श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ सप्तविंशत्यधिक शततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अयोध्यायां श्रीरामस्य सत्कारार्थं आयोजनम्, श्रीरामं प्रत्युद्गान्तुमनसां सर्वेषां जनानां भरतेन सह नन्दिग्रामे गमनम्, श्रीरामस्यागमनं भरतादिभिः सह तस्य समागमः, पुष्पकविमानस्य तेन कुबेरपार्श्वे प्रेषणं च -
अयोध्येमध्ये श्रीरामांच्या स्वागताची तयारी, भरतासह सर्वांचे श्रीरामांना सामोरे जाण्यासाठी नंदिग्रामात पोहोचणे, श्रीरामांचे आगमन, भरत आदिशी त्यांची भेट तसेच पुष्पकविमानास कुबेराजवळ धाडणे -
श्रुत्वा तु परमानन्दं भरतः सत्यविक्रमः ।
हृष्टमाज्ञापयामास शत्रुघ्नं परवीरहा ॥ १॥
तो परमानंदमय समाचार ऐकून शत्रूवीरांचा संहार करणार्‍या सत्यपराक्रमी भरतांनी शत्रुघ्नाला हर्षपूर्वक आज्ञा दिली - ॥१॥
दैवतानि च सर्वाणि चैत्यानि नगरस्य च ।
सुगन्ध माल्यैर्वादित्रैः अर्चन्तु शुचयो नराः ॥ २॥
शुद्धाचारी पुरुषांनी कुलदेवतांचे आणि नगरांतील सर्व देवस्थानांचे वाजत गाजत सुगंधित पुष्पांच्या द्वारे पूजन करावे. ॥२॥
सूताः स्तुतिपुराणज्ञाः सर्वे वैतालिकस्तथा ।
सर्वे वा दित्रकुशला गणिकाश्चैव सर्वशः ॥ ३ ॥

राजदारा स्तथामात्याः सैन्याः सेनागणाङ्‌गनाः ।
ब्राह्मणाश्च सराज न्याः श्रेणीमुख्यास्तथा गणाः ॥ ४ ॥

अभि निर्यान्तु रामस्य द्रष्टुं शशिनिभं मुखम् ।
स्तुति आणि पुराणांचे जाणकार सूत, समस्त वैतालिक (भाट), वाद्ये वाजविण्यात कुशल सर्व लोक, सर्व गणिका, राजराण्या, मंत्रीगण, सेना, सैनिकांच्या स्त्रिया, ब्राह्मण, क्षत्रिय तसेच व्यवसायी - संघाचे पुढारी लोक, सर्वांनी श्रीरामचंद्रांच्या मुखचंद्राचे दर्शन करण्यासाठी नगरातून बाहेर पडावे. ॥३-४ १/२॥
भरतस्य वचः श्रुत्वा शत्रुघ्नः परवीरहा ॥ ५॥

विष्टीरनेकसाहस्रीः चोदयामास भागशः ।
समीकुरुत निम्नानि विषमाणि समानि च ॥ ६ ॥
भरतांचे हे वचन ऐकून शत्रुवीरांचा संहार करणार्‍या शत्रुध्नांनी कित्येक हजार सेवकांच्या वेगवेगळ्या टोळ्या बनवून (गट बनवून) त्यांना आज्ञा दिली - तुम्ही लोक उंच सखल भूमींना समतल बनवून टाका. ॥५-६॥
स्थानानि च निरस्यन्तां नन्दिग्रामादितः परम् ।
सिञ्चन्तु पृथिवीं कृत्स्नां हिमशीतेन वारिणा ॥ ७ ॥
अयोध्येपासून नंदिग्रामापर्यंतचा मार्ग स्वच्छ करा. आसपासची सर्व जमीन बर्फासारख्या थंड जलाने शिंपडून ठेवा. ॥७॥
ततोऽभ्यवकिरंस्त्वन्ये लाजैः पुष्पैश्च सर्वतः ।
समुच्छ्रितपताकास्तु रथ्याः पुरवरोत्तमे ॥ ८ ॥
त्यानंतर काही लोकांनी रस्त्यात सर्वत्र लाह्या आणि फुले पसरावी. या श्रेष्ठ नगरांच्या रस्त्यांच्या आजुबाजूला उंच पताका फडकत ठेवाव्या. ॥८॥
शोभयन्तु च वेश्मानि सूर्यस्योदयनं प्रति ।
स्रग्दाममुक्तपुष्पैश्च सुगन्धैः पञ्चवर्णकैः ॥ ९ ॥
उद्या सूर्योदयापर्यंत लोकांनी नगरांतील सर्व घरांना सोनेरी पुष्पमाला, दाट फुलांचे मोठे गजरे, सूताच्या बंधनाविरहित कमळ आदि पुष्पे तसेच पंचरंगी अलंकारांनी सजवावे. ॥९॥
राजमार्गमसम्बाधं किरन्तु शतशो नराः ।
ततस्त्च्छासनं श्रुत्वा शत्रुघनस्य मुदान्विताः ॥ १० ॥
राजमार्गावर अधिक गर्दी होऊ नये याची व्यवस्था करण्यासाठी शेकडो माणसे सर्वत्र नेमावी. शत्रुघ्नांचा तो आदेश ऐकून सर्व लोक अत्यंत प्रसन्नतेने तो पालन करण्यास तत्पर झाले. ॥१०॥
धृष्टिर्जयन्तो विजयः सिद्धार्थश्चार्थसाधकः ।
अशोको मंत्रपालश्च सुमंत्रश्चापि निर्ययुः ॥ ११ ॥

मत्तैर्नागसहस्रैश्च सध्वजैः सुविभूषितः ।
धृष्टि, जयंत, विजय, सिद्धार्थ, अर्थसाधक, अशोक, मंतपाल आणि सुमंत्र हे आठही मंत्री ध्वजा आणि आभूषणांनी विभूषित मत्त हत्तींवर चढून निघाले. ॥११ १/२॥
अपरे हेमकक्ष्याभिः सगजाभिः करेणुभिः ॥ १२ ॥

निर्ययुस्तुरगाक्रान्ता रथैश्च सुमहारथाः ।
दुसरे बरेचसे महारथी वीर सोनेरी दोर्‍यांनी कसलेल्या हत्तिणी, हत्ती, घोडे आणि रथांवर स्वार होऊन निघाले. ॥१२ १/२॥
शक्त्र्यृष्टिपाशहस्तानां सधजानां पताकिनाम् ॥ १३ ॥

तुरगाणां सहस्रैश्च मुख्यैर्मुख्यतरान्वितैः ।
पदातीनां सहस्रैश्च वीराः परिवृता ययुः ॥ १४ ॥
ध्वजा-पताकांनी विभूषित हजारो उत्तम उत्तम घोडे आणि घोडेस्वार, तसेच हातात शक्ति, ऋष्टि आणि पाश धारण करणारे हजारो पायदळ योद्ध्यांनी घेरलेले वीर पुरुष श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी नेले गेले. ॥१३-१४॥
ततो यानान्युपारूढाः सर्वा दशरथस्त्रियः ।
कौसल्यां प्रमुखे कृत्वा सुमित्रां चापि निर्ययुः ॥ १५ ॥

कैकेय्या सहिताः सर्वा नन्दिग्राममुपागमन् ॥ १६ ॥
त्यानंतर दशरथ महाराजांच्या सर्व राण्या वाहनावर चढून कौसल्या आणि सुमित्रा यांना पुढे करून निघाल्या तसेच कैकेयी सहित सर्वच्या सर्व नंदिग्रामात येऊन पोहोचल्या. ॥१५-१६॥
द्विजातिमुख्यैर्धर्मात्मा श्रेणीमुख्यैः सनैगमैः ।
माल्यमोदक हस्तैश्च मन्त्रिभिर्भरतो वृतः ॥ १७ ॥

शङ्‌खभेरीनिनादैश्च बन्दिभिश्चाभिनन्दितः ।
आर्यपादौ गृहीत्वा तु शिरसा धर्मकोविदः ॥ १८ ॥
धर्मात्मा तसेच धर्मज्ञ भरत मुख्य मुख्य ब्राह्मण, व्यवसायी वर्गांतील प्रधान, वैश्य तसेच हातात माळा आणि मिठाई घेतलेल्या मंत्र्यांनी घेरून आपल्या मोठ्‍या भावाच्या चरणपादुका मस्तकावर धारण करून शंख आणि भेरींच्या गंभीर ध्वनिसह निघाले. त्या समयी बंदीजन त्यांचे अभिनंदन करीत होते. ॥१७-१८॥
पाण्डुरं छत्रमादाय शुक्लमाल्योपशोभितम् ।
शुक्ले च वालव्यजने राजार्हे हेमभूषिते ॥ १९ ॥
श्वेत माळांनी सुशोभित पांढरे रंगाचे छत्र तसेच राजांच्या योग्य सोन्यांनी मढविलेल्या दोन श्वेत चवर्‍याही त्यांनी आपल्या बरोबर घेऊन ठेवल्या होत्या. ॥१९॥
उपवासकृशो दीनः चीरकृष्णाजिनाम्बरः ।
भ्रातुरागमनं श्रुत्वा तत्पूर्वं हर्षमागतः ॥ २० ॥
भरत उपवासामुळे दीन आणि दुर्बळ झाले होते. त्यांनी चीर वस्त्रे आणि कृष्ण मृगचर्म धारण केलेले होते. भावाचे आगमन ऐकून प्रथमच त्यांना महान्‌ हर्ष झालेला होता. ॥२०॥
प्रत्युद्ययौ तदा रामं महात्मा सचिवैः सह ।
अश्वानां खुरशब्दैश्च रथनेमिस्वनेन च ॥ २१ ॥

शंखदुंदुहिनादेन संचचालेव मेदिनी ।
गजानां बृंहितैश्चापि शंखदुंदुभिनिःस्वनैः ॥ २२ ॥
महात्मा भरत त्या समयी श्रीरामांच्या स्वागतासाठी पुढे निघाले. घोड्‍यांच्या टापांचा, रथांच्या चाकांच्या, नेमींचा आणि शंख आणि दुंदिभींचा गंभीर नाद यामुळे सारी पृथ्वी जणु हलत असल्यासारखी वाटत होती. शंख आणि दुंदुभी यांच्या ध्वनिमध्ये मिसळलेल्या हत्तींच्या गर्जनेचा शब्दही जणु भूतलाला कंपित करीत होता. ॥२१-२२॥
कृत्स्नं तु नगरं तत् तु नन्दिग्राममुपागमत्
समीक्ष्य भरतो वाक्यं उवाच पवनात्मजम् ॥ २३ ॥
भरतांनी जेव्हा पाहिले की अयोध्यापुरीचे सर्व नागरिक नंदिग्रामात आले आहेत तेव्हा त्यांनी पवनपुत्र हनुमानांना म्हटले - ॥२३॥
कच्चिन्न खलु कापेयी सेव्यते चलचित्तता ।
न हि पश्यामि काकुत्स्थं राममार्यं परंतपम् ॥ २४ ॥

कश्चिन्न चानुदृश्यन्ते कपयः कामरूपिणः ।
वानरवीरा ! वानरांचे चित्त स्वभावतः चंचल असते. आपण त्या गुणाचे तर सेवन केलेले नाही ना- श्रीरामांच्या येण्याची खोटीच बातमी तर पसरविलेली नाही ना, कारण की मला अद्यापपर्यंत परंतप काकुत्स्थ आर्य श्रीरामांचे दर्शन होत नाही आहे. तसेच इच्छेनुसार रूप धारण करणारे वानरही कोठे दृष्टिगोचर होत नाहीत ? ॥२४ १/२॥
अथैवमुक्ते वचने हनूमानिदमब्रवीत् ॥ २५ ॥

अर्थं विज्ञापयन्नेव भरतं सत्यविक्रमम् ।
भरतांनी असे म्हटल्यावर - हनुमानांनी सार्थक आणि सत्य गोष्ट सांगण्यासाठी त्या सत्यपराक्रमी भरतांना म्हटले - ॥२५ १/२॥
सदा फलान् कुसुमितान् वृक्षान् प्राप्य मधुस्रवान् ॥ २६ ॥

भरद्वाजप्रसादेन मत्तभ्रमरनादितान् ।
मुनिवर भरद्वाजांच्या कृपेने रस्त्यांतील सर्व वृक्ष सदा फुलणारे- फळणारे झाले आहेत आणि त्यांच्यातून मधाच्या धारा पडत आहेत. त्या वृक्षांवर मत्त भ्रमर निरंतर गुंजारव करत आहेत. त्यांची प्राप्ति झाल्याने वानरलोक आपली भूक-तहान शमविण्यात लागले आहेत. ॥२६ १/२॥
तस्य चैव वरो दत्तो वासवेन परंतप ॥ २७ ॥

ससैन्यस्य तदातिथ्यं कृतं सर्वगुणान्वितम् ।
परंतप ! देवराज इंद्रांनीही श्रीरामांना असेच वरदान दिले होते. म्हणून भरद्वाजांनी सेनेसहित श्रीरामचंद्रांच्या सर्व गुणसंपन्न - सांगोपांग अतिथि-सत्कार केला आहे. ॥२७ १/२॥
निस्वनः श्रूयते भीमः प्रहृष्टानां वनौकसाम् ॥ २८ ॥

मन्ये वानरसेना सा नदीं तरति गोमतीम् ।
परंतु पहा आता हर्षाने भरलेल्या वानरांचा भयंकर कोलाहल ऐकू येत आहे. असे कळून येत आहे की या समयी वानरसेना गोमतीला पार करीत असावी. ॥२८ १/२॥
रजोवर्षं समुद्‌भूसतं पश्य वालुकिनीं प्रति ॥ २९ ॥

मन्ये सालवनं रम्यं लोलयन्ति प्लवङ्‌गमाः ।
तिकडे सालवनाकडे पहा, कशी धुळीची वृष्टि होत आहे. मी समजतो आहे की वानरलोक रमणीय सालवनाला आंदोलित करीत आहेत. ॥२९ १/२॥
तदेतद् दृश्यते दूराद् विमानं चन्द्रसंनिभम् ॥ ३० ॥

विमानं पुष्पकं दिव्यं मनसा ब्रह्मनिर्मितम् ।
रावणं बान्धवैः सार्धं हत्वा लब्धं महात्मना ॥ ३१ ॥
हे घ्या, हे आले पुष्पक विमान, जे दुरून चंद्रम्याप्रमाणे दिसून येत आहे. या दिव्य पुष्पक-विमानाला विश्वकर्म्याने आपल्या मनाच्या संकल्पानेच रचले होते. महात्मा श्रीरामांनी रावणाला बंधु-बांधवासह मारून हे प्राप्त केले आहे. ॥३०-३१॥
तरुणादित्य संकाशं विमानं रामवाहनम् ।
धनदस्य प्रसादेन दिव्यं एतन्मनोजवम् ॥ ३२ ॥
श्रीरामांचे वाहन बनलेले हे पुष्पक विमान प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे प्रकाशित होत आहे. याचा वेग मनासारखा आहे. हे दिव्य विमान ब्रह्मदेवांच्या कृपेने कुबेराला प्राप्त झाले होते. ॥३२॥
एतस्मिन्भ्रातरौ वीरौ वैदेह्या सह राघवौ ।
सुग्रीवश्च महातेजा राक्षसेन्द्रो विभीषणः ॥ ३३ ॥
यातच वैदेही सीतेसह ते दोघे रघुवंशीवीर बंधु बसलेले आहेत. आणि यातच महातेजस्वी सुग्रीव तसेच राक्षस विभीषण ही विराजमान आहेत. ॥३३॥
ततो हर्षसमुद्‌भू तो निःस्वनो दिवमस्पृशत् ।
स्त्रीबालयुव वृद्धानां रामोऽयमिति कीर्तितः ॥ ३४ ॥
हनुमानांनी इतके म्हणेपर्यंत तर स्त्रिया, बालके, युवक आणि वृद्ध, सर्व पुरवासी यांच्या मुखांतून अहो ! हे पहा राम येत आहेत ! असे उद्‍गार बाहेर पडले. त्या नागरिकांचा तो हर्षनाद स्वर्गलोकापर्यंत निनादला. ॥३४॥
रथकुञ्जरवाजिभ्यः तेऽवतीर्य महीं गताः ।
ददृशुस्तं विमानस्थं नराः सोममिवाम्बरे ॥ ३५ ॥
सर्व लोक हत्ती, घोडे आणि रथावरून उतरले तसेच पृथ्वीवर उभे राहून विमानावर विराजमान असलेल्या श्रीरामचंद्रांचे, आकाशांतील प्रकाशित चंद्रदेवाचे दर्शन घ्यावे त्याप्रमाणे दर्शन घेऊ लागले. ॥३५॥
प्राञ्जलिर्भरतो भूत्वा प्रहृष्टो राघवोन्मुखः ।
यथार्थेनार्घ्यपाद्याद्यैः ततो राममपूजयत् ॥ ३६ ॥
भरत श्रीराघवांकडे दृष्टि लावून हाथ जोडून उभे राहिले. त्यांचे शरीर हर्षाने पुलकित झाले होते. त्यांनी दुरूनच अर्घ्य-पाद्य आदिंच्या द्वारा श्रीरामांचे विधिवत पूजन केले. ॥३६॥
मनसा ब्रह्मणा सृष्टे विमाने भरताग्रजः ।
रराज पृथुदीर्घाक्षो वज्रपाणिरिवामरः ॥ ३७ ॥
विश्वकर्म्याच्या द्वारा रचित विमानात बसलेले विशाल नेत्र असणारे भरताग्रज भगवान्‌ श्रीराम देवराज इंद्रांप्रमाणे शोभत होते. ॥३७॥
ततो विमानाग्रगतं भरतो भ्रातरं तदा ।
ववन्दे प्रणतो रामं मेरुस्थमिव भास्करम् ॥ ३८ ॥
विमानाच्या वरील भागात बसलेल्या श्रीरामांकडे दृष्टि जाताच, भरतांनी जसे मेरू शिखरावर उदित सूर्यदेवांना द्विजलोक प्रणाम करतात, त्याप्रकारे त्यांना प्रणाम केला. ॥३८॥
ततो रामाभ्यनुज्ञातं तद् विमानमनुत्तमम् ।
हंसयुक्तं महाबेगं निपपात महीतलम् ॥ ३९ ॥
इतक्यातच श्रीरामांची आज्ञा मिळून ते महान्‌ वेगशाली हंसयुक्त उत्तम विमान पृथ्वीवर उतरून आले. ॥३९॥
आरोपितो विमानं तद् भरतः सत्यविक्रमः ।
राममासाद्य मुदितः पुनरेवाभ्यवादयत् ॥ ४० ॥
भगवान्‌ श्रीरामांनी सत्यपराक्रमी भरतांना विमानावर चढविले आणि त्यांनी श्रीरघुनाथांजवळ जाऊन आनंदविभोर होऊन पुन्हा त्यांच्या श्रीचरणांना साष्टांग प्रणाम केला. ॥४०॥
तं समुत्थाप्य काकुत्स्थः चिरस्याक्षिपथं गतम् ।
अङ्‌के भरतमारोप्य मुदितः परिषस्वजे ॥ ४१ ॥
दीर्घकाळानंतर दृष्टिपथात आलेल्या भरताला उठवून काकुत्स्थ श्रीरामांनी आपल्या मांडीवर बसविले आणि अत्यंत हर्षाने त्यांना हृदयाशी धरले. ॥४१॥
ततो लक्ष्मणमासाद्य वैदेहीं च परंतपः ।
अभ्यवादयत प्रीतो भरतो नाम चाब्रवीत् ॥ ४२ ॥
तत्पश्चात्‌ परंतप भरतांनी लक्ष्मणांना भेटून - त्यांचा प्रणाम ग्रहण करून वैदेही सीतेला अत्यंत प्रसन्नतेने प्रणाम केला आणि आपले नामही सांगितले. ॥४२॥
सुग्रीवं कैकयी पुत्रो जाम्बवन्तं अथाङ्‌गदम् ।
मैन्दं च द्विविदं नीलं ऋषभं चैव सस्वजे ॥ ४३ ॥

सुषेणं च नलं चैव गवाक्षं गन्धमादनम् ।
शरभं पनसं चैव परितः परिषस्वजे ॥ ४४ ॥
यानंतर कैकेयीकुमार भरतांनी सुग्रीव, जाम्बवान्‌, अंगद, मैंद, द्विविद, नील, ऋषभ, सुषेण, नल, गवाक्ष, गंधमादन, शरभ आणि पनस यांना पूर्णरूपाने आलिंगन दिले. ॥४३-४४॥
ते कृत्वा मानुषं रूपं वानराः कामरूपिणः ।
कुशलं पर्यपृच्छंस्ते प्रहृष्टा भरतं तदा ॥ ४५ ॥
ते इच्छेनुसार रूप धारण करणारे वानर मानवरूप धारण करून भरतास भेटले आणि त्यांनी सर्वांनी महान्‌ हर्षाने उल्लसित होऊन त्या समयी भरतांना त्यांचा कुशल समाचारही विचारला. ॥४५॥
अथाब्रवीद् राजपुत्रः सुग्रीवं वानरर्षभम् ।
परिष्वज्य महातेजा भरतो धर्मिणां वर ॥ ४६ ॥
धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ महातेजस्वी राजकुमार भरतांनी वानरराज सुग्रीवास हृदयाशी धरून त्यांना म्हटले- ॥४६॥
त्वमस्माकं चतुर्णां वै भ्राता सुग्रीव पञ्चमः ।
सौहृदाज्जयते मित्रं अपकारोऽरिलक्षणम् ॥ ४७ ॥
सुग्रीव ! तुम्ही आम्हा चौघांचे पाचवे भाऊ आहात, कारण की स्नेहपूर्वक उपकार करण्यानेच कोणी मित्र होत असतो (आणि मित्र आपला भाऊच असतो.) अपकार करणेच शत्रूचे लक्षण आहे. ॥४७॥
विभीषणं च भरतः सान्त्ववाक्यमथाब्रवीत् ।
दिष्ट्या त्वया सहायेन कृतं कर्म सुदुष्करम् ॥ ४८ ॥
यानंतर भरतांनी विभीषणांना सान्त्वना देत त्यांना म्हटले - राक्षसराज ! अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे की आपली सहायता मिळून श्रीरघुनाथांनी अत्यंत दुष्कर कार्य पूरे केले आहे. ॥४८॥
शत्रुघ्नश्च तदा रामं अभिवाद्य सलक्ष्मणम् ।
सीतायाश्चरणौ वीरो विनयादभ्यवादयत् ॥ ४८ ॥
याच वेळी शत्रुघ्नांनीही श्रीरामांना लक्ष्मणासह प्रणाम करून सीतेच्या चरणीं विनयपूर्वक मस्तक नमविले. ॥४९॥
रामो मातरमासाद्य विवर्णां शोककर्शिताम् ।
जग्राह प्रणतः पादौ मनो मातुः प्रहर्षयन् ॥ ५० ॥
माता कौसल्या शोकामुळे अत्यंत दुर्बळ आणि कान्तिहीन झाली होती. तिच्याजवळ पोहोचतांच श्रीरामांनी प्रणत होऊन तिचे दोन्ही चरण पकडले आणि मातेच्या मनाला अत्यंत हर्ष प्रदान केला. ॥५०॥
अभिवाद्य सुमित्रां च कैकेयीं च यशस्विनीम् ।
स मातॄश्च तदा सर्वाः पुरोहितं उपागमत् ॥ ५१ ॥
नंतर सुमित्रा आणि यशस्विनी कैकेयीलाही प्रणाम करून त्यांनी सर्व मातांना अभिवादन केले. यानंतर ते राजपुरोहित वसिष्ठांच्या जवळ आले. ॥५१॥
स्वागतं ते महाबाहो कौसल्यानन्दवर्धन ।
इति प्राञ्जलयः सर्वे नागरा राममब्रुवन् ॥ ५२ ॥
त्या समयी अयोध्येचे समस्त नागरिक हात जोडून श्रीरामचंद्रांना एकाच वेळी म्हणाले - कौसल्यानंदवर्धन महाबाहु श्रीरामा ! आपले स्वागत आहे, स्वागत आहे ! ॥५२॥
तान्यञ्जलिसहस्राणि प्रगृहीतानि नागरैः ।
आकोशानीव पद्मानि ददर्श भरताग्रजः ॥ ५३ ॥
भरताग्रज श्रीरामांनी पाहिले फुललेल्या कमळांप्रमाणे नागरिकांच्या हजारो ओंजळी त्यांच्याकडे उचलल्या गेल्या होत्या. ॥५३॥
पादुके ते तु रामस्य गृहीत्वा भरतः स्वयम् ।
चरणाभ्यां नरेन्द्रस्य योजयामास धर्मवित् ॥ ५४ ॥

अब्रवीच्च तदा रामं भरतः स कृताञ्जलिः ।
त्यानंतर धर्मज्ञ भरतांनी स्वतःच श्रीरामांच्या त्या चरणपादुका घेऊन त्या महाराजांच्या चरणी घातल्या आणि हात जोडून त्यासमयी त्यांना म्हटले - ॥५४ १/२॥
एतत् ते सकलं राज्यं न्यासं निर्यातितं मया ॥ ५५ ॥

अद्य जन्म कृतार्थं मे संवृत्तश्च मनोरथः ।
यत् त्वां पश्यामि राजानं अयोध्यां पुनरागतम् ॥ ५६ ॥
प्रभो ! माझ्या जवळ ठेव म्हणून ठेवलेले आपले हे सारे राज्य मी आपल्या चरणी आज परत केले आहे. आज माझा जन्म सफल झाला आहे. माझा मनोरथ पूरा झाला, जो मी अयोध्यानरेश आपणास श्रीरामास पुन्हा अयोध्येमध्ये परत आलेले पहात आहे. ॥५५-५६॥
अवेक्षतां भवान् कोशं कोष्ठागारं गृहं बलम् ।
भवतस्तेजसा सर्वं कृतं दशगुणं मया ॥ ५७ ॥
आपण राज्याचा खजिना, कोठार, घर आणि सेना सर्व पाहून घ्यावे. आपल्या प्रतापाने या सार्‍या वस्तु पूर्वीपेक्षा दसपट झाल्या आहेत. ॥५७॥
तथा ब्रुवाणं भरतं दृष्ट्‍वा तं भ्रातृवत्सलम् ।
मुमुचुर्वानरा बाष्पं राक्षसश्च विभीषणः ॥ ५८ ॥
भ्रातृवत्सल भरतांना याप्रकारे सांगतांना पाहून समस्त वानर आणि राक्षसराज विभीषण नेत्रांतून अश्रु ढाळू लागले. ॥५८॥
ततः प्रहर्षाद्‌भयरतं अङ्‌कमारोप्य राघवः ।
ययौ तेन विमानेन ससैन्यो भरताश्रमम् ॥ ५९ ॥
या नंतर राघवांनी भरतांना अत्यंत हर्ष आणि स्नेहाने मांडीवर बसवून विमानाद्वाराच सेनेसहित त्यांच्या आश्रमावर गेले. ॥५९॥
भरताश्रममासाद्य ससैन्यो राघवस्तदा ।
अवतीर्य विमानाग्राद् अवतस्थे महीतले ॥ ६० ॥
भरतांच्या आश्रमात पोहोचून सेनेसहित राघव विमानातून भूतलावर उतरले आणि उभे राहिले. ॥६०॥
अब्रवीत् तु तदा रामः तद् विमानमनुत्तमम् ।
वह वैश्रवणं देवं अनुजानामि गम्यताम् ॥ ६१ ॥
त्यासमयी श्रीरामांनी त्या उत्तम विमानास म्हटले - विमानराज ! मी तुला आज्ञा देत आहे, आता तू येथून देवप्रवर कुबेराच्याच जवळ निघून जा आणि त्यांच्याच सेवेमध्ये राहा. ॥६१॥
ततो रामाभ्यनुज्ञातं तद् विमानमनुत्तमम् ।
उत्तरां दिशमुद्दिश्य जगाम धनदालयम् ॥ ६२ ॥
श्रीरामांची आज्ञा मिळतांच ते परम उत्तम विमान उत्तर दिशेला लक्ष्य करून कुबेरांच्या स्थानी निघून गेले. ॥६२॥
विमानं पुष्पकं दिव्यं संगृहीतं तु रक्षसा ।
अगमद् धनदं वेगाद् रामवाक्यप्रचोदितम् ॥ ६३ ॥
राक्षस रावणाने त्या दिव्य पुष्पक विमानावर बळपूर्वक अधिकार मिळवला होता, तेच आता श्रीरामचंद्रांच्या आज्ञेने प्रेरित होऊन वेगपूर्वक कुबेराच्या सेवेमध्ये निघून गेले. ॥६३॥
पुरोहितस्यात्मसखस्य राघवो
बृहस्पतेः शक्र इवामराधीपः ।
निपीड्य पादौ पृथगासने शुभे
सहैव तेनोपविवेश वीर्यवान् ॥ ६४ ॥
तत्पश्चात्‌ पराक्रमी राघवांनी आपला सखा पुरोहित वसिष्ठ पुत्र सुयज्ञाचे (अथवा आपले परम सहायक पुरोहित श्रीवसिष्ठांचे) चरणास स्पर्श केला, जसे देवराज इंद्र बृहस्पतिंच्या चरणांना स्पर्श करतात त्याप्रमाणेच. नंतर त्यांना एका सुंदर पृथक आसनावर विराजमान करून त्यांच्या बरोबर दुसर्‍या आसनावर ते स्वतःही बसले. ॥६४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्तविंशत्यधिकशततमः सर्गः ॥ १२७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेसत्ताविसावा सर्ग पूरा झाला. ॥१२७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP