व्रताचे पालन करवावे. ॥२॥
तथेति च स राजानमुक्त्वा वेदविदां वरः ।
स्वयं वसिष्ठो भगवान् ययौ रामनिवेशनम् ॥ ३ ॥

उपवासयितुं वीरं मन्त्रविन्मन्त्रकोविदम् ।
ब्राह्मं रथवरं युक्तमास्थाय सुधृतव्रतः ॥ ४ ॥
तेव्हा राजाला 'तथास्तु' म्हणून वेदवेत्त्या विद्वानांमध्ये श्रेष्ठ तथा उत्तम व्रतधारी स्वयं भगवान वसिष्ठ मंत्रवेत्ता वीर श्रीरामास उपवास-व्रताची दीक्षा देण्यासाठी ब्राह्मणांना चढण्यास योग्य अशा प्रकारे जोडलेल्या श्रेष्ठ रथावर आरुढ होऊन रामाच्या महालाकडे निघाले. ॥३-४॥
स रामभवनं प्राप्य पाण्डुराभ्रघनप्रभम् ।
तिस्रः कक्ष्या रथेनैव विवेश मुनिसत्तमः ॥ ५ ॥
रामभवन श्वेत मेघांप्रमाणे उज्ज्वल होते. त्याच्या जवळ पोहोचल्यावर मुनिवर वसिष्ठांनी त्याच्या तीन देवड्यांमध्ये रथाच्याद्वारे प्रवेश केला. ॥५॥
तमागतमृषिं रामस्त्वरन्निव ससम्भ्रमम् ।
मानयिष्यन् स मानार्हं निश्चक्राम निवेशनात् ॥ ६ ॥
तेथे आलेल्या त्या सम्माननीय महर्षिंचा सन्मान करण्यासाठी राम मोठ्या घाईगर्दीने वेगपूर्वक घरातून बाहेर आले. ॥६॥
अभ्येत्य त्वरमाणोऽथ रथाभ्याशं मनीषिणः ।
ततोऽवतारयामास परिगृह्य रथात् स्वयम् ॥ ७ ॥
त्या मनीषी महर्षिच्या रथासमीप शीघ्रतापूर्वक जाऊन श्रीरामांनी स्वयं त्यांचा हात पकडून त्यांना रथांतून खाली उतरविले. ॥७॥
स चैनं प्रश्रितं दृष्ट्‍वा सम्भाष्याभिप्रसाद्य च ।
प्रियार्हं हर्षयन् राममित्युवाच पुरोहितः ॥ ८ ॥
श्रीराम प्रिय वचन ऐकण्यास योग्य होते. त्यांना इतके विनीत पाहून पुरोहितांनी 'वत्स !' असे संबोधून त्यांना हाक मारली आणि त्यांना प्रसन्न करून त्यांचा आनंद वाढवीत याप्रकारे म्हणाले - ॥८॥
प्रसन्नस्ते पिता राम यत्त्वं राज्यमवाप्स्यसि ।
उपवासं भवानद्य करोतु सह सीतया ॥ ९ ॥
"रामा ! तुझे पिता तुझ्यावर फार प्रसन्न आहेत कारण तुला त्यांच्या पासून राज्य प्राप्त होईल, म्हणून आजच्या रात्री तू वधू सीतेसह उपवास कर. ॥९॥
प्रातस्त्वामभिषेक्ता हि यौवराज्ये नराधिपः ।
पिता दशरथः प्रीत्या ययातिं नहुषो यथा ॥ १० ॥
'रघुनंदना ! जसे नहुषाने ययातिला अभिषेक केला होता, त्याच प्रकारे तुझा पिता महाराज दशरथ उद्या प्रातःकाळी मोठ्या प्रेमाने तुझा युवराज- पदावर अभिषेक करतील." ॥१०॥
इत्युक्त्वा स तदा राममुपवासं यतव्रतः ।
मंत्रवत् कारयामास वैदेह्या सहितं शुचिः ॥ ११ ॥
असे म्हणून त्या व्रतधारी आणि पवित्र महर्षिनी मंत्रोच्चारणपूर्वक सीतेसहित रामाला त्या समयी उपवास-व्रताची दीक्षा दिली. ॥११॥
ततो यथावद् रामेण स राज्ञो गुरुरर्चितः ।
अभ्यनुज्ञाप्य काकुत्स्थं ययौ रामनिवेशनात् ॥ १२ ॥
तदनंतर रामांनी महाराजांचे गुरु असलेल्या वसिष्ठांचे यथावत पूजन केले, आणि नंतर ते मुनि रामांची अनुमति घेऊन त्यांच्या महालांतून बाहेर पडले. ॥१२॥
सुहृद्‌भिस्तत्र रामोऽपि सहासीनः प्रियंवदैः ।
सभाजितो विवेशाथ ताननुज्ञाप्य सर्वशः ॥ १३ ॥
रामही तेथे प्रियवचन बोलण्यार्‍या सुहृदांबरोबर थोडा वेळ बसून राहिले, नंतर त्यांच्याकडून सन्मानित होऊन त्या सर्वांची अनुमति घेऊन पुन्हा आपल्या महालात निघून गेले. ॥१३॥
हृष्टनारीनरयुतं रामवेश्म तदा बभौ ।
यथा मत्तद्विजगणं प्रफुल्लनलिनं सरः ॥ १४ ॥
त्यावेळी रामांचे भवन हर्षोत्फुल्ल नरनारींनी भरून गेले होते आणि मत्त पक्ष्यांच्या कलरवांनी युक्त विकसित कमलांनी युक्त तलावांप्रमाणे शोभत होते. ॥१४॥
स राजभवनप्रख्यात् तस्माद् रामनिवेशनात् ।
निर्गत्य ददृशे मार्गं वसिष्ठो जनसंवृतम् ॥ १५ ॥
राजभवनांत श्रेष्ठ रामाच्या महालातून बाहेर येऊन वसिष्ठांनी सारे मार्ग मनुष्यांच्या गर्दीने भरलेले पाहिले. ॥१५॥
वृन्दवृन्दैरयोध्यायां राजमार्गाः समन्ततः ।
बभूवुरभिसम्बाधाः कुतूहलजनैर्वृताः ॥ १६ ॥
अयोध्येचा राजमार्गावर सर्वत्र लोकांच्या झुंडीच्या झुंडी दिसत होत्या ते सर्व रामांचा राज्याभिषेक पहाण्यासाठी उत्सुक झाले होते. सारे राजमार्ग अशा लोकांनी खचाखच भरलेले होते, घेरलेले होते. ॥१६॥
जनवृंदोर्मिसङ्‌‍घर्षहर्षस्वनवृतस्तदा ।
बभूव राजमार्गस्य सागरस्येव निस्वनः ॥ १७ ॥
जनसमुदायरूपी लाटा परस्परात टक्कर घेत असल्याने त्यासमयी जो हर्षध्वनि प्रकट होत होता, त्याने व्याप्त झालेला राजमार्गावरील कोलाहल समुद्राच्या गर्जनेप्रमाणे ऐकू येत होता. ॥१७॥
सिक्तसम्मृष्टरथ्या हि तथा च वनमालिनी ।
आसीदयोध्या तदहः समुच्छ्रितगृहध्वजा ॥ १८ ॥
त्या दिवशी वन आणि उपवनांच्या पंक्तिंनी सुशोभित झालेल्या अयोध्यापुरीच्या घरा घरांतून उंच उंच ध्वज उभारले गेले होते आणि तेथील सर्व गल्ल्या आणि रस्ते झाडून त्यांच्यावर सडे शिंपण्यात आले होते. ॥१८॥
तदा ह्ययोध्यानिलयः सस्त्रीबालाकुलो जनः ।
रामाभिषेकमाकाङ्‌‍क्षन्नाकाङ्‌‍क्षन्नुदयं रवेः ॥ १९ ॥
स्त्रिया आणि बालकांसहित अयोध्यावासी जनसमुदाय श्रीरामाचा राज्याभिषेक पहाण्याच्या इच्छेने त्यासमयी शीघ्र सूर्योदय होण्याची कामना करीत होता. ॥१९॥
प्रजालङ्‌‍कारभूतं च जनस्यानन्दवर्धनम् ।
उत्सुकोऽभूज्जनो द्रष्टुं तमयोध्यामहोत्सवम् ॥ २० ॥
अयोध्येतील तो महान उत्सव प्रजांसाठी अलंकाररूप आणि सर्व लोकांचा आनंद वाढविणारा होता, तेथील सर्व लोक तो पहाण्यासाठी उत्कंठित होत होते. ॥२०॥
एवं तज्जनसम्बाधं राजमार्गं पुरोहितः ।
व्यूहन्निव जनौघं तं शनै राजकुलं ययौ ॥ २१ ॥
या प्रकारे मनुष्यांच्या गर्दीनी भरलेल्या राजमार्गावर पोहोचल्यावर त्या जनसमूहाला एक बाजूस सारीत पुरोहित (वसिष्ठ) हळू हळू राजमहालाकडे गेले. ॥२१॥
सिताभ्रशिखरप्रख्यं प्रासादमधिरुह्य चः ।
समीयाय नरेन्द्रेण शक्रेणेव बृहस्पतिः ॥ २२ ॥
श्वेत मेघाच्या तुकड्या प्रमाणे सुशोभित होणार्‍या महालावर चढून, बृहस्पति देवराज इंद्रास जसे भेटतात, त्याप्रमाणे वसिष्ठ राजा दशरथांना भेटले. ॥२२॥
तमागतमभिप्रेक्ष्य हित्वा राजासनं नृपः ।
पप्रच्छ स्वमतं तस्मै कृतमित्यभ्यवेदयत् ॥ २३ ॥
त्यांना येतांना पाहून राजे सिंहासन सोडून उभे राहिले आणि विचारू लागले - 'मुने ! काय आपण माझा अभिप्राय सिद्ध केलात ?' वसिष्ठांनी उत्तर दिले - 'हां, केला'. ॥२३॥
तेन चैव तदा तुल्यं सहासीनाः सभासदः ।
आसनेभ्यः समुत्तस्थुः पूजयन्तः पुरोहितम् ॥ २४ ॥
त्यांच्या बरोबरच तेथे बसलेले अन्य सभासदही पुरोहितांचा समादर करीत आपापल्या आसनांवरून उठून उभे राहिले .॥२४॥
गुरुणा त्वभ्यनुज्ञातो मनुजौघं विसृज्य तम् ।
विवेशान्तःपुरं राजा सिंहो गिरिगुहामिव ॥ २५ ॥
त्यानंतर गुरुंची आज्ञा घेऊन राजा दशरथांनी त्या जनसमुदायास निरोप देऊन पर्वताच्या कंदरात घुसणार्‍या सिंहासमान आपल्या अंतःपुरात प्रवेश केला. ॥२५॥
तदग्र्यवेषप्रमदाजनाकुलं
     महेन्द्रवेश्मप्रतिमं निवेशनम् ।
व्यदीपयंश्चारु विवेश पार्थिवः
     शशीव तारागणसङ्‌‍कुलं नभः ॥ २६ ॥
सुंदर वेशभूषा धारण करणार्‍या सुंदरींनी भरलेल्या इंद्रसदना समान त्या मनोहर राजभवनास आपल्या शोभेने प्रकाशित करीत राजा दशरथांनी चंद्रमा ज्याप्रमाणे तारकांनी भरलेल्या आकाशात पदार्पण करतो त्याप्रमाणे त्या राजभवनांत प्रवेश केला. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा पाचवा सर्ग पूरा झाला. ॥५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP